ए फॉर अपोलो (ग्रीस १०)

Submitted by Arnika on 28 November, 2018 - 04:49

“सर, मी शिक्षिका होऊ? कुठला विषय शिकवू?”
“जरूर. काहीही शिकव; मीही येऊन बसेन वर्गात. पण इतक्यात नको.”
बारावीनंतर काय करायचं याबद्दल गणिताच्या मॅकिन्टॉश सरांशी गप्पा चालल्या होत्या. आपापल्या निवडीबद्दल प्रत्येकाला सरांकडून खात्रीचे चार शब्द ऐकायचे होते. शिक्षिका व्हायला सांगून “इतक्यात नको” असं का म्हणाले असतील सर?

बाकी प्रश्नांसारखं सरांकडे याचंही उत्तर होतं. “कॉलेजातून बाहेर पडून लगेच शिकवायला गेलात तर तुमच्याकडे शिकवण्यासारखी फक्त पुस्तकं उरतील. जग मोठं होण्याआधीच पुन्हा कुंपणात येईल. त्यापेक्षा बाहेर थोडं काम करून दुनिया बघून घे. स्वतःच्या पायावर उभं राहायला काय काय करावं लागतं याचा अंदाज घे. माणसं ओळखता यायला लागतील, जगाची रीत समजायला लागेल आणि चार अनुभव गाठीशी असतील तेव्हा शिकवायला म्हणून पुन्हा शाळेत पाऊल टाक. तुझ्या ‘असण्यातून’ समोरच्याला शिकता आलं तर खरं! बाकी पुस्तक शिकवणारे ढीगाने आहेतच.”

शाळा सोडताना सरांनी दिलेला हा विचार एखाद्या अवयवाइतका जवळ बाळगलाय आम्ही सगळ्यांनीच. त्यामुळे ग्रीसमध्ये येऊन इंग्लिश शिकवतानाही “आपल्याकडे शिकवण्यासारखं खरंच काहीतरी आहे ना?” हे सगळ्यात आधी डोक्यात आलं. या मुलांची भाषा शिकण्याचा मीही प्रयत्न करत्ये, त्यात चुका करत्ये हे बघून त्यांना इंग्लिश शिकायला गंमत वाटते आणि माझ्यासमोर इंग्लिशमध्ये चुका करताना त्यांना विशेष काही वाटत नाही ही त्यातली जमेची बाजू... पण ज्या चौघांना मी इंग्लिश शिकवते, त्यांपैकी दोघांना इंग्लिशचा राग आहे. त्या भाषेला लॉजिक नाही आणि तिचं व्याकरण वेगळंच चालतं अशा त्यांच्या तक्रारी होत्या. त्यात आईने जबरदस्तीने शिकायला बसवल्यामुळे अजूनच राग! बरं, ग्रीकमध्ये ट ते ण, श, ह, चंदनाचा च आणि जर्मनीचा ज असले उच्चारच नसल्याने बरेचसे इंग्लिश शब्द म्हणताना यांची बोबडी वळते.

यांच्या घरी राहाणाऱ्या युगांडाच्या लहान मुलाला मात्र किती इंग्लिश बोलू नि किती नको असं होतं. त्याला वेळ देऊन एकट्याशी गप्पा मारल्या आणि चारचौघांत त्याचं कौतुक केलं की तो मनोमन सुखावतो. छोटी ख्रीसा खेळकर असते तेव्हा भराभर शिकते. डाउन्स सिंड्रोम असल्याने तिचे उच्चार अस्पष्ट, तोंडातल्या तोंडात होतात, म्हणून हट्टाने तिच्याकडून प्रत्येक अक्षराचा उच्चार नीट करून घेणं आणि त्यातही तिला कंटाळा येणार नाहीसं बघणं या दोन गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या. ती कितीही तास गाणी म्हणू शकते, त्यामुळे ‘अथीना आकाशवाणीचं कोक्कीनू केंद्र’ दुपारभर ऑन असतं. तिला कठीण जाणारे स, व्ह, फ़ हे उच्चार आता गाण्यांमुळे जमायला लागलेत. मग दोन तास झाले की तिच्या कुरापती सुरू होतात. बाहेरच्या मांजरींना घरात आणून इंग्लिश शिकवणं, भावंडांना चिमटे काढणं, उशीचे अभ्रे उलटे करून शिवण उसवणं... काहीतरी हाताला चाळा. तेवढं तिला करू दिलं की तिची काही हरकत नसते. कान देऊन ऐकत राहाते ती.

उरली दोन शिंग फुटलेली पोरं. बारा वर्षांचा हुशार, आगाऊ स्तेल्योस आणि अकरा वर्षांची नुसतीच आगाऊ इरीनी. स्तेल्योसचं आईशी भांडण होत नाही त्यादिवशी तो इतका गुणी असतो की त्याला जे काही शिकवेन ते लक्षात राहातं. तो ते वेगवेगळ्या पद्धतीने वापरून दाखवतो. ग्रीक व्याकरण कसं वेगळं आहे त्याबद्दल चर्चा-बिर्चा करतो. पण इंग्लिश शिकायचंय म्हणून तू आज मित्राकडे जायचं नाहीस असं आईने सांगितलं की त्याचा सगळा राग आमच्या तासिकेवर निघतो. तरीही त्याची गंमत येते मला. त्याची उलट उत्तरं, त्याचे फालतू प्रश्न मला झेलता येतात, आणि बाकी काहीही असलं तरी तो रोज काहीतरी वेगळं बोलायचा प्रयत्न करतो याचं मला बरं वाटतं.

का कोणास ठाऊक, पण यांच्यातली इरीनी आणि मी आल्या दिवसापासून शिंग भिडवून आहोत. पहिल्या दिवशी तिचा पहिला प्रश्न, “तू परत कधी जाणारेस?” असा होता म्हणजे पुढचं काही सांगायलाच नको खरं तर. मुद्दाम लक्ष न देणं, जे येतंय तेही विसरण्याचं नाटक करणं, कंटाळा आल्यावर बसल्या जागेवरून ख्रीसाला उचकवणं असल्या गोष्टी करण्यात आणि इंग्लिशचा तास लवकर संपवण्यात तिचं सौख्य सामावलं आहे.

मुळात मुलं मोकळेपणाने वावरताना इंग्लिशमध्ये रमावीत अशी त्यांच्या आईची कल्पना आहे. अर्ध्या चड्ड्या घालून तंगड वर करून लोळत, संत्री खात आणि कॅच-कॅच खेळत माझ्याबरोबर इंग्लिश शिकणं हा माझ्या मते पुरेसा मोकळेपणा आहे. बिस्किटं करत गप्पा मारणं, काचापाणी खेळताना इंग्लिश शब्द शिकणं या पुरेशा खेळकर पद्धती आहेत. गाणी म्हणणं, खिदळणं, वेडेपणा करणं या गोष्टी तर माझ्याच रक्तात आहेत, त्यामुळे मोकळेपणाने शिकण्याला माझी ना नाही. पण परवा स्तेल्योस आणि इरीनीच्या अंगात आलं होतं. पुस्तकं पायाने लाथाडत, तक्त्यांवर उभं राहून नाचत मुद्दामून चुकीची उत्तरं देणं चालू होतं त्यांचं. गुण्यागोविंदाने सांगूनही ऐकत नाहीत म्हंटल्यावर मी रडवेली झाले. आता ओरडले तर यांना मी आवडणार नाही, यांना पुन्हा इंग्लिश शिकावसंच वाटणार नाही या भीतीने मी गप्प राहिले, आणि मला त्रास होतोय हे बघून पोरं अजून चेकाळली. हे सगळं मी पर्सनली घेत्ये म्हणजे मी शिकवण्याच्या लायकीची नाहीये असं वाटून भरून येत होतं... आणि इतक्यात सिक्याहून दीमित्राने व्हिडिओ कॉल केला.

दबल्या आवाजात मी दीमित्राला सगळं सांगितलं. ते ऐकून तिची मुलगी, आरियाद्नी, खुश झाली. असल्या नतद्रष्ट मुलांमध्ये राहाण्यापेक्षा अर्निकाने पुन्हा आपल्याच घरी परत यावं असं तिने ठरवलं. मध्यरात्री दार वाजवलं तरी मला आनंदाने जागा देणारी घरं या देशात आहेत या जाणिवेने शांत होऊन मी एकदाची झोपले. दुसऱ्या दिवशीही इरीनी-स्तेल्योसची असहकार चळवळ चालू होती. ताजा शेंबूड पुसलेल्या रुमालाने इरीनीने फळा पुसला. आदल्या दिवशी त्यांना लक्षात न राहाणारे पाच सोपे शब्द एका कागदावर चित्र काढून लिहून दिले होते, तो कागद त्यांनी चुरगळून कचऱ्यात टाकला... माझ्यातला स्विच जो काही ठणकला ना! म्हंटलं कागद घेऊन ये आणि तुझ्या आठवणीने तू लिहून काढ ते पाच शब्द. मी मदत करते.

एरवी त्यांच्या आईचा मला पाठिंबा असतो, पण त्यादिवशी तिलाही लोभडं आलं होतं. “अगं, लिहून ठेवलेले कागद आम्ही गोळा करत नाही कारण घरात जागा पुरत नाही! म्हणून टाकला असेल त्यांनी. शिवाय त्यांना लिहिता आलेलं नकोय मला; बोलता येईलसं बघ.” झालं. तेवढं ऐकून पोरं म्हणाली, “आई नको म्हणत्ये की नाही? मग मी नाही आणणार कागद. आमच्या घरात गर्दी होते.”
“बरं, मग माझ्या उशीखाली ठेवा कागद, आणि मी जाईन त्यादिवशी सगळे फाडून टाका, पण तोवर ते दोन कागद सांभाळायचे.” मी शांतपणे म्हणाले.
“मी नाही आणणार. मला असेच शिकव पाचही शब्द परत.” स्तेल्योस म्हणाला आणि कधी नव्हे ते इरीनीलाही भावाचा अभिमान वाटला.
“बरं. मग या मार्करने मी तुमच्या भिंतीवर शब्द लिहायला जात्ये.” त्या मार्करचं टोपण उघडताना मला म्यानातून तलवार काढल्यासारखं वाटत होतं.
“ह्या! आम्ही ग्रीसमध्ये असं नाही करत. तू असं नाही करू शकत.”
“मग आम्हीही भारतात पुस्तकांवर पाय देऊन नाचत नाही. तुम्ही दोघं ते करू शकता तर मला भिंतीवर मार्करने लिहायला काय जातंय!” मी स्तेल्योसच्या खोलीतल्या निळ्याशार भिंतीकडे जायला लागले. ती बिचारी आईसुद्धा भुवया उंचावून बघत राहिली. तेवढ्यात स्तेल्योसने कुठूनतरी कागद पैदा केला आणि आम्ही पुन्हा एकदा शब्द लिहिले. तास संपला तरी पोरं घुश्श्यातच होती; मीही जेवढ्यास तेवढं बोलत होते.

आपल्याबद्दल दहशत निर्माण करणे, धाक घालणे, ही माझी पद्धत नाव्हे. स्वतःचे मानापमान विसरून रिंगणात उतरणं मला जमलं नाही आणि त्यादिवशी पोरांना गप्प केल्यावर थोड्या वेळासाठी विजयी वाटलं तेही डाचायला लागलं. आपण सगळ्यांना आवडलो पाहिजे अशी सिक्रेटली अपेक्षा करणं आणि त्यामुळे भिडस्तपणा करणं मी बंद केलं त्याचं मात्र बरं वाटत होतं.

ग्रीसमध्ये सरकारी शाळांत जाणाऱ्या मुलांची घोकंपट्टी, नंतर छंदवर्ग, अभ्यासाचे क्लासेस, इंग्लिशचे क्लासेस, खेळाचं ट्रेनिंग हे सगळं घड्याळ्याच्या काट्यावर चालतं. फक्त मी गेल्यावेळी म्हणाले तशी आपल्यापेक्षा यांच्या लोकसंख्येची दाटी पाचपट कमी आहे म्हणून स्पर्धा तितकीच कमी. सिक्यामध्ये दीमित्राच्या घरी अभ्यासाच्या बाबतीतलं वातावरण इतकं तंग नसायचं. शाळेतून आल्याआल्या पोरांनी लगालगा अभ्यासाला बसणं दीमित्रा-कोस्तीस दोघांनाही मान्य नव्हतं. अथीनाच्या घरी सगळे फासे उलटे! पोरं आली की उभ्या-उभ्या जेऊन पंधरा मिनिटांच्या आत अभ्यासाला बसतात. संध्याकाळी एक तास खेळून येतात आणि बाकी सगळा वेळ या ना त्या क्लासमध्ये असतात. मग लहान भावंडं झोपल्यावर मोठी बारक्या दिव्याच्या उजेडात अभ्यास करताना दिसली की माझे उगाच डोळे पाणावतात.

दिवसभर बाहेर शहाण्यासारखं वागून मुलं दमत असतील अशा विचाराने मलाही त्यांचा पुळका येऊन जातो… कितीही वाकडं आलं तरी एकेक झोप झाली की आम्ही ताज्या दमाने भांडायला, खेळ मांडायला आणि इंग्लिश बोलायला तयार होतो. वाट वळणावळणाची आहे. एकमेकांना सहन करायचा आमचा पेशन्स संपलाय असं वाटतं तेव्हाच कुठूनतरी नवा रस्ता सापडतो. ख्रीसाच्या शाळेतून तिच्या इंग्लिशचं कौतुक करायला फोन येतो. स्तेल्योस अचानक पॉपकॉर्नची कृती मोडक्या इंग्लिशमध्ये सांगतो. “तू परत जायची मी वाट बघत्ये” असं म्हणणारी इरीनी कुठल्यातरी गोड क्षणी “माझ्या वाढदिवसाच्या दिवशी तू बाहेर नको जाऊस” असं म्हणून जाते. आपण एकमेकींवर राग धरायच्या विसरलो हे आम्हाला पुढच्या मिनिटाला लक्षात येतं. पण तोवर व्हायचं ते होऊन गेलेलं असतं. आमचं चुकून एकमेकींकडे बघून हसून झालेलं असतं...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुझ्या ‘असण्यातून’ समोरच्याला शिकता आलं तर खरं! बाकी पुस्तक शिकवणारे ढीगाने आहेतच. >>>

लाख मोलाचे वाक्य.
गणिताच्या मॅकिन्टॉश सरांना नमस्कार सांग माझा

“सर, मी शिक्षिका होऊ? कुठला विषय शिकवू?”
“जरूर. काहीही शिकव; मीही येऊन बसेन वर्गात. पण इतक्यात नको.”
बारावीनंतर काय करायचं याबद्दल गणिताच्या मॅकिन्टॉश सरांशी गप्पा चालल्या होत्या. आपापल्या निवडीबद्दल प्रत्येकाला सरांकडून खात्रीचे चार शब्द ऐकायचे होते. शिक्षिका व्हायला सांगून “इतक्यात नको” असं का म्हणाले असतील सर?

बाकी प्रश्नांसारखं सरांकडे याचंही उत्तर होतं. “कॉलेजातून बाहेर पडून लगेच शिकवायला गेलात तर तुमच्याकडे शिकवण्यासारखी फक्त पुस्तकं उरतील. जग मोठं होण्याआधीच पुन्हा कुंपणात येईल. त्यापेक्षा बाहेर थोडं काम करून दुनिया बघून घे. स्वतःच्या पायावर उभं राहायला काय काय करावं लागतं याचा अंदाज घे. माणसं ओळखता यायला लागतील, जगाची रीत समजायला लागेल आणि चार अनुभव गाठीशी असतील तेव्हा शिकवायला म्हणून पुन्हा शाळेत पाऊल टाक. तुझ्या ‘असण्यातून’ समोरच्याला शिकता आलं तर खरं! बाकी पुस्तक शिकवणारे ढीगाने आहेतच.”>>>>>> हा अख्खा पॅराच सोन्या- माणकाच्या तोलाचा आहे. खरच आमचा नमस्कार कळव तुझ्या सरांना. तुझे तर काय आम्ही गालगुच्चेच घेणार !!

हा अख्खा पॅराच सोन्या- माणकाच्या तोलाचा आहे. +११११
भारी झालाय हाही लेख Happy
प्रामाणिक अनुभव, सहज लेखन्शैली असल्यामुळे भावलंय खुप Happy
शुभेच्छा!!!

हाहा भले शाबास! Happy
साउंड ऑफ म्यूझिकची आठवण झाली वाचताना. ही मुलं इंग्रजी शिकतील, न शिकतील, तुला तुझ्यातल्या ठामपणासारखे आपलेच पैलू सापडत जातायत हीदेखील मजाच की! Happy

हा अख्खा पॅराच सोन्या- माणकाच्या तोलाचा आहे. खरच आमचा नमस्कार कळव तुझ्या सरांना.>>>>>> +१११११११

तुझे तर काय आम्ही गालगुच्चेच घेणार !!>>>>> नाही बाबा.तिला दंडवत एवढी सहनशक्ती पाहून.

हा अख्खा पॅराच सोन्या- माणकाच्या तोलाचा आहे. >>अगदी खरं!!
हे असं इतक्या स्पष्टपणे कधी कुणी सांगितलं नव्हतं. जाणवायचं फक्त काही शिक्षकांकडे बघून!
पूर्ण लेख खूप सुंदर!!

अर्निका - खूपच छान लिहिताय तुम्ही. ग्रीस चे वर्णन, तुमचे अनुभव आणि तुमचे तुमचे, सगळच वाचताना अगदी सहजपण जाणवतो. त्यामुळे वाचताना अगदी मजा येते आणि डोळ्यासमोर चित्र उभे रहाते.
पु.ले.शु.

छान अनुभव आणि लेखन केलं आहेस. धडा घ्यावा असं आयुष्य आणि विचार.
सगळे भाग वाचले. फोटोंची गरज वाटली नाही. ते जे लोकांनी संबंध जुळवलेत ते काय फोटोंत उतरणार नाहीत.

मला हे वाचताना राहून राहून साऊंड ऑफ म्युझिक आठवतो आहे. फक्त ते प्रत्यक्षात अनुभवणं हे काय दिव्य असेल याची कल्पना फक्त करू शकतो.

सरांना मी पुढच्या आठवड्यात भेटणारच आहे, तेव्हा सगळ्यांचा निरोप नक्की सांगेन. किती बरं वाटेल त्यांना, खरंच!
स्वाती, खरोखर मला माझ्यातला ('घरात वाघ' वगळता) ठामपणा या घरी सापडण्याची गरज होती, ते झालं. पण मुलं बरंच शिकलीही आणि ख्रीसाच्या शाळेतून फोन आला की ती इंग्लिशमध्ये अख्ख्या वर्गाच्या पुढे आहे Happy हुश्श्श!
धन्यवाद सगळ्यांना <3

मॅकिन्टॉश सर ग्रेट आहेतच आणि तू ही खूप भाग्यवान.... असे सर तुला लाभलेत....

खूप कुतुहल आहे तुझ्या शिकवण्याबद्दल.... कशी शिकवत असशील, कशी त्या त्या परिस्थितीला तोंड देत असशील तू ....

लेख उत्तमच...

मॅकिन्टॉश सर ग्रेट आहेतच आणि तू ही खूप भाग्यवान.>+१११
आदरणीय सरांना नमस्कार......अशा माणसांमुळेच देश आणि समाज घडतो......