शब्दांची घडवणूक

Submitted by केअशु on 23 June, 2018 - 06:52

मराठीत भाषेत अन्य भाषांमधून होणारी आवक आपल्याला नवी नाही.महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यांमधे बोलल्या जाणार्‍या भाषांपासून ते फारसी,इंग्लिश,पोर्तुगीज,अरबी अशा बर्‍याच भाषांमधून ही आवक झालेली आहे.
काही शब्द तर मूळचे मराठी नाहीत हे सहजपणे लक्षातही येणार नाही इतके ते मराठी भाषेत बेमालूमपणे मिसळले आहेत,स्वीकारले गेले आहेत.

ही आवक अजूनही सुरुच आहे.

पण ही आवक किती होऊ द्यायची यालाही काही मर्यादा असाव्यात,त्यामागे निश्चित असे धोरण असावे असे वाटू लागले आहे.

खालील वाक्ये पहा.

"हार्डडिस्क केबलनं लॅपटॉपला अॅटेच केली की विदीन टेन सेकंद लॅपटॉप आपोआप बंदच होतो."

"पावसाडा सुरु होऊनही मुंबईच्या रस्त्यांमदले गढ्ढे महापालिकेने न भरल्याने पुन्हा एकदा महापालिकेची पोल खुललेली आहे. - अखिलेश मिश्रा ------- न्यूजसाठी"

"पिल्लू तिकडे नको जाऊ.तिकडे अँटस असतील,त्या तुला बाईट करतील."

"अगं मी बोलली होती त्याला, मला जाताना पिकअप कर म्हणून!"

या व्हिडिओत ३.५० ते ४.३८ पर्यंत इरावती हर्षेंचं मराठी ऐका.

https://youtu.be/z0Gc91HZohY

अशीच मराठी वाटू शकणारी काही वाक्ये तुमच्याही कानावर बर्‍याचदा पडत असतील. या वाक्यांमधे काही मोजके शब्द मराठी आहेत,क्रियापदे मराठी आहेत.पण सोबतच इंग्लिश आणि हिंदी शब्दांचाही नको इतका भरणा आहे.

अशा भाषेला आपण मराठी का समजावं? मोजकेच मराठी शब्द आणि क्रियापद मराठी आहे म्हणून? अशी भाषा ही खरंतर इंग्लिश किंवा हिंदीची बोलीभाषा म्हणून जास्त शोभेल असं नाही का वाटत?

मराठीच्या अशा धेडगुजरी रुपाबद्दल खंत व्यक्त करुन हळहळण्यापेक्षा आपणच काही केलं तर? प्रयत्न करुन पहायला हरकत काय आहे? याच इच्छेतून सुरु झालेला हा उपक्रम "घडवणूक शब्दांची!"

१) परकीय आणि स्वकीय भाषेतून आलेले क्लिष्ट, लांबलचक, उच्चारायला अवघड असे शब्द

२) परकीय भाषेतून आलेल्या वैज्ञानिक,तांत्रिक पारिभाषिक संज्ञा

३) समान,नेमका अर्थ दर्शवणारा शब्द आधीपासूनच मराठीत उपलब्ध असूनही तोच अर्थ दर्शवणारा मराठीतर शब्द

वरील तीन प्रकारच्या शब्दांसाठी अचूक मराठी शब्द सुचवणे किंवा त्यांचे मराठीकरण करणे आणि हे करताना नवीन निर्माण केला जाणारा शब्द लांबीला कमी, उच्चारायला सोपा, अर्थवाही असेल याचाही विचार करणे म्हणजे "शब्दांची घडवणूक!"

आपणही या उपक्रमात सामील होऊ शकता.

हे निर्माण झालेले नवीन शब्द मुक्त वापरासाठी सर्वांकरिता उपलब्ध असतील.असे शब्द सुचविणार्‍यांबद्दल कृतज्ञता नक्कीच असेल,श्रेय देण्याजोगे असेल.

या उपक्रमात आपण कशाप्रकारे सहभागी होऊ शकता?

‍१) हा धागा बनवलाच आहे.इथेच आपण असे शब्द बनवून प्रकाशित करु शकता.इतरांनी बनवलेल्या शब्दांवर चर्चा,काथ्याकूट करु शकता.

२) "घडवणूक शब्दांची!" याच नावाने एक व्हॉटसअॅप समुहसुध्दा बनवला आहे.तिथे सामील होऊ शकता.सामील होण्यासाठी आपण आपलं नाव आणि व्हॉटसअॅप नं विपूद्वारे मला पाठवू शकता.

३) सर्वात महत्वाचा मुद्दा: - हे शब्द केवळ बनवून उपयोग नाही तर ते सर्वत्र पसरले पाहिजेत,त्यांचा प्रसार झाला पाहिजे,मराठीजनांनी ते बोलण्यातून,लेखनातून वापरले पाहिजेत.हे शब्द रुळणे हे या उपक्रमाचं खरं यश म्हणता येईल. आंतरजाल,संभाषण,लेखन,समाजमाध्यमे अशा मार्गांनी हे शब्द पसरवण्यास,रुळवण्यास आपण मदत करु शकता.रुळेपर्यंत हे शब्द वापरणं कदाचित त्रासाचं वाटेलही पण एकदा रुळले की त्यात सहजपणा येईल.

दर सोमवारी व्हॉटसअॅप समुहावरील अंतिमत: निश्चित झालेले शब्द इथे दिले जातील,किंवा निश्चित न झाल्यास आलेली समस्या अधिक चर्चेसाठी इथे दिली जाईल. जेणेकरुन अधिक मार्गदर्शन मिळेल.

असाही प्रश्न पडू शकतो की याआधी असे शब्दनिर्मितीचे प्रयत्न झालेले आहेत.वि.दा.सावरकरांनी भाषाशुद्धीच्या माध्यमातून हे प्रयत्न पूर्वी केले आहेत.तुम्ही असं वेगळं काय करताय?
याचं उत्तर असं की आम्ही संपूर्णतः नवीन असं काहीच करत नाही आहोत.फक्त याआधीच्या प्रयत्नांमधल्या त्रुटी दूर करण्याचा आपापल्या क्षमतेनुसार प्रयत्न करणे आणि नवीन,सोप्या शब्दांचा प्रसार,प्रचार करुन हे शब्द रुळवण्यास यथाशक्ती प्रयत्न करत आहोत.

असा प्रयत्न करुन सावरकरांची बरोबरी करण्याचे धाडस करावे हा उद्देश यामागे नसून सावरकर ही यामागची प्रेरणा असून नवशब्दांची गंगा वाहती ठेवण्याचा हा अल्पसा प्रयत्न आहे.

अशा नवीन शब्दांचा प्रसार,प्रचार करताना ते रुळवताना काही वेळा थट्टा,मस्करीही होईल.ती याआधीच्या प्रयत्नांवेळीही झालेली आहे.सदर आक्षेपक मस्करी करण्याऐवजी सकारात्मकपणे या उपक्रमात सामील झाल्यास अधिक आनंद होईल.

"येऊ देत की परभाषेतून मराठीत शब्द त्याला काय होतंय? उलट यामुळे मराठीची शब्दसंपत्ती वाढेलच.मराठी समृध्द होईल." असं वाटणार्‍यांनी आधी स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांच्या भाषाशुद्धी या पुस्तकातला हा मजकूर वाचावा.
2ngykqf.jpg

नवीन शब्द सुचवताना हे खाली दिलेले निकष वापरावेत.

१) उच्चारायला सोपा+सुगम असा शब्द बनवता येतो का हे प्रयत्न करुन तर पहा.(हे शब्द अल्पशिक्षित किंवा गाव-खेड्यातल्या माणसालाही सहज उच्चारता यावेत.)
नाहीच जमलं तर,
२) इंग्लिश शब्दाचे मराठीकरण करा.
३) नवीन शब्दात जास्तीतजास्त ४ अक्षरे असावीत.
४) एकच अखंड शब्द असावा.शब्दांचे दोन गट नकोत.

मराठी शब्द म्हणजे बोजड,लांबलचक असेच असणार हा पूर्वग्रह बदलायचाय.लांबीला कमी असणारे शब्द बनवण्यासाठी प्रयत्न करायचेत.

नवे शब्द रुळेपर्यंत या नव्या शब्दाशेजारीच कंसात याअाधी मराठीत वापरात असलेला शब्द लिहायचा; म्हणजे शब्दकोश शोधणे,ते विशिष्ट पान शोधणे यात वेळ जाणार नाही.नंतर जसजसे हे शब्द रुळत जातील तसतसे कंसात आधी वापरात असलेले शब्द लिहिण्याची गरज पडणार नाही.

उदाहरणासाठी म्हणून हे काही शब्द.

काही आधीपासून असलेले तर काही नवीन शब्द.

१) LED = दिवडी (प्रकाश देणारे छोटे दिवे)
२) Mobile = चलभाष
३) Acceleration = त्वरण
४) Generator = जनित्र
५) Transformer = रोहित्र
६) Air conditioner = वाकु( वातानुकूलक चे लघुरुप)
७) CFL = स्वल्पदीप
८) Adhesive = आसंजी
९) Direct Current दिष्टधारा
१०) Absolute निरपेक्ष
११) Acoustic ध्वनिक
१२) Adaptor अनुकूलक
१४) Air break वातारोधी
१५) Coil कुंडल
१६) Alarm संकटघंटी
१७) Amplifier प्रवर्धी
१८) Anode धनाग्र
१९) Cathode ऋणाग्र
२०) Welding सांधण
२१) Array विन्यास
२२) Audio श्रुति
२३) Illumination दीपन
२४) Diode = एकदि (एकाच दिशेत वीजप्रवाह वाहू देतो म्हणून)
२५) Pentode = पंचोड
२६) Conductor = सुवाहक
२७) Insulator = दुर्वाहक
२८) Semiconductor = अर्धवाहक
२९) Remote = दुनि (दूरनियंत्रक)
३०) Periodic table = अणूक्रमणिका
३१) Talk time = बोलकाळ
३२) Firewall = जालभिंत
३३) Router = मार्गक
३४) Flash = तडीत
३५) Hardware = यंत्रणा
३६) Software = मंत्रणा
३७) File = धारिका
३८) Pixel = चित्रपेशी
३९) LCD = दसद(द्रव स्फटीक दर्शक)
४०) Charger = भारक
४१) चॅनेल = वाहिनी
४२) कॉम्प्लेक्स = क्लिष्ट
४३) कंटीन्यूअस = सतत की अविरत?
४४) कन्व्हिनियंट = सुलभ
४५) कन्व्हर्टर = रुपांत्रक
४६) डाटा = विदा
४७) डिजिटायझर = अंकक
४८) इलेक्ट्रॉन = विजक
४९) एक्स्टेंशन = विस्तार
५०) फॅसिलिटी = सुविधा
५१) इंडिकेटर = दर्शक
५२) इन्फॉर्मेशन = माहिती
५३) इन्स्ट्रुमेंट = उपकरण
५४) इंटरकनेक्ट = अनुबंध
५५) मल्टिप्लेक्सर = चयनक
५६) पोर्टेबल = जंगम
५७) रेंज = पल्ला
५८) रिअल टाईम = यथाकाल
५९) सेन्सर = संवेदक
६०) सिग्नल = संकेत
६१) स्केच = रेखाटन
६२) स्टोअरेज = साठवण
६३) स्विच = खटका
६४) सिस्टिम = प्रणाली
६५) टेप = फीत
६६) टेम्परेचर इंडिकेटर = तापदर्शक
६७) ट्रॅन्समिशन = पारेषण
६८) युजर = वापरदार
६९. गोरीला ग्लास - माकडकाच
७०. OTG केबल - अोतार(OT+तार)
७१. डेटा केबल - वितार (विदा+तार)
७२. सेट टॉप बॉक्स - साधपेटी
७३. रिचार्ज - पुभार(पुनर्भार)
७४. सिमकार्ड - मामापत्र(मालकाची माहिती भरलेले पत्रक)
७५. ३.५ mm जॅक = रवटेकू
७६. सिम स्लॉट = सरखळी
७७. Cathode ray tube = (ऋकिन/रुकिन) ~ ऋण किरण नलिका
७८. सोल्डरींग = लयघट्ट
७९. इलेक्ट्रिक स्क्रू ड्रायव्हर = विमचा ~ विद्युत मळसूत्र चालक
८०. हँड स्क्रू ड्रायव्हर = हामचा ~ हाताने वापरायचा मळसूत्र चालक
८१. Printed Circuit Board(pcb) = छापटी ~ छापील परिपथ पट्टी
८२. Monitor = चित्रक ~ चित्र दाखवणारा
८३. USB = जुतार ~ अन्य साधनांची संगणकाशी जुळवणी करायला मदत करणारी तार

सर्व सकारात्मक सुचनांचे,सल्ल्यांचे स्वागतच आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

विचार चांगला आहे.
१. तुम्ही दिलेल्या उदाहरणतील वाक्यांत परक्या भाषेतले शब्द मराठी भाषेत वापरण्यापेक्षा भाषांची मिसळ केली गेली आहे. मूळ मराठी शब्द नाहीत, म्हणून तिथे परभाषेतले शब्द वापरलेत, असं पहिलं वाक्य सोडलं , तर झालेलं दिसत नाही. त्यामुळे ती आणि सावरकरांनी दिलेली उदाहरणंही या लेखामागच्या विचाराशी मेळ खात नाहीत.
२. पिरियॉडिक टेबलला - आवर्त सारणी की अशीच काही संज्ञा होती, असं आठवतंय.
३. रेफ्रिजरेटरला शीतकपाट असा शब्द वापरल्याचं पाहिलंय.
Lift/elevator उद्वाहक
escalator सरकता जिना
४. स्टॅटिस्टिक्स (संख्याशास्त्रातला) मधला डेटा = विदा. पण इथे आपण ज्या अर्थाने वापरतोय, तो तोच का?

आभार भरत,

समान,नेमका अर्थ दर्शवणारा शब्द आधीपासूनच मराठीत उपलब्ध असूनही तोच अर्थ दर्शवणारा मराठीतर शब्द वापरणं टाळावं हा उद्देश आहे.पहिलं वगळता अन्य उदाहरणं ही अन्य भाषेतून शब्द स्वीकारत गेल्यानं कसं नुकसान होतं यासाठी दिली आहेत.

विदा या शब्दाबद्दल इथे वाचायला मिळेल.
https://mr.m.wikipedia.org/wiki/चर्चा:विदा

आभार भरत,

समान,नेमका अर्थ दर्शवणारा शब्द आधीपासूनच मराठीत उपलब्ध असूनही तोच अर्थ दर्शवणारा मराठीतर शब्द वापरणं टाळावं हा उद्देश आहे.पहिलं वगळता अन्य उदाहरणं ही अन्य भाषेतून शब्द स्वीकारत गेल्यानं कसं नुकसान होतं यासाठी दिली आहेत.

विदा या शब्दाबद्दल इथे वाचायला मिळेल.
https://mr.m.wikipedia.org/wiki/चर्चा:विदा

मला वाटलं लेखाचा आणि उपक्रमाचा उद्देश , समान मराठी शब्द नसलेल्या परभाषी शब्दांसाठी, तसे शब्द घडवणे हा आहे.
किंवा तसे शब्द असले , तर ते अधिक प्रमाणात प्रचलित करणे.

परभाषेतील शब्द त्याला पर्याय नसल्याने मराठीत तसेच किंवा थोडे बदलून येणं, वावगं आहे असं मला वाटत नाही.
उदा: प्लॅटफॉर्मसाठी फलाट. याला इंग्रजी तद्भव शब्द म्हणता येईल (संस्कृतमधून आपण असे शब्द घेतले, तर ते योग्य, पण अन्य भाषेतून घेतले तर अयोग्य, असं मला वाटत नाही.)
अन्य भाषाही हे करतच असतात. इंग्रजीत शांपू (चंपी) हे चटकन आठवलेलं उदाहरण.
इंग्रजीत दरवर्षी काही शब्द ऑफिशियली - अधिकृतरीत्या समाविष्ट केले जातात.
तेव्हा नवे शब्द घडवणे आणि परभाषेतील शब्द स्वीकारणे या दोन्ही प्रकारांनी भाषा समृद्ध होते असं मला वाटतं.

जी गोष्ट ऐतद्देशियानी शोधली नाही,
जे शास्त्र सुद्धा भारतात उगम पावले नाही, त्या साठी मराठीत प्रतिशब्द शोधायचा आणि त्यापेक्षा लोकप्रिय करण्याचा खटाटोप का?
कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स ,टेलेकम्युनिकेशन हे विषय नजीकच्या भविष्यकाळात मराठीत शिकवले जाणार नाहीत, त्यात होणारी नवी संशोधने मराठीमध्ये मांडायची वेळ येणार नाही. असे असताना diode, pentode यासाठी मराठी शब्द का शोधायचे?

तंत्रज्ञान क्षेत्रातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की संज्ञा युनिव्हर्सल , वैश्विक असल्या पाहिजेत,
आता प्रत्येक भाषाभिमानी प्रांताने आपले शब्द निर्माण केले आणि लोकप्रिय करायचा चंग बांधला तर काय होईल?
म्हणजे हा सगळा खटाटोप (तंत्रज्ञान क्षेत्रात विशेषतः) केवळ मराठी डिक्शनरी ची जाडी वाढवणे इतकाच सीमित राहिल का?

मराठीत (वा अन्य भाषेत) शास्त्रीय परिभाषेतील शब्द घडवण्यामागे निव्वळ ते संशोधनाकरता वापरणे हाच एकमेव उद्देश नसतो. जर ही आधुनिक उपकरणे, पदार्थ इ. बाजारात विकायची वा विकत घ्यायची असतील तर सोपे मराठी शब्द वापरता येऊ शकतात. नवे शब्द घडवण्याची पद्धत, शैली ही एक उत्क्रांत होणारी प्रक्रिया आहे. हळूहळू त्यात सुधारणा होत राहिल. सगळेच शब्द यशस्वी होणार नाहीत. पण म्हणून प्रयत्न करणार्‍यांना नामोहरम करण्याची आवश्यकता नाही.

माझा प्रतिसाद नामोहरम वगैरे करणारा वाटत असेल तर सॉरी,
पण मुळात प्रतिशब्द शोधायची गरज काय हे कळल्याशिवाय सुघट शब्द शोधणे शक्य नाही, नाहीतर तर ते शब्द अग्निरथ आगमन निर्गमन ...सारखे टवाळीचे धनी होतील.

एखादी भाषा समृद्ध होते म्हणजे काय होते? वस्तूंची नावे त्या भाषेत घेतल्या मुळे भाषेची शब्द संपदा वाढते का?
मग परभाषेतील विशेष नामे पण आपण भाषांतरित करायची का? तांत्रिक परिभाषेतील USB, कम्पोनेंट्स ची नावे इत्यादी विशेषनामेच आहेत.

शर्ट, पॅन्ट, कमोड, स्टूल हे शब्द तसेच्या तसे आल्याने भाषा वाढली की कमी झाली?
हे मी फक्त तांत्रिक शब्दांबद्दल बोलत आहे, बाकीच्या परिघातील शब्द अवश्य मराठीत आणावेत.

बऱ्याचदा वस्तूच्या तांत्रिक माहिती साठी इंग्रजी मध्ये जो शब्द असतो तो शब्द मूळ (रूट) ठरतो आणि वस्तूचे नाव येते,
उदाहरणार्थ
Diode- 2 टर्मिनल असणारा म्हणून di-ode
मग 3 टर्मिनल असणारा triode
वस्तूत: दोन्ही गोष्टी विद्युत प्रवाह एकाच दिशेने जाऊ देतात.
लेखकाने सुचवलेला शब्द "एकदि" तांत्रिक दृष्ट्या पाहता हे नाव diode-triode-pentode- transistor- SCR सगळ्यांना लागू पडेल.
म्हणजेच इकडे नाव सुचवताना ते एक कम्पोनेंट् आणि त्यावरून आलेली बाकीची कम्पोनेंट्स (derivatives) असा विचार झाला नाहीये तर अमुक गोष्टीचे छान नाव ठेवायचे , XYZ नाव ऐकायला छान वाटते ते ठेऊ, आशा पद्धतीने सुचवले गेले आहे असे वाटते आहे.

तीच गोष्ट USB ची,
USB युनिव्हर्सल सिरीयल बस ही technology आहे, आणि त्यावर आधारित बऱ्याच गोष्टी काम करतात,
तेव्हा USB= 2 मशिन्स जोडण्याची केबल असे मानून USB technology फॅमिली चे नाव ठरवणे चुकीचे ठरेल

शोध लावणार्यांनी काही एक संदर्भ ठेऊन शोधलेल्या गोष्टीचे नाव ठेवलेले असते, मराठीकरण करण्याच्या नादात आपण आकाशातून पडलेले एक नाव त्या वस्तूला दिले असे होऊ नये.

जिकडे असे संदर्भ नाहीत, ते शब्द जास्त लौकर लोकप्रिय झाले, जसे संवेदक, निर्देशक,
आणि संदर्भ जुळून आले ते चपखल बसले जसे संगणक, गणकयंत्र etc.
आता हे संदर्भ शोधून त्याला चपखल बसणारे नाव शोधायचे आणि त्याचा प्रसार करायचा ही मगजमारी खरंच वर्थ आहे का?
आज तंत्रज्ञानाच्या स्फोटात दिवसाला 10 शब्द तरी नवीन येत असतील. मग आहे तो शब्द स्वीकारून पुढे जायचे की प्रतिशब्द शोधण्यात शक्ती गुंतवून ठेवाची हे आपण ठरवायचे.

असो...
माझे म्हणणे मी मांडले, ज्यांना शब्द शोधणे आवश्यक आहे असे वाटते त्यांना ऑल द बेस्ट

नवीन पर्यायवाचक शब्दांचे सर्जन व्हावे. त्यात वावगे काही नाही!

ते शब्द वापरले जातील की नाही हे वापरकर्ते ठरवतील.

पण नवीन पर्यायी मराठी शब्द येऊच नयेत हा विचार योग्य कसा?

गोरिला ग्लास हे ब्रँडनेम आहे हो! त्याचं मराठीकरण कसलं करता?
बायदवे, कोणीतरी वीकांत या भयानक शब्दाला मराठी सुचवा. वीकांत म्हटलं की मला कायम 'आकांत' आठवतो.

परवा पिं. चीं. मनपा रस्त्यावरिल ग्रेड सेपरेटर मध्ये गाडि घातली आणि वर एका ठिकाणी ग्रेड सेपरेटर ला चक्क मराठी प्रतिशब्द दिलेला.
ग्रेड सेपरेटर = समतल विलगक. मला फार आवडला आहे हा शब्द

Periodic table ला आवर्तसारणी म्हणतात.

Copper ला तांबे, iron ला लोखंड म्हणतात, तसे तुम्ही सगळ्या मूलद्रव्यांच्या नावांचे मराठीकरण करणार का?

यादीत दिलेले बहुतेक इंग्रजी शब्द इतके सोपे आहेत की त्यांचे मराठीकरण अजिबात करू नये. स्क्रू ड्रायव्हरला मराठी-हिंदीत पेचकस हा रूढ शब्द आहे, अनेक सुतारांना हा शब्द वापरताना मी ऐकले आहे.

`टायपिंग करणे'ला आधीपासूनच टंकणे म्हणतात, त्यामुळे टंकाळा शब्द रूढ व्हायला काहीच हरकत नाही.

स्क्रू ड्रायवर म्हणजे पेंचकस नव्हे. त्याला सरळ इस्क्रू चाबी म्हणतात ते. पकड नावाच्या प्रकाराला पेंचकस म्हणतात. शुद्धोबा, उगंच राठी बिठी आडनांव अन शुद्धमती असं जेंडर न्यूट्रल नांव घेऊन आयडी काढली, म्हणजे लय मराठी यायला लागलं असं नसतं. भोपाळात राहून इतकं बी कळंना, का राव तुमास्नी? का मराठीचा भोपळा फोडून र्‍हायले?

पेचकस म्हणजे स्क्रू ड्रायव्हरच. हे पहा :
https://www.google.com/search?client=ubuntu&channel=fs&q=%E0%A4%AA%E0%A5...
आणि हे :
https://www.collinsdictionary.com/dictionary/hindi-english/%E0%A4%AA%E0%...

आता मला दिलेल्या शिव्या मागे घ्या.

सावरकरांची शब्दसूची : या शब्दांपैकी जे इंग्रजी शब्द होते, त्यांचे बरेचसे पर्याय मराठीने स्वीकारले, पण जुने इंग्रजी शब्दही वापरात राहिले. फारसी शब्दांच्या बाबतीतही तेच झाले, 'शिवाय'च्या ऐवजी सुचवलेला 'व्यतिरिक्त' थोडाफार स्वीकारला गेला, पण 'शिवाय'चा उपयोग थांबला नाही. परकीय शब्दांनी भाषा समृद्ध होते हे सावरकरांना मान्य नव्हते. इंग्रजी भाषेने असंख्य परकीय शब्द आत्मसात केले आणि ती भाषा समृद्ध झाली.

नेपथ्य आणि वेतन हे जुनेच शब्द असून ते अनुक्रमे मोनियर मोनियर विल्यम्स/मोल्सवर्थ कोशांमध्ये आहेत.

शिवाजीच्या शब्दकोशातील फारच थोडे वापरले गेले. त्यातले काही शब्द या श्लोकात दिले आहेत :

अमात्यः स्यात् मजुमदारः सेनाकर्ता हुकूमतः ||
वाकनीसोऽपि मंत्री स्यात् न्यायाधीशोऽप्यदालतः |
कारमुल्की तु सुमंत्रः स्यात् सभासद् स्यात् मजालसी ||
शाहजादा राजपुत्रः प्रधानः पेशवा तथा |
सामंतोऽस्तु वजीरः स्यात् सैन्यं लष्करमीरितम् ||
सरनोबतस्तु सेनानी जुमलेदारः शताधिपः |
पदातिसैन्यं हशमं प्यादा पत्तिः प्रकीर्तितः ||
तत्र सरनोबतो यस्तु दलवायी स ईरितः |

सावरकारांची मराठी (इंग्रजी) शब्दसूची :

दिनांक (तारीख)
क्रमांक (नंबर)
बोलपट (टॉकी). हल्लीच्या मराठीत टाॅकीज म्हणजे चित्रपटगृह!
नेपथ्य
वेशभूषा (कॉश्च्यूम)
दिग्दर्शक (डायरेक्टर)
चित्रपट (सिनेमा)
मध्यंतर (इन्टर्व्हल)
उपस्थित (हजर)
प्रतिवृत्त (रिपोर्ट)
नगरपालिका (म्युन्सिपालटी)
महापालिका (कॉर्पोरेशन)
महापौर (मेयर)
पर्यवेक्षक ( सुपरवायझर)
विश्वस्त (ट्रस्टी)
त्वर्य/त्वरित (अर्जंट) : त्वर्य शब्द अजिबात रुळला नाही.
गणसंख्या (कोरम)
स्तंभ ( कॉलम)
मूल्य (किंमत). मूल्य आणि किंमत हे समानार्थी समजले जात नाहीत, त्यांना अर्थशास्त्रात अनुक्रमे Value आणि Price म्हणतात.
शुल्क (फी)
हुतात्मा (शहीद)
निर्बंध (कायदा). कायद्यासाठी निर्बंध हा शब्द स्वीकारला गेला नाही. एकतर कायदाच म्हणतात किंवा समासात वापरायचा असेल तर विधि.
शिरगणती ( खानेसुमारी)
विशेषांक (खास अंक)
सार्वमत (प्लेबिसाइट)
झरणी (फाऊन्टनपेन). 'झरणी' काही लोकांनी सुरुवातीला वापरला, पण रूढ झाला नाही.
नभोवाणी (रेडिओ)
दूरदर्शन (टेलिव्हिजन)
दूरध्वनी (टेलिफोन)
ध्वनिक्षेपक (लाउड स्पीकर)
विधिमंडळ (असेम्ब्ली)
अर्थसंकल्प (बजेट)
क्रीडांगण (ग्राऊंड)
प्राचार्य (प्रिन्सिपॉल)
मुख्याध्यापक (हेडमास्तर)
प्राध्यापक (प्रोफेसर)
परीक्षक (एक्झॅमिनर)
शस्त्रसंधी (सीझफायर)
टपाल (पोस्ट)
तारण (मॉर्गेज)
संचलन (परेड)
गतिमान
नेतृत्व (लीडरशीप)
सेवानिवृत्त (रिटायर)
वेतन (पगार). वेतन क्वचित वापरतात, पण तेही लेखनात; बोलताना मात्र पगार!

पेचकस म्हणजे मला तरी स्क्रू ड्रायव्हर असे वाटते.

पेच म्हणजे threads आणि त्यांना कसणारा या अर्थी पेचकस.

पेंचीस म्हणजे पकड, हे कसे ते माहीत नाही पण पकडला पेंचीस म्हणणारे बरेच राजस्थानी कारागीर बघितलेत.

"झरणी, नेतृत्व, विशेषांक हे शब्द सावरकरांचे नाहीत."

ही यादी https://blogs.maharashtratimes.indiatimes.com/karanki/savarkar/ वरून घेतली होती. यादीत काही चुका असू शकतील.

लोकमतवरच्या यादीतही झरणी आणि विशेषांक हे शब्द आहेत. पहा : http://www.lokmat.com/mumbai/marathi-words-given-v-d-savarkar/

"पेंचीस म्हणजे पकड, हे कसे ते माहीत नाही पण पकडला पेंचीस म्हणणारे बरेच राजस्थानी कारागीर बघितलेत."

पिंच म्हणजे चिमूट-चिमटी. यावरून कदाचित पेंचीस म्हणजे पकड हा अर्थ बनत असावा. Plier किंवा Pincerला हिंदीत चिमटी म्हणतात, यासाठी पहा : https://shabdkosh.raftaar.in/Meaning-of-PLIERS-in-Hindi. पेंचीस कदाचित पिंसरचा अपभ्रंश असावा.

झरणी, नेतृत्व, विशेषांक हे शब्द सावरकरांचे नाहीत.
>>>
म्हणजे इतर शब्द सावरकरांचे आहेत की फक्त जे नाहीत ते नाहीत इतकेच म्हणायचे आहे?

मला शुद्ध मरठीत संभाषण करायला आणि देवनागरीतोनच मराठी लिहायला आवडते ( including Whatsapp)
येथील शब्दभांडाराचा मला खूप उपयोग होइल...
मला एक मदत हवी आहे. इंग्रजीमधे " Share" करणे हा चांगला वाकप्रचार आहे. त्या साठी मरठीत काय शब्दप्रयोग करावा ?
मागे मायबोलीवरच कोणीतरी उत्तर दिले होते पण मी विसरलो.

सावरकरांनी मराठी भाषेत निर्मिलेले शब्द याची अचूक (किमान अभ्यासू) यादी कुठल्या पुस्तकात वा वेबसाइटवर आहे का?
म्हणजे भक्तांना 'बघा किती शब्द सावरकरांनी निर्मिले' असे योग्य त्याच शब्दांबद्दल अभिमानाने म्हणता येईल
विरोधकांना 'ह्या इतकेच, आणि हे वापरते तरी कोण' असे म्हणता येईल व खूपच तिरस्कार असेल तर ते शब्द कधीही न वापरण्याचा पणदेखील करता येईल. त्या बाणाने लिहिले आहे ना कुठलेतरी राजकुमारांचे नाटक ज्यात प्रत्येक राजकुमाराच्या व्यंगानुसार व्यंजने गाळली आहेत?

Pages