गव्हले

Submitted by मनीमोहोर on 1 September, 2018 - 08:12

आपल्याकडे शुभकार्यासाठी किंवा कुळाचारासाठी केलेल्या नेवैद्याच्या पानात खीर आणि पुरण ह्यांना खूप महत्व आहे. आमच्या लहानपणी अशा खास प्रसंगी जेवणाची सुरवात आम्ही खीरीनेच करत असू . त्यामुळे आई वडिलांना दीर्घायुष्य मिळते अशी आमची समजून होती. जेवताना कोणी खीर पहिल्यांदा खायला विसरली तर त्यावरून आम्ही तिला पीडत ही असू. एरवी शेवयांची, रव्याची, दुधी भोपळ्याची अशा विविध खीरी केल्या तरी शुभकार्यासाठी केली जाणारी खीर नेहमी गव्हल्यांचीच असते. पूर्वी स्त्रिया घरी होत्या आणि असे जिन्नस बाहेरून विकत आणण्याची मानसिकता ही नव्हती त्यामुळे गव्हले , शेवया वैगेरे सगळं घरीच केलं जात असे. शुभकार्यासाठी करायचे गव्हले पाच सवाष्णीना बोलावून त्यांचा मान करून त्यांच्या शुभहस्ते काढले जात असत. पण काळ बदलला, जीवनशैली बदलली. आता स्त्रिया नोकरी साठी घराबाहेर बाहेर पडू लागल्या. त्यामुळे अशा वेळमोडया पदार्थांकरता सवड मिळणे कठीण झाले . काळाच्या ओघात पुढील काही वर्षात हा पदार्थ फक्त लिखाणात आणि आठवणीतच राहू शकतो. असो.

काही वर्षांपूर्वी आमच्या घरी एका शुभ कार्यासाठी गव्हल्यांची खीर करायची होती. माझ्या एक नणंद बाई आम्हाला नेहमी स्वतः केलेले गव्हले देत असत पण काही कारणाने त्यांना त्यावेळी गव्हले काढणं शक्य नव्हतं. म्हणून मी गव्हले आणायला दुकानात गेले पण ते बाजारचे रंग, रूप , रया नसलेले गव्हले घ्यायला धीरच झाला नाही. गव्हल्यांची खीर तर करायलाच हवी होती म्हणून मग मीच स्वतः करायचा घाट घातला. तशी पाकृ काही मोठी किंवा कठीण नाहीये . करायचं काय, तर पाव वाटी बारीक रवा दुधात भिजवून दोन तास मुरत ठेवायचा. भिजवताना थोडा सैलच ठेवावा कारण रवा फुलून घट्ट होत जातो. गव्हले काढताना आपल्या रोजच्या कणके एवढ सैल हवं पीठ. त्यासाठी गरज असेल तर आयत्या वेळी दुधाचा हात लावून मळून ही घेता येतो. रव्या ऐवजी कणिक, मैदा ही वापरता येतो पण मला स्वतःला बारीक रवा आवडतो. गव्हले काढताना हात अगदी स्वच्छ ठेवणे फार आवश्यक आहे कारण तो भिजवलेला रवा फार हाताळला जातो. भिजवलेल्या रव्याचा सुपारी एवढा गोळा घ्यायचा. एका हाताच्या अंगठा आणि तर्जनी ह्यांच्या विशिष्ट हालचालीने अगदी थोडा भाग बोटाच्या पुढे आणून दुसऱ्या हाताच्या अंगठा आणि तर्जनीने तो तोडून खाली असलेल्या ताटलीत टाकायचा . लगेच हातातल्या पिठाचा लहानसा भाग परत पुढे आणून दुसरा गव्हला तोडून खाली टाकायचा . हाताची ही विशिष्ट हालचाल करताना हातातील पीठ थोडं ट्विस्ट करावं लागतं म्हणूनच कदाचित गव्हले वळणं हा शब्द प्रयोग जन्माला आला असेल. थोड्याश्या सरावाने हे लगेच जमत . हे गव्हले घरातच पंख्याखाली दोन दिवस वाळवायाचे आणि फ्रीज मध्ये ठेवायचे. गव्हले काढताना एकदा का ह्याची लय जमली की मग खूप मजा वाटते. अर्थात हे काम खूप म्हणजे खूपच वेळखाऊ आहे. पाव वाटी रव्याचे गव्हले करायला साधारण पाच सहा तास सहज लागतात. जेवढा रवा असेल साधारण तेवढेच गव्हले होतात. हे अति वेळखाऊ काम असल्याने घर ,संसार, नोकरी करणाऱ्या तरुण मुलींनी ह्या फंदात पडू नये. Empty nest वाली मंडळी मात्र ट्राय करू शकतात.

मला स्वतःला गव्हले काढायला आवडतं. माझे गव्हले फार सुंदर, एक सारखे आणि खूप बारीक होतात असं सगळे म्हणतात. खाली फोटोत दाखवलेले गव्हले आपल्याला कल्पनां नाही येणार पण ते आपल्या जिरेसाळ तांदुळाच्या एक तृतीयांश आकाराचे आहेत. साधारण तीन चार गव्हले एकत्र केले तर एका तांदळाच्या दाण्याएवढे दिसेल. टीव्ही बघताना किंवा इतर रिकाम्या वेळी ही बसल्या बसल्या करायला आवडत हे मला . माझ्यासाठी हा एक stress buster ही आहे. गव्हले वळताना जी एक लय मिळते आपल्याला त्यात आपल्या सगळ्या चिंता वाहून जातात असा माझा अनुभव आहे. घरातल्यांना ही गव्हले काढणं हा माझा stress बस्टर आहे हे माहीत झालयं आता. मी गव्हले काढताना दिसले की यजमान विचारतात , “ काय ग , काय झालंय ? काही प्रॉब्लेम झालाय का ? ” असं. अर्थात गव्हले काढताना नेहमीच स्ट्रेस असतोच हे काही खरं नाहीये कारण माझं गव्हल्यांचं स्किल आता खूप जणांना माहीत झालयं त्यामुळे परिचित आणि मैत्रिणीं त्यांच्या घरच्या शुभ कार्यासाठी माझ्याकडे आवर्जून गव्हले मागतात . तसेच अचानक कोणी घरी आले तर जाताना मी कधी कधी त्यांना छोटीशी गव्हल्यांची पुडी भेट म्हणून ही देते .

या गव्हल्यांची खीर आपण नेहमी शेवयांची करतो तशीच करतात . तुपावर परतून मग दूधात शिजवायचं. मात्र ही खीर पानातच वाढायची असल्याने नेहमीच्या खिरीपेक्षा थोडी दाट करावी म्हणजे वाढल्यावर जिथल्या तिथे राहाते. तसेच ही घरी केलेल्या गव्हल्यांची खीर चवीला फार छान लागते त्यामुळे खीर मागून मागून पुन्हा पुन्हा घेतली जाते म्हणून आपल्या अंदाजा पेक्षा थोडी जास्त करावी. गव्हले दुधात शिजवून त्यात साखर घालुन त्याचा शिऱ्या सारखा पदार्थ पण करतात ज्याला गव्हल्यांचा साखरभात अस म्हटलं जातं. मी मात्र तो अजून एकदा ही केला नाहीये. असो.

तर असे हे आपले शकुनाचे गव्हले आणि ही त्यांची कहाणी.

हा फोटो मी अलीकडे केलेल्या गव्हल्यांचा

IMG_20180901_124923.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलंय.
हे एवढे बारीक गव्हले एक एक करून हातानी बनवतात!
महान आहे हे! मनापासून दंडवत. _/\_.

आणि इकडे आम्हाला दोन चार भाज्या साध्या सोप्या डिशेस यू ट्यूबवर बघून बघून जरा जमल्या की धन्य वाटतं.

गव्हल्यांची खिर माझी आवडती डिश पण खाऊन आता काही वर्ष झाले. मराठ्यांमध्ये वाळवणीच्या पदार्थात शेवया असतात पण गव्हले नाही. फोटो पाहूनच किती आठवणी जाग्या झाल्या.

वा! फोटो आणि वर्णन दोन्ही मस्तच! वाचून मला ही करुन बघावेसे वाटताहेत. Exactly कसे करायचे ते जरा पुन्हा समजून घेईन.

मस्त लेख!
फोटो पाहून जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
मी लग्न होईपर्यंत हा प्रकार फार केला. पण लग्नानंतर कोणालाच ह्यात आवड नसल्याने तयार शेवया असायच्या घरी. पण त्यात ती मजा नाही. आता नक्की पुन्हा हे सुरु करणार. पण तुमच्या एवढ्या सफाईदारपणे जमायला बराच वेळ लागेल. __/\__
पण मी ह्या गव्हल्यांनाच बोटवं म्हणते. बोटवं आणी गव्हल्या एकच आहेत का?

https://youtu.be/MrXT6iUM600

ह व्हिडिओ मिळाला. ही मधुरा अमेरिकेत असताना स्वच्छ मराठी बोलायची आता भारतात जाऊन थोडं अशुद्ध झालंय असं वाटलं. Wink

मला पण लेख वाचून आज्जीची आठवण झाली. ती पण गव्हले वळत बसायची रिकामा वेळ मिळताच.
गव्हल्यांची खीर खाउन खरच य वर्ष झाली.

पूर्ण नवी माहिती.. कसले सुंदर दिसतय हे.. तांदळाच्या दाण्यासारखे वाटताय मला.. कशी लागत असेल चविला?
ममो, मी जास्त गोड नाही खात.. घरी शीरखुर्मा करते तो हि मॅक्स अर्धी वाटी जाते मला. पण जेव्हा तुझ्याकडे येईल तेव्हा मला खायचीये हि.. करायला शिकवं नाहीतर विडिओ काढ आणि युट्युबवर टाक.. Happy

आई गं कसले सुंदर, सुबक झालेत तुमचे गव्हले!! आमच्या घरीही प्रत्येक सणाला कार्याला गव्हल्याची खीर असणे मस्ट होते त्यामुळे एकदम नॉस्टॅल्जिक वाटले.

टीना, वर व्हिडीओ दिलाय बघ. तो फक्त गव्हल्यांचाच नसून लग्नात बाकी जे पदार्थ लागतात त्या सगळ्यांचाच आहे.

मस्त लेख. आमच्याकडे असायचे गव्हले व खीर पण. हे एकूण पाच वेगवेगळ्या साइजचे प्रकार आहेत. गव्हले नखुल्या, बोटवे आणि अजून दोन आहेत. हे पाच थोडे थोडे करून प्लास्टिक पिशवीत भरून रुखव तात मांडत. मुली कडच्यांची कलाकुसर. बिंज वॉच करताना बसल्या बसल्या करता येइल.

छान.
ममो, रूखवतात ५ वेगवेगळे गव्हले असतात. हे सगळे प्रकार येतात का तुम्हाला बनवता? बाजारात मिळणारे फार जाड असतात. तुमचे छान नाजुक"से" आहेत.

पाव वाटी रव्याचे गव्हले करायला साधारण पाच सहा तास सहज लागतात. >>>
बापरे! भारीच. हे नाव ऐकलं होतं पदार्थाचं पण आताच पाहिले.

व्हिडीओ पण पाहिला. आपल्याकडचा पास्ता म्हणावं वाटलं.

भारी आहात तुम्ही.

आजीची आठवण करून दिलीस ममो! Happy
धाकट्या मामाच्या लग्नात शकुनाचे पाच प्रकारचे गव्हले केलेले आठवले - गव्हले, मालत्या, नखुल्या अशी काही नावेही आठवत आहेत. प्रत्येकाचा आकार वेगळा... आजीने, मावशीआजीने मला शिकवलं होतं. आई, मावशी, आज्या, मी अशांनी बसून केलेले आठवताहेत. माझे अर्थातच ओबडधोबड असणार...

फार सुरेख आणि एकसारखे झालेत तुझे गव्हले! ही खीर खाऊन काही दशकं उलटली आता!!

वाह अप्रतिम गव्हले आणि लेख दोन्ही. दंडवत खरंच हेमाताई.

आजेसासुबाई अप्रतिम गव्हले करायच्या, ते आठवलं . त्या १०३ वर्षाच्या होऊन गेल्या पण जवळजवळ शेवटपर्यंत आम्हा सर्वांना स्वतःच्या हाताने केलेले गव्हले आणि वाती द्यायच्या. या लेखाचं शीर्षक वाचून त्याच आल्या डोळ्यासमोर आधी.

धन्यवाद व नमन तुमच्या पेशन्सला ममोजी. तुनळीवर मधुराज्‌ रेसीपी मध्ये पाहीलय गव्हले,नखुल्या बोटवे कसे करायचे ते. ती मधुरा फारच श्वास,दम लागल्या सारखं बोलते असं जाणवलं.
लहानपणी मी आईला पाटावरच्या शेवया बनवू लागायचो. ती creativity ची लय सापडली की परमानंदात मन डुलू लागतं

फारच सुंदर आणि नाजूक दिसतायत गव्हले. लहानपणी आजोळी कधीतरी कुणीतरी गव्हले करत बसलेलं आठवतंय. त्यानंतर नाही.
फणुल्या हाही या पाच प्रकारांमधला प्रकार आहे ना?

मस्तच.माझ्या लग्नात प्लास्टिक पिशवीत पाहिले होते.मला पदार्थाच्या कृतीपेक्षा पण जास्त तुमचं लिखाण आणि त्यातले भूतकाळाचे संदर्भ वाचायला जास्त आवडतात.

Pages