आपण असू लाडके : २. इंद्रधनुष्यात किती रंग?

Submitted by स्वाती_आंबोळे on 20 January, 2019 - 23:36

यापूर्वीचा लेखः १. गुलाबी त्रिकोणात कैद
यानंतरचा लेखः ३. समज आणि गैरसमज

हा लेख मराठीत लिहिणं काहीसं अवघड असणार आहे. त्याचं कारण माझ्या माहितीनुसार मराठीत मुळात sex आणि gender यांसाठीसुद्धा निरनिराळे शब्द नाहीत. आणि आपण लिंगभान, लिंगाभिव्यक्ती आणि लैंगिक कल (gender identity, gender expression आणि sexual orientation) यांबद्दल तपशिलात बोलणार आहोत.

मला वाटतं, सध्या मी गोंधळ टाळण्यासाठी इंग्रजी शब्दप्रयोगच वापरते. आपल्यापैकी कोणाला जर यात आलेल्या संज्ञांसाठी चपखल मराठी प्रतिशब्द सापडले तर त्यानुसार लेखात बदल करू.

तर सेक्स म्हणजे व्यक्तीच्या शारीरिक जडणघडणीनुसार ठरणारं लिंग. यात पुनरुत्पादनाशी निगडीत अवयव, अन्य बाह्य लक्षणं (उदा. दाढीमिशा), गुणसूत्रं आणि संप्रेरकं (हॉर्मोन्स) आली. बहुतांशी हे स्त्री अणि पुरुष या दोन गटांत विभागलं जातं. काही बाळांना जन्मतःच दोन्ही प्रकारचे पुनरुत्पादनाचे अवयव असतात. यांना 'इन्टरसेक्स' असं म्हणतात. तरी असं म्हणता येईल की शारीरिकदृष्ट्या ढोबळमानाने हे तीन गट होतात.

जेन्डर हा त्यामानाने थोडा गुंतागुंतीचा भाग आहे.
एखाद्या शरीरात राहणारी व्यक्ती तिच्या चेतासंस्थेच्या (neurological) जडणघडणीनुसार (मेंदू, मज्जारज्जू आणि चेतापेशी) कोणत्या लिंगाची आहे याचं उत्तर म्हणजे जेन्डर आयडेन्टिटी असं म्हणता येईल. ‘मानसिक’ लिंग असं म्हणायचं मी मुद्दाम टाळते आहे कारण त्यातून ‘हे मनाचे खेळ आहेत’ असा चुकीचा अर्थ लागू नये.

व्यक्तीचे तिच्या अंतःप्रेरणेनुसार होणारे आहारविहार/आचारविचार हे झालं तिचं जेन्डर एक्स्प्रेशन.

जेन्डर आयडेन्टिटी आणि एक्स्प्रेशन यांचं सेक्सप्रमाणे दोनतीन रकान्यांत वर्गीकरण करता येत नाही - ते एक रंगपटल (स्पेक्ट्रम) आहे. १००% स्त्रीत्व आणि १००% पुरुषत्व यांच्या अधेमधे कुठेतरी आपण सगळे असतो.

त्यातही गंमत अशी की कोणाचं जेन्डर एक्स्प्रेशन कसं असावं याबद्दल समाजाचे शारीरिक लिंगाधारित काही ठोकताळे असतात. ते स्थलकालानुसार बदलतात. म्हणजे लांब केस ठेवले म्हणून शीख मुलगा 'बायकी' दिसतो असं कोणी म्हणणार नाही आणि पॅन्ट घातलेली बाई आता आपल्याला 'पुरुषी' वाटत नाही. पण एखाद्या पुरुषाला नेहमी साडी नेसावी वाटली तर?

बहुतेकांच्या बाबतीत कमीजास्त प्रमाणात सेक्स, जेन्डर आयडेन्टिटी आणि जेन्डर एक्स्प्रेशन हे साधारणपणे पारड्याच्या एकाच बाजूला झुकतात. अशांना सिसजेन्डर (cisgender) असं म्हणतात. पण काही व्यक्तींच्या बाबतीत तसं होत नाही.
कधीकधी पुरुष स्त्रीच्या शरीरात जन्माला येतो किंवा त्याउलटही. या व्यक्तींना ट्रान्सजेन्डर असं म्हणतात.

हा फरक अगदी नैसर्गिक (natural variation) आणि अंगभूत (hard-wired) असतो.

transg_natural_brain.jpg
(चित्र श्री. दिलीप नगरकर आणि देसी रेनबो पेरेन्ट्स अ‍ॅन्ड अ‍ॅलाइज या संस्थेच्या सौजन्याने)

काही व्यक्तींची जेन्डर आयडेन्टिटी स्त्री आणि पुरुष अशा दोन टोकांच्या मध्ये हालणाऱ्या लंबकाप्रमाणे बदलत राहते - हे झाले जेन्डर-फ्लुइड लोक.
तर काही व्यक्ती या जेन्डर आयडेन्टिटी स्पेक्ट्रमच्या पूर्णपणे बाहेरच असतात - त्या स्वतःला नॉन बायनरी म्हणवतात.

अजून विषय 'स्व'पुरता मर्यादित आहे आणि एव्हानाच गणिताच्या भाषेत बोलायचं तर त्यात ढोबळमानानेसुद्धा (३ सेक्स * किमान ३ जेन्डर आयडेन्टिटीज * किमान २ जेन्डर एक्सप्रेशन्स = ) अठरा प्रकार झाले.

हे किमान.

यानंतर येतं सेक्शुअल ओरिएन्टेशन आणि रोमॅन्टिक ओरिएन्टेशन.
हेदेखील स्पेक्ट्रम्स असतात.

ज्या व्यक्तीला फक्त भिन्नलिंगी (other sex) व्यक्तींशी शरीरसंबंध ठेवावेसे वाटतात तिला हेटेरोसेक्शुअल किंवा बोलीभाषेत 'स्ट्रेट' म्हणतात.
याचं दुसरं टोक म्हणजे होमोसेक्शुअल व्यक्ती - यांना केवळ समानलिंगी (same sex) व्यक्तींशीच शरीरसंबंध ठेवावेसे वाटतात.
पुरुष होमोसेक्शुअल्सना गे तर स्त्री होमोसेक्शुल्सना लेस्बियन असंही म्हणतात.
काहींना समानलिंगी आणि भिन्नलिंगी दोहोंतही रस असतो - हे झाले बायसेक्शुअल.
काहींना सर्व सेक्स, आणि सर्व जेन्डर आयडेन्टिटीज शरीरसंबंधांसाठी आवडतात. त्यांना पॅनसेक्शुअल असं म्हणतात.
एसेक्शुअल लोकांना कोणाशीही शरीरसंबंध ठेवावेसे वाटत नाहीत.

लैंगिक कलातील हे फरक(variations)सुद्धा नैंसर्गिकरीत्या घडून आलेले आणि अंगभूत (hardwired) असतात.
homo_natural_brain_orientation.jpg
(चित्र श्री. दिलीप नगरकर आणि देसी रेनबो पेरेन्ट्स अ‍ॅन्ड अ‍ॅलाइज या संस्थेच्या सौजन्याने)

१९४८मध्ये 'लैंगिकता-क्रांतीचा जनक' समजल्या जाणार्‍या डॉ. अल्फ्रेड किन्सी यांनी त्यांच्या सर्वेक्षणावर आधारित 'सेक्शुअल बिहेवियर इन द ह्यूमन मेल' या पुस्तकात 'किन्सी स्केल' प्रथम प्रकाशित केली. पुढे १९५३मध्ये त्यांचंच सेक्शुअल बिहेवियर इन द ह्यूमन फीमेल' प्रकाशित झालं. दोन्ही पुस्तकं एकत्रितपणे 'किन्सी रिपोर्ट्स' म्हणून ओळखली जातात.

kinsey scale.jpg

बारकाईने पाहिल्यास लक्षात येईल की १००% हेटेरोसेक्शुअल या वर्गवारीत कोणीच येत नाही. किन्सीच्या निरीक्षणांनुसार सर्वांनाच आयुष्यात कधी ना कधी समानलिंगियांबद्दल आकर्षण वाटलेलं असतं.

मर्यादित स्वरूपाचं का असेना, पण अशा प्रकारचं हे पहिलंच सर्वेक्षण/संशोधन सामान्य जनतेसमोर येत होतं. पाश्चात्य समाजमनात लैंगिक अल्पसंख्यांकांच्या स्वीकारार्हतेतली ही पहिली पायरी होती, म्हणूनच डॉ. किन्सींच्या उल्लेखाशिवाय हे लेखन अपूर्ण ठरेल.

लैंगिक अल्पसंख्यांकांच्या सगळ्या प्रकारांसाठी सर्वसमावेशक नाव म्हणून आता 'क्विअर' (Queer) ही संज्ञा वापरतात. क्विअरचा मूळ शब्दार्थ विचित्र किंवा बिघडलेला असा होतो. खरंतर ही समाजाने त्यांना दिलेली शिवीच होती. पण एकविसाव्या शतकात त्यांनी हे संदर्भ पालटवून तीच संज्ञा अभिमानाने मिरवायला सुरुवात केली आहे.

जेन्डर आयडेन्टिटी आणि सेक्शुअल ओरिएन्टेशन यात संबंध असेलच असं नाही. म्हणजे उदाहरणार्थ प्रत्येक ट्रान्सजेन्डर व्यक्ती होमोसेक्शुअल असेलच असं काही नसतं आणि प्रत्येक होमोसेक्शुअल व्यक्ती ट्रान्सजेन्डर असेल असंही नाही.
त्याउलट असंही होऊ शकतं की एखाद्या शारीरिकदृष्ट्या स्त्री असणाऱ्या व्यक्तीची जेन्डर आयडेन्टिटी पुरुष ही आहे आणि हा पुरुष होमोसेक्शुअलही आहे, म्हणून या व्यक्तीला पुरुष आवडतात. पण याचा अर्थ ती 'स्ट्रेट स्त्री' आहे असा नसतो.

रोमॅन्टिक ओरिएन्टेशन हे सेक्शुअल ओरिएन्टेशनहून निराळं असू शकतं. म्हणजे एखाद्या सेक्शुअली स्ट्रेट मुलाला स्त्रियांविषयी शारीरिक ओढ वाटते, पण रोमॅन्टिक जवळीक फक्त पुरुषांशीच होते असंही होऊ शकतं.

genderunicorn1.0.jpg

एव्हाना L(esbian), G(ay), B(isexual), T(ransgender), Q(ueer), I(ntersex) या संज्ञा काही प्रमाणाततरी आपल्याला समजल्या.

यापुढची पायरी त्यांचे प्रश्न आणि त्यांचा संघर्ष समजून घेण्याची.

नैसगिकरीत्त्या चारचौघांपेक्षा वेगळं असण्याची खूप मोठी किंमत या व्यक्ती मोजतात. मुळात स्वतःच्या शरीराशी आणि मनाशी जुळवून घेतानाच त्यांची ओढाताण होते, विशेषत: लहान वयात. असं असणं त्यांनी ठरवून निवडलेलं नसतं. आपण निराळे म्हणजे नक्की काय आणि कसे आहोत, आपल्या जाणिवा, संवेदना, आकर्षणं आपल्या समवयस्कांसारखी का नाहीत, आपल्याला झालंय तरी काय, आपल्याला हवंय तरी काय - हे आपलं आपल्यालाच नीट समजत नाही, ते कोणाला सांगून कळायची शक्यता किती?
कुटुंब आणि समाज त्यांना द्विमित (बायनरी) रकान्यांपैकी कुठल्यातरी एकात कोंबून बसवायचा प्रयत्न करतो. आपली म्हणावीत तीच माणसं समजून घ्यायचं नाकारून धाक दाखवण्यापासून सक्तीने अघोरी उपचार करण्यापर्यंत काहीही करायला धजावतात - केवळ अज्ञानापोटी आणि लोक काय म्हणतील या भीतीने! यात अनेकदा दुर्दैवाने वैद्यकीय व्यावसायिकही सामील होतात.

हा आजार नाही, औषधा-शस्त्रक्रियांनी तो ‘बरा’ तर होत नाहीच, उलट अशा ‘औषधां’च्या कॅन्सरपासून ते त्वचारोग, शारीरिक विरूपता (disfiguration) यांसारख्या दुष्परिणामांना त्यामुळे सामोरं जावं लागू शकतं.

शारीरिक आणि मानसिक पातळीवर या जखमा भरून येणं अवघड असतं.
स्वत्व झाकून नैसर्गिक उर्मी मारत निमूट चारचौघांसारखं जगणं किंवा उघडपणे आपलं निराळेपण व्यक्त करून त्याचे असले परिणाम भोगणं हे दोन्ही पर्याय तितकेच भयंकर असतात. त्यामुळेच लैंगिक अल्पसंख्यांकांत नैराश्य (major depression or generalized anxiety disorder), व्यसनाधीनता, आत्महत्येचे विचार यांसारख्या मानसिक विकारांनी ग्रासलं जाण्याची शक्यता जवळजवळ तिपटीने वाढते.

माणसासारखी माणसं, ज्यांनी कोणाचंही काहीही वाईट केलेलं नाही, जी आनंदाने सुंदर आयुष्य जगू शकली असती, प्रेम देऊ आणि घेऊ शकली असती, ती या नसत्या चक्रांत अडकतात, फरफटतात! केवळ तुम्हीआम्ही त्यांना समजून आणि सामावून घ्यायला कमी पडतो म्हणून!

एखादा माणूस डावखुरा आहे किंवा एखाद्याला सहा बोटं आहेत हे आपण किती सहज स्वीकारतो! तितक्या सहज लैंगिक अल्पसंख्यांकांना स्वीकारत नाही.
का?

(क्रमशः)

तळटीप:
१. आधी लिहिल्यानुसार मी या विषयात तज्ज्ञ नाही, तसंच माझ्या निकटच्या परिचयातील कोणी लैंगिक अल्पसंख्यांकांत मोडत असल्यास मला त्याबद्दल कल्पना नाही, मी इथे देत असलेली माहिती सर्वसामान्यांसारखी गूगल करून मिळवली आहे (जिथून घेतली ते दुवे खाली दिले आहेत). ती काही अंशी चुकीची किंवा अपूर्ण असूच शकते. तुम्हाला त्यात काही त्रुटी आढळून आल्या तर त्या जरूर नोंदवा.

२. आधीच्या लेखावर आलेल्या प्रतिक्रियांमध्ये किन्नर किंवा ज्यांना आपण 'हिजडे' किंवा तॄतीयपंथी म्हणून ओळखतो त्यांचा उल्लेख आलेला दिसला. इंग्रजीत यांना eunuch म्हणतात. यांत काही वर उल्लेख आलेले इन्टरसेक्स लोक, तर बहुतांशी लहान वयात बळजबरीने खच्चीकरण केले गेलेले लोक यांचा समावेश असतो. अशा प्रकारे खच्चीकरण झाल्यामुळे त्यांच्या हॉर्मोनल बॅलन्सवर परिणाम होतो. हा प्रकार वरील चर्चेत घेतला नव्हता कारण तो त्यांच्या नैसर्गिक जडणघडणीत आणि वाढीत केल्या गेलेल्या मानवी ढवळाढवळीमुळे निर्माण झाला आहे. त्यांचं जीवनही अवघड असतंच, पण तो विषय मोठा आणि या लेखाच्या कक्षेबाहेरचा आहे.

यानंतरच्या लेखात लैंगिक अल्पसंख्यांकांबद्दलच्या प्रचलित गैरसमजांबद्दल लिहायचा मानस आहे.

संदर्भः
https://schools.au.reachout.com/articles/gender-and-sexuality
https://www.vox.com/2015/4/24/8483561/transgender-gender-identity-expres...
https://www.nytimes.com/2015/08/23/opinion/sunday/richard-a-friedman-how...

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एका अवघड (पण अत्यावश्यक) विषयावर या लेखमालिकेतून तुम्ही लिहीत आहात याबद्दल मनापासून अभिनंदन आणि धन्यवादही!
मालिकेतले दोन्ही लेख सोपे, सर्वसमावेशक झाले आहेत. या पुढील लेखनासाठी खूप सार्‍या शुभेच्छा!

मराठीमध्ये sex साठी लिंग आणि gender साठी लिंगभाव हे शब्द वापरले जातात.
आता लेख वाचते. या series मधील पहिला लेख उत्तम होता.

छान लेख,

एक सूचना- सिरीज ला एक नाव देता येईल का?
सिरीज नाव- भागाचे नाव अश्या form मध्ये

चांगला झालाय हा भाग.
एकंदरच Its Complicated आहे म्हणजे.

> बारकाईने पाहिल्यास लक्षात येईल की १००% हेटेरोसेक्शुअल या वर्गवारीत कोणीच येत नाही. किन्सीच्या निरीक्षणांनुसार सर्वांनाच आयुष्यात कधी ना कधी समानलिंगियांबद्दल आकर्षण वाटलेलं असतं. > हे तर आहेच. आणि कुठेतरी वाचलेल की स्त्रियांची लैंगिकता पुरुषांइतकी वेलडिफाईन्ड नसते. पुरुषाचे होमो-हेट्रो असे स्पष्ट वर्गीकरण करता येते पण स्त्रीमात्र अधेमधे कुठेतरी दोलायमान असते. मग जर ५०% लोकसंख्या असलेल्या स्त्रिया bi गटात टाकल्या तर त्या + ५-१०% हेट्रो नसलेले पुरुष म्हणजे एकूण लोकसंख्येपैकी बहुसंख्य हे नॉनहेट्रो आहेत कि!

> त्याउलट असंही होऊ शकतं की एखाद्या शारीरिकदृष्ट्या स्त्री असणाऱ्या व्यक्तीची जेन्डर आयडेन्टिटी पुरुष ही आहे आणि हा पुरुष होमोसेक्शुअलही आहे, म्हणून या व्यक्तीला पुरुष आवडतात. पण याचा अर्थ ती 'स्ट्रेट स्त्री' आहे असा नसतो. > हे भारी आहे!

काही प्रकार माहिती होते.. उगाच काहिही वाचायची हौस असल्याने.. काही एकदम नवीन.
अचानक वाटलं जे genuine लोक आणि उगाच त्यांच्याशी बांधले गेलेले त्यांचे पार्टनर यांची केवढी कुचंबना होत असेल .. फरफट होणार आयुष्यभर.. भारतात तर सगळं स्वीकारण्याआधी, लोकांना सगळं समजायलाच किती वेळ जाईल

एका अवघड (पण अत्यावश्यक) विषयावर या लेखमालिकेतून तुम्ही लिहीत आहात याबद्दल मनापासून अभिनंदन आणि धन्यवादही!
मालिकेतले दोन्ही लेख सोपे, सर्वसमावेशक झाले आहेत.>>+१
सोप्या मराठीतली ही लेखमाला सर्वांनाच खूप मार्गदर्शक होवो.

"माणसासारखी माणसं, ज्यांनी कोणाचंही काहीही वाईट केलेलं नाही, जी आनंदाने सुंदर आयुष्य जगू शकली असती, प्रेम देऊ आणि घेऊ शकली असती, ती या नसत्या चक्रांत अडकतात, फरफटतात! केवळ तुम्हीआम्ही त्यांना समजून आणि सामावून घ्यायला कमी पडतो म्हणून!"
>> खूप छान लिहीत आहात.

एका अवघड (पण अत्यावश्यक) विषयावर या लेखमालिकेतून तुम्ही लिहीत आहात याबद्दल मनापासून अभिनंदन आणि धन्यवादही! +१

दोनही लेख वाचले. शक्य असेल तिथे हे शेअर व्हायला पाहिजे.
निदान "या लोकांनी परदेशात जाउन राहीले पाहिजे, या लोकांची किळस वाटते, माझं मूल असं असेल तर मी त्याच्याशी बोलणार सुद्धा नाही" अशा कमेंट्स करणारे लोक थोडा विचार करतील अशी आशा.

लैंगिक ओळख लिहिताना अंकात व्यक्त करायची झाल्यास
मेल : १
फिमेल : २
आदर : ३
अशाप्रकारे लिहिण्याचा प्रघात आहे. बोलतानाही आपण या आदर कॅटेगरीचा उल्लेख तृतीयपंथी असा करतो. तरीही आपल्या मनात कुठेतरी हे मधले म्हणजे स्त्री आणि पुरुष यांच्या मधले आहेत असे येत राहते. म्हणजे स्केलच्या एका टोकाला स्त्री आणि दुसर्‍या टोकाला पुरुष अशी विभागणी केली तर हे लोक या स्केलवर मधे कुठेतरी असावेत अशी कल्पना असते. मग ते त्यांच्या आवाजाबद्दल असेल, दिसण्याबद्दल असेल किंवा इतर काही शारिरीक वैशिष्ट्यांबद्दल असेल.

पण ...

मला जाणवलेली एक गोष्ट जी हा लेख वाचताना पुन्हा प्रकर्षाने आठवली ती अशी -

काही अपवाद वगळता ऑन अ‍ॅन अ‍ॅव्हरेज किंवा नॉर्मल पुरुष हा ऑन अ‍ॅन अ‍ॅव्हरेज किंवा नॉर्मल स्त्री पेक्षा जास्त मस्क्यूलाईन असतो. म्हणजेच पुरुषी शरीरात स्नायूंचे प्रमाण अधिक व चरबीचे प्रमाण कमी असते तर स्त्रीच्या शरीरात ह्याच्या नेमके उलट असते. त्यामुळे शारिरीक ताकद जी मुख्यत्वेकरुन मारामारीचा प्रकार झाल्यास महत्त्वाची ठरते ती पुरुषांमध्ये अधिक असते. पुरुषाच्या हाताची पकड घट्ट, समोरच्याच्या शरीराला जास्त वेदनादायक ठरु शकते. तसेच एखाद्याला हाताने मारलेला फटका, थप्पड हे पुरुषाच्या हाताने घडल्यास जास्त आघात करणारे असते. याउलट स्त्रीच्या शरीरात चरबी जास्त असल्याने त्यांच्या हाताची पकड किंवा त्यांनी मारलेल्या थपडा / फटके हे फारसे वेदनादायी नसतात. या गोष्टी विचारात घेऊनच साधारणपणे प्राथमिक शाळेत महिलांना अध्यापनाचे काम दिले जाते तर उच्च माध्यमिक आणि त्यात दांडग्या मुलांच्या वर्गांवर पुरुषांचीच नेमणूक शिकविण्याकरिता केली जाते. असो. तर आता हे ऑन अ‍ॅन अ‍ॅव्हरेज किंवा नॉर्मल तृतीयपंथी मात्र ह्या मस्क्यूलाईन स्केल वर स्त्री व पुरुष यांच्या मध्ये न येता ऑन अ‍ॅन अ‍ॅव्हरेज किंवा नॉर्मल पुरुषांपेक्षाही अधिक मस्क्यूलाईन असतात असे माझे निरीक्षण आहे. रेल्वेत वगैरे कधी हे हिजडे पैसे मागायला येतात. दिले नाहीत तर गालावरुन हात फिरविणे, अंगचटीला येणे असे प्रकार करतात तेव्हा त्यांचा हात जोराने झटकून टाकताना किंवा त्यांना ढकलून बाजूला करताना ते चांगलेच काटक (शरीरसौष्ठव स्पर्धेत दिसणार्‍या बॉडीबिल्डर प्रमाणे पीळदार डोले शोले असणारे नव्हे) असल्याचे जाणवते. त्यांच्या हाताची पकडही चांगलीच मजबूत असते. त्यांना निदान शारिरीक ताकदीच्या बाबतीत तरी मधले म्हणता येणार नाही.

{{{ १००% हेटेरोसेक्शुअल या वर्गवारीत कोणीच येत नाही. किन्सीच्या निरीक्षणांनुसार सर्वांनाच आयुष्यात कधी ना कधी समानलिंगियांबद्दल आकर्षण वाटलेलं असतं. }}}

ठळक केलेलं वाक्य आणि नैसर्गिकरीत्या कोणीच गे / बायसेक्शुअल किंवा लेस्बियन नसतो/ते सर्वच जण निसर्गतःच स्ट्रेटच असतात ही पूर्वापार समाजात आढळणारी समजूत एकाच प्रकारची विचारसरणी दर्शवित नाहीत का?

सर्व प्रतिसाददात्यांचे मन:पूर्वक आभार.

सिम्बा, तुमच्या सूचनेनुसार शीर्षकात बदल केला आहे. (मला खरंतर ते 'आम्ही आपण असू लाडके' असं लिहायचं होतं, पण शीर्षकाच्या रकान्यात तसं करता येत नाहीये.)

बिपिन चन्द्र, ते ठळक केलेलं वाक्य किन्सीच्या निरीक्षणा/सर्वेक्षणातून आलेल्या आराखड्याबद्दलचं आहे. डॉ. किन्सी यांनी जवळपास दोन हजार सेक्स हिस्टरीजचा अभ्यास करून त्यावरून हा निष्कर्ष काढला होता. ती 'विचारसरणी' नाही, संशोधनाचा परिपाक आहे.
त्याउलट 'समाजात पूर्वापार' (कुठल्या समाजात आणि किती पूर्वीपासून - याबद्दल पुढच्या भागात लिहायचा विचार आहे.) आढळणारी समजूत ही केवळ 'समजूत'च आहे, त्यामागे कोणताही अभ्यास वा संशोधन नाही. तसंच ती समजूत पूर्णपणे चुकीची आहे हे वरील विवेचनावरून स्पष्ट झालं असेलच.

तसंच 'हिजड्यां'बद्दलची तळटीप वाचलीत तर अनेकदा ते सक्तीने खच्चीकरण केलेले पुरुषच असतात हे लक्षात येईल - तेव्हा ते पुरुषी दिसले तर त्यात नवल नाही.

'आपण असू लाडके' या शीर्षकाला केशवसुतांच्या
आम्ही कोण म्हणूनि काय पुससी? आम्ही असू लाडके-
देवाचे, दिधले असे जग तये आम्हांस खेळावया

या ओळींचा संदर्भ आहे. त्यातला 'आम्ही' हा अधिक समावेशक 'आपण'मध्ये परिवर्तित व्हावा हाच या लेखमालेचा उद्देश आहे. तेही आपल्यासारखाच, आपल्याइतकाच निसर्गाचाच भाग आहेत आणि जगाच्या क्रीडांगणावर खेळण्यातला निर्मळ निर्वेध आनंद घेण्याचा त्यांनाही तितकाच अधिकार असायला हवा अशी या शीर्षकामागची भावना आहे. Happy

हा ही लेख छान आहे.

१००% हेटेरो कोणीच नसते याचे आश्चर्य वाटले. कदाचित सॅम्पल मुळे आलेला एरर असू शकेल काय?

फा, किन्सीचा स्टडी आजच्या कसोटीने मर्यादित होता हे खरंच आहे, पण हे त्यामानाने अलीकडे प्रकाशित झालेलं संशोधन पहा. यातही किन्सीच्या १००% हेटेरोसेक्शुअल कोणीच नसतं या निरीक्षणाला पुष्टी मिळते.

अश्या लेखांमुळे हे संवाद चालू राहुन हळू हळू विचारांचा भाग बनतील. परदेशातील भारतीय ह्या बाबतीत किती ओपन माइंडेड आहेत? तेथे जन्मलेली व वाढलीली पिढी जर आपले चॉइस एक्सरसाइज करू पाहु लागली तर त्यांचे आईवडील कसे रिअ‍ॅक्ट होतात? मॅट्रिमोनिअल साइट वर अश्या ओरिएंटेशन्च्या मुलांसंबधी काय लिहीतात? का लपवतात?

लिंकबद्दल धन्यवाद. लेख चांगला आहे.
जे के रोलिंग आणि तत्सम स्त्रिया यांचा ट्रान्स व्यक्तींशी असलेला वाद हा - trans women ARE women आणि trans women are trans women असा आहे.
म्हणजे या व्यक्तींची तिसरी जेंडर कॅटेगरी निर्माण करा. मनातून त्यांना काहीही वाटत असेल तरी लीगल/पॉलिसी मॅटर्स मध्ये नैसर्गिक स्त्रियांची सुरक्षितता, हक्क यावर ट्रान्स व्यक्तींचं अतिक्रमण नको.
स्त्रियांसाठी safe places हा एक concept आहे. स्त्री समाज हा पिढ्यानपिढ्या oppressed आहे. म्हणून या सेफ स्पेसेसची गरज आहे. या सेफ प्लेसेस मध्ये ट्रान्स व्यक्तींना access असू नये. त्यांना हवंतर वेगळे स्पेस द्या. (स्त्रियांचे वेगळे बाथरूम्स, डोमेस्टिक अब्युज शेल्टर, हॉस्पिटलमध्ये वेगळे विंग, वेगळे प्रिझन- हे सर्व सेफ प्लेसेस मध्ये येतात.) आधीच हे रिसोर्स तुटपुंजे पडतात, त्यात नवीन वाटेकरी कुठे करता.
स्त्रियांच्या स्पोर्ट्समध्ये एखाद्या पुरुषाने 'मनाने मी स्त्रीच आहे' म्हणून भाग घेणं योग्य नाही.

हा वाद जन्माने स्त्री आणि नंतर पुरुष झालेल्या व्यक्ती घालत नाहीत. ते गप्प बसतात.
म्हणजे जन्माने पुरुष असलेल्यांचं male privilege , male aggressiveness यातून ते आक्रमक बनतात का?

थोडक्यात- ट्रान्स व्यक्तींबद्दल सहानुभूती आहे. त्यांना त्यांचे वेगळे स्पेसेस असावे. पण नैसर्गिक स्त्रियांशी १००% बरोबरी आणि समानता असा हट्ट त्यांनी धरू नये.

उदाहरण- एखादा white माणूस जर म्हणाला की मी जन्माने white आहे but I identify as black- तर लोक म्हणतील की ओके, तुला जसं हवं तसं तू identify कर. पण पुढे जाऊन तो म्हणाला की आता मला आरक्षण/affirmative action द्या, तर ते त्याला मिळेल का?

ट्रान्स्जेन्डर असणं ही विकृती नाही इतकं मान्य असेल तर बाकी बारकाव्यांवर नक्कीच खुलेपणाने चर्चा होऊ शकते - नव्हे, व्हावीच.

>>> त्रियांच्या स्पोर्ट्समध्ये एखाद्या पुरुषाने 'मनाने मी स्त्रीच आहे' म्हणून भाग घेणं योग्य नाही.
शारीरिक क्षमतेतील किंवा आकारमानातील फरकांमुळे म्हणताहात का?
ऑलिम्पिक्समध्ये अनेक देशांतील खेळाडू भाग घेतात. त्यात आशियाई देशांतील स्पर्धक हे इतर काही देशांतील स्पर्धकांपेक्षा सहसा चणीने लहानखुरे असतात. म्हणजे उदा. जपानी स्त्रीच काय, पण पुरुष स्पर्धकही एखाद्या रशियन स्त्री स्पर्धकाच्या तुलनेत लहानखुरा असेल. काही क्रीडाप्रकारांत वय/उंची/वजन यांनुसार स्पर्धकांचं वर्गीकरणही केलं जातं. मग पुरुषदेहात जन्माला आलेल्या स्त्रीला इतर स्त्रियांबरोबर भाग घेऊ देण्यात काय प्रॉब्लेम आहे?

खेळात शरीराला मनाची साथ लागते.
मनाने स्त्री + शरीराने पुरुष ........................ दोन्ही ऑप्शन्स द्या त्यांना. लेट देम चुझ.
मनाने पुरुष + शरीराने स्त्री ........................ दोन्ही ऑप्शन्स द्या त्यांना. लेट देम चुझ.
मनाने पुरुष + लिंगबदल करुन पुरुष झालेली व्यक्ती - पुरुष गट
मनाने स्त्री+ लिंगबदल करुन स्त्री झालेली व्यक्ती - स्त्री गट

<< त्रियांच्या स्पोर्ट्समध्ये एखाद्या पुरुषाने 'मनाने मी स्त्रीच आहे' म्हणून भाग घेणं योग्य नाही. >>
काळजी नको. हे ऑलरेडी झाले आहे. कनेक्टिकट की नॉर्थईस्टच्या कुठल्यातरी कॉलेजमध्ये ॲडमिशन घेताना असे झाल्याचे वाचले होते. (आता लिंक मिळत नाहीये).

पुरुषदेहात जन्माला आलेल्या स्त्रीला इतर स्त्रियांबरोबर भाग घेऊ देण्यात काय प्रॉब्लेम आहे? >> खरं म्हणजे पुरुष आणि स्त्रियांच्या वेगळ्या स्पर्धा कशासाठी? पण मुळात शारीरिक फरकामुळे त्या वेगळ्या ठेवल्या जातात. मग असं जर असेल, तर निकष केवळ शारीरिक असावा, मानसिक नको. मनाने स्त्री असली तरी पुरुषाचं शरीर असेल तर पुरुषांशी स्पर्धा करण्यासच पात्र व्हावी.

पण मुळात शारीरिक फरकामुळे त्या वेगळ्या ठेवल्या जातात.
>>>>

बुद्धीबळ (चेस) एकत्र असते की वेगळी?
माझ्या माहितीप्रमाणे वेगळी..
कर्रेक्ट असल्यास, का?

Pages