शब्दांची घडवणूक

Submitted by केअशु on 23 June, 2018 - 06:52

मराठीत भाषेत अन्य भाषांमधून होणारी आवक आपल्याला नवी नाही.महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यांमधे बोलल्या जाणार्‍या भाषांपासून ते फारसी,इंग्लिश,पोर्तुगीज,अरबी अशा बर्‍याच भाषांमधून ही आवक झालेली आहे.
काही शब्द तर मूळचे मराठी नाहीत हे सहजपणे लक्षातही येणार नाही इतके ते मराठी भाषेत बेमालूमपणे मिसळले आहेत,स्वीकारले गेले आहेत.

ही आवक अजूनही सुरुच आहे.

पण ही आवक किती होऊ द्यायची यालाही काही मर्यादा असाव्यात,त्यामागे निश्चित असे धोरण असावे असे वाटू लागले आहे.

खालील वाक्ये पहा.

"हार्डडिस्क केबलनं लॅपटॉपला अॅटेच केली की विदीन टेन सेकंद लॅपटॉप आपोआप बंदच होतो."

"पावसाडा सुरु होऊनही मुंबईच्या रस्त्यांमदले गढ्ढे महापालिकेने न भरल्याने पुन्हा एकदा महापालिकेची पोल खुललेली आहे. - अखिलेश मिश्रा ------- न्यूजसाठी"

"पिल्लू तिकडे नको जाऊ.तिकडे अँटस असतील,त्या तुला बाईट करतील."

"अगं मी बोलली होती त्याला, मला जाताना पिकअप कर म्हणून!"

या व्हिडिओत ३.५० ते ४.३८ पर्यंत इरावती हर्षेंचं मराठी ऐका.

https://youtu.be/z0Gc91HZohY

अशीच मराठी वाटू शकणारी काही वाक्ये तुमच्याही कानावर बर्‍याचदा पडत असतील. या वाक्यांमधे काही मोजके शब्द मराठी आहेत,क्रियापदे मराठी आहेत.पण सोबतच इंग्लिश आणि हिंदी शब्दांचाही नको इतका भरणा आहे.

अशा भाषेला आपण मराठी का समजावं? मोजकेच मराठी शब्द आणि क्रियापद मराठी आहे म्हणून? अशी भाषा ही खरंतर इंग्लिश किंवा हिंदीची बोलीभाषा म्हणून जास्त शोभेल असं नाही का वाटत?

मराठीच्या अशा धेडगुजरी रुपाबद्दल खंत व्यक्त करुन हळहळण्यापेक्षा आपणच काही केलं तर? प्रयत्न करुन पहायला हरकत काय आहे? याच इच्छेतून सुरु झालेला हा उपक्रम "घडवणूक शब्दांची!"

१) परकीय आणि स्वकीय भाषेतून आलेले क्लिष्ट, लांबलचक, उच्चारायला अवघड असे शब्द

२) परकीय भाषेतून आलेल्या वैज्ञानिक,तांत्रिक पारिभाषिक संज्ञा

३) समान,नेमका अर्थ दर्शवणारा शब्द आधीपासूनच मराठीत उपलब्ध असूनही तोच अर्थ दर्शवणारा मराठीतर शब्द

वरील तीन प्रकारच्या शब्दांसाठी अचूक मराठी शब्द सुचवणे किंवा त्यांचे मराठीकरण करणे आणि हे करताना नवीन निर्माण केला जाणारा शब्द लांबीला कमी, उच्चारायला सोपा, अर्थवाही असेल याचाही विचार करणे म्हणजे "शब्दांची घडवणूक!"

आपणही या उपक्रमात सामील होऊ शकता.

हे निर्माण झालेले नवीन शब्द मुक्त वापरासाठी सर्वांकरिता उपलब्ध असतील.असे शब्द सुचविणार्‍यांबद्दल कृतज्ञता नक्कीच असेल,श्रेय देण्याजोगे असेल.

या उपक्रमात आपण कशाप्रकारे सहभागी होऊ शकता?

‍१) हा धागा बनवलाच आहे.इथेच आपण असे शब्द बनवून प्रकाशित करु शकता.इतरांनी बनवलेल्या शब्दांवर चर्चा,काथ्याकूट करु शकता.

२) "घडवणूक शब्दांची!" याच नावाने एक व्हॉटसअॅप समुहसुध्दा बनवला आहे.तिथे सामील होऊ शकता.सामील होण्यासाठी आपण आपलं नाव आणि व्हॉटसअॅप नं विपूद्वारे मला पाठवू शकता.

३) सर्वात महत्वाचा मुद्दा: - हे शब्द केवळ बनवून उपयोग नाही तर ते सर्वत्र पसरले पाहिजेत,त्यांचा प्रसार झाला पाहिजे,मराठीजनांनी ते बोलण्यातून,लेखनातून वापरले पाहिजेत.हे शब्द रुळणे हे या उपक्रमाचं खरं यश म्हणता येईल. आंतरजाल,संभाषण,लेखन,समाजमाध्यमे अशा मार्गांनी हे शब्द पसरवण्यास,रुळवण्यास आपण मदत करु शकता.रुळेपर्यंत हे शब्द वापरणं कदाचित त्रासाचं वाटेलही पण एकदा रुळले की त्यात सहजपणा येईल.

दर सोमवारी व्हॉटसअॅप समुहावरील अंतिमत: निश्चित झालेले शब्द इथे दिले जातील,किंवा निश्चित न झाल्यास आलेली समस्या अधिक चर्चेसाठी इथे दिली जाईल. जेणेकरुन अधिक मार्गदर्शन मिळेल.

असाही प्रश्न पडू शकतो की याआधी असे शब्दनिर्मितीचे प्रयत्न झालेले आहेत.वि.दा.सावरकरांनी भाषाशुद्धीच्या माध्यमातून हे प्रयत्न पूर्वी केले आहेत.तुम्ही असं वेगळं काय करताय?
याचं उत्तर असं की आम्ही संपूर्णतः नवीन असं काहीच करत नाही आहोत.फक्त याआधीच्या प्रयत्नांमधल्या त्रुटी दूर करण्याचा आपापल्या क्षमतेनुसार प्रयत्न करणे आणि नवीन,सोप्या शब्दांचा प्रसार,प्रचार करुन हे शब्द रुळवण्यास यथाशक्ती प्रयत्न करत आहोत.

असा प्रयत्न करुन सावरकरांची बरोबरी करण्याचे धाडस करावे हा उद्देश यामागे नसून सावरकर ही यामागची प्रेरणा असून नवशब्दांची गंगा वाहती ठेवण्याचा हा अल्पसा प्रयत्न आहे.

अशा नवीन शब्दांचा प्रसार,प्रचार करताना ते रुळवताना काही वेळा थट्टा,मस्करीही होईल.ती याआधीच्या प्रयत्नांवेळीही झालेली आहे.सदर आक्षेपक मस्करी करण्याऐवजी सकारात्मकपणे या उपक्रमात सामील झाल्यास अधिक आनंद होईल.

"येऊ देत की परभाषेतून मराठीत शब्द त्याला काय होतंय? उलट यामुळे मराठीची शब्दसंपत्ती वाढेलच.मराठी समृध्द होईल." असं वाटणार्‍यांनी आधी स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांच्या भाषाशुद्धी या पुस्तकातला हा मजकूर वाचावा.
2ngykqf.jpg

नवीन शब्द सुचवताना हे खाली दिलेले निकष वापरावेत.

१) उच्चारायला सोपा+सुगम असा शब्द बनवता येतो का हे प्रयत्न करुन तर पहा.(हे शब्द अल्पशिक्षित किंवा गाव-खेड्यातल्या माणसालाही सहज उच्चारता यावेत.)
नाहीच जमलं तर,
२) इंग्लिश शब्दाचे मराठीकरण करा.
३) नवीन शब्दात जास्तीतजास्त ४ अक्षरे असावीत.
४) एकच अखंड शब्द असावा.शब्दांचे दोन गट नकोत.

मराठी शब्द म्हणजे बोजड,लांबलचक असेच असणार हा पूर्वग्रह बदलायचाय.लांबीला कमी असणारे शब्द बनवण्यासाठी प्रयत्न करायचेत.

नवे शब्द रुळेपर्यंत या नव्या शब्दाशेजारीच कंसात याअाधी मराठीत वापरात असलेला शब्द लिहायचा; म्हणजे शब्दकोश शोधणे,ते विशिष्ट पान शोधणे यात वेळ जाणार नाही.नंतर जसजसे हे शब्द रुळत जातील तसतसे कंसात आधी वापरात असलेले शब्द लिहिण्याची गरज पडणार नाही.

उदाहरणासाठी म्हणून हे काही शब्द.

काही आधीपासून असलेले तर काही नवीन शब्द.

१) LED = दिवडी (प्रकाश देणारे छोटे दिवे)
२) Mobile = चलभाष
३) Acceleration = त्वरण
४) Generator = जनित्र
५) Transformer = रोहित्र
६) Air conditioner = वाकु( वातानुकूलक चे लघुरुप)
७) CFL = स्वल्पदीप
८) Adhesive = आसंजी
९) Direct Current दिष्टधारा
१०) Absolute निरपेक्ष
११) Acoustic ध्वनिक
१२) Adaptor अनुकूलक
१४) Air break वातारोधी
१५) Coil कुंडल
१६) Alarm संकटघंटी
१७) Amplifier प्रवर्धी
१८) Anode धनाग्र
१९) Cathode ऋणाग्र
२०) Welding सांधण
२१) Array विन्यास
२२) Audio श्रुति
२३) Illumination दीपन
२४) Diode = एकदि (एकाच दिशेत वीजप्रवाह वाहू देतो म्हणून)
२५) Pentode = पंचोड
२६) Conductor = सुवाहक
२७) Insulator = दुर्वाहक
२८) Semiconductor = अर्धवाहक
२९) Remote = दुनि (दूरनियंत्रक)
३०) Periodic table = अणूक्रमणिका
३१) Talk time = बोलकाळ
३२) Firewall = जालभिंत
३३) Router = मार्गक
३४) Flash = तडीत
३५) Hardware = यंत्रणा
३६) Software = मंत्रणा
३७) File = धारिका
३८) Pixel = चित्रपेशी
३९) LCD = दसद(द्रव स्फटीक दर्शक)
४०) Charger = भारक
४१) चॅनेल = वाहिनी
४२) कॉम्प्लेक्स = क्लिष्ट
४३) कंटीन्यूअस = सतत की अविरत?
४४) कन्व्हिनियंट = सुलभ
४५) कन्व्हर्टर = रुपांत्रक
४६) डाटा = विदा
४७) डिजिटायझर = अंकक
४८) इलेक्ट्रॉन = विजक
४९) एक्स्टेंशन = विस्तार
५०) फॅसिलिटी = सुविधा
५१) इंडिकेटर = दर्शक
५२) इन्फॉर्मेशन = माहिती
५३) इन्स्ट्रुमेंट = उपकरण
५४) इंटरकनेक्ट = अनुबंध
५५) मल्टिप्लेक्सर = चयनक
५६) पोर्टेबल = जंगम
५७) रेंज = पल्ला
५८) रिअल टाईम = यथाकाल
५९) सेन्सर = संवेदक
६०) सिग्नल = संकेत
६१) स्केच = रेखाटन
६२) स्टोअरेज = साठवण
६३) स्विच = खटका
६४) सिस्टिम = प्रणाली
६५) टेप = फीत
६६) टेम्परेचर इंडिकेटर = तापदर्शक
६७) ट्रॅन्समिशन = पारेषण
६८) युजर = वापरदार
६९. गोरीला ग्लास - माकडकाच
७०. OTG केबल - अोतार(OT+तार)
७१. डेटा केबल - वितार (विदा+तार)
७२. सेट टॉप बॉक्स - साधपेटी
७३. रिचार्ज - पुभार(पुनर्भार)
७४. सिमकार्ड - मामापत्र(मालकाची माहिती भरलेले पत्रक)
७५. ३.५ mm जॅक = रवटेकू
७६. सिम स्लॉट = सरखळी
७७. Cathode ray tube = (ऋकिन/रुकिन) ~ ऋण किरण नलिका
७८. सोल्डरींग = लयघट्ट
७९. इलेक्ट्रिक स्क्रू ड्रायव्हर = विमचा ~ विद्युत मळसूत्र चालक
८०. हँड स्क्रू ड्रायव्हर = हामचा ~ हाताने वापरायचा मळसूत्र चालक
८१. Printed Circuit Board(pcb) = छापटी ~ छापील परिपथ पट्टी
८२. Monitor = चित्रक ~ चित्र दाखवणारा
८३. USB = जुतार ~ अन्य साधनांची संगणकाशी जुळवणी करायला मदत करणारी तार

सर्व सकारात्मक सुचनांचे,सल्ल्यांचे स्वागतच आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

"फलंदाज, गोलंदाज, यष्टिरक्षक वगैरेही सावरकरांचेच शब्द आहेत असे ऐकले होते."

नाहीत. हे शब्द संस्कृतचे प्राध्यापक डी. बी. देवधर (दिनकर बळवंत देवधर - भारतीय क्रिकेटचे महान क्रिकेट खेळाडू) यांनी दिले. (चूभूद्याघ्या).

मराठीवर फारसीचा फार मोठा प्रभाव आहे. अन्य भारतीय भाषांवरही आहे. पेचकस हा शब्द फारसी आहे. पेच म्हणजे स्क्रू. कस हा ओढणे ह्याकरता असणारे क्रियापद त्यापासून बनलेला उपसर्ग आहे. उदा. गांजेकस म्हणजे गांजा ओढणारा. तसेच पेचकस म्हणजे स्क्रू ओढणारा असा काहीसा अर्थ होतो. (ड्राईव्ह ह्या शब्दाचा मूळ अर्थ ओढणे असाच होता) कश्मकश ओढाताण असा उर्दू शब्द आहे. दिलकश हाही तसाच. चित्तवेधून घेणारा अशा अर्थाचा शब्द. कश चा कस असा अपभ्रंश होऊ शकतो.

गोलंदाज, तिरंदाज ह्यांचेही मूळ फारसी आहे. अंदाज हा उपसर्ग ज्या क्रियापदातून आला आहे त्याचा अर्थ फेकणे असा होतो. त्यामुळे गोलंदाज म्हणजे गोळा फेकणारा (गोळा ह्याच्याशी साधर्म्य असणारा फारसी शब्द आहे), तिरंदाज म्हणजे तीर (तीर हा फारसी शब्द आहे) फेकणारा. फलंदाज हा खरे तर अयोग्य शब्द आहे कारण बॅट्समन हा बॅट फेकत नाही. पण तो आता रुढ झालेला आहे. गोलंदाजशी यमक जुळत असल्यामुळे तो मराठीने स्वीकारला. हिंदीत बॅट्समनला बल्लेबाज म्हणतात. हाही फारसी पद्धतीचा शब्द. बल्ला हा बहुधा फारसी नाही. पण ह्यातील बाज हा उपसर्ग खेळणे ह्या अर्थाचे फारसी क्रियापद आहे त्यापासून बनलेला आहे. (जुएबाज, फांदेबाज, दगाबाज, कावेबाज असे अन्य शब्दही आहेत)

फा, पण 'घर' हा फारसी शब्द नाही. Happy
'तीर-अंदाज'सारखा विग्रह नाही होणार त्याचा.

हे एक इथे सापडलं:
[ घर + फा . अंदोझ = मिळणें ]

ओह सही. थॅन्क्स.

मग फलंदाज हे गोलंदाज वरून similar pattern वापरून केले असावे. postpone/prepone सारखे - यात प्रीपोन हा शब्द प्रत्यक्षात नाही पण लोक सर्रास वापरतात.

गोलंदाज, तिरंदाज ह्यांचेही मूळ फारसी आहे. अंदाज हा उपसर्ग ज्या क्रियापदातून आला आहे त्याचा >> नजर अंदाज म्हणजे दुर्लक्ष किंवा काणाडोळा करणे असे मी समजत होते. तो कसा काय आला असेल ?
कहते हैं के गालिब का है अंदाजे बयां और या ओळींमधे अंदाज म्हणजे स्टाइल / पद्धत असा अर्थ नाही का होत ?

अंदाज हा उपसर्ग म्हणून आला तर फेकणे असा अर्थ होतो, निदान मी दिलेल्या उदाहरणात. त्या शब्दाचे आणखी वेगळे अर्थ असणे शक्य आहे. निव्वळ अंदाज ह्याचा फारसी अर्थ साईज् असाही सापडला. उर्दूत अंदाजचा अर्थ स्टाईल असाच आहे. पण तसा अर्थ फारसीत सापडला नाही. (उर्दूत कित्येकदा मूळ अरबी वा फारसीतील शब्दाचे अर्थ बदललेले आढळतात. उदा. इत्तेफाक म्हणजे योगायोग किंवा सहमती. पण अरबी भाषेत इत्तेफाकचा अर्थ योगायोग असा होत नाही. फक्त सहमती असा अर्थ होतो.)

अंदाख्तन हे फेकणे ह्या अर्थाचे फारसी क्रियापद. त्याचा वर्तमानकाळी रूप अंदाज असे होते. निव्वळ -दाज असा उपसर्ग नसून *अनुस्वार+दाज असा शब्द आहे.

हे सगळे नवीन मराठी शब्द कुठे वापरायचे?
फक्त मराठी पुस्तकात, वर्तमानपत्रात? नि मायबोलीवर?
जरा घराबाहेर पडले की नाना भाषा बोलणार्‍या लोकांशी संबंध येतो. इतकेच काय, घरातसुद्धा आईला दीड पोळी ऐवजी वन अँड हाफ पोळी असे मुलाला सांगावे लागते!! कारण मुले इंग्रजी मिडियम मधे शिकतात. नि आ़जकाल तर मराठीने केला कानडी भ्रतार असेहि बरेचदा असते. (आता भ्रतार शब्दाचा अर्थ माहित आहे का कुणाला? )

मूळ फारसीमध्ये बर्कंदाज सारखे शब्द आहेत जे अंदाख्तन् वरून येतात (बर्क म्हणजे मूळ फारसीत वीज, तोफेचे गोळे वीजेसारखे कोसळतात म्हणून तोपचीला बर्कंदाज हा शब्द तयार झाला). माझ्यामते मराठीत हे शब्द आयात होताना -दाज या प्रत्ययाचा अर्थ "-गटाचा सदस्य" या अर्थाने घेतला गेला. त्यामुळे ज्या शब्दांमध्ये -दाज चा "फेकणे" असा अर्थ घेतल्यास तार्किक संगती लागत नाही तिथे उपसर्गाचा शब्द फारसी नाही. उदा. घरंदाज - घर फारसी नाही. फलंदाज - बहुधा फळी चा फळ आणि मग फल पुन्हा फारसी नाही. गोलंदाज, तीरंदाज या शब्दांचे मूळ फारसी पर्यंत नेता येते आणि इथे -दाज प्रत्यय फेकणे या अर्थाने वापरला गेला आहे.

हिंदी शब्दांमध्ये मात्र थोडी वेगळी गोष्ट घडते. -बाज हा प्रत्यय बाजी वरून आला असावा. बाजीचा फारसीत अर्थ होतो खेळ. थोडक्यात गेंदबाज म्हणजे जो गेंदशी खेळतो. जांबाज म्हणजे जो (स्वतःच्या) जीवाशी खेळतो. पण बहुतांशी वेळा हिंदीतला उपसर्ग हा संस्कृत/प्राकृत शब्दावरून आला असावा. उदा. गेंद हा शब्द संस्कृतमधल्या कंदुकवरून आला असावा. बल्ला सुद्धा वलक वरून आला असण्याची शक्यता आहे. (वलकचा एक अर्थ काठी/लाठी).

गोलंदाज हा फारसीतून आलेला शब्द, तोफेतून तोफगोळे गोळे फेकणारा या अर्थी मराठीत होताच. प्रा. दि.ब. देवधरांनी तो क्रिकेटच्या संदर्भात रूढ केला.

क्रिकेटसंबंधीचे मराठी शब्द आधी देवधरांनी व मग बाळ ज. पंडितांनी त्यांच्या रेडिओवरील खेळाच्या धावत्या समालोचनात वापरले.

Pages