उरी चित्रपटाच्या निमित्ताने

Submitted by योग on 30 January, 2019 - 11:50

'उरी सर्जिकल स्ट्राईक' हा चित्रपट ईथे लंडन मध्ये पाहण्याचा योग आला. ते देखिल २६ जानेवारीला मित्र परिवारा समवेत. चित्रपट पाहून अर्थातच काही दिवस हँग ओव्हर (भारावलेलेपणा) होताच. चित्रपट आवडलाच पण त्या निमित्ताने अनेक गोष्टी लक्षात आल्या व अनेक प्रश्ण ऊत्तरांची मनात पुन्हा नव्याने गर्दी जमली. चित्रपट मूल्ये, चित्रीकरण, अभिनय, पटकथा ई. सर्व अतीशय ऊत्तम वाटलेच. किंबहुना बॉर्डर, LOC या आधी येऊन गेलेल्या मसालेपटांपेक्षा हा चित्रपट नक्कीच फारच ऊजवा ठरतो. पण चित्रपट परिक्षण, राजकीय संदर्भ, ई. बद्दल चर्चा करण्यापेक्षा उरी च्या निमित्ताने जे अनुभवले व जाणवले ते लिहून, ईतरांना देखिल तसेच काही वाटले असेल का हे जाणून घेण्या साठी हा प्रपंच.

मुळात भारता बाहेर अनेक वर्षे राहिले की भारत, मातृभूमी ई. बद्दलची ओढ, आस्था, आदर, अभिमान वगैरे जरा कणभर जास्तच असतो. (भारतात गेल्यावर मात्र अनेक दुरावस्था पाहून आपण नाके मुरडतो तो भाग वेगळा). त्यातही उरी सारख्या काळजाला हात घालणार्‍या घटनेमूळे व त्यानंतर थेट पाक व्याप्त काश्मिर मध्ये 'घुसून' त्याला चोख प्रत्त्युत्तर देण्याची कारवाई केलेल्या आपल्या सैन्य व सरकारी यंत्रणेच्या बातम्या, कथा, ई. ऐकल्यावर हा चित्रपट पाहिल्यावर आत साठलेला असा कणभर जास्त देशाभिमान वे देशप्रेम हे ऊकळ्या फुटून बाहेर न पडते तरच नवल. पण यात मी एकटा नव्हतो हे नक्की. कारण चित्रपटाच्या क्लायमॅक्स्ला संपूर्ण चित्रपट गृहात वाजणार्‍या ऊस्फूर्त टाळ्या, जल्लोश, जय हिंद च्या घोषणा याची साक्ष होत्या. त्याही पुढे श्रेय नमावाली व शेवटचे गीत सुरू असताना चित्रपटग्रुहात आवर्जून थांबलेले प्रेक्षक पाहता एक नक्की जाणवले की चित्रपटाच्या विषयाने नक्कीच खोलवर परिणाम केला आहे. चित्रपट सुरू असताना देखिल प्रेक्षागृहात स्पष्ट जाणवलेली स्तब्धता, ऊत्कटता, राग, जल्लोष, दु:ख्ख या सर्व भावना याची साक्ष देतात.

अशा प्रकारचा चित्रपट समोर येणे आवश्यक होते. अक्षरशः जान हथेली वर घेऊन रोज कामावर जाणार्‍या आपल्या तरूण जवानांकडे पाहिले की तुमच्या आमच्या दैनंदीन सुख समाधानासाठी स्वताच्या शाश्वत व सुखी आयुष्याचा त्याग केलेल्या या आपल्या बांधवांकडे पाहून नतमस्तक व्हायला होते. खेरीज भारतीय लष्कर, व सैन्य हे जगातील ईतर कुठल्याही बलाढ्य सत्तेपेक्षा अजीबात कमी नाही हा विश्वास बळावतो. खेरीज राजकारणाचा कितीही धुरळा ऊडो, कुणिही कितीही दिशाभूल करो, सैन्यात धार्मिक व ईतर फूट पाडल्याच्या वल्गना करोत, वा भ्रष्टाचाराचे आरोप करोत. त्या सर्व धुरळ्यात मात्र आपले जवान, सैन्य, व एकूणात लष्कर हे आप्ल्या देशाच्या सुरक्षेसाठी सुसज्ज आहे, एकजूट आहे हा संदेश दिला जातो, जो एक सामान्य माणसा करीता मोलाचा आहे. सरकार कुणाचेही असो, मात्र अशा प्रकारच्या अत्यंत धोकादायक पण अतीशय गरजेच्या ठोस कारवाईस संमती देउन, सहकार्य करणे व आपले सैन्य व जवान यांचा आत्मविश्वास व कर्तबगारी वाढवण्यास पाठींबा देणे या साठी त्यांचे अभिनंदन करावेच लागेल. ईतकी वर्षे ऊघडपणे अतीरेक्यांना पाठींबा देऊन भारतात घुसखोरी करायला मदत करणे, सीमारेषे नजिक भारतीय नागरीक व सैन्य यांचेवर गोळीबार करणे, या असल्या कारवाया करणार्‍या पाकीस्तानी सत्ता व सैन्यास या कारवाई मार्फत थेट ऊत्तर देणे ही आपल्या सैनिकी कारवाई च्या इतीहासात एक नक्कीच मोठी महत्वपूर्ण घटना आहे. राष्ट्रवाद हा नुसता झेंडा वंदनातून, वा राष्ट्रगीत गाण्यातून सिध्ध होत नसतो (त्यावर देखिल काही बुध्धीभ्रष्ट लोक आक्षेप घेत असतात.), तर स्वताचे सैन्य, नागरीक, व जनता यांच्या जीवावर ऊठलेल्या प्रत्त्येक परकीय आक्रमकाला सडेतोड ऊत्तर देऊन तो कायम जिवंत ठेवावा लागतो. तरिही अशा घटनांचे पुरावे व स्पष्टीकरण आपल्या सैन्य व सरकारकडे मागणारे कपाळ करंटे लोकही आपल्याच देशात पहायला मिळाले हे पाहून दु:ख्ख व संतापही होतो. फुकट मिळालेल्या स्वातंत्र्य व सुरक्षेच्या पंचपक्वांन्नावर समाधानाचे ढेकर देऊन दुसरीकडे मात्र नक्षलवादी, माओवादी, ई. अंतर्गत अतीरेक्यांच्या मानवी हक्काच्या वा कधी ईनटॉलरंस च्या नावाने ऊर पिटणार्‍या अशा नालायक ढेकळांचा थयथयाट पाहिल्यावर मात्र अनेक प्रश्ण मनात निर्माण होतात. आजही स्वातंत्र्य ऊपभोयाची किंमत काय हे जाणून घ्यायचे असेल तर काही काळ अरबी, आफ्रिकी, आणि ईतर कंगाल देशातून राहून पहावे.

आपल्या आधीच्या पिढीच्या स्वातंत्र्य संघर्षाच्या बळावार आपल्या पिढीला स्वातंत्र्य अनुभवता व ऊपभोगता आले. मात्र ते आप्ल्या पुढील पिढीस अधिक संपूर्णपणे व सुंदरपणे ऊपभोगास द्यायचे असल्यास ते स्वातंत्र्य आपल्याला कायम जपावे लागेल, त्याची मूळे अधिक घट्ट करावी लागतील. त्यासाठी राष्ट्रप्रेम, राष्ट्र भावना यांना खतपाणी घालावे लागेल. मिळवणे जितके कठीण त्यापेक्षा कठीण ते जतन करणे आहे व त्याही पेक्षा कठीण त्याचे संवर्धन आहे.

दुर्दैवाने आमच्या पिढीच्या डोळ्यासमोर निव्वळ 'लोकप्रीय' आदर्श नाचवले गेले. रातोरात श्रीमंतीची व प्रसिध्धीची स्वप्ने दाखवणार्‍या फुटकळ धंदेवाईक कार्यक्रमातून आमची दिशाभूल केली गेली. दुसर्‍याला सेवा देण्यापेक्षा, स्वता:च्या तुंबड्या भरून घेण्याचे मार्ग कुठले याचे प्रशीक्षण देणारे अभ्यासक्रम व संस्थाचे पेव फुटले. चिल्लर चोर्‍या, मार्‍यामार्‍या, राडा, यातून जन्माला आलेला वार्डाचा नगरसेवक पुढे मंत्री देखिल होवू शकतो याची जिवंत ऊदाहरणे डोळ्यापूढे पहावी लागली. आरक्षण च्या बळावर ज्या घटकाला फायदा होणे अपेक्षित होते तो मागेच पडला मात्र अक्षरधः अपात्री, अकुशल आणि नालायक वर्गाच्या हाती मात्र अधिकार आले. मी आणि माझे या दोन शब्दात आमचे स्वातंत्र्य ऊपभोग व संवर्धन संपले. आणि मग या संकुचीत कोशाला हादरवणार्‍या घटना घडल्या की मेणबत्त्या पेटवून आपली जबाबदारी पार पाडण्याचे मार्ग आम्हाला ऊपलब्ध झाले. आता तर मेणबत्त्या देखिल फोन मधून पाठवणे ईथवर सोपे झाले आहे. या सर्वावर कळस म्हणजे अतीशय ऊच्चशिक्षीत, धुरंदर, व धोरणी व्यक्तीमत्वांचा सुळसुळाट असलेल्या या देशाला अजूनही निर्बुध्ध व नाकर्त्या कुटूंबांच्या (अनेक आहेत) लांगूलचालनातून तयार होणार्‍या होणार्‍या विरोधी पक्षांच्या कडबोळ्या खेरीज दुसरा पर्याय दिसत नाही. कुठेतरी काहीतरी चुकतय?

उरी च्या निमित्ताने पुन्हा एकदा काही उपाय समोर आले.
१. शाळांतून सैनिकी प्रशीक्षण सक्तीचे करायलाच हवे. शिस्त, एकजूट, राष्ट्र भावना, सांघिक कार्य या सर्वाची बीजे ही नेमकी शालेय वयात पेरली तर निश्चीतच जास्ती खोलवर रूजतील.
२. २५ ते ४० अशा वयोगटातील प्रत्येक नागरीकाला एक वर्ष सैन्य सेवा (प्रत्यक्ष रणांगणात नव्हे) सक्तीची असावी.
३. जमेल तसे एखादी तरी सहल मित्र परिवार, नातेवाईक यांचे बरोबर एखाद्या सैन्य स्थळाच्या ठिकाणी करावी.
४. देश्/राष्ट्र प्रथम मग बाकी सर्व. हा नियम स्वतापुरता घालून घ्यावा. खेरीज जिथे जिथे या नियमाची पायमल्ली करणारे लोक दिसतील तिथे अशा लोकांना मुळीच पाठींबा देऊ नये.
५. धर्म, जात या अशा वेळ व शक्ती व्यर्थ घालणार्‍या विषयांबद्दल कुठल्याही चर्चेस खतपाणी घालू नये. जिथे जिथे या विषयाला धरून संवाद व काम होत असेल तिथे सहभाग टाळणे.
६. आपला परिसर, आपला समाज किमान आपले शहर कसे अधिक सुरक्षीत, स्चच्छ व सुंदर होईल या साठी जमेल तसे विधायक कार्य करणे. म्हणजे नुसते मी कचरा करत नाही ईथवर थांबण्यापेक्षा, पुढे अधिक काही करता येईल का वैयक्तीक वा सामूहीक तत्वावर यासाठी प्रयत्न करणे.
७. बाबा, बुवा, महाराज या असल्या फालतू लोकांना वा समुदायांना महत्व देणे वा त्यांच्या आधीन होणे थांबवून संस्कार, कर्तव्य, मेहेनत या मूल्यांवर आधारीत जीवन जगणे. त्यातून जे मिळेल त्यावर समाधान मानणे आणि आपल्या पुढील पिढी पुढे तोच आदर्श ठेवणे.
८. निव्वळ ऊपभोगा पेक्षा, निर्मिती चा हव्यास धरणे. आर्थिक समृध्धी व संपन्नतेचा हा मुख्य पाया आहे. आपल्या पुढील पिढीस त्या करता प्रवृत्त करणे, मदत करणे.

"हे राज्य व्हावे ही तो श्रींची ईच्छा.." इथून ते "स्वराज्य हा माझा जन्मसिध्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच... पासून ते आता "स्वातंत्र्य ऊपभोगणे हा माझा अधिकार आहे " ईथवर आमचा प्रवास झाला आहे.

उरी च्या निमित्ताने पुन्हा एकदा अधिकारां बरोबरच कर्तव्यांची देखिल जाणीव झाली/होणे आवश्यक आहे असे वाटले. स्वातंत्र्य हा अधिकार नसून सुविधा आहे, आणि ते ऊपभोगण्याची, जतन व संवर्धन करण्याची किंमत आपाल्या व पुढील पिढीला देणे आवश्यक आहे.

जाता जाता: प्रत्येक भारतीयाने (भारतातील व भारता बाहेरील) व योग्य वयात आलेल्या मुला मुलांनी हा चित्रपट आवर्जून पहायलाच हवा.

जय हिंद!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>Ncc अजूनही आहे फक्त त्याच महत्त्व कमी होत चाललंय ....ज्यांना मिलिटरी सर्विसेस मध्ये जायचंय त्यांनीच जावं असा मतप्रवाह बनत चालला आहे पण ncc आणि तत्सम शालाबाह्य उपक्रमांमुळे विद्यार्थात शिस्त आणि संघटनेची भावना रुजते हे कुणी विचारात घेत नाही . शारीरिक आणि मानसिक क्षमता वाढते, निर्णयप्रक्रिया सुधारते , हे सर्व माझे स्वतःचे अनुभव आहेत . दुर्दवाने पालक आणि विद्यार्थी कमी मेहनत जास्त परतावा ह्या मागे लागल्याने ह्या गोष्टी शाळा कॉलेज मधून मागे पडू लागल्या आहेत .
+१००..

लष्करी सेवेची नाही मात्र volunteering स्वयंसेवेची सवय मुलांना लागणे गरजेचे आहे. कुठल्याही प्रकारच्या- सामाजिक, राजकीय, काही नाही तर धार्मिक तरी कामात, चळवळीत काम करायला हवे. पैश्याचा मोबदला ना घेता, दुसऱ्या माणसाच्या उपयोगी पडता येते हे समजते. लोकांमध्ये, लोकांना सांभाळून घेत काम करणे शिकता येते. विविध स्तरातल्या लोकांचे आयुष्य, त्यातले भेद-समस्या इत्यादीचे आकलन होते. जबाबदारीने काम करण्याची सवय लागते.

Surgical Strike In Bengal.
Movie to be named URI BABA Rofl

कस्सकाय साभार !!

देशाच्या सीमांचे संरक्षण करणाऱ्या जवानांना त्यांच्या प्रशिक्षणासाठी किवा एका जागेवरून दुसऱ्या जागेवर नेण्याकरिता संरक्षण मंत्रालय वाहतूक भत्ता देते.
देशाच्या संरक्षण मंत्रालयाने जवानाच्या वाहतूक खर्चासाठीही पुरेसे पैसे नसल्याचे सांगत जवानांना त्यांच्या वाहतूक भत्यासाठी प्रतीक्षेत ठेवले आहे. देशाच्या संरक्षण मंत्रालयाच्या वेबसाईट द्वारे हि माहिती प्रकशित केली आहे.
“अपुऱ्या निधीमुळे तात्पुरत्या व कायमस्वरुपाच्या दोन्ही सेवांमध्ये कार्यरत असणाऱ्या जवानांना पुढील निधी येईपर्यंत कोणताही भत्ता मिळू शकणार नाही,” असे स्पष्ट केले आहे.

जवानांना एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावर नेण्याकरिता एकंदरीत वर्षाला ४००० कोटी रुपये खर्च होतो. यावर्षी अधिक ८०० कोटी रुपये खर्च मंजूर करून पुढील निधी जवानांना देण्यात येईल असे सूत्रांनी सांगितले आहे. या सेवेचा फायदा सुमारे ४०,००० लष्करी अधिकाऱ्यांना होत असतो.

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात अतिरिक्त खर्च झाल्याचे कारण देत, जवानांना निधी पुरवणे अवघड होत असल्याचे सांगितले जात आहे.

--- आहे त्या सैनिकांना प्रशिक्षण द्यायला पैसे नाहीत. असे मी वर एका प्रतिसादात लिहिले. त्याची बातमी आज आली...

>> आहे त्या सैनिकांना प्रशिक्षण द्यायला पैसे नाहीत. असे मी वर एका प्रतिसादात लिहिले. त्याची बातमी आज आली...
या बाफ शी काही संबंध आहे का?
एकूणात, वेगवेगळ्या प्रतीसादवरून, तुमच्याकडे बरेच मटेरियल आहे असे दिसते . त्या सगळ्यांसाठी तुम्ही एक वेगळा बाफ ऊघडावा. म्हणजे सर्व 'ज्वलंत@ (मोदी सरकरा वि. च्या) समस्या तुम्हाला तिथे मांडता येतील. Proud

सिनेमा आवडला ... काही विचारणा... खालील गोष्टी खरोखरच वापरल्या गेल्या होत्या का?
१. त्यात दाखवलेले गरुडाचे ड्रोन जीआर डीओ त बनवले गेले होते का?
२. हेलिकॉप्टरने ट्रूपला परत आणायचा सोय प्रत्यक्षात गेली होती का?
खुलासा अपेक्षित...

डोवाल, आणि मोदी यांची खरेच दाखवले त्या लेव्हल ची इनवोल्व्हमेंनट होती का?
खुलासा अपेक्षित Lol

https://www.loksatta.com/agralekh-news/china-firmly-opposes-narendra-mod...

उरी बद्दल नाही, पण हे वाचुन उर नक्कीच बडवावासा वाटला. मागे जॉर्ज फर्नांडीस, चीनला विश्वास घातकी म्हणले होते तेव्हा त्यांच्यावर जाम टिका झाली होती पण ते खरेच आहे. एकवेळ हे पाकडे परवडले ते उघड शत्रु झालेत, चीनच काय? हा ड्रॅगन सर्पगतीने भारताला गिळु बघतोय.

.

*उरी चित्रपटातील गरुड ड्रोन*

बहुचर्चित आदित्य धर दिग्दर्शीत उरी चित्रपट चौथ्या आठवड्यातदेखिल गर्दीचे उच्चांक नोंदवित आहे. हा चित्रपट सत्य घटनेवर आणि देशप्रेमावर आधारीत असल्याने देशवासियांकडून त्याला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळतोय. अशा या चित्रपटातील अनेक छोट्यामोठ्या गोष्टींविषयी आपण अधिक माहिती घेण्यासाठी उत्सुक असतोच. तर मग आपल्याला अतिषय अभिमान वाटेल अशी माहिती खालील पोस्टमधून मिळेल.

*उरी फिल्म मधील गरुड ड्रोन निर्माण करणारा हर्षवर्धन सिन्हा* गर्व आहे,
अभिमान आहे तुझा आम्हाला
जय हिंद..!!
वंदे मातरम्..!!*

भारतीय जवानांचे प्राण वाचवण्यासाठी त्याने तयार केले भूसुरुंग शोधून निकामी करणारे ड्रोन.
*हे तंत्रज्ञान केवळ भारतीय लष्करालाचा देण्यासाठी परदेशातील ऑफर्स नाकारल्या*
उरी सिनेमाची सध्या सगळीकडे चर्चा आहे. या सिनेमामधील *'हाऊस द जोश?'*
या संवादाने तर सध्या अनेक नेते मंडळींच्या भाषणाची सुरुवात होते. या सिनेमातील आणखीन एक चर्चेची गोष्टी ठरली ती म्हणजे 'गरुड' हे आगळेवेगळे ड्रोन. या सिनेमामध्ये दाखवण्यात आल्याप्रमाणे या पक्षासारख्या दिसणाऱ्या ड्रोनचा उपयोग हेरगिरीसाठी करण्यात आला. मात्र आता खरोखरच एका १६ वर्षीय भारतीय विद्यार्थ्याने अशाप्रकारचा ड्रोन तयार केला आहे. विशेष म्हणजे हा ड्रोन हेरगिरीऐवजी भूसुरुंगांची जागा ओळखून ते नष्ट करण्यासाठी वापरला जाऊ शकतो.
अहमदाबादमधील
*हर्षवर्धन सिन्हा* या १६ वर्षीय विद्यार्थ्याने तयार केलेल्या या ड्रोनला 'इगल ए सेव्हन' हे नाव दिले आहे. हर्षवर्धन सिन्हा हा वयाच्या दहाव्या वर्षांपासून वेगवेगळी स्मार्ट गॅजेट्स बनवतो. रोबोटिक्सची आवड असणाऱ्या हर्षवर्धन सिन्हाने 'अॅरोबॉटिक्स सेव्हन' नावाच्या कंपनीची स्थापना केली आहे. या कंपनीच्या माध्यमातून जीवन अधिक सोप्पे करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल असं हर्षवर्धन सिन्हा सांगतो.
आपल्या या नवीन भूसुरुंग शोधून काढणाऱ्या ड्रोन तंत्रज्ञानाबद्दल बोलताना तो म्हणतो, 'सध्या अशाप्रकारचे तंत्रज्ञान कुठेच उपलब्ध नाही. भारतीय लष्कर आपल्या छावणीमधून रिमोटच्या सहाय्याने हे ड्रोन ऑपरेट करु शकेल. या ड्रोनच्या मदतीने लष्कराला भूसुरुंग शोधून काढून ते निकामी करणे सहज शक्य होईल. या ड्रोनला भूसुरुंग सापडला की तो छावणीमधील अधिकाऱ्यांना संदेश पाठवेल. त्यानंतर तेथील अधिकाऱ्यांना या ड्रोनवरील कॅमेरातून तो भूसुरुंग छावणीतील ऑप्रेटरला पाहता येईल. तसेच हा भूसुरुंग या ड्रोनच्या मदतीने कोणत्याही व्यक्तीच्या मदतीशिवाय लगेच निकामी करता येईल.' हर्षवर्धन सिन्हाने द क्विंटला दिलेल्या मुलाखतीमध्ये हे ड्रोन कसे काम करते यासंदर्भात माहिती दिली.
'इंडिया टुडे'ने दिलेल्या वृत्तानुसार हर्षवर्धन सिन्हाच्या या संशोधनाला परदेशातून मोठ्या रकमेची ऑफर देण्यात आली आहे. मात्र हर्षवर्धन सिन्हाने ती ऑफर नाकारली असून आपल्याला *हे तंत्रज्ञान केवळ भारतीय लष्कराला पुरवायचे असल्याचे त्याने स्पष्ट केले आहे.*
परदेशातील ऑफर्सबद्दल बोलताना हर्षवर्धन सिन्हा म्हणतो, 'दक्षिण कोरिया, अमेरिका, फ्रान्स, दुबई आणि थायलंड यासारख्या देशांमधील कंपन्यांनी मला पार्टनरशिपची ऑफर दिली होती. आम्ही तेथे येऊन कंपनी सुरु करावी असं त्या कंपन्यांनी आम्हाला सांगितले होते. कंपनी स्थापन करण्यासाठी आर्थिक मदत पुरवण्यात येईल असंही या कंपन्यांनी सांगितले.' इतक्या साऱ्या ऑफर्स येऊनही हर्षवर्धन सिन्हाच्या कंपनीने त्या सर्व नाकारल्या आहेत. 'आपल्या देशात भूसुरुंगाचा स्फोट झाल्याने अनेक जवान शहीद होतात. त्यामुळेच मला भारतीय लष्कर आणि सीआरपीएफ सारख्या सुरक्षादलासाठी हे तंत्रज्ञान आणखीन विकसित करायचे असल्याने मी परदेशातील ऑफर नाकारल्या आहेत' असं या नकारामागील कारण स्पष्ट करताना हर्षवर्धन सिन्हाने सांगितले.

साभार wtsapp!

>>इतक्या साऱ्या ऑफर्स येऊनही हर्षवर्धन सिन्हाच्या कंपनीने त्या सर्व नाकारल्या आहेत. 'आपल्या देशात भूसुरुंगाचा स्फोट झाल्याने अनेक जवान शहीद होतात. त्यामुळेच मला भारतीय लष्कर आणि सीआरपीएफ सारख्या सुरक्षादलासाठी हे तंत्रज्ञान आणखीन विकसित करायचे असल्याने मी परदेशातील ऑफर नाकारल्या आहेत' असं या नकारामागील कारण स्पष्ट करताना हर्षवर्धन सिन्हाने सांगितले.
ग्रेट! सलाम!

<<डोवाल, आणि मोदी यांची खरेच दाखवले त्या लेव्हल ची इनवोल्व्हमेंनट होती का?>>

कुठल्याही राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत एक उच्च स्तरीय समिती निर्णय घेते. साधारणत: या समितीत पंतप्रधान, त्यांचे सुरक्षा सल्लागार, संरक्षण मंत्री, तिन्ही दलांचे प्रमुख या व्यक्ती असतात. त्यानंतर झालेला निर्णंय राबवण्यासाठी त्या व्यक्ती नसतात; तर त्या त्या क्षेत्रातील तज्ड्न्य (मला मराठीत हे लिहिता येत नाही) असतात. पण सध्याच्या पंतप्रधान आणि डोवाल साहेबांची कमिट्मेन्ट आणि उर्जेचा स्तर पाहता; त्यांचा अगदी चित्रपटात दाखवला तितका नसेल - पण सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अर्थात चित्रपट निर्मितीसाठी थोडे ड्रामॅटायझेशन आवश्यक असतेच! Happy

शरद, tadnya

आज पुलवामा मध्ये झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध,
आणि बळी पडलेल्या 18 जवानांना श्रद्धांजली. __/\__

जैश-ए , लष्कर, जमात उल दवा यांसारख्या सर्वच दहशतवादी संघटनांना पाक सरकार, आयएसाय, कश्मिरमधले फुटीरतावादी, इतर मुस्लिम कट्टरतावादी संघटना यांचा सक्रिय पाठिंबा असतो. सर्व बाजूंनी पाकचे कंबरडे मोडले असूनसुद्धा अश्या प्रकारचे हल्ले करण्यासाठी सतत मनुष्यबळ, तंत्रज्ञान, इंटेलिजन्स त्यांना मिळत राहतो हे भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने भयावह आहे. पाकप्रणीत इस्लामी दहशतवाद कसा रोखायचा हा प्रश्न ऐरणीवर असलाच पाहिजे सर्वकाळ.
उरी काय किंवा पुलवामा या हल्ल्यांमागे जो अस्थीरता माजवण्याचा, भारतीय लष्कर, सरकार यांवरचा लोकांचा विश्वास उडावा हा उद्देश असतो तो सफल होऊ न देणे आपल्या हातात असते. सरकार म्हणजे मोदी/भाजप नव्हे लोकनियुक्त लोकशाही सरकार जे कुठल्याही पक्षाचे असो.
या हल्ल्याचा तीव्र निषेध!!

>>उरी काय किंवा पुलवामा या हल्ल्यांमागे जो अस्थीरता माजवण्याचा, भारतीय लष्कर, सरकार यांवरचा लोकांचा विश्वास उडावा हा उद्देश असतो तो सफल होऊ न देणे आपल्या हातात असते.

ऊरी च्या आधी पर्यंत असेच चित्र होते. पण आता मात्र ऊरी नंतर याचा पुरेपूर हिशेब चुकता केला जाईल हे जनतेला माहिती आहे, नव्हे खात्री आहे. लोकांचा विश्वास ऊडाणर नाही ऊलट अशा नतद्रष्ट प्रव्रुत्ती व शक्तींना व त्यांना मदत करणार्‍या सर्वांना कायमचा धडा शिकवण्याची आपल्या देशातील जनतेची भावना, निग्रह अजून बळकट होईल. आपण हे करू शकतो हे आता सिध्ध झाले आहे. त्या अर्थाने आपला देश बदलला आहे.

तरिही, हा बाफ खरे तर संपूर्णत्वास जात असतानाच पुलवामा घडले हे फार मोठे दुर्दैव! संताप, चीड, दु:ख्ख ...

आपल्या शहीद जवानांना श्रध्धांजली. त्यांच्या कुटूंबीयांवर कोसळलेल्या दु:खाची कल्पनाही करवत नाही.

हल्ल्याचा नुसता निषेध नाही तर हल्लेखोर व त्यांचे हस्तक यांना आता आरपार करून ठोकून काढावे एव्हडीच ईच्छा आहे. मग ते काश्मिर असो, वा पाकीस्तान, वा आणखिन कुठे.
'उरी चित्रपटाच्या निमित्ताने' सारखे बाफ पुन्हा भविष्यात काढायलाच लागू नयेत याच आशेने हा बाफ ईथेच बंद करुयात.

बाफ बंद करायच्या आधी एक माहिती. अक्षय कुमार आणि टीम ने भारत के वीर नावाचं ऍप काढलय ह्या ऍप वरून शहीद जवानांच्या कुटुंबियांना थेट मदत देता येते. त्या कुटुंबीयांची संपुर्ण माहिती तिथे आहे. आणि 15 लाख रुपये मिळाले कि ते कुटुंब आपोआप जाऊन नवीन शहीद जवानांची माहिती तिथे येते. हे कस्सकाय ज्ञान आहे. अक्षय कुमार चा विडिओ पण आहे. ऍप अव्हेलेबल आहे पण मी वापरल नाहीये.

ऊरी च्या आधी पर्यंत असेच चित्र होते. पण आता मात्र ऊरी नंतर याचा पुरेपूर हिशेब चुकता केला जाईल हे जनतेला माहिती आहे, नव्हे खात्री आहे...

???????? ओ वेळ काय काळ काय आणि तुमचे आपले राजकारणी प्रचारकी भाषण सुरूच? निर्लज्जपणाचा कळस असेल त्यालाही लाज वाटेल.

किती हिशोब चुकते करत राहणार आहात? गेल्या पाच वर्षात किती सैनिक गमावले आपण? कधी थांबणार हे कायमचं?

फार वाईट वाटतंय ही बातमी वाचल्या नंतर.
>>ऊरी च्या आधी पर्यंत असेच चित्र होते. पण आता मात्र ऊरी नंतर याचा पुरेपूर हिशेब चुकता केला जाईल हे जनतेला माहिती आहे, नव्हे खात्री आहे. लोकांचा विश्वास ऊडाणर नाही ऊलट अशा नतद्रष्ट प्रव्रुत्ती व शक्तींना व त्यांना मदत करणार्‍या सर्वांना कायमचा धडा शिकवण्याची आपल्या देशातील जनतेची भावना, निग्रह अजून बळकट होईल. आपण हे करू शकतो हे आता सिध्ध झाले आहे. त्या अर्थाने आपला देश बदलला आहे. >>
योग, देश बदलला आहे याची खात्री शत्रूला व्हावी लागते, देशातील नागरिकांना ती तेव्हा होते जेव्हा हे हल्ले थांबतात. शत्रूला ते अजिबातच वाटत नाहीये हे ह्या हल्ल्याने दिसलं. चाळीस जवानांचा निर्घृण खून झाल्या दिवशी तुम्हाला देश बदलला आहे ही प्रतिक्रिया द्यावीशी वाटली!
उरीचा बदला घेतला, या हल्ल्याचा ही घ्यावाच. पण ते पुरेसं नाही हे ही ध्यानात घ्यावे.
दु:ख्खद दिवस! Sad

Dear Admin
Kindly close this page for further posting
Thanks

<< देश बदलला आहे याची खात्री शत्रूला व्हावी लागते, देशातील नागरिकांना ती तेव्हा होते जेव्हा हे हल्ले थांबतात. शत्रूला ते अजिबातच वाटत नाहीये हे ह्या हल्ल्याने दिसलं. >>
------- अमितव सहमत

<< Dear Admin
Kindly close this page for further posting
Thanks >>
----- ज्या उद्देशाने धागा काढला आहे तो उद्देश सफल होत नाही आहे का?

<< हा बाफ खरे तर संपूर्णत्वास जात असतानाच पुलवामा घडले हे फार मोठे दुर्दैव! संताप, चीड, दु:ख्ख ... >>
---- पुलवामाची घटना खुप वाईट आहे, हकनाक जवान मारल्या जातात.
सखोल चौकशी होण्याची अपेक्षा. घटना काघडली, कोण कोण सहभागी होते, काय उद्देश होता या गोष्ती चौकशी अंती पुढे येतीलच.

<< आपल्या शहीद जवानांना श्रध्धांजली. त्यांच्या कुटूंबीयांवर कोसळलेल्या दु:खाची कल्पनाही करवत नाही. >>
------ सहमत...

Pages