सजाण

Submitted by मोहना on 17 July, 2019 - 17:23

आमच्या घरातून बाहेर पडलं की रस्त्यावर कुण्णीच नसतं. रस्त्यावरचं पहिलंच घर आमचं, थोडंसं चाललं की रस्ताच वळतो. मग एकदम गर्दी, गडबड, दुकानंच दुकानं. रोजच्यासारखंच आईने माझं बोट घट्ट धरलं होतं. मी ते सोडवलं की ती पुन्हा धरते. ऐकत नाही अगदी. आई नेहमीसारखी घाईघाईत मला काकूंकडे पोचवायला चालली होती. तिथून तिला कामावर जायचं होतं. पण मला उड्या मारत, काचेच्या खिडकीतून दुकानांच्या आत बघायचं होतं. टेडी बेअर, मिकी माऊसचं जे दुकान आहे ना ते मला खूप आवडतं. मी तिथे थांबतेच. मग आई पुन्हा हात धरुन ओढते. आजही आईने तसंच केलं. तिच्या मागे मागे जाताना त्या दुकानाच्या समोर एक मुलगा बसला होता तो दिसला. हा कधी इथे आला? काल तर नव्हता. तो काहीतरी वाजवत होता.
"तो मुलगा काय वाजवतोय? " मागे वळून वळून पाहत मी आईला विचारलं. पण तोपर्यंत आम्ही पुढे गेलो होतो. आईने मान वळवून पाहिलं.
"बाजा वाजवतोय. "
"पण तिथे का बसला आहे तो? "
"भिकारी आहे. "
"म्हणजे? "
"नंतर सांगेन. आता उशीर होतोय गं. "
"पण त्याच्या बाजूला ताटली का आहे? "
"त्यात पैसे टाकावेत येणार्‍याजाणार्‍यांनी म्हणून. "
"पैसे कशाला? "
"पोटासाठी"
"पोटासाठी पैसे का लागतात? "
"म्हणजे पोट भरण्यासाठी. बाजावर गाणी वाजवतो आणि पैसे मिळवतो तो, कुणी काही दिलं तर घेतो. जगायला पैसे लागतात. आता प्रश्न विचारु नकोस. " बापरे, काय म्हणाली आई आत्ता? मला काही समजलंच नाही. मी तशीच उभी राहिले. ती चिडली.
"तू काय म्हणालीस ते सांग आधी. "
"पैसे मागतोऽऽय. जगायला पैसे लागतात." चिडली की आई सावकाश सांगते पण आवाज खूप मोठा असतो. मला आता कळलं. मी म्हटलं,
"मग त्याची आई का नाही आणत पैसे? तू आणि बाबा आणता तसे. " आई काहीच बोलली नाही.
"आपल्याकडचे पैसे देऊ या त्याला? " आईच्या पर्समध्ये नेहमी पैसे असतात. पैशांनी कसं जगायचं असतं? पण जगायचं म्हणजे काय करायचं? मी विचारलं नाही आईला. ’किती गं तुझे प्रश्न’ असं म्हणत ती खेकसते.
आई तशीच चालत राहिली. मी तिला हात धरुन मागे ओढलं. ती वैतागली. रोज वैतागते तश्शीच.
"नको गं. माझ्याकडे नाहीत पैसे आणि उशीर होतोय. "
"आहेत. तुझ्या पर्समध्ये पैसे आहेत. "
आता मात्र ती हसली. किती छान दिसते आई हसली की. मग तिची भिती वाटत नाही.
"तुला कसं माहीत गं ठमे? " माझा गाल ओढत आई म्हणाली. मी गाल खसखसा पुसले. या मोठ्या माणसांना कळत नाही गाल ओढले की किती दुखतं ते.
"तूच सांगतेस. पण देना ते पैसे त्या मुलाला. "
"नको. "
"का नको पण? "
"आपल्याकडचे संपतील. "
"म्हणजे आपण भिकारी होवू? " आईने एकदम माझ्या पाठीत धपाटा घातला. आत्ता तर हसत होती. आता लगेच धपाटा. किती लागतं. मी तिच्याकडे रागारागाने पाहिलं. पण तीच रागावून म्हणाली,
"काहीतरी बोलू नकोस. "
"अगं पण तूच सांगतेस ना त्या मुलाकडे पैसे नाहीत म्हणून तो भीक मागतो. आपल्याकडचे संपले की भीक मागायला लागणारच ना." आता मला रडायला यायला लागलं. पण मी रस्त्यावर रडत नाही.
"हं. " आईचं लक्ष नसलं की नुसतं ’हं’ करते.
"पैसे मिळाले की तो काय करतो? "
"किती बोलतेस मीनू तू. लहान आहेस. मोठी झालीस की सांगेन. " मी नाक उडवलं. आईला उत्तर द्यायचं नसलं की ती असंच करते. रागारागाने पाय आपटत मी तिच्याबरोबर चालत राहिले. काकूंचं घर येईपर्यंत.

आजपण तो मुलगा तिथेच होता. मी हळूच आईचं बोट सोडलं, तिला कळलंच नाही माझं बोट सुटलं आहे ते. मी त्या मुलासमोर गेले. त्याने लगेच ताटली पुढे केली.
"तू भिकारी आहेस? "
तो काही बोलला नाही. मी त्याच्या ताटलीत पाहत होते. खूप नाणी होती.
"आहेत की तुझ्याकडे आता पैसे. आता तू भिकारी नाहीस. "
त्याने उत्तरंच दिलं नाही. नुसताच पाहत राहिला.
"तू खेळायला येशील माझ्याकडे? "
"खेळायला म्हणजे? " त्याच्या स्वरात उत्सुकता होती. मी त्याला सांगणार होते खेळ म्हणजे काय, त्याच्याआधीच तो म्हणाला,
"तू खायला देशील मी आलो खेळायला तर? "
आईला विचारुन सांगते. पण तू ये. आई नाही म्हणाली तर माझा खाऊ मी तुला देईन. मी धावत आईला गाठलं. तिचं बोट धरलं.

रोजच्यासारखी मी बागेत उड्या मारत होते. बाबा मला घरी घेऊन येतो काकूंकडून. म्हणजे सकाळी आई सोडते काकूंकडे. काकू मला शाळेत सोडतात आणि परत घरी आणतात त्यांच्या. बाबा मला घरी घेऊन आला की सँडविच करुन देतो, नाहीतर दूध बिस्किटं. बाबा माझ्याशी गप्पा मारत चहा पितो. मग जाऊन झोपतो. म्हणतो, ’जा पळ, बागेत खेळ आता.’ आतासुद्धा त्याने तेच केलं.
तितक्यात एक मुलगा बागेच्या फाटकाशी येऊन थांबला. फाटकापाशी गेल्यावर मी त्याला ओळखलं, ’अय्या, हा तर भिकारी.’
"मी खेळायला आलोय. "
खूप आनंद झाला मला. फाटक उघडलं आणि म्हटलं,
"तू केस विंचरले आहेस का? वेगळाच दिसतोयस. मी ओळखलंच नाही तुला. "
तो फक्त हसला.
"ये ना. काय खेळू या? " मी त्यालाच विचारलं.
"मला नाही खेळता येत. मी कधीच खेळत नाही. "
"मग तू काय करतोस? "
"बाजा वाजवतो."
"आपण पकडापकडी खेळूया. सोप्पं असतं. " पण त्याला कळलंच नाही. तो माझ्याकडे बघत राहिला. मग मी त्याला पकडापकडी म्हणजे काय ते सांगितलं. तर तो इतका हसला, इतका हसला की त्याच्या डोळ्यातून पाणीच यायला लागलं. माझे गाल एकदम फुगले. आई म्हणते तसे, पुरीसारखे टम्म.
"पकडापकडी म्हटल्यावर वेड्यासारखा हसतोस काय? "
"हा काय खेळ झाला? पोलिस दिसले की आम्ही असेच पळतो. " तो पुन्हा हसायला लागला. मी त्याला ढकलून दिलं. तो मला ढकलायला निघाला तशी मी पळत सुटले. तेवढ्यात आई आली.
"अगं, अगं... थांब गं मीनू. " आईने माझा दंड पकडला.
"हा कोण? "
तो तसाच उभा राहिला.
"अरे, नाव काय तुझं? "
"पक्या."
"म्हणजे पंकज? "
"नाही पक्याच. "
"असं कसं असेल? मीनूसुद्धा नाव विचारलं की मीना असं सांगते. "
"पण माझं नाव पक्याच आहे. " तो चड्डी थोडीशी वर करुन मांडी करकरा खाजवत होता. आईला ते अजिब्बात आवडलं नाही. मला सांगायचं होतं तो कोण आहे ते. मी तिचा हात धरुन ओढत होते. तसं केलं की ती रागाने बघते माझ्याकडे पण मग मला कळतं ती माझं ऐकतेय म्हणून. पण तिने पाहिलंच नाही. पक्याशीच बोलत राहिली.
"आई आज रस्त्यावर बाजा वाजवत होता ना, तो भिकारी आहे हा. " मी जोरात सांगितलं तिने ऐकावं म्हणून.
आई एकदा माझ्याकडे, एकदा पक्याकडे पाहत राहिली. पक्या रडायलाच लागला.
"चल गं आत. पक्या तूही जा घरी. रडत नको उभा राहूस इथे. " आई रागावलीच एकदम. रागावली की आईची खूप भिती वाटते.
"पण माझा खाऊ? मीनू म्हणाली मी खेळलो तर ती खाऊ देईल. "
"चेंगट नुसता. उद्या देईन. " आईने माझं बकोट धरुन ओढतच नेलं मला घरात. पक्याला पण तिथून जायला लावलं. पक्याला खाऊ द्यायचाच म्हणून मी भोकाड पसरलं. बाबा आतूनच ओरडले.
"मीनू, काय चाललं आहे? इकडे ये. " मी रडत रडत बाबांच्या कुशीत शिरले. आईशी कट्टी केली.

पण आईने कबूल केलं त्याप्रमाणे माझ्या हातात खाऊ दिला पक्यासाठी दुसर्‍यादिवशी.
"दे त्याला आज जाता जाता. पण आपल्याला पक्या कोण कुठला काही माहीत नाही. अशा मुलांशी खेळायचं नसतं. आज येऊ नको म्हणून सांग त्याला. "
"अशा मुलांशी म्हणजे? " पण आईने उत्तर दिलं नाही. ती चालतच राहिली. पक्याला मी खाऊ दिला पण आज येऊ नकोस असं नाही सांगितलं. पक्या एकदम गोड हसला खाऊ पाहून. मला पण खूप आनंद झाला. मी उड्या मारत आईच्या मागे धावत धावत पोचले.

आज आईला सुट्टी. बाबालापण. आई म्हणाली, ’संध्याकाळी हॉटेलमध्ये जाऊ, मस्त मूव्ही टाकू.’ बाबाने माझा पापा घेत होकार दिला. आईने माझ्या वेण्या घालून दिल्या. किती दुखतं ती वेण्या घालते तेव्हा. पण नंतर पापा घेते तो आवडतो मला. म्हणाली,
"पळा आता. बाहेर खेळा जरा. मी येते तयार होऊन. " आई मला खूप आवडली. बागेत आईने खूप फुलं लावली होती. मी धावतधावत जाऊन आईला लाल, लाल गुलाबाचं फुल दिलं. आईने पुन्हा एक पापा घेतला. किती पापे घेतात ही मोठी माणसं. मी तो खसाखसा पुसला आणि खेळायला गेले. तितक्यात पक्या आला. मी फाटकापाशी धावत धावत गेले. आईने सांगितलं होतं, त्याला येऊ नकोस म्हणून सांग.
"मी खेळायला आलो आहे. "
"हो, पण आत्ता नाही खेळता येणार. आम्ही ना बाहेर चाललो आहोत जेवायला. " त्याचे डोळे एकदम चकाकले.
"मी पण येऊ? "
"तू तुझ्या आई बाबांबरोबर जा ना. आई - बाबांबरोबरच जायचं असतं. "
"मला नाहीत आई - बाबा. "
"म्हणजे? सगळ्यांना असतातच आई - बाबा. "
"पण मला नाहीत. "
"का? "
"माझे आई - बाबा मेले. "
"मेले? म्हणजे काय? "
तितक्यात आई आणि बाबा बाहेर आले तसा तो पळालाच.
आई म्हणालीच,
"अगं तो पक्या ना? त्याला यायचं नाही म्हणून सांगितलं नाहीस का? "
" त्याचे आई - बाबा मेले. म्हणजे काय गं? "
"कुणी सांगितलं तुला? "
"त्यानेच. "
"अगं किती छोटी आहेस अजून तू. आत्ता नाही कळणार तुला. " आईने पुन्हा तेच सांगितलं. मी मोठी होणार तरी कधी? तेवढ्यात बाबा म्हणाला,
"मेले म्हणजे देवाघरी गेले. आजीसारखं. "
"आजी येणार आहे परत, तसे पक्याचे आई - बाबा पण येतील. "
बाबाने मला जवळ घेतलं. केसातून हात फिरवला माझ्या आणि म्हणाला,
"असं रस्त्यावरच्या मुलांशी बोलायचं नसतं. "
"का? "
"नसतं बोलायचं. "
"पण का? "
"नंतर सांगतो. "
"नाही आत्ताच सांग. " मी गाडीत न बसता पाय आपटत राहिले.
"काय वैताग आहे हिचा. हट्टी आहे नुसती. " गाडीत बसलेल्या आईने डोळे मोठे करत दारच लावलं. मला आणखी रडायला आलं. पण तितक्यात आईने दार उघडलं.
"या आत. " मग आईने भिकारी, पैसे सारं काही समजावून सांगितलं. पण तेच तेच, परत परत. मला समजतंय असं वाटतंच नाही तिला म्हणून ती पुन्हा पुन्हा तेच सांगते. काही काही मुलांना आई - बाबा का नसतात तेही सांगितलं तिने. पुढचं उद्या सांगणार आहे. माझं डोकं लहान आहे त्यात एका दिवशी सगळं मावणार नाही म्हणून.

आज काकूंकडे जाताना मी माझ्या वाट्याची बिस्किटं खिशात ठेवली. अजिब्बात प्रश्न विचारले नाहीत आईला. जाता जाता पक्याच्या हातात पटकन दिली. मागे वळून पाहिलं तर तो मिटक्या मारत खात होता. मला वाटलं, मी पण त्याच्या बाजूला जाऊन त्याच्यासारखी फतकल मारावी आणि मिटक्या मारत खावं. त्याचा बाजा पण वाजवावा. पण आई धपाटा घालेल आणि आज बाबा मला नीट सांगणार आहे पक्याशी मी का खेळायचं नाही ते. काकूंकडे मजा येते खूप. मी तर पक्याला विसरुनच जाते तिथे गेले की. काकू खूप गोष्टी सांगतात, लपाछपी खेळतात. लाडू देतात. काकूंकडे खूप मुलं येतात. त्यांच्याशी खेळायला मला पण आवडतं. फक्त सोनू सारखी रडते. पण काकू तिला ओरडत नाहीत. बाबा गाडीतून येतो. मग आम्ही घरी जातो. घरी जाताना मात्र मला पक्याची आठवण होते. आज घरी आल्यावर मी बाबाला म्हटलं,
"बाबा, आता सांग ना. पक्याशी मी का खेळायचं नाही? "
"अं? " तो चहा पित होता. ओठाला लागलेला चहा पुसत त्याने माझ्याकडे पाहिलं. मला खूप हसायला आलं. मनीमाऊसारख्या मिशा दिसत होत्या त्याच्या.
"सांग ना. " मी हसत हसत म्हटलं. मिशा पुसत तोही हसला.
"आज नाही गं बेटा. दमलोय मी. " बाबा झोपायला गेला. मी खेळायला गेले बागेत. पण आज पक्या आला नाही. मी मग झोक्यावर खूप झोका घेतल्या. झोका उंच गेला की बाजूच्या घरातली पिनू खेळत असली तर दिसते. मग ती पण तिच्या बागेत झोक्यावर बसते. आम्ही उंच उंच जातो आणि खूप हसतो एकमेकींकडे बघत. आई आली की मगच मी घरात जाते.

आज पक्या आल्यावर आम्ही खूप खेळलो. बाबाला कळलंच नाही. तो झोपून गेला. मी पक्याला सांगितलं होतं. आवाज नाही करायचा. बाबा उठला तर खेळता नाही येणार आपल्याला. तो ’बरं’ म्हणाला.
आई आली आणि पक्या पळालाच.
"चल घरात. बरं झालं आपला आपणच गेला. पुन्हा पुन्हा तेच. तुला सांगितलेलं तू ऐकत नाहीस. त्याला सांगून काही उपयोग नाही. " ती तरातरा आत गेली. बाबाला उठवलंच तिने.
"हिला सांग रे का नाही खेळायचं त्या पक्याबरोबर. " बाबा डोळे चोळत उठला. मला जवळ बसवून म्हणाला,
"अगं, तो वाईट मुलगा आहे. "
"नाही. तो चांगला आहे. "
" त्याला आई - बाबा नाहीत. तो शाळेत जात नाही. भिकारी मुलं चांगली नसतात बेटा. "
"नाही, तो चांगला आहे, चांगला आहे, चांगला आहे... " मी पाय आपटले. मला ठाऊक आहे बाबा पाय आपटले की चिडतो. पण त्याने एक फटकाच दिला तसं मला खूप रडायला आलं.
आईने मला पटकन जवळ घेतलं. बाबाला चहा दिला. मला पण पुन्हा पुन्हा समजावून सांगितलं. मला फक्त कळलं की पक्याशी मी खेळायचं नाही. पण का ते कुणी नीट सांगतच नाही की मला कळतंच नाही काही?

बाबा झोपला की थोडा वेळच पक्या खेळायचा. त्याला माहीत होतं आई कधी येते. ती यायच्या आधी तो जायचाच. मी नाही काही सांगितलं त्याला. पण त्याला सगळं कळतं. आईला मी त्याच्याशी खेळलेलं आवडत नाही हे कळलंच त्याला पण मला त्याच्याशी खेळायला आवडतं हे पण. माझा खाऊ आता मी रोज त्यालाच देते. आईला कळत पण नाही. आईला वाटतं मी पक्याशी आता बोलतच नाही. पक्याला ही गंमत सांगितली. पक्या म्हणाला,
"तुझ्या आई - बाबांमुळे तुला खोटं बोलायचं कसं ते कळलं. " पक्या माझ्यापेक्षा मोठा आहे नं त्यामुळे त्याला सगळं समजतं. मी पण आता मोठी व्हायची वाट पाहतेय.

असेच खूप दिवस झाले. खूप म्हणजे खूपच. आता मी तिसरीत आहे. मला खूप मैत्रिणी आहेत. आणि कितीतरी गोष्टी कळल्या आहेत मला मैत्रिणींकडून. आई - बाबा इतके मोठे आहेत पण धड माहीतच नाही त्यांना काही. भिकारी कसे असतात, त्यांच्यामागे पोलिस का लागतात, मेलं की आपलं काय होतं, कुठे जातो, परत नाहीच येता येत असं खूप काही काही. पक्या अजूनही खेळायला येतो पण आता मला नसतं खेळायचं त्याच्याशी. आवडतंच नाही त्याच्याशी खेळायला. मैत्रिणी हसतील, चिडवतील मला त्याच्याशी खेळले तर. पण मला त्याला ते सांगायचं नाही म्हणून मग मी थोडा वेळ खेळते त्याच्याशी. काल तर एक गंमतच झाली. आई बाबांना सांगत होती ते मी ऐकलं,
ती म्हणाली,
"आली एकदाची मीनू आता माणसात. पक्याशी खेळत नाही विशेष. तिला वाटत होतं आपल्याला ठाऊक नाही ती त्याच्याशी खेळते, चोरून खाऊ देते त्याला ते. मला आवडायचंच नाही अगदी. पण एकीकडे वाटायचं, जाऊ दे, तो मुलगाही बाजा वाजवून स्वत:चं पोट भरायचा प्रयत्न करतोय तर कशाला जास्त विरोध करा. तसा काही वाईट नाही तो. आणि त्याला तरी कोण आहे? एकदा शाळेत गुंतली मीनू की मागे पडेल सगळं. तसंच झालं ना, शाळेनं शहाणं करुन सोडलेलं दिसतंय अगदी. सांगत नाही काही पण पक्याचं येणं कमी झालं आहे. " यात कसली आली आहे गंमत?

मला आई - बाबांनी खोटं बोलायला शिकवलं आणि शाळेने शहाणं केलं. हीच आहे ती गंमत. आहे ना?

पूर्वप्रसिद्धी - मायबोली दिवाळी अंक.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

वाह !! निव्वळ अप्रतिम !!!!
शेवट्ची आई ची तगमग आणि तिच्या तोंडची वाक्य पण सुरेख च...

वय वाढत जातं तसं निरागस या शब्दाऐवजी बावळट / मूर्ख / अव्यवहारी असे विशेषण लागायला सुरुवात होते. आणि हुशार / चलाख / व्यवहारी बनण्यासाठी आग्रह. बोलणारे सगळे आपलेच.

कथा आवडली , नाव सुद्धा ! Happy सुरुवातीला मी चुकून ' साजण ' असं वाचलं Proud
फक्त मला एक प्रश्न पडला , त्या बाजा वाजवणाऱ्या मुलाला मिनू च्या घराचा पत्ता कसा कळला खेळायला जाण्यासाठी !?( अर्थात त्याने येता जाता लक्ष ठेवलेलं असू शकतं ..)
ही फक्त काल्पनिक कथा आहे म्हणून तितकासा महत्वाचा नाहीये हा मुद्दा

बायबल मधील जगातील पहिल्या स्त्री पुरषाला सापाने देवानं मना केलेल्या झाडाचं फळ खायला सांगितले व फळ खाल्ल्याणं ते शहाणे झाले ही गोष्ट आठवली. बालसाहित्य आहे का हे.

कथा आवडली Happy

लहानपणी मुलांना भेदभाव कळत नाहीत, ते भिनवले जातात. सामाजिक जाणिवा आणि भावना ह्यातली ओढाताण चांगली दाखवलीये.

पालक व पाल्य दोघांच्या भूमिका त्या त्या जागी योग्य आहेत Happy

Screenshot_2019-07-19-10-34-23-996_com.whatsapp.png

जस जसे मोठे होत जातो निरागसता हरवत जाते

छान माण्डली आहे कथा

Submitted by निलुदा on 18 July, 2019 - 10:38

सर्वांना धन्यवाद.
anjali_kool तिचं त्याच्याकडे लक्ष आहे हे लक्षात येवून. पण मुद्दा बरोबर आहे. एखादा प्रसंग, ओळ घालता येईल त्याला मिनूचं घर कसं कळलं ते दाखविण्याकरता.
ज्यांनी ज्यांनी ’साजण’ वाचलं त्यांच्या मनात सतत साजण असणार त्यामुळे जिकडेतिकडे ’तो’ दिसत असेल Happy