आपण असू लाडके : २. इंद्रधनुष्यात किती रंग?

Submitted by स्वाती_आंबोळे on 20 January, 2019 - 23:36

यापूर्वीचा लेखः १. गुलाबी त्रिकोणात कैद
यानंतरचा लेखः ३. समज आणि गैरसमज

हा लेख मराठीत लिहिणं काहीसं अवघड असणार आहे. त्याचं कारण माझ्या माहितीनुसार मराठीत मुळात sex आणि gender यांसाठीसुद्धा निरनिराळे शब्द नाहीत. आणि आपण लिंगभान, लिंगाभिव्यक्ती आणि लैंगिक कल (gender identity, gender expression आणि sexual orientation) यांबद्दल तपशिलात बोलणार आहोत.

मला वाटतं, सध्या मी गोंधळ टाळण्यासाठी इंग्रजी शब्दप्रयोगच वापरते. आपल्यापैकी कोणाला जर यात आलेल्या संज्ञांसाठी चपखल मराठी प्रतिशब्द सापडले तर त्यानुसार लेखात बदल करू.

तर सेक्स म्हणजे व्यक्तीच्या शारीरिक जडणघडणीनुसार ठरणारं लिंग. यात पुनरुत्पादनाशी निगडीत अवयव, अन्य बाह्य लक्षणं (उदा. दाढीमिशा), गुणसूत्रं आणि संप्रेरकं (हॉर्मोन्स) आली. बहुतांशी हे स्त्री अणि पुरुष या दोन गटांत विभागलं जातं. काही बाळांना जन्मतःच दोन्ही प्रकारचे पुनरुत्पादनाचे अवयव असतात. यांना 'इन्टरसेक्स' असं म्हणतात. तरी असं म्हणता येईल की शारीरिकदृष्ट्या ढोबळमानाने हे तीन गट होतात.

जेन्डर हा त्यामानाने थोडा गुंतागुंतीचा भाग आहे.
एखाद्या शरीरात राहणारी व्यक्ती तिच्या चेतासंस्थेच्या (neurological) जडणघडणीनुसार (मेंदू, मज्जारज्जू आणि चेतापेशी) कोणत्या लिंगाची आहे याचं उत्तर म्हणजे जेन्डर आयडेन्टिटी असं म्हणता येईल. ‘मानसिक’ लिंग असं म्हणायचं मी मुद्दाम टाळते आहे कारण त्यातून ‘हे मनाचे खेळ आहेत’ असा चुकीचा अर्थ लागू नये.

व्यक्तीचे तिच्या अंतःप्रेरणेनुसार होणारे आहारविहार/आचारविचार हे झालं तिचं जेन्डर एक्स्प्रेशन.

जेन्डर आयडेन्टिटी आणि एक्स्प्रेशन यांचं सेक्सप्रमाणे दोनतीन रकान्यांत वर्गीकरण करता येत नाही - ते एक रंगपटल (स्पेक्ट्रम) आहे. १००% स्त्रीत्व आणि १००% पुरुषत्व यांच्या अधेमधे कुठेतरी आपण सगळे असतो.

त्यातही गंमत अशी की कोणाचं जेन्डर एक्स्प्रेशन कसं असावं याबद्दल समाजाचे शारीरिक लिंगाधारित काही ठोकताळे असतात. ते स्थलकालानुसार बदलतात. म्हणजे लांब केस ठेवले म्हणून शीख मुलगा 'बायकी' दिसतो असं कोणी म्हणणार नाही आणि पॅन्ट घातलेली बाई आता आपल्याला 'पुरुषी' वाटत नाही. पण एखाद्या पुरुषाला नेहमी साडी नेसावी वाटली तर?

बहुतेकांच्या बाबतीत कमीजास्त प्रमाणात सेक्स, जेन्डर आयडेन्टिटी आणि जेन्डर एक्स्प्रेशन हे साधारणपणे पारड्याच्या एकाच बाजूला झुकतात. अशांना सिसजेन्डर (cisgender) असं म्हणतात. पण काही व्यक्तींच्या बाबतीत तसं होत नाही.
कधीकधी पुरुष स्त्रीच्या शरीरात जन्माला येतो किंवा त्याउलटही. या व्यक्तींना ट्रान्सजेन्डर असं म्हणतात.

हा फरक अगदी नैसर्गिक (natural variation) आणि अंगभूत (hard-wired) असतो.

transg_natural_brain.jpg
(चित्र श्री. दिलीप नगरकर आणि देसी रेनबो पेरेन्ट्स अ‍ॅन्ड अ‍ॅलाइज या संस्थेच्या सौजन्याने)

काही व्यक्तींची जेन्डर आयडेन्टिटी स्त्री आणि पुरुष अशा दोन टोकांच्या मध्ये हालणाऱ्या लंबकाप्रमाणे बदलत राहते - हे झाले जेन्डर-फ्लुइड लोक.
तर काही व्यक्ती या जेन्डर आयडेन्टिटी स्पेक्ट्रमच्या पूर्णपणे बाहेरच असतात - त्या स्वतःला नॉन बायनरी म्हणवतात.

अजून विषय 'स्व'पुरता मर्यादित आहे आणि एव्हानाच गणिताच्या भाषेत बोलायचं तर त्यात ढोबळमानानेसुद्धा (३ सेक्स * किमान ३ जेन्डर आयडेन्टिटीज * किमान २ जेन्डर एक्सप्रेशन्स = ) अठरा प्रकार झाले.

हे किमान.

यानंतर येतं सेक्शुअल ओरिएन्टेशन आणि रोमॅन्टिक ओरिएन्टेशन.
हेदेखील स्पेक्ट्रम्स असतात.

ज्या व्यक्तीला फक्त भिन्नलिंगी (other sex) व्यक्तींशी शरीरसंबंध ठेवावेसे वाटतात तिला हेटेरोसेक्शुअल किंवा बोलीभाषेत 'स्ट्रेट' म्हणतात.
याचं दुसरं टोक म्हणजे होमोसेक्शुअल व्यक्ती - यांना केवळ समानलिंगी (same sex) व्यक्तींशीच शरीरसंबंध ठेवावेसे वाटतात.
पुरुष होमोसेक्शुअल्सना गे तर स्त्री होमोसेक्शुल्सना लेस्बियन असंही म्हणतात.
काहींना समानलिंगी आणि भिन्नलिंगी दोहोंतही रस असतो - हे झाले बायसेक्शुअल.
काहींना सर्व सेक्स, आणि सर्व जेन्डर आयडेन्टिटीज शरीरसंबंधांसाठी आवडतात. त्यांना पॅनसेक्शुअल असं म्हणतात.
एसेक्शुअल लोकांना कोणाशीही शरीरसंबंध ठेवावेसे वाटत नाहीत.

लैंगिक कलातील हे फरक(variations)सुद्धा नैंसर्गिकरीत्या घडून आलेले आणि अंगभूत (hardwired) असतात.
homo_natural_brain_orientation.jpg
(चित्र श्री. दिलीप नगरकर आणि देसी रेनबो पेरेन्ट्स अ‍ॅन्ड अ‍ॅलाइज या संस्थेच्या सौजन्याने)

१९४८मध्ये 'लैंगिकता-क्रांतीचा जनक' समजल्या जाणार्‍या डॉ. अल्फ्रेड किन्सी यांनी त्यांच्या सर्वेक्षणावर आधारित 'सेक्शुअल बिहेवियर इन द ह्यूमन मेल' या पुस्तकात 'किन्सी स्केल' प्रथम प्रकाशित केली. पुढे १९५३मध्ये त्यांचंच सेक्शुअल बिहेवियर इन द ह्यूमन फीमेल' प्रकाशित झालं. दोन्ही पुस्तकं एकत्रितपणे 'किन्सी रिपोर्ट्स' म्हणून ओळखली जातात.

kinsey scale.jpg

बारकाईने पाहिल्यास लक्षात येईल की १००% हेटेरोसेक्शुअल या वर्गवारीत कोणीच येत नाही. किन्सीच्या निरीक्षणांनुसार सर्वांनाच आयुष्यात कधी ना कधी समानलिंगियांबद्दल आकर्षण वाटलेलं असतं.

मर्यादित स्वरूपाचं का असेना, पण अशा प्रकारचं हे पहिलंच सर्वेक्षण/संशोधन सामान्य जनतेसमोर येत होतं. पाश्चात्य समाजमनात लैंगिक अल्पसंख्यांकांच्या स्वीकारार्हतेतली ही पहिली पायरी होती, म्हणूनच डॉ. किन्सींच्या उल्लेखाशिवाय हे लेखन अपूर्ण ठरेल.

लैंगिक अल्पसंख्यांकांच्या सगळ्या प्रकारांसाठी सर्वसमावेशक नाव म्हणून आता 'क्विअर' (Queer) ही संज्ञा वापरतात. क्विअरचा मूळ शब्दार्थ विचित्र किंवा बिघडलेला असा होतो. खरंतर ही समाजाने त्यांना दिलेली शिवीच होती. पण एकविसाव्या शतकात त्यांनी हे संदर्भ पालटवून तीच संज्ञा अभिमानाने मिरवायला सुरुवात केली आहे.

जेन्डर आयडेन्टिटी आणि सेक्शुअल ओरिएन्टेशन यात संबंध असेलच असं नाही. म्हणजे उदाहरणार्थ प्रत्येक ट्रान्सजेन्डर व्यक्ती होमोसेक्शुअल असेलच असं काही नसतं आणि प्रत्येक होमोसेक्शुअल व्यक्ती ट्रान्सजेन्डर असेल असंही नाही.
त्याउलट असंही होऊ शकतं की एखाद्या शारीरिकदृष्ट्या स्त्री असणाऱ्या व्यक्तीची जेन्डर आयडेन्टिटी पुरुष ही आहे आणि हा पुरुष होमोसेक्शुअलही आहे, म्हणून या व्यक्तीला पुरुष आवडतात. पण याचा अर्थ ती 'स्ट्रेट स्त्री' आहे असा नसतो.

रोमॅन्टिक ओरिएन्टेशन हे सेक्शुअल ओरिएन्टेशनहून निराळं असू शकतं. म्हणजे एखाद्या सेक्शुअली स्ट्रेट मुलाला स्त्रियांविषयी शारीरिक ओढ वाटते, पण रोमॅन्टिक जवळीक फक्त पुरुषांशीच होते असंही होऊ शकतं.

genderunicorn1.0.jpg

एव्हाना L(esbian), G(ay), B(isexual), T(ransgender), Q(ueer), I(ntersex) या संज्ञा काही प्रमाणाततरी आपल्याला समजल्या.

यापुढची पायरी त्यांचे प्रश्न आणि त्यांचा संघर्ष समजून घेण्याची.

नैसगिकरीत्त्या चारचौघांपेक्षा वेगळं असण्याची खूप मोठी किंमत या व्यक्ती मोजतात. मुळात स्वतःच्या शरीराशी आणि मनाशी जुळवून घेतानाच त्यांची ओढाताण होते, विशेषत: लहान वयात. असं असणं त्यांनी ठरवून निवडलेलं नसतं. आपण निराळे म्हणजे नक्की काय आणि कसे आहोत, आपल्या जाणिवा, संवेदना, आकर्षणं आपल्या समवयस्कांसारखी का नाहीत, आपल्याला झालंय तरी काय, आपल्याला हवंय तरी काय - हे आपलं आपल्यालाच नीट समजत नाही, ते कोणाला सांगून कळायची शक्यता किती?
कुटुंब आणि समाज त्यांना द्विमित (बायनरी) रकान्यांपैकी कुठल्यातरी एकात कोंबून बसवायचा प्रयत्न करतो. आपली म्हणावीत तीच माणसं समजून घ्यायचं नाकारून धाक दाखवण्यापासून सक्तीने अघोरी उपचार करण्यापर्यंत काहीही करायला धजावतात - केवळ अज्ञानापोटी आणि लोक काय म्हणतील या भीतीने! यात अनेकदा दुर्दैवाने वैद्यकीय व्यावसायिकही सामील होतात.

हा आजार नाही, औषधा-शस्त्रक्रियांनी तो ‘बरा’ तर होत नाहीच, उलट अशा ‘औषधां’च्या कॅन्सरपासून ते त्वचारोग, शारीरिक विरूपता (disfiguration) यांसारख्या दुष्परिणामांना त्यामुळे सामोरं जावं लागू शकतं.

शारीरिक आणि मानसिक पातळीवर या जखमा भरून येणं अवघड असतं.
स्वत्व झाकून नैसर्गिक उर्मी मारत निमूट चारचौघांसारखं जगणं किंवा उघडपणे आपलं निराळेपण व्यक्त करून त्याचे असले परिणाम भोगणं हे दोन्ही पर्याय तितकेच भयंकर असतात. त्यामुळेच लैंगिक अल्पसंख्यांकांत नैराश्य (major depression or generalized anxiety disorder), व्यसनाधीनता, आत्महत्येचे विचार यांसारख्या मानसिक विकारांनी ग्रासलं जाण्याची शक्यता जवळजवळ तिपटीने वाढते.

माणसासारखी माणसं, ज्यांनी कोणाचंही काहीही वाईट केलेलं नाही, जी आनंदाने सुंदर आयुष्य जगू शकली असती, प्रेम देऊ आणि घेऊ शकली असती, ती या नसत्या चक्रांत अडकतात, फरफटतात! केवळ तुम्हीआम्ही त्यांना समजून आणि सामावून घ्यायला कमी पडतो म्हणून!

एखादा माणूस डावखुरा आहे किंवा एखाद्याला सहा बोटं आहेत हे आपण किती सहज स्वीकारतो! तितक्या सहज लैंगिक अल्पसंख्यांकांना स्वीकारत नाही.
का?

(क्रमशः)

तळटीप:
१. आधी लिहिल्यानुसार मी या विषयात तज्ज्ञ नाही, तसंच माझ्या निकटच्या परिचयातील कोणी लैंगिक अल्पसंख्यांकांत मोडत असल्यास मला त्याबद्दल कल्पना नाही, मी इथे देत असलेली माहिती सर्वसामान्यांसारखी गूगल करून मिळवली आहे (जिथून घेतली ते दुवे खाली दिले आहेत). ती काही अंशी चुकीची किंवा अपूर्ण असूच शकते. तुम्हाला त्यात काही त्रुटी आढळून आल्या तर त्या जरूर नोंदवा.

२. आधीच्या लेखावर आलेल्या प्रतिक्रियांमध्ये किन्नर किंवा ज्यांना आपण 'हिजडे' किंवा तॄतीयपंथी म्हणून ओळखतो त्यांचा उल्लेख आलेला दिसला. इंग्रजीत यांना eunuch म्हणतात. यांत काही वर उल्लेख आलेले इन्टरसेक्स लोक, तर बहुतांशी लहान वयात बळजबरीने खच्चीकरण केले गेलेले लोक यांचा समावेश असतो. अशा प्रकारे खच्चीकरण झाल्यामुळे त्यांच्या हॉर्मोनल बॅलन्सवर परिणाम होतो. हा प्रकार वरील चर्चेत घेतला नव्हता कारण तो त्यांच्या नैसर्गिक जडणघडणीत आणि वाढीत केल्या गेलेल्या मानवी ढवळाढवळीमुळे निर्माण झाला आहे. त्यांचं जीवनही अवघड असतंच, पण तो विषय मोठा आणि या लेखाच्या कक्षेबाहेरचा आहे.

यानंतरच्या लेखात लैंगिक अल्पसंख्यांकांबद्दलच्या प्रचलित गैरसमजांबद्दल लिहायचा मानस आहे.

संदर्भः
https://schools.au.reachout.com/articles/gender-and-sexuality
https://www.vox.com/2015/4/24/8483561/transgender-gender-identity-expres...
https://www.nytimes.com/2015/08/23/opinion/sunday/richard-a-friedman-how...

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सिम्बा यांनी दिलेल्या माहिती//

त्यात जे exemption आहे तेही काढून टाकावे अशी मागणी आता ट्रान्स लॉबी करत आहे- हे तुम्ही वाचलं नाही का? तसंच मेडिकल प्रोसेस न करता पुरुषाला स्त्री ठरवले जावे अशी त्या लॉबीची मागणी आहे. ती मान्य आहे का?

तिचं शरीर पुरुषाचं असलं तरी इन्स्टिन्क्ट्स स्त्रीच्या आहेत.//

ते काही असलं तरी शारीरिक फरक राहतोच ना. पाळी येणं, reproduction system ची डेव्हलपमेंट, बहुसंख्य स्त्रियांना येणारा मातृत्वाचा अनुभव- या सगळ्या शारीरिक प्रोसेसेसचा मनावर , मेंदूवर होणारा impact - याचं काय? हे मूलभूत नैसर्गिक फरक आहेत. ते राहणारच. या गोष्टींना trivialize करू नका. हे खूपच बेसिक आहे खरं तर. अशा प्रकारे शब्दात लिहावं लागतंय याचं आश्चर्य वाटलं.

हॉर्मोनल डिसॉर्डर्स असलेल्या स्त्रिया, मातृत्वाच्या अनुभवातून न गेलेल्या स्त्रिया, या स्त्रिया नसतात का? की lesser स्त्रिया असतात?
या गोष्टी trivialize करू नयेत, पण अवास्तव मोठ्याही करू नयेत.

हॉर्मोनल डिसॉर्डर्स असलेल्या स्त्रिया, मातृत्वाच्या अनुभवातून न गेलेल्या स्त्रिया, या स्त्रिया नसतात का? की lesser स्त्रिया असतात?
या गोष्टी trivialize करू नयेत, पण अवास्तव मोठ्याही करू नयेत.///

स्त्रीचं शरीर आणि reproductive system आहे.
आता त्यात काही हॉर्मनल इश्यू आहेत/मूल नाहीये - हे असू शकतं. But the basic system is still female.
पुरुषाचा देह ही वेगळी सिस्टीम आहे.

माझ्या पोस्ट्स रुड किंवा असंवेदनशील वाटत असतील तर त्याबद्दल सॉरी. ट्रान्स व्यक्तींबद्दल आदर, कौतुकच आहे कारण त्यांना इतरांपेक्षा कठीण पेपर आलेला असतो आणि त्यात त्यांचा काही दोषही नसतो. अनेक यशस्वी, जगात चांगले बदल घडवलेल्या, चांगलं काम करणाऱ्या, value addition करणाऱ्या व्यक्ती ट्रान्स आहेत. त्यांच्यावर अन्याय होऊ नये, त्यांना इतरांप्रमाणे निर्धोक, आनंदी जगता यावं, contribute करता यावं हे मान्य आहेच.
फक्त हे सर्व करताना त्यात स्त्रियांची सुरक्षितता , सेफ प्लेसेस, opportunities यावर घाला पडू नये. याबाबतीत कसलीही रिस्क घेऊ नये. एका नव्याने तयार झालेल्या समूहाची जबाबदारी दुसऱ्या युगानुयुगे शोषित समूहावर टाकून देणे, त्यांना रिसोर्सेस शेअर करायला लावणे हे योग्य नाही.
रिसोर्स स्ट्रेट पुरुषांकडून ट्रान्सकडे वळते करा. लोकल ट्रेनचं उदाहरण दिलं तेच- पुरुषांच्या ९ डब्यातील एक किंवा अर्धा डबा त्यांच्यातून ट्रान्स बनणाऱ्या लोकांना द्या. स्त्रियांचा डबा हे त्यांच्यासाठी सेफ स्पेस आहे. ते त्यांच्यासाठी(च) राहू द्या.

A series of compromises then was discussed over months, including Meriwether offering to "use any name the student requested instead of titles and pronouns.

The school opened a Title IX investigation against the professor, ultimately concluding Meriwether's treatment of the student created a "hostile environment"

https://www.cnn.com/2022/04/18/us/ohio-professor-transgender-lawsuit-set...

Pages