रिक्षा, रिक्षाचालक आणि मला आलेले वाईट अनुभव

Submitted by VB on 25 February, 2018 - 13:56

रिक्षा चालकांची मुजोरी, उद्दामपणा न अनुभवलेला अपवादाने सुद्धा सापडेल कि नाही माहित नाही.

तर बहुतांशी नोकरदारांप्रमाणे मीही रोज ट्रेन आणि रिक्षाने प्रवास करते , अन इतरांसारखी चांगलीच रुळलीसुद्धा आहे. पण तरी कधी कधी एखाद्या वेळी येतो वाईट अनुभव. असाच एक वाईट अनुभव गेल्या आठवड्यात आला. त्याबरोबर एक असाच खूप वर्षांपूर्वी आलेला आणि आता विस्मरणात गेलेला अनुभवही आठवला.

तर झाले काय , जवळपास दहा वर्षांपूर्वी, नवीन नवीन नोकरीला लागले होते. रोजची यायची, जायची वेळ ठरली होती पण एक दिवस ऊशीर झाला, ऊशीर म्हणजे खूप जास्तच, ऑफीसातच दहा वाजले रात्रीचे. खूप टेन्शन आले कारण त्याकाळी रात्री नऊ साडेनऊ नंतर बर्यापैकी वर्दळ शांत झालेली असायची.. म्हणून सरळ रिक्षा करून रेल्वे स्टेशनला आली अन तिथून ट्रेन ने ठाण्याला. यात अकरा वाजले होते. इतका ऊशीर झाल्यामुळे मी बसच्या ऐवजी रिक्षाने घरी जायचे ठरवले अन लगेच एक रिक्षासुद्धा मिळाली, त्यामुळे जरा बरे वाटले. पण हे समाधान क्षणिक निघाले. स्टेशन सोडल्यावर रिक्षा रोजचा मार्ग सोडुन दुसऱ्या भलत्याच रस्त्याला वळली. मी मनातून घाबरली पण वरवर तसे न दाखविता रिक्षावाल्याला जाब विचारून रिक्षा मेन रोड वर घ्यायला सांगितले तर त्याने त्यावर मलाच उद्धटपणे ऐकविले कि हा शॉर्टकट आहे अन तुम्हाला बरोबर सोडेन मी. मला माहित होते की हा शॉर्टकट नाहीये पण घाबरले होते त्यात माझ्याकडे तेव्हा मोबाइल हि नव्हता काय करावे काही सुचत नव्हते. थोड्यावेळाने रिक्षा एका बार समोर थांबली अन एक बाई रिक्षात येऊन बसली. मी अजूनच घाबरले पण शांत बसून होते काहीही न सुचल्यामुळे. मध्ये अजून थोडावेळ गेला पण तो थोडासा वेळ अगदी एका युगासारखा वाटत होता, त्यात ती बाई अन रिक्षावाला दोघांचे अगदी घाणेरड्या भाषेत बोलणे चालू होते, ते तर अगदी ऐकवत हि नव्हते. शेवटी रिक्षा त्या छोट्या गल्ल्या सोडून ओळखीच्या रस्त्यावर आली अन सोबत मला थोडा धीरही. रिक्षावाल्याला म्हटले मला इथेच उतरायचे आहे आधी तो नाही बोलला पण थांबला. मी जिथे उतरली होते तो रस्ताही सामसून होता, तशीच सरळ चालायला लागले. जवळपास दहा मिनिटे चालल्यावर एक बस दिसली जी माझ्या घरापर्यंत जाणारी होती, हात दाखविला अन थांबवली , कशीबशी पोहचली एकदाची घरी.
त्या दिवसापासून ठरविले होते की कधीही रिक्षा करायची नाही किमान एकटी असताना तर नाहीच नाही.
मधली खूप वर्षे ठरविल्याप्रमाणे टाळत आली रिक्षा, पण हळू हळू दुसरा पर्याय उपलब्ध नसल्याने परत एकदा रिक्षा प्रवास सुरु झाला.

गेल्या आठवड्यात सुद्धा एक दिवस असाच ऊशीर झाला ऑफिसमध्ये. साडेनऊ होत आले होते. हल्ली इतका ऊशीर होणार असेल तर सरळ कॅब बुक करते पण त्यादिवशी गडबडीत राहून गेले. म्हटले आधीच ऊशीर झालाय त्यात आता कॅब बुक करुन वाट बघत बसण्यापेक्षा सरळ जावे रिक्षाने स्टेशन पर्यंत. अन निघाली लगेच, ऑफिस समोर येताच लगेच एक रिक्षाही मिळाली . खरेतर लगेच रिक्षा मिळाली म्हणून मी खुष झाले पण तो आंनद काही फार काळ टिकला नाही. रिक्षात बसल्या बसल्या आधी घरी फोन करून मी निघाल्याचे आणि ऑफिसमध्ये फ्रेंडला मला रिक्षा मिळाल्याचे कळविले. अन मग इतका वेळ जे लक्षात आले नव्हते ते जाणविले कि रिक्षा वाला प्यायलाय अन आरश्यातून सारखा मागे बघतोय. एकदोनदा तर सरळ मागे वळून बघत होता.
आताही इथे मधेच उतरणे शक्य नव्हते कारण दुसरी रिक्षा मिळेल याची खात्री नाही अन तो रस्ताही इतका काही सेफ नाही म्हणून ठरविले कि जावे पुढे. पण मग लगेच माझ्या मित्राला मेसेज करून त्याला थोडा अंदाज दिला आणि फोन केला. त्यानंतर स्टेशन येई पर्यंत आम्ही ऊगाचच फोन वर गप्पा मारत होतो. त्यामुळे किमान मला थोडे बरे वाटले आणि, भीती, जी आधीच्या अनुभवामुळे मनात होती ती ही जरा कमी झाली. पूर्णवेळ मनात स्वतःला बजावत होते की बी अलर्ट अँड पोजिटीव्ह. शेवटी आले स्टेशन अन मी उतरले एकदाची.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मग मी म्हटलं फोकलिच्या तु इकडेच जा, माझी मी चालत जाईन 'तिकडे' >>> Lol
पुणे एअरपोर्ट ते रेल्वे स्टेशन ३५० घेतो रिक्षावाला , भाडं योग्य आहे का त्या अंतरासाठी ?

मग मी म्हटलं फोकलिच्या तु इकडेच जा, माझी मी चालत जाईन 'तिकडे' >>> Lol
पुणे एअरपोर्ट ते रेल्वे स्टेशन ३५० घेतो रिक्षावाला , भाडं योग्य आहे का त्या अंतरासाठी ?

जास्त आहे. पण एअरपोर्ट शहराच्या हद्दीच्या बाहेर आहे त्यामुळे आणखी काय काय सरचार्ज असेल.

ओला, उबर वगैरे मुळे बराच फरक पडला असेल असे वाटले होते. आता रिक्षा वापरणारे लोक कमी झाले असणार नक्कीच. किमान स्मार्टफोन असलेल्यांपैकी तरी. मी भारतात आलो होतो तेव्हा बरीचशी उबरच वापरली, अगदी एक-दोनदाच रिक्षा केली.

पण भाडी नाकारणे वगैरे कमी झालेले दिसत नाही - वरच्या प्रतिक्रियांवरून.

पुणे एअरपोर्टवरची प्रीपेड रिक्षा सेवा चांगली आहे. शिवाय पुन्हा शहरातून एअरपोर्टवर यायचं असेल तेव्हा त्यांनी दिलेल्या नंबरवर फोन केला की ते पिक अप करायलाही येतात.

पुणे एअरपोर्ट ते रेल्वे स्टेशन ३५० घेतो रिक्षावाला , भाडं योग्य आहे का त्या अंतरासाठी ?
पुणे एअरपोर्ट ते चिंचवड २७०- २८० रुपये होतात ओला रिक्षाने, ३६५ रुपये प्री-पेड रिक्षाने. शिवाजिनगर ला ओलाने २०० तर प्रीपेड २५० होतात. पुण्याला ह्या दोन्हीच्या मध्ये काहीतरी चार्ज होईल.
ओला कॅब मध्ये डिमांड कमी असेल तर रिक्षा पेक्षा कमी पैसे लागतिल. हाय डिमांड मध्ये (रात्रीची वेळ भरपुर पाउस ) कॅब ला १००० रुपये पण लागतिल. त्यावेळी ओला रिक्षा किंवा प्रीपेड.

गेली २ वर्षे ओला शेअर आठवड्यातून २ वेळा करते.त्यांच्याशी भरपूर बडबड करते.
यातून असं कळलं की आज जे ओला आपल्याला(गिर्‍हाईकाला) फायद्याचं आहे ते तसं बनायला कॅब चालकांना प्रचंड अटी आहेत.
म्हणजे योग्य भाडी मिळाली, पिक अवर ला ६ ट्रिप झाल्या, १२-१३ तास गाडी नीट चालवली, योग्य जागी उभी केली(जिथे लोक कॅब जास्त करतात अश्या जागी) तर महिन्याला ६० ते ६५ हजार कमाई होऊ शकते(स्वतः गाडी चालवल्यास, अन्यथा चालकाचा कट आणि मालकाचा शेअर असे २ भाग.) पूर्वी जेव्हा ओला ग्राहकाला महाग पडायची,सर्ज चार्जेस जास्त होते,शेअर अस्तित्वात नव्हते तेव्हा हीच कमाई चालक दिवसाला साडे आठ तास ड्राईव्ह करुन करायचे.थोडक्यात जी सिस्टम आपल्याला आता परवडतेय ती चालकांना जाचक वाटली तर चालक ओला सोडून गाड्या कॉल सेंटर ला लावतात आणि प्रवाश्यांना परत येरे माझ्या मागल्या परिस्थिती.
कोअर पुणे मध्ये 'बापाने रिकामटेकड्या मुलाला रिक्षा घेऊन देणं आणि तरुण पोराने दिवसभर पेपर वाचत किंवा गप्पा छाटत फक्त ३-४ ट्रिप कराव्या, बाकी लोकांना उद्धट उत्तरे द्यावी' हा ट्रेंड जास्त आहे.
एम एच १४ मध्ये रिक्षा ला मीटर नाही, त्यामुळे ओला किंवा मुला(मुलाबाळांना गाडी घेऊन बोलावणे) सिस्टम बरी पडते.

ओला उबेर असताना पुण्यात आणि पिंचीमधे अजिबात रिक्षेच्या वाटेला जाउ नये. पिंचीमधे तर नाहीच कारण तिथे रिक्षा मीटर वर धावत नाही. प्रचंड माज करतात. पेपर वाचत बसून राहतील पण भाड घेणार नाहीत.

@श्री : ११०/११२ रुपये होतात स्टेशन ते विमानतळ ते सुद्धा सकाळी गर्दीच्या वेळेत. ईथे ऑफिस मधे काही कलीग गेले आहेत २-३ वेळा. आयनॉक्स ते विमानतळ.

कोअर पुणे मध्ये 'बापाने रिकामटेकड्या मुलाला रिक्षा घेऊन देणं आणि तरुण पोराने दिवसभर पेपर वाचत किंवा गप्पा छाटत फक्त ३-४ ट्रिप कराव्या, बाकी लोकांना उद्धट उत्तरे द्यावी' हा ट्रेंड जास्त आहे.>> अनुमोदन. फक्त आता कोअरच्या बाहेर पण हे वाढत चाललंय. पेठेतून कर्वेरोडला (किंवा खरं तर कुठेच) जायला संध्याकाळी सहानंतर कधीही रिक्षा मिळत नाही हा गेले अनेक वर्षं जेव्हा जेव्हा गेलेय तेव्हाचा अनुभव आहे. ते नक्की कुठे जायला तयार असतात हा संशोधनाचाच विषय आहे. एकदा तर दहा किमी लांब जायचं होतं तेव्हा एका रिक्षावाल्याने सकाळी (स्थळ अर्थातच स.पे) अजून माझा पेपर वाचून व्हायचाय असं तुच्छतेने सांगितलं होतं.
मुंबईत क्वचित रिक्षा वापरली आहे. पण सगळे अनुभव अतिशय उत्तम आहेत. अगदी जवळच्या अंतराला विनाकटकट तयार होणे, रात्री साडेतीन वाजता बडोद्याच्या बसने बोरिवली नॅशनलपार्क पाशी उतरले असता मीटरने रिक्षा चालवून जरा किचकट पत्ता नीट शोधून व्यवस्थित गंतव्य स्थळी पोचवणे, अनेको वेळा चेंबूरला उतरून कलिना कॅम्पसला रिक्षाने गेलेय तरी एकदाही कधी कुणी लांबून नेऊन फसवलं नाहीये की मीटरवर उगाच जास्तीचे पैसे झालेत....

ओला उबर यांना सध्या कस्टमर अ‍ॅक्विजिशन करायचे आहे म्हणून ते मीटरभाड्यातले काही टक्के स्वतःहून देत आहेत. म्हणजे १०० रुपये मीटर्नुसार होत असतील तर ग्राहकाला ६०- ७० रुपयेच द्यावे लागतात. हे ते किती दिवस करणार? त्यांचा भविष्यातला प्लान काय आहे?

कदा तर दहा किमी लांब जायचं होतं तेव्हा एका रिक्षावाल्याने सकाळी (स्थळ अर्थातच स.पे) अजून माझा पेपर वाचून व्हायचाय असं तुच्छतेने सांगितलं होतं.
>>>
हे महानच

मुंबईतच बालपण गेल्याने रिक्षाशी संबंध नाही. टॅक्सीवाले आपण बोलू तिथे जातीलच असे नाही. नकार पचवावे लागतात. पण समोरची व्यक्ती उर्मट नसल्याने काही वाटत नाही.

रिक्षाबाबत नवी मुंबईचा सर्वाधिक अनुभव. रांगेत वा नाक्यावरच्या रिक्षास्टॅन्डला गेलो तर आधी आत बसायचे आणि मग आपल्याला जायचेय ते ठिकाण सांगायचे. जातातच.

पुण्याचे तीनचारच रिक्षाप्रवासाचे आहेत. सर्वच्या सर्व वाईट आहेत. कदाचित माझ्याकडे बघून हा मुंबईचा दिसतोय, पुण्याचा नाही, तर फसवा बिनधास्त असा हिशोब असावा सर्वांचा. पण गूगलने दरवेळी वाचवले.मूड आला तर लिहेन नंतर सविस्तर .. याच धाग्यात

.मूड आला तर लिहेन नंतर सविस्तर .. याच धाग्यात>>>> नशिब ..ह्याच धाग्यात लिहणार आहेस.
फक्त वाईट अनुभव च लिहायचे आहेत का ??? मला काही रिक्षाकांकाचे खुप चांगले अनुभव पण आले आहेत.

चांगले पन येऊच द्या.>>>लगेच सांगते
एकदा गणपतीच्या आदल्या दिवशी नेमका ऑफिस मधून निघायलाच उशीर झाला. स्टेशनवरून रिक्षा केली पण कोकणात जाणारे प्रचंड ट्रैफिक त्यामुळे अर्धा तास होऊनही नेहमीपेक्षा खुप कमी अंतर कापले होते आणि रिक्शावाले काका याया फाट्याच्या पुढे मी रिक्शा घालुच शकत नाही असे हतबल होऊंन म्हणाले शेवटी नवर्याला बाइक घेऊन यायला संगितल पण त्याना यायला तरीही अर्धा तास लागनारच होता म्हणून मी उतरुन वाट पहायची ठरावले आणि ते काका सुद्धा माझ्यासोबत थांबले मी नको म्हटले तर मला म्हणाले अशा पावसात या आडजागी माझ्या मुलीला मी एकटे थाम्बु दिले असते का?तुमचा नवरा आला की मी निघेन आणि खरोखर जवळपास अर्धा तास ते थाम्बुन राहिले आणि नवरा आल्यावरच गेले

Submitted by आदू on 27 February, 2018 - 14:07
छान अभिमानास्पद अनुभव
रिक्षावालासुद्धा माणुसकी जपून आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय.
जसे आपण इतरांशी वागतो तसे आपले ह्या जगात अनुभव Happy थोडक्यात म्हणजे आपण इतरांशी छान समजुतीने वागलो तर आपल्यालाही आदू ह्यांच्यासारखे अनुभव नक्कीच येत असणार.

मला कोल्हापुरातच असे मोजके चांगले अनुभव आलेत. अर्थात तेव्हा कळत नव्हते खूप त्यामुळे लक्षात नाहीत फार. तरी एक म्हणजे, मी पुण्याहून अशीच ट्रेन ने कोल्हापूर ला गेले एकदा आणि सह्याद्री तेव्हा नेमकी खुप लवकर पोहोचली. एका रिक्षावाल्याने माझ्याबरोबर येण्याची तयारी दाखवली. अजून एक passenger सोबत होता त्याला लक्ष्मी पुरीत सोडून आम्ही पुढे गेलो. बिल्डींग जवळ आल्यावर मी जीना चढून पहिल्या मजल्यावर गेले, बाबांनी दरवाजा उघडला तेव्हा तो रिक्षावाला खालून गेला. तोपर्यंत थांबला होता.
पुण्यात एक असेच अतिशय सभ्य म्हणजे पोटासाठी रिक्षा चालवत असतील असे न वाटणारे काका एकदा पौड रोड ला घरी निघालेले असून माझे भाडे घेऊन मला घरापर्यंत सोडून मग त्यांच्या घरी गेले. रात्री उशीर च झाला होता.

माझा चांगला अनुभवः
पुण्यातून शुक्रवारी संध्याकाळी निघून एकटी बोरीवली ला मैत्रिणीकडे गेले होते.पोहचायला ११.३० वाजले होते, बोरीवली मधले काहीही माहित नव्हते.मैत्रिणीने सांगितलेल्या नावाच्या पूर्ण बोरीवलीत ३ सोसायट्या होत्या.(पुण्यात अनेक कोलते पाटील २४के ग्लिटराती आणि पुढे खरे नाव अश्या ओळखतात तसं).रिक्षावाल्याने पत्ते दुकानात विचारत विचारत बरोबर सोडलं.सुटे पैसे नीट दिले.
(मैत्रिणीकडे गेल्यावर शोध लागला की तिने सांगितल्या त्यापेक्षा खूप सोप्या खुणा अस्तित्वात होत्या पण त्या 'मुंबईत राहत नसल्याने मला सवईच्या नसतील' म्हणून वेगळ्याच खुणा सांगितल्या होत्या Happy )

आदू , दक्षिणा, मस्त अनुभव, बरे वाटले वाचून.

@ मी.रा. <<<रिक्षावालासुद्धा माणुसकी जपून आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय.
जसे आपण इतरांशी वागतो तसे आपले ह्या जगात अनुभव Happy थोडक्यात म्हणजे आपण इतरांशी छान समजुतीने वागलो तर आपल्यालाही आदू ह्यांच्यासारखे अनुभव नक्कीच येत असणार.>>> अहो अर्थातच काही रिक्षावाले वाईट होते किंवा आहेत म्हणून सगळेच वाईट नसतात. पण आपण इतरांशी छान समजुतीने वागलो तर प्रत्येक वेळी आपल्याला चांगले अनुभव येतील असे नाही. आता माझेच अनुभव घ्या, यात मी दुसरे काय करणे अपेक्षित होते. खरेतर बरेचदा आपण इतरांशी कितीही चांगले वागलो न तरी समोरची व्यक्ती स्वतः च कसे बरोबर किंवा मी जे वागतो तेच योग्य ह्या भ्रमात असते अन त्यांच्याशी कसेही वागा, काही उपयोग नसतो कारण ते स्वतः तुन बाहेरच येत नाहीत.
अन हे माझे मत आहे बऱ्याच चांगल्या वाईट अनुभवातून बनलेले Happy

रिक्षाची गरज खुप कमी वेळा पडलिये पण जेव्हा जेव्हा पडलिये तेव्हा प्रत्येक वेळेला लुबाडणुक झालिये.
त्यांचा खरा त्रास त्यांच्या रिक्षा 'चालवण्याच्या' पद्धतीचा आहे, वाट्टेल तेंव्हा वळवणे, इंडीकेटर दाखवायचा प्रश्नच येत नाही बर्‍याच रिक्षांना हे अस्तित्वातच नसतं (ज्यांच आहे ते काढुन स्वत:च्या पार्श्वभागावर का लावत नाही ते कळत नाही कारण रिक्षावर तर तरी त्याचा काही उपयोग नाही). तुम्हाला गरज असेल तर तुम्ही ब्रेक लावा आम्हि आमची रिक्षा मध्ये घालणार. साहजिकच तुमच्या गाडीची तुम्हाला काळजी असते आणि तुम्हिच ब्रेक दाबता.
माझं एक स्वप्न आहे एक टँक घेउन पुण्यात चालवायचा आणी येणार्‍या सगळ्या रिक्षांना त्याखाली चिरडायचयं Happy

नाशकातही असेच अडेलतट्टू रिक्षावाले जास्त आहेत.
मला एक मजेशीर अनुभव आला होता 6 ते 7 वर्षांपूर्वी नाशिकला. मी कॉलेज रोडहून रिक्षावाल्याने सांगितलेल्या भाड्यात अजिबात घासाघीस न करता घरी येत होते. रिक्षावाला पण मोठे भाडे मिळाले म्हणून आंनदी होता. बऱ्याच गप्पा मारत होता. शेवटी एकदाचे घरी पोहोचलो तर तो रि वाला म्हणे, ताई, या बंगल्यात एक खतरनाक कुत्रा आहे, जपून आत जा! मला एक क्षणभर काही समजलं नाही! मग लक्षात आलं की तो आमच्या ब्रुनोबद्दल बोलतोय! प्रत्यक्षात ब्रुनो 2 वर्षांपूर्वीच गेला होता!

मला हजार का, लाखातच एखादा बारा रिक्षावाला मिळाला असेल.
नेहमी सुट्टे नाहीत च्या कारणाखाली हे लोक १-२ रुपये मारतच असतात. त्यातून माणिक बाग ते राजाराम ब्रिज खच्चून एक ते दीड किमी अंतर आहे अगदी स्वत:च्या गाडीने गेलं तर दहा रुपड्याचं ही पेट्रोल लागाणार नाही. पण रिक्षावाले ३५ ते चाळीस घेतात. एकदा माझे ३७ झाले. मी पस्तीस दिले, तर तो म्हणाला की वरचे? मी म्हटलं मी वरचे पैसे अनेक रिक्षावाल्यांना माफ केलेत, आज तुम्ही करा. त्याने इतकं तोंड वाकडं केलं आणि म्हणाला की सकाळी सकाळी पाहिलं च गिहाईक असं भेटला तुम्ही.
मी म्हटलं आम्हाला पण रिक्षावाला भेटला की सेम असच वाटतं आणी आमचा दिवस पण वाईट जातो.

ओला उबर अक्षरश: बेस्ट.
रिक्षाच्या मीटर मध्ये कायम काहीतरी झोल केलेला असतो. सेम अंतरासाठी १० ते १५ रुपयांचा फरक मी अनुभवला आहे.
ओला उबर बुक करताना जी amount दिसते तीच आपल्याकडून आकारली जाते. ट्राफिक, लांब चा रस्ता इ. काही फरक पडत नाही. पण रिक्षाचे मीटर दर ४ पावलावर पुढे पुढे सरकत जाते.
शिवाय रिक्षात ३ जण बसतात, ओला/उबर मध्ये ४ जण जाऊ शकतो, सुरक्षित प्रवास शिवाय AC.

आजकाल रिक्षाने प्रवास खूपच कमी झालाय. पूर्वी खूप होत होता तेंव्हा अनेक विविध (गमतीशीर तसेच संतापजनक) अनुभव आलेले आहेत.

थोडक्यात सांगायचे तर सर्वात चांगला अनुभव सातारच्या रिक्षावाल्यांचा आहे. कधीही तिथे मला त्रास झालेला नाही. पुणे कोल्हापूर हैद्राबाद मध्ये त्रासदायक भेटलेत. इतर शहरात माहिती नाही.

विविध शहरे आणि त्यातील रिक्षावाले असा एक धागा काढला होता कि काढायचा म्हणत राहून गेला माहित नाही. कारण रिक्षावाल्यांच्या हैद्राबाद मधल्या एका अनुभवाबाबत हे मी खूप पूर्वी लिहिले होते पण ते नक्की कुठे पोस्ट केले आता आठवत नाही. असो. तो अनुभव तसाच इथे चिकटवत आहे. कोल्हापुरात आणि पुण्यात आलेले अनुभव नंतर लिहीन.

--x--
एका खाजगी बसने मी पहाटे पुण्याहून हैदराबादला पोहोचत असे. तिथून कंपनीच्या गेस्टहाऊसमध्ये जाण्यासाठी रिक्षा करावी लागे. ही बस् तेथे पोहोचताच सारे रिक्षावाले बसभोवती जमा होत. कुणाला कुठे जायचे आहे त्यानुसार आधीच त्यांच्यात विभागणी झालेली असे. तिथे तर मीटर हा प्रकार कुणाला ऐकूनही माहिती नसेल अशी परिस्थिती आहे. कुठे जायचे त्यानुसार “बोली” लाऊन रिक्षा करावी लागते. त्यात एखाद्या रिक्षावाल्याबरोबर बोलणी फिस्कटली तर अन्य कोणीही रिक्षावाला तुम्हाला नेत नाही. इतकी संघभावना त्यांच्यात असते. त्यामुळे एकतर तुम्हाला “त्या भागात जाणारा तो” रिक्षावाला जे म्हणेल ते भाडे देऊनच जावे लागते. दुसरा पर्याय नाही. (एकदा तर त्या पहाटेच्या अंधारात लगेज घेऊन दुरवर जाऊन दुसरी एखादी रिक्षा पकडण्याचा माझा प्रयोग पण अयशस्वी झाला होता. असो.)

एकदा एका अतिशय गुंड प्रवृत्तीच्या रिक्षावाल्याशी “बोली” झाली. त्याच्याकडे फक्त तोंडाला दारूचा वास आणि उर्मट भाषा इतकेच भांडवल होते. खिळखिळी रिक्षा आणि खिशात पेट्रोलसाठी सुद्धा पैसे नाहीत अशी अवस्था. यामुळे सर्वप्रथम मला घेऊन तो पेट्रोल पंपावर जात असे आणि माझ्याकडील पैशातून पेट्रोल टाकून पुढचा प्रवास. म्हणजे भाडे आधीच घेतल्याचा प्रकार. मग साहेबांची मनमानी सुरु. कधी रिक्षा अतिहळू चालव तर कधी काही कारणासाठी कुठे मध्येच थांब असे याचे उद्योग (कारण पैसे तर आधीच मिळालेले आहेत. मग कसली चिंता). असे करत करत केवळ बारा किलोमीटर अंतर जाण्यासाठी तब्बल अर्धा-पाऊण तास लावायचा. एकदा तर पेट्रोलपंपावर त्याला मी शंभरहून अधिक रुपये जास्तीचे दिले होते. कारण माझ्याकडे सुट्टे नव्हते. गेस्टहाऊसवर उतरल्यानंतर या महाभागाने ते ही मला परत केले नाहीत. अरेरावीची भाषा वापरली. मी उत्तर दिल्यावर निर्लज्ज हसला आणि बेमुर्वतखोरपणे निघून गेला. म्हणजे सरळ सरळ गुंडगिरी.

पुढच्या वेळी पुन्हा मी जेंव्हा हैदराबादला गेलो तेंव्हा तोच पुन्हा तिथे हजर. त्याच्याकडे दुर्लक्ष करुन जेंव्हा इतर रिक्षावाल्यांकडे विचारणा केली तेंव्हा कुणीही आले नाहीत. शेवटी तोच रिक्षावाला तशीच फसवणूक तोच मन:स्ताप. अशा प्रकारे तिथे बाहेरून येणाऱ्या इतर प्रवाशांनाही त्रास झाल्याचे नंतर ऐकिवात आले.

एकेकाळी टांगेवाले माजोरी होते, मग रिक्षावाले झाले, मग सिक्ससीटर वाले आणि आता ओला उबर देखील त्याच मार्गावर आहेत. कित्येक वेळा मला ओला उबेरचा मनस्ताप झाला आहे. रात्री उशीरा लांबच्या मार्गावर न येणे, तुम्हीच ऑर्डर कॅन्सल करा म्हणून सांगणे वगैरे रम्य लीला करतातच.

अर्थात रिक्षाचालकांच्या मानाने कमी पण शेवटी मानवी प्रवृत्ती सेमच. तेच लोक रिक्षा चालवणार आणि तेच ओला उबेर

एकेकाळी टांगेवाले माजोरी होते, मग रिक्षावाले झाले, मग सिक्ससीटर वाले आणि आता ओला उबर देखील त्याच मार्गावर आहेत. >> बरोबर...मानवी स्वभावधर्म. म्हणूनच यापैकी कोणाचीही एकाधिकारशाही घातकच. यासाठी ठराविक काळाने प्रत्येकाला स्पर्धा तयार झाली पाहिजे. 'आग को पानी का डर बने रहना चाहिये' Wink

कुठे जायचे आहे ते स्थान सान्गितल्यावरही.... (मिटरवाले) कुठल्या मार्गाने तुम्हाला जायचे आहे हा पुढचा प्रश्न रिक्षेत बसल्यावर करतात. यान्ना मार्ग माहित असतो.... तो तुम्हाला माहित आहे का हे ते तपासत असतात.

पीएमपीएल, बेस्ट सारखे रिक्षांनाही ज्या ठिकाणी ती रिक्षा जाणार आहे ते मार्गफलक लावा अशी सक्ती केली पाहिजे. म्हणजे लोकही विचारत बसणार नाहीत उगाच Happy

वरदा - तुला पूर्वी ५-६ वर्षांपूर्वी रिक्षावर चर्चा झाली होती तेव्हा "दुर्गम प्रदेशातून" शहराच्या मध्यावर यायला सुद्धा रिक्षावाले नाही म्हणत हे तू लिहील्याचे आठवते Happy अजून तसेच दिसते Happy

रिक्षाचा विषय आलाच आहे तर सांगावेसे वाटते, माझे वडिल पुण्यात खूप वर्षांपूर्वी रिक्षा चालवायचे. म्हणजे जवळजवळ ३०-३५ वर्षांपूर्वी.
आता ते हयात नाहीत. पण असते तर नक्की तेव्हाचे अनुभव कसे होते रिक्षावाल्यांच्या नजरेतून ते लिहिता आले असते.

जेव्हा भारतात होते तेव्हा किंवा आता जेव्हा भारत वार्‍या करते तेव्हा दुर्दैवाने रिक्षावाल्यांचे वाईटच अनुभव जास्त आलेत. माझी दोन्ही राहण्याची ठिकाणे (सासर-माहेर) अशी आहेत की घरापर्यंत यायचे असेल तर रिक्षाला पर्याय नाहीये. एक महात्मा सोसायटी आणि दुसरे प्राधिकरण. महात्मा मधे यायचे म्हणजे तर जन्माचे वैर असल्यासारखे रिक्षावाले हाड्तूड करतात. परत यायला भाडं मिळत नाही हा एक जप ठरलेला. चुकुन माकून कोणी हो म्ह्टला तर २० रू जास्तची मागणी असतेच.

प्राधीकरण मधे तर मिटरच नाही रिक्षाला. मनाचेच ठरलेले रेट. त्यातून कधी निगडी मेन बसस्टॉप वर सोडायला सांगितले की मेन रोड क्रॉस करून पलिकडे सोडायचे ५ रू. जास्त.
आता हे ओला - उबर खरंच चांगलेय. म्हणजे मी अनुभव घेतलेला नाहीये, पण आई सांगते त्यावरून तिला खूप बरं झालंय. डोअर टू डोअर सर्विस.

माझं एक स्वप्न आहे एक टँक घेउन पुण्यात चालवायचा आणी येणार्‍या सगळ्या रिक्षांना त्याखाली चिरडायचयं Happy

नवीन Submitted by अग्निपंख on 27 February, 2018 - 17:03 >>>>>>>>>>>>
हा हा हा!!!! अगदी सेम हियर.....
मान्यांनी एकदा प्रयत्न केला होता बसने .....

फार फार वर्षांपूर्वी कोल्हापुरात आलेले काही मजेशीर अनुभव. योगायोगाने म्हणा अथवा काहीही पण हे सगळे अनुभव कोल्हापुरात बसस्थानकावरून घेतलेल्या रिक्षांच्या बाबत आलेले आहेत.

१.

एका पहाटे एसटीने कोल्हापूरला पोहोचल्यानंतर बस स्थानकापासून रिक्षा घेतली. तो म्हणाला मीटरने जाऊ. मी ठीक आहे म्हणालो. थोड्या अंतरावर तिघेजण रिक्षाची वाट पाहत उभे होते. याने रिक्षा थांबवली. त्यांनाही तिकडेच जायचे होते. मग याने मला पुढे आपल्या सीटवर शेजारी बसायला सांगितले. ते तिघे मागे बसले. झाले. अर्ध्या ड्रायवरसीट वर मी पेचकाटून बसलो. उरलेल्या अर्ध्या सीट वर तो. अशी वरात. शेवटी पोहोचलो एकदाचे. त्याला विचारले किती झाले? त्याने मीटरकडे बघून घेतले व खाली बघून डोळे चोळू लागला आणि बऱ्याच वेळाने साक्षात्कार झाल्यासारखे किती रुपये झाले ते सांगितले (असे अनेक रिक्षावाले करतात. का करत असतात मला आजपर्यंत कळलेले नाही. पट्कन सांगायचे ना काय झाले असतील ते. Biggrin पण ते नाही. असो). मी भागिले चार केले (कारण आता आम्ही चारजण होतो ना रिक्षात) आणि माझा वाटा देऊ लागलो. तर माझ्याशी भांडू लागला. म्हणाला,

"अहो आपले मीटरने ठरले होते. त्याप्रमाणे तुम्ही सगळे द्या"

मी म्हटले, "अहो पण आता रिक्षात चौघे आहेत"

तर म्हणाला, "अहो ते वडापने आलेत. त्यांचे वेगळे. तुम्ही मीटरने आलाय"

"अहो पण मी मीटरने येत असताना तुम्ही त्यांना का घेतले मग?"

झाले. याने वाद घालायला सुरु केला. Uhoh

"ते तुम्हाला काय करायचे? त्यांचा काय संबंध इथे? आपले ठरल्यानुसार तुम्हाला मी आणले ना इथवर? ते नसते तरी मीटरने पूर्ण भाडे दिलेच असते ना तुम्ही? मग? बाकीचे काय सांगू नका. ठरल्याप्रमाणे पैसे द्या"

त्याचे हे लॉजिक ऐकून मी थक्क झालो Lol ते मागे बसलेले लोक सुद्धा त्याला सांगत होते कि अहो तुम्ही असे कसे काय त्यांच्याकडून सगळे पैसे घेता. तर हा ऐकायलाच तयार नाही. मग मी पण इरेला पेटलो. म्हटले मीटरनुसार माझा वाटा जो आहे तेवढेच मी देणार. तुला हवे कि नको सांग. Angry मग म्हणाला नका देऊ काहीच. बघूया. मग मी पण ठीक आहे नको तर बोंबलत जा, म्हणून काही न देता चालू लागलो. मागून तो आरडाओरडा करू लागला. धमक्या पण दिल्या. पण काही न जुमानता मी निघून आलो. Sad

Pages