सासव

Submitted by देवकी on 11 May, 2018 - 12:30
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

५-६ रायवळ आंबे (पायरीही चालतील),पाव वाटी ओले खोबरे,१ -१.५ लहान चमचा तिखट,मीठ,गूळ मोहरी.

क्रमवार पाककृती: 

आंब्याच्या मोसमात आमच्याकडे (आईकडे )बरेचदा होणारा हा पदार्थ.आंबा कोवळा निघाला की त्याची रवानगी सासवात व्हायची.तर बरेचदा मुद्दाम सासव करण्यासाठी रायवळ आंबे विकत आणले जायचे. आंबट-गोड-तिखट अशा चवीचे सासव बर्‍याच वर्षांनी केले.त्याला कारण माझी शेजारीण."अग,तुमच्याकडे ते आंब्याचे सासम की सासव करतात ते कसे करतात" मग तिच्या निमित्ताने हा विस्मृतीत गेलेला पदार्थ करण्यात आला.

आंब्यांचा रस काढून घ्यावा.त्यांच्या बाठी टाकू नये.चमच्यानी रस सारखा करून घ्यावा.रसाच्या गाठी मोडून घ्याव्या.अर्धा ते पाऊण चमचा मोहरी कढईमधे कोरडी भाजावी.ओले खोबरे आणि भाजलेली मोहरी पाणी घालून वाटावी. आंब्याच्या रसात तिखट,हळद अणि गूळ घालावे.मीठ घालून हे वाटण घालावे.बाजूला काढून ठेवलेले बाठे त्या मिश्रणात घालाव्या.गॅसवर ठेऊन एक उकळी काढावी. एक मोठा चमचा पाणी घालून मिश्रण सारखे करावे.
गरमगरम सासव खायला तयार.

वाढणी/प्रमाण: 
३-४
अधिक टिपा: 

१.याची कन्सिस्टन्सी रायत्याप्रमाणे असावी.
२. हवे असल्यास किंवा काही घरांतून हिंग मोहरीच्या फोडणीवर वरील मिश्रण घालतात.आई घालत नाही.त्यामुळे मीही घातले नाही.
३.पोळी/ भाकरीबरोबर खाऊ शकता.गेल्याच आठवड्यात माझ्या शेजारणीने भातावर घेऊन खाल्ले.

माहितीचा स्रोत: 
परंपारिक,अर्थातच आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लाळ गाळणारी बाहुली ...
शेजारच्या काकू तर खूपच चविष्ट बनवायच्या.साबाही करतात.
जाम भारी लागतो हा प्रकार . शक्य असेल तर पूरवून-उरवून शिळा करून खायचा.
.
.

अहाहा! मला फार आवडतं.. वाचून तोंपासु झाले! आमच्याकडे थोडं पळीवाढ दाट करतात.. भाताबरोबर घ्यायला.
आणि रायवळ आंबे ते रायवळ आंबे.. त्यांची चव दुसर्‍या आंब्यांना नाही!

माझी कारवारी मैत्रीण छान बनवते. तिच्या हाताला चव आहे पण तीला मात्र मी बनविलेल्या पालेभाज्या, फळभाज्या आवडतात.

मस्तच! सासव हे नाव ऐकून होते. कृती माहीत नव्हती.
माझी आजी रायवळ/ पायरी आंब्यांचा 'कोयाडं' नावाचा साधारण असाच पदार्थ करायची. पण भाजलेली मोहरी आणि ओल्या नारळाचं वाटण नसणार त्यात. तिखट-गोड-आंबट अशीच चव लागायची. बाठीही असायच्या त्यात. छानच असायचं ते.

ओल्या नारळाचं वाटण,पदार्थ मिळून येण्यासाठी घालत असावेत कदाचित! फारसे खोबरे घालायचे नाही.२-३ छोटे चमचे होतील इतकेच.
"कोयाड"ची रेसिपी द्याल का?

मस्तच रेसिपी.
पण तो फोटो दिसत नाहीये मला तरी.

छान आहे पाककृती . माझी मावशी ही सेम ह्याच पद्धतीने बनवायची सासव. मी आणी माझी बहिण उन्हाळी सुटीत तिच्या कडे रहायला जायचो तेंव्हा हा मेन्यू ठरलेला असायचा. पण आता बरेच वर्ष नाही खाल्ला आहे. ही रेसिपी वाचुन जुन्या गोष्टी आठवल्या. Happy

इथे चायनीज मार्केटमध्ये नवजात बाळाच्या मुठीएवढे चक्क पिवळे आंबे दिसले. त्यांचे सासव करुन पाहीले पाहीजे. घरी सर्वांना आवडतो हा पदार्थ.

मस्त रेसीपी. मी ही असच करते. मला ही फार म्हंजे फार आवडतं. मसाले वगैरे फार नसून ही इतकं टेस्टी लागतं की विचारू नका.
हा मी केलेल्या सासव चा फोटो.

20210523_102457.jpg