विपुतल्या रेसिप्या ८ - पेंडपाला

Submitted by मेधा on 13 May, 2019 - 15:53
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ वाटी तूरडाळ स्वच्छ धूवून १०-१५ मिनीटे तेवढ्याच पाण्यात भिजवून
फोडणी साठी मोहरी, जीरे, भरपूर लसूण, हिंग, हळद, कडीपत्ता, तिखट, मीठ
दाण्याचे कूट
भरपूर कोथींबीर

क्रमवार पाककृती: 

ही कृती अंजलीने माझ्या विपूत लिहिली होती कोणे एक काळी. मायबोलीवरच्या रेसिप्या घरी शोधणे म्हणजे दिव्य आहे. लॅपटॉप शोधून कनेक्ट करणे एवढा वेळ नसतो . आय फोन किंवा आयपॅड वर मराठी टाइप करुन शोधणे जमत नाही. ट्राय केलेल्या, आवडलेल्या रेसिपीज छापून ठेवाव्या असा संकल्प करुन य वर्षं झाली . ही माझ्या(च) विपुत असल्याने शोधणे मला त्यातल्यात्यात सोपे. पण सर्च मधे सापडत नाही म्हणून हा प्रपंच.
----------------------------------
मायबोलीवर बहुतेक नाहीये पण पूर्वी वाहत्या धाग्यावर टाकली होती. १ वाटी तूरडाळ स्वच्छ धूवून १०-१५ मिनीटे तेवढ्याच पाण्यात भिजवून ठेव. कुकरला १ किंवा २ शिट्टी होउन शिजवून घे. डाळीचे दाणे इनटॅक्ट हवेत पण तूरडाळ शिजली गेली पाहिजे. थोड्या जास्त तेलावर फोडणी कर, मोहरी, जीरे, भरपूर लसूण, हिंग, हळद, कडीपत्ता परतून त्यावर डाळ घाल. चांगले परतून तिखट मीठ घालून एक वाफ आली की दाण्याचे कूट घाल. झाकून ठेव, पाच मिनीटांनी गॅस बंद कर. वरून भरपूर कोथींबीर घाल. आमच्याकडे पेंडपाला कढी, मिरचीचा कुट्टा किंवा दाण्याची चटणी असा बेत असतो.
मला इतक्यातच २-३ जणींनी ही रेसेपी मायबोलीवर विचारली होती. आता एक धागा काढून लिहीते.

---------------
मी तूरडाळ थोडी हळद + हिंग घालून शिजवते.
तिखट क्वचितच घालते, तेही अगदी थोड्या प्रमाणात.
इथे लसणीच्या पाकळ्या एकदम मोठ्या, जाड जूड असतात. त्या बारीक चिरुन घालते. क्वचित बारक्या पाकळ्या असल्या तर त्या जराशा ठेचून फोडणीत घालते.
कोथिंबीर असली तर घालते , पण त्यावाचून अडत नाही.

वाढणी/प्रमाण: 
३-४ जणांसाठी
माहितीचा स्रोत: 
अंजली
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इंटरेस्टिंग!
मला नावावरुन काही तरी हिरव्या भाज्या घालून असेल असं वाटलेलं. बघतो करुन.

करुन बघायला हवी.
डाळकांदा रेसिपी किती वेगळी असते ह्यापेक्षा?

आमच्याकडे हा प्रकार "आतल्या फोडणीची डाळ" म्हणून केला जातो म्हणजे तुर डाळ भिजवुन ठेवायची मग वर सान्गितलेली फोडणी करुन त्यात टाकून परतायची , उकळीचे पाणी घालून शिजवायची ( मायनस कान्दा आणी दाण्याचा कूट) कोथिबिर कढिपत्ता मस्ट वैगरे

डाळीची कृती चांगली वाटतेय, चविष्ट असावी असे वाटतेय.

पण ह्याला पेंडपाला नाव का पडले? यात पेंडही नाही व पालाही नाही.

पण ह्याला पेंडपाला नाव का पडले? यात पेंडही नाही व पालाही नाही.>>>> कोणजाणे. आमच्याकडे पेंडपाला म्हणूनच माहित आहे हा पदार्थ.
डाळकांदा वेगळा. पेंडपाल्यात कांदा नसतो. नुसता लसूण घालतात. कधी कधी गवार, पडवळ घालूनही करतात. बरोबर कढी असलीच पाहिजे. कोरडा होतो म्हणून असेल. खरंतर कढी- पेंडपाला असंच नाव आहे पदार्थाला.

छान आहे रेसेपी. मी बर्‍याच वर्षापूर्वी साप्ताहीक सकाळ मध्ये वाचली होती. त्यात ही कृती सेम होती, पण यात घरात ज्या पालेभाज्या उरतात ना, जसे पालक, मेथी वगैरे त्या यात शिजवुन लसणाची फोडणी घालायची हे वाचले होते. ही कृती सोलापूरकडील आहे हा पण त्यात उल्लेख होता.