तुला पाहते रे- भयंकराचे आकर्षण, एक सामाजिक प्रश्नचिन्ह

Submitted by अतुल ठाकुर on 20 July, 2019 - 20:43

काही गोष्टी पाहण्यात तुम्हाला रस नसला तरी पाहाव्या लागतात. घर लहान आहे त्यामुळे संध्याकाळी टिव्हीवर जे काही लागते ते कानावर मुद्दाम हेडफोन लावला तरी त्यातून झिरपत जाते. डोळे उघडे ठेवून काम करावे लागत असल्याने ते अधून मधून दिसतही राहते. या मालिकेबद्दल माझे वैयक्तिक मत काय आहे हे महत्त्वाचे नाही. पण २९८ भागांच्या या मालिकेला मिळालेली अमाप प्रसिद्धी मला सामाजिक दृष्ट्या विचार करायला लावणारी वाटली. "वय विसरायला लावते ते प्रेम" अशा आगळ्यावेगळ्या विषयाने सुरुवात झालेली ही मालिका पुनर्जन्म आणि सूडावर येऊन काल संपली. पहिली बायको राजनंदिनी हिला गच्चीवरून ढकलून देऊन तिचा खून करणार्‍या विक्रान्त सरंजामेने स्वतःचा शेवट गच्चीवरुन उडी मारून केला. नियतीने केलेला न्याय असे बहुधा दाखवायचे असणार. पण सर्व प्रश्न इथूनच सुरु होतात.

२९८ भागांच्या मालिकेत नायक आणि लग्नानंतर खलनायक झालेला माणुस हा पराभूत होताना फारसा दाखवलेलाच नाही. शेवटच्या फक्त दोन भागांमध्ये त्याने संपत्ती मिळविण्यासाठी जे काही खून पाडले त्याचे तो समर्थन करताना दिसतो. म्हणजे उरलेले २९६ भाग त्याची कमान चढतीच दाखवली आहे. शेवटच्या भागातदेखिल एकंदरीत त्याचीच पकड दिसते. कारण मी कबुली दिली तरी तुम्ही माझं काहीही वाकडं करु शकत नाही. माझ्यासारखी बुद्धीमत्ता कुणाकडेही नाही अशा वल्गना तो करताना दाखवला आहे. आणि अक्षरशः कुणीही त्याचं काहीही वाकडं करु शकत नाही हेच मालिकाभर दाखवण्यात आलं आहे. शेवटी तर नायिका आपण केलेले कारस्थान त्याला कळले तर? या प्रश्नाने प्रचंड घाबरलेली दाखवली आहे.

न्याय, क्षमा की दया हा प्रश्नही या संदर्भात महत्त्वाचा वाटतो. नायक बाप होणार, पोटातील बाळाला वडील हवे, त्याने कितीही भयंकर गुन्हे केले, माणसं ठार मारली तरी आपले त्याच्यावर प्रेम आहे, त्याचे आपल्यावर प्रेम आहे. झाले गेले विसरून जावे, पुन्हा पुढे चालावे, जिवनगाणे गातच राहावे या ट्रॅकवर काही भाग गेले. प्रेमाच्या, आपल्या माणसांशी निष्ठूर होता येणे कठिण असते हे मान्य केले तरी या टोकाचे गुन्हे केल्यावरही माणसे गुन्हेगाराबद्दल हळवी होतात हे पाहून नवल वाटले.

प्रेम, होणारे मुल याबद्दल हळवा झालेला नायक निर्घृणपणे छोट्या मुलासकट एका कुटूम्बाला संपवतो. मित्राला ठार मारतो, ज्याने नोकरी दिली त्याच्यावर खूनाचा आरोप ठेवून त्याला देशोधडीला लावतो. सासर्‍याच्या औषधात फेरफार करून त्याला ठार मारतो आणि शेवटी त्याच्या निरातिशय प्रेम करणार्‍या बायकोचाही गच्चीवरून फेकून खून करतो. नायकाच्या व्यक्तीमत्वाची ही सारी काळीकुट्ट बाजु पुरेशी ठळकपणे अधोरेखित व्हाही तशी होत नाही. उलट त्याच्या शेवटच्या समर्थन करण्याने त्याच्याबद्दल लोकांच्या मनात सहानुभूती निर्माण होते की काय असे वाटत राहते. इथे कलावंताच्या कला स्वातंत्र्याचा प्रश्न येतो.

बलात्कार वाईट म्हणजे तो दाखवायचाच नाही की काय? असा जर कुणी प्रश्न कलेच्या स्वातंत्र्याबाबत विचारला तर त्याचे उत्तर दाखवायचा हेच असणार. पण तो पाहताना घृणा वाटली पाहिजे. माणसे त्याचा आनंद घेऊ लागली तर काहीतरी चुकते आहे असेच म्हणायला हवे. समाजात हर्षद मेहताच्या बुद्धीमत्तेबद्दल आकर्षण असणारी माणसे असतात. मलाही तसे आकर्षण वाटायचे. पण एका भल्या गृहस्थाने माझे कान पिळले होते. तो संतापून म्हणाला होता ही बुद्धीमान माणसे पुढे त्यांच्या वाटेत जे कुणी येतात त्यांचा समूळ काटा काढतात.

आपल्या समाजात कायदा आहे, न्यायव्यवस्था आहे, पोलिस आहेत या बाबी या मालिकेत जवळपास नव्हत्याच. जगातली सर्व गरीब माणसे संपत्ती मिळविण्यासाठी विश्वासघाताचा मार्ग अवलंबतात काय? खून पाडतात काय? आणि तसा मार्ग त्यांनी अवलंबिल्यास ते समर्थनीय आहे काय हा देखिल प्रश्न येथे विचारता येईल. प्रामाणिकपणे, मेहनतीने पुढे आलेल्या माणसांची असंख्य उदाहरणं आहेत. इतके गुन्हे करूनही कुठलाही पश्चात्ताप न झालेला नायक आत्मसमर्थन करीत राहतो. त्याच्यापुढे सुष्टांचे म्हणणे दुबळे वाटत राहते. मालिकाकारांना न्याय होतो आहे की नाही, झाला तर कसा होतो ही बाब महत्वाची वाटते की नाही, त्यांना नक्की काय दाखवायचे आहे हेच कळत नाही.

थोडक्यात काय तर भयंकराचे उदातीकरण आणि त्यामुळे भयंकराबद्दल वाटणारे सुप्त आकर्षण ही बाब मला चिंतेची वाटते.

अतुल ठाकुर

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे बापरे इतकं कायकाय आहे का तुपारेमधे :-O

लेख आवडला. यातील विचारांशी सहमत आहे. कबीर सिंगबद्दल जी चर्चा चालूय तिथे मीदेखील थोडंफार याच अर्थाचं लिहणार होते. पण तुम्ही ते जास्त चांगल्यारीतीने मांडलय.
> बलात्कार वाईट म्हणजे तो दाखवायचाच नाही की काय? असा जर कुणी प्रश्न कलेच्या स्वातंत्र्याबाबत विचारला तर त्याचे उत्तर दाखवायचा हेच असणार. पण तो पाहताना घृणा वाटली पाहिजे. माणसे त्याचा आनंद घेऊ लागली तर काहीतरी चुकते आहे असेच म्हणायला हवे. > अगदी. कालच हा विचार करत होते आणि तुलनेसाठी फ्रेंझी सिनेमातले बलात्कार दृष्य आणि द गर्ल विथ ड्रॅगन टॅटू सिनेमातले बलात्कार दृश्य हे दोन अगदी चपखल वाटले.

What's so obscene about Kabir Singh? हा लेख चांगला आहे.

लेख आवडला. छान मुद्दे मांडलेत.

पहिले दोन भाग बघून सोडून दिली होती. बघितली नाही परत कधीच, इथे त्या धाग्यावर वाचत मात्र होते अधे मधे.

छान लेख.
तुपारे पाहत नाही मी म्हणुन त्याच्या related धागा वाचायचं टाळते. नाही आवडत ते वाचावं कशाला आसा माझा समज.
पण हा लेख आवडला. अगदी खरे मुद्दे मांडले आहेत.

मी अगदी शेवटपर्यंत पाहिली. मला यात सुबोध भावे या नटाला खलनायक सुध्दा रंगवता येतो हे दाखवण्यासाठीच तर मालिका काढली नाही ना अशी शंका राहून राहून येत होती. अग्नीसाक्षी चित्रपट, बाजीगर यांनी अशा गुन्हेगारीचे उदात्तीकरण केल्याचं मत बनलंय. कंपनी किंवा इतर सिनेमे जे अंडरवर्ल्ड गुन्हेगारांना हिरो बनवून दाखवतात त्यामुळे नक्कीच चुकीचा संदेश समाजात जात असतो.तरीही असे चित्रपट कोट्यावधींची कमाई करतात.

*मला यात सुबोध भावे या नटाला खलनायक सुध्दा रंगवता येतो हे दाखवण्यासाठीच तर मालिका काढली नाही ना अशी शंका राहून राहून येत होती.* - +1 ! केवळ प्रेक्षकांच्या मनातील सुबोध भावेंची प्रतिमा वापरूनच 'सस्पेनस' निर्माण करण्याचा प्रयत्न असावा .

हम्मम..

परत इथे तोच कबीर सिंगचा प्रश्न येतो. संपत्तीसाठी एक गरीब माणूस कुठल्या थराला जाऊ शकतो हे दाखवणारी एका स्वतंत्र माणसाची कथा एवढेच मानून मालिका पहावी, यात कुठेही कुणाचेही समर्थन नाही, कुठलाही संदेश नाही, ही वृत्ती कुणाचेही प्रतिनिधित्व करत नाही असे समजावे व नवीन मालिकेकडे वळावे?

की यातून काय संदेश जातोय, कोण कसल्या प्रेरणा घेतोय, समाजाच्या कुठल्या भागाचे हा माणूस प्रतिनिधित्व करतोय हा विचार करून काळजी करावी?

बलात्कार वाईट म्हणजे तो दाखवायचाच नाही की काय? असा जर कुणी प्रश्न कलेच्या स्वातंत्र्याबाबत विचारला तर त्याचे उत्तर दाखवायचा हेच असणार. पण तो पाहताना घृणा वाटली पाहिजे. माणसे त्याचा आनंद घेऊ लागली तर काहीतरी चुकते आहे असेच म्हणायला हवे>>>>>>>

ज्या व्यक्तीवर मालिका आधारलीय त्या प्रकारच्या लोकांची घृणा वाटायला लागली तर मालिकेने काहीतरी कमावले असे म्हणता येईल हेमावैम.

तलवार हातात घेणाऱ्या मनुष्याला तलवारीनेच मरण येईल. हे वचन वाचले होते. अति महत्त्वाकांक्षी लोक आपल्या मार्गातील येणाऱ्या लोकांचा काटा काढत शिखरावर पोहोचतात, पण शेवटी कर्माचे फळ मिळते हे हिटलर, मुसोलिनी,सद्दाम हुसेन यांच्या चरित्रावरून कळून येते तरीही हिटलरला चांगला म्हणणारे लोक आहेत. जवळ पाकिस्तानी सत्ताधाऱ्यांचे उदाहरणे आहेत.

वर्षभर झाले जाणीवपूर्वक निर्णय घेऊन आम्ही घरी टीव्ही बंद केला आहे. तो निर्णय योग्यच आहे याची प्रचीती अनेकदा येते. हा धागा वाचून पुन्हा एकदा आली.

आगीमुळे/पुरामुळे झालेला विध्वंस, भांडणे, हाणामारी, अपघात वगैरे सारख्या गोष्टी "पाहायला" आजूबाजूला गर्दी जमते. त्याच मानसिकतेचा अनेकदा फायदा घेतला जातो. जे खपते ते विकले जाते. कुठेतरी एक किस्सा वाचला होता. खरा कि खोटा तपासायला मला लिंक मिळालेली नाही. पण तरीही सांगतो. ऐंशीच्या अस्वस्थ दशकात अमिताभ आणि देमार हाणामारी चित्रपटांचे पर्व सुऊ झाल्यार कोणीतरी राज कपूर यांना विचारले होते, "तुम्ही अमिताभला घेऊन चित्रपट का काढत नाही? त्याची चलती आहे सध्या". त्यावर राज कपूर यांचे उत्तर होते म्हणे, "Sex sales better than Amitabh". हा किस्सा खरा कि खोटा हा भाग तात्पुरता बाजूला ठेवला तरी ज्या काळात जे खपले जाते त्या काळात ते विकले जाते हि वस्तुस्थिती नाकारली जाऊ शकत नाही. घ्यावे कि नाही हा ज्याचा त्याचा निर्णय.

राहता राहिला सामाजिक परिणामांचा प्रश्न. फार मनावर न घेता केवळ विरंगुळा म्हणून बघणारा एक प्रेक्षकवर्ग आहे. पण त्याचबरोबर त्यातून नकळतपणे मनावर संस्कार घडणारा सुद्धा एक वर्ग आहेच. एकेकाळी गुटखा विकला जात होता. क्वचित खाणारे जसे होते तसे त्याचे व्यसन लागलेले सुद्धा खूप होते. विकणारे मात्र गब्बर झाले. कालांतराने मात्र त्यावर कायद्याने बंदी आली. असे इतर अनेक गोष्टींबाबत सांगता येईल.

राज कपूर यांच्या चित्रपटात सेक्स नाही दिसला मला पण रोमान्स भरपूर होता. अपवाद मंदाकिनीची आंघोळ.

आमच्याकडे झी मराठी नाही. त्यामुळे मालिका पाहिलेली नाही.
पण मायबोलीवरचे धागे वाचत , किमान त्यांवर नजर टाकत आलोय.
<थोडक्यात काय तर भयंकराचे उदातीकरण आणि त्यामुळे भयंकराबद्दल वाटणारे सुप्त आकर्षण ही बाब मला चिंतेची वाटते.>
यापेक्षा सुबोध भावे किती छान दिसतो आणि किती छान अभिनय करतो, अशाच प्रतिक्रिया जास्त आहेत.
तुम्ही हे चार धागे स माजशास्त्राचा अभ्यासक या भूमिकेतून वाचून पहा
https://www.maayboli.com/node/67136
https://www.maayboli.com/node/68143
https://www.maayboli.com/node/68936
https://www.maayboli.com/node/69906

सुबोध भावेने यापूर्वीही एका मालिकेत खलनायकाचं काम केलं आहे. बहुदा आभाळमाया नाव असावं. डबल रोल होता. एक दत्तक घेणार्‍या बापाचा खून करुन गुन्हेगार बनलेला, आणि दुसरा नॉर्मल. त्याचशिवाय मी तुझी तुझीच रे चित्रपटामध्येही खलनायक होता तो.

तुम्ही हे चार धागे स माजशास्त्राचा अभ्यासक या भूमिकेतून वाचून पहा
यातील एक धागा मी वाचत आलोय. पाहिले की तेथे प्रतिक्रिया देणार्‍या बर्‍याच जणांनी मालिका पाहणे केव्हाच बंद केले होते. पिसं काढणारा धम्माल धागा म्हणून वाचणार्‍यांची संख्या खुप आहे. शिवाय अभिनयाबद्दल आणि मालिकेचे दिग्दर्शन, कथा, त्यातील त्रूटी यावर पोटतिडकिने लिहिणारे, नियमित आणि सविस्तर लिहिणारे काही आहेत. त्यावर इतरांचे भाष्य आहे. त्याचा खुपसा म्हणजे खुपच मोठा भाग हा नायिकेच्या सुमार अभिनयाबद्दलचा आहे. मालिका संपत आल्यावर ती चुकीच्या वळणावर चालली आहे असेही अनेकांनी सांगितले आहे. शेवटी फार गांभीर्याने काही लिहिण्यापेक्षा मालिकेची पिसं काढून मजा लुटायची असेच ते धागे आहेत. सुबोध भावेंच्या अभिनयाबद्दल शंकाच नाही. पण असा अभिनय जेव्ह्वा विशिष्ट पात्र रंगविण्यासाठी वापरला जातो तेव्हा चुकीच्या गोष्टीचे एरवी झाले असते त्याहीपेक्षा जास्त उदात्तीकरण होते असे मात्र वाटते. यात अभिनेत्यापेक्षा मला कथाकार, संवाद लेखक आणि दिग्दर्शक यांचा दोष जास्त वाटतो. कलाकार चांगला असेल तर त्याला जी भूमिका दिली आहे ती तो उत्तम वठवणारच. पण येथे नक्की काय म्हणायचंय यावर सर्व गोंधळच होता. किंवा त्यांना असेच दाखवायचे होते असे जर असेल तर ते फारच धक्कादायक आहे असे मला वाटते.

मालिकेपेक्षा कलाकार सुबोध भावे मोठा ठरल्याने त्या पात्राला तसं ट्रीट केलं असेल का, अशी एक शंका आहे. संशयाचा फायदा द्यायला.

पण समजा, दिग्दर्शन, लेखन व इतर पात्रांचा अभिनय चांगला असता, मालिका हास्यास्पद ठरली नसती, तर ते पात्र याच पद्धतीने पोचलं असतं का?

मालिकेपेक्षा कलाकार सुबोध भावे मोठा ठरल्याने त्या पात्राला तसं ट्रीट केलं असेल का, अशी एक शंका आहे. संशयाचा फायदा द्यायला.

ही शक्यता आहे.
पण समजा, दिग्दर्शन, लेखन व इतर पात्रांचा अभिनय चांगला असता, मालिका हास्यास्पद ठरली नसती, तर ते पात्र याच पद्धतीने पोचलं असतं का?
इथे मला जयवंत दळवींचं "पुरुष" नाटक आठवतं. खलनायक नाना पाटेकर आहेत. पण समोर चंद्रकांत गोखले आणि उषा नाडकर्णी उभे आहेत. त्यांच्या जबरदस्त अभिनयाने ती वेदना लगेच जाणवते. लेखन दिग्दर्शन आणि इतर पात्रांचा अभिनय चांगला असता तर मला वाटतं ती जरी शोकांतिका झाली असती तरी त्या व्यक्तीरेखेची काळीकुट्ट बाजु जास्त चांगल्या तर्‍हेने अधोरेखित झाली असती.

चांगलं लिहिलंय.

मी ही मालिका बघितलेली नाही. पण नायकाला थेट खुनी म्हणून उभं करणाऱ्या या मालिका मला तुलनेने ओके वाटतात.

त्यापेक्षा विचारप्रवर्तक असल्याचा आव आणून त्यातून हुशारीने चुकीचा मेसेज हळूच सरकवणं डोक्यात जातं.
उदा राजू हिरानी.

ज्या व्यक्तीवर मालिका आधारलीय त्या प्रकारच्या लोकांची घृणा वाटायला लागली तर मालिकेने काहीतरी कमावले असे म्हणता येईल >> हे साधनाचे पटले.
पण या मालिकेचा हा शेवट बदलला असावा. सुरुवातीला असा शेवट लेखकाच्या मनात नसेल.

शेवटी तर नायिका आपण केलेले कारस्थान त्याला कळले तर? या प्रश्नाने प्रचंड घाबरलेली दाखवली आहे.>> झीच्या (बाकी चॅनेल पण )मालिकाचा एक महत्वाचा स्टिरिओटाइप आहे ते म्हणजे नवरा-बायकोच्या नात्यात बायकोही सन्सार टिकवणारी , नवर्याने १००० गुन्हे केले तरी त्याला माफ करणारीच असली पाहिजे.

झीच्या (बाकी चॅनेल पण )मालिकाचा एक महत्वाचा स्टिरिओटाइप आहे
अगदी बरोवर शब्द वापरलात. शिवाय "विश्वास" शब्द सतत वापरायचा आणि तो वापरत असतानाच अगदी साध्या साध्या गोष्टींसाठीही धडकून खोटं बोलायच. इतरांचं चोरून ऐकायचं हा आणखी स्टीरियोटाईप. पाहाणार्‍याला वाटेल आता अगदी आता अपराधी पकडला जाईल, त्याला शिक्षा होईल. नेमक्या अशाच वेळेला कच खायची. अपराध्याला कुत्सित हसताना दाखवायचं. सुष्ट मंडळी संताप येईस्तोवर सहन करताना दाखवायचं. आणि अगदी शेवटच्या भागातल्या शेवटच्या मिनिटात असं वाटतं आता तरी अपराध्याला शिक्षा होईल पण गोंधळात ठेवून मालिका संपवायची.

अतुल ठाकुर आपण आपल्याला खटकलेल्या गोष्टी वेळेवर लिहायला हव्या होत्या. मालिकेत, इतर ठिकाणच्या अशा खटकणाऱ्या कथानकांविषयी योग्य जागी तक्रार करणे, न्यायालयात जाणे हे उपाय करायची गरज होती. असे आपण कुठे पाठपुरावा केला आहे का? याबाबत माहिती लिहा.
आता मालिका संपल्यावर वैचारिक लेख लिहून उपयोग नाही असे मला वाटते.

यातील एक धागा मी वाचत आलोय. पाहिले की तेथे प्रतिक्रिया देणार्‍या बर्‍याच जणांनी मालिका पाहणे केव्हाच बंद केले होते.
>> या धाग्यावर आपण आपलं मत लिहून योग्य अयोग्य पटवून द्यायचे होते. आता संपल्यावर बोलण्यात अर्थ नाही.

Pages