'दरी' वाढताना -- अफगाणिस्तान आणि भारत सामन्याच्या निमित्ताने

Submitted by Arnika on 29 June, 2019 - 06:39

IndiaAfghan.jpg
जुन्या घराजवळ माझा एक नेहमीचा मासेवाला होता. कितीही वेळा खरेदी-विक्री झाली तरी त्याच्या चेहऱ्यावर ओळख दाखवणारी रेषही दिसायची नाही. मी हसून दोन वाक्य बोलले तरी चेहरा तसाच. मख्ख नव्हे, पण काहीसा थकून निर्विकार झालेला. काही महिन्यांनी त्याचा बारा-तेरा वर्षांचा मुलगा रविवारी गल्ल्यावर बसायला लागला. मासे स्वच्छ करून देता देता त्याच्या-माझ्या गप्पा व्हायला लागल्या. त्याचे बाबा नुसते बघत बसत. शाळा, हवा-पाणी, आवडते मासे असली आमची बडबड चालायची. ती ऐकून त्या बाबांच्या चेहऱ्यातही किंचित नरमाई यायला लागली होती. एक दिवस आमची गाडी भाषांकडे आली. वयाच्या तेराव्या वर्षी पाच भाषा येत होत्या त्या मुलाला. सुरमई-पापलेटचं दुकान आणि पाच-पाच भाषा! कसं देवाने सगळं वैभव एका छोट्या मुलाला देऊन टाकलंय या विचाराने हेवा वाटून खाक झाले होते मी.
“कुठल्या भाषा रे? कशा काय शिकलास एवढ्या?” मी विचारलं, तसा त्याच्या बाबांचा चेहरा पुन्हा धीरगंभीर झाला.
“द–”
“जा रे, गिऱ्हाईक आहे दुसरं बाहेर.” तो पुढे बोलणार इतक्यात खवीस बापाने त्याला बाहेर पाठवलं.

आता असला गनिमी कावा काय मला समजणार नाही का? मीही भोचकपणा करायच्या मूडमध्ये आले आणि मासे बर्फाच्या पिशवीत ठेवून तिकडेच ठिय्या देऊन उभी राहिले. दोन गिऱ्हाइकं आटपली. मुलगा परत आत आला आणि मला तिथेच पाहून हसला.
“सांगत होतास ना? सांग ना कुठल्या भाषा!”
“Why you ask? What difference it make to your fish?” मुलाऐवजी बाप बोलला.
“माझ्या माश्याला काय फरक पडणारे? काहीच नाही. आणि त्यात न सांगण्यासारखं काय आहे?” आम्ही दोघं हटून बसलो. तो मुलगा बिचारा टेनिस पाहिल्यासारखा एकदा माझ्याकडे नि एकदा बाबांकडे बघत उभा!
“नक्की फरक नसेल पडत तर सांगतो भाषा.” बापाने पोराला मान हलवून परवानगी दिली.
“दरी, पश्तो, उर्दू, फ्रेंच आणि इंग्लिश.”
“दरी! अफगाणिस्तानची भाषा. म्हणजे तुम्ही अफगाण आहात?”
“सांगू नकोस कोणाला. तू विचारलंस म्हणून सांगितलं फक्त. पुढच्या रविवारी यायचं हं नक्की!”

रातोरात घरदार सोडून अफगाणिस्तानातून आश्रित म्हणून आलेलं कुटुंब होतं त्यांचं. पाकिस्तान, फ्रान्स अशी मजल दरमजल करत इंग्लंडला येऊन स्थिरावलेली माणसं, त्यामुळे त्या लहान मुलाने तेरा पूर्ण व्हायच्या आत असलं बेभरवशाचं आयुष्य जगत वाटेत सगळ्या भाषा टिपलेल्या होत्या. ही गोष्ट ऐकून मी आईला नेहमी म्हणायचे की तो मुलगा इतका गोड आहे मग बाप इतका खवीस का? आई म्हणाली की मुलाचा गोडवा टिकून रहावा म्हणून बापाला त्याचा हरपावा लागला असेल... मला काही समजलं नाही पण आईच्या डोळ्यात पाणी होतं.

असे कित्येक जण भेटायचे. टॅक्सी चालवणारे, दुकानदार, स्टेशनवरचे मदतनीस, होटेलातले वेटर वगैरे वगैरे. सगळ्यांची गोष्ट कितीही वेगळी असली तरी तितकीच त्रासाची आणि विरहाची. ते आपापसात बोलले की मला भाषा ओळखू यायची. हौसेने “तुम्ही अफगाणिस्तानातले आहात का” असं विचारल्यावर ते चमकून बघायचे अणि खाली मान घालून हो म्हणायचे. काही जण पाकिस्तानातले आहोत सांगायचे. काही जण पंजाब म्हणायचे. काही पूर्व-युरोपच्या देशातली काही नावं घ्यायचे आणि अगदीच खोटं बोलू न शकणारे तेवढे ‘काबुली जबाब’ द्यायचे. मला असला लढा कधीच द्यावा लागला नव्हता त्यामुळे मला हे समजायला वेळ लागला. आपण कुठून आलोय हे ताठ मानेने सांगता येऊ नये असं वातावरण इंग्लंडमध्ये भारताबद्दल माझ्या हयातीत तरी कधीच नव्हतं. काही पाकिस्तानी माणसांना खोटं उत्तर देताना मी पाहिलं होतं, पण खोटं उत्तर देऊन पाकिस्तानचे आहोत असं सांगणारी ही पहिलीच प्रजा भेटली होती. खरं सांगितलं तर धंदा बुडणार नाही ना, गिऱ्हाईक हातचं जाणार नाही ना, चार लोकांत अफगाण म्हणून वाईट नाव होणार नाही ना अशा काळजीत असायची ही मंडळी कायम.

अमेरिकेतल्या २००१ सालच्या हल्ल्यांची गोष्ट तेव्हा ताजी होती. युद्धाला नुकतंच तोंड फुटलं होतं. सैनिक आणि नागरीक मारले गेल्याच्या बातम्या आणि इंग्लंडचं सरकार अफगाणिस्तानात किती पैसे ओततंय हे वगळता त्या देशाबद्दल काहीही ऐकायला मिळायचं नाही. ज्या शहरांमध्ये इंग्लिश छावण्या असतील त्यांचीच नावं ऐकायला मिळायची आणि तिथल्या निसर्गाच्या नावाखाली नुसतं रणरणतं, ओसाड, करडं रान टीव्हीवर बघायला मिळायचं. तिथल्या माणसांबद्दल मनात किलमिष असायला मुळात त्या देशात माणसं रहातात हेच कोणाला ठाऊक नसण्याचे दिवस होते ते.

२००३ नंतर सहा-सात वर्षांत इंग्लंडमधलं वातावरण निवळलं आणि अफगाणिस्तानची भरपूर माणसंही भेटायला लागली. अफगाणिस्तान म्हंटल्यावर माझ्या डोक्यात धोक्याची घंटा वाजत नाही असं पाहून ही मंडळी भरपूर बोलायची. शिवाय मी भारतीय म्हणून मला कायम विशेष भाव! लांबवर लावलेल्या माझ्या गाडीत पंधरा किलोची कलिंगडं चढवून द्यायला येणं; मी भारतीय कपड्यांत कुठे जात असेन तर फारसीतली गाणी तुमच्या देवळाच्या वाटेवर लावलेली चालतात का असं आदबीनं विचारणं; पाऊस असेल तर मला घराच्या उंबरठ्यापाशी येऊन सोडणं आणि सामान उतरवून देणं ही सगळी कामं फक्त चार शब्द फारसीत/दरीत बोलल्यामुळे ते आपुलकीने करायचे. अफगाणिस्तानबद्दल भरभरून बोलायचे.

त्यात अमिताभची चौकशी करणारा ग़ोलाम होता. साडी नेसल्यावर पोट दिसतं त्यामुळे हौस असूनही सुनेला साडी नेसता येत नाही हे कळल्यावर तिच्यासाठी खास कमरेपर्यंत ब्लाउज शिवून घेणारी हुमा होती. मी जेव्हा केव्हा जाईन तेव्हा काबूलला जाण्याआधी हेरातला जाऊन येईन असं वचन घेणारा आदेल होता. दुकानातली कलिंगडं मला पेलेनाशी झाल्यावर ती गाडीपर्यंत पोचवायला येणारे काका रहीम होते. अफगाणिस्तानातून डॉक्टर होऊन आल्यावर इकडे रक्त तपासणीचं काम करणारी सोराया होती. इतिहासाचं शिक्षण अर्ध्यात सोडून यायला लागल्यावर लंडनला सूटकेसेस विकणारा अहमद होता...

त्या सगळ्यांच्या गप्पा, गाणी, ख़ालेद होसेनीची पुस्तकं, फारसीचा ताल, त्यांच्या गोष्टी, बोलण्या-बोलण्यात रूमीच्या कविता म्हणणं या सगळ्याची एकत्र जादू म्हणजे अफगाणिस्तान असं माझ्यापुरतं पक्कं झालं होतं. शिवाय डबघाईला आलेल्या देशांचे डोहाळे लागण्याची खोड! त्यांची क्रिकेटमध्ये एंट्री झाल्यावर मी मॅच बघायला जाणार नाही असं कसं शक्य होतं?

पाकिस्तानमध्ये वसवलेल्या अफगाण आश्रितांच्या छावणीत ही पिढी क्रिकेट शिकली. त्यातल्या रशीद, मुजीब आणि नबीचा कमाल खेळ मी गेली दोन वर्ष बघत होते. पण हे असं एखाद-दोन वाक्यात त्यांच्या कष्टांबद्दल, हालअपेष्टांबद्दल लिहून मी काय न्याय देऊ शकणारे त्यांना? कोणाच्या किती रन्स नि कोणाला किती विकेट्स हे आकडे सगळ्यांना माहिती आहेत. मी नव्याने सांगावं असं त्यात काही नाही. पण माझ्यासाठी सगळ्यात आनंदाची गोष्ट अशी की दहा-पंधरा वर्षांपूर्वीपर्यंत लपून-छपून “अफगाणिस्तानचे आहोत” असं सांगायला लागणारे अफगाण काल मोठमोठाले झेंडे घेऊन, पठाणी वेशात मैदानावर आले होते. लहानशी पोरं आरसे लावलेले, भरतकाम केलेले घेरदार झगे घालून फिरत होती. बायकाही पारंपरिक कपड्यांत आल्या होत्या. लोक त्यांच्याबरोबर फोटो काढायला रांगा लावत होते. आपण आनंद, मिलिंद वगैरे मंडळींना हाक मारताना कसं “आनंदा”, “मिलिंदा” म्हणतो, तसे हेसुद्धा “शाबाश मुजिबाऽ“ “आफरीन रहमता” असं ओरडत होते. खुलेपणाने, आनंदाने अफगाणी असल्याचं सांगत होते.

फोटोतला उजवीकडचा मुनीर फिनलंडहून फक्त या एका मॅचसाठी इंग्लंडला आला होता. म्हणाला, “आमच्या अफगाणिस्तानसाठी यायचं होतं पण एकदाच येणं परवडणार होतं. निराशा पदरी नको म्हणून मग अशी मॅच निवडली जिकडे दोन्ही टीम माझ्याच असतील. आमचा अख्खा देश भारताच्या बाजूने असतो. त्यामुळे माझ्यासाठी अफगाणिस्तान जिंकलं काय किंवा भारत काय, आनंद एकसारखाच असणार आहे.”

फक्त क्रिकेटने काही होत नसतं, तिथली परिस्थिती अजूनही बिकट आहे अशा आशयाच्या बातम्या वाचल्या मी. अर्थात, त्याची कल्पना सगळ्यांनाच आहे. तरीही ही छोटी वाटणारी पावलं महत्त्वाची आहेतच. काल त्या देशाचं जगासमोर करड्या रंगाऐवजी इतक्या रंगांमध्ये साजरं होणं सुखद होतं. त्यांनी शेवटपर्यंत आपल्याला खेळवत ठेवणं जिगरीचं होतं. एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून (पीलू रागातलं) राष्ट्रगीत म्हणणं हेलावून टाकणारं होतं. गेला महिनाभर युद्धाव्यतिरिक्तच्या बातम्यांमध्ये असणं मोलाचं होतं आणि जगाच्या नकाशावर पुन्हा मानाने उमटणं फार हळवं आणि सुंदर होतं.
Welcome, Afghanistan. Welcome to cricket.

पुन्हा एकदा जुन्या मासेवाल्याकडे चक्कर टाकेन म्हणत्ये...
-----
बरं, ताजा कलम: आपली भारतीय टीम निव्वळ <3 आहे.

- अर्निका परांजपे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अर्निका, गहीवरुन आलं हा लेख वाचतांना. अफगाण म्हणल्यावर आठवते ते रेश्मा गाणे, धर्मात्मा मधले. काबुलीवाला मी पाहीला नाही, पण गाणेच माहीत. हो, अफगाणी लोकांनी खूप भोगले आहे दहशतवादामुळे, तालीबानमुळे आणी पाकीस्तान मुळे. आपल्या सरकारने एक भारतीय म्हणून , एक मित्र म्हणून प्रत्येक वेळा अफगाणिस्तानला सावरायला मदत केली आहे आणी करत राहील. आज मॅच पहातांना मी तरी अफगाणच्याच बाजूने आहे.
देव त्यांना भरभराट देवो.

ही गोष्ट ऐकून मी आईला नेहमी म्हणायचे की तो मुलगा इतका गोड आहे मग बाप इतका खवीस का? आई म्हणाली की मुलाचा गोडवा टिकून रहावा म्हणून बापाला त्याचा हरपावा लागला असेल... मला काही समजलं नाही पण आईच्या डोळ्यात पाणी होतं.>>>> Sad

बर्‍याच दिवसांनी तुमचा लेख वाचून छान वाटलं.
अफगानिस्तान च्या टीम चं खरंच कौतुक वाटतं. आज तरी जिंकायला हवेत ते.

खूपच सुंदर लिहिलंय.
अफगाणिस्तान म्हणजे दहशतवादाच्या विळख्यात अडकलेला एक दुर्दैवी देश अशी काही दिवसांपूर्वी एक प्रतिमा होती. हल्लीच 'द काइट रनर' वाचल्यानंतर ही प्रतिमा पार बदलून गेलीये.

खुप खुप सुंदर लिहिलं आहेस अर्निका.

<<<<<<<<<दहा-पंधरा वर्षांपूर्वीपर्यंत लपून-छपून “अफगाणिस्तानचे आहोत” असं सांगायला लागणारे अफगाण काल मोठमोठाले झेंडे घेऊन, पठाणी वेशात मैदानावर आले होते. लहानशी पोरं आरसे लावलेले, भरतकाम केलेले घेरदार झगे घालून फिरत होती. बायकाही पारंपरिक कपड्यांत आल्या होत्या. लोक त्यांच्याबरोबर फोटो काढायला रांगा लावत होते. आपण आनंद, मिलिंद वगैरे मंडळींना हाक मारताना कसं “आनंदा”, “मिलिंदा” म्हणतो, तसे हेसुद्धा “शाबाश मुजिबाऽ“ “आफरीन रहमता” असं ओरडत होते. खुलेपणाने, आनंदाने अफगाणी असल्याचं सांगत होते.>>>>>>>> हे वाचताना डोळे भरुन आले आणि आनंद वाटला.
लिहित रहा.

सिम्बा, मायबोलीवरची मित्रमंडळी मायबोलीवरच पावती देतात बरेचदा; मलाही त्यांना इकडेच बघायची जास्त सवय आहे Happy मनापासून धन्यवाद!
आशुचॅम्प, होच का? मला परवाच कोणीतरी म्हणालं की व्हॉट्सॅपवर तुम्ही सगळ्यांना सांगा की हे हे तुम्ही लिहिलंय. आता कुठे कायकाय करत बसायचं... त्यापेक्षा पुढचं लिहायचा प्रयत्न करते Happy
सगळ्यांचे मन:पूर्वक आभार!

खुप छान लेख..

आपलं राष्ट्रीयत्व लपवताना किती त्रास होत असेल याची कल्पनाही करवत नाही. पण तिच लोक अभिमानाने टिमला सपोर्ट करताना वाचुन अगदी गहिवरुन आलं.
अफगाणच्या टिमने भारतीय टिमला दिलेली टक्कर बघता आजची मॅच खरंच त्यांनी जिंकायला हवी. Happy

>>>>फक्त क्रिकेटने काही होत नसतं, तिथली परिस्थिती अजूनही बिकट आहे अशा आशयाच्या बातम्या वाचल्या मी. अर्थात, त्याची कल्पना सगळ्यांनाच आहे. तरीही ही छोटी वाटणारी पावलं महत्त्वाची आहेतच. काल त्या देशाचं जगासमोर करड्या रंगाऐवजी इतक्या रंगांमध्ये साजरं होणं सुखद होतं. >>>>
थोडासा रुमानी हो जाये आठवला... उम्मीदपे दुनिया कायम है...
तुमचे लिखाण झपाटून टाकणारे आहे.

क्या बात है! सुंदर!
तुझे लेख वाचताना मधेमधे शब्दांशी खेळलेले खेळ दाद घेऊन जातात. उदा. काबुली जबाब , वाढलेली 'दरी' Happy

त्या दिवशी मला खूप वाईट वाटलं अफगाणिस्तान हरल्यावर. विशेषतः नबी आऊट झाला तेव्हा. तसं मला परवा वेस्ट इंडिज हरत आल्यावरही वाईट वाटायला लागलं होतंच.

अति अवांतर : सुनील ॲम्ब्रिस या वेस्ट इंडिजच्या खेळाडूचं नाव 'सुनील' गावस्करवरून ठेवलं आहे का?

फोटोतला उजवीकडचा मुनीर फिनलंडहून फक्त या एका मॅचसाठी इंग्लंडला आला होता. म्हणाला, “आमच्या अफगाणिस्तानसाठी यायचं होतं पण एकदाच येणं परवडणार होतं. निराशा पदरी नको म्हणून मग अशी मॅच निवडली जिकडे दोन्ही टीम माझ्याच असतील. आमचा अख्खा देश भारताच्या बाजूने असतो. त्यामुळे माझ्यासाठी अफगाणिस्तान जिंकलं काय किंवा भारत काय, आनंद एकसारखाच असणार आहे.” >>>>>.

आज आम्ही त्यांच्यासाठी चीअर करणार आहोत. रशीद, मुजीब आणि नबी तिघेही आवडतात.

Pages