फ्रेश फ्रुट केक

Submitted by Adm on 14 January, 2019 - 01:57
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

हॉलिडे सिझनमध्ये 'द ब्रिटीश बेकींग शो' बिंजवॉच केल्यापासून बेकींग करायची फार खुमखुमी येत होती. कपकेक, बनाना ब्रेड, ख्रिसमस केक वगैरे आधी केलेल्या गोष्टी करायच्या नव्हत्या, नवीन काहीतरी हवं होतं. शिवाय रियाने 'संडे इव्हिनींग बेकींग' अशी 'अ‍ॅक्टीव्हिटी' स्वतःच ठरवून टाकली आज संध्याकाळी खनपटीलाच बसली. मग त्याच बेकींग शोमध्ये बघितलेला फ्रेश फ्रुट केक करून बघायचं ठरवलं. स्पर्धेदरम्यान अट अशी होती की केकमध्ये वापरली जाणारी सगळी फळ ही ताजी हवी. कुठलाही सुकामेवा किंवा वाळवलेली फळं चालणार नाहीत. हा प्रकार आधी कधी खाल्ला नव्हता म्हणून करून बघावासा वाटला. इंटरनेटवर शोधाशोध करून त्यात थोडे बदल करून केक केला आणि तो चांगला झाला. तर ही त्याची पाककृती.

१. आपल्या आवडत्या ताज्या फळांचे तुकडे - साधारण २५० ते ३०० ग्रॅम ( मी स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी आणि सफरचंद वापरलं. एका स्ट्रॉबेरीचे चार तुकडे आणि सफरचंदाच्या बारीक फोडी करून घेतल्या. ब्लूबेर्‍या अख्ख्याच घातल्या).
२. अर्ध्या लिंबाचा रस. (इथे लिंबं खूपच मोठी असतात, म्हणून अर्ध घेतलं.)
३. अंडी - ३
४. साखर - १ कप
५. मैदा - १.७५ कप
६. बेकींग पावडर - १ टीस्पून
७. बेकींग सोडा - ०.२५ टीस्पून
८. दही - १ टेबलस्पून
९. बटर - अर्धी स्टीक
१०. दालचिनी पावडर - एक चिमूटभर (ऐच्छीक)
११. मिठ - चिमूटभर (ऐच्छीक)

क्रमवार पाककृती: 

१. ओव्हन ३५० डिफॅला प्रिहीट करून घेतला आणि लोफ पॅनला बटर लाऊन तयार ठेवलं.
२. फळांच्या तुकड्यांवर लिंबाचा रस घालून हलक्या हाताने ढवळून फ्रिजमध्ये थंड करायला ठेऊन दिलं.
३. एका मोठ्या बाऊलमध्ये अंडी आणि साखर फेटून घेतली. दालचिनी पावडर घालायची असल्यास ती ही आत्ताच घालावी पण मी घातली नाही.
मी इंटरनेटवर जी रेसिपी बघितली त्यात अजिबात बटर घातलं नव्हतं पण केकमध्ये बटर (किंवा तेल) अजिबात न घालता तो कसा होईल ह्याची खात्री वाटेना म्हणून मग अर्धी स्टीक बटर घातलं. मी घरात होतं ते सॉल्टेड बटर घातलं आणि मग वेगळं मिठ घातलं नाही.
४. वरचं मिश्रण चांगलं फेटून झाल्यावर त्यात चाळलेला मैदा, बेकींग पावडर, बेकींग सोडा आणि दही घालून एकत्र केलं. हे केकच्या बॅटर एव्हडं घट्ट होतं.
५. हे सगळं व्यवस्थित एकत्र झाल्यावर त्यात फळांचे तुकडे घालून पुन्हा हलक्या हाताने ढवळून घेतलं.
६. सगळं मिश्रण लोफ पॅनमध्ये घालून सारखं करून घेतलं आणि साधारण चाळीस मिनिटे बेक केलं.

वाढणी/प्रमाण: 
तुम्ही कापाल त्या प्रमाणे. मी कापले त्या जाडीचे साधारण १५ स्लाईस झाले.
अधिक टिपा: 

१. ह्यात वॅनिला इसेन्स घालायचा नाहीये. अंड्याचा वास येऊ नये म्हणून वॅनिला इसेन्स घालतात असं मला वाटतं. त्यामुळे केकला अंड्याचा वास रहातो की काय अशी भिती वाटत होती. पण अजिबात राहिला नाही.
२. एकंदरीत प्रमाणापेक्षा साखर कमी आहे असं वाटतं पण फळांची गोडी उतरत असल्याने पुरेसा गोड होतो.
३. प्रु (ब्रिटीश बेकींग शोची जज) च्या मते फ्रेश फ्रुट केक पूर्ण तयार झाला आहे की नाही हे बघायची चाचणी फसू शकते कारण केक जसजसा बेक होत जातो, तशी फळं ओलावा बाहेर टाकतात आणि मग टुथपिक नेमकी फळाच्या तुकड्याच्या आसपास घुसली तर ती कोरडी निघत नाही आणि तो जास्त बेक केला जाऊन कडक होऊ शकतो. त्यामुळे एकेच ठिकाणी न बघता दोन तीन ठिकाणी बघावं. वरून बघताना खरच केक ओला आहे की काय वाटत होतं पण तो व्यवस्थित बेक झाला होता.
--
Cake 2.jpeg
--
Cake 3_0.jpeg
--

माहितीचा स्रोत: 
ब्रिटीश बेकींग शो / इंटरनेट आणि स्वतःचा आगाऊपणा
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बटर घातले नाही तर लगेच संपवायचा. उरला तर तो कोरडा पडत जातो.

हा परफेक्ट टी टाइम केक आहे, बेक करायला ठेऊन चहाची तयारी करायला घ्यायची. चहा ओतून होईतो केक तयार, गरम गरम हादडायचा. लोफ पॅन मध्ये वेळ लागतो असे वाटते. माझा 20 मिनिटात तयार झाला. पण पुढच्या वेळेस लोफ पॅनमध्येच करेन.

तोंपासु, फोटोज.करून बघतेच एकदा.
आमच्या कडे साबांचा जूना , gas वर गरम करायचा अवन आहे. त्यात केक मस्त होतो.

हो आमच्याकडेपण आहे अॅल्युमिनियमचा. मधून पोकळ आहे म्हणजे मध्यभागी एक पोकळ दांडा आहे. एक छोटी ताटली आहे त्याबरोबर मिळालेली, त्यात वाळू भरून ती गॅसवर ठेवायची आणि त्यावर केकचं भांडं. छान खरपूस केक होतो त्यात.

त्या वाळूच्या भांड्यात रेग्युलर केक्स होतात का? माझ्या सासरीपण आहे पण आम्ही त्यात फक्त पारंपारिक रव्याचा केकच करतो. मैद्याचा केक कधीच केलेला नाही.

सगळे केक चांगले होतात फक्त आकार एखाद्या रिंगसारखा असतो. आईसिंग करण्यासाठी गोल हवा असेल तर नाही चालणार.

Pages