गुरूची विद्या गुरूला

Submitted by फारएण्ड on 15 September, 2019 - 23:14

ते दिवस अनेकांना आठवत असतील. भारताच्या संघाचा बकरा करण्याच्या ठराविक पद्धती होत्या - परदेशातील विकेट्स, स्पीड, स्विंग, बाउन्स, स्लेजिंग, माइंड गेम्स. विशेषतः परदेशातील दौर्‍यांमध्ये, पण कधीकधी भारतातही. कधी नुसत्या वेगावर, कधी बाउन्सर्सनी जखमी करून, तर अनेकदा पत्रकार, जुने खेळाडू यांच्यापासून ते संघाचे मॅनेजर, कोच यांच्यापर्यंत अनेकांनी संघाला कमी लेखणारी विधाने करून खेळलेल्या माइंड गेम्स.

त्यात अत्यंत कौशल्याने खेळतानासुद्धा मैदानावर आपले 'बेसिक्स' विसरणे ही आपल्या लोकांची खासियत. ऐन भरात असलेल्या आक्रमक ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक मारल्यानंतर, म्हणजे क्रिकेटमध्ये म्हणतात तसे "after doing all the hard work", पुढे रन काढताना केवळ बॅट जमिनीवरून घासत न नेल्याने बॅट क्रीजमध्ये 'वरती' आहे पण जमिनीवर टेकलेली नाही अशा अफलातून अवस्थेत रन आउट होणे, किंवा प्रचंड मेहनती व गंभीर असणार्‍या दोन खेळाडूंना रन्स काढताना अचानक कॉमेडी शो करण्याची हुक्की येणे, किंवा बाउन्सरच्या उंचीशी स्पर्धा करून तो खेळण्याचा प्रयत्न, असले अचाट प्रकार आपले लोक अधूनमधून करत.

तसेच फील्डिंगमध्ये. आपल्याकडे एक-दोन चांगले फील्डर्स कायमच असत. एकनाथ सोलकरबद्दल खूप वाचले आहे. ८०-९०मध्ये कपिल, श्रीकांत, अझर होते. पण संघाची एकूण लेव्हल खूप खाली. मारलेला बॉल बाउन्ड्रीकडे चालला आहे आणि स्क्रीनवर दिसणारा क्षेत्ररक्षक तो दुसर्‍या कोणालातरी दाखवतो आहे हा कायम दिसणारा सीन. बॉल अडवल्यावर पुन्हा थ्रो करताना बॉल आकाशात उंच जाऊनच खाली आला पाहिजे अशा हट्टाने केलेले थ्रोज. पूर्वी हे चित्र अगदी कॉमन होते.

गेल्या काही वर्षांत हे हळूहळू बदलत गेले. २००० साली जॉन राइटबरोबरच्या पहिल्या प्रॅक्टिसला अर्धा तास प्रॅक्टिस करून पॅव्हिलियनमध्ये चहा-बिस्किटे खायला जाणारा संघ आता आमूलाग्र बदल होऊन इतका फिट झाला आहे की एका पाकी फॅनने परवा भारत-पाक सामन्यानंतर कॉमेंट केली की त्यांचे (भारताचे) खेळाडू किती फिट वाटतात. आपले (पाकचे) नुकतेच बिर्याणी, गोश्त, कोफ्ता सगळे एका वेळेस खाऊन मैदानावर आल्यासारखे वाटतात. पूर्वी भारताला पहिल्याच मॅचमध्ये ग्रीन टॉप देऊन गारद करत. आता तसे केले, तर भुवीपासून ते बुमरापर्यंत आपलेच बोलर्स त्याचा जास्त फायदा घेतील अशी भीती दिसते. कोहली-धोनी जेव्हा खेळपट्टीवर धावतात, तेव्हा ते ऑसीजना लाजवतील असे रन्स काढतात. जे लोक अनेक वर्षे क्रिकेट फॉलो करत आहेत, त्यांना वेळोवेळी काही बदल जाणवले असतील. काही जबरदस्त कॅचेस, रन आउट्स, विकेट्स अशा होत्या की भारताकडून ते होताना पाहणे हा खूप नवा अनुभव होता. काही सिम्बॉलिक क्लिप्समधून हे बदल बघायचा हा प्रयत्न -

१९७८ साली कपिलच्या बोलिंगसमोर पाकच्या सादिक मोहम्मदने हेल्मेट मागितले, त्याबद्दल वाचले होते. भारताच्या गोलंदाजीविरुद्ध प्रतिस्पर्धी संघाने हेल्मेट मागण्याची ती बहुधा पहिलीच वेळ असावी. कपिलच्या त्या बोलिंगची क्लिप उपलब्ध आहे, त्यात नंतर सादिकने हेल्मेट घातलेलेही दिसते. अगदी हीच घटना त्या क्लिपमध्ये असेल असे नाही, पण मॅच तीच आहे.

पण यावरून नेहमी आपल्याविरुद्ध खेळले जाणारे डावपेच आपण दुसर्‍यांवर उलटवले, याची काही उदाहरणे आठवली.

१. वेव्हनचा रन आउट

ही २०००ची आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची मॅच. हा नवीन भारतीय संघ. २०००च्या सुरुवातीला झालेले मॅच फिक्सिंग स्कँडल व दोन मोठ्या सीरिजमध्ये झालेले पराभव यातून नव्याने उभा केलेला. नवीन कप्तान गांगुलीने आणलेल्या व पुढे १०-१२ वर्षे भारताकरता जबरदस्त कामगिरी केलेल्या खेळाडूंपैकी युवराज सिंगची ही पहिली मॅच.

ऑस्ट्रेलिया चेस करताना १७-१८ ओव्हर्समध्ये १०० रन्स बाकी आणि ६ विकेट्स हातात, बेव्हन क्रीजवर. इथून पुढची मॅच म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या दृष्टीने आधीच लिहून ठेवलेली स्क्रिप्ट. फारसे चौके-छक्के न मारताही बेव्हन इथून कधी मॅच खिशात टाकून घेऊन जाई, ते कळतही नसे. कारण त्याचे विकेट्सदरम्यानचे धावणे आणि एकूण फिटनेस.

एकेकाळी बहुतांश इतर संघ फिल्डिंगमध्ये 'गॅप' काढून रन काढत. ऑस्ट्रेलियाने वेगळेच तंत्र आणले - यात वन डेमध्ये बॉल कोठेही अलगद मारून एक किंवा दोन रन्स मिळतील इतक्याच वेगाने जाईल असा मारायचा, तो थेट फील्डरकडे मारला, तरी तेवढ्यात रन काढता येते आणि त्यांचे अतिशय वेगात पळणारे खेळाडू नेहमीच अशी रन काढत. बेव्हनचे रन काढण्याचे जजमेंट खूप भारी समजले जाई. पहिल्या काही विकेट्स गेल्यावर बेव्हन टिकला होता व त्याच्या पद्धतीने रन्स काढत होता. तेव्हापर्यंतची भारताची ख्याती पाहता तो नेहमीप्रमाणे फील्डरकडे 'सॉफ्ट' शॉट मारून रन काढायला गेला.

फरक इतकाच होता की या वेळेस तेथे युवराज होता. त्याने तो बॉल थांबवून स्टंप उडवेपर्यंत बेव्हन अजून अर्धा फूट मागे होता. अशा रन्स काढण्याइतकाच अशा फील्डिंगमध्येही बेव्हन भारी होता. पण इथे आपल्याला सवाई कोणीतरी भेटल्याचे भाव त्याच्या चेहर्‍यावर दिसतात आउट होउन परत जाताना.

मॅचमध्ये बाकी काही अनुकूल नसताना फील्डिंगच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांने एखाद्याच क्षणी दाखवलेल्या ढिलाईचा फायदा घेत एखादी विकेट अक्षरशः पैदा करणे ही ऑस्ट्रेलियाची अनेक वर्षे खासियत होती. इथे सलमान बटचा युवराजने केलेला रन आउट तसाच आहे. फॉरवर्ड शॉर्ट लेगला उभा असताना उलटा पळत जाऊन थोडा जास्तच पुढे आलेला सलमान बट पाहून एका थेट थ्रोमध्ये त्याला त्याने इथे बरोब्बर उडवले. पुढे अनेक गेम्समध्ये युवराजचे असे असंख्य रन आउट्स आहेत. विशेषतः ऑफ साइडला तो उभा असताना एकाच सलग अ‍ॅक्शनमध्ये बॉल पिक अप करून थेट बोलरच्या स्टंप्सवर मारून तो बॅट्समनला परत पाठवत आहे, हे दृश्य अनेकदा दिसले आहे.

२०००च्या मॅच फिक्सिंग वगैरेनंतर गांगुली-राइटने संघ नव्याने बांधला. त्यात आलेल्या या तरुण खेळाडूंनी आपली वन डे टीम आणखी वरच्या लेव्हलवर नेली. बेव्हनचा रन आउट ही त्याची सुरुवात होती.

२. जाँटीचा कॅच

त्या काळात शॉर्ट कव्हरमध्ये जाँटीचा 'टेरर' होता. त्याच्या फील्डिंगव्यतिरिक्त त्याचे कॅचिंगही जबरी होते. तर या २००२च्या कोलंबोच्या चॅम्पियन्स ट्रॉफी मॅचमध्ये भारताच्या २६१ रन्सना उत्तर देताना हर्शेल गिब्जने द. आफ्रिकेला १९०पर्यंत नेले. पण तो क्रॅम्प्समुळे 'रिटायर्ड हर्ट' झाला. दुसर्‍या बाजूला जाँटीही नीट खेळत होता. हरभजनच्या एका बॉलला स्वीप करताना तो जरा हवेत राहिला. तेथे शॉर्ट फाइन लेगला असलेल्या युवराजने
झेपावत तो वरच्या वर पकडला आणि जाँटीइतकीच जाँटीगिरी करून त्याला परत पाठवले. इथे गेमही फिरला व आपण ती तोपर्यंत एकतर्फी होत चाललेला गेम खेचून आणला.

३. ऑसीज आणि माइंड गेम्स

“Well if you think the Australians have got into the mind of Ganguly, Tendulkar has got into the mind of Glenn McGrath” - इयान चॅपेल - २००१मधल्या वन डे सीरिजमधला एक गेम. या सीरिजमध्ये सचिनने मॅग्राथला टार्गेट करायचे, हे ठरले होते. त्याप्रमाणे जवळजवळ प्रत्येक (वन डे) मॅचमध्ये त्याने त्याच्या बोलिंगवर अत्यंत आक्रमक फटकेबाजी केली. या मॅचमध्येही सुरुवातीपासून मॅग्राथच्या बोलिंगवर त्याने मारलेले फटके बघण्यासारखे आहेत - काही पूर्ण आक्रमक, तर काही क्लासिक तेंडुलकर शॉट्स.

सतत माइंड गेम्स खेळणार्‍या ऑसीजना या पॉइंटला फुल टेन्शनमध्ये आणले त्याने. कारण आधीच ते ती फेमस टेस्ट सीरिज हरले होते. ही मॅच जर हरले असते, तर वन डे सीरिजही हरले असते. त्यामुळे अत्यंत टेन्स वातावरण होते. याच्याआधी व नंतर ५ मिनिटांचे रेकॉर्डिंग पाहिलेत तर मॅग्राथवर किती टेन्शन आणले होते, ते सहज दिसेल.

४. Sprint, sprint, sprint!

एरव्ही ऑस्ट्रेलियाला आपण सहसा हरवले आहे ते बहुतांश भारतीय पद्धतीने क्रिकेट खेळून. कलाकारी ही आपली खासियत, तर फिटनेस आणि शिस्तबद्धता ही त्यांची. फलंदाजीत मार्क वॉ व गोलंदाजीत वॉर्न सोडला, तर 'कलाकारी' हा त्यांच्या कौशल्याचा भाग नाही. फिटनेस, क्षेत्ररक्षण, प्रेशर हाताळायची क्षमता, मोक्याच्या वेळेस आपला खेळ उंचावणे, अत्यंत शिस्तबद्ध गोलंदाजी व दिसायला आकर्षक नसली तरी वेळेवर हमखास चालणारी फलंदाजी याच्या बळावर ते सामने जिंकतात. याउलट गेल्या एक-दोन दशकांतील भारतीय विजय हे सचिन, लक्ष्मण, हरभजन यांच्या कलाकारीवर जिंकलेले आहेत. पण ऑसीजसारखीच फलंदाजी त्यांच्याचविरुद्ध करून त्यांना गारद केले अशी वरच्यासारखी फारशी उदाहरणे नाहीत. मात्र हे आणखी एक -

२०१६च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या २०-२०च्या सामन्यांत कोहली आणि धोनी दोघांची जोडी जमली. तोपर्यंत आवश्यक असलेला रन रेट वाढत चालला होता. पण या दोघांचाही फिटनेस व एकमेकांबरोबर खेळताना धावांचे जजमेंट इतके जबरी आहे की मोठे शॉट्स बसत नव्हते, तेव्हा त्यांनी अत्यंत आक्रमकपणे पळून रन्स काढायला सुरुवात केली. ऑसी क्षेत्ररक्षकांकडून धावा चोरणे सोपे नाही. पण इथे त्या वेळच्या सामन्यातील कॉमेंटरीचे काही भाग पाहा -

Hazlewood to Kohli, 2 runs, two more, this is incredible running, Kohli steps out and flicks the ball off his toes, he and Dhoni are absolutely steaming between the wickets, #mohalisobig that the Aussies are struggling to keep these to ones

Faulkner to Dhoni, 2 runs, they are running Australia ragged! Dhoni dabs the ball towards mid-on, the fielder has to come in from long on, he has no chance in preventing the second, Dhoni and Kohli sprint sprint sprint

असे एरव्ही ऑसीज इतरांविरुद्ध करत. इथे त्यांचीच पद्धत त्यांच्याचविरुद्ध यशस्वीपणे वापरली कोहली आणि धोनी दोघांनी. नंतर स्कोअर आवाक्यात आल्यावर मात्र मग कोहलीमधला भारतीय खेळाडू जागा झाला आणि त्याने एकाच ओव्हरमध्ये ३-४ चौके मारून मॅच संपवली. ऑसी फील्डिंगवर मात करून धावा काढणे आपल्या लोकांकडून आधी दिसल्याचे लक्षात नाही.

५. श्रीशांतचा बाउन्सर

आपल्या लोकांना ऑस्ट्रेलियात किंवा द आफ्रिकेत खेळण्याची तयारी म्हणजे chin music ला तोंड देण्याची तयारी. भारतात ज्या उंचीवर बॉल खेळावा लागतो, त्यापेक्षा या देशातील पिचेसवर बॉल बराच वर येतो व त्याची सवय आणि तयारी केलेली नसेल तर तो खेळणे जड जाते. अगदी खूप प्रॅक्टिस केलेली असेल, मनाची तयारी केलेली असेल तरीही नेहमीच्या सवयी झटक्यात बदलता येत नाहीत. त्यामुळे मग अशा अफलातून अवस्थेत आपले लोक अनेकदा सापडत.

पण आपल्या बोलरने त्यांच्या बॅट्समनला, तेही अशा पिचेसवर वर्षानुवर्षे खेळलेल्या - हेच म्युझिक ऐकवताना पाहणे यासारखा अनुभव नाही. श्रीशांतने २०१०च्या टेस्टमध्ये जॅक कॅलिसला टाकलेला बॉल गुड लेंग्थवरून असा उसळला की त्यालाही तो झेपला नाही. पेस आणि बाउन्स दोन्ही खतरनाक होते या बॉलचे.

एकदा असे दणके बसू लागले की मग साहजिकच पिचेस इतकी बाउन्सी असू नयेत वगैरेचा साक्षात्कार होतो. कारण आता आपले लोकही हा गेम उलटवू शकतात.

६. डावखुरा स्विंग बोलर - इरफान

सुमारे १५-२० वर्षे पाकड्यांविरुद्ध खेळणे म्हणजे वासिम अक्रमला फेस करणे. त्याचे ते वेगवान स्विंगिंग यॉर्कर्स, कधी बाहेर जाणारे तर कधी झपकन आत येणारे बॉल्स खेळणे भल्याभल्यांना जमत नसे. अक्रम, वकार, शोएब यांच्या गोलंदाजीवर सराव केलेल्या सईद अन्वर, आमिर सोहेल वगैरेंना किमान पाटा पिचेसवर आपली तेव्हाची बोलिंग भिरकावून देणे सोपे होते, यात काहीच आश्चर्य नाही. पण या पाकड्यांना आंतरराष्ट्रीय लेव्हलला स्वतः त्याचा सामना करावा लागला नव्हता.

इरफान पठाण येईपर्यंत!

"आमच्याकडे असे बरेच पठाण पडलेत" अशी वल्गना करणार्‍या (कोच) जावेद मियाँदादचे दात २००४ साली पठाणच्याच मदतीने आपण कसोटी व वन डे दोन्हीत घशात घातले. पण त्यावरही कडी केली ती २००६मधल्या कराची टेस्टमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये तीन खरतनाक बॉल्स लागोपाठ टाकून त्याने हॅटट्रिक काढली.

पहिल्या दोन्ही मॅचेस महापाटा पिचेसवर झाल्यानंतर तिसर्‍या मॅचला कराचीला पहिल्या दिवशी बोलिंगला मदत मिळेल असे वातावरण होते. द्रविडने टॉस जिंकून फील्डिंग घेतली. आपल्या बोलिंगवर व बॅटिंगवर प्रचंड भरवसा असल्याशिवाय कोणीही पहिली फील्डिंग घेत नाही. पण इरफानने खतरनाक बोलिंग करून तो निर्णय योग्य होता हे सिद्ध केले. पहिल्याच ओव्हरमध्ये टप्प्याचा व स्विंगचा अंदाज तीन बॉल्समध्येच घेऊन चौथ्या बॉलपासून पुढे हॅटट्रिक काढली. नवीन बॉलचा स्विंग हा स्लिप्सच्या बाजूला असतो. आउटस्विंगर सुरुवातीला जास्त वापरला जातो. त्यामुळेच २-३ स्लिप्स, गली वगैरे सुरुवातीला असतात. कारण बहुतांश लोक बॉल बाहेर जाईल अशा तयारीने खेळतात व त्यामुळे अचानक आत येणारा बॉल हमखास विकेट काढतो.

इथे सलमान बट डावखुरा. त्यामुळे याच दिशेने स्विंग झालेला बॉल त्याच्या दृष्टीने बाहेर जाणारा. त्याचा कॅच स्लिपमध्ये गेला. पुढचा युनिस खान. तीन स्लिप्स, एक गली. हा बॉल नक्कीच बाहेर जाणार. इरफानने टाकलादेखील ऑफ स्टंपच्या दिशेने. युनिसची बॅट त्या बाहेरच्या दिशेने खाली आली, पण तोपर्यंत तो बॉल हवेतल्या हवेत नुसता आत वळला नाही, तर 'डिप' झाला आणि बॅटच्या सुमारे अर्धा फूट आत त्याच्या पॅडवर लागला. यानंतर आला मोहम्मद युसुफ. तो त्या काळात प्रचंड कन्सिस्टंट होता. त्यालाही तीन स्लिप्स, दोन गली. ऑफ साइड इतकी टाइट केल्यावर या वेळेस तरी बॉल नक्कीच तिकडे स्विंग करायचा प्लॅन असेल? नोप! युसुफची बॅट सरळ खाली आली बॉलची दिशा बघून, पण बॉल आणखी आत आला आणि 'गेट'मधून थेट त्याचा स्टंपच घेऊन गेला. युसुफसारख्या फलंदाजाचा इतका बकरा करायचा म्हणजे सोपे काम नव्हे. तिकडे ते पाच फील्डर्स केवळ डावपेच म्हणून उभे केले होते, हे कळेपर्यंत पाक ०/३ झाले होते.

दुर्दैवाने आपल्या कणाहीन व दिशाहीन बॅटिंगमुळे आपण ही मॅच हरलो. नाहीतर अक्रमच्या १९९२ वर्ल्ड कपमधल्या त्या दोन बॉल्सइतकेच याही ओव्हरचे महत्त्व ठरले असते.

७. वॉर्नलाच गुगली!

इथे शेन वॉर्नच्या औषधाची मात्रा त्यालाच पाजली आहे. कलकत्त्याची २००१ची लक्ष्मण-द्रविडने फिरवलेली कसोटी. या भागीदारीने भारताचा पराभव होणार नाही हे नक्की केले, पण विजयाची खातरी नव्हती. कारण वेळ पडली, तर ऑस्ट्रेलिया एक दिवस सहज खेळून काढेल असे वाटत होते. पाचव्या दिवशी चहापानापर्यंत ऑस्ट्रेलियाचे तीन गडी बाद झाले होते. मॅच ड्रॉ होत चालली आहे असे चित्र दिसत होते. कारण एकच सेशन बाकी होते. ऑस्ट्रेलियाला २००+ रन्स करणे बाकी होते, आणि भारताला त्यांचे ७ गडी. जरा काहीतरी वेगळे करावे, म्हणून गांगुलीने सचिनला बोलिंग करायला दिली. इथे क्लिपमध्ये "एकच ओव्हर" असे काहीतरी तो सांगतोय असे दिसते.

सचिनच्या बोलिंगमध्ये त्याचा टप्प्यावर त्या दिवशी किती कंट्रोल आहे याचा खूप मोठा भाग असे. एरव्ही तो खूप रन्स देत असे. पण जर टप्पा कंट्रोल होत असेल, तर तो एखाद्या कसलेल्या अनुभवी स्पिनरइतकाच धोकादायक असे. त्यात तो मनाप्रमाणे ऑफ स्पिन किंवा लेग स्पिन काहीही टाकू शके, त्यामुळे फलंदाजांना झेपत नसे. या मॅचमध्ये तो बोलिंगला आला, तेव्हा हेडन आणि गिलख्रिस्ट क्रीजवर होते. त्या काळात हे दोघे जर असतील तर कोणतीही धावसंख्या अवघड नसे. किंबहुना या आधीच्याच मॅचमध्ये याच दोघांनी पहिल्या डावात घणाघाती बॅटिंग करून मॅच भारताच्या खिशातून काढून घेतली होती (९९/५वरून २९६/६). हे टिकले असते, तर ते २२०सुद्धा त्यांनी एका सेशनमधेच मारले असते.

पण त्या दिवशी सचिन या मॅचमधल्या फलंदाजीतील अपयशाची भरपाई गोलंदाजीत करणार होता . गिलख्रिस्टला पहिल्याच बॉलला त्याने उचलला. लगेच हेडनलाही. पण खरी मजा आली ते वॉर्नची विकेट बघताना. आधीचे दोन्ही बॉल डावखुर्‍या फलंदाजाच्या दृष्टीने 'आत येणारे' होते - म्हणजे उजव्या फलंदाजाच्या दृष्टीने लेग स्पिन. वॉर्नही त्याच अंदाजाने खेळायला गेला. प्रत्यक्षात हा बॉल गुगली होता. तो बाहेर जायच्याऐवजी आत आला आणि बरोब्बर स्टंपसमोर वॉर्नचा बकरा झाला. एका जागतिक दर्जाच्या लेगस्पिनरला त्याच्याच ट्रिकने जाळ्यात पकडले सचिनने. हे जर वॉर्नने एखाद्या - विशेषतः इंग्लिश - फलंदाजाविरुद्ध केले असते, तर तो Ball of the century वगैरे झाला असता. पण इयान चॅपेलची लगेच आलेली कॉमेंट अत्यंत चपखल होती -

"He is the one player you would expect to pick the wrong 'un"

सलग १६ मॅचेस जिंकून हवेत उडणार्‍या ऑसीजना या व पुढच्या मॅचमध्ये हरवून भारताने जमिनीवर आणले. असेच पुन्हा नंतर पुन्हा सलग १६ मॅचेस त्यांनी जिंकल्यावर २००८मध्ये पर्थलाही पुन्हा भारतानेच हरवले होते.

या क्लिप्स व ही उदाहरणे मला वेगळी वाटतात, कारण यात भारताने ज्या डावपेचांकरता प्रतिस्पर्धी संघ किंवा एखादा खेळाडू नावाजलेला आहे, त्याच्यावरच त्याचाच गेम उलटवला आहे. नाहीतर एरव्ही आपले विजय हे आपल्या खास भारतीय कौशल्यामुळे मिळालेले असत. "दोही मारा, लेकिन सॉलिड मारा के नही?" टाइपचे विजय. कधी सचिन, कधी लक्ष्मण तर कधी सेहवाग यांची विविध प्रकारची कलाकारी, तर कधी द्रविडची अत्यंत संयमी पण तितकीच ठाम तंत्रशुद्ध बॅटिंग. बोलिंगमध्ये बहुतांश विजय फिरकीच्या जोरावरचे. कपिलने जिंकून दिलेले काही सामने सोडले, तर वेगवान गोलंदाजी वगैरे अपवादानेच. त्यामुळे एखादे ग्रीन टॉप पिच दिले की तो स्विंग वा बाउन्स आपल्या फलंदाजांना झेपत नाही व त्याचबरोबर दुसर्‍या बाजूने त्याचा फायदा घेणारे ३-४ गोलंदाज एका वेळेस संघात नाहीत, अशी नेहमीची अवस्था.

पण गेल्या काही वर्षांत आधी बिग-५, त्याचबरोबर कुंबळे, युवी, हरभजन, झहीर, इरफान, ईशांत, मग धोनी, कोहली, पुजारा आणि आता भुवी आणि बुमरा यांनी वेळोवेळी केलेल्या कामगिरीने हे चित्र पालटले. एकूण तुलनेत संघ अजूनही जगज्जेता वगैरे नाही. पण पुन्हा रँकिंग चांगले आहे. मुख्य म्हणजे आता त्याच जुन्या ट्रिक्स या टीमविरुद्ध चालत नाहीत, किंबहुना त्या उलटू शकतात, याचे एक ठळक उदाहरण -

१९९९मध्ये स्टीव्ह वॉने नवोदित ब्रेट लीला तेव्हाच्या फलंदाजीवर 'सोडला' आणि तो भारताला हरवून पहिल्याच इनिंगमध्ये ५ विकेट्स घेऊन गेला. नंतर २००८ला पर्थला पुन्हा तीच जुनी ट्रिक वापरताना त्यांनी शॉन टेट या अतिशय वेगवान बोलरला आणले. पण आता ती चाचपडणारी टीम नव्हती. भारताने ही मॅच जिंकली व शॉन टेटला एकही विकेट मिळाली नाही. तो नंतर पुन्हा टेस्ट मॅचेसमध्ये निवडला गेला नाही. उलट आपल्याच ईशांत शर्माने खेळपट्टीचा सर्वात जास्त फायदा उठवला. रिकी पॉण्टिंगविरुद्ध दोन्ही डावांतील त्याची बोलिंग ही भारताच्या सर्वोत्कृष्ठ स्पेल्सपैकी असेल.

२०-२५ वर्षांपूर्वी विंडीज मधे कोणी जर असे म्हंटले असते की काही वर्षांनी इथे चाचपडणारी टीम विंडीज ची असेल व भारताचा प्रमुख पेस बोलर त्यांची धूळधाण उडवेल, तर कोणीही विश्वास ठेवला नसता. पण त्याच वेळचे त्यांच्या दिग्गजांच्या साक्षीने बुमराहने ते करून दाखवले.

विजय हा विजय असतो वगैरे सगळे ठीक असले, तरी भारताने दुसर्‍या टीमला त्यांचीच पद्धत वापरून जिंकलेल्या अशा मॅचेसची मजा काही वेगळीच आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे अगदी रिलेट झाले.
सचिनच्या गुगलीवर वॉर्नचे आउट होणे आणि चॅपेलची कमेंट नेहमीच लक्षात राहील अशी आहे.
श्रीसांथचा कॅलिसला बाउन्सर पण. त्यादिवशीच्या वर्तमापत्रात/क्रिकइन्फोवगैरे वर तीच इमेज होती सगळीकडे.

मस्त धागा!

अनेक जुने सामने आठवले.