अमानविय शक्तिंशी बोकलत ह्यांचे मानविय द्वंद्व !!!!!

Submitted by कल्पतरू on 24 August, 2018 - 07:23

नमस्कार मंडळी, हा नवीन धागा काढण्याचे कारण म्हणजे आपले नवीन मायबोलीकर बोकलत, तर या गोष्टीला काही दिवसांपूर्वी सुरवात झाली, अमानवीय या धाग्यावर अनेक मायबोलीकर त्यांना आलेले गूढ अनुभव शेअर करत असतात. त्या सगळ्या अनुभवांना एक गंभीरतेची किनार असते पण आपले बोकलत त्या सगळ्या गंभीरतेवर पाणी ओतून तो धागा विनोदी करण्याचा प्रयत्न करत आहेत. मायबोलीकरांनी त्यांना हात जोडून नवीन धागा काढण्याची विनंती केली पण परिणाम शून्य, म्हणून त्यांच्या वतीने हा धागा मी काढत आहे आणि त्यांना कळकळीची विनंती करत आहे कि इथून पुढे त्यांनी त्यांचे अनुभव या धाग्यावर शेअर करावेत. नमुन्यादाखल त्यांनी शेअर केलेला अनुभव इथे पोस्ट करत आहे.
मुंजाचाच विषय निघालाय तर आता मी तुम्हाला एक खरीखुरी माझ्याबाबत घडलेली घटना सांगतो. ३-४ दिवसाची सुट्टी काढून मामाने मला त्याच्या गावी कोकणात बोलावलं होतं. साधारण दुपारी एक वाजता तिकडे पोहचलो समोर पाहतोय तर सगळे गावकरी माझीच वाट पाहत उभे होते. मला पाहताच त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. प्रत्येकजण माझ्याकडे अपेक्षेने पाहत उभा होता, कोणाच्या डोळ्यात पाणी होते तर कोणी हात जोडून उभं होतं. मामाच्या घरी गेल्यावर मामाला हा काय प्रकार आहे म्हणून विचारलं तर तो गंभीर झाला आणि म्हणाला तुला मी मुद्दाम इथे बोलावलंय. गाव संकटात आहे, गावाच्या बाहेर एक चिंचेचं भलं मोठं झाड आहे त्या झाडावर एक मुंजा राहतो त्या मुंजाने गावातल्या माणसांचं जगणं मुश्किल करून ठेवलंय. दर अमावसेला २० कोंबड्या आणि पौर्णिमेला १० बोकड अर्पण करावी लागतात. नाही केल्या तर त्या चिंचेच्या झाडावरून येणारी केबलची वायर तो तोडून टाकतो. त्यामुळे बायकांचे डेली सोप्स आणि बाप्यांचे क्रिकेटचे सामने बंद होतात. अजून जीओचा टॉवर पण आपल्याकडे नाय आला त्यामुळे या अनर्थातून गावाला वाचव आणि गावात सुख समाधान शांती नांदु दे. गाव खरोखरच एका मोठ्या संकटात सापडलं होतं.दैनंदिन गरजेचं साधन नसल्याने बायकांची भांडणं आणि बाप्यांच्या पारावरील गप्पाना ऊत आला होता. एक मात्र चांगली गोष्ट अशी की लोकं एकटे दुकटे बाहेर पडायला घाबरत असल्याने गाव हागणदारीमुक्त झाला होता. तरीसुद्धा गावाला या संकटातून काढणं माझं कर्तव्य होतं. मामा मला म्हणाला उद्या अमावास्या आहे, जर तू मुंज्याला कुस्तीचा आव्हान देऊन हरवलंस तर तो कायमचा निघून जाईल. मी थोडा वेळ विचार केला, आणि मामाला बोललो निश्चिन्त रहा. मी हरवेन उद्या त्या मुंजाला. आता मी कुस्तीच्या तयारीला लागलो, जेमतेम २४ तास माझ्याकडे होते.या २४ तासात सल्लूचा सुलतान आणि आमिरचा दंगल वारंवार पाहून कुस्तीतले सगळे डावपेच व्यवस्थित शिकून घेतले. दुसऱ्या दिवसाची रात्र कधी अली समजलीच नाही. रात्री ठीक बारा वाजता त्या चिंचेच्या झाडाखाली जाऊन मुंजाला कुस्ती खेळायचं आव्हान दिलं. आव्हान दिल्याबरोबर झाडावर सळसळ झली आणि २० ते २५ फुटाचा एक माणूस भेसूर हसत माझ्यासमोर उभा राहिला. आकाशात एक लख्ख वीज चमकली आणि आमच्या कुस्तीला प्रारंभ झाला. सगळे गावकरी माझ्या नावाचा जल्लोष करत होते त्यामुळे माझ्या अंगात चेव आला होता. पहिला डाव आम्ही एकमेकांची ताकद मोजण्यात खर्ची घालवला. नंतर खऱ्या कुस्तीला सुरवात झाली. कधी तो वरचढ ठरायचा तर कधी मी. साधारण १ तास असाच गेला दोघेही थकलो होतो. शेवटी मुंजाने मला पकडायला हाताची कैची मारली ती मी लीलया चुकवली आणि ज्या क्षणाची वाट मी पाहत होतो तो आला. कैची चुकल्यामुळे मुंजा थोडा वळला आणि त्याची कंबर माझ्यासमोर अली. मी क्षणाचाही विलंब न करता सुलतान मधली सल्लूची फिनिशिंग मूव्ह मारली, या डावातून मुंजा सावरू नाही शकला आणि उताणा पडून राहिला. गावकर्यांनी एकच जल्लोष करत मला खांदयावर उचलला आणि शोले मधल्या जय वीरू सारखी माझी वरात काढली. दुसऱ्या दिवशी माझ्यासाठी जंगी पार्टी ठेवली होती. सगळी गावकरी मला आशीर्वाद देत होती.मामाच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळत होते. एका गावाला संकटातून वाचवल्याचं समाधान माझ्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होतं.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

भरत Lol

अमानवीय या धाग्यावर अम्धश्रद्धेचा प्रसार होत असल्याने बंदी आणावी असा आग्रह आजवर कुणीही धरलेला नाही हे नवलच आहे. असहीष्णुता राहिली नाही असे खेदाने म्हणावे लागत होते परंतु बोकलत यांनी लिहू नये अशा आशयाच्या पोस्टी वाचल्याने जिवात जीव आला, जीव भांड्यात पडला, जिवाची शांती झाली.

मायबोलीवरील सर्व जीवित महिला ड्युआयड्यांकडून सर्व जीवित पुरूष ड्युआयड्यांना राखी बांधण्यात येणार आहे. ड्युभावांकडून पाच पाच इमेल अकाउंटसची ड्युतायड्यांना ओवाळणी
- मायबोलीवरील अमानवीय विश्वातील सण

तिकडे सगळे याच्या त्याच्या ऐकीव गोष्टी सांगत असतात, भुताने विडीच काय मागीतली, पारंब्यानाच काय लटकत होता भूत, गाडीच्या वेगाने धावत काय होतं, कशावरून त्या थापा नाहीत? दोन ओळीत यांचे अनुभव संपून पण जातात. आणि माझे सविस्तर सत्य अनुभव लिहिले की यांच्या नाकाला मिरच्या का झोंबतात ते कळलं नाही, अनुभव मला आलाय ना तो खरा की खोटा ठरवणारे हे कोण? यांच्या भल्यासाठीच लिहितोय हे यांना समजत कसं नाही. आणि पटत नसतील तर वाचू नये माझे अनुभव, दुर्लक्ष करा, पण ते सुद्धा जमत नाही. आजपर्यंत जे महान शास्त्रज्ञ आणि तत्त्ववेत्ते होऊन गेले त्यांना पण सुरवातीला असाच विरोध झाला होता, पण नंतर त्यांचे विचार शोध जगाने स्विकारलेच ना, तसच एक दिवस येईल तिथल्या माझ्या विरोधात असलेल्या लोकांना माझ्या कथा पटतील. मी तिथे लिहीत राहणार.

तर मंडळी मायबोलीवरचे हे अमानवीय जग आहे त्यामधे मानवीय नावाचा धागा अत्यंत लोकप्रिय असून त्या धाग्यावर कोकलत नावाच्या आयडीने मानवांशी कुस्ती केल्याचे प्रसंग रंगवले असल्याने अमानवीय आयडी खवळले आहेत. अमानवीय जगात यावरून मोठाच गदारोळ माजलेला आहे. कोकलत या आयडीवर शिव्याशापांचा वर्षाव होत असताना बाई कामदेवी या आयडीने कोकलत यांची जोरदार पाठराखण करीत मानवीय धाग्याला नमोरुग्ण म्हटले आहे. त्यामुळे मानवीय धाग्याचे चाहते भलतेच नाराज झालेले आहेत.

मात्र रुग्ण म्हटल्याने एव्हढे तापायचे कारण नाही कारण एक अमानवीय डॉक्टर पहिल्यापासून तैनातीत आहे असे जोरदार प्रत्त्युत्तर कामदेवी यांनी दिलेले आहे. जय मल्हार मालिकेत दर्शवल्याप्रमाने हा डॉक्तर देखील एकातून दुसरा अवतार घेऊ शकतो आणि प्रत्येक अवतारात तो वरिजनल असतो असे मानले जाते. या डॉक्टरच्या हॉस्पिटलमधे जे रुग्ण जातात त्यांना डॉक्टर दिसत नाही, मात्र इंजेक्शन हवेतून येते, टोचून जाते, तोंड भलतेच काही दिसल्यास आ वासला जाऊन रुग्णाच्या तोंडात बॅटरीचा उजेड पडणे असे प्रकार झाल्याचे आढळलेले आहे. त्यामुळे अमानवीय जगातल्या रुग्णांनी काळजी करू नये या आवाहनाला सत्याची किनार असल्याचे दिसून येते.

- आमच्या बातमीदाराकडून

मला आवडले किस्से माझा मान ठेवा बोकलत >>> धन्यवाद, खरं तर तिथल्या सगळ्या वाचकांना माझे किस्से आवडतात, काही आयडी आहेत बोटावर मोजण्याइतके ज्यांना आवडत नाही, पण अपवाद तर प्रत्येक गोष्टीला असतोच ना.

बाबा कामदेव, तुम्ही मायबोलीच्या धोरणाशी द्वंद्व खेळू पाहताय का?
>>
मायबोलीला धोरण आहे या तुमच्या विधानावरचे हसू थांबले की ऊत्तर लिहायला घेतो....

अमानवीय धाग्याला पुरोगामी भुताने झपाटले,
फक्त धर्मनिरपेक्ष मांत्रिकच त्या धाग्याचे भूत उत्रवू शकतात

तर आज तुम्हाला मी घोस्ट हंटर कसा झालो ते सांगणार आहे. माझं बालपण कोकणातल्या एका खेड्यात गेलं. चारही बाजूंनी डोंगर आणि मधेच लहानसं ५०० घरांची वस्ती असलेलं आमचं गाव. संध्याकाळ झाली की शाईच्या ओघळासारख्या पुढे पुढे धावणाऱ्या सावल्यांच्या शर्यतीवर डोंगर पांघरूण घालायचा आणि सत्ता सुरु व्हायची काळोखाची. काळोख पडला कि गावातील बायका जेवण करायच्या तयारीला लागायच्या. साधारण आठ साडे आठ पर्यंत शेजारी पाजारी जेवण वैगरे उरकून अंगणात नाहीतर ओटीवर एकत्र जमत आणि इकडच्या तिकडच्या गप्पाना सुरवात होत असे. अगदी रोज नाही पण आठवड्यातून २-३ दिवस तरी भुतांच्या गोष्टी तिखट मीठ लावून सांगितल्या जायच्या. कधी कोणाला विडी पिणारा भूत दिसायचा, कोणाला चिंचेच्या झाडावरची हडळ, कोणाला नदीच्या किनाऱ्यावरचा झोटिंग तर कोणाच्या रिक्षात नायतर सायकलवर भूत प्रवास करायचा.मी तेव्हा दुसरी तिसरीत असेन. मी कोणातरी मोठ्या माणसाजवळ बसून या गोष्टी ऐकायचो. या सगळ्या गोष्टीत एक भूत वारंवार यायचं ती म्हणजे गावाबाहेर असलेल्या वडाच्या झाडावरची जखिण, बरेच जण तीला पाहिल्याचा दावा करायचे, सुरवातीला भीती वाटायची पण रोज मरे त्याला कोण रडे हा प्रकार माझ्या बाबतीत झाला आणि भीती वाटायची सोडून त्या जखिणीला पाहायची इच्छा माझ्या मनात जागृत झाली, जे जखिणीला पाहिल्याचा दावा करायचे त्यांचा मला हेवा वाटू लागला. भुरभुरणारे सोनेरी केस, गोबरे गोबरे गाल , गुलाबाच्या पाकळीसारखे डोळे , जखिणीचं असं वर्णन मनातल्या मनात करत मी झोपी जाऊ लागलो. 'चाल तुरुतुरु उडती केस भुरुभुरु' हे गाणं ऐकलं की मला जखिणच आठवायची. मला चांगलंच आठवतंय एकदा नळावर बायकांची पाण्यावरून जुंपली तेव्हा एक बाई दुसऱ्या बाईला रागाच्यान भरात जखीण बोलली होती, तेव्हा कित्येकदा मी जखीण बोललेल्या बाईकडे काहींना ना काही निमित्त काढून जायचो, पण एकदा दारू पिऊन घरी आलेल्या नवऱ्याला जोरात लाथ मारताना मला तिचे पाय दिसले आणि माझी निराशा झाली. रविवारच्या दिवशी दुपारी सगळे झोपले की मी त्या वडाच्या झाडाखाली जात असे. दोन तीन प्रदक्षिणा मारून जखीण कुठे दिसे का ते पाहत असे १५-२० मिनिटे जखीणीला शोधून दमलो की त्या वडाच्या पारंब्यांवर थोडे झोके घेऊन परत घरी परतत असे. नंतर पुढे कधीतरी गावात केबल आली. त्यातल्या झी हॉरर शो मधल्या विचित्र चेहऱ्याच्या जखिणी पहिल्यावर मनाला झालेल्या यातना इथे शब्दात मांडणं खूप कठीण आहे. शेवटी तो दिवस आलाच, एकदा मी मित्राच्या घरी खेळायला गेलो होतो निघताना खूप उशीर झाला आणि त्या रात्री नेमकी सर्वपित्री अमावस्या होती, साधारण संध्याकाळचे ८ वाजले असतील , बाहेर मिट्ट काळोख होता, मित्राचे बाबा सोडायला येत होते पण बोललो काका तुम्ही नका काळजी करू, तुम्ही सोडायला आलात तर माझ्या बाबाना तुम्हाला परत सोडायला यायला लागेल, एव्हडा रास्ता खतरनाक होता.तर मी म्हणजेच लहानपणीचा बोकलत त्या खतरनाक रस्त्यावरून एकटा यायला तयार झालो, या प्रसंगावरून मी किती धीट होतो याची कल्पना तुम्हाला आलीच असेल. तर मी त्या वडाच्या झाडाजवळ आल्यावर अचानक मला पाठीमागून पैंजणांचा आवाज आला. मी पाठीमागे पाहिले तर कोणीच न्हवत, बरोबर वडाच्या झाडाजवळ आल्यावर पुन्हा तोच आवाज, पाठीमागे पाहिलं तर एक बाई माझ्याजवळ येत होती, असं वाटत होतं ती चालत नसून हवेत तरंगत माझ्याकडे येत होती. माझ्याजवळ आली आणि बोलली बाळ एव्हड्या रात्री एकटा इथे काय करतो आहेस. मी बोललो काय नाय घरी जातोय. ती मला बोलली चल माझ्या घरी मी इथेच वडाच्या पाठीमागे झोपडीत राहते. मी पाहिलं तर खरोखर तिथे एक झोपडी होती. अगोदर तर कधी न्हवती, त्यामुळे मी जाऊ की नको विचार करत होतो, इतक्यात ती बोलली चल तुला बोरकुट आणि पारले बिस्कीट देते. बोरकूटचा नाव काढल्याबरोबर माझ्या तोंडाला पाणी सुटलं, वयचं काय हो माझं तिसरीतलं खेळण्याबागडण्याचं वय मी तिच्या भूल थापना सहज बळी पडलो आणि तिच्यासोबत झोपडीत गेलो. ती लहानशीच झोपडी होती, आणि विशेष म्हणजे त्या झोपडीत तिचा माझ्या वयाचा मुलगा पण होता. मला पाहताच तो एकदम खुश झाला आणि आई भूक लागली करत ओरडू लागला, मग त्या बाईने त्याला दम दिल्यावर शांत झाला, मला एका चटईवर बसायला सांगून ती जेवणाची तयारी करू लागली. मी बोरकुट मिळणार म्हणून खुश होतो पण ही बया माझ्याकडे लक्ष द्यायला तयारच नाही, शेवटी मीच बसून बसून कंटाळलो आणि तिच्याजवळ जाऊन बोललो ओ काकू बोरकुट देताय की जाऊ घरी. तशी ती भेसूर हसायला लागली आणि बोलली तू आमची शिकार आहेस, जाशील कसा? तुला खाऊन आम्ही मायलेक आमची भूक मिटवणार आहोत. गप जाऊन बस चटईवर. आता मला समजून चुकलं माझी गाठ जखीणीशी पडले. मला एकीकडे आनंद पण झाला की ज्या गोष्टीला पाहण्यासाठी मी तरसत होतो ती चक्क माझ्यासमोर आहे आणि दुसरीकडे दुःख पण होतं की त्याबदल्यात मी माझा जीव पणाला लावलाय. माझ्या जागी दुसरा कोणी असता तर भोवळ येऊन अर्धमेला झाला असता, जखीणीच्या तावडीत सापडलं की वाचणं महामुश्किल पण नियतीच्या मनात दुसरंच काहीतरी होतं. दहा मिनिटं अशीच गेली, तो लहान पोरगा मला वडापाव समजून माझ्याकडे आधाशाने पाहत होता, नंतर ती जखीण माझा बळी द्यायला माझ्याजवळ आली आणि माझा हात पकडला पण तिला झटका बसावा अशी ती मागे सरकली, एक लख्ख वीज आकाशात चमकली आणि आकाशवाणी झाली, "बोकलत तूझा जन्म हा जगातल्या वाईट शक्तींविरुद्ध लढण्यासाठी झाला आहे, आम्ही तुला विशिष्ट शक्ती प्रदान केल्या आहेत, कोणताही दुष्ट आत्मा प्रेतात्मा तुझं काहीच वाकडं करू नाही शकत. विजयी भव बोकलत." आणि आकाशवाणी बंद झाली, ती आकाशवाणी ऐकून माझ्या अंगात उत्साह संचारला मी त्या जखीणीसमोर हात केला आणि माझ्या हातातून वीज निघाली आणि ती जखीण क्षणार्धात भस्म झाली, त्याचक्षणी ती झोपडी आणि तिचा मुलगा नष्ट झाले आणि मी वडाच्या झाडाखाली उभा होतो. झालेला प्रकारची वाच्यता कुठेही करायची नाही आणि गोरगरिबांना भुतांच्या तावडीतून सोडवण्याचा निश्चय करून मी घराची वाट चालू लागलो.

म्हणजे बाधित वास्तू वर" बोकलत प्रसन्न " असं लिहले तरी ते घर बाधामुक्त होईल, हे ली बेस झालं.>>> हे काय विचारणं झालं? तुम्हाला सांगतो मी जेवढे दिवस गावी राहतो त्या दिवसात गावातल्या कुठल्याच व्यक्तीच्या अंगात नाही येत, जसा मुंबईत आलो की तिकडे तमाशा सुरू झालाच म्हणून समजा. गावावरून निघताना लोकं चक्क आडवे झोपतात रस्त्यावर माझी गाडी पुढे नको जायला म्हणून, वेळ मिळेल तसं सविस्तर लिहिनच.

बोकलत तूझा जन्म हा जगातल्या वाईट शक्तींविरुद्ध लढण्यासाठी झाला आहे, आम्ही तुला विशिष्ट शक्ती प्रदान केल्या आहेत, कोणताही दुष्ट आत्मा प्रेतात्मा तुझं काहीच वाकडं करू नाही शकत. विजयी भव बोकलत." ----. Lol Lol
धन्य आहे...

आमचे एक काका खूप शूर आहेत. ते मित्रमंडळींसह जंगलात जातात. तिथे जमिनीवर चौकोन आखून बुद्धीबळ खेळतात. सोंगट्या नेतच नाहीत. आजूबाजूची भूतं पकडून त्यांना सोंगट्या बनायला लावतात. अत्यंत पराक्रमी आहेत. ते बुद्धीबळ पाहणे चित्तथरारक असते. कारण जेव्हां सैनिक असलेल्या दोन सोंगट्या एकमेकांच्या तिरक्या रेषेत येतात तेव्हां ते घनघोर युद्धाचा आदेश देतात. त्याप्रमाणे युद्ध पार पडले की मगच ते पुढची चाल खेळतात. त्यांच्यामुळे आता भूतांनाही बुद्धीबळात चांगली रुची निर्माण झालेली आहे. ते येणा-या जाणा-याला बुद्धीबळाचे आव्हान देत असतात.

बोकळत
तुमचं जे कोंत गाव आहे त्याच्या सरपंचांना एक विनंती आहे की गावाचे नाव येत्या 26 जानेवारी पासून बोकलत नगर करण्यात यावे.

गावाचे नाव येत्या 26 जानेवारी पासून बोकलत नगर करण्यात यावे. >>>> Lol

आख्खे गाव बोंबलत आहे असे चित्र डोळ्यापुढे तरळून गेले.

बोकळत >>> Lol

आख्खे गाव बोंबलत आहे>>> की बोकळत आहे Happy

तिकडे लिहायचा थांबलो आणि रोज पहिल्या पेजवर असणारा धागा दुसऱ्या पेजवर गेला, आता हळूहळू तिसऱ्या चौथ्या पेजवर जाईल. तुम्ही सगळे बोलत असाल तर सुरु करतो तिकडे लिहायला.

अहो बोकलत तुम्हाला लोक अख्खं गाव बहाल करताहेत आणि तुम्ही त्या जुनाट अमानवीय धाग्यात पाय गुंतवून बॉकलत बसतात.

एखाद्या भुताने आपले झाड सोडल्यावर त्या झाडाच्या जवळच्या लोकांनी हुश्श करावे, तसे वाटतेय का मंडळी?
बोकलत, या धाग्यालाच अमानवीय अनुभव दिल्याबद्दल अभिनंदन आणि आभार.>>>> धन्यवाद भरत सर, तिकडे काही लिहू नाही शकत म्हणून इथे तुमचे आभार मानतो. पण त्या धाग्यावर अशाच रटाळ कथा येत राहिल्या तर विचार बदलावा लागेल मला.

अहो बोकलत तुम्हाला लोक अख्खं गाव बहाल करताहेत आणि तुम्ही त्या जुनाट अमानवीय धाग्यात पाय गुंतवून बॉकलत बसतात.>>>>बरोबर आहे तुमचं पण त्या धाग्यासोबत माझे जन्मोजन्मीचे ऋणानुबंध आहेत असं सारखं वाटतंय मला.तिकडे कोणी प्लँचेट सुरु केलं तर मला नाईलाजाने जावं लागेल.

Pages