तुला पाहते रे- भयंकराचे आकर्षण, एक सामाजिक प्रश्नचिन्ह

Submitted by अतुल ठाकुर on 20 July, 2019 - 20:43

काही गोष्टी पाहण्यात तुम्हाला रस नसला तरी पाहाव्या लागतात. घर लहान आहे त्यामुळे संध्याकाळी टिव्हीवर जे काही लागते ते कानावर मुद्दाम हेडफोन लावला तरी त्यातून झिरपत जाते. डोळे उघडे ठेवून काम करावे लागत असल्याने ते अधून मधून दिसतही राहते. या मालिकेबद्दल माझे वैयक्तिक मत काय आहे हे महत्त्वाचे नाही. पण २९८ भागांच्या या मालिकेला मिळालेली अमाप प्रसिद्धी मला सामाजिक दृष्ट्या विचार करायला लावणारी वाटली. "वय विसरायला लावते ते प्रेम" अशा आगळ्यावेगळ्या विषयाने सुरुवात झालेली ही मालिका पुनर्जन्म आणि सूडावर येऊन काल संपली. पहिली बायको राजनंदिनी हिला गच्चीवरून ढकलून देऊन तिचा खून करणार्‍या विक्रान्त सरंजामेने स्वतःचा शेवट गच्चीवरुन उडी मारून केला. नियतीने केलेला न्याय असे बहुधा दाखवायचे असणार. पण सर्व प्रश्न इथूनच सुरु होतात.

२९८ भागांच्या मालिकेत नायक आणि लग्नानंतर खलनायक झालेला माणुस हा पराभूत होताना फारसा दाखवलेलाच नाही. शेवटच्या फक्त दोन भागांमध्ये त्याने संपत्ती मिळविण्यासाठी जे काही खून पाडले त्याचे तो समर्थन करताना दिसतो. म्हणजे उरलेले २९६ भाग त्याची कमान चढतीच दाखवली आहे. शेवटच्या भागातदेखिल एकंदरीत त्याचीच पकड दिसते. कारण मी कबुली दिली तरी तुम्ही माझं काहीही वाकडं करु शकत नाही. माझ्यासारखी बुद्धीमत्ता कुणाकडेही नाही अशा वल्गना तो करताना दाखवला आहे. आणि अक्षरशः कुणीही त्याचं काहीही वाकडं करु शकत नाही हेच मालिकाभर दाखवण्यात आलं आहे. शेवटी तर नायिका आपण केलेले कारस्थान त्याला कळले तर? या प्रश्नाने प्रचंड घाबरलेली दाखवली आहे.

न्याय, क्षमा की दया हा प्रश्नही या संदर्भात महत्त्वाचा वाटतो. नायक बाप होणार, पोटातील बाळाला वडील हवे, त्याने कितीही भयंकर गुन्हे केले, माणसं ठार मारली तरी आपले त्याच्यावर प्रेम आहे, त्याचे आपल्यावर प्रेम आहे. झाले गेले विसरून जावे, पुन्हा पुढे चालावे, जिवनगाणे गातच राहावे या ट्रॅकवर काही भाग गेले. प्रेमाच्या, आपल्या माणसांशी निष्ठूर होता येणे कठिण असते हे मान्य केले तरी या टोकाचे गुन्हे केल्यावरही माणसे गुन्हेगाराबद्दल हळवी होतात हे पाहून नवल वाटले.

प्रेम, होणारे मुल याबद्दल हळवा झालेला नायक निर्घृणपणे छोट्या मुलासकट एका कुटूम्बाला संपवतो. मित्राला ठार मारतो, ज्याने नोकरी दिली त्याच्यावर खूनाचा आरोप ठेवून त्याला देशोधडीला लावतो. सासर्‍याच्या औषधात फेरफार करून त्याला ठार मारतो आणि शेवटी त्याच्या निरातिशय प्रेम करणार्‍या बायकोचाही गच्चीवरून फेकून खून करतो. नायकाच्या व्यक्तीमत्वाची ही सारी काळीकुट्ट बाजु पुरेशी ठळकपणे अधोरेखित व्हाही तशी होत नाही. उलट त्याच्या शेवटच्या समर्थन करण्याने त्याच्याबद्दल लोकांच्या मनात सहानुभूती निर्माण होते की काय असे वाटत राहते. इथे कलावंताच्या कला स्वातंत्र्याचा प्रश्न येतो.

बलात्कार वाईट म्हणजे तो दाखवायचाच नाही की काय? असा जर कुणी प्रश्न कलेच्या स्वातंत्र्याबाबत विचारला तर त्याचे उत्तर दाखवायचा हेच असणार. पण तो पाहताना घृणा वाटली पाहिजे. माणसे त्याचा आनंद घेऊ लागली तर काहीतरी चुकते आहे असेच म्हणायला हवे. समाजात हर्षद मेहताच्या बुद्धीमत्तेबद्दल आकर्षण असणारी माणसे असतात. मलाही तसे आकर्षण वाटायचे. पण एका भल्या गृहस्थाने माझे कान पिळले होते. तो संतापून म्हणाला होता ही बुद्धीमान माणसे पुढे त्यांच्या वाटेत जे कुणी येतात त्यांचा समूळ काटा काढतात.

आपल्या समाजात कायदा आहे, न्यायव्यवस्था आहे, पोलिस आहेत या बाबी या मालिकेत जवळपास नव्हत्याच. जगातली सर्व गरीब माणसे संपत्ती मिळविण्यासाठी विश्वासघाताचा मार्ग अवलंबतात काय? खून पाडतात काय? आणि तसा मार्ग त्यांनी अवलंबिल्यास ते समर्थनीय आहे काय हा देखिल प्रश्न येथे विचारता येईल. प्रामाणिकपणे, मेहनतीने पुढे आलेल्या माणसांची असंख्य उदाहरणं आहेत. इतके गुन्हे करूनही कुठलाही पश्चात्ताप न झालेला नायक आत्मसमर्थन करीत राहतो. त्याच्यापुढे सुष्टांचे म्हणणे दुबळे वाटत राहते. मालिकाकारांना न्याय होतो आहे की नाही, झाला तर कसा होतो ही बाब महत्वाची वाटते की नाही, त्यांना नक्की काय दाखवायचे आहे हेच कळत नाही.

थोडक्यात काय तर भयंकराचे उदातीकरण आणि त्यामुळे भयंकराबद्दल वाटणारे सुप्त आकर्षण ही बाब मला चिंतेची वाटते.

अतुल ठाकुर

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तरी न्यायालयीन बंदी इ. कोणी उपाय म्हणून सांगत असेल तर ते तितकंच अघोरी आणि चुकीचा पायंडा पडणारं असेल. मोराल पुलिसिंग करण्याचा हक्क आपल्याला कुणी दिला असं सध्यातरी वाटतंय.
>> मोरल पोलिसिंग करायचा अधिकार नाही तर वाईट,भिकार ही म्हणू नका ना. मालिका संपल्यावर कुठेतरी कुरकुर करण्यापेक्षा गप बघावी, आवडत नसेल तर नाही बघावी आणि इतरांनी बघू नये असंही म्हणू नये.
ठाकुर साहेब चर्चा कुठून सुरु झाली व जे ना वर रंगली.

ठाकुर सर कृपया माझे प्रतिसाद हलकेच घेणे. माझ्या मते आपण समाजकार्य करता व आपणास समाज सुधारावा ही तळमळ आपल्या लेखनातून जाणवत राहते. म्हणून आपण अनिष्ट गोष्टींना योग्य ठिकाणी पाठपुरावा करून आळा घालू शकता. समाजकार्य करण्यासाठी आपण आपलं आयुष्य वाहून घेतले आहे व एक माबोकर चांगले काम करत आहे म्हणून अपेक्षा उंचावल्या इतकेच. धन्यवाद.

माझं म्हणणं एवढंच होतं की तुम्ही सुट्टीला रिकामटेकडे म्हणून भारतात आलात, तुम्हाला आता इथे वेळ घालवायला काका/मामा प्रेमाचे भरतं आलंय म्हणून त्यांनी त्यांची रोजची व्यवस्था बाजूला ठेवायची का? >> आपण माणूसघाणे नसलो की आपल्या मनात असे संकुचित विचार येत नाहीत. आप्तांना बघून आनंद वाटणारी लोक, 'दोन आठवड्याच्या तुटपुंज्या सुटीत हा धावपळ करत मला भेटायला आला हे बघून आनंद वाटला' असा विचार करतात. गाठ भेट व्हावी म्हणून समारंभ, प्रवास पुढे ढकलणारे आप्त सुद्धा असतात.
तुमच्या घरी येणार्‍या प्रत्येकाला तो कुठूनही आला असला तरी, 'हं आला रिकामटेकडा प्रेमाचं भरतं घेऊन'
असे आपादमस्तक न्याहळत असतील तर तुमच्या आप्त मित्रा बद्द्ल कीव वाटण्यासारखी परिस्थिती दिसते.

जेव्हा ते एकटे असतात, काही कारणांनी त्यांना लोकांची, मनुष्यबळाची गरज असते तेव्हा तुम्ही तुमची कामं सोडून येता का?> तुमच्या आप्त मित्रानी तुमच्याकडे पाठ फिरवली असे तुमच्या अनुभवावरून दिसते त्याचे मूळ आपल्या वर लिहिलेल्या वागण्यात तर नाही ना ह्याचे तुम्ही आत्मपरीक्षण करणे जरुरीचे वाटते आहे.

प्रतिसाद वैयक्तिक वाटल्यास, तो तसा वाटावा म्हणुनच लिहिला आहे असे समजा.

ज्येष्ठ नागरिक भारत यूएस वगैरे कैच्याकै फाटे फुटत आहेत इथे.
मला वाटतं तुपारे बघणाऱ्यात २ टाईपचे लोक असतील. सुबोध भावेच्या स्टाईल लुक्स आणि रिच बिझनेसमन character वर फिदा असलेल्या व त्याच्यासाठी म्हणून मालिका बघत त्यात गुंतत गेलेल्या विविध वयोगटातल्या बायका.
चाळीशीच्या भावेला कॉलेज कन्यका नायिका पटली हा ट्रॅक प्रचंड आवडलेले व त्यामुळे मालिका बघू लागलेले मध्यमवयीन पुरुष.

अहो हायझेनबर्ग,
कुठे नादाला लागता या आयडीच्या. त्यांचे बिनबुडाचे निष्कर्ष ( हा अजून एक - सुट्टीला रिकामटेकडे म्हणून भारतात आलात, तुम्हाला आता इथे वेळ घालवायला काका/मामा प्रेमाचे भरतं आलंय म्हणून..... इ.) वाचून मला त्यांची दया आली, म्हणून इग्नोरास्त्र मारले.
भारतातली सुट्टी माझी तरी कधी रिकामटेकडी नव्हती/ नसते. असंख्य वैयक्तिक आणि कौटुंबिक व्याप असतात. त्याबद्दल अजिबात तक्रार नाही. आप्तमित्रांच्या भेटींचा आनंद पाहिला की याचसाठी केला अट्टाहास हे पटते.
ज्या ज्ये. नांनी ‘व्यसन’ कसे वाईट इ. पढवले त्यांची आजची टीव्हीकेंद्रित दिनचर्या आणि एकामागून एक चालणाऱ्या सुमार मालिकांमधली तल्लीनता पाहून मात्र आश्चर्य वाटते. एके काळी आपले आदर्श असलेले हे लोक इतके बदलले?! Happy सगळेच नाही बदलले तरी पण....
आता वेळ घालवण्याचे दुसरे पर्यायच नसतील तर गोष्ट निराळी.
(आणि हो, टीव्ही चालू असला तरी आमच्या भेटीने त्यांनाही आनंद झालेला असतो!)
<<<<<मुळात प्रेक्षकांना या मालिकांचं व्यसन लागलं आहे. पिसं काढायला, किती वाईट आहे ते बघायला , नाहीतर मग ज्ये.ना.च्या नावाखाली पण अगं अगं म्हशी करत आपण मालिका बघतो. त्यावर इथे भरभरून चर्चा करतो. नव्या मालिकेचा प्रोमो दिसला रे दिसला की इथे त्यावर धागा निघतो.
चॅनेलला काय संदेश जातो? कशी का असेना, लोक मालिका बघतातच. सुमार, रादर भिक्कार मालिका पाहण्याची आपल्याला सवय लागली आहे. आपलीच रुची तशी झाली आहे. >>>>
माझे निरिक्षण भरत यांच्या या मुद्दयासंदर्भात नोंदवलेले होते. बाकी ज्ये. नांनी वेळ कसा घालवावा हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे हे बरोबर.
तटी. - मी तुपारे बघितली नाही. संबंधित धागा/ धागेही वाचलेले नाहीत. या धाग्यावरचे हेमाशेपो.

वरती धाग्याच्या विषयात जे आकर्षणाबद्दल लिहीले आहे ते खरे असू शकेल, पण तुपारे चे उदाहरण त्याबाबतीत चपखल नाही. तुपारे ची सुरूवात वय विसरायला लावणारी प्रेमकहाणी अशी झाली आणि बरीच वाटचाल त्याच मार्गाने होती. त्यातले प्रेमाचे प्रसंग सहसा मराठीत असतात तशाच प्रकारचे होते. चाळीतील मध्यमवर्गीय जीवन तुलनेने खरे वाटण्यासारखे होते, तर ऑफिस मधले प्रसंग काहीही माहिती न घेता, अभ्यास न करता एपिसोडस चे रतीब घालण्यासाठी कल्पनेच्या भरार्‍या मारलेले होते. ते सर्वात धमाल असत. ते पाहायला आणि त्याबद्दल इतरांबरोबर शेअर करायला जाम मजा येत होती.

मग कोणालातरी साक्षात्कार झाला असावा की हे दळण अजून फार चालवता येणार नाही. टीआरपी घसरत चालला आहे. काहीतरी वेगळे करायला हवे. म्हणून तो ट्विस्ट आला, ज्यात विक्रांत व्हिलन झाला. तो सगळा भाग कृत्रिमरीत्या मालिकेत खुपसल्यासारखा झाला. त्या सगळ्या षडयंत्राला काहीच अर्थ नव्हता.

मात्र ६०-७० च्या दशकातील कुटुंबे, आता साठीपलीकडे असलेले पण त्याकाळची मूल्ये, मानमर्यादा, संस्कृतीच्या कल्पना अजूनही मानणारे लोक हा यांचा टार्गेट प्रेक्षकवर्ग आहे. घरगुती, सालस बायकांनी कसे वागावे, कसे कपडे घालावेत, काय संवाद म्हणावेत याबद्दलच्या त्यांच्या कल्पनांना दुजोरा दिल्यासारखे एपिसोड्स लिहीतात हे लोक. मॉडर्न स्त्रिया - त्यांचे कपडे, वागणे हे सहसा व्हॅम्पच्या वळणावर असते. त्यातून मग एका बाजूला राधिका, ईशा तर दुसर्‍या बाजूला शनाया, मायरा वगैरे असतात. त्यांचे ऑफिसमधले वागणे ही अशा प्रेक्षकवर्गाच्या कल्पनेत त्यांचे यशस्वी काम कसे असेल अशा अंदाजाने लिहील्यासारखे असते. आश्चर्य म्हणजे आपल्या नोकरीच्या काळात सरकारी, खाजगी कंपन्यांत, बँकांमधे वगैरे काम केलेल्यांनाही हे ढोबळ चित्रीकरण खटकत नाही.

या असल्या घनघोर कौटुंबिक मसाल्यात कॉर्पोरेट ड्रामा, इस्टेटीकरता षडयंत्र हे सगळे प्रचंड उपरे आहे. त्यातले कायदे, प्रोसेस वगैरेचा अजिबात अभ्यास न करता लिहीलेले. ते सगळे जाम विनोदी होते.

त्यामुळे टीआरपी वाढवण्याकरता ट्विस्ट आणि सुबोध भावे च्या पात्राला फुटेज द्यायचे म्हणून घातलेले अनेक प्रसंग याची जंत्री निर्माण झाली असावी असेच वाटते. ते जे काही चालले होते ते लोकांना हवे होते, त्याचे आकर्षण त्या प्रेक्षकवर्गाला होते असे अजिबात नाही - लोक काय जे दाखवाल ते पाहतात असा एक नियम झाल्यासारखा आहे सध्या या मालिकांच्या बाबतीत. त्यातून असल्या पाणी घातलेल्या कथा व एपिसोड्स निर्माण होत असावेत.

मालिका सुरवातीला पाहिली नंतर पाहणे बंद केले . कधीच . सुरवातीचा एखादा इथला धागा वाचला असेल कदाचित ( ते पण आठवत नाहीये ) पण त्यानंतर आलेले धागे वाचलेच नाहीत पण लेख छान आहे . इथे वाचून मला समजलं कि मालिका संपली आणि मालिकेचा शेवट काय झाला

कायम असं वाटत कि या मालिकांना देण्यात येणारा वेळ मर्यादित असावा . जस कि एकच वर्ष . मानबा तर अडीच वर्ष चाललंय बहुतेक . निर्माता चॅनलच्या मर्जीतला दिसतोय एकंदरीत . एवढ्या लायनीत मालिका उभ्या असतील . त्यांनी काय करावं ? प्रेक्षकांना पण व्हरायटी नको का ? बर ज्यांना टीआरपी नाही त्या मालिका चार महिन्यात सुद्धा बंद करण्याचा अधिकार चॅनलकडे आहेच कि . पण ज्या मालिका उचलून धरल्या जातात त्या तीन तीन वर्ष ?

मला वाटतं ज्येनानी किंवा सगळ्यांनीच टीव्ही बघु नये / मालिका बघु नये असा मुद्दा नसुन तुपारे, मानबा सारख्या शें बु नसलेल्या, ज्यात काय वाटेल ते दाखवतात अशा मालिका वेळेवर बघणं बंद करुन इतर काही पर्याय शोधावेत असा आहे.
पण सुरुवातीपासुन बघतोय म्हणुन काहीही दाखवलं तरी बघायचं आणि टीआरपी वाढवायचा असं होतं खरं.

*ज्येष्ठ नागरिकांमुळे आम्हांला भंगार मालिका बघायला लागतात * -

अहो, कटकट संपेल कशी, जांवई शोधून झाले म्हणून !
आतां माबोवरचे असले जांवईशोध मागे लागतीलच ना !!

Asaamgataya_0.jpeg

सुबोध भावेच्या स्टाईल लुक्स आणि रिच बिझनेसमन character वर फिदा >>>>> सनवने ही मालिका एकदाही पाहिली नाही हे एका वाक्यात प्रुव्ह केलं Proud

ते जे काही चालले होते ते लोकांना हवे होते, त्याचे आकर्षण त्या प्रेक्षकवर्गाला होते असे अजिबात नाही - लोक काय जे दाखवाल ते पाहतात असा एक नियम झाल्यासारखा आहे सध्या या मालिकांच्या बाबतीत. त्यातून असल्या पाणी घातलेल्या कथा व एपिसोड्स निर्माण होत असावेत.

लग्न होईपर्यंत वेगळा विषय असलेली ही मालिका ट्विस्ट दिल्यावर गुन्हेगारीच्या वळणावर गेली. त्यांना दुसरा कुठला ट्विस्ट देता आलाच नाही. दुसरे म्हणजे एकदा नायकाला खलनायक केल्यावर त्याच्या गुन्ह्यांचे कळत नकळत समर्थनच केले गेले. सज्जनांची बाजु फारशी मांडली गेलीच नाही किंवा दुबळी वाटली. सादरीकरणाचा एकंदरीत प्रकाराच मला विचार करण्याजोगा वाटला. त्यावर लिहिले आहे. शिवाय एकदा असे दाखवणे सुरु झाल्यावर प्रेक्षकही त्यात गुंतत गेले ही बाबही नाकारता येणार नाही.

फार पूर्वी अगदी अशीच कथा असलेली (गुमराह की काहीतरी असेच नाव होते) निना गुप्ता, इरफान खान आणि मनोहरसिंग यांच्या भूमिका असलेली हिन्दी मालिका आली होती. त्यात निना गुप्ता तर साठीच्या घरातल्या माणसाच्या प्रेमात पडते आणि त्यांना मुलदेखिल होते. त्यात ट्विस्ट म्हणजे पुढे तिचं मन द्विधा होऊन एका तरूणावर जडतं. खुप गुंतागुंतीची कथा रंगवली होती. मला सुरुवातीला वाटलं होतं वयातली तफावत दाखवताना काही तरी वेगळ्या समस्या, अनुभव हाताळणारी मालिका असेल. पण तसे झाले नाही. सादरकर्त्यांना गुन्हेगारीचा ट्विस्ट आणि सादरीकरणात त्याचे उदात्तीकरण महत्त्वाचे वाटले असावे.

म्हाताऱ्याबरोबर फक्त तो श्रीमंत आहे आणि आपल्यावर भाळलाय म्हणून लग्न करू हा संदेश दिलाय, आजकालच्या मुलींना! सारासार विचार करून लग्न करा नाहीतर मग गुन्हेगाराच मूल पदरात पडून देशोधडीला लागायला होतं Happy घरातल्या ज्येनाना विचारलं तर ते बरोब्बर तात्पर्य सांगतील! Happy

भयंकराचे आकर्षण हे वाचून हसू आलं.
भारतात सध्या सर्वत्र घडत असण-या घटनांच्या पाहता आणि त्याचे सामान्यीकरण पाहता टीव्ही शो वरून चिंताक्रांत होणे गंमतीचे वाटले. लेखकाची चिंता आपल्या जागी योग्यच आहे. पण ती किरकोळ वाटेल अशा मॉब लिंचिंगच्या, बलात्काराच्या आरोपीच्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्च्यांच्या, दंगलींच्या घटना यांना ऊत आला आहे. याचा अर्थ या घटना आधी नव्हत्याच असे नाही. पण ज्याप्रमाणे गुन्ह्यांचे प्रमाण असते तशाच त्या कधी कधी घडणा-या घटना होत्या. ज्या बातमी बनत असत.

आता या घटना म्हणजे रोज मरे असा प्रकार झालेला आहे. बेदरकार ड्रायव्हिंग, लहान मुले, वृद्ध यांना भयंकर वाटेल अशी रहदारी , एकंदरच संवेदनशॉलता हरवलेले नागरीक ही प्रचंड मोठी समस्या आहे.
समाजच असा असताना टीव्ही सीरीयल मधे त्या मानाने नकारात्मक पात्र खूपच सौम्य आहे असे म्हणावेसे वाटते.

(लेखकाच्या समस्येची टिंगल अथवा टर उडवणे हा अजिबातच हेतू नाही).

मोबाईल लिंचिंग च्या नावाने भुई धोपटणे चालू आहे. काही कारणे असू शकतात.
हेच पहा. याला मोबाईल लिंचिंग म्हणणार का ?
https://www.esakal.com/maharashtra-marathwada/caught-lover-her-dist-latu...

आशीर्वाद काही लोकांचा रोख हिंदू धर्मीयांनी केलेल्या इतर धर्मीय गुन्हेगारांना मारहाणीवर असतो.

यापुर्वी ही भिकार सिरिअल्स आल्या आणि गेल्या.
यापुर्वी ही चांगल्या सिरिअल्स आल्या आणि गेल्या.

काहीही फरक पडत नाही. पुढे चला!

बरोबर

त्यांनी काय होतंय आणि हे असंच होतं आपण काय करणार? ह्या वरवर हतबल आणि अगतिक दिसणाऱ्या आणि भासणाऱ्या प्रश्नांच्या मागे खरंतर मरू दे ना मला काय करायचंय हा भाव असतो बरेचदा . निदान माझ्या घरातल्यांशी बोलतांना तरी मला हेच जाणवलं आहे.

त्यांनी काय होतंय आणि हे असंच होतं आपण काय करणार? ह्या वरवर हतबल आणि अगतिक दिसणाऱ्या आणि भासणाऱ्या प्रश्नांच्या मागे खरंतर मरू दे ना मला काय करायचंय हा भाव असतो बरेचदा .
आपल्याला नक्की काय म्हणायचंय हे माझ्या लक्षत आलं नाही.

कायम असं वाटत कि या मालिकांना देण्यात येणारा वेळ मर्यादित असावा .
सूजा अगदी पटले. पुर्वी काही मालिका तेरा भागांच्या असायच्या आणि अतिशय कमी वेळ असल्याने असेल कदाचित पण खूप परिणामकारक सादरीकरण असायचे. पाणी घालणे हा प्रकार नव्हता. मला अमोल पालेकरांची "नकाब" ही मालिका एक ठळक उदाहरण म्हणून आठवतेय.

म्हणजे, पाहतांना हातात रिमोट असून, त्याचा वापर करायचा नाही आणि तद्दन भंगार मालिका पाहायच्या. आणि नंतर का पाहता ह्या प्रश्नाचं उत्तर नेहेमी असाच द्यायचं कि मी न बघून काय होणार आहे etc . ह्या मालिकांना लोकाश्रय मिळतो कारण त्या न-पाहण्याचा किंवा एक दर्जेदार निर्मिती आणि कथानक असेल तरच त्या बघण्याचा पर्याय आहे हेच बरेचदा प्रेक्षक विसरल्या सारखं करतात.

Pages