पुस्तकपरिचय : आलोक (कथासंग्रह, ले. : आसाराम लोमटे)

Submitted by ललिता-प्रीति on 15 August, 2018 - 07:53

कधीकधी इव्हेंट-ड्रिव्हन पुस्तक खरेदी केली जाते. ‘आलोक’ हे पुस्तक मी असंच खरेदी केलं. त्याचे लेखक आसाराम लोमटे यांना त्या पुस्तकानिमित्त साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला होता. त्यानंतर वेगळं कुठलंतरी पुस्तक बघायला म्हणून दुकानात गेले होते; तेव्हा हे पुस्तक समोर दिसलं. स्वतःच स्वतःच्या मनाला जरा टोचून पाहिलं, की इतर दुनियेभरची पुस्तकं तुझ्या विश-लिस्टमध्ये असतील, मात्र एका मराठी पुस्तकाला सा.अ.पुरस्कार मिळालाय तर ते नको वाचायला तुला!... ही टोचणी बरोबर जागी बसली आणि मी ते पुस्तक विकत घेतलं. नेहमीप्रमाणे त्यानंतर ६-८ महिने ते कपाटात नुसतं ठेवून दिलं होतं. सलग काही इंग्रजी पुस्तकं वाचली गेल्यावर मराठी पुस्तकाची तातडीची गरज निर्माण झाली आणि मग ते बाहेर निघालं.

पुस्तक विकत घेतानाच त्याच्या ब्लर्बमधून ‘ग्रामीण पार्श्वभूमीच्या कथा’ यापलिकडे फारसं काही समजलं नसल्याचं लक्षात होतं. त्यामुळे थेट वाचायला सुरूवात केली. पुस्तकात एकूण ६ कथा आहेत. सगळ्याच कथा संथ लयीत, बारीकसारीक तपशील टिपत पुढे जाणार्‍या आहेत. त्यांतलं कथानक सूक्ष्म पातळीवर उलगडतं. मात्र त्या क्लिष्ट मुळीच नाहीत.

‘चिरेबंद’, ‘ओझं’, ‘खुंदळण’ या पहिल्या तीन कथांना तर कथानक म्हणावं असं अगदी थोडंसंच आहे. या तीनही कथांच्या केंद्रस्थानी असलेल्या घटना कथा सुरू होतात त्या टाईम-स्टँपच्या आधीच घडून गेलेल्या आहेत. प्रत्यक्ष कथांमध्ये त्या घटनांचे पडसाद, प्रतिक्रिया, त्यात गुंतलेल्या पात्रांची त्यावरची विचारांची घुसळण, परिणामस्वरूप परिस्थितीने घेतलेलं काहीएक वळण, असा फ्लो आहे. पण वाचत असताना आपल्या डोक्यात एकीकडे ती आधीच घडून गेलेली घटना कशी असेल, तेव्हाचं वातावरण कसं असेल, आत्ता आपल्यासमोर खुली होणारी पात्रं तेव्हा कशी वागली असतील, याचं एक चित्र आपण उभं करत राहतो. हे वाचताना अगदी नकळत होतं. ‘चिरेबंद’ कथेत गावातला जुना सावकार, त्याचा मोठा वाडा, त्याच्या मृत्यूनंतर तिथे एकटीच राहणारी त्याची बायको, तिथे अधूनमधून येणारा तिचा नातू, सावकाराने सावकारीला जोडून केलेले अपहार असे बहुतांशी भूतकाळाचे संदर्भ आहेत. त्यात ‘चिरेबंद’ काय आहे याचा वाचताना सतत शोध घेतला जातो; आणि कथा संपतासंपता तो शोधही संपतो.

‘ओझं’ आणि ‘खुंदळण’ कथांमध्ये याच्या बरोबर उलट होतं. कथांच्या सुरूवातीलाच शीर्षकांचं आणि कथानकाचं नातं लक्षात येतं. कथेच्या कोणत्याही टप्प्यावर शीर्षकाने सुरूवातीलाच आखून दिलेल्या रेषेपासून कथानक जराही ढळत नाही. ‘ओझं’ कथा वाचत असताना आपल्याही मनावर ओझं ठेवत जाते. ही कथा एकाच वेळी हेलपाटून टाकणारी आहे आणि त्यातून सुटकेचा अनुभव देणारीही आहे. गेल्या काही वर्षांत ग्रामीण पार्श्वभूमी आणि दुष्काळ यांची अजोड जोडी तयार झालेली आहे. ही कथा दुष्काळ आणि शेतकरी आत्महत्येवरच आधारलेली आहे. पुस्तकातली या प्रकारची ही एकमेव कथा; पण ती येते आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याच्या धाकट्या भावाच्या निवेदनातून. कथेत करूणरसाला पुरेपूर वाव आहे; मात्र इथे वाचकानं अश्रू ढाळणे अपेक्षित नाही. कथेत कारुण्य येतं ते बोचर्‍या वास्तवाचं बोट धरून. कथेतल्या आर्ततेकडे कुणी सद्य परिस्थितीची चिकित्सा म्हणून बघेल; कुणी त्याला परखड भाष्य म्हणेल; किंबहुना लेखकाचं तेच उद्दीष्ट आहे.

मध्यंतरी पुण्यातल्या तरूण रंगकर्मींच्या एका गटाबद्दल वाचण्यात आलं होतं. हे तरूण घरोघरी जाऊन त्या-त्या घराचा नेपथ्यासारखा वापर करून नाटक सादर करतात. त्यांनी ‘ओझं’ ही कथा तशा सादरीकरणासाठी निवडली होती. कथा वाचून मग हे वाचल्यावर मला त्या तरुणांचं अतिशय कौतुक वाटलं होतं. नाट्यमय घटनांची साखळी हाताशी नसताना त्यांनी या कथेतलं नाट्य सादरीकरणात कसं पकडलं असेल हा खरंच औत्सुक्याचा विषय आहे. असो.

‘खुंदळण’ कथा ग्रामीण राजकारणाला केंद्रस्थानी ठेवते. कथेत दर्शवलेली तळागाळातल्या राजकीय कार्यकर्त्याची कुतरओढ, दोलायमान मनःस्थिती, परिस्थितीशरणता इतकी प्रभावी आहे, की आपण त्या राजकारणापासून शतयोजनं दूर असलो तरी कथा वाचताना त्या कार्यकर्त्याला कधी चूक तर कधी बरोबर ठरवत जातो. त्याच्याबरोबरीने आपलं मनही हेलकावे खात राहतं. त्या कार्यकर्त्याच्या दोलायमान मनःस्थितीला ‘कोणता झेंडा घेऊ हाती?’ची डूब आहे; मात्र त्यावर बोलताना राजकारणातल्या व्यक्तिनिष्ठतेवर अधिक भर दिला गेला आहे. त्यामुळे कथेत राजकारण केंद्रस्थानी असलं तरी वरचढ ठरत नाही; ते त्या कार्यकर्त्याच्या मनातली घालमेल अधिक गडद करतं.
पुस्तकात ‘जीत’ ही राजकारणाची पार्श्वभूमी असलेली आणखी एक कथा आहे; मात्र ‘खुंदळण’हून पूर्ण वेगळी. दोन्ही कथा वाचल्यानंतर मनात ग्रामीण राजकारणाचं नक्की कोणतं चित्र फ्रेम करून ठेवायचं यावरून आपली ‘खुंदळण’ होऊ शकते.

ग्रामीण कथांमध्ये स्थानिक बोलीभाषेचा वापर फार महत्त्वाचा असतो. मग ती भाषा ‘स्थानिक’ म्हणजे नेमक्या कोणत्या स्थानाची, हे जरी आपल्याला फारसं माहिती नसलं तरी त्याविना अडत नाही; मात्र त्या नेमक्या शब्दांच्या वापरामुळे वाचनाची खुमारी वाढते. ‘आलोक’मधल्या कथा वाचताना तो आनंद मिळतो. आसाराम लोमटे परभणी परिसरातले, म्हणून ती बोलीभाषा तिथली असं मानून शहरी वाचक या कथा वाचू शकतात.

कथांबद्दल एकत्रितपणे बोलताना आणखी एक उपमा वापरावीशी वाटते. झाडांच्या कुंडीतली माती कोरडी झालेली दिसते. आपण बोटांनी बाजूला केली तर ती सहज बाजूला होते. बघता बघता एखादा बारकासा खड्डाही उकरला जातो. आणि मग आतली माती जरा दमट असल्याचं दिसतं. त्या दमट मातीचा गारवा बोटांच्या टोकांना जाणवतो. आता माती आधीइतकी सहजी बाजूला होत नाही. पण तो हवाहवासा गारवा, दमट मातीचा ओला वास सोडवतही नाही. या कथा तो ओलावा आपल्यापुढे ठेवतात. हा ‘ओलावा’ म्हणजे पात्रांमधली माया, ममता, प्रेम, कनवाळूपणा असं सगळं छान, गोड असेल असं नाही. माणसाचं माणूस असणे, त्याच्या स्वभावातले बरे-वाईट कंगोरे, परिस्थितीनुरूप त्याची वागणूक, असं सगळं त्यात येतं. ग्रामीण भवतालातला माणूस कसा घडत अथवा बिघडत जातो ते त्यातून दिसतं. हे बिघडणे लौकिकार्थाने बिघडणे नसतं; तो जगण्याच्या, तगून राहण्याच्या आटापिट्यातला एक भाग असतो.

‘कुभांड’ कथेत मध्यमवयीन मालीपाटलाचा हाच आटापिटा कथेला व्यापून राहतो. ‘कुभांड’ या शब्दावरून एखादी सनसनाटी, खळबळजनक घटना कल्पिली जाऊ शकते; पण कथेतलं कुभांड व्यक्ती-व्यक्तीतल्या चढाओढीचं, वर म्हटलेल्या आटापिट्याचं प्रतिक आहे. त्यापायी वरकरणी मालीपाटलाच्या गावातलं वातावरण काही काळापुरतं डहुळलं जातं; पण त्यातून त्याला एक वर्चस्ववादी विधान करायचं असतं, त्यात तो यशस्वी होतो. त्या विधानाची पद्धतशीर आणि बेरकी आखणी म्हणजे ते ‘कुभांड’.

कथासंग्रहातली मला सर्वात आवडलेली कथा म्हणजे ‘वळण’. शाब्दिक ‘वळणा’वर घडलेली एक घटना, त्या घटनेची साक्षीदार ठरलेली एक शाळकरी मुलगी; साक्षीदार म्हटलं तरी तिनं ती घटना अगदी समोर ढळढळीत पाहिलेली नाही; तरी त्या घटनेमुळे तिच्या आयुष्याला कोणतं ‘वळण’ लागतं हे सांगणारी ही कथा. अत्यंत चित्रदर्शी. अतिशय प्रभावी. शाब्दिक वळणापासूनच्या त्या मुलीच्या वाटचालीत वाचक पावलापावलावर तिच्या साथीने जे चालायला लागतो, तो थेट कथेच्या शेवटाला वळणाच्या भावार्थापाशी येऊनच दम खातो.
पुस्तकातल्या प्रत्येक कथेच्या सुरूवातीला एक-एक चित्र-रेखाटन आहे. त्यातदेखील ‘वळण’ कथेचं रेखाटन मला सर्वात आवडलं. अगदी नेमकं आणि प्रभावी आहे. तो प्रभाव खर्‍या अर्थाने कथा संपल्यावरच पूर्णपणे उमगतो. ‘वळण’ कथेच्या नोटवर पुस्तक संपतं हे देखील मला फार आवडलं. कथांचा क्रम ठरवताना, ही कथा शेवटी ठेवताना त्यामागे संपादकांचा काहीएक विचार असेल तर तो पुरता यशस्वी ठरला आहे.

सर्व सहा कथा संपल्यावर आसाराम लोमटे यांचं एक मनोगतरूपी परिशिष्ट येतं. ‘मुक्त शब्द’ मासिकातल्या ‘समकाल आणि मी’ या सदरात विविध लेखकांनी लिहिलं होतं. त्यातला हा एक लेख आहे. त्यात लोमटेंनी लेखनामागची त्यांची मनोभूमिका स्पष्ट केली आहे. हा लेखही आवर्जून वाचण्यासारखा आहे. तो पुस्तकाच्या शेवटी ठेवला आहे, हे देखील मला वैशिष्ट्यपूर्ण वाटलं.

सुरूवातीला म्हटलं तो पुस्तकखरेदीचा धागा धरून म्हणेन, की दरवर्षी साहित्य अकादमी पुरस्कार कुणाला मिळतो, त्या यादीत मराठी कुणी आहे का, याचा कधी काही ठरवून मागोवा आपण घेतोच असं नाही; म्हणजे मी तरी कधी तसा घेतलेला नाही. असली पुरस्कारप्राप्त पुस्तकं आपल्याला झेपणारी असतील की नाही, हे एक कारण; आणि दुसरं, म्हणजे कुणा मराठी लेखकाला पुरस्कार मिळालाच तर वर्तमानपत्रांत त्याबद्दल वाचायला मिळतंच, तेवढं ज्ञान मिळालं तरी बास झालं, हा अल्पसंतुष्टीपणा. तर असंच गेल्या वर्षी कधीतरी या पुस्तकाबद्दल पेपरात वाचलं होतं. पण प्रथमच असं झालं, की सा.अ.पुरस्कारप्राप्त पुस्तक मी समजून-उमजून विकत घेतलं; आणि त्यातल्या कथांनी, विशेषतः ‘वळण’ कथेमुळे स्वतःच्याच पुस्तकखरेदीचं कौतुक करावंसं वाटलं.
-----
आलोक
आसाराम लोमटे
शब्द प्रकाशन

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे, वा.... सुरेख पुस्तक परिचय....
मूळ कथा वाचायची उत्सुकता निर्माण झालीये...

मस्त परीचय ललिता. Happy
पुस्तक मिळवून वाचायची उत्सुकता आहे, मिळवायला हवं हे पुस्तक.

नक्कीच कुतूहल निर्माण झालय हे वाचून.

सलग काही इंग्रजी पुस्तकं वाचली गेल्यावर मराठी पुस्तकाची तातडीची गरज निर्माण झाली >> हे आवडले Happy

पुस्तकपरिचय आवडला.
खुप खुप सुंदर कथासंग्रह आहे हा. ओझं ही कथा सर्वात आवडली. अक्षरशः गलबलून आलं वाचताना. मी या लेखकाची दोन पुस्तकं वाचलीयेत, धूळपेर आणि आलोक. दोन्हीही नितांतसुंदर आहेत. गावातल्या आजच्या माणसाचं जगणं, त्याच्या आशा- आकांक्षा, दु:खं यांचं खरंखुरं चित्रण. आलोकमधील शेवटचं लेखकाचं मनोगत चिंतनीय वाटलं.
आसाराम लोमटे आता कादंबरी लिहित आहेत असं कळलं. खुप उत्सुकतेने वाट पहात आहे.
संपादनः ओझं याच नावाची आणखी एक सुंदर कथा आहे. आठवतेय का कुणाला?