तो - ती आणि.......

Submitted by सिम्बा on 22 November, 2017 - 07:15

एक उद्योग घराण्याची वारसदार, एक रिअलिटी tv शो जिंकणारा यशस्वी मॉडेल, एक राष्ट्रीय दर्जाची रौप्य पदक जिंकणारी अथलीट, आणि एक नौदलाचा तरुण सैनिक या सगळ्यांच्या जीवनकथेत एक सामायिक धागा आहे असे सांगितले तर तो शोधता येईल का?

जगात आढळणाऱ्या यच्चयावत जिवंत गोष्टींचे आपण पुल्लिंग किंवा स्त्रीलिंग म्हणून वर्गीकरण करून टाकले आहे. नाही म्हणायला कोर्टाच्या आदेशा वरून सरकारी पातळीवर तिसरे लिंग म्हणून “ट्रान्सजेन्डर” ला मान्यता मिळाली आहे,पण प्रत्यक्षात सरकारी form वर लिंग- या रकान्यात अजून तरी तिसरा पर्याय अवतरला नाही आहे.

ट्रान्सजेन्डर, तृतीय पंथी म्हंटले कि आपल्या डोळ्यासमोर साडीत गुंडाळलेला, विचित्र हातवारे करणारा राकट देह येतो. त्याच्या बरोबरच मनात भीती, किळस अशा निगेटिव भावना गर्दी करतात.
पण जर उद्या आपल्याबरोबर बोलणारी एक ग्रेसफुल बाई म्हणाली “हो काही वर्षापूर्वी मी हे सगळे मिस करायचे, कारण तेव्हा मी पुरुष होते” किंवा छान दाढीबिढी राखलेला पुरुष म्हणाला “बायकांना काय आव्हानांना सामोरे जायला लागते ते मला माहिती आहे, कारण गेली २५ वर्षे मी एक स्त्रीच होतो”’ तर आपली काय प्रतिक्रिया असेल? त्या व्यक्तीच्या आजच्या रूपाचा/ सामाजिक स्थानाचा आदर करणारी प्रतिक्रिया असेल? कि “ट्रान्सजेन्डर” या खुंटीवर अडकवून ठेवलेल्या सगळ्या निगेटिव भावना आपल्या वागण्यातून डोकावू लागतील?

हे ट्रान्सजेन्डर म्हणजे आहे तरी काय?

वस्तुत: ट्रान्सजेन्डर, लिन्गांतरित हि एक सर्वसमावेशक संज्ञा आहे (अम्ब्रेला टर्म) यात विविध प्रकारचे लोक येतात

१) इंटरसेक्स – सामान्यतः नुकत्याच जन्मलेल्या बाळाच्या जननेन्द्रियांकडे पाहून मुलगा झाला कि मुलगी झाली हे ठरवले जाते मात्र काही वेळा जन्मतःच बाळाच्या जननेन्द्रियात दोष असतो, आणि मुलगा किंवा मुलगी सांगणे कठीण होऊन बसते, मुल जसजसे मोठ एहोते तसे त्याच्या कुठले हार्मोन्स प्रबळ होतात त्या प्रमाणे त्याचे बाह्य रूप ठरते, आणि ते मुलास मुलगा किंवा मुलगी चे आयुष्य जगणे भाग पडते.
२) क्रॉस ड्रेसर:- हि व्यक्ती स्त्री किंवा पुरुष असते पण यांना भिन्न लिंगी पोशाख घालायचे जबरदस्त आकर्षण असते. खाजगीत किंवा सुरक्षित अवकाशात हे आपली हौस पूर्ण करतात, इतर वेळी हे आपल्या कुटुम्बासकट चाकोरीतील आयुष्य जगणारी असू शकते
३) dragg :- या व्यक्ती व्यवसायाचा भाग म्हणून विरुद्धलिंगी व्यक्तीचे कपडे घालून प्रेक्षकांसमोर येतात. थायलंड सारख्या ठिकाणी स्त्री म्हणून स्टेज शो करणारी मुले या प्रकारात येतात.
४) तृतीयपंथी :- हा खरा तर एक समूह आहे, समाजाच्या दबावाखाली टाकून दिलेली इंटर सेक्स मुले, धार्मिक कारणांसाठी खच्ची केलेले पुरुष यांच्यात सामील होतात. केवळ पैसे मिळवण्यासाठी स्त्री चे कपडे घालून भिक मागणारे पुरुष सुद्धा यात येतात. हि इनोर्गानिकपणे वाढणारी कम्युनिटी आहे. गुरु- चेला पद्धतीने नवीन येणाऱ्या लोकांना ते आपल्यात सामाऊन घेतात.
५) ट्रान्सजेन्डर :- या व्यक्ती स्त्री किंवा पुरुष म्हणून जन्माला येतात, पण मोठे होताना त्यांना असे जाणवू लागते कि त्यांना ज्या लिंगाचे समजले जाते ते ते नाहीत
उदाहरणार्थ एखाद्या स्त्रीलिंगी व्यक्तीला असे वाटू शकते कि तिच्या आत पुरुष आहे, आणि ती पुढे जाऊन पुरुष सारखी वागू लागते, किंवा वैद्यकीय मदत घेऊन ती आपले बाह्यरूप तिच्या आतल्या लिंगाशी मिळते जुळते करून घेऊ शकेल.

वर म्हंटले तो सामायिक धागा हाच... त्या सर्व व्यक्ती लिन्गांतरित आहेत.

हा थोडासा गोंधळून टाकणारा प्रकार आहे, हा समजून घेण्यासाठी काही संज्ञा आपण समजून घेऊ

Genderbread-Person.jpg१) Gender (लिंग) :-– नैसार्गिरित्या एखाद्याचे लिंग असेल ते (जे बर्थ certificate वर लिहिले जाते ते)
२) Gender Identity- (लैंगिक ओळख) :- एखाद्या व्यक्तीला आपण आतून कोणत्या लिंगाचे आहोत याची होणारी जाणीव.
३) Gender expression- (लैंगिक अभिव्यक्ती ) :- व्यक्तीच्या बाह्यरूपाने ती कोणते स्वत: बद्दल काय सांगते ते
४) Sexual orientation:- (लैंगिक कल) :- एखाद्या व्यक्तीला कोणत्या लिंगाबद्दल भावना निर्माण होतात त्यानुसार हे ठरते.

जन्माला येणाऱ्या बहुतांश लोकांमध्ये पहिल्या २ गोष्टी sync मध्ये असतात आणि ३ री गोष्ट अपोआप त्याच्याशी जुळून येते. म्हणजे जर एखादे मुल मुलगा म्हणून जन्माला आले असेल (gender- M) तर तो स्वत: ला मुलगा म्हणूनच ओळखतो (gender identity- M), आणि त्याची बॉडी लँग्वेज, भावनांची अभिव्यक्ती मुलाप्रमाणेच होते.
पुढे जाऊन त्याला मुले आवडतात कि मुली यानुसार तो होमोसेक्शुअल आहे कि हेट्रोसेक्शुअल आहे ते ठरते.(sexual orientation)
मात्र काही अपवादात्मक व्यक्तींमध्ये, निसर्ग थोडासा गोंधळ घालतो
समजा एखादे बाळ जन्मतःच मुलगी म्हणून नोंदले गेले (Gender F), तिला घराचे मुलगी म्हणूनच वाढवत आहेत (gender expression F) मात्र मोठी होताना तिला आपण पुरुष आहोत असे वाटू लागते, पुरुषी गोष्टी आवडू लागतात ती स्वत: ला पुरुष समजू लागते (gender identity – M ).आणि याला अनुसरून तिला आपले gender expression बदलावेसे प्रकर्षाने वाटू लागते. या वाटण्याच्या तीव्रतेनुसार ती वैद्यकीय मदत घेऊन किंवा फक्त दर्शनी स्वरूप बदलून आपली identity आणि लिंग sync मध्ये आणण्याचा विचार करेल

आणि टप्प्यावर संघर्ष सुरु होतो.

- जर समाजाला आणि कुटुंबियांना घाबरून तिने आपली अभिव्यक्ती बदलली नाही, तर तिला रोजच्या मानसिक घुसमटीस सामोरे जावे लागेल,
आणि जर तिने आपले बाह्यरूप बदलले तर तिला सोशल डीस्क्रीमिनेशनला तोंड द्यावे लागेल
- समजा तिने वैद्यकीय मदत घेऊन आपले लीगांन्तरण पूर्ण केले (स्त्री हार्मोन्स ब्लॉक करून पुरुष हार्मोन्स घेणे, प्लास्टिक सर्जरी करून पुरुष जननेंद्रिये तयार करणे) तर आता ती “लिंगांतरीत पुरुष (transgender man) ” म्हणून ओळखली जाईल. आणि सर्व सामाजिक व्यवहारांमध्ये त्याचा “तो” म्हणून उल्लेख व्हावा असा त्याचा प्रयत्न असेल. आणि यासाठी पूर्ण समाजाच्या विरोधात जावे लागते

मला वाटते, हे सगळे किती आव्हानात्मक आहे हे आपल्या लक्षात आले असेलच!

वयाची काही वर्षे आपण जसे नाही आहोत तसे वागत काढणे (हि काही वर्षे कितीही असू शकतात काही घटनांमध्ये वयाच्या अगदी २१व्य वर्षी लोकांनी सेक्सचेंज ऑपरेशन करून घेतले आहेत तर काही ठिकाणी हे धैर्य गोळा करायला त्यांना ५५-६० वर्षे जाऊ लागली आहेत)
त्यानंतर खूप काळ चालणारे वैद्यकीय उपचार.
रुपांतरण पूर्ण झाल्यानंतर येणाऱ्या सामाजिक, कायदेशीर गुंतागुंतीना सामोरे जात समाजात राहणे म्हणजे दर दिवशी नवे आव्हान आहे
घरदार सोडून, आपली जुनी ओळख पुसून,नव्या अवतारात नवा डाव मांडायची संधी सगळ्यांना मिळते असे नाही, आपले नेहमीचे शेजारी, नातेवाईक, सहकर्मचारी यांच्या समोर आपली नवीन ओळख घेऊन जाणे हि खूप धैर्याची गोष्ट आहे.

अशाच एका धैर्यवान व्यक्तीशी आपण गप्पा मारणार आहोत , मायबोली संवाद ग्रुप मध्ये.
वाचत राहा, माणसे वाचताना -३

* हा लेख कोणत्याही प्रकारे sexuality वर भाष्य करत नाही किंवा transgender बद्दल अचूक शात्रीय माहिती देण्याचा दावा करीत नाही, पुढची मुलाखत समजून घेण्यासाठी काही संज्ञा ओळखीच्या असणे आवश्यक वाटले आणि मुलखतीत हे स्पष्टीकरण देणे सोयीचे नव्हते म्हणून वेगळा लेख लिहिला आहे.
** चित्र www.itspronouncedmetrosexual.com संकेतस्थळावरून)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सिम्बा,
वेळोवेळी अत्यंत वेगळी व उत्तम माहितीपर लेखांबद्दल फार कौतूक वाटते. खूप छान माहिती. पु. ले. शु.

चांगली माहिती आहे!
आधी टायटल वरून एखादी टिपिकल गोग्गोड प्रेमकथा असावी असे समजून स्किप करणार होते जवळपास. Happy

चांगली माहिती आहे!
आधी टायटल वरून एखादी टिपिकल गोग्गोड प्रेमकथा असावी असे समजून स्किप करणार होते जवळपास.
+१

फक्त मी होते नाही तर होतो Proud

कालच्या लोकसत्ता ला या बाबतीत आलेली एक बातमी
https://www.loksatta.com/maharashtra-news/woman-constable-lalita-salve-f...

महिला कॉन्स्टेबल ला लिंगबदल करून पुरुष व्हायचे आहे, त्यासाठी त्यांना न्यायालयाचे दार ठोठवावे लागले आहे.

सिम्बा पुढील भाग कधी येतो आहे? वाचायची उत्सुकता आहे.

या धाग्याचे नाव 'तो ती आणि ट्रान्सजेंडर' असे केले तर कदाचित जास्त traffic येईल आणि जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोचेल बहुतेक. कारण आत्ताच्या नावावरून फारसा संदर्भ लागत नाहीये. अर्थात हे माझे मत आहे..just a suggestion.

छान माहिती.
धागा गुलमोहोर ललितलेख ऐवजी आरोग्यम् धनसंपदा मधे बसेल बहुतेक