गव्हले

Submitted by मनीमोहोर on 1 September, 2018 - 08:12

आपल्याकडे शुभकार्यासाठी किंवा कुळाचारासाठी केलेल्या नेवैद्याच्या पानात खीर आणि पुरण ह्यांना खूप महत्व आहे. आमच्या लहानपणी अशा खास प्रसंगी जेवणाची सुरवात आम्ही खीरीनेच करत असू . त्यामुळे आई वडिलांना दीर्घायुष्य मिळते अशी आमची समजून होती. जेवताना कोणी खीर पहिल्यांदा खायला विसरली तर त्यावरून आम्ही तिला पीडत ही असू. एरवी शेवयांची, रव्याची, दुधी भोपळ्याची अशा विविध खीरी केल्या तरी शुभकार्यासाठी केली जाणारी खीर नेहमी गव्हल्यांचीच असते. पूर्वी स्त्रिया घरी होत्या आणि असे जिन्नस बाहेरून विकत आणण्याची मानसिकता ही नव्हती त्यामुळे गव्हले , शेवया वैगेरे सगळं घरीच केलं जात असे. शुभकार्यासाठी करायचे गव्हले पाच सवाष्णीना बोलावून त्यांचा मान करून त्यांच्या शुभहस्ते काढले जात असत. पण काळ बदलला, जीवनशैली बदलली. आता स्त्रिया नोकरी साठी घराबाहेर बाहेर पडू लागल्या. त्यामुळे अशा वेळमोडया पदार्थांकरता सवड मिळणे कठीण झाले . काळाच्या ओघात पुढील काही वर्षात हा पदार्थ फक्त लिखाणात आणि आठवणीतच राहू शकतो. असो.

काही वर्षांपूर्वी आमच्या घरी एका शुभ कार्यासाठी गव्हल्यांची खीर करायची होती. माझ्या एक नणंद बाई आम्हाला नेहमी स्वतः केलेले गव्हले देत असत पण काही कारणाने त्यांना त्यावेळी गव्हले काढणं शक्य नव्हतं. म्हणून मी गव्हले आणायला दुकानात गेले पण ते बाजारचे रंग, रूप , रया नसलेले गव्हले घ्यायला धीरच झाला नाही. गव्हल्यांची खीर तर करायलाच हवी होती म्हणून मग मीच स्वतः करायचा घाट घातला. तशी पाकृ काही मोठी किंवा कठीण नाहीये . करायचं काय, तर पाव वाटी बारीक रवा दुधात भिजवून दोन तास मुरत ठेवायचा. भिजवताना थोडा सैलच ठेवावा कारण रवा फुलून घट्ट होत जातो. गव्हले काढताना आपल्या रोजच्या कणके एवढ सैल हवं पीठ. त्यासाठी गरज असेल तर आयत्या वेळी दुधाचा हात लावून मळून ही घेता येतो. रव्या ऐवजी कणिक, मैदा ही वापरता येतो पण मला स्वतःला बारीक रवा आवडतो. गव्हले काढताना हात अगदी स्वच्छ ठेवणे फार आवश्यक आहे कारण तो भिजवलेला रवा फार हाताळला जातो. भिजवलेल्या रव्याचा सुपारी एवढा गोळा घ्यायचा. एका हाताच्या अंगठा आणि तर्जनी ह्यांच्या विशिष्ट हालचालीने अगदी थोडा भाग बोटाच्या पुढे आणून दुसऱ्या हाताच्या अंगठा आणि तर्जनीने तो तोडून खाली असलेल्या ताटलीत टाकायचा . लगेच हातातल्या पिठाचा लहानसा भाग परत पुढे आणून दुसरा गव्हला तोडून खाली टाकायचा . हाताची ही विशिष्ट हालचाल करताना हातातील पीठ थोडं ट्विस्ट करावं लागतं म्हणूनच कदाचित गव्हले वळणं हा शब्द प्रयोग जन्माला आला असेल. थोड्याश्या सरावाने हे लगेच जमत . हे गव्हले घरातच पंख्याखाली दोन दिवस वाळवायाचे आणि फ्रीज मध्ये ठेवायचे. गव्हले काढताना एकदा का ह्याची लय जमली की मग खूप मजा वाटते. अर्थात हे काम खूप म्हणजे खूपच वेळखाऊ आहे. पाव वाटी रव्याचे गव्हले करायला साधारण पाच सहा तास सहज लागतात. जेवढा रवा असेल साधारण तेवढेच गव्हले होतात. हे अति वेळखाऊ काम असल्याने घर ,संसार, नोकरी करणाऱ्या तरुण मुलींनी ह्या फंदात पडू नये. Empty nest वाली मंडळी मात्र ट्राय करू शकतात.

मला स्वतःला गव्हले काढायला आवडतं. माझे गव्हले फार सुंदर, एक सारखे आणि खूप बारीक होतात असं सगळे म्हणतात. खाली फोटोत दाखवलेले गव्हले आपल्याला कल्पनां नाही येणार पण ते आपल्या जिरेसाळ तांदुळाच्या एक तृतीयांश आकाराचे आहेत. साधारण तीन चार गव्हले एकत्र केले तर एका तांदळाच्या दाण्याएवढे दिसेल. टीव्ही बघताना किंवा इतर रिकाम्या वेळी ही बसल्या बसल्या करायला आवडत हे मला . माझ्यासाठी हा एक stress buster ही आहे. गव्हले वळताना जी एक लय मिळते आपल्याला त्यात आपल्या सगळ्या चिंता वाहून जातात असा माझा अनुभव आहे. घरातल्यांना ही गव्हले काढणं हा माझा stress बस्टर आहे हे माहीत झालयं आता. मी गव्हले काढताना दिसले की यजमान विचारतात , “ काय ग , काय झालंय ? काही प्रॉब्लेम झालाय का ? ” असं. अर्थात गव्हले काढताना नेहमीच स्ट्रेस असतोच हे काही खरं नाहीये कारण माझं गव्हल्यांचं स्किल आता खूप जणांना माहीत झालयं त्यामुळे परिचित आणि मैत्रिणीं त्यांच्या घरच्या शुभ कार्यासाठी माझ्याकडे आवर्जून गव्हले मागतात . तसेच अचानक कोणी घरी आले तर जाताना मी कधी कधी त्यांना छोटीशी गव्हल्यांची पुडी भेट म्हणून ही देते .

या गव्हल्यांची खीर आपण नेहमी शेवयांची करतो तशीच करतात . तुपावर परतून मग दूधात शिजवायचं. मात्र ही खीर पानातच वाढायची असल्याने नेहमीच्या खिरीपेक्षा थोडी दाट करावी म्हणजे वाढल्यावर जिथल्या तिथे राहाते. तसेच ही घरी केलेल्या गव्हल्यांची खीर चवीला फार छान लागते त्यामुळे खीर मागून मागून पुन्हा पुन्हा घेतली जाते म्हणून आपल्या अंदाजा पेक्षा थोडी जास्त करावी. गव्हले दुधात शिजवून त्यात साखर घालुन त्याचा शिऱ्या सारखा पदार्थ पण करतात ज्याला गव्हल्यांचा साखरभात अस म्हटलं जातं. मी मात्र तो अजून एकदा ही केला नाहीये. असो.

तर असे हे आपले शकुनाचे गव्हले आणि ही त्यांची कहाणी.

हा फोटो मी अलीकडे केलेल्या गव्हल्यांचा

IMG_20180901_124923.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गव्हले भारीच की.
गव्हले असं फक्त ऐकुन होते. पण हे असं प्रकरण असेल हे माहित नव्हतं.
मला फोटोत आधी तांदुळ आहेत असं वाटलं. गव्हल्यांचं माप समजण्यासाठी.
पण तेच गव्हले आहेत वाचुन बाब्बो असं झालं. खरंच एकसारखे सुबक आहेत.
खरंच वेळखाउ प्रकरण.

खुप खुप खुप सुबक नाजुक आणि सुंदर. माझ्या लहान बहिणीने ती 14-15 वर्षांची असताना कुठुन शी एक पद्धत मिळविली होती त्या मधे रवा घट्ट भिजवून खिसनीने खिसुन गव्हले केले होते. कधी कधी करतो आम्ही अशा पद्धतीने. पन हाताने केलेल्याची सर नाही त्याला

प्रतिसादासाठी सर्वांना धन्यवाद.

हे वाचून आपल्या आई आजी मावशी काकू आणि अनेक वर्षांपूर्वी खाल्लेली खीर अशा सगळ्या आठवणींना उजाळा मिळाला हेच ह्या धाग्याचं श्रेय.

सिम्बा मला मालत्या करता येतात आणखी बाकीचे प्रकार नाही येत. मी सहाणेवर करते मालत्या .

मी अनु प्रतिसाद आवडला.

Shitalkrishna, छान वाटली आयडीया झटपट गव्हल्यांची.

छान गव्हले! आई करायची.. आता नाही होत तिला करणे.
ह्या बरोबर फणुल्या पण करायची.. त्या साठी फणी होती एक.

गव्हले किती सुरेख दिसत आहेत!
गव्हल्यांच्या खीरीची चवही आठवत नाही आता. क्वचीत एक-दोन वेळेला खाल्ली असेल.

>> मला पदार्थाच्या कृतीपेक्षा पण जास्त तुमचं लिखाण आणि त्यातले भूतकाळाचे संदर्भ वाचायला जास्त आवडतात.
+१

ममो! अप्रतिम झालेत गव्हले, माझी मावशी खुप सुन्दर गव्हल्या करायची तिला हे सगळेच प्रकार येत होते, मालत्या,बोटवे वैगरे सुट्टित तिच्याकडे गेल की मलाही शिकवल्या होत्या पण इतक्या चिकट कामात वेळ घालवायला त्यावेळी नको वाटायच, माहेरच्या सगळ्या मुलिच्या लग्नात मावशी हातचे गव्हले मालत्या,बोटवे ५ मुराबे वैगरे असायचेच, आमच्याकडे लेकिची लग्नानतर पाठवणी करताना गव्हल्याने ओटि भरली जाते.

सुंदर दिसत आहेत गव्हले. माझ्या आई, आजी, मावशी, सासूबाई सुंदर करतात गव्हले, त्यांना सगळे प्रकारही येतात. मीही बरे करते. पण मला दोनच प्रकार येतात, गव्हले आणि मालत्या, एक ट्विस्ट करायचाही प्रकार असतो, सुंदर दिसतो, पण करायला अवघड असतो. जितका गव्हला बारीक, तितका सुंदर, गव्हले करताना कंटाळा करायचा नाही. म्हणून घरातल्या मोठ्या बायका त्या करत असाव्यात Happy
घरात शुभकार्य निघालं की अजूनही इथे तरी मुहूर्ताची सुरूवात गव्हल्यांनीच केली जाते. नात्यातल्या/ शेजारच्या बायका बोलावून सगळ्यांनी मिळून थोडे तरी गव्हले करायचे मुहूर्तापुरते. याच गव्हल्यांची खीर ग्रहमखाच्या जेवणात असते. शुभकार्याची लगबग, चाहूल, गप्पा हा सगळा माहोलच गव्हल्यांच्या बरोबरीने एकत्र येतो, त्यामुळे गव्हले = मंगल, प्रसन्न भावना Happy

प्रतिसादासाठी धन्यवाद.
प्राजक्ता, पूनम किती छान लिहीलय.
देवीका, लिंक दिली इथे आभार, आता प्रॉपर रेसिपी पण राहील ह्या धाग्यावर.

खूप सुंदर!!
भिजवलेल्या रव्याचा सुपारी एवढा गोळा घ्यायचा. एका हाताच्या अंगठा आणि तर्जनी ह्यांच्या विशिष्ट हालचालीने अगदी थोडा भाग बोटाच्या पुढे आणून दुसऱ्या हाताच्या अंगठा आणि तर्जनीने तो तोडून खाली असलेल्या ताटलीत टाकायचा . लगेच हातातल्या पिठाचा लहानसा भाग परत पुढे आणून दुसरा गव्हला तोडून खाली टाकायचा . हाताची ही विशिष्ट हालचाल करताना हातातील पीठ थोडं ट्विस्ट करावं लागतं >>>तुम्ही याचा व्हिडीओ अपलोड कराल का? बघून शिकायला सोपे जाईल.

WA वर फिरतय हे फोटोसकट आणि नावाशिवाय.>>> Sad मग ते पुढे पाठवताना त्यात लेखिकेचे नाव लिहून पुढे पाठवावे. नाव माहित असेल तर मी तसेच करते.

धन्यवाद धनुडी आणि sonalisl.

WA वर फिरतय हे फोटोसकट आणि नावाशिवाय.>> धनुडी, नेट च्या जमान्यात हे ल अपरिहार्य आहे. Sonalisl ने लिहिल्याप्रमाणे पुढे पाठवताना आपण नाव लिहून पाठवू शकतो.

पुढच्या वेळेस करीन तेव्हा नक्की व्हिडीओ काढते sonalisl.

मायबोलीने हा लेख आपल्या होमपेज वर ठेवला आहे. त्यासाठी मायबोली टीम आणि प्रशासनाला खूप खूप धन्यवाद.

मस्त

Apratim, Gavhale ani photo pan.

majhi Aai ajun karte, tine majya mulila pan shikvale ahet.

Pages