मिरची तूफान

Submitted by योकु on 20 December, 2018 - 10:14
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

ही सुद्धा एका युट्यूब चॅनल वर पाहीलेली आणि घरी नंतर ट्राय केलेली रेसीपी.
थोडे बदल केले आहेत माझ्या सवयीनुसार पण हे ही सुप्पर झालं होतं.

तर साहित्य -
- ओंजळभर मिरच्या (नेहेमीच्या, फोडणीत तिखटपणाला ज्या वापरतो त्यत्या)
- २ ते ३ चमचे बेसन (चण्याच्या डाळीचं पीठ)
- चमचाभर धण्याची पूड
- पाव चमचा हळद
- अर्धा/पाऊण चमचा बडीशेप पूड
- एका मोठ्या लिंबाचा रस (मूळ कृतीत आंबट दही वापरलेलं आहे)
- मीठ
- २-३ टेबलस्पून तेल, मोहोरी, चिमटीभर हिंग

क्रमवार पाककृती: 

- मिरच्या धूवून, पुसून कोरड्या करायच्या आणि नंतर भरल्या वांग्यांना + आकारांत चिरा देतो तसं चिरून घ्यायचं; म्हणजे त्यांची फुलं होतील.
- बेसन कोरडंच जरा ५/१० मिनिटं मंद आचेवर भाजून घ्यायचं
- आता फोडणी करून मोहोरी चांगली तडतडू द्यायची आणि चिमटीभर हिंग घालून प्रकरण जरासं फसफसलं की मिरच्या घालायच्या.
- सगळ्या मिरच्यांना तेल व्यवस्थित माखलं की यात सगळे कोरडे मसाले आणि मीठ घालून जरा मसाले तेलावरच पोळू द्यायचे.
- आता यात भाजलेलं बेसन घालून सगळं नीट हलवून घ्यायचं आणि लिंबाचा रस घालून गॅस बंद करायचा. कढईत भाजी तशीच जरा ५/७ मिनिटं राहू द्यायची आणि मग कशाही बरोबर तोंडीलावणं म्हणून घ्यायची.

मूळ रेसीपी इथे आहे

वाढणी/प्रमाण: 
तोंडीलावणं म्हणून ठेचा, लोणचं याप्रमाणे आणि हो हिरवी मिरची आहे ती, सो आपल्याला सोसवेल तेव्हढीच...
अधिक टिपा: 

- बेसन आधी भाजून घ्या किंवा नंतर मेन कृतीत शिजवून घ्या (मूळ कृतीत आधी भाजून घेतलेलं नाहीय). ते नीट होणं महत्त्वाचं आहे नाहीतर कच्चट चव आणि वास दोन्हीही जाणवेल. बेसन अतीही वापरायचं नाहीय. जस्ट मिरच्या कोट होतील इतपतच.
- बडीशेप पूड अवश्य वापरा, सुरेख चव येते.
- आंबटपणाही जरासा पुढे हवा तरच ती अपेक्षित धणे + तिखट + आंबट आणि बडिशेपेच्या सुरेख सुवासाची चव साधते.

माहितीचा स्रोत: 
युट्यूब व्हिडिओ
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज मस्तच लागेल. उद्याबद्दल काही सांगता येत नाही. Wink
एकदा लांब पोपटी मिरच्यांचं सालन केलं होतं. भारी लागलं पण भाजी जितकी मुरते तितका तिखटपणा वाढत जातो. बडीशेप मस्त लागते ह्यात.
(दोन्ही वाक्यात आज आणि उद्याला वेगळा अर्थ आहे) Wink

खरंच तुफान रेसिपी आहे आणि सोपी सुद्धा. सध्या थंडीमुळे तिखट खाण्यात धोका नाही, त्यामुळे ताबडतोब करण्यात येईल. योकू, तुमचं पीठ आधीच भाजून घेण्याच सजेशन आवडलं. मला आलटून पालटून कधी लिंबू रस आणि कधी दह्यात शिजवलेली मिरची आवडेल.

फोटु रे टोण्या?
भारिच लागेल हि रेस्पी.
आणि जर समज आमचूर पावडर घातली जरा तर?
चालेल काय?

मस्त आहे
आईच्या छान होतात.माझा हा प्रकार म्हणजे खमंग काळं बेसन अधिक मिरच्या किंवा बेसन पिठलं यापैकी एक असतो.

ही रेसिपी वर आली की मला प्रचंड भूक लागल्याची जाणीव होतेय. भाकरी किंवा थालिपीठ ह्याबरोबर मस्त लागेल ही मिरची.

योकु, मस्त रेस्सीपी.
तुझी बघुन मी , आमच्या घरी नेहमी केली जाणारी मलई मिरचीची रेसीपी लिहिली.

अखिल मायबोली मिर्चीमय झाली आहे. मिरच्यांच्या व्हरायटी रेसिपीज दिसताहेत, त्यातली मला ही थोडी जास्त आवडेल अस वाटतं आहे.
जे लोक फोटोचा हट्ट करताहेत त्यांनी रेसीपी मध्ये दिलेली युट्यूब लिंक पाहून घ्या बरं. एन्ड प्रोडक्ट भारी दिसतं आहे

आज करून पाहिले.पण मिरच्यांपेक्षा इतर masala ,बेसन jarasé जास्त पडले.पण मस्त लागले.फोटोत पीठ खूप दिसत आले तरी तेवढे नाही.
yoku, धन्यवाद!पुढच्यावेळी लोणचे करून पहाणार.

IMG_20200718_095047~2.jpg