उरी चित्रपटाच्या निमित्ताने

Submitted by योग on 30 January, 2019 - 11:50

'उरी सर्जिकल स्ट्राईक' हा चित्रपट ईथे लंडन मध्ये पाहण्याचा योग आला. ते देखिल २६ जानेवारीला मित्र परिवारा समवेत. चित्रपट पाहून अर्थातच काही दिवस हँग ओव्हर (भारावलेलेपणा) होताच. चित्रपट आवडलाच पण त्या निमित्ताने अनेक गोष्टी लक्षात आल्या व अनेक प्रश्ण ऊत्तरांची मनात पुन्हा नव्याने गर्दी जमली. चित्रपट मूल्ये, चित्रीकरण, अभिनय, पटकथा ई. सर्व अतीशय ऊत्तम वाटलेच. किंबहुना बॉर्डर, LOC या आधी येऊन गेलेल्या मसालेपटांपेक्षा हा चित्रपट नक्कीच फारच ऊजवा ठरतो. पण चित्रपट परिक्षण, राजकीय संदर्भ, ई. बद्दल चर्चा करण्यापेक्षा उरी च्या निमित्ताने जे अनुभवले व जाणवले ते लिहून, ईतरांना देखिल तसेच काही वाटले असेल का हे जाणून घेण्या साठी हा प्रपंच.

मुळात भारता बाहेर अनेक वर्षे राहिले की भारत, मातृभूमी ई. बद्दलची ओढ, आस्था, आदर, अभिमान वगैरे जरा कणभर जास्तच असतो. (भारतात गेल्यावर मात्र अनेक दुरावस्था पाहून आपण नाके मुरडतो तो भाग वेगळा). त्यातही उरी सारख्या काळजाला हात घालणार्‍या घटनेमूळे व त्यानंतर थेट पाक व्याप्त काश्मिर मध्ये 'घुसून' त्याला चोख प्रत्त्युत्तर देण्याची कारवाई केलेल्या आपल्या सैन्य व सरकारी यंत्रणेच्या बातम्या, कथा, ई. ऐकल्यावर हा चित्रपट पाहिल्यावर आत साठलेला असा कणभर जास्त देशाभिमान वे देशप्रेम हे ऊकळ्या फुटून बाहेर न पडते तरच नवल. पण यात मी एकटा नव्हतो हे नक्की. कारण चित्रपटाच्या क्लायमॅक्स्ला संपूर्ण चित्रपट गृहात वाजणार्‍या ऊस्फूर्त टाळ्या, जल्लोश, जय हिंद च्या घोषणा याची साक्ष होत्या. त्याही पुढे श्रेय नमावाली व शेवटचे गीत सुरू असताना चित्रपटग्रुहात आवर्जून थांबलेले प्रेक्षक पाहता एक नक्की जाणवले की चित्रपटाच्या विषयाने नक्कीच खोलवर परिणाम केला आहे. चित्रपट सुरू असताना देखिल प्रेक्षागृहात स्पष्ट जाणवलेली स्तब्धता, ऊत्कटता, राग, जल्लोष, दु:ख्ख या सर्व भावना याची साक्ष देतात.

अशा प्रकारचा चित्रपट समोर येणे आवश्यक होते. अक्षरशः जान हथेली वर घेऊन रोज कामावर जाणार्‍या आपल्या तरूण जवानांकडे पाहिले की तुमच्या आमच्या दैनंदीन सुख समाधानासाठी स्वताच्या शाश्वत व सुखी आयुष्याचा त्याग केलेल्या या आपल्या बांधवांकडे पाहून नतमस्तक व्हायला होते. खेरीज भारतीय लष्कर, व सैन्य हे जगातील ईतर कुठल्याही बलाढ्य सत्तेपेक्षा अजीबात कमी नाही हा विश्वास बळावतो. खेरीज राजकारणाचा कितीही धुरळा ऊडो, कुणिही कितीही दिशाभूल करो, सैन्यात धार्मिक व ईतर फूट पाडल्याच्या वल्गना करोत, वा भ्रष्टाचाराचे आरोप करोत. त्या सर्व धुरळ्यात मात्र आपले जवान, सैन्य, व एकूणात लष्कर हे आप्ल्या देशाच्या सुरक्षेसाठी सुसज्ज आहे, एकजूट आहे हा संदेश दिला जातो, जो एक सामान्य माणसा करीता मोलाचा आहे. सरकार कुणाचेही असो, मात्र अशा प्रकारच्या अत्यंत धोकादायक पण अतीशय गरजेच्या ठोस कारवाईस संमती देउन, सहकार्य करणे व आपले सैन्य व जवान यांचा आत्मविश्वास व कर्तबगारी वाढवण्यास पाठींबा देणे या साठी त्यांचे अभिनंदन करावेच लागेल. ईतकी वर्षे ऊघडपणे अतीरेक्यांना पाठींबा देऊन भारतात घुसखोरी करायला मदत करणे, सीमारेषे नजिक भारतीय नागरीक व सैन्य यांचेवर गोळीबार करणे, या असल्या कारवाया करणार्‍या पाकीस्तानी सत्ता व सैन्यास या कारवाई मार्फत थेट ऊत्तर देणे ही आपल्या सैनिकी कारवाई च्या इतीहासात एक नक्कीच मोठी महत्वपूर्ण घटना आहे. राष्ट्रवाद हा नुसता झेंडा वंदनातून, वा राष्ट्रगीत गाण्यातून सिध्ध होत नसतो (त्यावर देखिल काही बुध्धीभ्रष्ट लोक आक्षेप घेत असतात.), तर स्वताचे सैन्य, नागरीक, व जनता यांच्या जीवावर ऊठलेल्या प्रत्त्येक परकीय आक्रमकाला सडेतोड ऊत्तर देऊन तो कायम जिवंत ठेवावा लागतो. तरिही अशा घटनांचे पुरावे व स्पष्टीकरण आपल्या सैन्य व सरकारकडे मागणारे कपाळ करंटे लोकही आपल्याच देशात पहायला मिळाले हे पाहून दु:ख्ख व संतापही होतो. फुकट मिळालेल्या स्वातंत्र्य व सुरक्षेच्या पंचपक्वांन्नावर समाधानाचे ढेकर देऊन दुसरीकडे मात्र नक्षलवादी, माओवादी, ई. अंतर्गत अतीरेक्यांच्या मानवी हक्काच्या वा कधी ईनटॉलरंस च्या नावाने ऊर पिटणार्‍या अशा नालायक ढेकळांचा थयथयाट पाहिल्यावर मात्र अनेक प्रश्ण मनात निर्माण होतात. आजही स्वातंत्र्य ऊपभोयाची किंमत काय हे जाणून घ्यायचे असेल तर काही काळ अरबी, आफ्रिकी, आणि ईतर कंगाल देशातून राहून पहावे.

आपल्या आधीच्या पिढीच्या स्वातंत्र्य संघर्षाच्या बळावार आपल्या पिढीला स्वातंत्र्य अनुभवता व ऊपभोगता आले. मात्र ते आप्ल्या पुढील पिढीस अधिक संपूर्णपणे व सुंदरपणे ऊपभोगास द्यायचे असल्यास ते स्वातंत्र्य आपल्याला कायम जपावे लागेल, त्याची मूळे अधिक घट्ट करावी लागतील. त्यासाठी राष्ट्रप्रेम, राष्ट्र भावना यांना खतपाणी घालावे लागेल. मिळवणे जितके कठीण त्यापेक्षा कठीण ते जतन करणे आहे व त्याही पेक्षा कठीण त्याचे संवर्धन आहे.

दुर्दैवाने आमच्या पिढीच्या डोळ्यासमोर निव्वळ 'लोकप्रीय' आदर्श नाचवले गेले. रातोरात श्रीमंतीची व प्रसिध्धीची स्वप्ने दाखवणार्‍या फुटकळ धंदेवाईक कार्यक्रमातून आमची दिशाभूल केली गेली. दुसर्‍याला सेवा देण्यापेक्षा, स्वता:च्या तुंबड्या भरून घेण्याचे मार्ग कुठले याचे प्रशीक्षण देणारे अभ्यासक्रम व संस्थाचे पेव फुटले. चिल्लर चोर्‍या, मार्‍यामार्‍या, राडा, यातून जन्माला आलेला वार्डाचा नगरसेवक पुढे मंत्री देखिल होवू शकतो याची जिवंत ऊदाहरणे डोळ्यापूढे पहावी लागली. आरक्षण च्या बळावर ज्या घटकाला फायदा होणे अपेक्षित होते तो मागेच पडला मात्र अक्षरधः अपात्री, अकुशल आणि नालायक वर्गाच्या हाती मात्र अधिकार आले. मी आणि माझे या दोन शब्दात आमचे स्वातंत्र्य ऊपभोग व संवर्धन संपले. आणि मग या संकुचीत कोशाला हादरवणार्‍या घटना घडल्या की मेणबत्त्या पेटवून आपली जबाबदारी पार पाडण्याचे मार्ग आम्हाला ऊपलब्ध झाले. आता तर मेणबत्त्या देखिल फोन मधून पाठवणे ईथवर सोपे झाले आहे. या सर्वावर कळस म्हणजे अतीशय ऊच्चशिक्षीत, धुरंदर, व धोरणी व्यक्तीमत्वांचा सुळसुळाट असलेल्या या देशाला अजूनही निर्बुध्ध व नाकर्त्या कुटूंबांच्या (अनेक आहेत) लांगूलचालनातून तयार होणार्‍या होणार्‍या विरोधी पक्षांच्या कडबोळ्या खेरीज दुसरा पर्याय दिसत नाही. कुठेतरी काहीतरी चुकतय?

उरी च्या निमित्ताने पुन्हा एकदा काही उपाय समोर आले.
१. शाळांतून सैनिकी प्रशीक्षण सक्तीचे करायलाच हवे. शिस्त, एकजूट, राष्ट्र भावना, सांघिक कार्य या सर्वाची बीजे ही नेमकी शालेय वयात पेरली तर निश्चीतच जास्ती खोलवर रूजतील.
२. २५ ते ४० अशा वयोगटातील प्रत्येक नागरीकाला एक वर्ष सैन्य सेवा (प्रत्यक्ष रणांगणात नव्हे) सक्तीची असावी.
३. जमेल तसे एखादी तरी सहल मित्र परिवार, नातेवाईक यांचे बरोबर एखाद्या सैन्य स्थळाच्या ठिकाणी करावी.
४. देश्/राष्ट्र प्रथम मग बाकी सर्व. हा नियम स्वतापुरता घालून घ्यावा. खेरीज जिथे जिथे या नियमाची पायमल्ली करणारे लोक दिसतील तिथे अशा लोकांना मुळीच पाठींबा देऊ नये.
५. धर्म, जात या अशा वेळ व शक्ती व्यर्थ घालणार्‍या विषयांबद्दल कुठल्याही चर्चेस खतपाणी घालू नये. जिथे जिथे या विषयाला धरून संवाद व काम होत असेल तिथे सहभाग टाळणे.
६. आपला परिसर, आपला समाज किमान आपले शहर कसे अधिक सुरक्षीत, स्चच्छ व सुंदर होईल या साठी जमेल तसे विधायक कार्य करणे. म्हणजे नुसते मी कचरा करत नाही ईथवर थांबण्यापेक्षा, पुढे अधिक काही करता येईल का वैयक्तीक वा सामूहीक तत्वावर यासाठी प्रयत्न करणे.
७. बाबा, बुवा, महाराज या असल्या फालतू लोकांना वा समुदायांना महत्व देणे वा त्यांच्या आधीन होणे थांबवून संस्कार, कर्तव्य, मेहेनत या मूल्यांवर आधारीत जीवन जगणे. त्यातून जे मिळेल त्यावर समाधान मानणे आणि आपल्या पुढील पिढी पुढे तोच आदर्श ठेवणे.
८. निव्वळ ऊपभोगा पेक्षा, निर्मिती चा हव्यास धरणे. आर्थिक समृध्धी व संपन्नतेचा हा मुख्य पाया आहे. आपल्या पुढील पिढीस त्या करता प्रवृत्त करणे, मदत करणे.

"हे राज्य व्हावे ही तो श्रींची ईच्छा.." इथून ते "स्वराज्य हा माझा जन्मसिध्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच... पासून ते आता "स्वातंत्र्य ऊपभोगणे हा माझा अधिकार आहे " ईथवर आमचा प्रवास झाला आहे.

उरी च्या निमित्ताने पुन्हा एकदा अधिकारां बरोबरच कर्तव्यांची देखिल जाणीव झाली/होणे आवश्यक आहे असे वाटले. स्वातंत्र्य हा अधिकार नसून सुविधा आहे, आणि ते ऊपभोगण्याची, जतन व संवर्धन करण्याची किंमत आपाल्या व पुढील पिढीला देणे आवश्यक आहे.

जाता जाता: प्रत्येक भारतीयाने (भारतातील व भारता बाहेरील) व योग्य वयात आलेल्या मुला मुलांनी हा चित्रपट आवर्जून पहायलाच हवा.

जय हिंद!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>ईथे कृ. भाजप, कॉ. ई. राजकारणी प्रतिक्रीया देणे व वाद करणे शक्य तो टाळावे.
धन्स!>> तसे झाले असते तर माबो वरचे बरेच धागे "पेटले" नसते हो.. असो.. तुम्ही विषयच असा घेतला आहे कि इथे दंगे होण्याची शक्यताच जास्त! त्यामुळे शुभेच्छा..
तुम्ही सुचविलेले ८ उपाय आवडले. आमच्या वेळी शाळेत एन सी सी, आर एस पी सारखे उपक्रम होते आणि त्यातुन अगदी सैनिकी नाही तरी शिस्तीचे, संघभावनेचे धडे मिळायचे (किंवा तसे अपेक्षित तरी होते). आतही ते उपक्रम आहेत का माहिती नाही.

आपला तडाखेबंद सिनेपरिचय वाचला. मीही सिनेमाचा आनंद घेतला. काही उणी काढायची म्हणून नाही पण एक निवृत्त सैनिक म्हणून काही वाटले...
१. अजीत डोबाल आपल्या भावनांचा राग हातातल्या मोबाईलवर काढून हातातल्याची मान मुरगाळून पुढचा काढ असे हेल्परला म्हणून पाहताना त्या व्हिलनच्या अँटिक्स वाटतात.
२. नर्स बनून आलेल्या सिव्हिलियन स्पाय व्यक्तीने ऑर्मी हेडक्वार्टर मधील ऑप्स रूममध्ये चीफना ब्रिफींग देण्यात सिनेमॅटिक लिबर्टी म्हणून मानून देखील खटकते. बाकीचे सगळे खरे मानायचे तर मग इथेच काल्पनिकता का?
३. करपट ढेकरा देताना नवाझ शरीफ यांच्या रुपाने राकेश बेदी यांनी थोडी निंदा केली आहे. पण नवाज खवैय्या म्हणून होतेच. कामाच्या पेक्षा खाण्यासाठी त्यांचे लक्ष असे. म्हणतात कराचीत एका बिझीनेस, इंडस्ट्रीतील महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी कॉन्फरन्स संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, कॉन्फरन्स अच्छी रही मगर ब्रेकफास्ट जरा खराब था!

मी चित्रपट पाहिलेला नाही , संधी मिळेल तेव्हा पाहणार आहेच.

आपल्या आर्मीवर, सैनिकांच्या शौर्यावर चित्रपट बनवला गेला, तो १०० कोटीच्या पुढे गेला, लोकांनी आवर्जून बघितला याचा आनंद वाटतो.

अजीत डोबाल आपल्या भावनांचा राग हातातल्या मोबाईलवर काढून हातातल्याची मान मुरगाळून पुढचा काढ असे हेल्परला म्हणून पाहताना त्या व्हिलनच्या अँटिक्स वाटतात.>>● ते राग नाही काढत, गोष्टी गुप्त राहाव्यात म्हणून घेतलेली खबरदारी असते

अशा प्रकारचा चित्रपट समोर येणे आवश्यक होते. अक्षरशः जान हथेली वर घेऊन रोज कामावर जाणार्‍या आपल्या तरूण जवानांकडे पाहिले की तुमच्या आमच्या दैनंदीन सुख समाधानासाठी स्वताच्या शाश्वत व सुखी आयुष्याचा त्याग केलेल्या या आपल्या बांधवांकडे पाहून नतमस्तक व्हायला होते. खेरीज भारतीय लष्कर, व सैन्य हे जगातील ईतर कुठल्याही बलाढ्य सत्तेपेक्षा अजीबात कमी नाही हा विश्वास बळावतो. खेरीज राजकारणाचा कितीही धुरळा ऊडो, कुणिही कितीही दिशाभूल करो, सैन्यात धार्मिक व ईतर फूट पाडल्याच्या वल्गना करोत, वा भ्रष्टाचाराचे आरोप करोत. त्या सर्व धुरळ्यात मात्र आपले जवान, सैन्य, व एकूणात लष्कर हे आप्ल्या देशाच्या सुरक्षेसाठी सुसज्ज आहे, एकजूट आहे हा संदेश दिला जातो, जो एक सामान्य माणसा करीता मोलाचा आहे. सरकार कुणाचेही असो, मात्र अशा प्रकारच्या अत्यंत धोकादायक पण अतीशय गरजेच्या ठोस कारवाईस संमती देउन, सहकार्य करणे व आपले सैन्य व जवान यांचा आत्मविश्वास व कर्तबगारी वाढवण्यास पाठींबा देणे या साठी त्यांचे अभिनंदन करावेच लागेल. ईतकी वर्षे ऊघडपणे अतीरेक्यांना पाठींबा देऊन भारतात घुसखोरी करायला मदत करणे, सीमारेषे नजिक भारतीय नागरीक व सैन्य यांचेवर गोळीबार करणे, या असल्या कारवाया करणार्‍या पाकीस्तानी सत्ता व सैन्यास या कारवाई मार्फत थेट ऊत्तर देणे ही आपल्या सैनिकी कारवाई च्या इतीहासात एक नक्कीच मोठी महत्वपूर्ण घटना आहे. राष्ट्रवाद हा नुसता झेंडा वंदनातून, वा राष्ट्रगीत गाण्यातून सिध्ध होत नसतो (त्यावर देखिल काही बुध्धीभ्रष्ट लोक आक्षेप घेत असतात.), तर स्वताचे सैन्य, नागरीक, व जनता यांच्या जीवावर ऊठलेल्या प्रत्त्येक परकीय आक्रमकाला सडेतोड ऊत्तर देऊन तो कायम जिवंत ठेवावा लागतो. तरिही अशा घटनांचे पुरावे व स्पष्टीकरण आपल्या सैन्य व सरकारकडे मागणारे कपाळ करंटे लोकही आपल्याच देशात पहायला मिळाले हे पाहून दु:ख्ख व संतापही होतो. फुकट मिळालेल्या स्वातंत्र्य व सुरक्षेच्या पंचपक्वांन्नावर समाधानाचे ढेकर देऊन दुसरीकडे मात्र नक्षलवादी, माओवादी, ई. अंतर्गत अतीरेक्यांच्या मानवी हक्काच्या वा कधी ईनटॉलरंस च्या नावाने ऊर पिटणार्‍या अशा नालायक ढेकळांचा थयथयाट पाहिल्यावर मात्र अनेक प्रश्ण मनात निर्माण होतात. आजही स्वातंत्र्य ऊपभोयाची किंमत काय हे जाणून घ्यायचे असेल तर काही काळ अरबी, आफ्रिकी, आणि ईतर कंगाल देशातून राहून पहावे.>>>>>>>>> हा अख्खा पॅराच अतीशय महत्वाचा आहे. जबरदस्त !!

ते राग नाही काढत, गोष्टी गुप्त राहाव्यात म्हणून घेतलेली खबरदारी असते
त्यासाठी सिमकार्ड नष्ट करणे गरजेचे आहे. बिचाऱ्या हँडसेटला मुरगाळून आत कार्ड ठेवले आहे असे झाले तर ते काय म्हणायचे?

त्यासाठी सिमकार्ड नष्ट करणे गरजेचे आहे. बिचाऱ्या हँडसेटला मुरगाळून आत कार्ड ठेवले आहे असे झाले तर ते काय म्हणायचे?>>>> मोबाईल आणि सिमकार्ड दोन्ही नष्ट करत असतील, प्रत्येक गोष्ट डिटेल मध्ये ते दाखवणार नाहीत ना. आणि तसंही मोबाईल नष्ट करणे जरा हटके वाटते म्हणून दाखवला असेल मोबाईल तोडताना, माझा सांगायचा मुद्दा हा आहे की ते राग नाहीत काढत कारण मला आठवतंय त्यानी शेवटच्या आनंदाच्या क्षणी सुध्दा मोबाईल तोडलाय.

ते राग नाही काढत, गोष्टी गुप्त राहाव्यात म्हणून घेतलेली खबरदारी असते>>>
मग असं असेल तर पंप्र, आणि इतरांना सुद्धा असेच ५०-१०० मोबाईल घेउन फिरावं लागेल, सिक्युर एन्क्रिप्टेड नावाचा काही प्रकार नाहिये का?

गोष्टी जोपर्यंत आपल्या मनात असतात तोपर्यंत त्या गुप्त असतात एकदा का तुमच्या तोंडातून त्या बाहेर पडल्या की वाऱ्यासोबत कुठेही जाऊ शकतात, बंद खोलीत एकटे असाल तर भिंती पण ऐकतात, मोबाइल खूप लांबची गोष्ट आहे.

<<सिक्युर एन्क्रिप्टेड नावाचा काही प्रकार नाहिये का?>>

चित्रपटासाठी थोडे फार असे प्रकार करावे लागतात.

>>आमच्या वेळी शाळेत एन सी सी, आर एस पी सारखे उपक्रम होते आणि त्यातुन अगदी सैनिकी नाही तरी शिस्तीचे, संघभावनेचे धडे मिळायचे (किंवा तसे अपेक्षित तरी होते). आतही ते उपक्रम आहेत का माहिती नाही.
हो नक्कीच!.. आमच्याही वेळी होते.. शिस्त व संघभावना व राष्ट्र भावना ही रा.स.स. च्या शाखेतून देखिल मिळत असे.

शाळेत सैन्य शिक्षणाचा सर्वात मोठा तोटा म्हणजे जे तरुण बाहेर पडतात ते मिलिट्री प्रशिक्षित असतील. जर त्यांना पुढील आयुष्यात योग्य संधी मिळाली नाही तर ते बेरोजगार राहतील आणि गुंडगिरी करतील. जर बंदुका चालवण्याचे शिक्षण मिळाले तर फारच वाईट!!

१. शाळांतून सैनिकी प्रशीक्षण सक्तीचे
- भारतासारख्या देशाला अधिकचा सैनिकी प्रशिक्षण खर्च परवडणार नाही. आहे त्याच बजेटमध्ये सैन्यासाठी बेसिक गोष्टींची तरतूद करतांना अनेक ठिकाणी कात्री लावावी लागते. सक्तीचे शिक्षण हे ज्या देशाकडे मनुष्यबळ कमी असते त्यांना अत्यंत गरजेचे असते. "ह्या लोकांना हंटरच पाहिजे" अशा मानसिकतेच्या लोकांना उठसूठ प्रत्येक सामाजिक प्रश्नावर सक्तीचे सैनिकी शिक्षण हाच उपाय दिसतो. (साहजिकच खर्च-बिर्च न करता प्रशिक्षण हवे असेल तर आरएसएसच्या शाखा आनंदाने हे प्रशिक्षणाचे -त्यानिमित्तने ब्रेनवॉशिंगचे - काम स्विकारतील.)

२. २५ ते ४० अशा वयोगटातील प्रत्येक नागरीकाला एक वर्ष सैन्य सेवा (प्रत्यक्ष रणांगणात नव्हे) सक्तीची असावी.
उत्तर वरीलप्रमाणेच. सोबत - प्रत्येक नागरिकाला एक कशाला चांगली दोन वर्षे शेतीत पुर्णवेळ मजूरी, दोन वर्षे गटारे साफ करणे, शहरातला कचरा उचलणे अशा कामांची सक्ती करायला हवी.

३. जमेल तसे एखादी तरी सहल मित्र परिवार, नातेवाईक यांचे बरोबर एखाद्या सैन्य स्थळाच्या ठिकाणी करावी.
- हा जिंगोइजमचा भाग झाला. सैन्यस्थळावर जाऊन चमकोगिरी करणे आणि सैन्याच्या अडचणी वाढवून ठेवण्याने अधिक काहि होणार नाही. हवेच असेल तर सैन्याचे म्युझियम्स आहेत भारतभर तिथे भेट द्यावी. परंतु तिथे मग टिपु सुलतान वगैरे लोकांना मानसन्मान दिला जातो हे पाहून रागावू नये. खरे तर वेगवेगळे शासकिय विभाग कसे काम करतात त्याठिकाणी सहली काढाव्या. म्हणजे आपल्या करांच्या पैशाचे नियोजन कसे होते, भ्रष्टाचार कसा होतो ते प्रत्यक्ष कळेल. डंपिंग ग्राउंड, शासकिय रुग्णालये, विविध सरकारी संस्था अशा ठिकाणी सहली काढल्या पाहिजे.

४. देश्/राष्ट्र प्रथम मग बाकी सर्व. हा नियम स्वतापुरता घालून घ्यावा. खेरीज जिथे जिथे या नियमाची पायमल्ली करणारे लोक दिसतील तिथे अशा लोकांना मुळीच पाठींबा देऊ नये.
-हा नियम संदिग्ध आहे. म्हणजे नेमके काय करणे अपेक्षित आहे? देश आणि राष्ट्र ह्या दोन वेगळ्या संकल्पना आहेत. देश म्हणजे देशातले सर्व प्रकारचे, सर्व जातीधर्माचे, विचारांचे लोक असतात, हे जीवंत लोक मिळून देश बनतो. बीफच्या संशयावरुन आपल्या फेलो देशवासीयांचा जीव घेणे म्हणजे देशप्रेम नव्हे. आपल्या राज्यघटनेची मूलभूत तत्त्वे पाळणे म्हणजे देशप्रेम.

५. धर्म, जात या अशा वेळ व शक्ती व्यर्थ घालणार्‍या विषयांबद्दल कुठल्याही चर्चेस खतपाणी घालू नये. जिथे जिथे या विषयाला धरून संवाद व काम होत असेल तिथे सहभाग टाळणे.
- सहमत.
६. आपला परिसर, आपला समाज किमान आपले शहर कसे अधिक सुरक्षीत, स्चच्छ व सुंदर होईल या साठी जमेल तसे विधायक कार्य करणे. म्हणजे नुसते मी कचरा करत नाही ईथवर थांबण्यापेक्षा, पुढे अधिक काही करता येईल का वैयक्तीक वा सामूहीक तत्वावर यासाठी प्रयत्न करणे.
- २ चे उत्तर बघा.
७. बाबा, बुवा, महाराज या असल्या फालतू लोकांना वा समुदायांना महत्व देणे वा त्यांच्या आधीन होणे थांबवून संस्कार, कर्तव्य, मेहेनत या मूल्यांवर आधारीत जीवन जगणे. त्यातून जे मिळेल त्यावर समाधान मानणे आणि आपल्या पुढील पिढी पुढे तोच आदर्श ठेवणे.
- हे जगण्याचे तत्त्वज्ञानाबद्दल प्रीचींग झाले, ह्यात देशाचा देशप्रेमाचा काही संबंध नाही. प्रत्येकाचे स्वतःचे जीवन जगण्याचे तत्त्वज्ञान वेगवेगळे असू शकते

८. निव्वळ ऊपभोगा पेक्षा, निर्मिती चा हव्यास धरणे. आर्थिक समृध्धी व संपन्नतेचा हा मुख्य पाया आहे. आपल्या पुढील पिढीस त्या करता प्रवृत्त करणे, मदत करणे.
- सेम अ‍ॅज अबॉव.

सहल मित्र परिवार, नातेवाईक यांचे बरोबर एखाद्या सैन्य स्थळाच्या ठिकाणी करावी.
साधारणपणे दर वर्षी एक दिवस लोकांना नेव्हल शिप पहायला, हवाईदलाच्या तळावरील विमाने, आर्मी युनिट पहायला मुभा असते. शिवाय विशेष परवानगी काढून काही विशिष्ठ भाग सोडून तरुणांना भेट द्यायला शक्यता असते..

उरी पाहिला. चांगला आहे. मी काही लोकांच्या प्रतिक्रिया ऐकून / वाचून ज....रा माझा अपेक्षेचा स्तर उंचावून गेलो होतो बहुदा, वयाचा परिणाम असावा किंवा चित्रपट माध्यमाची समज कमी असावी पण बॉर्डर, एल ओ सी कारगिल वगैरे युद्धपट पहाताना किंवा अजूनही 'ए वतन, ए वतन, हमको तेरी कसम' वगैरे ऐकताना जे 'वाटतं', ते नाही'वाटलं'. इतकी अ‍ॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी असताना, मुळातच उरीसारख्या घटना घडायला नको होत्या असंही एकदा वाटून गेलं. पण ओव्हरऑल, चांगला सिनेमा आहे. निदान भाई पाहून जो वैताग आला होता, तसं काही झालं नाही.

>>पण बॉर्डर, एल ओ सी कारगिल वगैरे युद्धपट पहाताना किंवा अजूनही 'ए वतन, ए वतन, हमको तेरी कसम' वगैरे ऐकताना जे 'वाटतं', ते नाही'वाटलं'

ऊलट, वरील सर्व चित्रपटात Emotional Content हा खूपच जास्त होता.. किंबहुना मूळ घटनेपेक्षा भावनिक मुद्द्यांना हात घालून व नेहेमीचा फिल्मी मसाला ह्गालून हे चित्रपट आपल्या समोर आणले गेले. त्या पार्श्वभूमीवर म्हणूनच उरी जास्त अधिक परिणामकारक वाटला.
असो.
>>इतकी अ‍ॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी असताना, मुळातच उरीसारख्या घटना घडायला नको होत्या असंही एकदा वाटून गेलं.
तसं तर ९/११ कसं घडलं हे अजूनही अविश्वसनीय वाटते. Technology can't actually prevent, but works more as multi layered deterant and warning system. Uri (Millitants attack on our Troups ) had negligible interface with Technology as the attack and context and workings were quite manual nature. But since then our Military technology and tracking esp along LOC has been updated/upgraded to highest stds.
@ Sandip Dange
गटारे साफ करणे, कचरा साफ करणे ही कामे देखिल नागरीकांनी करायची हे दुसरे टोक झाले. मुळात सिस्टीम मधे ज्याला जे नेमून दिले आहे त्याने ते केले तर बरेच प्रश्ण सुटू शकतात किंवा निर्माण होत नाहीत.

>>"ह्या लोकांना हंटरच पाहिजे"
अजीबात नाही.. पण शिस्त, देशभावना, व सांघिक कार्य हे सर्व सैनिकी प्रशीक्षणातून अधिक योग्य प्रकारे मिळू शकते. ईथे 'मानसिक' प्रशीक्षणावर भर आहे नुसते लेफ्ट राईट परेड असे अभिप्रेत नाही.
असो.

ऊलट, वरील सर्व चित्रपटात Emotional Content हा खूपच जास्त होता.. किंबहुना मूळ घटनेपेक्षा भावनिक मुद्द्यांना हात घालून व नेहेमीचा फिल्मी मसाला ह्गालून हे चित्रपट आपल्या समोर आणले गेले. त्या पार्श्वभूमीवर म्हणूनच उरी जास्त अधिक परिणामकारक वाटला. >>> + १२३

emotional content जास्त असणं हा सिनेमाची कमतरता कशी काय होऊ शकेल? त्यासाठीच तर आपण सिनेमा, नाटक पहातो. हास्य, करूण वगैरे रस त्यात प्रामुख्यानं दाखवले जातात आणी ते पहायला प्रेक्षक जमतात. जसं खेळ बघताना जर त्यातला थरार जाणवणार नसेल, तर खेळ 'बघण्यात' काय हशील? तसंही प्रत्येकाच्या आवडी-निवडीचा प्रश्न आहेच आणी प्रत्येकाला कुठली भावना, किती सहन होते हे ही वैय्यक्तिक आहे, पण म्हणून, एखाद्या सिनेमात इमोशनल कंटेंट कमी होता, म्हणून तो सिनेमा उजवा होता हे अतार्किक वाटतं.

"इतकी अ‍ॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी असताना, मुळातच उरीसारख्या घटना घडायला नको होत्या असंही एकदा वाटून गेलं.
तसं तर ९/११ कसं घडलं हे अजूनही अविश्वसनीय वाटते." - वाटतंच ना. पण ९/११ घडलं, म्हणून उरी प्रकरण घडणं, नैसर्गिक / क्षम्य आहे असं तर नाही ना? मुळात उरी अविश्वसनीय घटना आहे असं मी म्हटलच नाही. घडायला नको होतं असं म्हटलय. ती घटना दुर्दैवी होती. ह्या विधानाशी असहमत असण्याचं काही कारण नसावं.

अक्षरशः जान हथेली वर घेऊन रोज कामावर जाणार्‍या आपल्या तरूण जवानांकडे पाहिले की तुमच्या आमच्या दैनंदीन सुख समाधानासाठी स्वताच्या शाश्वत व सुखी आयुष्याचा त्याग केलेल्या या आपल्या बांधवांकडे पाहून नतमस्तक व्हायला होते. <<
सैनिकांबद्दल आदर असणे, एक भारतीय नागरिक म्हणून आपले कर्तव्य पाळणे हे महत्त्वाचे आहेच. पण सैनिक त्याग करतात आणि आपण मौजमजा करतो असा अपराधीपणा वाटणे हे निरोगी व्यवस्थेचे लक्षण नाही. सैनिक हे आपल्यासारख्याच अनेक कुटुंबातील असतात. देशातील शेतकरी ते सीमेवरचा सैनिक प्रत्येक घटक महत्त्वाचा आहे. बाकी संदिप डांगे यांच्या मतांशी सहमत!

उरी अजुन बघितलेला नाही. पुढच्या आठवड्यापर्यंत राहिला तर बघायचा विचार आहे.

योग, बाहेरच्या देशात राहिल्यावरही सैनिकी शिक्षण सक्तीचे करावे असे तुम्हाला वाटते वाचुन आश्चर्य वाटले.
द.कोरिआ, इस्त्राईल, ईजिप्त इ. देशांत मिलिटरी सर्विस बंधनकारक आहे. तिकडे देशाचा, लोकसंख्येचा आकार आणि असलेले थ्रेट यांचं प्रमाण यासाठी मोठी कुमक लागते, तसेच आणिबाणी कधी आली तर लगेच बेसिक काही सैन्य तयार असणे आवश्यक असते. शिस्त लागावी म्हणून सैनिकी शिक्षण देत नाहीत, ते आर्थिकदृष्ट्या आणि सामाजिक स्वास्थ्याच्या अनुशंगाने परवडत नाही.
या वरील देशातील अनेक नागरिकांशी बोलल्यावर हे मिलिटरी ट्रेनिंग म्हणजे नक्की काय लेव्हलचं (पुचाट) असतं आणि त्याचा तिकडचे लोक किती एक्स्ट्रीम लेव्हलवर तिरस्कार करतात आणि ते करायला लागू नये म्हणून कायकाय करतात, देश सोडून दुसर्‍या देशांत स्थलांतरीत होण्याला ते एक कारणही असते याच्या सुरस कथा ऐकल्या आहेत. मला आजवर अशी एकही व्यक्ती सापडलेली नाही जिला हे मिलिटरी ट्रेनि़ग आवडले, तिच्या मुलांना हे द्यावे असे वाटते.
'सैनिकी शिक्षण द्यावे' हा टिपिकल भारतीय, मूळ समस्या काय आणि त्यावर नीट उपाय करायला कष्ट घेण्याची तसदी न घेता, सगळ्या समस्यांवर अत्यंत सोपा इलाज शोधणे कॅटेगरीतला उपाय आहे.

Amit perfect. Even in Singapore also people hate this compulsory military training. The worst part it is compulsory to males only.

Ncc अजूनही आहे फक्त त्याच महत्त्व कमी होत चाललंय ....ज्यांना मिलिटरी सर्विसेस मध्ये जायचंय त्यांनीच जावं असा मतप्रवाह बनत चालला आहे पण ncc आणि तत्सम शालाबाह्य उपक्रमांमुळे विद्यार्थात शिस्त आणि संघटनेची भावना रुजते हे कुणी विचारात घेत नाही . शारीरिक आणि मानसिक क्षमता वाढते, निर्णयप्रक्रिया सुधारते , हे सर्व माझे स्वतःचे अनुभव आहेत . दुर्दवाने पालक आणि विद्यार्थी कमी मेहनत जास्त परतावा ह्या मागे लागल्याने ह्या गोष्टी शाळा कॉलेज मधून मागे पडू लागल्या आहेत . आमच्या वेळेला ncc कॅडेट आहे हा/ही , अस कौतुकाने बघायचे सारे कॉलेज मध्ये आता ती परिस्थिती आहे का अशी शंका आहे.
राहत राहिला प्रश्न देशप्रेमाचा तर ते क्षणिक आणि उकळी आलेल्या दुधा सारख न वाटता एक निरंतर प्रक्रिया असावी जी रोजच्या जीवनात सुद्धा अंमलांत आली पाहिजे.

'सैनिकी शिक्षण द्यावे' हा टिपिकल भारतीय, मूळ समस्या काय आणि त्यावर नीट उपाय करायला कष्ट घेण्याची तसदी न घेता, सगळ्या समस्यांवर अत्यंत सोपा इलाज शोधणे कॅटेगरीतला उपाय आहे.

Pages