शब्दधन - सोळा आण्याच्या गोष्टी - शतशब्द कथा स्पर्धा!

Submitted by संयोजक on 1 September, 2019 - 22:59

shashak1.jpg
---
रहस्य हा विषयच उत्कंठावर्धक आणि रसपूर्ण! मग गीतारहस्य असो अथवा भारत वर्षाच्या एकुलत्या एक नर्मदा नदीचे उलट्या दिशेने वाहण्याचे रहस्य असो. संपूर्ण विश्व कैक रहस्यांनी भरलेलं आहेत.
मनात धडकी भरणारी रात्रीच्या वेळची मिणमिणत्या दिव्यांच्या प्रकाशात दिसणारी सावल्यांची हालचाल...... मग त्या अगम्य, अतर्क्य, अनामिक भीतीने अंगावर सर्रकन येणारा काटा असेल किंवा एखाद्या व्यक्तिरेखेच्या माहिती नसलेल्या अनभिज्ञ बाजूचे, व्यक्तिमत्त्वाच्या अनोळखी पैलूचे दर्शन असेल.... सारेच रहस्यमय! लिहिताय ना मग? आम्ही आतूर आहोत. आम्हालाही वाचायची आहे रहस्यकथा; तुमच्या लेखणीतून उतरलेली.

इथे मात्र आपले शब्दधन जरा काटकसरीने वापरू. केवळ शंभर शब्दांत तुम्हाला रहस्यकथा लिहायची आहे.

फेसाळत्या नदीलाही बांध असतात. मग स्पर्धा त्याला अपवाद कशी असेल?

तर नियम साधे सोप्पे आहेत:

१. कथा मराठी भाषेत असावी.
२. भाषा शक्यतो शुद्ध असावी.
३. असभ्य शब्द, शिवीगाळ नको.
४. कथा अर्धवट, अनाकलनीय, अतार्किक नको.
थोडक्यात, रहस्य मांडणी आणि त्याची उकल असे दोन्ही साधले गेले पाहिजे.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पुढील गोष्टी लक्षात घ्या :
१. प्रवेशिका पाठवण्याकरिता 'मायबोली गणेशोत्सव २०१९' या ग्रूपचे सदस्य असणे आवश्यक आहे. हा ग्रूप सदस्य नोंदणीकरता २ सप्टेंबरला खुला करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी.
२. 'मायबोली गणेशोत्सव २०१९' ह्या ग्रूपचे सदस्यत्व घेण्यासाठी या पानाच्या उजवीकडे दिसणाऱ्या 'मायबोली गणेशोत्सव २०१९' या निळ्या शब्दांवर टिचकी मारा. नंतर 'सामील व्हा' या शब्दांवर टिचकी मारा.
३. याच ग्रूपमध्ये उजवीकडे 'नवीन लेखनाचा धागा' या शब्दांवर टिचकी मारा. (गणेशोत्सव २०१९ ग्रूप मधले गप्पांचे पान, नवीन कार्यक्रम हे पर्याय वापरायचे नाहीत).
४. प्रवेशिकेचे शीर्षक पुढील प्रकारे द्यावे - {सोळा आण्याच्या गोष्टी} - {प्रवेशिकेचं नाव} - {तुमचा आयडी}"
५. प्रवेशिका ०२ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर २०१९ या वेळेत पाठवता येतील.
६. या स्पर्धेचे परीक्षण संयोजक मंडळ करणार असून परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मला कथा लिहायचीय पण १०० शब्दांत लिहलेल्या रहस्य कथा वाचताना मजा येईल का काही ? निदान २०० शब्द तरी हवेत. तरी प्रयत्न करून बघतो

६. या स्पर्धेचे परीक्षण संयोजक मंडळ करणार असून परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. >> मतदान का घेत नाहीयेत दरवर्षीसारखे.
संयोजकांना आवडण्यापेक्षा लोकांना/वाचकांना आवडणे जास्त महत्वाचे आहे. चार पाच संयोजकांची निवड नक्कीच बायस्ड असू शकते. मायबोलीवर भरपूर वाचन समीक्षा करणारे सभासद आहेत लोकशाही मार्गाने निवड झाल्यास सर्व स्पर्धकांना सारखा चान्स राहतो जिंकण्याचा.
संयोजक परीक्षक म्हणून असण्याचा पायंडा आजिबात आवडला नाही.

संयोजकांनी त्यांचा निर्णय द्यावा पण मतदानाद्वारेही स्पर्धा घ्यावी. त्यात मजा येते. आम्हालाही भाग घेतल्यासारखे वाटते.
छान उपक्रम.

चार पाच संयोजकांची निवड नक्कीच बायस्ड असू शकते. मायबोलीवर भरपूर वाचन समीक्षा करणारे सभासद आहेत लोकशाही मार्गाने निवड झाल्यास सर्व स्पर्धकांना सारखा चान्स राहतो जिंकण्याचा.>>>>

माणसे आहेत म्हणजे तिथे बायस राहणारच.. लोकशाही मार्गाने निवड करणारे बायस्ड नसतात असे कुठे आहे. आणि चार पाच संयोजक देखील माबोकर आहेत. जर ते सोडून इतर माबोकर बायस्ड नाहीत तर संयोजकांनाही या मताचा फायदा मिळायला हवा.

संयोजकांनीच निवड केलेली काय वाईट? मतदान घेणं सोपं नाहीये आणि इतकी मेहनत करून फार मतदान होत नाही. त्यात वेळही वाया जातो. बायसबद्दल म्हणाल तर कोणत्याही पद्दतीनं निकाल जाहीर झाला तरी 'बायस्ड होता' ही नेहमीची तक्रार असतेच. त्याला इलाज नाही.

स्पर्धेत आपल्या आनंदाकरता भाग घ्या. इथे पहिला नंबर आल्यानं काही ज्ञानपीठ पुरस्कार मिळणार नाहीये आणि न आल्यानं काही नाक कापलं जाणार नाहीये.

त्यामुळे संयोजकांच्या सोईवर सोडून द्या.

संयोजकांनी त्यांचा निर्णय द्यावा पण मतदानाद्वारेही स्पर्धा घ्यावी. त्यात मजा येते. आम्हालाही भाग घेतल्यासारखे वाटते.>>>

पॉप्युलर फिल्मफेअर अवॉर्डस आणि क्रिटिकस स्पेशल असे दोन्ही ठेवा... बाकी मतदान करण्यात मजा येते हेही तितकेच खरे आहे.

फार मतदान होत नाही याबाबत सहमत. 100 ते 150 च्या आसपास लोक सगळ्या इव्हेंट्सना मतदान करतात. मायबोलीची लोकसंख्या पाहता हा आकडा खूपच कमी आहे.

इथे पहिला नंबर आल्यानं काही ज्ञानपीठ पुरस्कार मिळणार नाहीये >> ज्ञानपीठ एकवेळ पटकन मिळेल, पण इथे नंबर मिळेल का. मुद्दा इथल्या नंबराचा आहे Wink Happy

संयोजकांनी निकाल देण्यात काय प्रॉब्लेम आहे? लोकांना वोट करायला सांगितलं तरी कंपूबाजी होतेच!
एकेक होतकरु लेखक/पत्रकार डुआयडीज ची फौज बाळगून असेल तर तो 'लोकशाही' निकाल कसा म्हणावा? इथे थोडंच बोटाला शाई लावतात !

संयोजकांनी परीक्षण करण्यात काय वाईट आहे? संयोजकही मायबोलीकरच आहेत.
वोट करणारे माबोकर सगळेच काही उत्तम कथा/साहित्यालाच वोट करतील असं नाही.

<<< संयोजकांनी त्यांचा निर्णय द्यावा पण मतदानाद्वारेही स्पर्धा घ्यावी. त्यात मजा येते. आम्हालाही भाग घेतल्यासारखे वाटते.
छान उपक्रम.>>>+१

आतापर्यंत दरवर्षी मतदानपद्धतीने निकाल लागत होता ना मग आता या वर्षीच हा बदल करण्यामागे काय कारण आहे कळेल का?

साधना,
आपण लोक बायस्ड असतो, 50% सुद्धा मतदान करत नाही, पक्ष/कंपू/प्रचाराला भुलून मत देतो, चांगल्या नेत्यांना मत देऊ ह्याची ग्यारंटी नसते म्हणुन आपल्या वतीने सरकारी नोकरीत असलेल्या लोकांनी परस्पर सरकार निवडून दिलेले चालेल का?
नाही म्हणजे ते लोक सरकारी नोकरीत आहेत तर सरकार कसे हवे हे ठरवण्यास ते जास्त लायक असे तुम्हाला म्हणायचे आहे का?

मागच्या 10 वगैरे संयोजक मंडळांनी मतदान यशस्वी रित्या पार पाडून दाखवले आहे तर ह्या वर्षीच्या मंडळाला ते का जमू नये. काही अडचण असेल तर दिलखुलासपणे सांगावी, वाचक समजून घेतील. पण धागे, प्रतिसाद उडवून लावणार्‍या मनमानी मंडळाकडून काही खुलासा, स्पष्टीकरण केले जाईल ही अपेक्षा नाही.
बर, परीक्षणासाठी काही पात्रता वगैरे क्रायटेरिया आहे का? म्हणजे गझल परीक्षण सुद्धा संयोजक करणार असतील तर त्या प्रांतातली संयोजकांची मुशाफिरी कळू दे वाचकांना. बेफिकीर, कैलास, सुप्रिया वगैरे मातब्बर गझलकार स्पर्धेत भाग घेणार तर त्यांना जोखणारा ही त्याच तोडीचा असावा अशी वाचकांची आणि खुद्द स्पर्धकांची इच्छा असणार ना. मी हा प्रश्न विचारला तर माझा प्रतिसाद उडवून टाकला.
तसे नसेल तर सालाबादाप्रमाणे मायबाप वाचकांना निर्णय घेऊ द्यावा.

स्पर्धेत जिंकावेच असे काही नसते... शंभरपैकी चारच वाचकांनी का असेना वीसेक कथा वाचून एखाद्या कथेला मत दिले, तर त्या चार मतांचे अप्रूप लेखकाला वाटते की. म्हणुन मतदान ही सर्वसमावेशक लोकशाही सिस्टीम चांगली आहे. कथेवर प्रतिसाद देणारे कमी असले तरी रेडियो बटन दाबून आपले मत मांडणारे वाचक जास्त आहेत.

हायझेनबर्ग +१.
इतकी वर्षे मतदानानेच विजेता निवडला जातोय. त्या कौलावर रिगिंगचा आक्षेप आल्याचं आठवत नाही.
संयोजक कोणा तज्ज्ञांकरवी निकाल लावणार असते, तर गोष्ट वेगळी.

हाब.
संयोजक बायस्ड असतील (च) हे गृहितक चुकीचे वाटते. त्यांना संशयाचा फायदा द्यायला हवा.

संयोजकांनी परिक्षण करताना कोणती पद्धत अवलंबली जाणार आहे, कोणत्या निकषांना किती वजन असणार त्याबाबत खुलासा करणे सुयोग्य ठरेल.
उदा.
शुद्धलेखन १ गुण
शुद्ध भाषा १ गुण
सभ्य भाषा १ गुण
सोपी भाषा - १ गुण
तर्क शुद्ध मांडणी - १ गुण
रहस्य मांडणी २ गुण
रहस्य उकल ३ गुण
एकूण गुण १०

तसेच सर्व परिक्षकांनी कोणत्या निकषाला किती गुण दिले आणि त्या गुणांची सरासरी म्हणून अखेरीस कथेला किती गुण मिळाले हे जाहीर केले तर एक नवीन उत्तम पायंडा पाडला जाऊ शकतो.
त्याच बरोबर अशी नवीन पद्धत सुरु करताना, आतापर्यंत दरवर्षी मतदानपद्धतीने निकाल लागत होता ना मग आता या वर्षीच हा बदल करण्यामागे काय कारण आहे कळेल का? हे ही सांगणे आवश्यक ठरते.

संयोजकांनीच निवड केलेली काय वाईट? >>>
मामी आणि सनव

संयोजक बनण्याकरता वेळेची उपलब्धता, उत्साह आणि नेट कनेक्शन याखेरीज इतर फारसं काही लागत नसताना आणि स्पर्धेच्या नियमांमधे 'शक्यतो', 'शुद्ध', 'असभ्य', 'अनाकलनीय' अशा प्रकारचे शब्द असताना केवळ त्या साताठ संयोजकांच्या आकलनक्षमतेनुसार आणि तर्कानुसार विजेता निवडला जाण्याचा प्रकार अनाकलनीय, अतार्किक वाटतो.
ही टिप्पणी केवळ यावेळच्या संयोजकांबद्दल नसून एक चुकीचा पायंडा पडू नये म्हणून केलेली आहे.

संयोजकांनी त्यांचा निर्णय द्यावा पण मतदानाद्वारेही स्पर्धा घ्यावी. >> हा सुवर्णमध्य ठरू शकतो.

यावर्षी मिपावर शतशब्दकथा स्पर्धा आयोजीत केली होती. जव्हेरगंज होते संयोजक मंडळात. स्पर्धेत mayu4u जिंकला होता, मला वाटतं तो आताच्या माबो गणेशोत्सव संयोजक मंडळात आहे.

त्यांची पद्धत (मी आतापर्यंत पाहिलेल्या वेगवेगळ्या पद्धतीपैकी) बेस्ट होती.
• सगळ्या लेखकांनी कथा संयोजक मंडळाला पाठवायच्या
• कथा संयोजक या आयडीनेच प्रकाशित होतील
• ज्या वाचकांना कथा आवडली आहे त्यांनी खाली प्रतिसादात +१ लिहायच.
• स्पर्धेनंतर सगळी मतं मोजली जातील आणि विजेत्या ३ कथा घोषित केल्या जातील आणि सगळ्या कथांचे लेखक कोण आहे ते सांगितले जाईल.

आता यात लुपहोल ही होती की
• डुआयडी वापरून मतदान होतील . पण ओपन मतदान असल्याने इतर वाचक डुआयडी पॉइंटआउट करू शकत होते.
• वैयक्तिक मैत्री असलेल्याना व्हॉट्सऍप वगैरे वापरून 'ही कथा मी लिहलीय, मला मत द्या' असे लेखक सांगू शकत होते. यावर मात्र काही उपाय नव्हता.
पण अशा पद्धतीने मत मिळवून लेखकाला आनंद होत असेल की 'मी सांगितले नसते तर या लोकांनी मला मत दिले असते की नाही' हा विचार करून दुःख होत असेल <- हे लेखकावरच सोडून द्यावे Proud

एनिवे आता इथल्या इश्यूकडे वळू:

जर अनंतचतुर्दशीपर्यँत संयोजक मंडळाने स्पर्धा-निकाल पद्धत बदलण्याचेपटेल असे उत्तर दिले नाही तर मतदान करण्यास उत्सुक वाचक 'मी परीक्षक' अशी गांधीटोपी घालून आपापल्या टॉप ३ कथा इथेच या धाग्यावर जाहीर करू शकतात. होऊनजौद्या क्रांती Lol Lol

पाकक्रुती स्पर्धेचा निकालही संयोजकच ठरवणार आहेत.
या आधीच्या कोणत्या गणेशोत्सवात मतदानाने आलेला निकाल पटला नव्हता ते समजून घ्यायला आवडेल.

एखाद्याने डुआयडीज वापरून शंभर वेळा मतदान केले तरी चालेल पण तो निर्णय संयोजक मंडळाचा असता कामा नये ही 'लोकशाहीची' व्याख्या केविलवाणी आहे. डुआयडी रोखता येत नाहीत हे प्रशासनाने पूर्वीच क्लियर केलेलं आहे.

संयोजक मंडळ तयार करताना जाहीर आवाहन केले होते. त्याला जो प्रतिसाद मिळाला त्यानुसार मंडळ बनवले. आता त्यांना त्यांचं काम करू दे की. नाहीतर स्वतः जायचं होतं मंडळात. हे लोक स्वतःचा पर्सनल वेळ व श्रम देऊन काम करत आहेत. तर त्यानाच टार्गेट केलं जातंय हे खेदजनक आहे.
विद्रोहच करायचा तर अनेक मुद्दे आहेत- संयोजक मंडळ निवडताना निवडणूक प्रक्रिया,मतदान घेऊन निवडलेलं नाही. त्यांनी जे उपक्रम निवडले ते ठरवताना मतदान झालं नाही. उदाहरणार्थ - तीन ओळींचं हायकू की चार ओळींची चारोळी? शुगर फ्री पदार्थ की ग्लूटेन फ्री?

यावरून आठवलं- मागे मराठी भाषा दिनानिमित्त तेव्हाच्या संयोजक मंडळाने 'गोनिदा' ही थीम ठरवली होती. ज्यांनी या लेखकांचे काहीच वाचलेले नाही त्यांना भाग घेताच आला नाही. ही थीम लोकशाही पद्धतीने ठरवली होती का? अर्थात, संयोजक मंडळाचं निर्णय स्वातंत्र्य म्हणून हे मान्य केलं पाहिजे. अन्यथा खुसपटच काढायचं तर अनेक पद्धतीने काढता येतं.

संयोजकांनी त्यांचा निर्णय द्यावा पण मतदानाद्वारेही स्पर्धा घ्यावी. >> हा सुवर्णमध्य ठरू शकतो.> >>>+१

डुप्लिकेट आयडी आणि मतदानाचा नेमका कसा संबंध आहे? लेखक डुप्लिकेट आयडी ने स्वतः ला किंवा आवडत्या आयडीला मतदान करेल, असे का?
करू दे की.. त्या मूठभर लोकांसाठी बाकी शेकडो सदस्यांची स्पर्धेत सहभागी होण्याची संधी का काढून घ्यायची?

Harpen च्या आकलनशक्ती आणि तर्काच्या मुद्द्याला अनुमोदन.

नाहीतर स्वतः जायचं होतं मंडळात. >> totalitarian establishment ला अडचणीचे प्रश्न विचारले की असे ऐकायला मिळते. Proud
जे मला करायला जमते आणि आवडते ते मी करणार ना. मला कथा लिहायला आवडते आणि थोडे फार जमते देखील, ते मी करेन आणि सहभागी होईल. मी संयोजक मंडळात असतो आणि बेफिकीरांची गझल जोखण्याची जबाबदारी कोणी मला दिली असती तर मी स्पष्ट नकार दिला असता. ज्या साहित्यात मला गती नाही तिथे मी जबाबदार आणि प्रामाणिक परफॉर्मन्स देऊ शकणार नाही हे मला कळते. गती आहे हे प्रूव्ह करण्याचा काही क्रायटेरिया नाही म्हणुन शेवटी आवडली/ नाही आवडली एवढ्यावरच निर्णय करायचा असेल तर 5 लोकां ऐवजी 150 लोकांनी आपली आवड सांगणे चांगले आहे की.

हे लोक स्वतःचा पर्सनल वेळ व श्रम देऊन काम करत आहेत. तर त्यानाच टार्गेट केलं जातंय हे खेदजनक आहे.>> आणि स्पर्धेसाठी लिहिणारे, वाचणारे कुणाचा वेळ श्रम खर्च करतात? . Proud ही परस्पर पूरक सिस्टिम आहे. संयोजकांना सदस्यांच्या सहभाग हवा आहे आणि सदस्याना संयोजकांचा सर्वाना सामावून घेत स्पर्धा facilitate करण्याचा प्रयत्न. टीका आणि कौतुक सगळ्यांना ड्यु प्रोसेस मध्ये मिळतेच.

हाब, तुमचे मुद्दे चांगले आहेत.

मामी या गणेश मंडळात या आधी काम केलेल्या माबोकराचा मुद्दाही विचारात घेण्याजोगा आहे. तिने मतदानाची तांत्रिक प्रक्रिया करण्यासाठी लागणारा वेळ व त्या तुलनेत केले जाणारे मतदान यावर जे लिहिले ते बघता संयोजकांनी यावर्षी बदल करायचे ठरवले असेल तर मला तरी गैर वाटत नाही.

मी इथल्या मतदानाचा संबंध बाहेरील जगातील मतदानाशी लावत नाही. जिथे मतदान हा पूर्ण प्रक्रियेचा भाग आहे तिथे 0 टक्के जरी मतदान झाले तरीही दरवेळेस ती प्रक्रिया करावी लागतेच.

संयोजक मंडळ परीक्षण करणार हे वाचून लगेच टीका करणे म्हणजे संयोजक मंडळ सक्षम नसल्याचे आधीच ठरवणे असे मला वाटते.

१. तांत्रिक मुद्दा संपूर्णपणे अमान्य. भाग घेणार्‍यांची लिस्ट करुन ती एकाखाली एक लिहिणे हे १० मिनिटांचे काम असेल.
मतदानाघेण्यासाठी लागणारी व्यवस्था तयार आहे. त्यात योग्य ते टॅग घालून ही वरची लिस्ट टाकणे आणखी १० मिनिटे.

२. गणेशोत्सवातील भाग घेणार्‍यांना संयोजक म्हणतात आणि दिवाळीत संपादक म्हणतात. का बरं असेल हे?

३. कुठल्याही ज्येष्ठ श्रेष्ठ मूठभर व्यक्तींपेक्षा क्राऊड सोर्स्ड बायनरी निवड पद्धत ही कधिही चांगली. हा काही ब्रेक्झिटचा निर्णय करायचा नाहिये. आणि इथे ज्येष्ठांना विचारणार असंही लिहिलेलं नाहीये. बायसेस सगळ्यांचे असतात यात काहीच दुमत नाही. पण ५-६ लोकांचे बायसेस जर १०० लोकांत ( एनी नंबर मोअर दॅन ५-६) विभागले गेले तर ते वॉटर डाऊन होण्याची शक्यता स्टॅटिस्टिकली भरपूर प्रमाणात वाढते.

४. म्हातारी मेल्याचं दु:ख नाही पण काळ सोकावतो. चांगला मतदानाचा पायंडा असताना आणि त्यात कोणीही कधिही माझ्या माहितीत तरी आक्षेप घेतला नसताना हा बदल का केला हे वेमा/ अ‍ॅडमिन यांनी (ही खाजगी जागा आहे हे माहित असुनही) सांगितलं पाहिजे.

५. प्रश्न विचारला की धागा गायब करणे. मग तो प्रश्न उडवुन धागा परत आणणे. त्या धाग्यातला मतदानाबद्द्लचा नियम गायब करणे, पण बाकी सगळीकडे तसाच ठेवणे, आणि त्या धाग्यात निवड कशी करणार हे गुलदस्तात ठेवणे आणि यासगळ्या बद्दल शून्य स्पष्टीकरण देणे. जो प्रश्न एका उत्तरात निकाली निघाला असता त्या साठी पूर्ण गणेशोत्सवात वातावरण तापत ठेवणे. ही संयोजकांची कसली स्टॅटेजी आहे कोणास ठावुक!

हाबच्या पूर्ण प्रतिसादाला +१
या घडीलाही कातडी बचावू ब्लाईंडआयपेक्षा काही स्पष्टीकरण असेल ते द्यावं. अडेलतट्टूपणा करायचा असेल तर तो ही अवश्य करावा. पण तो करणार आहोत हे लिहा आणि विषय संपवा. चांगल्या मंगल गणपतीच्या वातावरणात हे चर्विचरणाचं गुर्हाळ चालू ठेवू नका.
बदल करायचा नाहीये याची कातडीबचावू पोस्ट लिहायला मदत हवी असेल तर संपर्कातून कळवलंत तर मी ही मदत करेन. पण हे थांबवा!

१. शशकसाठी शब्द कसे मोजतात ? कारण मी वर्डमध्ये जेव्हा टाईप केले , तर प्रत्यक्ष शब्द शंभर पेक्षा कमी असूनही , त्याने विरामचिन्हे धरून शब्दसंख्या शंभर दाखवली .
२. तर शब्द कसे मोजले जाणार आहेत ?
३. बऱ्याच जणांच्या कथा ह्या शंभरपेक्षा जास्त शब्द दाखवत आहेत . त्या कथांचे काय ?
४. काही कथांमध्ये तर विरामचिन्हे सोडूनही शब्दसंख्या जास्त होत आहे . त्या कथांचे काय ?
५. मी आधी विचारलेल्या एका प्रश्नात शंभर ही शब्दसंख्या ही काटेकोरपणे पाळली जाणार आहे , असे नमूद करण्यात आलेले आहे .
६. शब्द कमी असले तर चालणार आहे का ? किंवा शब्द जास्त असले तर चालणार आहे का ?

कृपया लोकांचा उदंड प्रतिसाद पाहता हे स्पष्ट केले तर फार बरे होईल .
धन्यवाद .

Pages