शब्द आणि भाव

Submitted by पुरंदरे शशांक on 15 October, 2019 - 03:27

शब्द आणि भाव

शब्दरत्ने घरी त्याच्या
शब्द थोर देव होय
परी भाव वेगळाचि
शब्द केवळ तो सोय

त्याला ठाऊक पुरते
भाव जाणतसे हरी
शब्द ऐलिकडे राहे
भाव नेई पैलतीरी

शब्दाकाशी ही मावेना
त्याचा भाव तो अफाट
भावे विठ्ठल भेटला
भाव ब्रह्मांड व्यापत

उरी धरुन ठेविती
जन त्याचे शब्दधन
कोणी विरळाचि जाणे
भाव शब्दातील प्राण

भाव दाटता चित्तात
फोलपट शब्द होत
एक हरी अंतर्यामी
भावे स्वये प्रकटत
.....................................

शब्दाकाशी.... शब्दांच्या आकाशात

फोलपट .... बीजावरील साल, कवच, भुसा, कोंडा

..........................................

Group content visibility: 
Public - accessible to all site users

उरी धरुन ठेविती
जन त्याचे शब्दधन
कोणी विरळाचि जाणे
भाव शब्दातील प्राण>>>>> खूप सुंदर !

उरी धरुन ठेविती
जन त्याचे शब्दधन
कोणी विरळाचि जाणे
भाव शब्दातील प्राण>>>>> खूप सुंदर !<<<+111