अन्न, स्त्रीवाद आणि मी (मूळ लेखिका आर्किटेक्ट शीतल पाटील)

Submitted by अतुल. on 28 September, 2019 - 02:15

संस्कृतीच्या नावाखाली हजारो वर्षांचा लेप मनांवर बसला आहे. मनं अधू झाली आहेत. असंवेदनशील झाली आहेत. इतकी असंवेदनशील कि रांधा, वाढा, खरकटी काढा हि स्त्रियांची कामेच आहेत, यात बदलण्यासारखे काय आहे? असा कोडगा व निलाजरा प्रश्न सहजगत्या विचारला जाऊ शकतो. अनेक ठिकाणी स्वत: त्या स्त्रीला सुद्धा याची जाण नसते. मानसिक गुलामगिरी सारखा दुर्दैवी प्रकार नसेल. नांगराच्या शोधानंतर निर्माण झालेली जमिनीची मालकी. त्यासाठी पुरुषांच्या हाणामाऱ्या. ती मालकी पुढे नेण्यासाठी वंश नावाचा प्रघात. व त्यातून पुढे निर्माण झालेला स्त्रियांवरचा मालकीहक्क. असा हा स्त्री-पुरुषांतील सामाजिक समतोल ढासळलेला प्रवास आहे. आणि संस्कृती नावाच्या प्रक्रीयेखाली हि गुलामगिरीची पुटं मनांवर शिस्तबद्धपणे चढवली आहेत. हा जाडजूड लेप खरवडून निघून एक व्यक्ती म्हणून स्त्रीकडे पाहायला शिकण्यासाठी अजून कित्येक वर्षे जातील माहित नाही. पण त्यासाठी आधी जी जाणीव व्हायला हवी ती होणे महत्वाचे आहे. माही मैत्रीण शीतल पाटील हिच्या लेखातून हि जाणीव निर्माण करण्याचा व मनांवरील हि पुटं काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला गेलाय. समतोल समाजव्यवस्था निर्माण होण्यासाठी असे विचार समाजाच्या सर्व स्तरांत झिरपवण्याची नितांत गरज आहे. याच भावनेतून व तिच्या परवानगीने हा लेख इथे देत आहे (खाली मूळ लेखाची लिंक सुद्धा आहे).
------------------------------------------------------------------------------------

अन्न, स्त्रीवाद आणि मी

गात दोन प्रकारची लोकं आहेत असं म्हणतात - एक जे खाण्यासाठी जगतात आणि दुसरे - जगण्यासाठी खातात.मी एक सामान्य भारतीय स्त्री आहे आणि तरीही, जरा चवीत बदल किंवा दुधात मिठाचा खडा म्हणूया - मी दुसर्या प्रकारात मोडते . जगण्यासाठी आवश्यक असलेली गोष्ट (read, necessary evil) इतकाच माझा आणि खाण्याचा संबंध. मी आता जे लिहिणार आहे ते केवळ कॅथार्सिस सारखं काहीतरी असणार आहे, पण हे कधीतरी करायला हवंच होतं तेंव्हा....

गोष्टीची सुरुवात करायची तर सुरुवातीपासूनच करायला हवी! त्यासाठी साधारण चार लाख वर्षं तरी मागे जायला हवं. अवघ्या चराचरात होमोनिड कुटुंबातील होमो इरेक्टस हा प्राणी कृत्रिमरित्या अग्नी निर्माण करायला आणि हाताळायला सगळ्यात आधी शिकला. ही मानववंशीय प्रजातींच्या बौद्धिक क्षमतेची पहिली ठिणगी. त्यातूनच मग अंधारलेल्या गुहे मध्ये हवं तेंव्हा हवा तेवढा प्रकाश आणि ऊब मिळवता येऊ लागली असेल. त्याने निबिड अरण्यात जगणं बरंच सुसह्य झालं असावं.

मुळात Hunter gatherer असलेल्या माणूस नावाच्या प्राण्याची अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जेंव्हा निसर्गाशी दोन हात करण्यात आणि सतत च्या स्थलांतर करण्यात खूप शक्ती खर्ची पडू लागली तेंव्हा त्याच्या मादीने पिल्लं जगावी म्हणून गुहेत राहून शेतीचा प्रयोग करून बघितला. त्या प्रयोगाची फळं मिळायला लागल्यावर तो हळू हळू स्थिरावायला लागला. आणि इथेच स्त्रीच्या अधोगतीची बीजं –“संस्कृती” नावाच्या कसदार जमिनीत रुजली, वाढली, फोफावली. मूल हे स्त्री पुरुष संबंधांतून जन्माला येतं इतकं तोवर माणसाला कळायला लागलेलं होतं. पण स्त्रीला होणारं मूल नक्की कुठल्या पुरुषाचं आहे हे कळपात राहणार्‍या त्या बिचार्‍या प्राण्याला कळायला मार्ग नव्हता. (तेंव्हा DNA tests चा शोध अजून लागायचा होता अर्थातच.) त्यामुळे, कष्टाने मिळवलेली जमीन पुढच्या पिढीकडे सोपवायची तर समोरचं मूल आपलं आहे ह्याची खात्री तर असायला हवी नं ? मग आता हा पेच सोडवायचा कसा ? तर स्त्री इतर कुठल्याही पुरुषाशी संबंधच ठेऊ शकणार नाही अशी काहीतरी युक्ती करायला हवी होती. संबंधच काय तर इतर पुरुषांच्या संपर्कातही ती येऊ नये अशी चोख व्यवस्थाच करायला हवी होती.त्यासाठी एक फार धूर्त योजना आखण्यात आली, ती म्हणजे विवाह संस्था ! आणि अश्या तर्‍हेने अत्यंत स्वयंपूर्ण, सक्षम, स्वायत्त, स्वतंत्र आणि सबळ असलेली स्त्री ही अक्षरशः पुरुषाच्या दावणीला बांधण्याची मुहूर्तमेढ रोवण्यात आली . त्यातून मनुष्यबळ निर्मितीचा कारखानाच घरच्या घरी मिळाला वर जमिनीच्या वारसा हक्काचा प्रश्नही आपसूक मिटला. जश्या गोठ्यात गाई तशी घरात बाई !

आता ह्या पार्श्वभूमीवर आपल्याला सहज लक्षात येईल की अग्नी, शेती आणि विवाह ह्या तिन्हींच्या संयोगाने मानवाच्या मादीचं विश्व बदलून स्वयंपाकघर नावाच्या खोली पुरतं सीमित झालं आणि जीवंत राहण्यासाठीची मुलभूत गरज असलेला साधा अन्न नावाचा घटक पाककला नावाच्या अती क्लिष्ट आणि वेळखाऊ उपद्व्यापात अडकला .

तेंव्हा अन्न आणि स्त्रीवाद हा अस्तित्वाच्या गाभ्याशी जाऊन भिडणारा विषय न होता तरच नवल .
अन्न, वस्त्र, निवारा ह्या माणसाच्या मुलभूत गरजा असल्या तरी आता ह्या तीनही गोष्टी अविश्वसनीय वाटाव्या इतक्या प्रमाणात बदलेल्या आहेत. आता त्या गरज ह्या संज्ञेला ओलांडून कधीच एका अत्यंत स्फोटक अश्या संस्कृती नावाच्या वेष्टनात गुंडाळल्या गेल्या आहेत .पुरुष धार्जिणी संस्कृती निर्माण करण्यासाठी आणि ती टिकवून ठेवण्यासाठी कराव्या लागणार्या शोषणाची अत्यंत वस्तुनिष्ठ व्यवस्थाच निर्माण केली गेली. ती व्यवस्था एकाच वेळी अनेक पातळ्यांवर कार्यरत होती, अजूनही आहे . त्यामुळे अन्न आणि स्त्रीवाद हा विषय म्हणजे एक तीन पायाची शर्यत आहे . तो खरंच समजून घ्यायचा असेल तर स्त्री आणि अन्न ह्या दोन विषयांची जन्माची पडलेली गाठ सोडवून त्यांना तटस्थपणे वेगवेगळ करून बघता यायला हवं . हा झाला larger point of view. Larger premise.

पूर्वीच म्हणल्या प्रमाणे मी जे लिहितेय ते माझ्यासाठी कॅथार्सिस सारखं काहीतरी आहे But I also believe, the more personal you write , the more universal it becomes. And the first step you can take towards changing your story, is to tell your story. So, अत्यंत खाजगी किंवा व्यक्ती, ह्या पातळीवर चिकित्सा करायला गेलो तर अन्न हा अतिशय over rated, time and energy consuming प्रकार वाटतो मला.त्यातही स्त्री असल्याने अन्न शिजवणे किंवा स्वयंपाक ह्या विषयाशी माझं कळत्या वयापासून love-hate relationship होतं असं आता मागे वळून बघताना मला जाणवतं. I loved to hate food (&/or cooking) and Hated to have to love food (&/or cooking). अगदी लहान असताना पासून मी घरातल्या स्त्रीयांना चुली जवळ तासंतास हाडाची काड करताना बघत होते आणि इतकं करून जे पानात वाढलं जायचं ते मोजून १०-१५ मिनिटात घरातली मुलंबाळ कर्ते पुरुष फस्त करून आपापल्या कामाला लागलेले असायचे आणि बायका पुन्हा अनेक तास उष्टी खरकटी भांडी स्वच्छ करण्यात घालवायच्या . त्यातून बाहेर पडत नाही तोच पुढ्या जेवणावळीच्या तयारीला बिचार्या लागलेल्या असायच्या.मोठं झाल्यावर आपल्यालाही हेच करायला लागणार आहे की काय ह्याचा धसका माझ्या बालमनाने घेतला होताच आणि ह्यातून काहीही झालं तरी आपण आपली सुटका करून घ्यायलाच हवी तरच काही खरं आहे; हे सतत स्वतःला बजावत राहिले.माझं स्वतःचं aptitude गृहकृत्यदक्ष सुगरण वगैरे स्त्री असण्याचं नव्हतं आणि घरातल्यानीही फार मला त्या साच्यात बसवायचा प्रयत्न केला नाही . त्यांनी एक दोनदा सांगून बघितलं असेल इतकंच पण फार काही मला कुणी “सासरी गेल्यावर आमचा उद्धार करशील” ह्या सबबीखाली जाच केला नाही. त्यात अभ्यासात बर्यापैकी प्रगती होती तेंव्हा त्यांनी मला माझ्यावर सोडून दिलं, त्यांच्या ह्या ऋणात मी आजन्म रहायला तयार आहे .

माझी आई उत्तम स्वयंपाक करायची पण त्याहून उत्तम जर काही तिने आमच्या भरणपोषणा साठी केलं असेल, तर तिने वाचन ह्या प्रकाराचे संस्कार आमच्यावर न बोलता, तिच्या वागण्यातून नकळत केले. आमच्या घरात पुस्तकांच्या चळती सतत लागलेल्या असायच्या . स्वयंपाक जेवणं आवरली की आई कायम हातात कुठलं न कुठलं पुस्तक घेऊन बसलेली असायची. तिला मी कधीही शेजारी पाजरी जाऊन कुणाशी उगाचच गप्पा मारत बसलेली बघितलं नाही. कधी कधी तर ती एखादं engaging पुस्तक वाचत असेल तर स्वयंपाक देखील झटकन आवरून जवळ जवळ पळत जाऊन पुस्तक घेऊन बसत असे.

मला हे एक तिचे खूप आवडे . तिच्या स्वयंपाकापेक्षा मला तिचं हे , स्वतःच्या वाचना साठी लागणारा वेळ आणि अवकाश संसाराच्या व्यापातून मिळवण्यासाठी धडपडणं, फार लोभस वाटत असे आणि आदर्शही. ती तिच्याच पुस्तकांच्या जगात इतकी रमलेली असे की आमच्यावर उगाचच बाकीच्यांच्या आया करतात तशी चौकीदारी किंवा आईगिरी तिने कधी केली नाही . ह्यावर अती दक्ष आया कदाचित भुवया उंचावतील पण त्यामुळेच खरंतर आमचे आम्ही निर्णय घ्यायला आणि त्या निर्णयांची जबाबदारी घ्यायला शिकलो . याहून मोठं शिक्षणाचं प्रयोजन ते काय असेल??!!

आईचा स्वयंपाक minimalist म्हणता येईल ह्या categoryत मोडायचा. ती उगाचंच कधी स्वयंपाकघरात तासंतास घालवत बसत नसे. साधं सुटसुटीत पण व्यवस्थित पोट आणि मन भरेल असा स्वयंपाक ती करत असे आणि त्याचाही फार गवगवा करत नसे. स्वतःच्या पाक कौशल्याचा वापर तिने कधीही आम्हाला emotionally blackmail करायला अथवा स्वतःचा ego satisfy करायला केला नाही . हे फार महत्वाचं mental training मला घरबसल्या त्यामुळे मिळालं. अन्ना कडे बघण्याचा अलिप्त भाव त्यामुळेच आपोआप विकसित होत गेला. अन्न शिजवणे हा जगत राहण्यासाठीचा महत्वाचा भाग असला तरी तो आपल्या जगण्याचं प्रयोजन होऊ शकत नाही, होऊ नये, ह्याचं भान मला खूप लहानपणीच आलं होतं. त्यामुळे खाण्याच्या चवीपेक्षा त्याचं पोषण मूल्य तपासायला शिकले . जितका वेळ आणि शक्ती एखादी पाक कृती करायला लागते त्या प्रमाणात त्याचा उपयोग आपल्या शरीराला होतोय का ह्याचा ताळमेळ आपोआप मनात लागायला सुरु होत असे.

त्यातूनच नको त्या फापट पसार्यातून मोकळं होऊन शरीरास जे उपकारक ते स्वीकारणे आणि अपायकारक ते नाकारणे हे आपोआप घडायला सुरुवात झाली. मला कधीही कुठल्याही तळलेल्या किंवा चटपटीत किंवा गोड पदार्थांचं so called craving, instinctively सहसा होत नाही . त्यामुळे ठरवून diet (control) वगैरे प्रकार आजवर कधीही करायला लागले नाहीत. शरीरंच व्यवस्थित मार्गदर्शन करायला लागलं काय खायला हवं नको ते. शरीराचं ऐकलं तर मनाच्या स्वैर वागण्याला आपसूक चाप बसतो. आणि चवीचं म्हणाल तर ते बरंचसं mental construct आहे आणि त्यामुळेच फारच subjective आहे असंही मला हल्ली वाटायला लागलंय.

म्हणजे प्रत्येकाला आपल्याच आईच्या हातच्या आमटी किंवा वरणाची चव लक्षात असते, आवडते. मला माझ्या हातच्या आमटीची चव अजीबातच आवडत नाही पण माझ्या मुलांना मात्र ती फार आवडते. तर त्यात त्या आमटी पेक्षा ती मी केलेली असते हे त्यांना माहीत असेल तर त्यांच्या दृष्टीकोनात फरक पडतो. आमटी अतिशय सामान्य असते पण ती आपल्या आईने आपल्यासाठी केलीये ह्यात कदाचित मुलांचाही ego satisfy होत असेल. कुणीतरी आपल्यासाठी सगळी कामं बाजूला ठेऊन केवळ आपल्याला आवडते म्हणून एखादा पदार्थ करून आपल्याला वाढत असेल, किंवा तेच तिचं काम असेल, तर ह्यापेक्षा जास्ती validation काय असू शकेल ?!

पण मला आई म्हणून अजिबातच माझ्या हातच्या कुठल्याही पदार्थांचा कौतुक वाटत नाही. मी एक average स्वयंपाक करणारी average बाई आहे. त्यात आई झाल्याने फार काही फरक पडलेला आहे असं मला वाटत नाही. एकदा वीणा वर्ल्ड ह्या पर्यटन व्यवसायात अग्रगण्य असलेल्या कंपनीच्या सी.ई. ओ. वीणा पाटील ह्यांची मुलाखत मी बघत होते . तेंव्हा त्यांनाही इतर व्यावसायीक यश मिळवलेल्या कर्तबगार स्त्रीयांना विचारतात तसेच घरा-दारा-मुलां संबधीचे सुमार प्रश्न त्या मुलाखतकारानेही विचारले असता, त्यांनी अजिबात कुठलाही अपराध भाव चेहेर्यावर अथवा आवाजात न येऊ देता दिलेलं उत्तर माझ्यासाठी मनोहर सूर्योदय बघितल्याचा आनंद देऊन गेलं. त्या म्हणाल्या होत्या, “मला जर कुणी विचारलं की तुमचा आवडता पदार्थ कोणता, तर माझं प्रामाणिक उत्तर असतं , असा कुठलाही पदार्थ, ज्यासाठी मला स्वतःला स्वयंपाक घरात जाऊन फार वेळ घालवावा लागणार नाही, मला आवडतो.”

घराबरोबरच इतर अनेक व्यवधानं समर्थपणे सांभाळणार्या कर्तबगार मल्टी टास्किंग मास्टर्स असलेल्या अनेक मैत्रिणी मला लाभलेल्या आहेत . त्यातल्याच एकीने एकदा एक मजेशीर किस्सा सांगितला होता . ती म्हणाली, “नवीन लग्न होऊन मी जेंव्हा ह्या घरात आले तेंव्हा माझ्या सासर्यांनी मला सांगितलं होतं, तुला जर आयुष्यात खरंच सुखी व्हायचं असेल तर कुणाच्याही हातच्या कुठल्याही पदार्थाची चव आवडून घ्यायची सवय लाऊन घे, आणि त्यात उगाचंच कुठलाही अहंभाव किंवा न्यूनगंड मनात येऊ देऊ नकोस.”

माझ्यासाठी ही दोन्ही उदाहरणं माझ्या narrative शी अगदी चपखल मेळ खाणारी आणि म्हणून अत्यंत तार्किक वाटली मला आणि मी ती पडत्या फळाची आज्ञा समजून शिरसावंद्य मानली . कसोशीने पाळली आणि खरंच सुखी झाले .

आमच्या घरी स्वयंपाक करणार्या मावशी अतिशय उत्तम स्वयंपाक करतात. माझ्यापेक्षा नक्कीच जास्त सरस करतात हे मी नम्रपणे मान्य करून माझं स्वयंपाकघर निर्धास्त मनाने त्यांच्या स्वाधीन करून टाकलेलं आहे .जबाबदार्यांच delegation किंवा वेळखाऊ आणि repetitive processes चं outsourcing हे global economies मध्ये organisation building चे key factors समजल्या जातात. घर ही एक संस्था म्हणलं तर ती चालवण्याचे अनेक वेगवेगळे प्रकार असू शकतात. माझ्या आईकडे वेगळा उपाय होता, सासूबाईं कडे वेगळा आणि माझा वेगळा. सगळेच प्रकार एकाच वेळी तितकेच प्रभावी असूच शकतात . प्रत्येकीचं नियोजन कौशल्यंच असतं ते.

कुणी स्टार प्लेयर्स असतात कुणी टीम प्लेयर्स असतात. मी टीम प्लेयर आहे. मला एकटीच्या खांद्यावर विजय ओढून आणावा असं कधीही वाटत नाही तशी महत्वाकांक्षा नाही आणि इच्छा तर मुळीच नाही. I enjoy being part of a winning team , without having to keep performing all the time.

खांदे पालट होत राहिली तर कुणावरच अतिरिक्त ताण येत नाही आणि प्रत्येकाच्याच क्षमता अधून मधून घासून पुसून लख्खं होत राहतात . “मी घरी नसले तर माझ्या घराचं पानही हलत नाही” किंवा “आमच्या ह्यांना साधा चहा देखील करायला येत नाही”, “किंवा आमच्या घरी सगळ्यांना माझ्याच हातच्या गरम गरम पोळ्या/भाकरी लागतात” इत्यादी इत्यादी, असल्या dysfunctionality ला कौतुकांच्या वेष्टणात गुंडाळून स्वतःचं आणि इतरांचही जगणं दुर्धर करून टाकणार्या toxic feminity च्या जाळ्यात मी कधीच स्वतःला किंवा माझ्या घराला अडकू दिलेलं नाहीये. ह्याचा मला माफक अभिमान आहे. मी असली नसली तरी माझं घर व्यवस्थित सुरू राहावं ह्याची तजवीज मी केलेली आहे. मी स्वयंपाक घरात दिवस दिवस गेले नाही तरी सगळ्याचं सगळं व्यवस्थित होतंय की नाही ह्याकडे माझं माझ्या कामाच्या टेबलावरून लक्ष असतं. आणि तितकं पुरेसं असतं. स्वयंपाकघर हेच एकमेव आणि इतकंच जगण्याचं, कर्तव्यपूर्तीचं आणि स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्याचं मर्यादित क्षेत्र असलेल्या स्त्रियांच्या अनेक पिढ्यांचे “संस्कार” अगदी आजच्या पिढीपर्यंत लीलया पोहोचलेले आहेत. हे बघून गंमत वाटते.

अभिनयाच्या क्षेत्रात प्रथितयश असलेल्या एका तरुण दांपत्याची मुलाखत सोशल मीडिया फीड स्क्रोल करत असताना चुकून बघण्यात आली, तेंव्हाच्या ३० सेकंदात , मुलाखत घेणाऱ्या मुलीने नेहमीप्रमाणेच दोघांमधल्या तिच्यावर नेम धरून हमखास वर्मी बसणारा आणि प्रेक्षकांना खुश करणारा, ठेवणीतला प्रश्न भात्यातून काढला, “ तुम्ही दोघंही सतत इतके बिझी असता, तेंव्हा घरासाठी , एकमेकांसाठी वेळ कसा काढता आणि तो कसा घालवता?” त्यावर क्षणाचाही विलंब न लावता ती म्हणाली, “आम्हाला फार वेळ एकत्र मिळत नाही पण जेव्हा जेव्हा तो मिळतो तेंव्हा तेंव्हा आम्ही एकत्र जेवतो, त्यातही ह्याला गरम गरम पोळ्या करून वाढण्यात मला सगळ्यात जास्त आनंद मिळतो.” असं ती सांगत असताना, तो दोन्ही गालात गुलाबजाम असल्यासारखा गोड ब्लश करत होता, पुढे ती म्हणाली, “मला आठवतं माझी आई आम्हाला असं लहानपणी मस्त गरम पोळ्या वाढायची ते खाताना कोण सुख वाटायचं, तेच ह्यालाही मिळावं असं मला वाटतं आणि मलाही असं वाढायला आवडतं ” इतका सगळा प्रेमळ गोड गुलाबी संवाद ऐकून मला अर्धा क्षण कौतुक वाटलं खरं त्या आदर्श दांपत्याचं, पण तितकंच. त्यानंतर मात्र त्या गोडव्याने पोटात ढवळायला लागलं. ३० सेकंदाच्या वर काही मी ती मुलाखत पचवू शकले नाही आणि पुढे स्क्रोल करता करता विचार करू लागले , मिळत असेल कुणाला त्यात आनंद तर मिळो बापडा. आपल्या आईचं काय जातंय?

पण मला, प्रामाणिकपणे सांगायचं तर, कधीही पोळ्या लाटत बसण्यात किंवा त्या गरम गरम नवर्याला किंवा कुणालाही , अगदी स्वत:च्या मुलांनाही, वाढण्यात आनंद वगैरे अनुभवलाय असा एकही क्षण आठवत नाही. आमच्या घरात ज्याला गरम पोळ्या/ भाकरी खाण्याचा आनंद मिळवायचा असेल त्याने मावशी असतात त्या वेळेत जेवायला बसावे इतकाच नियम आहे . तोही कुणी पाळत नाही . प्रत्येक जण आपापल्या वेळेत आपापल्या सोईने लागेल तसं जेवण गरम करून वाढून घेतात . अगदी माझा १० वर्षाचा मुलगाही !

मला आठवतं नवीन लग्न होऊन जेंव्हा मी सासरी आले तेंव्हा हळदीचा रंग उतरल्यावर कुणीतरी मला विचारलं होतं, तुझी स्पेशालिटी डिश काय आहे , तीच आज सगळ्यांसाठी कर बघू . ते ऐकल्यावर खरंतर पोटात आधी गोळाच आला होता. सुचेचना उत्तर. कधी विचारच नव्हता केला ह्याबद्दल, कृती तर फार दूर. आपली तर कुठली स्पेशालिटीच नाहीये . तेंव्हा नवरा मदतीला धाऊन आला आणि दोघांनी मिळून कढी खिचडी का काय ती केली होती. सगळ्यांनी अर्थातच कौतुक करून वेळ साजरी केली पण i was so unimpressed with my culinary efforts. नवरा अतिशय समंजस मिळालाय हे एका अर्थी खरोखरीच ‘वर’दान म्हणायला हवं.

“पुरुषाच्या हृदयाचा मार्ग त्याच्या पोटातून जातो”, ह्यासारखं sexist आणि crude वाक्य नाहीये जगात. माझ्या आयुष्यात महत्वाच्या असलेल्या एकाही पुरुषाला मी कधीही, काहीही खाऊ पिऊ घालून आपलंसं करायचा प्रयत्न तर सोडा तसा विचारही कधी केलेला नाहीये. आणि मुळात अश्या, हृदयाचा मार्ग पोटातून वगैरे जाणार्या पुरुषांबद्दल किंवा त्यांच्या हृदयाबद्दल मला कधीही यत्किंचीतही आकर्षण वाटलेलं नाहीये, त्यामुळे त्यांना आपलंसं करण्याचा प्रश्नच नव्हता उलट असे जे काही तुरळक पुरुष वाटेत आले त्यांना kindly excuse me म्हणून मी तिथून सहज सटकलेय.

एखाद वर्ष एकमेकांना ओळखल्यावर जेव्हा नवर्याने propose केले तेंव्हा मी त्याला पहिला प्रश्न विचारला होता, “ तुला तुझ्या आई किंवा वहिनी सारखी कुणी मुलगी हवी आहे का??” त्यावर क्षणाचाही विलंब न लावता त्याने शांतपणे उत्तर दिलं होतं, “नाही. मला आई आणि वहिनी already आहेत , मला तू हवी आहेस , life partner म्हणून हवी आहेस. तुझी तयारी असेल तर लग्न करुया .” मी अर्थातच ते उत्तर ऐकून मगच तयार झाले. त्यानंतर च्या एका भेटीत त्याने विचारले होते, “तू non veg खात नाहीस , पण तू non veg बनवू शकते का ?” त्यावर मी म्हणाले होते , “नाही. मला येत नाही.”
त्यावर त्याने विचारले , “माझी आईही खात नाही, ती शिवतही नाही , पण शिजवते. तसं तुला करायला जमेल का?"
मला आठवतं त्यावर मी तितक्याच शांतपणे उत्तर दिल होतं , “प्रयत्न केला तर कदाचित जमेलही मला, पण मला तो प्रयत्न करायला आवडेल असं वाटत नाही , एक तर ते माझ्या तत्वात बसत नाही आणि मी तुझी आई नाहीये.” त्यावर त्याने मला हसून long drive वर नेलं आणि त्याच्या आवडत्या एका restaurant मध्ये dinner date ला घेऊन गेला जिथे आम्ही architecture ह्या आमच्या अत्यंत आवडत्या विषयावर पोट भर चर्चा करून दिवस सत्कारणी लावला.

लग्ना आधी जेंव्हा सासरी भेटायला गेले होते तेंव्हा माझ्या नणंदेने मला विचारलं होतं, “स्वयंपाक येतो का ?” तेंव्हा मी “फार नाही, फक्त कामा पुरता, उपाशी रहायला लागणार नाही कधी इतकाच येतो.“ असं प्रामाणिक उत्तर दिलं होतं. त्यावर तिने पुन्हा विचारलं,
“पण आमच्या सचिन ला तर वेगवेगळ्या डिशेस खायला खूप आवडतात, मग कसं करणार तू ??” त्यावर मी पुन्हा तितक्याच शांतपणे म्हणाले होते “ ज्याला खायला आवडतं त्याने बनवायलाही शिकावं, मी मदत नक्की करीन, पण तेवढ्यासाठी मला स्वयंपाकात फार वेळ घालवायला नाही आवडणार"

तेंव्हा कदाचित कुणाला माझी उत्तरं आगाऊपणाची वाटली असतील पण माझ्यासाठी ती सगळीच उत्तरं खरी आणि महत्वाची होती, अजूनही आहेत. मला माझं स्त्रीत्व स्वयंपाकघराशी बांधून घ्यायचं नव्हतं अगदी प्रेमाखातर देखील नाही. ही clarity मला लहानपणापासूनच होती त्यामुळे ती उत्तरंही तितकीच स्वच्छ होती. केवळ पाककला कौशल्या च्या कसोटी वर जर कुणी माझ्या स्त्रीत्वाची पारख करणार असेल तर त्यांनी मला खुशाल शून्य देऊन टाकावा . आयुष्यभर तो क्रूस खांद्यावर घेऊन चालत बसण्यापेक्षा मला खांदे झटकून त्या ओझ्यातून मोकळं होणं जास्त परवडणारं, आवडणारं होतं.

त्यामुळेच जेंव्हा आमच्या नवीन घरातलं स्वयंपाकघर आम्ही design करत होतो तेंव्हा अत्यंत साधं logical brief आम्ही स्वतःला दिलेलं होतं. आपल्या घरातलं स्वयंपाकघर democratic असावं , open असावं . तिथे कुणीही कधीही काहीही येऊन शिजवावं. स्वतः खावं इतरांना खाऊ घालावं. स्वयंपाकघर हे भूक लागणार्या प्रत्येकासाठी, भूक शमवण्यासाठी लागणारं साहित्य असलेलं ठिकाण आहे. ते प्रत्येकाने मुक्तहस्ते वापरावं इतर कुणावरही स्वतःच्या भुकेचं, चवीचं ओझं न टाकता, मग ती आपल्यावर जीवापाड प्रेम करणारी आई असो, बायको असो, गर्ल फ्रेंड असो, आजी असो किंवा कुणीही .

बहुसंख्य स्त्रियांची, त्यातही भारतीय स्त्रियांची, उमेदीची खूप वर्षं,कर्तृत्व,उर्मी, क्षमता, स्वयंपाक घर नावाच्या पोकळीत अक्षरशः शोषल्या जातात हे आपण सारेच जाणतो, ते मान्य करू न करू हा भाग वेगळा. त्यातल्या सगळ्याच स्त्रीयांना काही स्वयंपाकाची आवड असू शकत नाही, किंबहुना असत नाही किंवा त्या नैसर्गिकरीत्या स्वयंपाकासाठी designed असतात असंही नाही. स्वयंपाक ही काही gendered skill नाहीये, आणि असं असेल तर food industry चा विचार करता, तिथे सगळ्याच महत्वाच्या ठिकाणी पुरूषच दिसतात, हे कसे? 5 star हॉटेल्स चे शेफ्स असो किंवा लग्नात लागणारे जेवण बनवणारे आचारी /महाराज असो, किंवा सरकारी गेस्ट हाऊस मध्ये काम करणारे खानसामे असो, किंवा अगदी पाणीपुरी/ पावभाजी ची गाडी चालवणारे असो, सगळेच पुरुषच दिसतात. हे कसे ?

व्यवसाय म्हणून स्वयंपाक करणे किंवा एखाद दिवशी हौसेने एखादा पदार्थ करून बघणे आणि रोज तासंतास ओट्या समोर उभं राहून तेच thankless काम वर्षानुवर्ष , आयुष्यभर करत राहणं ह्यात perception चा खूप फरक आहे. करणार्यांच्या आणि ती सेवा विनासायास उपभोगणार्यांच्या देखील. म्हणूनच ज्या स्त्रिया ह्या एकरेषीय, एकसुरी gender roles, ना आव्हान देतात, त्यातून मार्ग काढतात, त्या जाळ्यातून मुक्त होण्याच्या शक्यता धुंडाळतात, त्यांचं स्त्रीत्व यत्किंचीतही दुय्यम दर्जाचं ठरतं असं मला अजिबातच वाटत नाही. उलट त्याच जगण्याच्या पद्धतींच्या नव्या शक्यता, विचारांच्या नव्या दिशा दाखवू शकतात .

बोलता बोलता मी असं एकदा म्हणाले असता माझा एक अत्यंत जिवलग फेमिनीस्ट मित्र म्हणाला होता, “ न जाणो असे किती आईनस्टाईन, शेक्सपीअर, कोलंबस आपण हरवून बसलोय.... स्वयंपाकघरात, आणि त्याहून मोठं दु:खं हे आहे की आपल्याला ते कधीच कळणारही नाही. त्यांची इतकी महत्वाची आयुष्यं केवळ तांदळातले खडे वेचण्यात निघून गेली असतील.” त्याचं ते वाक्य मनात घर करून राहिलंय ते कायमचं.
आईनस्टाईनच्या (त्याच्याच इतक्या कर्तबगार) बायकोवर ची documentary एकदा youtube वर बघण्यात आली. मलीव्हा मरीच तिचं नाव. अर्थात आपल्यापैकी बोटावर मोजण्या इतक्या लोकांनी हे नाव ऐकलं असेल. ज्यांना अधिक जाणून घेण्यात रस असेल त्यांनी जरून गूगल करून बघावं म्हणजे मी काय म्हणतेय त्याचं गांभीर्य कदाचित थोड्या प्रमाणात पोहोचेल.
सिमोन दि ब्वाव्हा तिच्या सेकंड सेक्स ह्या पुस्तकांत ह्या प्रक्रियेचा व्यवस्थितच धांडोळा घेते. ती म्हणते, एकूणच आपल्या समाजात पुरुषाच्या कर्तृत्वाला नको तितके वलय प्राप्त झालेले आहे. स्त्री तीन चार तास खपून जगातला सर्वोत्तम केक जरी बनवत असेल तरी तो १०-१५ मिनिटात संपून जातो आणि त्याची इतिहासात कुठेही नोंद ठेवली जात नाही .

केवळ चूल आणि मूल ह्या टोकांवर झुलणारा स्त्रीत्वाचा डोलारा उतरवून फक्त व्यक्ती म्हणून स्त्री कडे बघता आलं तर अन्न ह्या एका छोट्याश्या गोष्टी साठी किती मोठी किंमत ती व्यक्ती मोजतेय ह्याचा अंदाज जरी आला तरी आपल्या अपेक्षा आटोक्यात ठेवता येतील. “तुला स्वयंपाक येतो का?” असा वर वर साधा वाटणारा प्रश्न एखाद्या तरुण मुलीला विचारण्या आधी आपण तो किती loaded आहे ह्याचा क्षणभर थांबून विचार करू शकलो त्या ऐवजी, तिला तिच्या कुठल्या क्षमता विकसित कराव्याश्या वाटतात ह्यावर चर्चा करू शकलो तरी ह्या लेखन प्रपंचाचं प्रयोजन कारणी लागलं असं म्हणायला हरकत नाही. नाही ??!!

- शीतल पाटील
(लेखिका गेली १७ वर्ष बांधकाम क्षेत्रात कार्यरत आहे. अनेक प्रख्यात राष्ट्रीय अंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम केल्या नंतर तिने मंथन डिझाईन स्टुडीओ ह्या नावाने कोल्हापूर येथे स्वतः ची प्रक्टिस स्थापित केली . शिक्षण क्षेत्रात रस असल्याने ती वेगवेगळ्या आर्किटेक्चर कॉलेजेस मध्ये विजिटिंग लेक्चरर म्हणूनही कार्यरत आहे . एकीकडे व्यवसाय नावारूपास आणताना एकत्र कुटुंबात राहून दोन मुलांची आई असण्याची तिहेरी कसरत करत झालेल्या तिच्या प्रवासातून आलेल्या अनुभवांचा उपयोग विध्यार्थ्यांना आणि व्यवसायात नव्याने उतरू बघणार्या मुलांना विशेषतः मुलींना व्हावा ह्यासाठी ती सतत प्रयत्नशील असते)

मूळ लेखाची लिंक:
https://punhastriuvach.blogspot.com/2019/09/blog-post_89.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लेख.

. विवाहसंस्था झुगारून देण्याची हिंमत तिच्यात नव्हतीच मुळी. >> एक म्हणजे माणसाचे विचार केव्हा पूर्ण आकार घेतील हे सांगणे कठीण आहे. वाचन, अनुभव, चर्चा इत्यादि गोष्टींचा प्रभाव पडून माणसाचे विचार बालपण तर उतारवय केव्हाही ते होऊ शकते.
आणि दुसरं म्हणजे पूर्वी विवाहसंस्था कशी निमार्ण झाली हे एका विवाहित व्यक्तीने सांगू नये हे कसले लॉजिक आहे तर कळले नाही. विवाहसंस्थेतील जुनाट कल्पना आता ती व्यक्ती पाळत नाही एवढे पुरेसे आहे.

कुटुंब व्यवस्थेचे,समाज व्यवस्थेचे सर्व फायदे घेवून ह्या दोन्ही संस्था कशा वाईट आहेत अशी बोंब मारायची

परस्पर विरोधी मत बघा .
पुरुष आमच्या कडे वासनेच्या नजरेने बघतात असे मत मांडायचे .
आणि कमीत कमी कपडे वापरणे हा स्त्रियांचा हक्क आहे हे पण सांगायचे .
बार मध्ये काम करणाऱ्या स्त्रियांचा बाजार भरवाल जातो हे सांगायला गेले की त्यांच्या उपजीविकेच्या हक्क वर गादा येतो असे विरोधी मत व्यक्त करायचे .
ब्रदर ,बहीण,नवरा,दिर,सासू,सासरा, समाज अशी नाती झुगारून लावायची आणि अन्याय होत असताना समाज मुकाट्याने बघत बसतो म्हणून सुद्धा बोंब मारायची .
सर्व परस्पर विरोधी मत काही स्पष्ट मतं नाही त मुक्ती वाल्यांची

एक मुद्दा की लेख कॉपी पेस्ट आहे त्यामुळे प्रश्नांची उत्तरे द्यायला येणार नाही.
- का यावी? तिने तिच्या नवऱ्याबरोबर तिची कार्यपद्धती जुळवून घेतली आहे. विचार लादले असतील तर तिच्या संसारापुरते लादले आहेत.

>>आर्किटेकट आहेत म्हणे , घराचे डिझाइन काढ म्हटले तर त्यात बहुदा किचन दाखवत नसावी>>

Blackcat, तुम्ही लेख वाचलाय का हो? वाचला असेल तर हा परिच्छेद वाचला नाहीत का? :-
"....त्यामुळेच जेंव्हा आमच्या नवीन घरातलं स्वयंपाकघर आम्ही design करत होतो तेंव्हा अत्यंत साधं logical brief आम्ही स्वतःला दिलेलं होतं. आपल्या घरातलं स्वयंपाकघर democratic असावं , open असावं . तिथे कुणीही कधीही काहीही येऊन शिजवावं. स्वतः खावं इतरांना खाऊ घालावं. स्वयंपाकघर हे भूक लागणार्या प्रत्येकासाठी, भूक शमवण्यासाठी लागणारं साहित्य असलेलं ठिकाण आहे. ते प्रत्येकाने मुक्तहस्ते वापरावं इतर कुणावरही स्वतःच्या भुकेचं, चवीचं ओझं न टाकता, मग ती आपल्यावर जीवापाड प्रेम करणारी आई असो, बायको असो, गर्ल फ्रेंड असो, आजी असो किंवा कुणीही....."

हे वाचल्यावर मला तर भरून आलं Happy . आज मला कुठे बाहेर जायचं आहे, आणि घराबाहेर पडण्यापूर्वी मला घरातल्यांच्या जेवणाखाण्याचा विचार करावा लागणार नाहीये; उपाशी राहावं लागणार नाही इतपत स्वैपाक प्रत्येकाला येतो आहे त्यामुळे मी घरी नसले तरी स्वैपाकचं गाडं अडणार नाहीये - ही कल्पनाच किती उभारी देणारी आहे!

पालथे घडे प्रतिसाद नेहमीचेच आहेत. पण काही बायकांचे प्रतिसाद वाचून मजा वाटली.
नवरा सपोर्टिव्ह असेल, माणसासारखे वागणारा आणि वागवणारा असेल तर त्या बाईच्या इतर कर्तृत्वाला, विचारांना काही किंमतच नाही. म्हणजे नवर्‍याने अफेअर करून, मारहाण करून, गुलामासारखे वागवून वगैरे छळले तर त्या बाईचे कर्तृत्व, संघर्ष वगैरे खरा नाहीतर सगळे फालतू?
किती जळजळ!

त्यामुळेच जेंव्हा आमच्या नवीन घरातलं स्वयंपाकघर आम्ही design करत होतो तेंव्हा अत्यंत साधं logical brief आम्ही स्वतःला दिलेलं होतं. आपल्या घरातलं स्वयंपाकघर democratic असावं , open असावं . तिथे कुणीही कधीही काहीही येऊन शिजवावं. स्वतः खावं इतरांना खाऊ घालावं. स्वयंपाकघर हे भूक लागणार्या प्रत्येकासाठी, भूक शमवण्यासाठी लागणारं साहित्य असलेलं ठिकाण आहे. ते प्रत्येकाने मुक्तहस्ते वापरावं इतर कुणावरही स्वतःच्या भुकेचं, चवीचं ओझं न टाकता, मग ती आपल्यावर जीवापाड प्रेम करणारी आई असो, बायको असो, गर्ल फ्रेंड असो, आजी असो किंवा कुणीही....."

सगळ्यांचे हेच स्वप्न असते,
घरचे सोडाच , सावित्रीबाई फुल्यांनी नवऱ्याला ठार करायला आलेले मारेकरी पोटासाठी हे काम करतात , हे कळल्यावर त्यांना रात्री 12 वाजता जेवायला घातले होते

आज मला कुठे बाहेर जायचं आहे, आणि घराबाहेर पडण्यापूर्वी मला घरातल्यांच्या जेवणाखाण्याचा विचार करावा लागणार नाहीये >> अगदी रिलेट झाले.
नीधप यांचा मुद्दा आवडला.

आज मला कुठे बाहेर जायचं आहे, आणि घराबाहेर पडण्यापूर्वी मला घरातल्यांच्या जेवणाखाण्याचा विचार करावा लागणार नाहीये

ते शिवाजी महाराज , दगड , त्यात बेडूक , रामदास स्वामी वगैरे गोष्ट आठवली, जणू काय लग्न नाही झाले तर पुरुष उपाशीच मरतात,

Proud

) त्यामुळे, कष्टाने मिळवलेली जमीन पुढच्या पिढीकडे सोपवायची तर समोरचं मूल आपलं आहे ह्याची खात्री तर असायला हवी नं ? मग आता हा पेच सोडवायचा कसा ? तर स्त्री इतर कुठल्याही पुरुषाशी संबंधच ठेऊ शकणार नाही अशी काहीतरी युक्ती करायला हवी होती. संबंधच काय तर इतर पुरुषांच्या संपर्कातही ती येऊ नये अशी चोख व्यवस्थाच करायला हवी होती.त्यासाठी एक फार धूर्त योजना आखण्यात आली, ती म्हणजे विवाह संस्था

असा इतिहास सांगत आहे लेखिका .
कुटुंब संस्था निर्माण करण्या मागे लेखिका जे कारण सांगत आहे ते अतिशय तर्कहीन कारण आहे .
कुटुंब संस्था नसती तर मुलांचे संगोपन ,त्यांचे महागडे शिक्षण,करायला कोण येणार होता .
बाकी प्राणी स्वलांबी आहेत .
पण माणूस परावलंबी प्राणी आहे ..
स्वतःचे अन्न स्वतः मिळवायची ताकत सुधा माणसात यायला कमीत कमी १५ वर्ष जावे लागतात .
लेखिका शिकली ती काय स्वतःच्या हिमतीवर ..तिच्या आईवडिलांनी लाखो रुपये उधळले असतील तिच्या वर .
काही ही विचार मांडले आहेत लेखिकी नी कुटुंब विषयी .
वाचणारे काय शत मूर्ख आहेत असं वाटतं काय तिला .
मुंग्या,हत्ती,वाघ,जवळ जवळ सर्व च प्राणी कुटुंब करून राहतात.
ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे.
कुटुंब व्यवस्था ही स्त्रिया न चे शोषण करणारी संस्था आहे असं एकवेळ मान्य करू मग .
स्त्री आणि पुरुष एकत्र एका घरात राहणार नाहीत .
राहिले की परत गाडी मूळ रुळावर येईल ..
स्त्री आणि पुरुष chya मिलानातून मुल झाले तर ते कोण्ही सांभाळायचे ह्या प्रश्नाचे उत्तर काय .
आपण जी काही मालमत्ता जमा करतो ती वारसा हक्कानी कोणाला द्यायची ह्या प्रश्नाचे काय उत्तर..
कारण ह्या मालमत्ते मुळेच स्त्रिया कुटुंब पद्धतीच्या बळी पडल्या आहेत असे स्वतः लेखिका सांगतेय आपल्या महान लेखात .

खुपच छान लेख. विचारांची स्पष्टता आवडली. स्त्रिवादी लेखावर
ट्रोलांचा धिंगाणा सुरू झाला की समजावे की लेख/विचार bang on आहे. थयथयाटाची मजा घ्या. Wink

पोस्ट च्या विषयाच्या विपरीत कमेंट असेल तर आपण त्याला trol म्हणू शकतो पण त्याच विषयात प्रश्न उपस्थित करण्यात trol म्हणता येणार नाही .
अजुन एक शंका .
लेखक जेव्हा डॉक्टर ही पदवी नावा समोर लावतो तेव्हा त्या लेखकाला फक्त आरोग्य आणि शरीर शास्त्र ह्याच विषयात अधिकार वणीनी बोलता येईल आणि लोक सुद्धा त्याच विषयातील मतांचा स्वीकार करतील .त्या नुसार लेखिकेने बांधकाम क्षेत्रातील कौशल्य साठी दिल्या जाणाऱ्या पदवीचा आपल्या नावा समोर उल्लेख केला आहे त्याचे प्रयोजन काय आहे

पुरुष धार्जिणी संस्कृती निर्माण करण्यासाठी आणि ती टिकवून ठेवण्यासाठी कराव्या लागणार्या शोषणाची अत्यंत वस्तुनिष्ठ व्यवस्थाच निर्माण केली गेली.
पुरुष धर्जिनी संस्कृती आपणाला माहीत आहे कारण त्याच संस्कृती मध्ये आपण लहानाचे मोठे झालो आहोत .
ही स्त्री धर्जिणी संस्कृती विषयी कुतूहल आहे .
पुरुष सत्ताक पद्धतीला पुरुष सुद्धा कंटाळले आहेत .
स्त्री sattak पद्धत आली तर पुरुषांचे आयुष्य २० वर्षांनी वाढेल .
काहीच चिंता नाही
उद्या आपल्याला तशी संस्कृती स्थापन करायची झाली तर त्याची रूपरेखा काय असेल हे जाणून घेण्याची उस्तुकाता आहे .

लेखिकेने विचारांची उत्तम क्लॅरिटी ठेवून लेख लिहिला आहे. त्यामुळे लेखाखाली आलेले बहुतांश प्रतिसाद वाचून hence proved असे वाटले!

सोपे आहे , बाईने लग्न करताना नोकरी न करणारा व घर बघणारा नवरा करावा , किंवा नोकर ठेवता येईल इतका पगार मिळवावा अन नवरा घरजावई करून डोसाईल ठेवावा,

माझी हाये तयारी, पण बायकाच भेटत नाहीत तशा

लेख फार आवडला.
>>>>>>>> “मी घरी नसले तर माझ्या घराचं पानही हलत नाही” किंवा “आमच्या ह्यांना साधा चहा देखील करायला येत नाही”, “किंवा आमच्या घरी सगळ्यांना माझ्याच हातच्या गरम गरम पोळ्या/भाकरी लागतात” इत्यादी इत्यादी, असल्या dysfunctionality ला कौतुकांच्या वेष्टणात गुंडाळून स्वतःचं आणि इतरांचही जगणं दुर्धर करून टाकणार्या toxic feminity>>>>>>>>>> +१११११

त्यामुळे लेखाखाली आलेले बहुतांश प्रतिसाद वाचून hence proved असे वाटले!>>>>>>+++111111

नवरा सपोर्टिव्ह असेल, माणसासारखे वागणारा आणि वागवणारा असेल तर त्या बाईच्या इतर कर्तृत्वाला, विचारांना काही किंमतच नाही. >>>>+++++123456789

>>>>;आज मला कुठे बाहेर जायचं आहे, आणि घराबाहेर पडण्यापूर्वी मला घरातल्यांच्या जेवणाखाण्याचा विचार करावा लागणार नाहीये>>>
हे असं माझ्या घरी होतं.मी तशी घडी प्रयत्नपूर्वक बसविली आहे .... पण इतर अनेकींच्या घरी तसं नाहीए याची पूर्ण कल्पना आहे... ही परिस्थिती प्रत्येक घरात यावी यासाठी प्रत्येक संवेदनाशील माणसाने जाणीवपूर्वक पावलं उचलायला हवीत... कोणत्याच बाबतीत single point of failure असू नये

कुटुंब पद्धती आणि विवाह संस्था ह्या जालीम संस्था मालमत्तेचा हक्क वारसाला देतात .
ज्यांची हा हक्क नाकारण्याची हिम्मत आहे त्यांनी लेखिके chya विचारला पाठिंबा देणे हे १००% स्वीकारता येईल .
पण त्याच्या विपरित वागणूक ठेवून जे कमेंट करत आहेत ते ढोंगी आहेत .विवाह संस्था ,कुटुंब संस्था ह्यांचा पुरेपूर फायदा घेवून अजुन जास्त
फायद्या साठी विचारांच्या कोलांट्या उड्या मारणारी लोक समाज द्रोही लोक आहेत.
ह्याचे उत्तर अपेक्षित आहे

<<<केवळ चूल आणि मूल ह्या टोकांवर झुलणारा स्त्रीत्वाचा डोलारा उतरवून फक्त व्यक्ती म्हणून स्त्री कडे बघता आलं तर अन्न ह्या एका छोट्याश्या गोष्टी साठी किती मोठी किंमत ती व्यक्ती मोजतेय ह्याचा अंदाज जरी आला तरी आपल्या अपेक्षा आटोक्यात ठेवता येतील.>>>

अगदी खरे. स्वयंपाक ही by default स्त्रीची जबाबदारी नाही. पण traditional कुटुंबसंस्थेमुळे स्त्रीसाठी ही जबाबदारी 'नैसर्गिक तत्व' आहे असे presumption दृढ होते.

तसे प्रीझमशन बायकांनी नाकारावे , मी नोकरीला जाईन , नवर्याने घरी बसावे असे जाहीर करावे,

मला आता पार्ट टाइम पाळणाघर चालू करावेसे वाटत आहे

लेखिका व तिच्या घरचे घरात नाही तर घर नावाच्या लॉजमध्ये/ होस्टेलमध्ये रहात आहेत असे वाटते. स्री ही नाजूक, सुंदर निसर्गानं बनविली आहे. तिच्या वावरण्यानं घराला घरपण येते. मातृसत्ताक पद्धती मध्ये सुद्धा अन्न स्रीच शिजवत असणार. मला नक्की माहिती नाही. पण बाळाला स्तनपान करुन अन्न पुरवते, तेच बाळ मोठे झाले की हाताने अन्न शिजवून भरवते म्हणून ती अन्नपूर्णा आहे.
करिअरच्या मागे धावणाऱ्या, चूल आणि मूल आमची जबाबदारी नाही म्हणणाऱ्या स्त्रियांनी जेंडर शस्त्रक्रिया करून पुरुष बनावं.

Pages