(कॅन्ड) फणसाची भाजी

Submitted by स्वाती_आंबोळे on 31 January, 2018 - 10:48
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१. १ कच्च्या फणसाचा कॅन (इथे Chaokoh नावाच्या ब्रॅन्डचा मिळतो)
२. तुरीचे दाणे आणि/किंवा काळे हरभरे आणि/किंवा शेंगदाणे आणि/किंवा तुमच्या आवडीचं कुठलंही कडधान्य. मटार गोडसर लागतात म्हणून ते नकोत. इथे तुरीचे दाणे फ्रोझन मिळतात ते मी कधीतरी वापरते.
३. एखादी लाल सुकी मिरची, कढीलिंबाची पानं
४. चवीनुसार हिरव्या मिरच्या, मीठ, गूळ आणि काळा/गोडा मसाला
५.फोडणीचं साहित्य - तेल, मोहरी, जिरं, हिंग, हळद
६. खोबरं, कोथिंबीर

क्रमवार पाककृती: 

१. कॅनमधलं पाणी काढून फणसाच्या फोडींत पाणी न घालता त्या कुकरमध्ये वाफेवर शिजवून घ्याव्यात.
(कुकरमध्ये खाली नेहमी घालतो तसं पाणी घालायचं - सांगायला नको, पण शंकेला जागा राहू नये म्हणून लिहीते आहे.)
जे/जी कडधान्यं किंवा शेंगदाणे घालायचे असतील ते त्याचबरोबर, पण त्यात पाणी घालून शिजवून घ्यावेत.
मी सहसा (कुकरच्या Proud ) दोन शिट्ट्या येऊ देते.
faNas_can.jpg

२. फोडी शिजल्या की हव्या त्या आकारात चेचून्/चिरून घ्याव्यात.
३. तेलात मोहरी, हिंग, जिरं आणि हळद घालून फोडणी करावी. त्यात कढीपत्ता, लाल मिरची, हिरव्या मिरच्या घालाव्यात. आवडत असतील तर कोथिंबिरीचे देठ बारीक चिरून घालावेत - छान स्वाद येतो.
४. त्यावर शिजवून घेतलेल्या फणसाच्या फोडी आणि कडधान्य घालावं आणि छान परतून घ्यावं.
५. चवीनुसार मीठ, काळा/गोडा मसाला, गूळ घालावा. खोबरं (सढळ हाताने) घालावं.
६. अंगासरशी पाणी घालावं आणि झाकण ठेवून दोन दणदणीत वाफा येऊ द्याव्यात म्हणजे भाजी छान मिळून येते.
७. आवडीनुसार रस ठेवून भाजी शिजली की गॅस बंद करावा, मग दोन मिनिटांनी कोथिंबीर घालून ढवळून घ्यावी.
८. वाढण्यासाठी भांड्यात काढल्यावर वरून खोबरं कोथिंबीर घालावी.
faNas_bhaji.jpg

वाढणी/प्रमाण: 
चार जणांसाठी पुरेशी होते
अधिक टिपा: 

१. कुकरचा वेळ 'लागणार्‍या वेळा'त धरलेला नाही.
२. फणस आणि कडधान्य आधी निराळं शिजवून घेण्याऐवजी भाजी प्रेशर पॅनमध्येच केली तरी चालेल असं वाटतंय. पुढच्या वेळी तशी करून बघेन आणि त्याबद्दल इथे लिहीन. (म्हणजे भाजी कशीही झाली तरी त्यानिमित्ताने धागा पुन्हा वर येईल. Proud )

मायबोलीवरच फणसाच्या भाजीच्या अनेक रेसिपीज आहेत, त्यात ही माझी भर. Happy

माहितीचा स्रोत: 
१. आई - भाजीची ही पारंपरिक रेसिपी तिने शिकवली. २. मिनोती - कॅन्ड फणस कुकरमध्ये शिजवून वापरायची आयडिया तिने सांगितली.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

या पद्धतीने आमच्या शेजारच्या आजी भाजी करायच्या. मस्त चव होती त्यांचा हाताला.
आमच्याकडे मात्र फणसाची भाजी वर योकूने लिंक दिली आहे तशी सुकट घालून केली जाते.
सुकट्/सोडे घालायचे नसतील तेव्हा माझी आई नुसत्या हिंग, मोहरी, हिरवी मिरची च्या फोडणीवर फणसाची भाजी करते. फणस उकडून जरा चुरुन घ्यायचा. हळद नाही घालत. वरुन ओले खोबरे. खूप मस्त होते! मात्र त्यासाठी फणस ताजा हवा. कॅनमधल्या फणसाची केली होती पण आईसारखी ती फ्रेश चव नव्हती.

>>कॅन्ड वस्तू म्हणजे टोमॅटो प्युरे किंवा नारळाचं दूध वगैरे कॅन ओपन केल्यावर जरी लगेच दुसर्‍या डब्यात काढून फ्रिजमध्ये ठेवलं तरी फार टिकत नाही हे खरं आहे. एक दोन दिवसात संपवलेलं बरं.>> टोमॅटो प्युरी, नारळाचे दूध उरले तर मी लगेच फ्रीज करून टाकते.

येसर आणि वेसवार वेगवेगळे. आमच्याकडे अजून एक प्रकार असतो. येस्वार मसाला म्हणून, खास बाळंतिणीच्या स्वयंपाकात वापरतात.

वेसवार कृती आमची मिळवली मी माझ्या नणंदेकडून. धने टाकतात.

साहित्य-

१ वाटी तांदूळ
अर्धा वाटी उडीद डाळ
अर्धा वाटी धने
१० ते १५ सुक्या मिरच्या
१ चमचा मेथी
१ चमचा मोहरी

कृती-

हे सर्व वेगवेगळे तांबूस होईपर्यंत खमंग भाजून घ्यावं पण तांदूळ आणि मिरच्या एकत्र भाजाव्यात आणि मिक्सरवर बारीक वाटावं.

आज केली भाजी एकदाची. चणे कुठे तरी लपून बसल्यामुळे चवळी घालून केली. आयुष्यात पहिल्यांदाच फणसाची भाजी खाल्ली. खूप आवडली किंवा आवडलीच नाही असं काही वाटलं नाही, न्युट्रल एकदम. कदाचित नॉस्टॅल्जियाची फोडणी नसल्यामुळे असेल Wink पहिल्यांदाच केली, खाल्ली त्यामुळे फोटो-बिटो लाड ओघानं आलेच.

IMG_7946.JPG

सिंडे, माझ्या बाबतीत नेमके उलट झाले होते. माझा नॉस्टॅलजीआ गऱ्याच्या भाजीबाबत होता. कच्च्या संबंध फणसाची भाजी कधीच खाल्ली नव्हती. लोकांचा नॉस्टॅलजीआ वाचून मी आणून करून खाल्ली व अगदी नकोशी झाली. तेव्हा अंदाजपंचे नेहमीच्या भाजीसारखी केली होती. आपल्याला जमणारे काम नाही म्हणून भाजीवर काट मारून टाकली.

गेल्या वर्षी एका ब्लॉगवर रसभरीत रेसीपी वाचून परत प्रयत्न करू म्हणून पाव किलो फणस आणला. भाजी सेम जशीच्या तशी लिहिलेली तशी केली आणि सगळी भाजी मी नुसती उचलून खाल्ली Happy Happy भाजीला अंगची अशी खास चव नाहीय पण गूळ व मसाला योग्य प्रमाणात पडला तर अफलातून चवीचे रसायन तयार होते असे निरीक्षण आहे.

काल प्रथमच कुयरी आणलीय. याआधी अर्धवट गरे तयार झालेला फणस आणत होते. आता कुयरीची भाजी करून बघायचीय.

वेसवारच्या माहिती/कृतींसाठी सर्वांचे अनेक आभार.

सिंडे, फोटो काय तोंपासू आलाय!!

>>> गूळ व मसाला योग्य प्रमाणात पडला तर अफलातून चवीचे रसायन तयार होते
हो, पण भाजीलाही अंगची एक आंबटसर चव असते. म्हणूनतर गुळाशी गूळपीठ. Happy

माझा नॉस्टॅलजीआ गऱ्याच्या भाजीबाबत होता >>> च्च! आता गर्‍याची भाजी करावी लागेल Wink

फोटो काय तोंपासू आलाय!! >>> धन्यवाद Happy

>>> माझी आई नुसत्या हिंग, मोहरी, हिरवी मिरची च्या फोडणीवर फणसाची भाजी करते.
वा वा! माझी आई एक 'कोरडी' व्हर्जन करते, त्यात फोडणीत लाल सुक्या मिरच्या आणि उडदाची डाळ घालते. वरून मीठ, साखरेची चिमूट आणि खोबरं-कोथिंबीर. Happy

आजच केली. काही मेंबरांना वाल नको म्हणून भिजलेले शेंगदाणे घालून केली. एकच संकेश्वरी मिरची घातली तर तिखट झाली. मग जरा गुळ, खोबरे वाढवले. पाहुण्यांना फार आवडली. बारक्या मेंबरानेही मुकाट खाल्ली.

चवळी , काळे वाटणे चणे, दाणे असं काही ही घालून करतात कुयरीची भाजी.

पण बेस्ट कॉम्बिनेशन ओले वालाचे दाणे आणि काजू दोन्ही घालायचे हे आहे.

मी शनिवारी केली ही भाजी. फ्रोझन तुरीचे दाणे आणि गोडा मसाला घालून. चिल्लर पार्टीने लूक्स लाइक पुल्ड चिकन म्हणून खाल्ली भाजी . इथे कधी कधी सोलाणे आणि भूईमुगाच्या शेंगा मिळतात. तेंव्हा तेही ट्राय करणार.

Pages