तेरा मुझसे है पेहले का नाता कोई - भाग ७

Submitted by हजारो ख्वाईशे ऐसी on 20 November, 2018 - 03:29

तेरा मुझसे है पेहले का नाता कोई - भाग १
https://www.maayboli.com/node/67353

तेरा मुझसे है पेहले का नाता कोई - भाग २
https://www.maayboli.com/node/67392

तेरा मुझसे है पेहले का नाता कोई - भाग ३
https://www.maayboli.com/node/67521

तेरा मुझसे है पेहले का नाता कोई - भाग ४
https://www.maayboli.com/node/67659

तेरा मुझसे है पेहले का नाता कोई - भाग ५
https://www.maayboli.com/node/67705

तेरा मुझसे है पेहले का नाता कोई - भाग ६
https://www.maayboli.com/node/67974

————————————————————
पुढे चालू....
————————————————————

लेहच्या त्या हॉटेलमध्ये सिद्धार्थ, निशा, राधा आणि सत्या आपापल्या रूममध्ये विचार करत बसले होते.
सिद्धार्थ :
आज सिद्धार्थला जे वाटत होतं त्याचं वर्णन कोणीही शब्दात करू शकत नव्हतं. निशाची आणि त्याची पहिली भेट आठवली त्याला. आज निशाच्या डोळ्यात त्याच्याबद्दल काहीतरी उमटताना पाहिलं होतं त्याने. एक ओळख सोडून दुसरं काहीतरी.
ते काहीतरी तसच अलवार होतं जसं त्याला आजवर तिच्याबद्दल वाटत आलं होतं की नाही माहीत नाही पण फक्त मैत्रीपेक्षा काहीतरी वेगळं होतं हे नक्की.. सिद्धार्थला आता असं वाटत होतं की उद्या जाऊन निशाला सगळं सांगावं. त्याने राधाच्या मदतीने तिचा लावलेला शोध, गोखलेकाकांची मदत घेऊन तिच्या घरी पाठवलेली माहिती, परत निशाच्या आईशी त्याची झालेली ओळख, हि ट्रिप हे सगळं निशाला त्याला सांगायचं होतं. आत्ताच्या आत्ता. पण त्याने मनाला समजावलं, हे सगळं तिच्यासाठी खूप लवकर होईल का? त्याने अजून वेळ घ्यायचं ठरवलं, ते उद्या पॅंगॉन्ग त्सो ला मुक्कामासाठी जाणार होते त्यामुळे आता झोपायला हवं म्हणून सिद्धार्थ झोपला.

निशा:
निशा आज जणू हवेत तरंगत होती. सिद्धार्थ बरोबर असतानाचा प्रत्येक क्षण तिने मनात कित्येकदा घोळवला होता तरी तिचं समाधान होत नव्हतं.
निशा हे काय चाललंय? तू असं किती ओळखतेस त्याला? त्याचा किती विचार करतेयस तू, असं एक मन म्हणताच दुसरं मन मात्र तिचं त्याच्याशी जणू कित्येक जन्मांचं नातं आहे अशी ग्वाही देत होतं. निशाला मगाशी तो म्हणालेला ते वाक्य आठवलं, “हो! मनातल्या मनात” आणि निशा चक्क लाजली. तिला कळत नव्हतं तिला काय होतंय नक्की.. सिद्धार्थचा चेहरा तिच्या डोळ्यांसमोरून हटत नव्हता. हा आनंद आहे कि हुरहूर हे तिला कळत नव्हतं. हे असं काही तिला या आधी कोणाबद्दलच वाटलं नव्हतं. सिद्धार्थचा मनमोकळा स्वभाव, त्याच दिलखुलास हसणं, त्याचं भटकंतीचं वेड आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्याने तिचा चेहरा अगदी सहज वाचणं... हे सगळंच तिला प्रचंड आवडलं होतं. निशा, are you falling in love? निशाने स्वतःलाच विचारलं. आणि त्याच उत्तर तिच्याजवळ असूनही तिला ते कबूल करता येत नव्हतं. सिद्धार्थच्या विचारातच निशाला झोप लागली.

राधा:
राधा तिच्या रूममध्ये अस्वस्थपणे फेऱ्या मारत होती. सिद्धार्थ तिचा जिवलग मित्र. त्याच्या आयुष्यात अशी कोणतीच गोष्ट नव्हती जी राधाला माहित नव्हती. राधा म्हणजे त्याच्यासाठी encyclopedia होती. जगातली कुठलीही गोष्ट अगदी लहानसहान असली तरी सिद्धार्थने नेहमीच तिच्याशी share केली होती. निशाबद्दलही तिला पहिल्या दिवसापासून माहित होत. पण आज जेंव्हा सिद्धार्थने निशाला माझ्याबरोबर येतेस का म्हणून विचारलं तेंव्हा राधाला ते आवडलं नाही. का ते राधालाही कळत नव्हतं. आज पूर्ण दिवस राधा त्याचाच विचार करत होती. इतर कोणाला राधाची परिस्थिती कळणं शक्यच नव्हतं पण... सत्यजित.. त्याने मात्र ते बरोबर ओळखलं आणि राधाला हटकलंही. राधाने निशा आणि सिद्धार्थचा विचार मनातून काढायचा किती प्रयत्न केला पण तिला ते जमलं नाही. त्या विचारातच राधाने रात्र काढली.

सत्या:
आज सकाळी जेंव्हा सिद्धार्थने निशाला त्याच्याबरोबर नेलं तेंव्हाच सत्याने राधाकडे पाहून अंदाज बांधला होता कि हिचा आजचा दिवस खराब जाणार. राधाची सिद्धार्थबरोबरची मैत्री बऱ्यापैकी possessiveness कडे झुकणारी होती, अर्थात सिद्धार्थच्या मनात मात्र असं काही नव्हतं हे सत्याला माहित होतं. याबद्दल राधाशी बोलायचा सत्याने या आधीही बऱ्याचदा प्रयत्न केला होता पण राधाने त्याचं कधीच ऐकून घेतलं नव्हतं. कदाचित तिलाही ते जाणवत असावं कि ती जसं वागते ते बरोबर नाही त्यामुळे ती सत्याला टाळायची. कारण सत्या जणू तिच्यासाठी आरसा होता. सिद्धार्थ मैत्रीपोटी राधाला काही बोलत नसला तरी सत्या मात्र तिला योग्यवेळी बोलण्याची एकही संधी सोडायचा नाही. सत्याने उद्या परत राधाशी बोलायचं ठरवलं आणि झोपला.

सकाळ झाली. आज सगळेजण पॅंगॉन्ग त्सो कडे कूच करणार होते. राधाने सगळ्यांना सूचना दिल्या आणि निशाकडे न बघताच ती निघालीही. निशाला वाईट वाटलं. राधा रागावलीये हे सर्वांना जाणवण्याइतपत ठळक होतं. आता काय करावं असा निशा विचार करत असतानाच तिच्या शेजारी सिद्धार्थची बाईक येऊन थांबली.
“चल.” सिद्धार्थ म्हणाला.
निशा काहीच न बोलता सिद्धार्थबरोबर निघाली.
बरंच अंतर गेल्यावर सिद्धार्थने बाईक थांबवली. मागून येणाऱ्या सर्वांना त्याने पुढे जाऊन दिलं. त्यातल्या सत्याने त्या दोघांकडे बघून दिलेली मिश्किल स्माईल सिद्धार्थच्या नजरेतून सुटली नाही.
“काय झालं निशा? कसला विचार करतेयस?” सिद्धार्थने निशाला विचारलंच शेवटी.
“काही नाही” निशाच तोंड अगदीच पडलं होतं.
“निशा.... राधाचं वागणं मनावर नको घेऊ.” सिद्धार्थला तिच्या नाराजीमागचं कारण कळालं होतं.
“सिद्धार्थ, I’m sorry..” निशाचा चेहरा आता रडवेला झाला होता.
“निशा... अगं काय झालं?” सिद्धार्थ गडबडलाच तिला सॉरी म्हणताना बघून.
“माझं चुकलं.. मी.. मी तुझ्या आणि राधा.. राधाच्या मध्ये... सॉरी... मी...” निशाला रडू आवरेना. तिने आपला चेहरा ओंजळीत लपवला आणि रडायला लागली.
सिद्धार्थने तिला थोडा वेळ रडू दिलं. ती शांत झाल्यावर त्याने पुन्हा विचारलं, “ निशा नक्की कशाचं वाईट वाटलंय तुला? काय झालं?”
“I’m sorry सिद्धार्थ. माझ्यामुळे तुझ्यात आणि राधाच्यात भांडण होऊ नये एव्हढंच मला वाटतं. मला तुमच्या दोघांमध्ये... मी.. मला माफ कर” निशाच्या डोळ्यात अजूनही पाणी होतं.
पण सिद्धार्थ तिला समजवायचं सोडून चक्क हसायला लागला.
वेडा आहे काय हा मुलगा? मी इथे रडतेय आणि हा हसतोय.?! त्याही परिस्थितीत निशाला त्याचा राग आला.
“निशा... अगं वेडे... तुला काय वाटलं? कि माझ्या आणि राधामध्ये काहीतरी आहे? आणि तुझ्या आमच्या मध्ये येण्याने ते स्पॉईल होईल?” सिद्धार्थला अजूनही हसू आवरत नव्हतं.
तो दोन पावलं चालत निशाजवळ आला आणि म्हणाला
“निशा, तू समजतेस तसं काही नाहीये गं. मी आणि राधा खूप चांगले मित्रमैत्रीण आहोत इतकंच. एका मैत्रिणीच्या पेक्षा इतर कुठल्याही नात्यात राधाला मी इमॅजिन करू शकत नाही. आणि..” सिद्धार्थ बोलता बोलता थांबला.
निशाने त्याच्याकडे पाहत विचारलं,
“आणि काय?”
“आणि असंही माझी लाईफ पार्टनर कशी असेल हे माझ्या डोक्यात क्लिअर आहे, त्यात राधा कुठेच बसत नाही.” सिद्धार्थ म्हणाला.
सिद्धार्थच्या या बोलण्याने निशाला न जाणे का पण आत कुठेतरी खूप बरं वाटलं. तिने डोळे पुसले आणि हळूच हसली, म्हणाली,
“हो का? आणि कशी असेल तुझी लाईफ पार्टनर?”
या निशाच्या प्रश्नावर सिद्धार्थही हसला, त्याच्या गालावरची खळी आणखी खोल करत नेहमीसारखा, आणि त्याने तिचा हात अलगद हातात घेतला. आणि त्याने निशाकडे पाहिलं, जगात असलेल्या सगळ्या प्रेमासहित. निशाला त्याच्याकडे पाहून उत्तर मिळालं होत. तिने हात सोडवून घ्यायचा प्रयत्न केला पण सिद्धार्थची तिच्या हातावरची पकड अजूनच घट्ट झाली आणि तो म्हणाला,
“तुझ्यासारखी”
निशाला कुठे चेहरा लपवू असं झालं होतं. तिने नजर जमिनीवर खिळवून ठेवली कारण त्याच्याकडे पाहण्याची हिम्मत आत्ता तरी तिच्यात नव्हती.
“निशा... I love you “ सिद्धार्थ म्हणाला.
आणि निशाने झटकन त्याच्याकडे पाहिलं,
“माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. तुझ्यासारखी नाही तूच हवी आहेस मला माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाची जोडीदार म्हणून. लग्न करशील माझ्याशी?”
निशाला सिद्धार्थ असं काही विचारेल असं वाटलंच नव्हतं. ती पुरती गोंधळली होती. हसू, गोंधळ आणि लज्जा यांचं अप्रतिम मिश्रण तयार झालं होत तिच्या चेहऱ्यावर. पण सिद्धार्थ काही तिच्यावरून नजर हटवायला तयार नव्हता. त्याला जमतच नव्हतं ते.
“निशा... उत्तराची काही घाई नाहीये. तू विचार कर, वेळ घे आणि मग उत्तर दे.” सिद्धार्थला तिचा गोंधळ समजत होता पण त्याबरोबर त्याने हेही ओळखलं कि ती नाही म्हणणार नाही, कारण तसं असतं तर तिचा चेहरा लगेच बदलला असता आणि इतक्या दिवसात तो तिचा चेहरा वाचताना कधीच चुकला नव्हता.
पुढचा पॅंगॉन्ग त्सो पर्यंतचा रास्ता ते दोघेही एकमेकांशी बोलले नाहीत.
पॅंगॉन्ग त्सो ला आल्यावर सर्वांना सक्तीचा आराम करायचा होता. ते दोघे टेन्ट्स कडे निघालेले असतानाच समोरून राधा आणि सत्या आले.
“हाय सिद्ध्या, मला जरा बोलायचं तुझ्याशी.” असं म्हणून राधा जवळजवळ हाताला धरून खेचतच सिद्धार्थला घेऊन गेली. त्या गडबडीतही सिद्धार्थने निशाकडे पाहून एक छान स्माईल दिली आणि गेला.
निशा आता काय करावं असा विचार करत उभी होती.
“हाय निशा कशी आहेस?” सत्याने विचारलं.
“मी छान. तू कसा आहेस सत्यजित?” निशाने विचारलं.
“प्लिज कॉल मी सत्या. सत्यजित जरा जास्त फॉर्मल आहे.” सत्य हसून म्हणाला.
“ओके. सत्या.” निशा हसली.
“निशा, एक विचारू रागावणार नाहीस ना?” सत्याने विचारलं.
“नाही विचार की” निशा म्हणाली.
“तुला आपला सिद्धार्थ कसा वाटतो गं? म्हणजे चांगला मुलगा आहे नाही?” सत्याने विचारलं.
सत्या आपल्याला चिडवतोय म्हणजे त्याला सिद्धार्थच्या मनात काय चाललंय ते माहित आहे हे कळून निशा हसली.
“बाय सत्या. उद्या भेटू” असं म्हणून निशा टेन्टकडे निघालीसुद्धा.
इकडे राधाचा मूड काही वेगळाच दिसत होता. तिला आलेला राग तिच्या डोळ्यातून स्पष्ट दिसत होता.
“राधे, काय झालं? असं का आणलंस मला इकडे? सिद्धार्थला काहीच कळत नव्हतं ती अशी का वागतेय.
“सिद्ध्या त्या पोरीच्या मागे लागून आधीच खूप वेळ घालवलायस तू. मी तुला अजून टाईमपास करून देणार नाही.” राधा ऐकायच्या मन:स्थितीत नव्हती.
“राधे, उगाच काहीतरी बोलू नकोस. तू सगळं माहित असूनही असं बोलतेयस? मी नाही जगू शकत निशाशिवाय. माझं प्रेम आहे तिच्यावर”
सिद्धार्थ असं म्हणाला तशी राधा उसळलीच
“ कसलं प्रेम रे? तिच्या गावी तरी आहे का तुझं तिच्यावर प्रेम आहे ते?”
“राधा प्लिज... मी आजच तिला सांगितलय माझं तिच्यावर प्रेम आहे. आणि मला असं वाटतंय कि तिचं उत्तर हो असणार आहे” असं म्हणून सिद्धार्थ तिथून निघूनच गेला. राधा जणू स्तब्ध झाली होती. इतकी मोठी गोष्ट घडून गेली पण आपल्याला सांगावं असंही त्याला वाटलं नाही? एकदाही? राधाला काही न सुचल्यामुळे ती नुसतीच बसून राहिली. काहीतरी निश्चय करूनच तिथून उठली.
निशा काही वेळ आराम करून टेन्टबाहेर आली. हळूहळू ग्रुपमधले सगळेच बाहेर येत होते. पॅंगॉन्ग त्सो खूप सुंदर दिसत होतं. निळंशार पाणी आणि त्यात प्रतिबिंब पाहणारे निळे आकाश यांचा जणू संगम झाला होता. निशा स्तब्ध होऊन ते दृश्य डोळ्यात साठवून घेत होती. इतक्यात तिला मागे कोणीतरी उभं आहे असं वाटलं. ती मागे वळली तर तिथे राधा होती.
“हाय निशा, आज रात्री आपण टेन्ट शेअर नको करायला. आणि हो, मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं, तुला वेळ आहे ना?” राधाने निशाला विचारलं.
क्रमश:

Group content visibility: 
Public - accessible to all site users

.
.

अप्रतिम!

या निशाच्या प्रश्नावर सिद्धार्थही हसला, त्याच्या गालावरची खळी आणखी खोल करत नेहमीसारखा, आणि त्याने तिचा हात अलगद हातात घेतला. आणि त्याने निशाकडे पाहिलं, जगात असलेल्या सगळ्या प्रेमासहित. निशाला त्याच्याकडे पाहून उत्तर मिळालं होत. तिने हात सोडवून घ्यायचा प्रयत्न केला पण सिद्धार्थची तिच्या हातावरची पकड अजूनच घट्ट झाली आणि तो म्हणाला, >>> श्यप्प्थ!!!! शाहरूखच आठवला. Happy

“हाय निशा, आज रात्री आपण टेन्ट शेअर नको करायला.>> टेन्ट? हे लोक नोवेंबर महिन्यात टेन्ट मध्ये कसे राहू शकतात?