आपण असू लाडके : १. गुलाबी त्रिकोणात कैद

Submitted by स्वाती_आंबोळे on 16 January, 2019 - 13:29

यानंतरचे लेखः
२. इंद्रधनुष्यात किती रंग?
३. समज आणि गैरसमज

दुसऱ्या महायुद्धाच्या वेळची गोष्ट आहे.
हिटलरच्या नाझी छळछावण्यांमधील कैद्यांच्या पोशाखावर त्यांच्या वर्गवारीनुसार त्रिकोणी कापडी बिल्ले शिवलेले असत. कुठल्या कारणाने हा कैदी मुक्त स्वतंत्र जीवन जगायला नालायक ठरला हे बिल्ल्याच्या रंगावरून स्पष्ट होई. ज्यू लोकांचा नालायकपणा पिवळा तर राजकीय कैद्यांचा लाल, गुन्हेगारांचा हिरवा तर परकीयांचा निळा.*

सहज दुरूनसुद्धा लक्षात यावेत म्हणून समलैंगिक पुरुष कैद्यांचे गुलाबी बिल्ले इतरांपेक्षा थोडेसे मोठे असत. त्यांचा इतरांपेक्षा अधिक अनन्वित छळ होत असे - नाझी अधिकाऱ्यांकडून, आणि इतर कैद्यांकडूनही! पाशवी बलात्कार, गुदद्वारात झाडूच्या दांड्यासारख्या वस्तू खुपसणे, गुप्तांगावर उकळतं पाणी ओतणे, खच्चीकरण इथपासून ते त्यांना ‘बरं’ करण्यासाठी टेस्टॅस्टेरॉनची इंजेक्शन्स देणे, वैद्यकीय ‘प्रयोगां’साठी त्यांना गिनिपिग्ज म्हणून वापरणे अशा अनेक अतिविकृत पातळ्यांवर हा छळ चालत असे.
युद्ध संपल्यानंतर छळछावण्यांमधले बाकी कैदी मुक्त करण्यात आले, गुलाबी बिल्ले वगळून. कारण जर्मन कायद्यातील १७५व्या कलमानुसार समलैंगिकता हा अजूनही गुन्हाच होता.

जेत्या युरोपीय राष्ट्रांचा लैंगिक अल्पसंख्यांकांकडे पाहायचा दृष्टीकोन फारसा निराळा नव्हताच.
याच महायुद्धात जर्मनांचे सांकेतिक लिपीतले गुप्त संदेश 'वाचू' शकणारं यंत्र तयार करणार्‍या शास्त्रज्ञ अ‍ॅलन टुरिंगला नंतर समलैंगिक असल्याच्या 'गुन्ह्या'बद्दल दोषी ठरवून ब्रिटिश सरकारने शिक्षा म्हणून हॉर्मोन ट्रीटमेन्ट घ्यायला लावली. इतक्या प्रतिभाशाली शास्त्रज्ञाचे अखेरचे दिवस शारीरिक आणि मानसिक अत्यवस्थेत गेले आणि त्यातच त्याचा मृत्यूही झाला. **

असो. ही झाली फार फार वर्षांपूर्वीची सातासमुद्रापारची कथा.

आपलं काय?

इथल्या बातमीनुसार भारत, पाकीस्तान, नेपाळ, बांगलादेश, न्युझीलंड, नेदरलंड्स, अर्जेन्टिना, कॅनडा, डेन्मार्क, ऑस्ट्रेलिया, जर्मनी या देशांत पासपोर्टसारख्या सरकारी ओळखपत्रांवर आणि अमेरिकेतील न्यूयॉर्क, कॅलिफोर्निया, मेन, आयडाहो, ओरेगॉन आणि वॉशिंग्टन या राज्यांत जन्मप्रमाणपत्रावर आता 'लिंग' या रकान्यात स्त्री आणि पुरुष यांव्यतिरिक्त लिंगनिरपेक्ष अशी तिसरी चौकट भरता येते.****

भारतीय दंडसंहितेत ब्रिटिशांनी १८६६मध्ये घातलेलं समलैंगिकतेला गुन्हा ठरवणारं कलम ३७७ सप्टेंबर २०१८ मध्ये स्वतंत्र भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलं.***

पण या झाल्या कायदेशीर बाबी.

आपलं काय?

आपण आता वैश्विक नागरिकत्व(ग्लोबल सिटिझनशिप) मिरवतो. हवी असलेली कोणतीही माहिती सहज काही खटके दाबून घरबसल्या मिळवू शकतो. आपल्याला लैंगिक अल्पसंख्यांकांबद्दल किती आस्था असते? त्यांचे किती प्रकार माहिती असतात? ते आपल्याला विचित्र किंवा 'अनैसर्गिक' वाटतात का? ते उपचारांनी 'बरे' होतील असं आपल्याला वाटतं का? 'आपल्या'कडे असलं काही नव्हतं अशा भ्रमात आपण जगतो का? त्यांच्या संपर्काने आपली मुलं 'बिघडतील' अशी भीती आपल्याला वाटते का? आपण त्यांची दखलच घ्यायचं टाळतो का? आपण त्यांच्यासमोर किंवा अपरोक्ष त्यांच्याबद्दल राग, त्रागा, वैताग, किंवा असंवेदनशील विनोद यापैकी काही करतो का?

१९७८ साली गिल्बर्ट बेकर यांनी तयार केलेला इंद्रधनुषी झेंडा आता लैंगिक अल्पसंख्यांकांचा मानबिंदू झालेला आहे. निसर्गाला, सृजनाला त्याच्या सगळ्या रंगांत साजरं करणारं आशावादी चिन्ह.

आपलं काय?

आपले आचारविचार अजून वास्तव नाकारणार्‍या गुलाबी त्रिकोणात कैद आहेत का?

(क्रमशः)

तळटीपः
१. लेखाच्या शेवटी विचारलेले प्रश्न माझ्यासकट आपल्या सर्वांनाच आहेत. ज्याच्याबद्दल आपल्याला नीटशी माहिती नसते ते सहसा आपल्याला विचित्र वाटतं. मला लैंगिक अल्पसंख्यांकांबद्दल कधी 'विचित्र' वाटलं नाही, पण मी कधी त्यांच्याबद्दल माहितीही करून घेतली नव्हती हे खरं आहे. माझ्या वर्तुळातल्या कितीतरी व्यक्तींना 'पुरुषी (दिसणार्‍या!) बायका' आणि 'बायकी (दिसणारे!) पुरुष' इतकेच प्रकार 'माहिती' असतात हे मी पाहिलं आहे.
नुकतीच माझ्या मुलाशी या संदर्भात चर्चा झाली, आणि माझे डोळे उघडले. त्यातून जे मला कळलं ते तुम्हालाही सांगावं, शक्य तर माहिती करून घ्यायला, विचार करायला उद्युक्त करावं, आणि आपला सर्वांचाच दृष्टीकोन थोडा व्यापक करता आला तर पहावा इतक्याचसाठी हा लेखमालेचा प्रपंच मांडत आहे.

२. मी या विषयात तज्ज्ञ नाही, तसंच माझ्या निकटच्या परिचयातील कोणी लैंगिक अल्पसंख्यांकांत मोडत असल्यास मला त्याबद्दल कल्पना नाही, मी इथे देत असलेली माहिती सर्वसामान्यांसारखी गूगल करून मिळवली आहे (जिथून घेतली ते दुवे खाली दिले आहेत). ती काही अंशी चुकीची किंवा अपूर्ण असूच शकते. तुम्हाला त्यात काही त्रुटी आढळून आल्या तर त्या जरूर नोंदवा.

३. यापुढच्या भागात लैंगिक अल्पसंख्यांकांच्या प्रकारांची माहिती करून घ्यावी असा मानस आहे.
मायबोलीकर सिम्बा यांनी याविषयी लिहिलेला एक लेख इथे सापडला - आपण त्याच लेखाचं बोट धरून जमल्यास आणखी सविस्तर चर्चा करू.

संदर्भः
* http://www.thepinktriangle.com/history/symbol.html
* http://time.com/5295476/gay-pride-pink-triangle-history/
** https://www.britannica.com/biography/Alan-Turing
*** https://timesofindia.indiatimes.com/india/what-is-section-377/articlesho...
**** https://www.cnn.com/2019/01/03/health/new-york-city-gender-neutral-birth...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपण जेव्हा हेटरो संबंधाबाबत नॉर्मल असे म्हणतो तेव्हाच नकळत होमोला अ‍ॅबनॉर्मल म्हणत असतो. खरे तर दोन्ही नैसर्गिक. >>>
नैसर्गिक आणि नॉर्मल मध्ये घोळ होतो आहे. आणि नॉर्मल चे विरुद्धार्थी abnormal असा अर्थ होत नाही. typical लिबरलिस्ट oversimplification.
आणि conversion therapy मध्ये इन principle चुकीचं असं काही वाटत नाही. फक्त जबरदस्तीने आणि अवैज्ञानिक पद्धतीने ती लादली जाऊ नये.

आजही पावलोपावली संघर्ष करावा लागतो, साधी शाळेत बाथरुम कुठली वापरायची इथे गाडे अडते. आपण वेगळे आहोत हे मुद्दाम अधोरेखीत करावे लागते ते प्रश्नांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी, मी त्याकडे मदतीसाठी मारलेली हाक म्हणून बघते.#####
हे मात्र खरं .. पण हा प्रश्न समलिंगी sexuality असणाऱ्यांना कमी त्रास देत असावा आणि किन्नर (खरा शब्द माहिती नाही हा चुकीचा असेल तर खुउप सॉरी) लोकांना जास्त त्रास देत असावा..
चर्चा करताना समलिंगी आणि किन्नर यांमध्ये गफलत होऊ नये..

वाचतोय.
अनेकांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरं पुढील भागांत येतील असं वाटतं. वाचकांनी धीर धरायला हवा..
वेगळा लिंगभाव gender आणि वेगळी लैंगिकता sexuality असलेल्यां अल्पसंख्यांकांना LGBTआता QI सुद्धा) एक भलंमोठं लेबल लावलं.असलं तरी त्यांचा.एकत्र. केला तर गोंधळ होऊ शकेल. प्रत्येक गटाचे स्वरूप आणि प्रश्न वेगवेगळे आहेत.

वर आनंदी यांनी लिहिलंय तसं.

वेगळं आहोत हे दाखवून देण्याबाबत.- स्त्रीवादाच्या सुरुवातीलाही असंच काहीसं वाटलं असेल का तेव्हाच्या समाजाला?

typical लिबरलिस्ट oversimplification.>>
अजिबात नाही! फक्त योग्य शब्द वापरला जावा इतकाच आग्रह आहे.
>>फक्त जबरदस्तीने आणि अवैज्ञानिक पद्धतीने ती लादली जाऊ नये.>> जबरदस्ती होते आणि वैज्ञानिक आधार नसताना केली जाते हाच तर मुद्दा आहे. ज्यांना यातून जावे लागले त्यांच्या कहाण्या आत्यंतिक क्लेशकारक आहेत.

स्वाती, चांगली लेखमाला आणि चर्चा.

सिम्बा यांच्या लेखाच्या लिंकबद्दल धन्यवाद. आणि मुख्यतः सिम्बा यांनाही लेखाबद्दल धन्यवाद. त्यातले वेगवेगळे प्रकार ( किंवा कॉम्बिनेशन्स ) प्रथमदर्शनी ओव्हरलॅपींग आणि थोडेसे गोंधळवणारे वाटले. पण पुन्हा वाचल्यानंतर आणि सोबतच्या चित्राच्या साहाय्याने कळण्यास मदत होते.

स्वाती२, तुमच्या पोस्टी नेहमीच सुस्पष्ट आणि थेट असतात.

त्यांचे किती प्रकार माहिती असतात?
<<< आतापर्यंतच्या माहितीनुसार खालीलप्रमाणे असावेत असे वाटते.

१) जन्माने स्त्री पण स्वेच्छेने पुरुष म्हणून जगायला आवडणे
२) जन्माने पुरुष पण स्वेच्छेने स्त्री म्हणून जगायला आवडते
३) स्त्री शैलीतच जगायला आवडणार्‍या स्त्रीया परंतु ज्यांना हार्मोनल असंतुलनामुळे नाईलाजाने पुरुष म्हणून जगावे लागते
४) पुरुष म्हणूनच जगायला आवडणारे पुरुष परंतु ज्यांना हार्मोनल डिसॉर्डर मुळे स्त्री म्हणून जगणे भाग पडते
५) जन्माने स्त्री, स्त्री म्हणूनच जगायला आवडते (कोणत्याही दबावाशिवाय) , शारिरीकदृष्ट्या प्रजननाच्या दृष्टीने आवश्यक असणारे हार्मोन्स आणि जैविक चक्रे नियमित/पोषक पण मनातून शारिरीक आकर्षण पुरुषांऐवजी स्त्रीयांविषयी
६) जन्माने पुरुष, पुरुष म्हणूनच जगायला आवडते (कोणत्याही दबावाशिवाय), शारिरीकदृष्ट्या प्रजननाच्या दृष्टीने आवश्यक असणारे हार्मोन्स आणि जैविक बाबी पोषक पण मनातून शारिरीक आकर्षण स्त्रीयांऐवजी पुरुषांविषयी

या सगळ्या शक्यतांना समलिंगी असे संबोधले जाते/जावे का?

अधिक वाचायला आवडेल. पुढील लेखांच्या प्रतिक्षेत.

१) शारीरिक दृष्ट्या काही प्रॉब्लेम वा कमतरतेमुळे लिंग निश्चित ना होऊ शकणारे किन्नर किंवा तृतीयपंथी..
२) आणि लिंग माहिती आहे .. पुर्णतः स्त्री असेल तर स्त्री म्हणून आणि पुरुष असेल तर पुरुष म्हणून शारीरिक दृष्ट्या परिपूर्ण आहेत .. आणि समलिंगाच्या लोकांकडे sexually आकर्षित होणारे, समलिंगी लोक आवडणारे हे समलिंगी ..

गजानन यांची पोस्ट आवडली.

आनंदी यांनी मांडलेले प्रश्न मलाही खूपवेळा पडतात. परेड वगैरे करून किंवा पुरुषांनी स्त्री दिसण्याचा भडक मेकअप करून आपण वेगळे आहोत हे सिद्ध केले का जावे? सगळेच नॉर्मल कॅटेगरीत का येऊ नयेत? स्वतःच्या लैगिकतेच्या बाबतीत स्वष्ट नसलेल्या मुलांचे पालक अशा गोष्टी बघून घाबरतात व मुलांना नीट करायची खटपट सुरू करतात ज्यामुळे मुलांचे प्रश्न अजून बिघडतात.

बहुतेक तिथेही आपण नक्की कोण याचा गोंधळ असेल. ट्रान्सजेंडर, किन्नर व केवळ स्वजातीयांमध्येच इच्छुक असणारे यातील फरक न बघता सगळ्यांना lgbt खाली एकत्र केले जातेय का?

समंजस आणि माहितीपूर्ण अभिप्राया-प्रतिसादांसाठी अनेक आभार. इथे उपस्थित झालेल्या प्रश्नांचा उहापोह पुढील भागांत करायचा नक्की प्रयत्न करेन.
भाग २ इथे प्रकाशित केला आहे.

चांगली सुरूवात आहे लेखमालेची.

या विषयाबद्दल अज्ञान तर असतेच आणि चर्चा करण्यासाठी ओपन माइंड पण नसते बर्‍याचदा >>> +१

चांगल्या विषयावरचा लेख. चांगल्या पध्दतीने मांडलय.
यावर जास्तीत जास्त लिखान व्हायला हवे.
लेख आवडला. नंतर सविस्तर प्रतिसाद देईन.

शक्यता आहे की आजकाल तरुण पिढीला gay म्हणून घेन cool वाटत असेल कारण hollywood चा प्रभावखाली आल्यावर ते common वाटत कारण पाश्चात्य देशात या बद्दल जास्त जागरूकता आहे आणि त्यांचे कलाकार तर मोठ्या पडद्यावर सुद्धा मान्य करतात म्हणून असेल कदाचित.. काही चुकल्यास क्षमस्व

Pages