लिव्ह दाय ड्रीम्स ! - माझी कैलास मानसरोवर यात्रा भाग ८

Submitted by केदार on 6 October, 2014 - 02:48

कैलासची परिक्रमा आता फक्त ५ किमी मध्ये संपणार होती. आजच्या दिवसाचा कार्यक्रम म्हणजे कैलास परिक्रमेतील उरलेला ५ किमी ट्रेक करून, त्या ठिकाणाहून बस मध्ये बसून परत दार्चनला जायचे, तिथून सामान लोड करून पुढे त्याच बसने कुगूला (मानसरोवर) पोचायचे. कुगूला जाताना अर्थातच मानसरोवरची प्रदक्षिणा घालून त्या कॅम्प वर पोचायचे होते. थोडक्यात पहिल्या ५ किमी नंतर पूर्ण बस प्रवासच.

ते पाच किमी आम्ही सहजच पार केले जेथून बस मिळते त्या ठिकाणी येऊन इतर लोकं येण्याची वाट पाहू लागलो. इथेच आम्ही चीन मधील पोर्टर, पोनी ह्यांना पैसे दिले कारण आता पुढचा प्रवासात त्यांची गरज नव्हती.

आम्ही बस मध्ये बसून पुढे निघालो. दार्चन आले. हॉटेलपाशी गाडी जरावेळ थांबली. तिथे माझ्या लक्षात आले की माझा आय फोन हरवला. कारण तो खिशात नव्हता. मी काल रात्री बॅटरी चार्ज करून तो आज सकाळी खिशात ठेवल्याचे आणि जेंव्हा रघूने त्याचा मोबाईल हरवला आहे असं सांगितल्यावर माझा फोन मी चेक केल्याचे आठवत होते. म्हणजे हा आज कुठेतरी वाटेत पडला. रघूचा मोबाईल त्याला बॅगेत सापडला.

माझ्या आयफोन मध्ये चीन मध्ये चालणारे मेट्रिक्स कार्ड होते. ज्यावर आम्ही सर्व प्रत्येकाच्या घरी खुशाली देत असू की आम्ही व्यवस्थित आहोत वगैरे. घरी फोन करून मग मी आयफोन इरेझ करायला सांगीतले. आता घरी हवे तेंव्हा कम्युनिकेशन (रेंज असेल तर) बंद झाले. माझ्यासोबतच हा त्रास अख्खा कंपूला भोगावा लागला कारण सर्व जण माझा फोन वापरत.

तो सर्व एपिसोड दार्चनला झाला. आम्ही १० मिनिटे बस मधून उतरलो होतो. परत चढल्यावर स्थिरस्थावर होतो आहोत तोच भांडण सुरू झाले.

आमच्यासोबत एक ज्येष्ठ नागरिक होते त्यांचे आणि त्या गुरू गाईडचे काहीतरी वाजले. पण जेनांच्या मदतीसाठी श्याम धावला आणि श्यामची व गुरूची बाचाबाची झाली. हे सर्व जेंव्हा झाले तेंव्हा मी आयफोन चिंतेत होतो त्यामुळे हे काही माहिती नव्हते. आम्ही सर्व बसमध्ये बसलो पण गुरू गाईड मात्र ते जी काही बाचाबाची होती तिला सोडायला तयार नव्हता. आम्ही तसे बस मध्येही नेहमीच बॅक बेंचर्स होतो. श्याम माझ्या दोन सीट पाठीमागे बसला होता. पण गुरू तिकडे ड्रायव्हरच्या केबिन मधून शिव्या देत होता. त्याला शांत बस असे दोन तीन समोरच्या लोकांनी म्हणून पाहिले, पण तो, कुठे आहे तो लहाना पोरगा, आता बघतो त्याची, त्याला अन तुम्हाला पोलिसांच्या हवाली करतो, चीनचा अपमान करता काय? वगैरे वगैरे बोलत होता. रागाच्या भरात त्याने अगदी स्लिव्ह्स रोल करून आयल मधून श्याम कडे यायला सुरूवात केली.

त्याचा तो पवित्रा आणि स्लिव्ह रोलिंग मुळे मी जाम भडकलो, त्याला माझ्या जागे पर्यंत येऊ दिले (शेवटापासून चौथी सीट) आणि त्याच्या समोर धाडकन उभा राहिलो. तिथे नक्की काय बोललो ते आता पूर्ण आठवत नाही पण मी त्याला म्हणालो, तू बसमध्ये इथपर्यंत आलास पण इथून पुढे तू श्याम परत पोचू शकणार नाहीस. तुला मारामारी करायची तर माझ्यासोबत कर. अर्थात त्याने मला टच करण्याचीही हिंमत केली नाही. कारण आय वॉज टॉवरिंग ओव्हर हीम. तो फारतर ५ फुटाचा असेल आणि मी त्यापासून त्या बसच्या आयल मध्ये केवळ ६ इंचांवर उभा होता. आणि आयफोन हरवल्याचा राग त्याच्यावर काढण्यात मला काहीही त्रास नव्हता.

माझा हा पवित्रा पाहून लोकंही मग त्याला बोलले. पण तो आम्ही जिथे बसले तिथपर्यंत स्लिव्ह रोल करून आला तेंव्हा त्याला आमच्या LO सहित कोणीही थांबवले नाही. सर्व दिडमुढ वगैरे झाले होते. लीडरशिप स्किल्स आमच्या LO मध्ये नाहीत असे माझे पहिल्यापासून म्हणणे होते, ते माझ्यासाठी इथे अधोरेखित झाले कारण तो इतका वेळ त्या LO जवळूनच धमक्या देत होता आणि तो आणि इतर लोकं ऐकत होते.

श्याम कडे मी वळून पाहिले, त्यालाही कल्पना नव्हती की भांडण असे विकोपाला जाईल. पण त्याच्यापर्यंत तो गुरू पोचणार की नाही हे त्याला माहिती नव्हते.

हा एपिसोड झाल्यावर श्याम मला म्हणाला, " अबे केदार, मुझे मालूम था तू उसको छोडता नही बे, उसको अब छोडेंगे नही" श्यामला मी म्हणालो, अबे छोड अब, उसको पता चल गया है. और हम यंहा किसीको मारणे नही आहे, लेकीन कोई मारेगा तो प्रतिकार जरूर करेंगे"

हे एक उगाच गालबोट लागले. दरवेळी तो गुरू भारताबद्दल वाईट बोले, स्वतःचीच आडमुठी भूमिका घेऊन इतरांना त्रास देत असे त्यामुळे तसाही तो हिटलिस्टवर आला होताच. त्याला मी जर धक्का दिला असता तर कदाचित दोन तीन लोकांनी नक्कीच हात साफ केला असता.

तर हा एपिसोड आणि आयफोन एपिसोड पूर्ण होऊन आम्ही मानससरोवराकडे निघालो. बसमधूनच एक प्रदक्षिणा झाली आणि आम्ही आजच्या मुक्कामी येऊन पोचलो. इथे आम्ही दोन दिवस राहणार होतो.

बहुतेक सर्वांच्या रूम्स ह्या मानसरोवर फेसिंग असल्यामुळे अगदी गादीवर पडल्या पडल्या देखील कैलास आणि मानसरोवराचे दर्शन सहज होत असे.

थोड्यावेळानंतर आम्ही मानसरोवरामध्ये डुबकी लावून पापाचे काऊंटर रिसेट करायचे ठरवले आणि कपडे घेऊन निघालो. तर तेथे लोकं ऑलरेडी आंघोळ करत होते. (अन तेथेही काही लोकांनी साबन नेली होती, ते पाणी परत मानसरोवरातच !) ते बघून आम्ही सर्व, आणखी दूर एका निवांत जागी गेलो, जिकडे कोणाचाही आवाज येणार नाही आणि ती शांतता उपभोगताना डुबकीही लावता येणार होती. तिथे मग आम्ही काउंटर रिसेट केले. आम्ही सातही लोकांनी आपआपल्या अंडरवेअर मध्येच ते स्नान केले हे विशेष ! अतिशय थंडगार पाण्यात आंघोळ करणे म्हणजे भारीच. पण मजा आली !

सरोवर आणि कैलास !

तिथे एक छोटा गोम्पा (बुद्धिस्ट मंदीर) होते. मग त्यातही जाऊन आलो.

गोम्पासहित कैलास मानसरोवर.

दुसरे दिवशी सकाळी लोकं मानसरोवराची पूजा करणार होते. त्याची तयारी लोकांनी चालू केली. तिथे कोण कशी पूजा करणार ह्याचे वाद सुरू झाले. ज्यात मला काही इन्ट्रेस्ट नसल्याकारणाने मी परत सरोवराकाठी आलो.
दुसरे दिवशी सकाळी पूजा असणार होती. मग कोणी नाश्ता करू नये अशी टुम काढण्यात आली, जी अर्थातच आम्ही धूडकारून लावली आणि पूजा असली तरी उपाशी पोटी मी करणार नाही असे आम्ही काही जणांनी सांगीतले. होता होता २० लोक नाश्ता करणारी झाली. Happy

ऑलमोस्ट रात्र होत असतानाचे काही फोटो.

आज रात्री आणखी एक मोठी गोष्ट होणार होती, ती म्हणजे कैलासावरून मानसरोवरात तीन दिव्य लाईट / किरण रोज पहाटेच्या सुमारास (सहसा २ ते ४ ) येतात ( Mysterious lights) आणि ते सरोवरात स्नान करतात अशी वंदता आहे. यु ट्युबर तर ते लाईट पण दिसतील. तर आम्हाला अर्थातच ते किरण पाहायचे होते. कोणी म्हणतं की ते देव, कोणी म्हणतं की गंधर्व वगैरे.

तर आज रात्री जागायचं अश्या तयारीत आम्ही होतो. साधारण रात्रीचे १० एक वाजले असतील, तितक्यात गोंधळ सुरू झाल्याचा आवाज आला. कारण काय? तर पार्वेतला ते लाईटस दिसले असे त्याने सांगीतले. आणि दोन तीन नाही तर एकदम १० ! पार्वते हा उच्च भक्त असल्यामुळे कदाचित त्याला ३३ कोटी पण दिसतील अशी माझी खात्री आहे. तर त्या गडबडीमुळे आम्ही रात्री १ ला जाणारे १०:३० / ११लाच रूमच्या बाहेर पडून मानसरोवराकाठी गेलो. न जाणो ते खरेच असतील तर काय घ्या? मग तिथे खरचं अनेक लाईटस दिसले. लोकं अगदी आनंदी झाले पण त्या आनंदावर, ते लाईटस गाडीचे आहेत, पवित्र नाहीत असे सांगून मी विरजण टाकले.

श्याम, पराग, भीम आणि मी असे काठावर होतो. मग आम्ही नाईट फोटोग्राफी सुरू केली. पराग ट्रायपॉड आणतो असे म्हणाल्यामुळे मी ट्रायपॉड घेतला नाही. पण दुर्दैव असे की तो ट्रायपॉड बिघडला. तितक्यात मग पराग, श्याम आणि भीमने ट्रायपॉडवर शक्तीप्रयोग सुरू केले, ज्याकडे माझे लक्ष नव्हते. तिघेही त्या ट्रायपॉडचे हे ओढ, ते ओढ असे करू लागले कारण कॅमेरा नीट बसत नव्हता. तितक्यात माझे लक्ष गेले, मग तो ट्रायपॉड व्यवस्थित सेट कसा करायचा ह्याचा अभ्यासवर्ग घेऊन आम्ही नाईट फोटोग्राफी करण्यास सुरूवात केली. परागचा कॅमेरा नीट बसला, पण माझा बसेना कारण त्या शक्तीप्रयोगात काही गोष्टी खरच शक्तीशाली होऊन गेल्या त्यामुळे तो ट्रायपॉड बिचारा त्याचे प्राण कंठाशी घेऊन होता.मग परागनेच तो वापरावा असे ठरवले. माझ्याकडे 1.8 लेन्स आहे. पण तीचा पुरेपूर वापर मात्र त्या रात्री घेता आला नाही.

रात्र पौर्णिमेची असल्यामुळे सगळं व्यवस्थित दिसत होतं. एक गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे मानसरोवराकाठी असताना आमच्या बॅचच्या वेळेस पौर्णिमा पण होती. त्यामुळे अनेक लोकांना ह्या बॅच मध्ये यायचे होते असे ऐकले.

कुणीतरी चहा देखील आणला. पण हे मिस्ट्री लाईटस काही येत नव्हते. बाकी दूर वरून गाडीचे छोटे छोटे लाईट मात्र दिसत होते. श्याम कंटाळून निघून गेला. अजून एक दोन तासानंतर परागही निघून गेला. मी आणि भीम त्या लाईटसची वाट पाहत होतो. साधारण पावने तीनच्या सुमारास आम्हीही कंटाळलो आणि झोपायला निघालो.

ते लाईटस कुणालाही दिसले नाहीत ! सकाळी पार्वते म्हणाला त्याने चाळीस लाईट पाहिले. पण त्याचा परत एकदा मुड ऑफ करायचा नव्हता म्हणून मी काही न बोलता अरे ते चाळीस एक आम्हीही पाहिले ( जे खरेच होते) असे सांगीतले.

सकाळी मग लोक विधिवत तयार झाले. माझ्या सहयात्रेकरूला सोवळ्यात तयार करण्याचे कार्य मी पार पाडले. आणि आम्ही पूजा बघण्यास निघालो.

अब हम क्या करेंगे? हवन करेंगे हवन करेंगे !!

इथे येऊन लोकांनी सर्वधर्मसमभाव दाखवला. हिंदू धर्माप्रमाणे सगळ्या वाटा "त्याच्या"कडेच जातात. म्हणून मग ॐ सहनावत्तू सारखे नमाज ही अदा केला. Happy

तिथे जवळपास फिरताना आम्हाला काही याकची शिंगे दिसली. तिथे फोटो घेण्याचा कार्यक्रम केला.

आम्ही जिथे उतरलो होतो तिथे पूल टेबल होता. मला खेळायची हुक्की आली. मी इतरांना विचारले पण कोणी तयार झाले नाही. शेवटी रघू न्यूजर्सीकर दिसला, तो तयार झाला. मग तेथील लोकांसोबत आम्ही पूल गेम खेळला. पहिला आम्ही जिंकलो. चिअर्स करायला बाकी यात्री पण मग सामील झाले. मग परत दुसराही खेळला. त्यात हारलो. सोडत १:१ अशी सुटली. थोडा पाऊस आला मग तिसरा काही खेळला नाही.

संध्याकाळी मग आम्ही परत थोडे दूर जाऊन पाणी आणण्याचा कार्यक्रम केला. आज रात्री जागायची इच्छा मात्र नव्हती.

दुसरे दिवशी सकाळी उठून मग आम्ही मानसरोवराचे शेवटचे दर्शन घेऊन तकलाकोटपडे परत निघालो. ज्यासाठी हे सर्व केले ते उदिष्ट्य साध्य झाले होते. त्यामुळे सर्वच जण आनंदी होते.

लिव्ह दाय ड्रीम्स ! - माझी कैलास मानसरोवर यात्रा भाग १
लिव्ह दाय ड्रीम्स ! - माझी कैलास मानसरोवर यात्रा भाग २
लिव्ह दाय ड्रीम्स ! - माझी कैलास मानसरोवर यात्रा भाग ३
लिव्ह दाय ड्रीम्स ! - माझी कैलास मानसरोवर यात्रा भाग ४
लिव्ह दाय ड्रीम्स ! - माझी कैलास मानसरोवर यात्रा भाग ५
लिव्ह दाय ड्रीम्स ! - माझी कैलास मानसरोवर यात्रा भाग ६
लिव्ह दाय ड्रीम्स ! - माझी कैलास मानसरोवर यात्रा भाग ७

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कशी असते हे म्हणायचं होतं. पाहिली लिंक मध्ये. धन्यवाद.

Submitted by अमर ९९ on 21 August, 2019 - 12:04
>> साधना जी हो लिंक पाहिली होती. धन्यवाद. केदार सर आणि अजून एक लेखिका यांच्या लेखमालिका वाचल्या आहेत. खूप सुंदर अनुभव देतात हे लेख. तुमचं सुध्दा हरिद्वार वगैरे ठिकाणी लेकींबरोबर केलेलं प्रवासवर्णन वाचलं आहे. धन्यवाद पुन्हा एकदा.

Pages