अमानविय शक्तिंशी बोकलत ह्यांचे मानविय द्वंद्व !!!!!

Submitted by कल्पतरू on 24 August, 2018 - 07:23

नमस्कार मंडळी, हा नवीन धागा काढण्याचे कारण म्हणजे आपले नवीन मायबोलीकर बोकलत, तर या गोष्टीला काही दिवसांपूर्वी सुरवात झाली, अमानवीय या धाग्यावर अनेक मायबोलीकर त्यांना आलेले गूढ अनुभव शेअर करत असतात. त्या सगळ्या अनुभवांना एक गंभीरतेची किनार असते पण आपले बोकलत त्या सगळ्या गंभीरतेवर पाणी ओतून तो धागा विनोदी करण्याचा प्रयत्न करत आहेत. मायबोलीकरांनी त्यांना हात जोडून नवीन धागा काढण्याची विनंती केली पण परिणाम शून्य, म्हणून त्यांच्या वतीने हा धागा मी काढत आहे आणि त्यांना कळकळीची विनंती करत आहे कि इथून पुढे त्यांनी त्यांचे अनुभव या धाग्यावर शेअर करावेत. नमुन्यादाखल त्यांनी शेअर केलेला अनुभव इथे पोस्ट करत आहे.
मुंजाचाच विषय निघालाय तर आता मी तुम्हाला एक खरीखुरी माझ्याबाबत घडलेली घटना सांगतो. ३-४ दिवसाची सुट्टी काढून मामाने मला त्याच्या गावी कोकणात बोलावलं होतं. साधारण दुपारी एक वाजता तिकडे पोहचलो समोर पाहतोय तर सगळे गावकरी माझीच वाट पाहत उभे होते. मला पाहताच त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. प्रत्येकजण माझ्याकडे अपेक्षेने पाहत उभा होता, कोणाच्या डोळ्यात पाणी होते तर कोणी हात जोडून उभं होतं. मामाच्या घरी गेल्यावर मामाला हा काय प्रकार आहे म्हणून विचारलं तर तो गंभीर झाला आणि म्हणाला तुला मी मुद्दाम इथे बोलावलंय. गाव संकटात आहे, गावाच्या बाहेर एक चिंचेचं भलं मोठं झाड आहे त्या झाडावर एक मुंजा राहतो त्या मुंजाने गावातल्या माणसांचं जगणं मुश्किल करून ठेवलंय. दर अमावसेला २० कोंबड्या आणि पौर्णिमेला १० बोकड अर्पण करावी लागतात. नाही केल्या तर त्या चिंचेच्या झाडावरून येणारी केबलची वायर तो तोडून टाकतो. त्यामुळे बायकांचे डेली सोप्स आणि बाप्यांचे क्रिकेटचे सामने बंद होतात. अजून जीओचा टॉवर पण आपल्याकडे नाय आला त्यामुळे या अनर्थातून गावाला वाचव आणि गावात सुख समाधान शांती नांदु दे. गाव खरोखरच एका मोठ्या संकटात सापडलं होतं.दैनंदिन गरजेचं साधन नसल्याने बायकांची भांडणं आणि बाप्यांच्या पारावरील गप्पाना ऊत आला होता. एक मात्र चांगली गोष्ट अशी की लोकं एकटे दुकटे बाहेर पडायला घाबरत असल्याने गाव हागणदारीमुक्त झाला होता. तरीसुद्धा गावाला या संकटातून काढणं माझं कर्तव्य होतं. मामा मला म्हणाला उद्या अमावास्या आहे, जर तू मुंज्याला कुस्तीचा आव्हान देऊन हरवलंस तर तो कायमचा निघून जाईल. मी थोडा वेळ विचार केला, आणि मामाला बोललो निश्चिन्त रहा. मी हरवेन उद्या त्या मुंजाला. आता मी कुस्तीच्या तयारीला लागलो, जेमतेम २४ तास माझ्याकडे होते.या २४ तासात सल्लूचा सुलतान आणि आमिरचा दंगल वारंवार पाहून कुस्तीतले सगळे डावपेच व्यवस्थित शिकून घेतले. दुसऱ्या दिवसाची रात्र कधी अली समजलीच नाही. रात्री ठीक बारा वाजता त्या चिंचेच्या झाडाखाली जाऊन मुंजाला कुस्ती खेळायचं आव्हान दिलं. आव्हान दिल्याबरोबर झाडावर सळसळ झली आणि २० ते २५ फुटाचा एक माणूस भेसूर हसत माझ्यासमोर उभा राहिला. आकाशात एक लख्ख वीज चमकली आणि आमच्या कुस्तीला प्रारंभ झाला. सगळे गावकरी माझ्या नावाचा जल्लोष करत होते त्यामुळे माझ्या अंगात चेव आला होता. पहिला डाव आम्ही एकमेकांची ताकद मोजण्यात खर्ची घालवला. नंतर खऱ्या कुस्तीला सुरवात झाली. कधी तो वरचढ ठरायचा तर कधी मी. साधारण १ तास असाच गेला दोघेही थकलो होतो. शेवटी मुंजाने मला पकडायला हाताची कैची मारली ती मी लीलया चुकवली आणि ज्या क्षणाची वाट मी पाहत होतो तो आला. कैची चुकल्यामुळे मुंजा थोडा वळला आणि त्याची कंबर माझ्यासमोर अली. मी क्षणाचाही विलंब न करता सुलतान मधली सल्लूची फिनिशिंग मूव्ह मारली, या डावातून मुंजा सावरू नाही शकला आणि उताणा पडून राहिला. गावकर्यांनी एकच जल्लोष करत मला खांदयावर उचलला आणि शोले मधल्या जय वीरू सारखी माझी वरात काढली. दुसऱ्या दिवशी माझ्यासाठी जंगी पार्टी ठेवली होती. सगळी गावकरी मला आशीर्वाद देत होती.मामाच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळत होते. एका गावाला संकटातून वाचवल्याचं समाधान माझ्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होतं.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

झाड सोडले म्हणून एव्हढे प्रतिसाद आले तर माझा विचार बदलला असे जाहीर केले तर काय होईल?

झाड सोडले म्हणून एव्हढे प्रतिसाद आले तर माझा विचार बदलला असे जाहीर केले तर काय होईल?>>>>अमानवीय २ या धाग्यावर मी काहीही लिहिणार नाही, अजून फक्त १२०० प्रतिसाद बाकी आहेत त्या धाग्यावर नंतर अमानवीय ३ निघणार, आणि माझ्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी अशी की तो धागा मी न भूतो न भविष्य असा गाजवणार. आता वेगवेगळे सण पण सुरु होतील त्यामुळे दिवाळीपर्यंत मला जास्त काय लिहायला नाय मिळणार, एकदा का तुळशीचा लग्न लागला की बोकलतचा कहर सुरु झालाच म्हणून समजा. मेरा वचन ही है शासन.

अहो तो धागा एकदम मेल्यागत पड़लाय
जरा येत चला की तिकडे
आणि प्लीज -
आमच्या सारख्या बोकलत फैन्सना ऎसे भूतांच्या राज्यात एकटे नका ओ सोडु.

बोकलतभाऊ या धाग्यावर तुमच्या कथांची चर्चा होऊ द्या कि राव, कशाला त्या झाडाचे विषय नाही का
सांगा कि एखाद्या जखिणी बरोबरचे किंव्हा हडळी बद्दलचे तुमचे रोमँटिक कथानक

त्या धाग्यासोबत माझे जन्मोजन्मीचे ऋणानुबंध आहेत असं सारखं वाटतंय मला.तिकडे कोणी प्लँचेट सुरु केलं तर मला नाईलाजाने जावं लागेल.<<<~~~~~
जर कोण्या मूर्ख व्यक्तीने त्या धाग्यात planchet करून तुम्हाला बोलावल तर ते सर्व जण त्याला बुकलून काढतील, आणि मग त्याला भयाण रात्री बोकलात नगर इथे बोंबलत येण्या शिवाय दुसरा पर्यायच नाही.

हा धागा का मेल्यासारखा पडलाय.... बोकलत कुठे आहात तुम्ही..तुमचे किस्से लिहा ना इथे
नवीन Submitted by उमानु on 20 September, 2018 - 00:15
>>>>
थांबा हो येतील किस्से. ४ दिवसांनी पित्र चालू होतील तेव्हा कदाचित अतृप्त आत्मे सुद्धा येऊन लिहीतील.

मे महिन्याची दुपार आणि सुट्टी असा दुग्धशर्करायोग जुळून आला की आमरस पुरीवर आडवा हात मारायचा आणि नंतर पंखा फुल स्पीडवर ठेऊन आपलं आवडतं पुस्तक वाचायचं हा माझा आवडता जुना छंद. असाच एक दिवस पुस्तक वाचत असताना बाल्कनीत पडफड झाली, जरा नाखुशीनेच उठून मी बाहेर गेलो पाहतोय तर समोर एक कबुतर चोचीत पत्र घेऊन आला होता. मागच्याच आठवड्यात समोरच्या बिल्डिंगमधला पक्या आणि त्याची मैत्रीण बागेत शेवपुरी खायला गेले होते. पक्या मरणाचा कंजूष आणि त्यात हावरा पण, दोघात एकच शेवपुरी मागवली, पक्याने चार खाल्य्या आणि पोरीला दोनच दिल्या. पोरीचा बाप लांबून सगळं बघत होता, प्रेम आहे म्हणून एकच प्लेट मागवली या गैरसमजाचा भोपळा तेव्हा फुटला जेव्हा शेवटी मिळणारी सुकी पुरी पण पक्याने त्याच्याच घशात टाकली. आता बाप भेळपुरीच्या गाडीजवळ जाऊन तावातावाने भांडू लागला. "वेळ आली तर या शेवपुरीवाल्या भैय्यासोबत पोरीचं लग्न लावून देईन तुझ्यासारखा कंजूष जावई पदरात पाडून घेणार नाही" या वाक्यानंतर तो शेवपुरीवाला अनेकदा आमच्या कॉलनीत टोपलीतून दारोदारी शेवपुरी विकताना मला दिसला होता, तर ते पत्रं त्या पोरीनेच पाठवलं असेल म्हणून मी परत आत जायला वळलो तर कबुतर म्हणाला थांब बोकलत, हे तुझंच पत्र आहे. आत्याने पाठवलंय. आत्याकडून पत्र आलंय म्हणजे कोकणात जायचा योग आला होता. माझे नातेवाईक मला त्यांच्याकडे बोलावण्यासाठी पत्रव्यवहार करतात, फोनवर जर मला बोलावलं तर त्या परिसरातल्या दुष्ट शक्तींकडून माझ्या प्रवासात बाधा येते. गाडी बंद पडणे, वाहनचालकाचे नियंत्रण सुटणे अशा गोष्टी सर्रास होतात, त्यामुळे शक्यतो नातेवाईक माझ्याशी पत्रव्यवहार करतात. तर त्या कबुतरालापण मी थोडी आमरस पुरी खायला दिली आणि दुसऱ्या दिवशीच पहाटेच्या गाडीने मी आत्याच्या गावी हजर झालो. पोहचल्यावर माझं जंगी स्वागत गावकऱ्यांकडून झालं. कितीतरी हार एकामागून एक माझ्या गळ्यात पडत होते. समोरच भला मोठा बॅनर लावला होता त्यावर गॉगल घातलेला माझा फोटो आणि चार पाच भुतं भीतीने सैरावैरा पळताना दाखवली होती, आणि बोकलतची फाईट, वातावरण टाईट. बोकलत चले मस्ती में, आग लगी भूतों कि बस्ती में असं बरंच कायकाय लिहिलं होतं.नंतर माझी स्टॅन्डपासून ते आत्याच्या घरापर्यंत वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली. आत्याने मस्त चमचमीत जेवणाचा बेत केला होता. नंतर संध्याकाळी गावातल्या देवळाजवळ माझं भाषण झालं. आजूबाजूच्या गावातले हजारो माणसं माझं भाषण ऐकण्यासाठी आले होते. मी स्टेजवर पाय ठेवताच माझ्या नावाचा असा काही जल्लोष झाला कि विचारू नका. पोलिसांची एकच धावपळ उडाली. मग मीच एक हात वर केला तेव्हा सगळीकडे पिनड्रॉप सायलेन्स. मग मी सगळ्या श्रोत्यांना भुतांचे प्रकार, त्यांची आवडती वस्तिस्थानं, तसेच कुठल्या भुताशी कधी सामना झालाच तर त्यापासून कसं वाचायचं यावर तासभर व्याख्यान दिलं. सगळे मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते. व्याख्यान संपल्यावर टाळ्यांचा जोरदार कडकडाट झाला. रात्री जेवण झाल्यावर सगळे अंगणात गप्पा मारत बसलो होतो, रात्री कधीतरी माझा डोळा लागला, रात्रीचे साधारण दोन अडीच वाजले असतील एका विचित्र घंटानादाने मला जाग आली,......(पुढील भाग लवकरच)

मस्त, Rofl लवकर येऊ द्यात.

बोकलत रिटर्न्स!
पुभाप्र.

माझा पण एक किस्सा लिहिण्याची इच्छा आहे, जमल्यास.
इथे लिहिला तर चालेल का?

माझा पण एक किस्सा लिहिण्याची इच्छा आहे, जमल्यास.
इथे लिहिला तर चालेल का?>>> हे काय विचारणं झालं, आपलंच झाड आहे लिहा बिनधास्त.

रात्री जेवण झाल्यावर सगळे अंगणात गप्पा मारत बसलो होतो, रात्री कधीतरी माझा डोळा लागला, रात्रीचे साधारण दोन अडीच वाजले असतील एका विचित्र घंटानादाने मला जाग आली,......(पुढील भाग लवकरच)

सुरवातीला मी जरासा गोंधळलो नंतर समजलं तो आवाज दूर शेतावरून येत होता. गावाच्या पश्चिमेला घनदाट झाडी होती. नंतर एक दीड किलोमीटर शेतीचा भाग आणि त्याच्यापुढे पूर्वेला माळरान. तर आवाज त्या घनदाट झाडीतून येत होता. सहज म्हणून मी नक्की काय प्रकार आहे हे पाहायला पुढे गेलो तर काळजात धस्स झालं पावलं जागेवरच थबकली, माझ्या मनगटावर लावलेलं यंत्र बीप बीप आवाज करायला लागलं, अमानवीय शक्ती आसपास असल्या कि ते यंत्र वाजतं. ती चक्क वेताळाची पालखी होती. सोन्याचा गोंडा लख्ख चमकत होता. आजपर्यंत जे फक्त ऐकत होतो ते माझ्यासमोर होतं डोळ्यांवर विश्वास बसत न्हवता. असा योग पुन्हा येणे नाही. काहीही करून गोंडा मिळवायचा आणि वेताळ गुलाम झाला कि त्याच्याकडून सोन्याचा हंडा मागून गावकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधरवायची हा विचार पक्का केला. तसं पाहायला गेलं तर सरळ जाऊन तो सोन्याचा गोंडा मी हिसकावून आणू शकत होतो. परंतु शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ या तत्वावर चालणार मी असल्याने युक्तीने तो गोंडा आणण्याचं ठरवलं. मी हळूहळू बांधांमागे लपत लपत त्या पालखिजवळ गेलो. सगळ्यात पुढे लहान पोरं त्यांच्या पाठीमागे बायका नंतर बाप्ये आणि वाजंत्री, सगळ्यात शेवटी वेताळाची पालखी आणि आजूबाजूला १५-२० म्हातारे अशी रचना होती,बायका बाप्ये पोरं सगळेच भान हरपून नाचत होते. पालखी जवळ आल्यावर बेमालूमपणे मी त्यांच्यात मिसळलो. आता सोन्याचा गोंडा चक्क एक हात जवळ होता पण पालखीत आग्या वेताळ बसला होता, निखाऱ्यासारखे लाल भडक डोळे, शक्तिमान मधल्या किलविष सारखं नाक, दोरखंड सारखे केस, माझ्याजागी दुसरा कोणी असता तर भीतीने पार बोबडी वळली असती पण मी खंबीर होतो आणि विषय गंभीर होता. पाच मिनिटं झाली असतील आग्या उठायचं नाव घेत न्हवता. कंटाळून मी गोंडा खेचायला जाणार इतक्यात चमत्कार झाला आणि झिंगाट गाणं वाजंत्र्यांनी सुरु केलं, गाण्याचे सूर ऐकून आग्याच्या अंगात वारं संचारलं आणि पालखी सोडून सगळ्याच्या पुढे जाऊन नाचू लागला. मिळालेल्या संधीचं सोनं करत मी सोन्याचा गोंडा उचलला आणि आल्या पावली माघारी वळलो. वेताळाच्या गोटात एकच खळबळ माजली होती. दुसऱ्या दिवशी गावात अनेक कुत्र्या मांजरींचा सुळसुळाट झाला होता. वेताळाचे हस्तक पशु पक्षांच्या रूपात येऊन गोंडा कोणी पळवलाय याचा शोध घेत होते. मी मजेत चहा पीत पीत त्यांची केविलवाणी धडपड पाहत होतो. त्यातलेच दोन चार धीट माझ्या घराची पाहणी करण्याकरता घरी शिरले. मग मात्र माझी सटकली, एका कुत्र्याची मानगूट धरल्यावर सगळे त्यांच्या मूळ रूपात आले आणि माझ्यावर हल्ला चढवला. परंतु एकाच वेळी दोन तीनशे जणांना लीलया लोळवणारा मी, माझ्यावर चौघांनी हल्ला करणं म्हणजे पेटत्या तेल विहिरीची आग फुंकर मारून विझवण्याचा प्रयत्न करण्यासारखं होतं, त्या चौघांचाही चपलेने आणि पोकळ बांबूने खरपूस समाचार घेतला, शेवटी गयावया करून पाया पडायला लागले तेव्हा मला त्यांची दया आली, मग घरातली धुणी भांडी त्यांच्याकडून करून घेतली आणि संध्याकाळी त्यांच्याकरवी वेताळाला निरोप पाठवला गोंडा पाहिजे असेल असेल तर सोन्याचा हंडा घेऊन रात्री बारा वाजता स्मशानाजवळ भेट. मी रात्री स्मशानाजवळ गेलो तेव्हा वेताळ आधीपासूनच वाट पाहत झाडावर लटकला होता. मी येताना दिसताच लगबगीने माझ्याजवळ आला आणि सकाळी त्याच्या हस्तकांनी माझ्या वर जो हल्ला केला त्याबद्दल माफी मागून सोन्याचा भरलेला हंडा माझ्या हवाली केला. दुसऱ्या दिवशी मी गावातल्या सगळ्यांना सोन्याची दोन दोन बिस्किटं दिली. गावकऱ्यांच्या आनंदाला पारावार उरला न्हवता. मी परत निघते वेळी त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं.आत्याचा उर अभिमानाने भरून आला होता. सगळ्यांनी मला अनेक आशीर्वाद दिले आणि रथातून माझी मिरवणूक एस टी स्टॅन्ड पर्यंत काढली. मुंबईची एस टी आली तसा मी आतमध्ये चढलो परंतु गावकरी खूपच भावुक झाले होते, मग मी लवकरच परत येऊन पुन्हा सोन्याची बिस्कीट देण्याचं आश्वासन दिलं तेव्हा सगळ्यांनी बोकलत नावाचा जय जयकर केला, अगदी माझी गाडी दिसेनाशी होईपर्यंत मला निरोप दिला. समाप्त.

धमाल Lol

कुणातरी म्हटलंच आहे.
बोकलतांचे घरी, हडळी पाणी भरी.

मनापासून धन्यवाद मानव पृथ्वीकर, सस्मित, मेघा, अनामिका
@बाबा कामदेव दोन्हीकडे टाकलाय किस्सा, दोन्ही धाग्यांच्या वाचकांचा मान ठेवलाय. Happy

मी पण तुमची पंखा आहे बोकलत... भारी लिहिता तुम्ही.. हे तर ठीकच आहे पण थोडं इतरही लिहीत जा... छान लिहिता तुम्ही

Pages