गव्हले

Submitted by मनीमोहोर on 1 September, 2018 - 08:12

आपल्याकडे शुभकार्यासाठी किंवा कुळाचारासाठी केलेल्या नेवैद्याच्या पानात खीर आणि पुरण ह्यांना खूप महत्व आहे. आमच्या लहानपणी अशा खास प्रसंगी जेवणाची सुरवात आम्ही खीरीनेच करत असू . त्यामुळे आई वडिलांना दीर्घायुष्य मिळते अशी आमची समजून होती. जेवताना कोणी खीर पहिल्यांदा खायला विसरली तर त्यावरून आम्ही तिला पीडत ही असू. एरवी शेवयांची, रव्याची, दुधी भोपळ्याची अशा विविध खीरी केल्या तरी शुभकार्यासाठी केली जाणारी खीर नेहमी गव्हल्यांचीच असते. पूर्वी स्त्रिया घरी होत्या आणि असे जिन्नस बाहेरून विकत आणण्याची मानसिकता ही नव्हती त्यामुळे गव्हले , शेवया वैगेरे सगळं घरीच केलं जात असे. शुभकार्यासाठी करायचे गव्हले पाच सवाष्णीना बोलावून त्यांचा मान करून त्यांच्या शुभहस्ते काढले जात असत. पण काळ बदलला, जीवनशैली बदलली. आता स्त्रिया नोकरी साठी घराबाहेर बाहेर पडू लागल्या. त्यामुळे अशा वेळमोडया पदार्थांकरता सवड मिळणे कठीण झाले . काळाच्या ओघात पुढील काही वर्षात हा पदार्थ फक्त लिखाणात आणि आठवणीतच राहू शकतो. असो.

काही वर्षांपूर्वी आमच्या घरी एका शुभ कार्यासाठी गव्हल्यांची खीर करायची होती. माझ्या एक नणंद बाई आम्हाला नेहमी स्वतः केलेले गव्हले देत असत पण काही कारणाने त्यांना त्यावेळी गव्हले काढणं शक्य नव्हतं. म्हणून मी गव्हले आणायला दुकानात गेले पण ते बाजारचे रंग, रूप , रया नसलेले गव्हले घ्यायला धीरच झाला नाही. गव्हल्यांची खीर तर करायलाच हवी होती म्हणून मग मीच स्वतः करायचा घाट घातला. तशी पाकृ काही मोठी किंवा कठीण नाहीये . करायचं काय, तर पाव वाटी बारीक रवा दुधात भिजवून दोन तास मुरत ठेवायचा. भिजवताना थोडा सैलच ठेवावा कारण रवा फुलून घट्ट होत जातो. गव्हले काढताना आपल्या रोजच्या कणके एवढ सैल हवं पीठ. त्यासाठी गरज असेल तर आयत्या वेळी दुधाचा हात लावून मळून ही घेता येतो. रव्या ऐवजी कणिक, मैदा ही वापरता येतो पण मला स्वतःला बारीक रवा आवडतो. गव्हले काढताना हात अगदी स्वच्छ ठेवणे फार आवश्यक आहे कारण तो भिजवलेला रवा फार हाताळला जातो. भिजवलेल्या रव्याचा सुपारी एवढा गोळा घ्यायचा. एका हाताच्या अंगठा आणि तर्जनी ह्यांच्या विशिष्ट हालचालीने अगदी थोडा भाग बोटाच्या पुढे आणून दुसऱ्या हाताच्या अंगठा आणि तर्जनीने तो तोडून खाली असलेल्या ताटलीत टाकायचा . लगेच हातातल्या पिठाचा लहानसा भाग परत पुढे आणून दुसरा गव्हला तोडून खाली टाकायचा . हाताची ही विशिष्ट हालचाल करताना हातातील पीठ थोडं ट्विस्ट करावं लागतं म्हणूनच कदाचित गव्हले वळणं हा शब्द प्रयोग जन्माला आला असेल. थोड्याश्या सरावाने हे लगेच जमत . हे गव्हले घरातच पंख्याखाली दोन दिवस वाळवायाचे आणि फ्रीज मध्ये ठेवायचे. गव्हले काढताना एकदा का ह्याची लय जमली की मग खूप मजा वाटते. अर्थात हे काम खूप म्हणजे खूपच वेळखाऊ आहे. पाव वाटी रव्याचे गव्हले करायला साधारण पाच सहा तास सहज लागतात. जेवढा रवा असेल साधारण तेवढेच गव्हले होतात. हे अति वेळखाऊ काम असल्याने घर ,संसार, नोकरी करणाऱ्या तरुण मुलींनी ह्या फंदात पडू नये. Empty nest वाली मंडळी मात्र ट्राय करू शकतात.

मला स्वतःला गव्हले काढायला आवडतं. माझे गव्हले फार सुंदर, एक सारखे आणि खूप बारीक होतात असं सगळे म्हणतात. खाली फोटोत दाखवलेले गव्हले आपल्याला कल्पनां नाही येणार पण ते आपल्या जिरेसाळ तांदुळाच्या एक तृतीयांश आकाराचे आहेत. साधारण तीन चार गव्हले एकत्र केले तर एका तांदळाच्या दाण्याएवढे दिसेल. टीव्ही बघताना किंवा इतर रिकाम्या वेळी ही बसल्या बसल्या करायला आवडत हे मला . माझ्यासाठी हा एक stress buster ही आहे. गव्हले वळताना जी एक लय मिळते आपल्याला त्यात आपल्या सगळ्या चिंता वाहून जातात असा माझा अनुभव आहे. घरातल्यांना ही गव्हले काढणं हा माझा stress बस्टर आहे हे माहीत झालयं आता. मी गव्हले काढताना दिसले की यजमान विचारतात , “ काय ग , काय झालंय ? काही प्रॉब्लेम झालाय का ? ” असं. अर्थात गव्हले काढताना नेहमीच स्ट्रेस असतोच हे काही खरं नाहीये कारण माझं गव्हल्यांचं स्किल आता खूप जणांना माहीत झालयं त्यामुळे परिचित आणि मैत्रिणीं त्यांच्या घरच्या शुभ कार्यासाठी माझ्याकडे आवर्जून गव्हले मागतात . तसेच अचानक कोणी घरी आले तर जाताना मी कधी कधी त्यांना छोटीशी गव्हल्यांची पुडी भेट म्हणून ही देते .

या गव्हल्यांची खीर आपण नेहमी शेवयांची करतो तशीच करतात . तुपावर परतून मग दूधात शिजवायचं. मात्र ही खीर पानातच वाढायची असल्याने नेहमीच्या खिरीपेक्षा थोडी दाट करावी म्हणजे वाढल्यावर जिथल्या तिथे राहाते. तसेच ही घरी केलेल्या गव्हल्यांची खीर चवीला फार छान लागते त्यामुळे खीर मागून मागून पुन्हा पुन्हा घेतली जाते म्हणून आपल्या अंदाजा पेक्षा थोडी जास्त करावी. गव्हले दुधात शिजवून त्यात साखर घालुन त्याचा शिऱ्या सारखा पदार्थ पण करतात ज्याला गव्हल्यांचा साखरभात अस म्हटलं जातं. मी मात्र तो अजून एकदा ही केला नाहीये. असो.

तर असे हे आपले शकुनाचे गव्हले आणि ही त्यांची कहाणी.

हा फोटो मी अलीकडे केलेल्या गव्हल्यांचा

IMG_20180901_124923.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धागा वर आला थँक्यू.

बरेच दिवस इथे लिहीन म्हणत होते आज अनायसे धागा वर आलाच आहे तर लिहितेच आता.

कोरोना च टेन्शन कमी करण्यासाठी हल्ली नवनवीन रेसिपींचा आधार घेतला जातोय जसे पाव ,समोसे, पाणीपुरीच्या पुऱ्या, वाळवणाचे पदार्थ, आईस्क्रीम इ इ . पण टेन्शन कमी करण्याचा गव्हले काढणं हा एक उत्तम मार्ग आहे . आणि इतर पदार्थां सारखं खूप साहित्य पण ह्याला लागत नाही. म्हणजे जिन्नस संपले जा दुकानात किंवा एखाद्या रेसिपीला घरात नसणारा जिन्नस हवाय तर घाला परत हेलपाटा दुकानात अस गव्हल्यां बाबत नाही होणार. तसंच फार स्किलची ही गरज नाही. पाव वाटी रवा चांगली तीन चार तास टाईमपास ची नक्कीच हमी घेईल तुमच्या. ☺तेव्हा चला … गव्हले काढायला ☺ (हलके घ्या )

खरंच ममो, पण आमचे गव्हले इतके सुबक होणार नाहीत ना. तरी ट्राय करायला हरकत नाही. तसाही रवा आणताना चुकून बारीक रवा आणलाय

>>> साधारण तीन चार गव्हले एकत्र केले तर एका तांदळाच्या दाण्याएवढे दिसेल.
ममो, सहज एक सुचवणी - पुन्हा गव्हले कराल तेव्हा शेजारी एखादी स्टॅन्डर्ड साइज्ड वस्तू आकाराचा अंदाज यायला ठेवा फोटो काढताना.

उदा. हे असं:

food size.png

video post kara na please. >>> हो ना , पब्लिक डीमांडवर कराच Happy

फार छान लेख आणि गव्हले... माझ्या चुलतभावाच्या लग्नात त्याच्या सासूबाईंनी मांडव परतणे करताना गव्हलयांचा साखरभात केला होता.अगदी घासभर प्रत्येकाला पण त्याची चव अजून मनावरून आणि जिभेवरून उतरली नाहीये..गव्हल्यांचा भात...अहाहा

धन्यवाद सगळ्याना.
धनुडी, अग गमतीत लिहीलय मी.
नेक्स्ट टाईम करीन तेव्हा असा फोटो काढीन स्वाती आणि व्हिडीओ ही काढीन.
गव्हल्यांचा साखरभात ऐकून आहे पण केला /खाल्ला नाहीये अजून. किती करावे लागत असतील त्यासाठी गव्हले.

आमच्या एका परिचितांच्या नातवाची मुंज होती आणि त्या आजींनी शकुनाचे गव्हले काढायला मला बोलावलं होतं. खिचडी , पेढा कॉफी असं खाऊन झाल्यावर मला कुंकू लावलं, गजरा दिला , सगळा मान केला सव्वाष्णीचा. मग त्या काकू मला म्हणाल्या "मी आधी तुला काढून दाखवते कसे काढायचे ते मग तू काढ चार शकुनाचे. " त्यांचं वय खूप होत. पंच्याऐशी वगैरे तरी असेलच, त्यामुळे त्यांचा हात चालत नव्हता नीट तरी त्यानी कसेबसे दाखवले मला . मग मी रवा हातात घेतला . माझ्याकडच्या ह्या स्किलची कल्पना नव्हती त्याना. माझा स्पीड, आणि एकंदर सफाई बघून चाटच पडल्या त्या. कारण त्यानी हे अजिबातच imagine केलं नव्हतं. खूप कौतुक केलं त्यानी माझ्या गव्हल्यांचं.

खूप सुंदर गव्हले मनिमोहर जी. मी पण लहानपणी करायचे आणि आजी माझे खूप कौतुक करायची मी सगळ्या नातवंडात सुंदर करते म्हणून. पण आमच्याकडे याला वळवट म्हणायचे. आज आजीची खूप आठवण येतेय.

खूप सुंदर गव्हले. लेख पुन्हा वाचला.
मला रुखवताची आठवण झाली माझ्या आणि अनेकींच्या.
आम्ही पण वळवट म्हणतो.अजूनही काही नैवेद्याला वळवटाचीच खीर करते आई. त्यात एक करंजी पण असते नुसत्या कणकेची. आई त्याला खीर गुळाची पोळी म्हणते.
नाग पंचमीला हे करतात आमच्याकडे .
मनिमोहोर तुमचे लेख नेहमीच आवडतात. Happy

देवरूप, मी अस्मिता , सामो प्रतिसादा बद्दल धन्यवाद.
वर मालत्यांचा उल्लेख झालाय. लॉक डाउन मध्ये मी टाईमपास म्हणून केल्यात थोड्या , त्याचा हा फोटो .
IMG_20200718_150649.jpg

गव्हल्यांची चुलत बहीण म्हणजे मालत्या. गव्हलयांच्या पीठा पासूनच करतात ह्या ही. एक छोटी म्हणजे बारीक मोत्याएव्हढी पीठाची गोळी घेऊन सहाणेवर किंवा पोळपाटावर अंगठ्याने तिला लाम्ब करायची आणि अंगठ्यानेच तिला स्पायरल वळवायची . गुळगुळीत पृष्ठभागावर ( म्हणजे स्टीलची ताटली वैगेरे) नाही करता येत ह्या. तीन चार पीळ पडले की छान दिसते मालती त्यामुळे गव्हलयांपेक्षा ह्या आकाराने थोड्या मोठ्या च कराव्या लागतात.

लग्नात सासरी पाठवणी करताना मुलीची आई तिची मालत्यानी ओटी भरते. ह्या मालत्याना जसा पीळ असतो तसा पीळ आईच्या आतड्याला पडतो पाठवणी करताना म्हणून. पूर्वीच्या काळी मुलीची पसंती न बघता लग्न लावत असत. वयात अंतर, दुसरेपणावर देणे, आधीच्या पत्नीची मुलं असणे, गरीबी आणि हे काही नसलं तरी जनरलीच कॉमन असणारा अतीव सासुरवास, मुलीला आर्थिक स्वावलंबन /स्वातंत्र्य किंबहुना कोणतेच स्वातंत्र्य नाही, शिक्षण नाही अश्या अनेक गोष्टींमुळे आईच्या आतड्याला खरच पीळ पडत असेल पाठवणीच्या वेळी.

आता मुलींची परिस्थिती , आर्थिक क्षमता, निर्णय स्वातंत्र्य, एकंदरीतच सुनेकडे बघण्याचा दृष्टिकोन वैगेरे सगळंच खूप बदलल्याने वाईट वाटलं तरी पीळ पडणे / मुलीची अपराधी वाटणे ह्या भावना नक्कीच कमी झाल्या आहेत. तरी मालत्यानी ओटी भरण्याची प्रथा अजून टिकून आहे.

ह्या मालत्याना जसा पीळ असतो तसा पीळ आईच्या आतड्याला पडतो पाठवणी करताना म्हणून. >>>> अरे बापरे!अहे माहित नव्ह्ते.हृद्ध आहे.

मालत्या छान दिसतात. ( मला मालत्या म्हटलं ना कि आशालता वाबगावकर ची कडवेकरमामीच आठवते, मालताई sssssss असं म्हणत घरात शिरणारी)
सोनाली पहिला प्रयत्न छानच आहे गव्हल्यांचा

Pages