मालवणी गोळ्याची आमटी

Submitted by दाद on 4 September, 2012 - 01:11
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

साहित्य गोळे -
बारिक चिरलेला कांदा २ वाट्या,
बारिक चिरलेली कोथिंबीर १ वाटी,
जिरे-धण्याची पूड १ च चमचा,
एखादी गरम मसालापूड (अगदी थोडी), चवीला हळद, तिखट, मीठ,
बेसन अंदाजे तीन-चार वाट्या
साहित्य आमटी -
वाटप - (ओल खोबरं ३ वाट्या, थोडा कच्चा कांदा - २ टे चमचे, मिरी १०-१२ दाणे, धणे १.५ टे चमचा) - अगदी बाsssरिक वाटायचं.
चिंचेचा कोळ, थोडा चिरलेला कांदा फोडणीत - २ टे चमचे,
तेल १ टे चमचा

क्रमवार पाककृती: 

कृती -
बेसन सोडल्यास गोळ्याचं साहित्यं सगळं नीट एकत्र करायचं. मग त्यात बेसन आणि पाणी घालत पीठ भिजवायचं. भज्याच्या पीठापेक्षा घट्टं हवं. अगदी वळता येतील इतकही घट्टं नको. हाताने गोळे सोडता यायला हवेत.
आमटीसाठी भांडं उभट घ्यावं. म्हणजे गोळ्यांना शिजायला पाण्याची उंची मिळते.
थोड्या तेलावर कांदा टाकायचा आणि किंचित मऊ झाल्यावर पाणी ओतावं. छोट्या लिंबाएव्हढे गोळे (सगळ्या पिठाचे) त्यात एकमेकांशी खूप लगट न करता शिजतील इतकं पाणी हवं. त्यातच हळद, चवीला - चिंचेचा कोळ, मीठ आणि तिखट घालावं.
पाणी खळखळून उकळायला लागलं की, हाताने गोळे पाण्यात सोडावेत. ते शिजले की तरंगायला लागतात. सगळे गोळे शक्यतो लवकरात लवकर सोडावेत म्हणजे एकसम शिजतात. गॅस दणदणीत हवा. पाण्याचं तापमान कमी झाल्यास गोळे विरघळतात. त्यामुळे सगळे गोळे सोडेपर्यंत आणि शिजेपर्यत असेल इतकं भरपूर पाणी सुरुवातीपासून हवं.
गोळे शिजले की, त्यातलच थोडं उकळतं पाणी घेऊन वाटपात घालून गॅस कमी न करताच वाटप ह्या उकडहंडीत घालायचं. वाटप खूप थंड झालं असेल तर गोळे विरघळण्याची शक्यता असते.
किंवा मायक्रोवेव्हमधे वाटप किंचित गरम करून घ्यावं (शिजवून नव्हे) वाटप लावल्यावर गोळे फुटणार नाहीत असं हलकं ढ्वळत रहावं म्हणजे वाटप शिजेल पण फुटणार नाही.
जिरेसाळीचा, आंबेमोहराचा, बासमती असा वासाचा गरम गरम भात अन त्यावर आमटी. किंचित तूप घातलेलंही मस्तं लागतं.

वाढणी/प्रमाण: 
४ माणसांना भरपूर
अधिक टिपा: 

१. गोळ्याची आमटी (किंवा कोणतीही कच्च्या वाटपाची आमटी) हा सगळ्यात जेवणात शेवटी करायचा पदार्थं आहे. कारण तो पुन्हा पुन्हा गरम केला की... गोळे विरघळतात, वाटप फुटतं... चवही बदलते इ. इ. आमटीत वाटप पडलं की एकीकडे ताटं घ्यायची.
२. गोळ्यांचं पीठ खूप आधी भिजवून ठेवलं तर त्यातल्या कांद्याला पाणी सुटतं आणि पीठ पातळ होतं. हरकत नाही... बेसन घालून सारखं करायचं. शक्यतो खूप आधी भिजवूच नये.
३. आवडत असेल तर गोळ्यांच्या पिठात १/२ च. चमचा आलं-लसूण पेस्ट घालावी.
४. कोकणात रसाचा म्हणून नारळ मिळतो. तो वापरला तर छान रसाची आमटी. पण घरात असलेल्या खोबर्‍याला चांगला रस नसेल तर मी व्यवस्थितपणे नेस्ले ची नारळाच्या रसाची पावडर मिळते, त्याचा थोडा रस घालते. कॅनमधल्या नारळाच्या दुधाला एक विचित्रं वास असतो असा माझा समज आहे आणि तो अजूनही गेलेला नाही (समज)
५. मी गोळ्याचं पीठ भिजवलेलं भांडं अगदी थोड्या पाण्याने धुवून(??) ते बेसनाचं पाणी वाटपात टाकते, जेणेकरून वाटप लावल्यावर ते फुटायची भिती कमी.
६. ही आमटी पुन्हा पुन्हा गरम केली की आटत जाते. पाणी घालून वाढवावी तर गोळे विरघळतात... चव बदलते. तेव्हा, ताजी ताजी करावी अन मटकावून मोकळं व्हावं झालं.
७. ह्याला किंचित आंबट, तिखट अन रसाचा गोडपणा असल्याने मी शक्यतो ह्याच्याबरोबर साधी उसळ करते. दुसरी रसाची किंवा टोमॅटो वगैरे असलेली भाजी, किंवा आंबट कोशिंबीर टाळते, इतकच.
८. ह्या आमटीबरोबर पुर्‍यांपेक्षा साधी पोळी जास्तं चांगली.

माहितीचा स्रोत: 
माझी खास मालवणी आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच! तोंपसु. आजीच्या हातच्या या आमटीची आठवण झाली.
अनायसे बाहेर दणदणैत पाउस पडतोय. (असाच पडत राहीला तर आज रात्री जेवायला माहेरीच जावे का :गहन विचार करणारी बाहुली: ????)

कॅनमधल्या नारळाच्या दुधाला एक विचित्रं वास असतो असा माझा समज आहे आणि तो अजूनही गेलेला नाही (समज) >>>> हा हा हा हा

दाद, आमच्या मालवणच्या घरी, अशी आमटी बाजारातून आणलेल्या कांदा भजीची करत असत.
आणि ते अगदी बारीक वाटण वगैरे, काकीची खासियत असायची. त्या घरी नारळाचे वाटण न घातलेला पदार्थ
असा नसेच !

फोटू? पुढल्या खेपेक केलय का काढतय हा.
सतिश<<पण याला काहीतरी वेगळे नाव आहे ना>>, आमी ह्याका गोळ्याची आमटीच म्हणतंव. तुमका काय दुसरी नावा ठेऊची असत ती ठ्येवा बापडी Happy
नाही हो... मला दुसरं नाव ठाऊक नाही.

>>, आमी ह्याका गोळ्याची आमटीच म्हणतंव>> हेच नाव आहे.. गुळूयेची / गुळयेची आमटी..:)
आज अंगारिकेमुळे वेगळा मेनु असणार.. म्हणुन उद्या नक्की खाणार..

मस्तच!! Happy
>>गुळयेची आमटी >> होय होय तीच ती.. हाली बरेच दिवसात केली नाय.. आता करुक होयी. Happy

>अगदी बाsssरिक वाटायचं.>> अगदी गंधासारख्या मा Happy

जिरेसाळीचा, आंबेमोहराचा, बासमती असा वासाचा गरम गरम भात अन त्यावर आमटी. किंचित तूप घातलेलंही मस्तं लागतं.

बरोबर अगदि. पोळी पेक्शा गरम गर्म भात् च छान लाग्तो. आम्हि हि आमटी बनवतो पन वाट्ण नाहि टाकत. आता टाकुन ब न् वेन.थन्क्स दाद

मला प्र चं ड आवडतो हा प्रकार.
मी गोळ्यांमध्ये बारीक चिरलेली हि. मिरचीपण घालते. गरम गर्म गोळा फोडून खाताना मध्ये दाताखाली मिरची आली की अगदी मस्त चव येते गोळ्याची. Happy

भ्रमा...
कालच खाल्लंय...>>>... काल तुझ्या कडे 'मोरी' होती मां रे???...
Proud

माझी आई पण छान करते हि आमटी. या आमटी बरोबर ती उकड्या तांदळाचा भात करायची हमखास.
दाद जुने दिवस आठवले या रेसिपीने. मी पण करते ही आमटी बरेचदा पण आता ज्यांच्या बरोबर हा बेत करुन हाणयचो ती माहेरची माणसंच नाही राहिली हयात .... आमटी केली कि बाकिचे अगदी ओर्पुन जेवतात पण मला जाम आठवण येते आईच्या आमटीची आणि आम्ही दोघा भावंडानी आडवा हात मारलेल्याची.

Attach recipe try keli.mast zali aahe golyanchi aamati!dil khush ho gaya!
Mi watapat thoda goda masala aani thoda gul ghatla ukaltana.khup chan lagtey aamati.Gole pan chan zalet.tumhi dilelya sarv tips khup upyogi aahet.Thank you!