रिक्षा, रिक्षाचालक आणि मला आलेले वाईट अनुभव

Submitted by VB on 25 February, 2018 - 13:56

रिक्षा चालकांची मुजोरी, उद्दामपणा न अनुभवलेला अपवादाने सुद्धा सापडेल कि नाही माहित नाही.

तर बहुतांशी नोकरदारांप्रमाणे मीही रोज ट्रेन आणि रिक्षाने प्रवास करते , अन इतरांसारखी चांगलीच रुळलीसुद्धा आहे. पण तरी कधी कधी एखाद्या वेळी येतो वाईट अनुभव. असाच एक वाईट अनुभव गेल्या आठवड्यात आला. त्याबरोबर एक असाच खूप वर्षांपूर्वी आलेला आणि आता विस्मरणात गेलेला अनुभवही आठवला.

तर झाले काय , जवळपास दहा वर्षांपूर्वी, नवीन नवीन नोकरीला लागले होते. रोजची यायची, जायची वेळ ठरली होती पण एक दिवस ऊशीर झाला, ऊशीर म्हणजे खूप जास्तच, ऑफीसातच दहा वाजले रात्रीचे. खूप टेन्शन आले कारण त्याकाळी रात्री नऊ साडेनऊ नंतर बर्यापैकी वर्दळ शांत झालेली असायची.. म्हणून सरळ रिक्षा करून रेल्वे स्टेशनला आली अन तिथून ट्रेन ने ठाण्याला. यात अकरा वाजले होते. इतका ऊशीर झाल्यामुळे मी बसच्या ऐवजी रिक्षाने घरी जायचे ठरवले अन लगेच एक रिक्षासुद्धा मिळाली, त्यामुळे जरा बरे वाटले. पण हे समाधान क्षणिक निघाले. स्टेशन सोडल्यावर रिक्षा रोजचा मार्ग सोडुन दुसऱ्या भलत्याच रस्त्याला वळली. मी मनातून घाबरली पण वरवर तसे न दाखविता रिक्षावाल्याला जाब विचारून रिक्षा मेन रोड वर घ्यायला सांगितले तर त्याने त्यावर मलाच उद्धटपणे ऐकविले कि हा शॉर्टकट आहे अन तुम्हाला बरोबर सोडेन मी. मला माहित होते की हा शॉर्टकट नाहीये पण घाबरले होते त्यात माझ्याकडे तेव्हा मोबाइल हि नव्हता काय करावे काही सुचत नव्हते. थोड्यावेळाने रिक्षा एका बार समोर थांबली अन एक बाई रिक्षात येऊन बसली. मी अजूनच घाबरले पण शांत बसून होते काहीही न सुचल्यामुळे. मध्ये अजून थोडावेळ गेला पण तो थोडासा वेळ अगदी एका युगासारखा वाटत होता, त्यात ती बाई अन रिक्षावाला दोघांचे अगदी घाणेरड्या भाषेत बोलणे चालू होते, ते तर अगदी ऐकवत हि नव्हते. शेवटी रिक्षा त्या छोट्या गल्ल्या सोडून ओळखीच्या रस्त्यावर आली अन सोबत मला थोडा धीरही. रिक्षावाल्याला म्हटले मला इथेच उतरायचे आहे आधी तो नाही बोलला पण थांबला. मी जिथे उतरली होते तो रस्ताही सामसून होता, तशीच सरळ चालायला लागले. जवळपास दहा मिनिटे चालल्यावर एक बस दिसली जी माझ्या घरापर्यंत जाणारी होती, हात दाखविला अन थांबवली , कशीबशी पोहचली एकदाची घरी.
त्या दिवसापासून ठरविले होते की कधीही रिक्षा करायची नाही किमान एकटी असताना तर नाहीच नाही.
मधली खूप वर्षे ठरविल्याप्रमाणे टाळत आली रिक्षा, पण हळू हळू दुसरा पर्याय उपलब्ध नसल्याने परत एकदा रिक्षा प्रवास सुरु झाला.

गेल्या आठवड्यात सुद्धा एक दिवस असाच ऊशीर झाला ऑफिसमध्ये. साडेनऊ होत आले होते. हल्ली इतका ऊशीर होणार असेल तर सरळ कॅब बुक करते पण त्यादिवशी गडबडीत राहून गेले. म्हटले आधीच ऊशीर झालाय त्यात आता कॅब बुक करुन वाट बघत बसण्यापेक्षा सरळ जावे रिक्षाने स्टेशन पर्यंत. अन निघाली लगेच, ऑफिस समोर येताच लगेच एक रिक्षाही मिळाली . खरेतर लगेच रिक्षा मिळाली म्हणून मी खुष झाले पण तो आंनद काही फार काळ टिकला नाही. रिक्षात बसल्या बसल्या आधी घरी फोन करून मी निघाल्याचे आणि ऑफिसमध्ये फ्रेंडला मला रिक्षा मिळाल्याचे कळविले. अन मग इतका वेळ जे लक्षात आले नव्हते ते जाणविले कि रिक्षा वाला प्यायलाय अन आरश्यातून सारखा मागे बघतोय. एकदोनदा तर सरळ मागे वळून बघत होता.
आताही इथे मधेच उतरणे शक्य नव्हते कारण दुसरी रिक्षा मिळेल याची खात्री नाही अन तो रस्ताही इतका काही सेफ नाही म्हणून ठरविले कि जावे पुढे. पण मग लगेच माझ्या मित्राला मेसेज करून त्याला थोडा अंदाज दिला आणि फोन केला. त्यानंतर स्टेशन येई पर्यंत आम्ही ऊगाचच फोन वर गप्पा मारत होतो. त्यामुळे किमान मला थोडे बरे वाटले आणि, भीती, जी आधीच्या अनुभवामुळे मनात होती ती ही जरा कमी झाली. पूर्णवेळ मनात स्वतःला बजावत होते की बी अलर्ट अँड पोजिटीव्ह. शेवटी आले स्टेशन अन मी उतरले एकदाची.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुण्यातले रिक्षावाले तर सर्वात बेक्कार Sad देव करो आणि कधीही त्यांच्या रिक्षात बसायची वेळ आपल्यावर येऊ नये. कोल्हापूरात किंवा बहुतेक अन्य शहरांत आधी रिक्षात बसून मग आपल्याला कुठे जायचे आहे हे सांगायचा प्रघात आहे. रिक्षावाला कोणत्याही डेस्टिनेशन ला यायला नकार देत नाही.
अर्थातच जर रस्त्यावर रिक्षा उभी केली असेल तर ती ग्राहक सेवेसाठी मग तो म्हणेल तिथे त्याला घेऊन जाणे हेच त्याचे कार्य. पण हेच पुण्यात रिक्षा नक्की ग्राहकासाठी आहे की रिक्षावाल्यासाठी ते कळत नाही. कारण आपण आपल्याला अमूक ठिकाणी जायचे आहे असे सांगितले की आधी रिक्षावाला विचार करणार आणि १०० पैकी ९९ वेळा ते तिकडे येणार नाही असेच सांगतात. अगदीच तयार झाल्यास २० रुपये जास्त चार्ज करणार असल्याचे सांगतात.
परवा मला हॉस्पिटल मध्ये जायचे होते, मी रिक्षा साठी विचारल्यावर एक जण धावत आला आणि मला जायचे असलेले ठिकाण अत्यंत जवळ असल्याचे ऐकून माझ्याकडे तु.क. टाकून येणार नाही म्हणला. जवळच्या अंतरासाठी रिक्षावाले नेहमी नाक मुरडतात. त्याच हॉस्पिटल मध्ये जाण्यासाठी अपघात ग्रस्त मैत्रिणीला नेताना एका रिक्षावाल्याने चाळिस रुपये आकारले होते माझ्याकडून.
माझा भराचसा भर आजकाल स्वतःची गाडी, उबर ओला वर असतो. पण अगदी कधी कधी नाईलाज असल्यास रिक्षा करावी लागते. रांगेत रिक्षा लावून सुद्धा यायला नकार दिला तर मी विचारते बिनधास्त मग इथे का लावली स्टँड ला? घरी लावा.
पुण्यातली अंतरं माहित असतील तर एकदा मला डांगे चौकातून वाकड दत्त मंदिर ला जायला ६० रुपये सांगितले होते. ( गुगल मॅप वर पाहिलं तर अंतर वट्ट ८५० मीटर मात्र. आहे) Proud मी म्हटलं किस खुशी मे? तर म्हणे तुमच्यासाठी मला वाकडी वाट करून तिकडे जावे लागेल, मला इकडे जायचे आहे. मग मी म्हटलं फोकलिच्या तु इकडेच जा, माझी मी चालत जाईन 'तिकडे' Proud

रिक्षा नक्की ग्राहकासाठी आहे की रिक्षावाल्यासाठी - म्हणजे काय? रिक्षा ही अगदी केवळ फक्त सिर्फ रिक्षावाल्यासाठी. हा नियम पुण्यातलाच नाही. सर्व भूतलावरच्या रिक्षांसाठी आहे. कोल्हापुरात अपवाद असेल.

मुंबईत रहात असल्याने रीक्षांचा जास्त अनुभव नाही. पण त्यांच्या उर्मट पणा बद्दल ऐकलेय.
आणि टॅक्सीचालक पण काही कमी नाहीत त्यांच्यापेक्षा.

पुण्यापेक्षा पिंपरी-चिंचवड मधले रिक्षावाले बेकार, मिटर नाही मनमानी आणि ग्राहक बघुन दर आकारणी . पण त्यासाठी उपाय आहे. ओला रिक्षा करावी. दर पण फिक्स (पहिल्या ४ किमी ला २९ रुपये) आणि रिक्षा पण ओलानी ठरवुन दिलेल्या मार्गानीच जाते. दोन फोन असतिल तर एक फोन एका आठवड्यात आणि दुसरा फोन दुसर्या आठवड्यात वापरला तर भरपुर कुपन पण येतात त्यात एखाद- दुसरी राईड फ्री मध्ये निघते.

मुम्बईचे रिक्षावाले बरे. मागच्या आठवड्यात त्याने पहाटे ट्राफिक न्हवते आणि वन वे मध्ये उलटी रिक्षा घातली म्हणुन मिटर पेक्षा १० रुपये जास्त देउ केले तर परत केले आणि वर लेक्चर सुनवले. त्यानंतर ठरवले की मुम्बईत टीप नाही. ( मुम्बई आतरराष्ट्रीय एअरपोर्ट वर २० रुपये घेतात कारण त्याना पोलिसाना चाय पाणी द्यावे लागते).

मुम्बईत स्पर्धा प्रचंड असल्याने कुणीही नाही म्हणत नाही. आम्हाला तर मिनिमम अंतरासाठी सुद्धा टॅक्सीवाला नाही म्हणाला नाही. इथे लांब अंतर असेल तरच रिक्षावाले हो म्हणतात.
जवळ अंतराला यायला तयार झालेच तर वरती २-३ रुपये (मारणे) सुट्टे नसल्याच्या बहाण्याने हे ही चालतेच चालते.
याउलट कधी कधी रिक्षावाला बरा ही निघतो पण षठीसामाशी Sad

जवळ अंतराला यायला तयार झालेच तर वरती २-३ रुपये (मारणे) सुट्टे नसल्याच्या बहाण्याने हे ही चालतेच चालते.>> मला आत्ता पुणे स्टेशन वर बस मधुन उतरल्यावर 'कहा जाना है' म्हणुन विचारणा झाली.. सहसा मी असे विचारणार्‍यांच्या नादी लागत नाही पण म्हटल यावेळि कि 'शनिवार पेठ' तर तो म्हणे १५० रु द्या.. मी म्हटल पागल कुत्र्यानं चावलय मला १५०रु सायंकाळी ६ वाजता तुझ्या घशात घालायला..
बाहेर रस्त्यावर येऊन पहिले मिटरने चलतो का म्हणुन एकाला विचारुन बसली.
रु ३७/- मधे दारासमोर.. त्यात त्यानं रु ३/- परत दिल्यावर टचकन पाणीच आलं माझ्या डोळ्यात Lol म्हटल राहुदे बाबा तेवढे तुलाच..

मुम्बईत स्पर्धा प्रचंड असल्याने कुणीही नाही म्हणत नाही >>>> नाही हा, असे काही नाही. आम्ही रोज सकाळी किती आटापिटा करतो एक रिक्षा पकडण्यासाठी ते काय सांगू. माझ्या ऑफिसपर्यंत शेअर रिक्षा जात नाही म्हणजे थोडे लांब एका कोपऱ्यावर सोडतात म्हणून आम्ही तीन जण एकत्र येऊन मीटर वर जातो तर रोज किमान ४ते ५ रिक्षावाल्यांना विचारले तरी क्वचित एखादा तयार होतो, नाहीतर त्यांचे ठरलेले उत्तर असते कि सिर्फ एक जण आयेगा तो ठीक, तीन के लिये एक ऑटो नही जायेगा Angry

VB ओला रिक्षा करा . १ मार्च पर्यन्त TAKE70 कोड वापरुन ७०% सुट घ्या ( maximum discount Rs 50 ) फक्त मुम्बईत .....

टिना एकदा मी कोल्हापूरहून रेल्वेतून उतरले, समोर रिक्षावाला होता, मला विचारलं कुठे जायचं आहे इ. सह्याद्री सकाळी पुण्यात सकाळी ६.३० नन्तरच पोहोचते आणि ७ च्या आगोदर, तेव्हा तर दिडपट भाड्याचा प्रश्नच नाही. त्याने मला सिंहगड रोड लय लांब आहे आणि ४०० रुपये होतील म्हणून सांगितले. मी त्याला म्हटलं मी चालत जाईन, कारण त्याच्यापेक्षा कमी भाड्यात मी कोल्हापूरहून इथवर आलेय. गब्ब्सला तो

ओला रिक्षा केलीये काही दिवस ट्राय, पण बरेचदा आमच्या रूटवर नसतात अवैलबल, कदाचित अंतर चार किलोमीटर पेक्षा कमी आहे म्हणून किंवा माहित नाही, पण नसतात

VB, वाईट वाटले तुझे अनुभव वाचून.मी मुंबईच्या सबर्बमधे रहात असल्याने रहात असल्याने रिक्शाचा अनुभव आहेच.पण चांगलेच अनुभव आहेत.२००९ साली तर काही दिवस, रोज रात्री १.३०-२ तास रिक्षात बसून रिक्षावाल्याशी गप्पा मारत यायचे.अर्थात ४० + होते त्यावेळी. फक्त चावी दिली रिक्षावाल्याला की मी निवांत.मधून हूं हूं करायचे इतकेच.भिती नाही वाटली खरी,तसे प्रसंग आले नाहेत हेही आहेच.

पुण्यापेक्षा पिंपरी-चिंचवड मधले रिक्षावाले बेकार, मिटर नाही मनमानी आणि ग्राहक बघुन दर आकारणी . अगदी अगदी.

देवकी ताई मी हि सबअर्बन मधेच राहते आणि सध्याचे घर स्टेशन पासून बर्यापैकी जवळ आहे, पायी रेल्वे स्टेशन गाठता येते. ,हा आमचे ठाण्याचे घर मात्र स्टेशन पासून लांब आहे घोडबंदर रोडला.

गेल्या आठवड्यातील त्या अनुभवानंतर शक्यतो बसनेच प्रवास करतेय, थोडा जास्त वेळ जातो पण ठिकेय

व्हिबी अगदी अगदी, अपनी सुरक्षा अपने हाथ. कुणी उशिर झाला म्हणून ओरडत असेल तर सांग मला बस ने उशिर झाला तर कृपया ओरडू नये अन्यथा माझ्या सुरक्षित प्रवासाची सोय करावी.

गेल्या आठवड्यातील त्या अनुभवानंतर शक्यतो बसनेच प्रवास करतेय, थोडा जास्त वेळ जातो पण ठिकेय>>> बरोबरच आहे तुझे.मनात धास्ती असेल तर नकोच ते.

12 Aug 2017 ची FB पोस्ट:

काल रात्री साडेबारा एकच्या सुमारास शिवनेरीने चांदणी चौकात उतरलो.... बऱ्यापैकी रिमझिम होती त्यामुळे वाकड क्रॉस केल्यावरच ओला बूक करुन ठेवली होती.... बसमधून उतरलो तर आजूबाजूला कुठेच कॅब दिसत नव्हती..... स्टॉपवर एकुलती एक रिक्षा उभी होती.... पाऊस असल्यामुळे जरा रिक्षाचा आसरा घेऊन ओलावाल्याला फोन लावला.... लोकेशन गंडल्यामुळे तो रस्त्याच्या पलीकडे थांबला होता..... त्याला वळून यायला जरा वेळ लागणार होता.... आमचे संभाषण चालू असतानाच रिक्षावाल्याची कटकट चालू झाली.... "कुठली गाडी आहे?".... मी म्हणालो "कार आहे"..... "नाही, पण कुठली आहे?"..... "Xcent आहे"...... "कुणाची आहे?"..... मला काही कळेना.... मी: "माहीत नाही.... ओला आहे"
ओला ऐकताचा तो खवळलाच.... " खाली उतरायचे".... मी: "अरे पण पाऊस आहे"..... "ते काही माहीत नाही.... ओला ने जायचे असेल तर खाली उतरायचे"
मग काय उतरलो खाली.... भिजलो थोडासा!..... तेव्हढ्यात आली आमची ओला आणि एकदम रिझनेबल पैश्यात घरी आणून सोडले.... अगदी हसतमुखाने (मला फारशी अपेक्षा नव्हती तरीही)
सुट्टे पैसे सुद्धा लगेच परत दिले!

यानिमित्ताने " ओला/उबर" वाल्यांनी रिक्षावाल्यांची किती आणि कशी ठासून ठेवलीय ते लक्षात आले
"ओला" चे नाव काढताच त्या रिक्षावाल्याचा आविर्भाव जसा काही बदलला ते बघता "घांव बहोत गहरा है!"
आणि गम्मत ही की या सगळ्यातून शहाणे होवुन जरा बरी सर्वीस द्यायचे काही नाव नाही!

तळटीप: सन्माननीय अपवाद असतीलही..... नव्हे आहेत.... काही माझ्या बघण्यातही आहेत पण त्यांची संख्या अपवाद या गटात मोडण्याइतकीच आहे!

नाहीतर त्यांचे ठरलेले उत्तर असते कि सिर्फ एक जण आयेगा तो ठीक, तीन के लिये एक ऑटो नही जायेगा
>>> हे लॉजिक कळले नाही. म्हणजे एका फॅमिली चे 3 जण असले किंवा 3 मित्र असले तरी नाही म्हणणार का?

मुंबईतले रिक्षावाले काही कमी नाहीत .मी सकाळी पहिल्या फटक्यात रिक्षांवल्याने इच्छित स्थळी जायला होकार दिला तर आज नशीब चांगलं आहे म्हणून देवाचे आभार मानते .
घाईच्या वेळी रिक्षा न मिळणं , मिळाली तरी इथेच सोडणार परतीच भाडं असेल तरच येणार असे प्रकार सर्रास घडतात . मनसे वाल्यांनी त्यांच्या स्टंट बाजी साठी का होईना पण शेयर रिक्षाचा उपक्रम चालू केलाय .त्यातला त्यात तेवढं सोय .बाकी आनन्दच आहे

लॉजिक कळले नाही. म्हणजे एका फॅमिली चे 3 जण असले किंवा 3 मित्र असले तरी नाही म्हणणार का? >>>> हे लॉजिक तर अजून आम्हालाही नीट कळले नाही. जर ट्रॅफिक नसेल तर एका फेरीचे साधारण ७० रुपये होतात जे आम्ही तीन जण वाटून घेतो किंवा सरळ ठरवितो कि आज तू दे उद्या मी देते, जे त्यांना रुचत नाही त्यांच्या मते ती शेअरिंग रिक्षा नसताना असे करणे योग्य नाही तर आम्ही फक्त एकाच व्यक्तीला घेणार किंवा जाणारच नाही.

जवळजवळ वर्षभराने ह्या विकएंडला पुण्यात आलो होतो. शिवाजीनगर ते डेक्कन रिक्षाने प्रवास केला. पहिलाच रिक्षावाला नकार न देता यायला तयार झाला. त्याने स्वतःहुनच मीटर पाडले.
एरव्ही मीटरने न येणे, आल्यास मीटर पेक्षा १०/२० रुपये जास्त घेणार वगैरे सांगणारे रिक्षावाले ओला/उबर मुळे नरमले आहेत.

वाकड पोलिस चौकी ते दत्तमंदिर रोड एवढ्या जेमतेम १ किमी अंतरासाठी ६० रुपये, सामान असेल तर १०० रुपये असे दर सांगणारे रिक्षावाले ओला रिक्षातुन ३० रुपयात थेट बिल्डींगच्या गेटपर्यंत नेतात. शिवाय गेटपर्यंत नेणार नाही, जायचे असल्यास १०/२० रुपये जास्त असे सांगत नाही.

पुण्यात रिक्षावाल्यांचे अत्यंत वाईट अनुभव आलेले आहेत. म्हणजे भीतीदायक नाहीत VB तुझ्यासारखे, पण भाडे नाकारणे, तेही तुच्छ कटाक्ष टाकून , हा अनुभव तर असंख्य वेळा घेतला आहे.
इथे बंगळूरला एकदा सकाळी सकाळी मीच एका रिक्षावाल्याला १५ की २० रू. साठी १०० ची नोट देऊन भडकवले होते Lol त्यावर त्याने कन्नडमध्ये प्रचंड थयथयाट केला. पण मला तेव्हा कन्नड येतच नसल्याने मी अजिबात चिडले नाही Happy कन्नड येत नसल्याचा फायदा मला तेव्हा प्रथमच जाणवला Lol
इथलेही रिक्षावाले कुप्रसिद्धच आहेत पुण्यासारखे, पण हल्ली
उबर/ओला मुळे जरा अद्दल घडून सुधारले असावेत. फार संबंध येत नाही खरं तर.

ओला उबर मुळे रिक्षावाले अज्जिबात नरमले नाहियेत. सुरूवातीला उलट यांनी उबर ओला वाल्यांवर दगडफेक केली. पण त्यांची सर्व्हिस पाहून आपण त्यातून काही शिकावे हे नाही.
हे सेम चायनिज मार्केट सारखे झाले, ते लोक ज्या पद्धतीने व्यवसाय करतात ते पहायचे नाही पण त्यांचा विरोध करायचा.
असो..
मी अत्यंत कमी वेळेला रिक्षा प्रिफर करते, पण जेव्हा जेव्हा तशी वेळ येते तेव्हा तेव्हा माझे हमखास भांडण होतेच होते. Sad

ओला उबर मुळे रिक्षावाले अज्जिबात नरमले नाहियेत. सुरूवातीला उलट यांनी उबर ओला वाल्यांवर दगडफेक केली. पण त्यांची सर्व्हिस पाहून आपण त्यातून काही शिकावे हे नाही.>>> अगदी अगदी. ओला, उबर नवीन नवीन आले होते तेव्हा वाटले होते की या पारंपारिक रिक्षा, टॅक्सीवाल्याना चांगली कॉम्पीटीशन मिळालीये, आता तरी सुधारतील. पण त्यांनी हे लोक्स आमच्यावर कसा अन्याय करतायेत असे चित्र रंगवून संप, दगडफेक असले प्रकार सुरु केले. बर्याचदा ओला, उबर वै यांच्या थांब्याच्या जवळही भाडे घ्यायला जात नाहीत तर पॅसेंजरला थोडे लांब बोलावून घेतात यांच्या धाकाने.

विदर्भात राहणार्‍यांची पन खुप दैना होते यांच्या अवास्तव भाडेआखणीमुळे.. संगमवाडी पुलावर पार्किंग आहे, तिथुन पब्लिक ट्रांसपोर्ट नसल्यातच जमा.. हे पार्किंग १ पासुन शनिवार पेठेसाठी १५०रु मागतात... काहिच्या काही.. माझे फार झगडे होतात त्यामुळे.. परतीच भाड जरी मागितल तरी डबल करुन रु ८० ला पडणारी फेरी रु १५० म्हणतात..
एकदा म्हटल जरा कमी करा; तर म्हणे कि द्या तेवढे का पोटावर लाथ मारताय मग म्हटल म्हणुन का मी जगराता ठेवलाय? मी पन विद्यार्थिनी आहे..आणि नोकरदार असते तरी का फुकटचे कमावतेय तुला पोसायला? यापुढे बरेचदा ओला बुक करते तर ते लोक त्यांना आपण गाडीत बसेपर्यंतसुद्धा थांबु देत नाही...म्हणे आमच भाडं लाटतो..आमच्या एरियात वगैरे येतो.. एकदा मीच चिडली म्हटल तू घेऊन चल एवढ्या पैशात येते मी.. सर्विस कुणाची घ्यायची हा माझा प्रश्न आहे..मी ठरवणार.. तू हायेस कोण मला रिसिव्ह करायला आलेल्या गाडीला हकलणारा..तुला कमी पैशात मला घेऊन जाता येत नाही तसच मलापन तू मागतोय तेवढे पैसे देणे जमणार नाय.. याउप्पर बोलला तर मी सरळ आरडाओरडा करुन लोकांना गोळा करेल अन पोलिस बोलावेल.. मग बसली गाडीत आणि आली निघुन..
तो ओला वाला ड्रायवर म्हणतो कि मॅडम बर झाल तुम्ही बोलल्या..या रिक्षावाल्यांच्या दादागिरीपुढे बरेचदा कस्टमरच गप होत अन आमची गोची होते..हे लोक गाड्या फोडायलापन मागे पुढे बघत नाही..

आॅफिसच्या खूप आधी शेअर रिक्षावाले आठ रू प्रत्येकी प्रमाणे सोडतात. मीटरने आफिसच्या दारापर्यंत बावीस-तेवीस होतात, रात्रीच्या वेळी चार जणांनाही घेतात. म्हणजे रिक्षावाले सो काॅल्ड व्हाईट काॅलर जाॅबवाल्यांपेक्षा खूपच जास्त कमवत असणार. सेपरेट आॅटो दोनजणांनी केल्यास प्रत्येकी पंधरा रू मागतात. बेस्ट बसचं तिकीट जसं वाढेल तसे शेअर रिक्शा्चे भाव वाढतात. मग हेच पब्लिक बेस्टवाले स्वत:कडे का नाही वळवत. दूरच्या अंंतरासाठीसुद्धा सगळेच रिक्षावाले तयार होत नाहीत. अनेक रिक्षावाले दुपारी ग्रुप करून गप्पा मारत असतात निवांत. तुमच्याकडे ते ढुंकुनही बघत नाहीत. रोज प्रवास करत असल्यामुळे मीटरमध्ये गडबड आहे हे लगेच कळतं, पण याला ऊपाय काय.
नाशिकला मीटर असतं पण फक्त शोभेसाठी, थोड्या अंतरासाठी वाट्टेल तसे पैसे मागतात. भाज्या आणि फळं नाशिकला स्वस्त आणि ताजी मिळतात पण रिक्क्षावाले एवढे लुबाडतात की ते मुंबईपेक्षा महागच पडतं. पुण्याला सुट्टे पैसे परत देण्याची पद्धतच नाही. आैरंगाबादचे रिक्षावालेही लुबाडण्याच्या बाबतीत कुठेही कमी नाहीत. बंगळूरुचे आणि पुण्याचे रिक्षावाले यांच्यात फक्त भाषेचा फरक.

Pages