'दरी' वाढताना -- अफगाणिस्तान आणि भारत सामन्याच्या निमित्ताने

Submitted by Arnika on 29 June, 2019 - 06:39

IndiaAfghan.jpg
जुन्या घराजवळ माझा एक नेहमीचा मासेवाला होता. कितीही वेळा खरेदी-विक्री झाली तरी त्याच्या चेहऱ्यावर ओळख दाखवणारी रेषही दिसायची नाही. मी हसून दोन वाक्य बोलले तरी चेहरा तसाच. मख्ख नव्हे, पण काहीसा थकून निर्विकार झालेला. काही महिन्यांनी त्याचा बारा-तेरा वर्षांचा मुलगा रविवारी गल्ल्यावर बसायला लागला. मासे स्वच्छ करून देता देता त्याच्या-माझ्या गप्पा व्हायला लागल्या. त्याचे बाबा नुसते बघत बसत. शाळा, हवा-पाणी, आवडते मासे असली आमची बडबड चालायची. ती ऐकून त्या बाबांच्या चेहऱ्यातही किंचित नरमाई यायला लागली होती. एक दिवस आमची गाडी भाषांकडे आली. वयाच्या तेराव्या वर्षी पाच भाषा येत होत्या त्या मुलाला. सुरमई-पापलेटचं दुकान आणि पाच-पाच भाषा! कसं देवाने सगळं वैभव एका छोट्या मुलाला देऊन टाकलंय या विचाराने हेवा वाटून खाक झाले होते मी.
“कुठल्या भाषा रे? कशा काय शिकलास एवढ्या?” मी विचारलं, तसा त्याच्या बाबांचा चेहरा पुन्हा धीरगंभीर झाला.
“द–”
“जा रे, गिऱ्हाईक आहे दुसरं बाहेर.” तो पुढे बोलणार इतक्यात खवीस बापाने त्याला बाहेर पाठवलं.

आता असला गनिमी कावा काय मला समजणार नाही का? मीही भोचकपणा करायच्या मूडमध्ये आले आणि मासे बर्फाच्या पिशवीत ठेवून तिकडेच ठिय्या देऊन उभी राहिले. दोन गिऱ्हाइकं आटपली. मुलगा परत आत आला आणि मला तिथेच पाहून हसला.
“सांगत होतास ना? सांग ना कुठल्या भाषा!”
“Why you ask? What difference it make to your fish?” मुलाऐवजी बाप बोलला.
“माझ्या माश्याला काय फरक पडणारे? काहीच नाही. आणि त्यात न सांगण्यासारखं काय आहे?” आम्ही दोघं हटून बसलो. तो मुलगा बिचारा टेनिस पाहिल्यासारखा एकदा माझ्याकडे नि एकदा बाबांकडे बघत उभा!
“नक्की फरक नसेल पडत तर सांगतो भाषा.” बापाने पोराला मान हलवून परवानगी दिली.
“दरी, पश्तो, उर्दू, फ्रेंच आणि इंग्लिश.”
“दरी! अफगाणिस्तानची भाषा. म्हणजे तुम्ही अफगाण आहात?”
“सांगू नकोस कोणाला. तू विचारलंस म्हणून सांगितलं फक्त. पुढच्या रविवारी यायचं हं नक्की!”

रातोरात घरदार सोडून अफगाणिस्तानातून आश्रित म्हणून आलेलं कुटुंब होतं त्यांचं. पाकिस्तान, फ्रान्स अशी मजल दरमजल करत इंग्लंडला येऊन स्थिरावलेली माणसं, त्यामुळे त्या लहान मुलाने तेरा पूर्ण व्हायच्या आत असलं बेभरवशाचं आयुष्य जगत वाटेत सगळ्या भाषा टिपलेल्या होत्या. ही गोष्ट ऐकून मी आईला नेहमी म्हणायचे की तो मुलगा इतका गोड आहे मग बाप इतका खवीस का? आई म्हणाली की मुलाचा गोडवा टिकून रहावा म्हणून बापाला त्याचा हरपावा लागला असेल... मला काही समजलं नाही पण आईच्या डोळ्यात पाणी होतं.

असे कित्येक जण भेटायचे. टॅक्सी चालवणारे, दुकानदार, स्टेशनवरचे मदतनीस, होटेलातले वेटर वगैरे वगैरे. सगळ्यांची गोष्ट कितीही वेगळी असली तरी तितकीच त्रासाची आणि विरहाची. ते आपापसात बोलले की मला भाषा ओळखू यायची. हौसेने “तुम्ही अफगाणिस्तानातले आहात का” असं विचारल्यावर ते चमकून बघायचे अणि खाली मान घालून हो म्हणायचे. काही जण पाकिस्तानातले आहोत सांगायचे. काही जण पंजाब म्हणायचे. काही पूर्व-युरोपच्या देशातली काही नावं घ्यायचे आणि अगदीच खोटं बोलू न शकणारे तेवढे ‘काबुली जबाब’ द्यायचे. मला असला लढा कधीच द्यावा लागला नव्हता त्यामुळे मला हे समजायला वेळ लागला. आपण कुठून आलोय हे ताठ मानेने सांगता येऊ नये असं वातावरण इंग्लंडमध्ये भारताबद्दल माझ्या हयातीत तरी कधीच नव्हतं. काही पाकिस्तानी माणसांना खोटं उत्तर देताना मी पाहिलं होतं, पण खोटं उत्तर देऊन पाकिस्तानचे आहोत असं सांगणारी ही पहिलीच प्रजा भेटली होती. खरं सांगितलं तर धंदा बुडणार नाही ना, गिऱ्हाईक हातचं जाणार नाही ना, चार लोकांत अफगाण म्हणून वाईट नाव होणार नाही ना अशा काळजीत असायची ही मंडळी कायम.

अमेरिकेतल्या २००१ सालच्या हल्ल्यांची गोष्ट तेव्हा ताजी होती. युद्धाला नुकतंच तोंड फुटलं होतं. सैनिक आणि नागरीक मारले गेल्याच्या बातम्या आणि इंग्लंडचं सरकार अफगाणिस्तानात किती पैसे ओततंय हे वगळता त्या देशाबद्दल काहीही ऐकायला मिळायचं नाही. ज्या शहरांमध्ये इंग्लिश छावण्या असतील त्यांचीच नावं ऐकायला मिळायची आणि तिथल्या निसर्गाच्या नावाखाली नुसतं रणरणतं, ओसाड, करडं रान टीव्हीवर बघायला मिळायचं. तिथल्या माणसांबद्दल मनात किलमिष असायला मुळात त्या देशात माणसं रहातात हेच कोणाला ठाऊक नसण्याचे दिवस होते ते.

२००३ नंतर सहा-सात वर्षांत इंग्लंडमधलं वातावरण निवळलं आणि अफगाणिस्तानची भरपूर माणसंही भेटायला लागली. अफगाणिस्तान म्हंटल्यावर माझ्या डोक्यात धोक्याची घंटा वाजत नाही असं पाहून ही मंडळी भरपूर बोलायची. शिवाय मी भारतीय म्हणून मला कायम विशेष भाव! लांबवर लावलेल्या माझ्या गाडीत पंधरा किलोची कलिंगडं चढवून द्यायला येणं; मी भारतीय कपड्यांत कुठे जात असेन तर फारसीतली गाणी तुमच्या देवळाच्या वाटेवर लावलेली चालतात का असं आदबीनं विचारणं; पाऊस असेल तर मला घराच्या उंबरठ्यापाशी येऊन सोडणं आणि सामान उतरवून देणं ही सगळी कामं फक्त चार शब्द फारसीत/दरीत बोलल्यामुळे ते आपुलकीने करायचे. अफगाणिस्तानबद्दल भरभरून बोलायचे.

त्यात अमिताभची चौकशी करणारा ग़ोलाम होता. साडी नेसल्यावर पोट दिसतं त्यामुळे हौस असूनही सुनेला साडी नेसता येत नाही हे कळल्यावर तिच्यासाठी खास कमरेपर्यंत ब्लाउज शिवून घेणारी हुमा होती. मी जेव्हा केव्हा जाईन तेव्हा काबूलला जाण्याआधी हेरातला जाऊन येईन असं वचन घेणारा आदेल होता. दुकानातली कलिंगडं मला पेलेनाशी झाल्यावर ती गाडीपर्यंत पोचवायला येणारे काका रहीम होते. अफगाणिस्तानातून डॉक्टर होऊन आल्यावर इकडे रक्त तपासणीचं काम करणारी सोराया होती. इतिहासाचं शिक्षण अर्ध्यात सोडून यायला लागल्यावर लंडनला सूटकेसेस विकणारा अहमद होता...

त्या सगळ्यांच्या गप्पा, गाणी, ख़ालेद होसेनीची पुस्तकं, फारसीचा ताल, त्यांच्या गोष्टी, बोलण्या-बोलण्यात रूमीच्या कविता म्हणणं या सगळ्याची एकत्र जादू म्हणजे अफगाणिस्तान असं माझ्यापुरतं पक्कं झालं होतं. शिवाय डबघाईला आलेल्या देशांचे डोहाळे लागण्याची खोड! त्यांची क्रिकेटमध्ये एंट्री झाल्यावर मी मॅच बघायला जाणार नाही असं कसं शक्य होतं?

पाकिस्तानमध्ये वसवलेल्या अफगाण आश्रितांच्या छावणीत ही पिढी क्रिकेट शिकली. त्यातल्या रशीद, मुजीब आणि नबीचा कमाल खेळ मी गेली दोन वर्ष बघत होते. पण हे असं एखाद-दोन वाक्यात त्यांच्या कष्टांबद्दल, हालअपेष्टांबद्दल लिहून मी काय न्याय देऊ शकणारे त्यांना? कोणाच्या किती रन्स नि कोणाला किती विकेट्स हे आकडे सगळ्यांना माहिती आहेत. मी नव्याने सांगावं असं त्यात काही नाही. पण माझ्यासाठी सगळ्यात आनंदाची गोष्ट अशी की दहा-पंधरा वर्षांपूर्वीपर्यंत लपून-छपून “अफगाणिस्तानचे आहोत” असं सांगायला लागणारे अफगाण काल मोठमोठाले झेंडे घेऊन, पठाणी वेशात मैदानावर आले होते. लहानशी पोरं आरसे लावलेले, भरतकाम केलेले घेरदार झगे घालून फिरत होती. बायकाही पारंपरिक कपड्यांत आल्या होत्या. लोक त्यांच्याबरोबर फोटो काढायला रांगा लावत होते. आपण आनंद, मिलिंद वगैरे मंडळींना हाक मारताना कसं “आनंदा”, “मिलिंदा” म्हणतो, तसे हेसुद्धा “शाबाश मुजिबाऽ“ “आफरीन रहमता” असं ओरडत होते. खुलेपणाने, आनंदाने अफगाणी असल्याचं सांगत होते.

फोटोतला उजवीकडचा मुनीर फिनलंडहून फक्त या एका मॅचसाठी इंग्लंडला आला होता. म्हणाला, “आमच्या अफगाणिस्तानसाठी यायचं होतं पण एकदाच येणं परवडणार होतं. निराशा पदरी नको म्हणून मग अशी मॅच निवडली जिकडे दोन्ही टीम माझ्याच असतील. आमचा अख्खा देश भारताच्या बाजूने असतो. त्यामुळे माझ्यासाठी अफगाणिस्तान जिंकलं काय किंवा भारत काय, आनंद एकसारखाच असणार आहे.”

फक्त क्रिकेटने काही होत नसतं, तिथली परिस्थिती अजूनही बिकट आहे अशा आशयाच्या बातम्या वाचल्या मी. अर्थात, त्याची कल्पना सगळ्यांनाच आहे. तरीही ही छोटी वाटणारी पावलं महत्त्वाची आहेतच. काल त्या देशाचं जगासमोर करड्या रंगाऐवजी इतक्या रंगांमध्ये साजरं होणं सुखद होतं. त्यांनी शेवटपर्यंत आपल्याला खेळवत ठेवणं जिगरीचं होतं. एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून (पीलू रागातलं) राष्ट्रगीत म्हणणं हेलावून टाकणारं होतं. गेला महिनाभर युद्धाव्यतिरिक्तच्या बातम्यांमध्ये असणं मोलाचं होतं आणि जगाच्या नकाशावर पुन्हा मानाने उमटणं फार हळवं आणि सुंदर होतं.
Welcome, Afghanistan. Welcome to cricket.

पुन्हा एकदा जुन्या मासेवाल्याकडे चक्कर टाकेन म्हणत्ये...
-----
बरं, ताजा कलम: आपली भारतीय टीम निव्वळ <3 आहे.

- अर्निका परांजपे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुप सुंदर लेख.
अफगाणिस्तान टीमचा इतिहास वाचण्यासारखा आहेच पण ते सध्याही सराव भारतातच करतात. अजूनही त्यांच्याकडे
स्वत:चे स्टेडियम नाहीये. भारत त्यांना आर्थिक मदतही करतो.

<<< “दरी, पश्तो, उर्दू, फ्रेंच आणि इंग्लिश.”
“दरी! अफगाणिस्तानची भाषा. म्हणजे तुम्ही अफगाण आहात?” >>>
माझ्या माहितीतल्या ९९% टक्के लोकांना दरी ही अफगाणिस्तानची भाषा आहे, हे माहीत नसेल. मला स्वतः:ला ही माहीत न्हवते and I am sure many (including me) would care less. कोण कुठली भाषा बोलतो ही खाजगी बाब आहे.

<<< हौसेने “तुम्ही अफगाणिस्तानातले आहात का” असं विचारल्यावर ते चमकून बघायचे अणि खाली मान घालून हो म्हणायचे. >>>
<<< आपण कुठून आलोय हे ताठ मानेने सांगता येऊ नये असं वातावरण इंग्लंडमध्ये .....>>>
मुळात हे असं वातावरण इंग्लंडमध्ये का आहे, ते काही कळलं नाही. कदाचित हा खरा प्रश्न असेल.

क्रिकेट हा खेळ cheating करून खेळला जाणारा आणि पैसे हेच सर्वस्या असणारा खेळ आहे लोकांना माहीत आहे

उपाशी बोका, I have had a fascination about languages from that region for a while, so I couldn't possibly care more than I did about the languages they speak! आणि एखाद्याशी गप्पा होत असताना तो पाच भाषा बोलतो हे त्याच्याचकडून कळल्यावर त्या भाषा कुठल्या हे विचारण्यात फार खाजगी आणि अप्रस्तुत काहीच नाही वाटत मला Happy अफगाणिस्तानातलं युद्ध, दहशतवादाच्या सततच्या खबरा आणि इंग्लंडचा त्या युद्धासाठी जाणारा पैसा यामुळे असं वातावरण होतं इंग्लंडमध्ये.

पिलू राग भारतीय आहे काय? त्यांचे राष्ट्रगीत भारतीयाच्या मदतीने तयार झाले आहे काय याविषयी जाणून घ्यायला आवडेल. तुमच्या फोटोतील क्यूट मुलगा मागील लेखनात वर्णन केलेला तोच आहे काय?

वाह, खूप sensitive आहे लेख. आवडलाच. Khaled Hosseini ची पुस्तके वाचून अजून कळला अफगाणिस्तान. अफगाणी लोकांनी खूपच भोगलंय आता परत ते वर येताना पाहून आनंदच वाटतो
You are a good observer

छान.
===

> अफगाणिस्तान म्हणजे दहशतवादाच्या विळख्यात अडकलेला एक दुर्दैवी देश अशी काही दिवसांपूर्वी एक प्रतिमा होती. हल्लीच 'द काइट रनर' वाचल्यानंतर ही प्रतिमा पार बदलून गेलीये. > अधिक वाचायला आवडेल.

अतिशय सुंदर लेख!

हाच लेख तू पुन्हा स्वतंत्रपणे इंग्रजीत लिही. आणखी मोठा वाचकवर्ग मिळेल. इथे अमेरिकेतही अफगाणिस्तान बद्दल कुतूहल आहे. त्यांना अजिबात माहीत नसलेल्या अनेक गोष्टी यातून समजतील. मला हफिंग्टन पोस्ट किंवा न्यू यॉर्क टाइम्स मधे असा लेख अगदी चपखल बसेल असे वाटते Happy

सुंदर लेख. कसे दिवस काढले असतील बिचाऱ्यानी. Cricket ग्राऊंडवर त्यांना बघताना नेहमी माझ्या मनात संमिश्र भावना होत्या. हाच विचार असायचा कि कस वाटत असेल त्यांना. लेख वाचून त्यांची मनःस्तिथि थोडी का होईना कळली. बर वाटलं मनाला. आणखी अनुभव वाचायला आवडतील.
खूप छान खेळली अफगाणिस्तानची टीम. मला तर गुलाबदनने विकेट घेतल्यावर दंडावरच्या बेडक्या दाखवल्या ते बघून एकदम हसू फुटलं होतं . फारसं खेळायला मिळत नसताना भारतासारख्या दिग्गज टीमला मस्त टक्कर दिली त्यांनी.

वा फारच छान लिहले आहे .. शीर्षक वाचून आधी वेगळाच अंदाज बांधला होता परंतु लेख एक्दम भावुक आहे. कुठेही मोठ्या मोठ्या शब्दांचा वापर ना करता देखील खूपच प्रभावशाली झाला आहे.

हाहाहाहा, ता.क. बद्दलच्या शंका वाचून लक्षात आलं माझ्या की मी तो डिलीटच केला नाहीये. मी अफगाणिस्तानच्या मॅचला आल्ये आणि एकूणच खूप अफगाणी कौतुकाची पोस्ट टाकली होती मी फेसबुकवर. त्यावर खूप जणांनी "भारताच्या टीमबद्दल लिहा, त्यांनाही सपोर्ट करा" वगैरे म्हंटलं बरं का, पण माझं असं झालं की आपल्या टीमबद्दल किती लिहू आणि किती नको! त्याऐवजी फक्त बदामच टाकते असं म्हणून मी या लेखाखाली ता.क. लिहिला. त्याचा इकडे काही रेलेव्हन्स नाही. तो काढून टाकायला विसरले -- सॉरी! Happy

Thanks for your whole article. So positive and yesss emotional too that i could not stop my tears.
Keep sharing dear

Pages