१. अडुम्बाची विलक्षण सफर (भाग पहिला)

Submitted by सखा on 24 June, 2017 - 09:52

बोकलवाडीच्या सेंट परशु महाविद्यालयात जर सर्वात अधिक खवट आणि जहाल मास्तर कोण अशी जर इलेक्शन घेतली तर विद्यार्थ्यांनी भूमितीच्या बोकडे मास्तरला बिनविरोध निवडून दिले असते. विनाकारण विद्यार्थ्यांच्या पाठीत धम्मक लाडू घालणे, कान पिळणे यात खविस बोकडे मास्तर आणि तर्कट मुख्याध्यापक दाबेसर तोडीस तोड होते म्हणा की.
बोकडे मास्तरांना रोजच्या राशी भविष्या व्यतिरिक्त पुरवणीत येणारी प्रवासवर्णने लहानपणापासूनच वाचायला फार फार आवडत.
किती मनोहर असतात नाही प्रवास वर्णने? कशी ती परदेशात जाऊन आलेले लोक दुसर्या देशांची रसभरीत वर्णने करतात. प्रवासवर्णनात त्यांना सर्वात जास्त आवडणारा भाग म्हणजे परत आल्या आल्या शी: बाई काय ही इंडियातील घाण, नो शिस्त आणि सो मच गर्दी हं वगैरे म्हणत परदेशातील रस्त्यावरील टापटीप, शिस्त वगैरेचे लेखकाने किंवा लेखिकेने केलेले रसाळ वर्णन. अमेरिका यूरोप इथे जन्मण्या ऐवजी आपण देखील भारतात चुकून जन्मलो असे बोकडे मास्तरचे प्रामाणिक मत होते.
परदेशात रस्त्या पासून कुत्र्या पर्यंत सगळेच फार मस्त असते असे त्यांनी अनेक प्रवास वर्णनात वाचले होते. परदेश प्रवासात लेखकाला हमखास काही प्रेमळ माणसे भेटतातच, भलेही इथे भारतात काळे कुत्रे विचारत नसले तरी परदेशात मात्र अचानक ओळख होऊन लेखकाला लोक आपल्या आलिशान घरी घेऊन जाऊन जेवण करून खाऊ घालतात. मुख्य म्हणजे त्यातल्या त्यात तरुणांना हमखास भेटणाऱ्या फॉरेनच्या गोर्या सुंदऱ्या. अहाहा किती मस्त आणि कोमल अनुभव असेल तो!
ट्रिपचा पैसा वसूलच की. आता फार झाले आपणही फॉरेन ट्रिप करायलाच हवी आणि पेपरा मासिकात लेख लिहून प्रसिध्धी मिळवत चार चौघात भारताला नाके मुरडावीत असे सुविचार बोकडे मास्तरच्या अविवाहित मनात आजकाल वारंवार येत असत.
योग कसे असतात बघा नेमके त्या दिवशीच्या बोकडेंच्या राशी भविष्यात "तरुणांना परदेश गमनाची संधी, विवाह ठरेल" असे लिहून आले होते.त्यामुळे हा दैवी कौलच असे बोकडे याना वाटले.
बोकलवाडीच्या कळकट्ट बस स्टॅन्ड शेजारच्या झेरॉक्सच्या दुकाना शेजारच्या मुतारीच्या बाजूलाच एक नवीन प्रवास कंपनी उघडली होती. बोकडे मास्तर शाळा सुटताच तडक सायकलवर टांग मारून चौकशी साठी तिथे गेले.
तिथे बसलेल्या कुणा एका एजंट सदृश इसमाने बोकडें समोर विविध नकाशे आणि आकर्षक बुकलेट्स ठेवून प्रत्येक देशाच्या ट्रीपच्या जबरदस्त किमती सांगितल्या. त्या अवाच्या सवा किमती ऐकून बोकडे मास्तरांचा चेहरा पार पडला. बिचाऱ्यांच्या लक्षात आले की अमेरिका युरोप आणि इतर बरेच देश पाहून भारताला नाके मुरडण्याची संधी केवळ आपल्या भारतीय रुपयाच्या दुबळेपणामुळे जमू शकत नाहीये. एक दीर्घ निःश्वास टाकून, पाच तास घालवून एकही साडी पसंत न पडल्याने नवऱ्यावरच राग राग करणाऱ्या बाई सारखे ते खट्टू मनाने रागवून दुकानातून बाहेर पडणार इतक्यात, तो एजन्ट खास आवाजात म्हणाला:
-साहेब एक नवीन आफ्रिकन टूर आहे पण त्याला फारसे कोणी जात नाही, मात्र ती तुमच्या बजेट मध्ये जमू शकेल.
बोकडेंच्या दणदणीत प्रवास वर्णन लिहिण्याच्या विझलेल्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या.
-कुठल्या देशाची
-अडुम्बा
-आं ?? अडुम्बा?? या नावाचा देश आहे??
-हो साहेब नवीन देश आहे म्हणे. नुकतेच स्वातंत्र मिळाले आहे त्या मुळे फारसे कुणाला माहीत नाही. स्कीम चालू आहे साहेब बघा.
-त्यात काय डोंबल बघायचंय? फॉरेनला असले म्हणजे झाले.
-होय साहेब फॉरेनच आहे, पण साहेब ती फार ऍडव्हेंचरस टूर आहे लेच्या-पेंच्या साठी नाही.
आता मात्र बोकडे मास्तरचा इगो दुखावला गेला ते रागात म्हणाले.
-अहो माझ्या देहयष्टीकडे पाहून असे बोलू नका मी फार ऍडव्हेंचरस आहे.
बोकडेना ते एकदा भर पावसात गल्लीच्या कोपऱ्यावर मागे लागलेल्या कुत्र्यास दगड मारून हाकलले होते असे त्यांना म्हणायचे होते.
-सॉरी साहेब. मग करू बुक?
-बिनधास्त करा हो!
पाहता पाहता साक्षात बोकडे मास्तर परदेशात जात आहेत ही बातमी अख्ख्या शाळेत आणि गावात कचऱ्या सारखी पसरली. जो तो बोकडेना कुठे जाणार कुठे जाणार असे विचारू लागला. बोकडे मास्तर सुध्दा आल्यावर सांगतोच की असे म्हणून सस्पेन्स वाढवू लागले. चित्रकलेच्या देखण्या नयनबाई सुध्दा कधी नव्हेतो बोकडेंना "हैप्पी जर्नी" म्हणाल्या मुळे बोकडेंना त्या दिवशी रात्री स्वप्न पडले त्यात त्यांना दिसले की:
विमानतळावर आल्या आल्या नयन बाई त्यांना गच्चं मिठी मारून ढसा-ढसा रडत बोकडे सर मी तुम्हाला फार मिस केले, माझ्याशी लग्न कराल काय असे विचारत होत्या आणि बोकडें मात्र त्यांना खस्सकन दूर लोटून माफ करा नयन ताई माझे लग्न परदेश प्रवासात भेटलेल्या या तरुणीशी ठरले आहे असे एका सोनेरी केसाच्या आणि निळ्या डोळ्याच्या टंच तरुणी कडे बोट दाखवून सांगत आहेत. (स्वप्न समाप्त)

शाळेमध्ये बोकडे सरांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. अनेकांनी बोकडे सरांना उद्देशून भावपूर्ण भाषणे करून आपली बोलण्याची खुमखुमी पूर्ण केली. मुख्याध्यापक दाबे आपल्या भाषणात चुकून "मी आपल्या गावचे आधुनिक कोलंबस श्री बोकडे यांना भावपूर्ण निरोप देतो" ऐवजी "भावपूर्ण श्रद्धांजली देतो" असे म्हणाल्याने एकच हशा उडाला.
कवियत्री कुसूमवल्ली बाईंनी बोकडे वर केलेल्या कविताने सुध्दा बहार निर्माण केली त्या म्हणाल्या:
दूर देशी निघाले बोकडे
पडेल पाऊल का वाकडे?
उदास झाली सर्व बाकडे
ज्या वर बसती ही माकडे

बोकडे सरांनी सुध्दा खूप बहारदार भाषण ठोकले. आपल्या भाषणात त्यांनी ते जरी परदेशात दहा दिवसासाठी निघाले असले तरी ते प्रवासात अजिबात कुणाला विसरणार नसल्याचे वारंवार नयनबाई कडे बघत म्हणाले. शेवटी त्यांचे भाषण खूपच लांबल्याने सर्वांनी कंटाळून शिट्या टाळ्या वाजवून त्यांचे भाषण बंद पाडले आणि बोकडे एकदाचे खाली बसले.
बुकिंग एजंटने सांगितल्या प्रमाणे मुंबई विमानतळावर अगदी वेळेवर येऊन बोकडे आपल्या ग्रुप लीडरला शोधू लागले. तो आपल्या नावाची पाटी घेऊन उभा असल्याने आपल्याला काहीच अडचण येणार नाही असे बुकिंग एजेंट म्हणाला होता. बोकडे आपल्या नावाची पाटी शोधू लागले तेव्हा त्यांना आपले नाव कुठेच दिसेना मात्र एका पाटीवर "श्री बोकड" असे नाव होते. ती पाटी धरलेल्या एका ठार वेडा दिसणाऱ्या ढेरपोट्या माणसाला बोकडेनी जाऊन विचारपूस केली तर काय आश्चर्य तोच माणूस चक्क ग्रुप लीडर होता.
"वेलकम्म मिष्टर बोकड टू अडुम्बा ट्रिप."
"थांकु, मेरा नेम बोकडे, बी ओ किडे, मीन्स बोकडे .... नो बोकड प्राणी."
बोकडेंचा अर्थातच जरा इंग्रजीचा प्रॉब्लेम होता तरी ते तक्रारीच्या सुरात म्हणाले.
"नो प्रॉब्लेम सार ... मे वळ्खलाच होता ... ते तुमच्या गावचं एजन्ट म्हणालं एक काळंबींद्र सुक्कड माणूस आहे."
आपले वर्णन ऐकून बोकडेंनी विषय बदललेला बरे असा विचार करून विचारले.
"बाकीचे लोक कुठे आहेत?"
"नो लोक, वनली यू यांड मी .... बाकी लोक भित्रे हो .. तुमच्या सारखे शूर लोक कमी असते बघा जगात"
बोकडे मास्तर आपली बॅग धरून टूर गाईडच्या मागे तुरु तुरु निघाले. चालता चालता अती बडबड्या गाईडने त्याचे नाव डॉकटर जे टी मल्लम असल्याचे सांगितले. ही टुरिंग कम्पनी त्याच्या भावजींची असून डॉकटर जे टी मल्लमने झूऑलॉजी मध्ये पी एच डी केले होते मात्र त्या नंतर जीवनातल्या एका अयशस्वी प्रेम प्रकरणा मुळे त्याला मेंटल प्रॉब्लेम झाला आणि तो नुकताच दहा वर्षांनी वेड्यांच्या इस्पितळातून बरा होऊन बाहेर आला. बाहेर आल्यावर त्याच्या भावजीने म्हणे त्याला या लाईनवर घेतले होते. आपल्या प्रेमप्रकरणा बद्दल गहिवरून बोलताना तो म्हणाला की त्याचे मालतीवर खूप खूप प्रेम होते आणि त्याला तिच्याशीच लग्न करायचे होते. मात्र त्याच्या घरच्यांचा या लग्नाला कडाडून विरोध होता कारण मालती हे त्यांच्या म्हशीचे नाव होते. असो.
पहिल्यांदाच विमान प्रवास करीत असले तरी मालवाहू विमान आणि पॅसेंजर विमान यातला फरक न कळण्या इतके दुधखुळे बोकडे मास्तर मुळीच नव्हते. त्यांनी आपण मालवाहू विमानातून कसे काय प्रवास करत आहोत असे विचारताच डॉक्टर साहेब म्हणाले की विसरू नका ही ऍडव्हेंचर ट्रिप आहे. मालवाहू विमानातून जाण्याचा हा एक आगळा अनुभव आमची कम्पनी आमच्या सन्माननीय प्रवाशांना देते. मग अर्धातास तिथल्या आडदांड मुकादमानी बोकडे आणि डॉकटर कडून डब्बे डुब्बे, जनावरे, जड जड कार्टन्स वगैरे खुश्शाल विमानात चढवून घेतली. च्या मारी प्रवाशा कडून मजुरा सारखे काम करून घेण्याची ही आगळीच ऍडव्हेंचर ट्रिप दिसतीये असा बोकडेंनी मनात चरफडत विचार केला. बर तो डॉकटर चांगलाच पहिलवान असल्याने त्याने सगळे सामान अगदी मजेत विमानात चढवले. दमून तोंडाला फेस आलेल्या बोकडेना मात्र ..... शिंगरू मेले हेलपाट्यानी ही म्हण आठवली. मरणप्राय थकून ते विमानात सामानाच्या मध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सीट वर बसले आणि पट्टा बांधताच एकदाचे ते मालवाहू विमान आकाशात झेपावले.
मालवाहू विमान असल्याने प्रवास वर्णनात असतात तशा हवाई सुंदऱ्या आणि जेवण वगैरेचा काही प्रश्नच नव्हता. बरेच झाले मास्तरांनी सोबत शिळ्या पोळीचे कुटके आणले होते काम करून दमल्याने बोकडे आणि डॉकटरनी तेच खाऊन मस्त तण्णावून दिली. अधून मधून नाही म्हंटले तरी आजू बाजूला पिंजऱ्यात बांधलेल्या गुरांच्या च्या आवाजाने मास्तरांना जाग येत होती एवढाच काय तो त्रास पण आता ऍडव्हेंचर ट्रिप म्हंटल्यावर चालायचंच.

जर मी तुम्हाला सांगितले की अडुम्बा ची राजधानी टाकाटूला मास्तर आणि डॉक्टर पॅराशूटने उतरले तर वाईट हवामान किंवा क्षेपणास्त्राने हल्ला होऊन विमान पडलेकी काय अशी तुमच्या मनात रास्त शंका येणे स्वाभाविक आहे. मात्र काळजीचे अजिबात कारण नाही हवामान उत्तम होते त्याचे काय झाले की चार दिवसा पूर्वी झालेल्या अल्पवृष्टीने नुकतीच तयार केलेली धावपट्टी वाहून गेली (जगात जिकडे तिकडे भ्रष्टाचार हो) आणि विमानाला पुढे जायचे असल्याने ट्रॅफिक कंट्रोल आणि इमिग्रेशनवाले म्हणाले तीनच प्रवाशी आहेत त्यांना द्या पॅराशूटने सोडून आम्ही घेतो पुढचे बघून. होय तीनच. मला माहित आहे चतुर वाचकांना माझ्या नग गणतीत चूक झाली असे वाटणे साहजिक आहे. ती तिसरी व्यक्ती अथवा प्राणी म्हणजे अडुम्बाच्या राजाला भारता कडून मिळालेली एक जिवंत भेट, एक मदमस्त धिप्पाड सांड. मग काय विचारायचे मास्तर-डॉक्टर जोडगोळीला इतर विमान कर्मचाऱ्यांनी त्या धिप्पाड सांडाच्या पाठीवर बसवून भल्यामोठ्या पॅराशूटच्या साहाय्याने एअरपोर्टवरच्या आकाशातून खाली मस्तपैकी ढकलून दिले.
एव्हड्या उंचावरून जमिनीकडे सांडाच्या पाठीवर पुढे शिंगाला धरून बसलेले डॉकटर आणि त्यांच्या ढेरीस घाबरट प्रेयसीसम मागून घट्ट मिठी मारून भीतीने बोंबलणारे मास्तर हे दृश्य अडुम्बाच्या मावळणाऱ्या सूर्यबिंबाच्या पार्श्वभूमीवर मोठे विलोभनीय दिसत होते. त्यांच्या त्या हंबरड्यानी आणि हालचालींनी डॉक्टरला पोटाला अशक्य गुदगुल्या झाल्या आणि सांडावर बसल्याने मालतीची आठवण येऊन डॉक्टरांना भयंकर हसू आले.
काही काळाने जमिनीवर पोहोचताच जगलो म्हणून की काय, हर्ष वायू होऊन तो सांड आपल्या स्वारांसह जो बेछूट उधळला की ज्याचे नाव ते. पंधरा मिनिटांनी येथेच्छ धावपळ केल्यावर तो एकदाचा अडुम्बाच्या सुरक्षा सैनिकांच्या काबूत आला आणि पांढऱ्या फटक पडलेल्या डॉकटर आणि मास्तर जोडगोळीला खाली उतरविण्यात आले.
मास्तरांची बॅग जरी घाईने उतरल्या मुळे पुढे एव्हाना वेगळ्याच देशाच्या हवाईहद्दीत गेली असली तरी नशिबाने खिशात पासपोर्ट होता त्यामुळे इमिग्रेशन नामक प्रकार हवाई अड्डा वजा जंगलातच एका झाडा खाली लाकडी टेबल खुर्च्या मांडून बसलेल्या दोन अधिकाऱ्यांनी त्वरित पार पडला आणि तारेच्या एका कुंपणातून बाहेर पडताच एका उत्कृष्ट गाईडच्या आविर्भावात बोकडेंना डॉकटर विराट हास्य करीत म्हणाला:
"वेलकम टू अडुम्बा मिस्टर बोकड!"
(क्रमशः)
पुढील भाग

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धमाल.
पुढच्या भागाची वाट बघतोय.

Biggrin मस्त सुरुवात.

मलाही केव्हाचा अडुम्बा बघायचा होता. आता बोकडे मास्तरांच्या बरोबर मस्त सफर होणार.

बोकडेंनी प्रवासात वाचण्यासाठी काही पुस्तके नेली होती का? नेली असावीत पण बरेच थकल्याने ती बाहेर काढलीच नसावीत.
शशी थरूर( हे पण केरलावालेच) एकदा म्हणाले होते की आइ डोन्ट ट्रावल कॅटलक्लास. तेव्हा इतर भारतीय विमानप्रवाशांनी आक्षेप घेतलेला. क्याटलांनी आपल्याबरोबर प्रवास केला तर काय बिघडले? तसे आपण सर्वच जण काही गाड्स ओन कन्ट्रीमधून येत नाही. दगडाधोंड्याच्या देशातूनही येतो.
लुकींग फारवर्ड टु ~~~ आणि कॅनॅाट वेट टु इक्सपिअरिअन्स ग्रेट अडवेंचर्स? अशी ठराविक ट्रावल अँड टुअर कंपन्यांच्या जाहिरातींतील वाक्ये ( इंग्रजीतच लिहितात मेले) गुदगुल्या करून राहिली आहेत.
लेखन झकासच परंतू एका महान धागालेखकास इन्फिरिअरॅारटि काम्प्लेक्स देण्याच्या तोडीचे आहे

@Srd : बोकडेंनी प्रवासात वाचण्यासाठी काही पुस्तके नेली होती का?>>छे हो, बोकडेना खिडकी बाहेर पाहायची इच्छा होती.
लेखन झकासच परंतू एका महान धागालेखकास इन्फिरिअरॅारटि काम्प्लेक्स देण्याच्या तोडीचे आहे>>अहो इथे बोकडेंचे प्राण कंठाशी आले आहेत आणि तुम्ही इन्फिरिअरॅारटि काम्प्लेक्स (म्हणजे नेमके काय? इथे आधीच इंग्रजीचा प्रॉब्लम आहे ) बद्दल बोलताय? Happy

अर्रर्र
>>परंतू एका महान धागालेखकास ~~>>
मायबोलीवरच्या हा शब्द राहिला हो.

अगदी आवर्जून वाचावं असे लेखन असतं तुमचं.
मस्तं...मस्तं चाललीय हो अडुम्बाची सफर. माझ्या बकेट लिस्ट मधे टाकलंय अडुम्बा. कधी योग येतोय जाण्याचा देव जाणे Lol

>>दूर देशी निघाले बोकडे
पडेल पाऊल का वाकडे?
उदास झाली सर्व बाकडे
ज्या वर बसती ही माकडे>> Lol
फर्स्ट हाफ जास्त आवडला.

मस्त सुरुवात. पुढील भागाच्या प्रतिक्षेत

दूर देशी निघाले बोकडे
पडेल पाऊल का वाकडे?
उदास झाली सर्व बाकडे
ज्या वर बसती ही माकडे >> Rofl Rofl Rofl

यांना कुमारपर्वता केमन्नागुड्डी आणि श्रिंगेरी मधील कुठल्या आडुम्बेनामक तळ्यावर सोडले की काय प्यारेशुटने?

Lol
मलाही केव्हाचा अडुम्बा बघायचा होता. << मामी सांडावर बसुन पॅराशुट लावुन उडी मारायची प्रॅक्टीस केल्याशिवाय जाउ नकोस Lol