फ्रेश फ्रुट केक

Submitted by Adm on 14 January, 2019 - 01:57
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

हॉलिडे सिझनमध्ये 'द ब्रिटीश बेकींग शो' बिंजवॉच केल्यापासून बेकींग करायची फार खुमखुमी येत होती. कपकेक, बनाना ब्रेड, ख्रिसमस केक वगैरे आधी केलेल्या गोष्टी करायच्या नव्हत्या, नवीन काहीतरी हवं होतं. शिवाय रियाने 'संडे इव्हिनींग बेकींग' अशी 'अ‍ॅक्टीव्हिटी' स्वतःच ठरवून टाकली आज संध्याकाळी खनपटीलाच बसली. मग त्याच बेकींग शोमध्ये बघितलेला फ्रेश फ्रुट केक करून बघायचं ठरवलं. स्पर्धेदरम्यान अट अशी होती की केकमध्ये वापरली जाणारी सगळी फळ ही ताजी हवी. कुठलाही सुकामेवा किंवा वाळवलेली फळं चालणार नाहीत. हा प्रकार आधी कधी खाल्ला नव्हता म्हणून करून बघावासा वाटला. इंटरनेटवर शोधाशोध करून त्यात थोडे बदल करून केक केला आणि तो चांगला झाला. तर ही त्याची पाककृती.

१. आपल्या आवडत्या ताज्या फळांचे तुकडे - साधारण २५० ते ३०० ग्रॅम ( मी स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी आणि सफरचंद वापरलं. एका स्ट्रॉबेरीचे चार तुकडे आणि सफरचंदाच्या बारीक फोडी करून घेतल्या. ब्लूबेर्‍या अख्ख्याच घातल्या).
२. अर्ध्या लिंबाचा रस. (इथे लिंबं खूपच मोठी असतात, म्हणून अर्ध घेतलं.)
३. अंडी - ३
४. साखर - १ कप
५. मैदा - १.७५ कप
६. बेकींग पावडर - १ टीस्पून
७. बेकींग सोडा - ०.२५ टीस्पून
८. दही - १ टेबलस्पून
९. बटर - अर्धी स्टीक
१०. दालचिनी पावडर - एक चिमूटभर (ऐच्छीक)
११. मिठ - चिमूटभर (ऐच्छीक)

क्रमवार पाककृती: 

१. ओव्हन ३५० डिफॅला प्रिहीट करून घेतला आणि लोफ पॅनला बटर लाऊन तयार ठेवलं.
२. फळांच्या तुकड्यांवर लिंबाचा रस घालून हलक्या हाताने ढवळून फ्रिजमध्ये थंड करायला ठेऊन दिलं.
३. एका मोठ्या बाऊलमध्ये अंडी आणि साखर फेटून घेतली. दालचिनी पावडर घालायची असल्यास ती ही आत्ताच घालावी पण मी घातली नाही.
मी इंटरनेटवर जी रेसिपी बघितली त्यात अजिबात बटर घातलं नव्हतं पण केकमध्ये बटर (किंवा तेल) अजिबात न घालता तो कसा होईल ह्याची खात्री वाटेना म्हणून मग अर्धी स्टीक बटर घातलं. मी घरात होतं ते सॉल्टेड बटर घातलं आणि मग वेगळं मिठ घातलं नाही.
४. वरचं मिश्रण चांगलं फेटून झाल्यावर त्यात चाळलेला मैदा, बेकींग पावडर, बेकींग सोडा आणि दही घालून एकत्र केलं. हे केकच्या बॅटर एव्हडं घट्ट होतं.
५. हे सगळं व्यवस्थित एकत्र झाल्यावर त्यात फळांचे तुकडे घालून पुन्हा हलक्या हाताने ढवळून घेतलं.
६. सगळं मिश्रण लोफ पॅनमध्ये घालून सारखं करून घेतलं आणि साधारण चाळीस मिनिटे बेक केलं.

वाढणी/प्रमाण: 
तुम्ही कापाल त्या प्रमाणे. मी कापले त्या जाडीचे साधारण १५ स्लाईस झाले.
अधिक टिपा: 

१. ह्यात वॅनिला इसेन्स घालायचा नाहीये. अंड्याचा वास येऊ नये म्हणून वॅनिला इसेन्स घालतात असं मला वाटतं. त्यामुळे केकला अंड्याचा वास रहातो की काय अशी भिती वाटत होती. पण अजिबात राहिला नाही.
२. एकंदरीत प्रमाणापेक्षा साखर कमी आहे असं वाटतं पण फळांची गोडी उतरत असल्याने पुरेसा गोड होतो.
३. प्रु (ब्रिटीश बेकींग शोची जज) च्या मते फ्रेश फ्रुट केक पूर्ण तयार झाला आहे की नाही हे बघायची चाचणी फसू शकते कारण केक जसजसा बेक होत जातो, तशी फळं ओलावा बाहेर टाकतात आणि मग टुथपिक नेमकी फळाच्या तुकड्याच्या आसपास घुसली तर ती कोरडी निघत नाही आणि तो जास्त बेक केला जाऊन कडक होऊ शकतो. त्यामुळे एकेच ठिकाणी न बघता दोन तीन ठिकाणी बघावं. वरून बघताना खरच केक ओला आहे की काय वाटत होतं पण तो व्यवस्थित बेक झाला होता.
--
Cake 2.jpeg
--
Cake 3_0.jpeg
--

माहितीचा स्रोत: 
ब्रिटीश बेकींग शो / इंटरनेट आणि स्वतःचा आगाऊपणा
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इंटरनेट आणि स्वतःचा आगाऊपणा >> भारी आहे हा आगाऊपणा.
केक इतका तोंपासु झालाय की खरंच उचलून तोंडात टाकावा वाटतोय गं.
भारीच

मस्त दिसतोय.
फ्रुट केक प्रचंड आवडतो, अर्थात तो फ्रेश फ्रुट नसतो. हा बघूनच करावासा वाटतोय.

केक इतका तोंपासु झालाय की खरंच उचलून तोंडात टाकावा वाटतोय गं.+१११
यमी!!!
बिना अन्ड्याचा कसा करतात पण ? :शाकाहारी बाहुली:

स्टोल्लेन ब्रेड बनवण्यासाठी ड्राईड फ्रुईट्स घेतलेली, त्यातली थोडी शिल्लक ठेवलेली फ्रुट केक करायला.

ह्या रेसिपीच्या निमित्ते मुहूर्त मिळेल. Happy

छान आहे रेसिपी. बटर टाळून पाहावे का?

मस्त पाकॄ.

तो ब्लूबेरीचा रंग कातिल दिसतोय. भारतात ब्लूबेर्‍या मिळणं कठीण आहे. त्याच्या जवळ जाणारी चव कुठल्या फळात मिळेल?

रच्याकने, तुला आता 'पकवापकवी' असा धागा काढायला हरकत नाहीये Happy तो पण आधीच्या धाग्याइतका उत्तमच होइल.

हे असे आग्रह करता तुम्ही लोक. मग असले प्रकार आम्हालाही करावे लागतात लगेच. Proud
मस्त दिसतोय केक! ऑरेन्ज क्रॅनबरी, प्लम, पीच ही फळं वापरून पण मस्त होईल या रेसिपीने.

पण समजा तीनाऐवजी एखादंच अंडं घातलं तर?
<<
मोहन न घालता केलेली शंकरपाळी जशी जड होतात, तसा केक जडबदक होईल. फ्लफी अन लाईट होणार नाही.

यीस्ट अन बेकिंग पावडर ने बॅटरचे एरिएशन/लिव्हनिंग होते, अर्थात बुडबुडे तयार होतात, ते तसेच टिकून राहण्यासाठी स्ट्रक्चरल सपोर्ट जो आहे, तो अंड्याच्या प्रोटीनने मिळतो. स्वतः अंड्यामुळेही 'लिव्हनिंग' होते.

याच्यामुळेच बेकिंगमधे अंडी, कणिक, सोडा इ. गोष्टी मोजून प्रमाणात घातल्या जातात, नाहीतर केक व तत्सम पदार्थ फसतात.

मस्त! फ्रूट केक खूप आवडतो.

वरून बघताना खरच केक ओला आहे की काय वाटत होतं पण तो व्यवस्थित बेक झाला होता. >> आतूनही झाला आहे का? फोटोत पाहताना वाटले की आतील मैदा थोडा अजून घट्ट आहे.

छान दिसत आहे Happy

मलाही व्हॅनिला, बटर/ऑईल शिवाय केक होऊ शकतो हे माहित नव्हतं पण लेकाच्या फ्रेन्च टीचर ने बटर/ व्हॅनिला विरहीत पोरांनां Bûche de Noël केक करायला लावला आणि छानच लागत होता. आता लागोपाठ दुसर्‍यांदा त्याबद्दल ऐकलं ह्या रेसिपी मुळे.

फ्रेश ब्लूबेरीज् , अ‍ॅपल, पायनॅपल इत्यादी घालून केक/मफीन्स केले आहेत / खाल्ले आहेत.
हा केक तसा डेन्स दिसतो आहे (हे फा करता. त्याला कच्चट असेल असं वाटत आहे तर तसं नसून डेन्स केक्स साधारण असेच दिसतात).

भारीच .लगे रहो

( तू संजीव कपूर बनायचं मनावर घेतलस की काय Lol )

यम्मी दिसतोय केक. छान रेसीपी आहे , नक्की करून बघेन. बनाना ब्रेड(केक) नेहमी होतो पण बाकी ताजी फळं घालण्याची आयडिया सहीच आहे. व्हॅनिला इसेन्स का घालायचा नाही ते कळलं नाही.

प्रतिक्रियाबद्दल सगळ्यांना धन्यवाद Happy

बटर टाळून पाहावे का? >>>> नक्की करून पहा आणि इथे लिहा!

तुला आता 'पकवापकवी' असा धागा काढायला हरकत नाहीये >>>>> Lol अगदी ह्या नावाने नाही पण तत्सम धागा काढला आहे ना. Happy

बेक्ड पदार्थांमध्ये बर्‍याचदा अंड्याचा वास येतो तो आवडत नाही. >>>>> सायो, ह्यात अंड्याचा अजिबात वास आला नाही. अर्थात मला अंड्याच्या वासाचा काही प्रॉब्लेम नाही. त्यामुळे थोडासा वास कळतही नाही पण ज्यांना सहन होत नाही, त्यांना येईल कदाचित.

आतूनही झाला आहे का? >>>> तो घट्टपणा / ओलसरपणा फळांच्या ओलाव्याने वाटत असेल. प्रत्यक्षात आतून / बाहेरून व्यवस्थित बेक झाला होता आणि हलकाही झाला होता.

चव मस्त असेल ना? >>>>> आंबट गोड चव आणि सफरचंदांचा करकरीतपणा छान चाटतो !

जाई Proud

व्हॅनिला इसेन्स का घालायचा नाही ते कळलं नाही. >>>> का घालायचा नाही ते माहीत नाही पण न घातल्याने काही फरक पडला नाही.

अंडे न घालता करायचा असेल तर कसा करायचा याबाबत मबोच्या सुगरणी/सुगरणांनी शंकानिरसन करावे.आगाऊ धन्यवाद!

आज केक करून बघितला.

IMG_20190119_153704770~01.jpg

आईचा ओव्हन खूप लहान आहे, त्यात मी वरखालची शिग तापवली असल्याने वरून थोडा जास्त लाल झाला. तिच्याकडे लोफ पॅन नसल्यामुळे पसरट भांड्यात केला. किवी, रेड बेरीज, प्लम, मँगो इतकी फळे होती.

मी बटर अजिबात घातले नाही, सॉफ्टनेसला फारसा फरक पडला नाही. थोडा ड्रायनेस जाणवतो. वेगळे चिमूटभर मीठ घालणे गरजेचे आहे, व्हॅनिला इसेन्स घातला नाही तरी चालते, मी घातला नाही.

डाएट असेल तर बटर न घालता करा व आनंद घ्या. नसेल तर बटर घालून करा व आनंद घ्या.

खूप झटपट होतो हा केक.

इतकी सोपी पाकृ दिल्याबद्दल आभार. संध्याकाळी चहाबरोबर गरमागरम केक एकदम बेस्ट.

अरे! मीपण फोटो टाकायलाच इथे आले होते. मीपण परवा केला होता.
प्लम, स्ट्रॉबेरी ही फ्रेश फ्रूट्स आणि खजुराचे तुकडेही घातले. सॉल्टेड बटर घातलं. मला जवळजवळ ४० मिनिटं लागली मात्र बेकिंगला. १८० अंश सेल्सिअस.
एकदम मस्त झाला होता. लगेच संपलासुद्धा.
IMG_20190118_204731512.jpg

वॉव भारीच !! दोन्ही फोटो मस्त आहेत. Happy
साधना, बटर न घालता करून बघितल्याबद्दल धन्यवाद. आता पुढच्यावेळी मी पण घालणार नाही.

मी लिहिलेली पाकृ लोकांनी करून बघून फोटो-बिटो (ते ही चांगले) टाकलेले बघून मला फारच भारी वाटतं आहे! Proud

पग्या, तुला पोरीने चांगलाच कामाला लावलाय >>>> हो ना! त्या दिवशी काही काही पदार्थ घरात नव्हते तर थंडीत बाहेर पडायला लावलं तिने! Happy

Pages