छापा-काटा, मधल्या वाटा (लंडन ३)

Submitted by Arnika on 21 October, 2019 - 08:34

dreamsscales.png

इतिहासाचा वर्ग भरल्याची घंटा झाली. डॉक्टर बोनेटा समोरच्या टेबलावरच्या मुलींचा गृहपाठ गोळा करायला लागले. फार काही नाही, दोन पानांची प्रश्नउत्तरं होती. इतक्यात धाड्दिशी वर्गाचं मागचं दार उघडलं आणि आमच्या शाळेतला दांडोबा आत आला. मलासुद्धा धिप्पाड वाटेलसा बांधा, सोनेरी केसांचा उजव्या कानावर बांधलेला अंबाडा (असला शकुंतला अंबाडा घातलेली कोणीतरी मुलगी ओंकार स्वरूपावर दीपनृत्य करत नसतानाही दिसू शकते यावर इंग्लंडला गेल्यापासून माझा विश्वास बसायला लागला होता), सतत च्युइंग गम रवंथ केल्याची मचक मचक आणि गळ्यातल्या चेनला बांधलेली एक बारकी पेन्सिल. कार्लीन माझ्याशेजारच्या खुर्चीत येऊन आदळली. शाळेत दप्तर घेऊन येण्यासारखा हीन प्रकार ती कधीच करायची नाही. तिने माझं दप्तर उघडून त्यातला एक कोरा कागद घेतला आणि गळ्यातली पेन्सिल सोडवत मला म्हणाली, “ए, बघू गं तुझा गृहपाठ.”
“मी नाही दाखवणार. तुझा तू करून आणत जा ना.”
“दे गं ए कुत्रे, मला काय करायचंय मेलेल्या माणसांबद्दल शिकून? पास होण्यापुरतं तू लिहिलेलं एक पान दाखव.”
हे दोन महिने दररोज चालू होतं. गणित आणि फ्रेंच वगळता सगळ्या विषयांचा अभ्यास ती माझ्या वहीतून जसाच्या तसा उतरवून काढायची. गणितात तिचं मन रमत होतं म्हणून, आणि सुरुवातीला फ्रेंचमध्ये मला तिच्यापेक्षाही वाईट मार्क पडायचे म्हणून त्या दोन विषयांसाठी कार्लीनची भिस्त माझ्यावर नव्हती. उगाच नव्या शाळेत वैर नको म्हणून वर्गात मी गुमान तिला गृहपाठ कॉपी करू द्यायचे, पण तोंड वेंगाडून निषेध नोंदवायचे. माझ्या वाकड्या तोंडाची तिला काहीही फिकीर नव्हती. ती दररोज तितक्याच हक्काने माझ्या दप्तरावर डल्ला मारायची.

मी इंग्लंडच्या शाळेत जायला लागल्यावर चार चांगल्या मुलींकडे माझी जबाबदारी द्यावी म्हणून मिसेस पर्सिव्हलनी मला ज्या टेबलावर बसवलं तिथल्या एकीची मैत्रीण होती कार्लीन. पहिले दोन दिवस तिने माझ्याशी बोलायचा प्रयत्न केला, पण मला तिचं काही समजत नव्हतं आणि तिच्याशी बोलता तर अजिबात येत नव्हतं. ती अशी काही वैतागली, की माझी हनुवटी हातात धरून म्हणाली, “You know, I tried but I really hate you.” मला वाटलं हनुवटी हातात घेऊन हसून बोलत्ये म्हणजे माझी कोडकौतुकं चालली आहेत. मी thank you म्हंटलं! मला इंग्लिश समजत नाही म्हणून त्या क्षणी कार्लीनला माझी इतकी दया आली, की तेव्हापासून ती सतत माझ्या आगेमागे रहायला लागली. मी साधं सँडविच नेलं तरी माझ्या जेवणाच्या डब्याला विचित्र वास येतो म्हणायची, पेपर कॉपी करायची, वेण्या ओढायची, शिव्या शिकवायची, त्रास द्यायची, पण काही केल्या माझी पाठ सोडायची नाही. मी जवळजवळ रडकुंडीला यायचे.

अँबर नावाची तिची घनिष्ट मैत्रीण वागा-बोलायला अगदी मवाळ होती. कार्लीनसारखी ती इतरांवर दादागिरी करायची नाही, पण कार्लीनने केली तर ही तिला अडवायचीही नाही. अँबर चार-सहा महिन्यांनी कधीतरी शाळेतून गायबच झाली. मग अचानक डिसेंबरच्या प्रीलिम्सना आली तेव्हा परीक्षाखोलीच्या बाहेर मला ती भेटली.
“All right, goody two shoes?” अति गुणी वागणाऱ्यांना इंग्लिशमध्ये गुडी टू शूज़ म्हणतात. कार्लीन आणि अँबर मला अशीच हाक मारायच्या. फार लाडात आल्या तर “ए कुत्रे”. अँबरच्या चेहऱ्याला सुंदर लकाकी आली होती. कमरेमागे शाल घेऊन ती भिंतीला टेकून उभी होती तरीही तिला पोटाचं नव्याने वाढलेलं वजन पेलत नव्हतं. एका हातात कंपासपेटी आणि दुसऱ्यात अंडं-पाव घेऊन ती दोन जिवांचं जेवत होती. “आज डावीकडे सरकून बसू नको, तुझा पेपर नाही दिसला तरी चालेल. प्रीलिम्स पास नाही झाले तरी हरकत नाही, आज फक्त हजेरी महत्त्वाची. आवशी येईल पेपर झाल्यावर तोवर बसून राहायचं फक्त.”

किती साधी वाटली होती ही! कार्लीनसमोर कोणीही साधंच वाटेल म्हणा. पण मग कार्लीन परवडली की; तिला बाळ तरी नाही होणारे या वयात. अत्ता दहावीत बाळ होणारे हिला? आणि एवढं होऊनही तिची आई तिला गाडीने घ्यायला येणार आहे? अँबरसुद्धा अगदीच ‘हे’ मुलगी निघली वाटतं.

प्रीलिम्सचा शेवटचा पेपर झाला त्यादिवशी सकाळपासून शाळेत काहीतरी खलबतं चालली होती. फाटकापाशी काही मुलींनी विटा गोळा करून ठेवल्या होत्या. पेपर संपल्यावर स्कर्ट उतरवून शाळेच्या आवारातच पोरींनी लेंगे अंगात चढवले. इतक्यात एक वेगळाच युनिफॉर्म घातलेली मुलगी शाळेच्या कुंपणावरून उडी टाकून आत आली. वरच्या वर्गातल्या एका मुलीची तिने कॉलर धरली आणि दोन-पाच मिनिटं दोघी पोरींची मारामारी आणि शिवीगाळ चालूच होती. कोपऱ्यावर त्या वेस्टवूड शाळेच्या पोरींचा ताफा होता. आमच्या शाळेतल्या सगळ्या दांडोब्यांनीही विटा हातात घेतल्या. असला राडा म्हणजे कार्लीनच्या हातचा मळ! तिनेही भराभर विटा उचलल्या आणि फाटकापाशी जायला लागली.

एव्हाना गडबडीचा सुगावा लागून शिक्षक बाहेर आले होते, पण हे सरकतं युद्ध होतं त्यामुळे जमाव रस्त्यावर लढायला उतरला. दोन मुलींच्या मोहल्ल्यातली मारामारी होती तिचा शाळांशी काहीच संबंध नव्हता. पण झालं असं की त्या दोन मुलींचे मावळे सकाळी गावभर फिरून मुलींना “तू शॉन्टेलच्या बाजूने आहेस की डॅनिएलाच्या बाजूने” असं विचारत फिरत होते. त्यांच्या गल्लीपल्याड कोणाला माहित कोण शॉन्टेल आणि कोण डॅनिएला? दोन-तीन शाळांमधे ही सर्वेक्षणाची टीम पोचलेली होती आणि त्यांनी जबरदस्त डेटा गोळा केला होता. ओळख ना पाळख लोकमान्य टिळक तत्त्वावर तीन शाळांची गर्दी आमच्या शाळेबाहेर जमली. मी शांतपणे घराचा रस्ता धरला. माझ्या शाळेत नक्की शॉन्टेल होती की डॅनिएला हेही मला माहित नव्हतं आणि पावनखिंड जवळ येत चालली होती. आता पोलिसांच्या गाड्यांचे आवाजही येत होते. एवढ्यात आली एक धटिंगण, मी कोणाच्या बाजूची आहे असं विचारत. कार्लीनने कुठून पाहिलं कोणास ठाऊक? ताबडतोबड ती त्या मुलीला धरत म्हणाली, “तुला काय करायचंय? ती नवीन आहे तिला हात नाही लावायचा.” पोलीस जवळ आले तसा तिने त्या मारामारीतून काढता पाय घेतला आणि तिच्या दोन रिद्धी-सिद्धींना मला सोबत म्हणून घरापर्यंत सोडून यायला सांगितलं (पुढे अर्ध्या तासाचा रस्ता होता, थोडाथोडका नव्हे. गरोदर असूनही अँबर शेवटपर्यंत आली)! म्हणे “उद्या ही मुलगी मला धडधाकट दिसली पाहिजे शाळेत; पहिला तासच विज्ञानाचा आहे आणि मला केमिस्ट्रीतलं घंटा काही कळत नाही”.

डॅनिएला आमच्या शाळेची होती म्हणे. त्यादिवशी बरगडीला तडा गेल्याने सहा आठवडे दवाखान्यातच होती ती. बऱ्याच जणींना जरा जरा दुखापत झाली होती. मला मात्र कुठे साधा ओरखडाही उठला नव्हता. अत्ता हे वाचणारे आई-बाप घाबरले असतील. त्यांना भीती बसावी असा माझा अजिबात हेतू नाही. असल्या मारामाऱ्या जवळपास कधीच होत नाहीत आणि भांडणांचा सुगावा लागला तरी ती विकोपाला जाऊ नयेत म्हणून शिक्षक आधीपासूनच लक्ष ठेवून असतात. शिवाय (मी हे टाळत होते, पण आता जाऊ दे, म्हणूनच टाकते) आमच्यावेळी असं नव्हतं. मी दोन वर्ष त्या शाळेत असताना एकदाच असं घडलं आणि तेव्हा खबर मिळूनही त्या अफवा असतील असं म्हणत शिक्षक जरा गाफील राहिले होते.

त्यादिवशी कार्लीनने वाचवलं पण तीही वीट घेऊन मारामारीत सापडलीच होती. आता त्या उपकाराच्या बदल्यात, चुकीचं आहे हे समजत असूनही, तिला कॉपी करू द्यायची का? मी हे सहन करून आणि तिला पाठीशी घालून खूप मोठी चूक करत होते का? कॉपी करणाऱ्या, शाळेमागच्या झाडीत बसून सिगरेट ओढणाऱ्या, च्युइंग गममधला रस संपल्यावर ती टेबलखाली चिकटवणाऱ्या या नाठाळ मुलीशेजारी बसायला लागणं म्हणजे वाईट संगतच होती. अँबर सोळाव्या वर्षी गरोदर होती म्हणजे तिची संगत नक्कीच वाईट असणार. की त्यातही ती मला घरापर्यंत सोडायला थंडीतून चालत आली म्हणजे ती चांगली? किती विचित्र असतात या स्पष्टपणे चूक किंवा बरोबर नसणाऱ्या गोष्टी!

आम्ही रहात होतो त्या केंट परगण्यात ग्रामर स्कूल्स भरपूर होत्या. मुलं अकरा वर्षांची झाली की एक प्रवेश परीक्षा होते. त्यात चांगले मार्क मिळालेली पोरं ग्रामर स्कूलमध्ये जातात आणि उरलेली सर्वसमावेशक शाळेत. दोन्ही प्रकार सरकारी शाळांचेच, त्यामुळे दोन्हीकडे शिक्षण विनाशुल्क होतं. ज्या भागात तथाकथित हुशार मुलांच्या अशा वेगळ्या शाळा नसतात तिकडे प्रत्येक शाळेत शालेय अभ्यासात रुची असलेली आणि लौकिकार्थाने हुशार न समजली जाणारी अशी सगळ्या त-हेची मुलं असतात. आमच्या केमिस्ट्रीच्या मिस लूकस म्हणायच्या की लहानपणापासून तुम्ही मार्कांच्या आधारावर शाळा वेगळ्या केल्यात तर मुलांना खोट्या जगात रहायची सवय लावता तुम्ही. मग समाजातली सगळ्या प्रकारची हुशारी आणि सगळ्या प्रकारच्या उणिवा आपल्या भोवतालाचा भाग आहेत आणि त्यांच्याचबरोबर आपल्याला जन्म काढायचा आहे ही जाणीव मुलांमध्ये रुजत नाही.

काहीशा अशा विचारांती देशाच्या अनेक भागांमधल्या ग्रामर स्कूल्स आता खालसा करण्यात आल्या आहेत, पण केंटमध्ये अजूनही मार्कवार विभाजन चालतं. आता आमच्या आसपासच्या दोन गावांत मिळून सहा ग्रामर स्कूल्स असल्याने अभ्यासात थोडाफार रस असलेली बहुतांश पोरं त्या शाळांमध्ये गेलेली होती. उरलेल्या शाळांमध्ये अभ्यासात त्यामानाने कमी गती किंवा रस असलेली पोरं उरली होती. एकदम दहावीत प्रवेश घ्यायचा, तोही विशेष इंग्लिश येत नसताना, म्हणजे कुठल्या ग्रामर स्कूलमध्ये जाणं मला शक्यच नव्हतं. मी अकरावीच्या बोर्डाच्या परीक्षा होईस्तोवर सर्वसमावेशक कन्याशाळेत गेले.

मी ठाण्यात असताना दुपारी पाच तास शाळा, मग बिल्डिंगच्या आवारात माफक मैदानी खेळ, गाणं किंवा नृत्य, टाइमपास, रात्रीचं जेवण, मग पुस्तकं आणि टीव्ही, आठेक तास झोप आणि सकाळी उठून गृहपाठ अशा सवयींची होते. वर्गातली पहिल्या दहातली मुलं होती त्यांच्या मानाने फारच कमी शिस्तीची. एखादी तात्पुरती लहर वगळता “मी शाळा सोडून कुठल्याही अभ्यासाच्या क्लासला जाणार नाही” असं घोषित केलेली सेमी-बंडखोर मुलगी. आणि याच सगळ्या दुर्गुणांनी आणि दिनचर्येने मला इंग्लंडच्या शाळेत घासू, अभ्यासू, शहाणी वगैरे बिरुदं मिळवून दिली कारण पुस्तकी विषयांत रस असलेल्या फार कमी मुली माझ्या शाळेत होत्या. काहींना हेअरड्रेसर व्हायचं होतं. काहींना कपड्यांचं दुकान चालवायचं होतं. काहींना व्हायचंय कोण ते ठाऊक नव्हतं पण अठराव्या वर्षी कर्ज काढून डिग्री घेण्यापेक्षा नोकरी करायला सुरुवात करायची होती, तर एकदोघींना पोलिसात जायचं होतं. त्यांच्यात दोन वर्ष राहून मी उगाचच academic stardomचा आनंद घेतला.

अभ्यासाच्या बाबतीत सीरिअस नसलेली मुलं म्हणजे वाईट संगत. लग्न न झालेल्या आईबाबांच्या पोटी जन्मलेली मुलं म्हणजे चांगल्या घरची नाहीत. हेअरड्रेसर व्हायचं स्वप्न बाळगणाऱ्या मुली म्हणजे दुसरं काहीच न येणाऱ्या मुली. अठराव्या वर्षी शिक्षण सोडून पैसा कमवायला जाणारी माणसं म्हणजे हालाखीच्या परिस्थितीतून आलेली माणसं... हे सगळं कोणी मला कधी बोलून दाखवलं नव्हतं की माझ्याकडून पाठ करून घेतलं नव्हतं. आजुबाजूला काय चालतंय आणि त्यावर आसपासच्या माणसांची प्रतिक्रिया काय आहे ते बघून मी माझ्याशी बांधलेले आडाखे होते. त्यांपलिकडे जग असू शकतं ही शक्यताही मला मान्य नव्हती इतक्या घट्ट समजुती होत्या त्या.

तोवर मला ठाण्याच्या शाळेत असलेली संगतही मझ्यासारख्यांचीच होती. स्वभावाने किती का वेगळे असेनात, माझ्या तोपर्यंतच्या मित्रमैत्रिणींचं जग एकमेकांपेक्षा फारसं वेगळं नव्हतं. आमची स्वप्न काही एकमेकांपेक्षा फार वेगळ्या वाटांनी जाणारी नव्हती. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परीक्षा आणि छंदवर्ग सीरिअसली घेणं वगळता आयुष्याबद्दल सीरिअस असण्याचे काही मार्ग असतात हे त्या वयात आमच्या कोंडाळ्यात राहून समजण्यासारखं नव्हतं.

इंग्लंडला आली का पंचाईत! माझ्यासारखं म्हणावं असं कोणीच नाही. ना भाषेने ना विचारांनी, ना दिसायला ना वागायला, ना स्वप्नात ना जागेपणी. कोणीच नाही. तरीही या ना त्या कारणाने आमची मैत्री होतच होती. आमच्यात कॉमन काही नाही, आमचा ग्रूपच वेगळा आहे, आमचे विषयच वेगळे आहेत असं म्हणून नाकं मुरडण्याची चैन परवडण्यासारखी नव्हती. जी कोणी हसून बोलेल आणि शंभर वेळा माझ्या “पार्डन” म्हणण्याला कंटाळणार नाही ती माझी मैत्रीण. जी कोणी लायब्ररीपासून प्रयोगशाळेपर्यंत जायची वाट दाखवेल ती मैत्रीण. मला इंग्लिश समजत नसलं तरी जी शेजारी बसून शांतपणे सोबत करत डबा खाईल ती माझी मैत्रीण. बाकी त्या काही का करत असेनात! बालवाडीतले मैत्रीचे निकष असेच होते ते त्यानंतरच्या दहा वर्षात बरबटले असणार. इंग्लंडच्या शाळेत पाटी नव्याने कोरी झाली आणि नव्याने मैत्री होणं तितकंसं कष्टाचं काम उरलं नाही.

दीड वर्ष मी क्लोईच्या घरी जात-रहात होते. कितीतरी वेळा तिच्या आईबाबांशी गप्पा झाल्या होत्या. पण त्यांनी तरुणपणी साठवलेले पैसे घर घेण्यासाठी खर्च केले आणि म्हणून ते दोघं लग्न न करता बावीस वर्ष एकत्र रहात होते हे मला अकरावी संपता संपता समजलं. क्लोई आणि तिच्या दोन बहिणीही त्यांना ‘अशाच’ झाल्या होत्या. तरी बरी वाढ झाली होती की तिघींची. प्रेमाबिमात होतेच आईवडीलही; तेसुद्धा एकमेकांच्याच.

टिफ़नीला तर आईवडलांचा एक राखीव सेट होता. बाबांची बायको आणि आईचा नवरा दोघांचाही जीव होता म्हणे तिच्यावर. केटीच्या आईवडिलांचं जराही पटायचं नाही. दारू पिऊन त्यांच्यात कडाक्याची भांडणंही व्हायची. एक दिवस सोशल सर्व्हिसेसना बोलावून केटीने स्वतःच्या आईला घराबाहेर काढलं. दुसऱ्या दिवशी शाळेत येऊन इंग्लिशच्या वर्गात रोमिओ आणि ज्यूलिएटच्या खऱ्या प्रेमाबद्दल तिने घडाघडा पाच मिनिटांचं भाषण दिलं. सोरायाला शाळेत यायला रोज वीस मिनिटं उशीर व्हायचा. तिला तिच्यापेक्षा लहान सख्खी आठ भावंडं होती. बाबांचं मन त्या संसारातून उठून दुसरीकडे रमलं होतं त्यामुळे शाळेत येण्याआधी हिलाच आईला मदत करावी लागायची. मैत्रिणींचंच कशाला, “जन्मभर एकाच माणसावर प्रेम करत रहाणं ही कल्पनाही मला अशक्य वाटते” हे जेव्हा माझ्या आवडत्या मिसेस नोबल म्हणाल्या, तेव्हा एक आठवडा मी पूर्णपणे नास्तिक झाले होते. कार्यानुभव म्हणून मी महिनाभर ज्या प्राथमिक शाळेत शिकवायला जायचे तिथला सहा वर्षांचा एक मुलगा सतत थापा मारायचा. एक दिवस शाळेत मारामारी केलीन आणि रडत रडत म्हणाला, “मिस परांजपे, मला घरी सोडा.”
“अरे आई येईल ना तुझी; अर्ध्या तासात शाळा सुटणारे आता.”
“आई तुरुंगात असते.”
“हे बघ जेरेमी, इतकं खोटं बोलू नये हं. कसं वाटेल आईला शाळाभर अफवा पसरवल्यास तर?” मी शक्य तितक्या कनवाळू आवाजात म्हणाले, इतक्यात त्याच्या बाईंनी मला कोपऱ्यात बोलावलं.
“त्याची आई खरंच तुरुंगात आहे. विषय फार वाढवू नकोस.” बाई कानात कुजबुजल्या आणि निघून गेल्या.

आजुबाजूची सगळीच माणसं अशी नव्हती, पण जी होती त्या काही टीव्हीवरच्या व्यक्तिरेखा नव्हत्या. वेगळ्या ग्रूपमधल्या नव्हत्या. शहराच्या दुसऱ्या बाजूच्या तळागाळातल्या वस्तीतल्या नव्हत्या. ज्यांच्याशी माझा रोज संबंध यायचा त्या माझ्याच ग्रूपमधल्या, माझ्याच घरापाशी रहाणाऱ्या हाडामांसाच्या व्यक्ती होत्या. बऱ्या-वाईटातला फरक न कळण्याइतकी मी लहान नव्हते ही त्यातली मोलाची बाजू. सगळ्यांचं सगळं पटायचं नाही, मी लगालगा त्यांच्यासारखी वागले तर माझं भलं होणार नाही हे समजत होतं, पण जग असंही असू शकतं हे दररोज नव्याने दिसायचं. There is your truth and there is my truth. As for the universal truth, it does not exist (डॅन ब्राऊन आणि अमीश त्रिपाठी दोघांनी भांडावं या वाक्याच्या स्वामित्वावरून).

माझ्यासारख्या आवडीनिवडी असलेला, माझ्यासारखं घरदार असलेला गोतावळा इंग्लंडमध्ये सापडेपर्यंत मला चौकटीबाहेरच्या मंडळींशी मैत्री करायची सवय लागली; पर्यायाने जाईन तिथल्या जगात रमायची गोडी लागली. शेवटी ‘जग मोठं होणं’ म्हणजे काय? फक्त चार ठिकाणचं जेवण, चार भाषा, चार सुंदर देश बघणं म्हणजे जग मोठं होणं नसावं. आपल्यासारख्या नसलेल्या माणसांचे विचार, त्यांची कृतीही बरोबर असू शकते; आपल्या नसलेल्या नज़रियातूनही खूप काही बघण्यासारखं असतं; ‘आपल्या घरच्यांनी आपल्यावर केले आहेत ते’ यापलिकडेही संस्कारांची व्याख्या असू शकते; आणि काळ्या-पांढऱ्याच्या मधे असंख्य छटा भरत जाताना त्या पटावर आपण कुठे आहोत, या सगळ्याचं भान येणं म्हणजे असावं जग मोठं होणं. कारण as for the universal truth, it does not exist.

-अर्निका परांजपे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक वेगळंच जग उलगडते आहेस सगळ्यांसमोर.
तुझ्या आयुष्याला मी बऱ्याच वेळा आ वासून लहान मुलं अरेबियन नाईट्स मधले चमत्कार वाचतात तशी वाचत असते.

बाई ग!

चौकटीबाहेरच्या मंडळींशी मैत्री करायची सवय लागली; पर्यायाने जाईन तिथल्या जगात रमायची गोडी लागली. शेवटी ‘जग मोठं होणं’ म्हणजे काय? फक्त चार ठिकाणचं जेवण, चार भाषा, चार सुंदर देश बघणं म्हणजे जग मोठं होणं नसावं.>>>>>>> खरंच.

Apratim lihala ahes !
Shewatacha para tar thet bhidala.

जे लिहिलं आहे ते खरं मानण्याशिवाय पर्याय नाही. मला तरी लिखाण खोटं वाटतं आहे. गुडी गुडी लिहिले आहे. अॅंबर सारख्या मैत्रिणी असताना सोळाव्या धोकादायक वयात तसले अनुभव घ्यावेसे नक्कीच वाटलेले असणार.

घण्यासारखं असतं; ‘आपल्या घरच्यांनी आपल्यावर केले आहेत ते’ यापलिकडेही संस्कारांची व्याख्या असू शकते; आणि काळ्या-पांढऱ्याच्या मधे असंख्य छटा भरत जाताना त्या पटावर आपण कुठे आहोत, या सगळ्याचं भान येणं म्हणजे असावं जग मोठं होणं. कारण as for the universal truth, it does not exist. >>>>> सुंदर. वाचतेय लेखमाला.

खुप आवडतंय हे लेखन.
अंतर्मुख व्हायला होतंय. विचार कराव लागतोय वाचताना.
काळ्या-पांढऱ्याच्या मधे असंख्य छटा भरत जाताना त्या पटावर आपण कुठे आहोत, या सगळ्याचं भान येणं म्हणजे असावं जग मोठं होणं>>>>>>>>>> सुंदर! खुप भावलं.

अतिशय सुंदर लेख लिहून शेवटच्या पॅराग्राफमध्ये काहितरी जजमेंटल वाटणार्‍या कमेंट लिहून सगळी मजा घालवता तुम्ही. Sad
दुसर्‍या भागातही तसच वाटलं होतं आणि ह्यातही! कदाचित मी जास्तच रिडींग बिटवीन द लाईन्स करत असेन पण खटकलं खरं.

योग्य शेवटच्या बाबतीत मला सईचे लेख अतिशय आवडतात.

अनु, मला माझ्याच आयुष्याबद्दल जेव्हा रंजीस व्हायला होईल ना, तेव्हा तुझं हे म्हणणं आठवेल मला Happy अरेबियन नाइट्स!
सगळ्यांचे मनापासून आभार...

@पराग, मला थोडं खुलवून सांगा ना तुमचं म्हणणं. एवढ्यासाठी, की माझ्या शेवटच्या म्हणण्याचा अर्थच 'जजमेंटल नसणं बरं' असा होता. त्यात जे काही म्हणणं होतं ते माझेच पूर्वीचे जजमेंटल विचार खोडून काढणारं होतं. ते जजमेंटल वाटावं याचं आश्चर्य वाटलं मला. Happy

दुसर्‍या भागात त्या पालकांच्या प्रश्नांना आगोचर/गंमतशीर म्हंटलेलं आवडलं नव्हतं एक-दोघांना. पण "तू काय काय ट्राय केलंस"इतका आगोचर प्रश्न नाही दुसरा. तसं "डेटिंगचा विषय घरी आणू नये म्हणून काय करावं?" हा जामच गंमतशीर प्रश्न वाटतो मला. आपापल्या पाल्याची अमर्याद काळजी आणि त्यांच्याविषयी प्रेम वाटणं हे मी अगदीच समजू शकते, पण म्हणून असमंजसपणे, समोरच्या मुलामुलीचं वय, त्यांचा-आपला काय संवाद चालतो हे न बघता कोणीही उठून असे विचित्र प्रश्न विचारणं मला फार रूड वाटतं. त्या बाबतीत मात्र असेन मी जजमेंटल!

फक्त चार ठिकाणचं जेवण, चार भाषा, चार सुंदर देश बघणं म्हणजे जग मोठं होणं नसावं. >>>>>हे चुकीचं असल्या माफ करा, पण जरा स्पष्ट लिहीतो. मी तुमच्या ब्लॉगवर लेखांमधून जेव्हडं वाचलय त्यावरून मला कळलेल्या माहितीनुसार तुमचं स्वतःचं कुठलही कर्टुत्त्व नसताना निव्वळ आलेल्या परिस्थितीमुळे (आई वडिलांचं स्थलांतर) तुम्ही लंडनला गेलात. तिथले अनुभव अगदी मोकळ्या मनाने, डोळसपणे घेतलेत. त्याबद्दल सुंदर लिखाण केलत हे सगळ मस्तच. पण प्रत्येकाला ही परिस्थिती मिळत नाही. जो तो आपापल्या परिने आपापलं जग / परिघ मोठं करायचा प्रयत्न करत असतो. काही लोकं ते चार ठिकाणचं जेवण ,चार भाषा, चार सुंदर देश बघून करत असतात. त्यात आलेल्या अनुभवाने त्यांचं जग मोठं होतं असत. तर त्याच्यावर तुमचा आक्षेप का? आपले अनुभव ते भारी दुसर्‍यांचं ते 'टुरिझम' असं म्हणून इथे नाकं मुरडली आहेत असं मला वाटलं म्हणून तो प्रतिसाद.

दुसर्‍या भागात त्या पालकांच्या प्रश्नांना आगोचर/गंमतशीर म्हंटलेलं आवडलं नव्हतं काही जणांना. >>>> मी ही त्यातला एक होतो. Wink पालक आपापल्या परीने मुलांचं संगोपन करत असतात. त्यात ते ही शिकत असतात. (मी हे स्वानुभवाने सांगू शकतो.:) ) अश्यावेळेला काही प्रतिक्रिया ह्या पॅनिक होऊन आलेल्या असू शकतात. अश्यावेळी अनुभवी / तश्या परिस्थितीतुन गेलेल्या व्यक्तींसमोर कोणी अगदी काहीही प्रश्न विचारले तर मी तरी त्याला अगोचर वगैरे विशेषणे लावणार नाही.

तुझ्या आयुष्याला मी बऱ्याच वेळा आ वासून लहान मुलं अरेबियन नाईट्स मधले चमत्कार वाचतात तशी वाचत असते. >>> खरच

जग मोठं होण आणि संस्कारांची व्याख्या >>> खूपच छान

जग मोठं होणं.>>> जबरदस्त खुप सुंदर लिहिलंय एकंदरीत लेख वाचताना घटना डोळ्यासमोरून जात आहेत असे वाटत....एक विनंती मागच्या भागाची लिंक देत चला

@पराग, ओह ओह ओह, असं म्हणताय! नाही मग तिकडे गैरसमज झाला असेल तुमचा. टूरिझमला किंवा बाकी कोणीही कसंही जग बघण्याला माझा आक्षेप नाही, उलट समर्थनच आहे. मीही ते तसंच बघते की, जिथे मी रहात नाही ते देश सोडून बाकीच्या जागी. तेही जग बघणंच आहे, पण फक्त तेवढंच ते नसावं (नसेल या अर्थी), त्यापलिकडेही त्यात बर्‍याच बाबी असतील, हे माझं म्हणणं. पुढच्या वेळी अजून स्वच्छ लिहायचा प्रयत्न करेन. Happy

अश्यावेळी अनुभवी / तश्या परिस्थितीतुन गेलेल्या व्यक्तींसमोर >>> अशा व्यक्ती म्हणजे माझे पालक. मी नाही! So, I'll agree to disagree here.

सुंदर लिहिलंय अर्निका..

पराग,
मला कळलेला त्या चार देश वगैरे वाक्याचा अर्थ तुम्ही घेतला त्यापेक्षा वेगळा आहे, परिघ मोठा होणं यात लेखिकेला त्या त्या ठिकाणच्या लोकांचा अनुभव येणं, तिथं खऱ्या अर्थाने जगणं अभिप्रेत असावं. अर्थात आपआपला परिघ आपण कसा ठरवतो यावर हे अवलंबून आहे. लेखिका उत्तर देतीलच..
पण, बाकीची तुमची टिप्पणी >>तुमचं स्वतःचं कुठलही कर्टुत्त्व नसताना निव्वळ आलेल्या परिस्थितीमुळे (आई वडिलांचं स्थलांतर) तुम्ही लंडनला गेलात. तिथले अनुभव अगदी मोकळ्या मनाने, डोळसपणे घेतलेत. त्याबद्दल सुंदर लिखाण केलत हे सगळ मस्तच. पण प्रत्येकाला ही परिस्थिती मिळत नाही.<< मला आकसपूर्ण, द्वेषात्मक वाटली. अगदीच विनाकारण होतं ते सगळं. त्यांना मिळालं मला नाही म्हणत भोकाड पसरणाऱ्या मुलागत लिहिलंय तुम्ही. She is entitled and she has explained it well in her first blog of this series.

आणि हो, तुमचंही परिघ कसं मोठं झालं ते वाचायला आवडेल! कृपया लिहा तुमचे अनुभव..

(मी कधी कोणत्याच लेखकाच्या बाजूने/ विरोधात उभा राहत नाही, कारण निरुपयोगी टीका करणारे आणि त्या टिकेला उत्तरं देत राहणारे ते लेखक दोघे कस्पट.. अर्निका दोघांतही कधीच दिसत नाही, अनेक जुने लेखक फालतू कमेंट्समुळे लिहिणं बंद करत असताना, ते मला अर्निका सोबत होऊ द्यायचं नाही, त्यांचं लिखाण समृद्ध करतं म्हणून मी माझ्या स्वार्थासाठी तरी त्यांचं लिहिणं थांबु देणार नाही!)

अर्निका आता निमोपण ह्यातुन जातेय हळूहळू. ती ही भारतातून इथे आल्यामुळे गुडी २ शूज, त्यात आजु बाजुच्या भारतीय आया, 'बघ, शिक तिच्याकडून' असं म्हणाल्या की तुटलीच तिची नवी मैत्रिण तिच्यापासून. सध्या ग्रामरच्या जगात सेटल होण्याचा प्रयत्न करतेय, इथे बर्‍याच गुडी २ शूज आहेत आणि काही काही तर एकदमच टॅलेन्टेड आणि भारी आहेत, त्यामुळे तिलाच नाठाळ मुलीसारखं वाटतयं. कालच तिच्याशी तुझ्या भाग २ मधला निबंधाचा किस्सा ह्यावर बोलत होते. शी कुड सो रिलेट टू इट. आताही तिचा आक्सेंट हा कधी कधी विनोदाचा विषय असतो, इथेच वाढलेल्या भारतीय मुलांमध्ये.

इथले माझ्या गावातले बरेचसे सामाजिक प्रश्ण हे धार्मिक भेदभावावर देखील आहेत असं मला जाणवतंय. मी तिच्याबरोबर तिला पडणारे आणि मलाही पाठ्येतर असलेले प्रश्ण समजावून घेण्याचा प्रयत्न करतेय.

Pages