तिची वारी

Submitted by Vrushali Dehadray on 28 April, 2018 - 02:17

तिची वारी
पहाट फटफटायच्या आधीच धुरपानं तानीला ठवलं “ताने, उठ लवकर. वारीत जायचयं.” तानी अजुनच जास्त गोधडीत गुरफटली. कालच्या भुरभुर पावसानं चांगलाच गारवा आला होता. फाटक्या गोधडीतून अंग बाहेर निघत नव्हतं.

“ताने” आईचा आवाज ऐकून तिचा दणका पाठीत पडायच्या आत तानी घाईनं उठली. बाहेर अजून उजेडही दिसत नव्हता. तानीनं कोपऱ्यातल्या जर्मनच्या टोपातलं पाणी घेऊन चूळ भरली. तशीच बाहेर आडोशाला जाऊन आली. बांबूला प्लॅस्टिक लावून बांधलेल्या झोपडीच्या बाहेर धुरपानं तीन दगडांची चूल पेटवली. तानी परत येईस्तोवर तिनं चहासाठी आधण ठेवलं. कालचीच वापरेली चहापत्ती तिने पुन्हा त्या आधणात टाकली. प्लॅस्टीकच्या पिशवीत ठेवलेली साखरेची पुडी पाठीला बांधायच्या झोळीत ठेवलेली होती. त्यातली चिमुटभर साखर त्यात टाकली. कागदाच्या पुडीत गुंडाळलेला शिळा पाव काढला. चहा उकळायला लागल्यावर पदरानं पातेलं खाली काढलं. पदराच्या टोकाने दोन जर्मनच्या ताटल्यांमध्ये तो चहा गाळला. एक ताटली तानीच्या पुढे सारली. एक आपल्या पुढे घेतली. उरलेला चहा टवके गेलेल्या कपात ओतून ठेवला, म्हातारीसाठी. तोवर गोणपाटावर टाकलेलं पोरं किरकिरायला लागलं होतं. कोणीही न सांगता तानी उठली, झोपडीत गेली. ते पोर उचललं आणि आईच्या हातात दिलं. तिने ते तसाच छातीला लावलं आणि एकीकडे चवी चवीने चहा पीत राहिली.

“अजून पाव दे की ग. लई भुका लागल्यात.”
“गुमान हाये त्यो खा. एवढाच हाय. वारीला गेल्यावर लई खायला मिळंल. बिस्किटा, लाडू, भाजीभाकर. चल, आटीप लवकर. म्या हे एवढ आटीपते. तवर तू सामान गोळा कर.”

पोटभर खायला मिळण्याच्या आशेनं तानी पटकन झिपऱ्या सावरत उठली. आईच्या आणि आपल्या ताटल्या बादलीतल्या पाण्यात बुचकळून काढल्या.

“ह्याला जरा घे.” छातीपासून बारक्याला बाजुला करत धुरपा म्हणाली. तोंडातलं बोंड सुटल्यावर ते पोर पुन्हा किरकिर करायला लागलं. तानीनं त्याला काखोटीला मारलं आणि तोंडाने झ्या झ्या करत त्याला खेळवू लागली. ना तिच्या डोळ्यातली झोप सरली होती ना पोटातली भूक. तवर उजाडायला लागलं होतं. धुरपानं झोपड्यात आवराआवर करायला सुरुवात केली. आवरायला फारसं होतच काय म्हणा. एक प्लॅस्टिकची बादली, दोन तीन पातेली, ताटल्या, फाटकी वास येणारी कांबरूणं आणि अंगावर घालायची कोणी ना कोणी दिलेली लक्तरं. तेच जरा निटनेटकं केलं. त्यातल्या त्यात जरा धडकं न फाटलेलं लुगडं आणि पोलकं घातलं. तोंडावरनं पाण्याचा हात फिरवला. तेलपाणी नसणाऱ्या केसांचा बुचडा बांधला आणि कसरतीच्या खेळाचं सामान एकत्र करायला लागली. तिने ते काम तानीला सांगीतलं होतं खरं, पण तानीच्या कडेवर पोराला शांत बसल्याचे बघून ती स्वत:च सामान गोळा करू लागली. जमिनीवर ठोकण्याचे चार बांबू, दोर, ढोलकी, दोरावर चालताना आडवी धरायची काठी, रिंग, पाण्याची बाटली, पोराला झोपवायला एक फाटकी गोधडी, थोडी कापडं. म्हातारीकरता दोन पाव बाजूला काढून ठेवले. म्हातारीच्या हातात चुरगळलेल्या पन्नासच्या दोन नोटा कोंबून ती म्हणाली, “म्हातारे, भूका लागल्या की रस्सा मागवून पावाबरोबर खा. मंदीच्या गण्याला सांग समोरच्या हाटीलातून रस्सापाव आणून द्याया. जीवाला बरं आसलं तर देवळाच्या म्होर भीक मागाया जा जनीच्या सासूसंग. आज पंदरादिशी आमी वापस येतो. तवर जीवाला संबाळ.” डोकं कराकरा खाजवत म्हातारीने मुंडी हलवली.

सामान एकत्र बांधून धुरपी निघाली. ‘चल ताने’ अशी हाक दिल्यावर तानीने फाटक्या स्लीपर पायात अडकवल्या आणि ती धुरपीच्या मागं उरलेलं सामान घेऊन पळू लागली.

रस्ता माणसांनी फुलून गेला होता. पंढरीच्या विठोबाच्या भेटीसाठी निघालेल्या ज्ञानियांच्या राजाला सोबत करण्यासाठी अवघ्या राज्यातून वैष्णव गोळा झाले होते. विठ्ठलाच्या भेटीची आस लागलेल्या हजारो वारकऱ्यांबरोबरच गावोगावहून हौशे, नवशे आणि गवशेही गोळा झाले होते. त्यांच्याबरोबरच धुरपीसारखे हातातोंडाची मिळवणी करण्यासाठी आशेने जमलेलेले भटके कलाकारही होते. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे करमणुकीची नवी दालने खुली झाली. या नव्या तंत्रज्ञानाच्या झंजावातात पारंपरिक कला आणि त्या सादर करणारे कलाकार पालापाचोळ्यासारखे उडून जात होते. नव्या करमणुकीच्या प्रकारांनी त्यांची भाकरी पळवली. मग धुरपीसारख्या कोल्हाट्यांना थोडाफार आधार राहिला तो वारीसारख्या गोष्टींचा. तंत्रज्ञानाने जगणं सोपं केलं म्हणे. पण या सोप्या जगण्याचा कोरभर तुकडाही धुरपीच्या फाटक्या पदरात आला नाही. उलट पदराला पडलेली भोकं आणखी वाढत राहिली. ती बुजवण्याचा क्षीण प्रयत्न ती वारीच्या मदतीने करत होती. तिला भरवसा होता तो खेड्यापाड्यांमधनं आलेल्या वारकऱ्यावर, शहरातल्या पांढरपेशांवर नाही. कारण त्यांच्याकडे तिची कला बघण्याकरता वेळच नव्हता. रस्त्यावर उभे राहून कोल्हाट्याचे खेळ बघणे हे त्या नवश्रीमंत वर्गाच्या तथाकथित एटिकेट्समध्ये कुठेच बसत नव्हते. म्हणून ती तंगडतोड करत वारीच्या दिशेने निघाली होती. तिला खात्री होती की खेड्यापाड्यातून आलेले हे वैष्णवजन पंढरपूरला पोचेपर्यंत तिची पुढच्या काही महिन्यांची सोय नक्की करतील.

एका खांद्यावर पोर, दुसऱ्या खांद्यावर सामानाचे गाठोडे, गळ्यात ढोलकं आणि डोक्यावर खेळाचे सामान घेउन धुरपी वारीच्या दिशेने भराभर चालू लागली. तिच्यामागे एक छोटं गाठोडं गळ्यात अडकवून तानी पळू लागली. धुरपीच्या वेगाशी जमवून घेताना तिची दमछाक होत होती. वारकऱ्यांचे घोळके दिसायला लागल्यावर धुरपी थांबली. तिनं पदरानं घाम पुसला.

“ताने हितच ख्योळ मांडूया. सामान काढ.” माय थांबल्यामुळे तानीला हायसं वाटलं. तिनं गाठोडं खाली ठेवलं. धुरपीनं खाली धडुतं घालून पोराला त्यावर टाकलं. खेळ करण्याकरता तिने मध्ये दोर बांधलेले बांबू जमिनीत रोवले. हलवून ते पक्के आहेत ना ते पाहिलं. “ताने, पहिलं रिंगतलं ख्योळ सुरु कर. मोठा घोळका आला की रश्शीवर चढ.” धुरपीनं गळ्यात ढोलकं अडकवून वाजवायला सुरुवात केली. त्याच्या तालावर तानी रिंगमधून वेगळ्या प्रकारे अंग लववून करामती दाखवू लागली. ते बघायला थोडीफार गर्दी जमायला सुरुवात झाली होती. मोठा घोळका यायला लागल्यावर मायने तानीला दोरावर चढायला सांगितलं. तानी खारीगत सरसर दोरावर चढली. वर गेल्यावर धुरपीन तिच्या हातात बांबू दिला. ढोलकीच्या तालावर पायात दोर पकडून, हातात बांबूच्या आधाराने तोल सावरत ती दोरावर चालू लागली. दोराच्या मध्यावर आल्यावर तिनं दोर झुलवायला सुरुवात केली. आता भोवतालची गर्दी बरीच वाढली. धुरपी एकीकडे ढोलकं वाजवत बघ्यांना खेळ बघायला थांबा म्हणून विनवत होती.
तानी हुषारीनं दोरावर झुलत होती. लक्ष समोर होतं आणि कान ढोलकीच्या तालाकडं. तेवढ्यात त्या गर्दीत दोन शाळकरी मुलं घुसली. एक मुलगा आणि एक मुलगी. तानीच्याच वयाची. अंगावर शाळेचे गणवेश, पाठीवर दप्तरं, हातात डब्याची पिशवी. ढोलकीचा आवाज ऐकून ती मुलं गर्दीत घुसलेली दिसत होती. मोठ्या आश्चर्याने ते दोरावर चालणाऱ्या तानीकडे बघत होते. त्यांनी ढोलक्याच्या ठेक्यावर टाळ्या वाजवायला सुरुवात केली. त्या टाळ्यांचा आवाज ऐकून तानीचं लक्ष त्यांच्याकडं गेलं. त्यांना बघून तानीचं खेळातंन लक्ष उडालं.

गेले कित्येक दिवस तानी धुरपीच्या मागं लागली होती की मला शाळेत जायचयं. झोपडीच्या पुढून शाळेत जाणारी गणवेशातली मुलं ती नेहमी बघायची. त्यांच्यासारखं आपणही छान कपडे घालून, ऐटीत दप्तर पाठीला लावून शाळेत जावं असं तिला वाटायचं. गुजामावशीचा तुक्या काही दिवस शाळेत जात होता. पण दुष्काळामुळं गाव सुटलं आणि शाळाही सुटली. पण त्या सुटलेल्या शाळेच्या आठवणी तुक्याला अजून सतवायाच्या. मग तो शेजारपाजारच्या पोरांना त्याच्या शाळेच्या कथा सांगत बसे. तोडकेमोडके पाढे, कविता, एबीसीडी आणि असंच थातूर मातूर. शाळेच एक जुनं पुस्तकही त्याच्या खजिन्यात होतं. शाळेचं कधी तोंडही न बघितलेली ती फिरस्ती पोरं विस्मयानं तुकयाच्या शाळेच्या गोष्टी ऐकायची. या गोष्टींमुळे तानी शाळेत जाण्याची, पुस्तक वाचण्याची स्वप्न बघू लागली. शाळेच्या गोष्टींचा एक भाग होता, मधल्या सुट्टीत मिळणारा पोटभर भात. तुक्या मोठ्या चवीनं त्या भाताचे वर्णने ऐकवायचा आणि कायमच पोटात भूक घेउन फिरणारी मुलं लाळ गाळत त्या भाताच्या गोष्टी ऐकायची. बाकी कशासाठी नाही तरी पोटभर मिळणाऱ्या भातासाठी तरी शाळेत जायलाच हवं असं तानीला वाटायचं.

खेळ बघायला आलेली मुलं पाहिल्यावर तानीच्या मनात पुन्हा शाळेचे विचार घोळायला लागले. त्या नादात तिचा दोरावरून कधी तोल गेला ते तिला कळलंच नाही.

“पोर पडली, पोर पडली.” असा एकच कालवा उठला.
“च्या मायला जमत नव्हतं तर कशाला उगाच पोरीला दोरावर चढवायाचं!”
“छ्या, उगाच वेळ गेला. आतापतोर बराच पुढं गेलो असतो की.”
“माय, पोरीला लईच लागलया. घे बाई, पानी पाज पोरीला. ही भाकर खाऊ घाल.” कनवाळू आयाबाया तानीला किती लागलंय ते बघायला पुढे आल्या. सुदैवाने खाली गवत असल्याने हाड वगैरे मोडलं नव्हतं. पण मुका मार बराच लागला होता. तानी व्हीवळत रडत होती.

“कारटे, ध्यान कुठं व्हतं तुजं? आता तुमच्या पोटाला काय घालू, दगडं ?” धुरपाने करवादून तानीला दोन धपाटे घातले नी ती सुन्न होऊन बसून राहिली. गर्दी केव्हाच पांगली होती. आणि तानीच्या डोळ्यातून वाहणाऱ्या पाण्याबरोबर वाहून चालली होती तिची शाळेत जाण्याची स्वप्न.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर वर्णन केलंय. तानी जशीच्या तशी डोळ्यासमोर उभी राहीली..
आणि
शेवटची लाईन मनाला भिडली...
पुलेशु ! Happy

शाळेत असताना मराठीत 'कसरत' नावाचा धडा होता.
असाच आशय होता त्याचा. तेव्हाही वाईट वाटायचं ते वाचून आणि आताही मन सुन्न झालं.
चांगलं लिखाण आहे.