(कॅन्ड) फणसाची भाजी

Submitted by स्वाती_आंबोळे on 31 January, 2018 - 10:48
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१. १ कच्च्या फणसाचा कॅन (इथे Chaokoh नावाच्या ब्रॅन्डचा मिळतो)
२. तुरीचे दाणे आणि/किंवा काळे हरभरे आणि/किंवा शेंगदाणे आणि/किंवा तुमच्या आवडीचं कुठलंही कडधान्य. मटार गोडसर लागतात म्हणून ते नकोत. इथे तुरीचे दाणे फ्रोझन मिळतात ते मी कधीतरी वापरते.
३. एखादी लाल सुकी मिरची, कढीलिंबाची पानं
४. चवीनुसार हिरव्या मिरच्या, मीठ, गूळ आणि काळा/गोडा मसाला
५.फोडणीचं साहित्य - तेल, मोहरी, जिरं, हिंग, हळद
६. खोबरं, कोथिंबीर

क्रमवार पाककृती: 

१. कॅनमधलं पाणी काढून फणसाच्या फोडींत पाणी न घालता त्या कुकरमध्ये वाफेवर शिजवून घ्याव्यात.
(कुकरमध्ये खाली नेहमी घालतो तसं पाणी घालायचं - सांगायला नको, पण शंकेला जागा राहू नये म्हणून लिहीते आहे.)
जे/जी कडधान्यं किंवा शेंगदाणे घालायचे असतील ते त्याचबरोबर, पण त्यात पाणी घालून शिजवून घ्यावेत.
मी सहसा (कुकरच्या Proud ) दोन शिट्ट्या येऊ देते.
faNas_can.jpg

२. फोडी शिजल्या की हव्या त्या आकारात चेचून्/चिरून घ्याव्यात.
३. तेलात मोहरी, हिंग, जिरं आणि हळद घालून फोडणी करावी. त्यात कढीपत्ता, लाल मिरची, हिरव्या मिरच्या घालाव्यात. आवडत असतील तर कोथिंबिरीचे देठ बारीक चिरून घालावेत - छान स्वाद येतो.
४. त्यावर शिजवून घेतलेल्या फणसाच्या फोडी आणि कडधान्य घालावं आणि छान परतून घ्यावं.
५. चवीनुसार मीठ, काळा/गोडा मसाला, गूळ घालावा. खोबरं (सढळ हाताने) घालावं.
६. अंगासरशी पाणी घालावं आणि झाकण ठेवून दोन दणदणीत वाफा येऊ द्याव्यात म्हणजे भाजी छान मिळून येते.
७. आवडीनुसार रस ठेवून भाजी शिजली की गॅस बंद करावा, मग दोन मिनिटांनी कोथिंबीर घालून ढवळून घ्यावी.
८. वाढण्यासाठी भांड्यात काढल्यावर वरून खोबरं कोथिंबीर घालावी.
faNas_bhaji.jpg

वाढणी/प्रमाण: 
चार जणांसाठी पुरेशी होते
अधिक टिपा: 

१. कुकरचा वेळ 'लागणार्‍या वेळा'त धरलेला नाही.
२. फणस आणि कडधान्य आधी निराळं शिजवून घेण्याऐवजी भाजी प्रेशर पॅनमध्येच केली तरी चालेल असं वाटतंय. पुढच्या वेळी तशी करून बघेन आणि त्याबद्दल इथे लिहीन. (म्हणजे भाजी कशीही झाली तरी त्यानिमित्ताने धागा पुन्हा वर येईल. Proud )

मायबोलीवरच फणसाच्या भाजीच्या अनेक रेसिपीज आहेत, त्यात ही माझी भर. Happy

माहितीचा स्रोत: 
१. आई - भाजीची ही पारंपरिक रेसिपी तिने शिकवली. २. मिनोती - कॅन्ड फणस कुकरमध्ये शिजवून वापरायची आयडिया तिने सांगितली.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त आहे रेसिपी. कोथिंबीर देठ घालण्याची आयडिया आवडली, करून बघेन. फोटो बघून भूक लागली.

मी गावाहून फणस कुयरी येते तेव्हाच करते, क्वचित ओगले चिरलेला फणस मिळतो त्याची करते. साहित्य साधारण हेच आमचंही. मी यात गोडा मसाल्या बरोबर वेसवार घालते. वेसवार सासरच्या रेसिपीत मस्ट. माहेरी माहीती नव्हतं, तिथे गोडा मसाला फक्त. शेंगदाणे आणि हरबरे घालून करते मी. फोडणी करून सर्व घालून भाजी कुकरमध्ये करते तीन शिट्या काढून वरून परत सांडगी मिरचीची फोडणी देते. फणस नवरा चिरून देतो त्याला शिजवून घेऊन आवडत नाही. असो मला चिरायला लागत नाही Lol

मला डाळी ओळखता येत नाहीत, सौ. कधी उसळ करून सांगते ही मुगाची उसळ आहे, ही चवळीची आहे, मी बर म्हणतो.
तशी मला डाळींची आवड नाही.
मला दाण्यापेक्षा काजू आवडतात. तर तेहि शिजवून घ्यायचे का?

हे कॅन्ड फणस किंवा एकुणच कॅन्ड काहीही आणलं की रेफ्रिजरेटरमध्ये ठेवतात की साध्या कपाटात?

अर्थातच साध्या. ते स्टोअर करतानाही बाहेरच असतात की. कॅन्ड वस्तू एकदा ओपन केल्या की उरलेल्या दुसर्‍या डब्यात काढून फ्रिजमध्ये ठेवणं अपेक्षित आहे.

नंद्या, काजू थोडावेळ भिजवून ठेवले तर आधी कुकरमध्ये नाही शिजवून घेतले तरी चालतील असं वाटतं - भाजी फोडणीला घालण्याआधी फोडणीतच थोडे परतून घेतले तर रश्शाबरोबर शिजायला हवेत.

सिंडे, सायो इज म्हणिंग द राइट. कॅन उघडल्यावर जिन्न्स रेफ्रिजरेट करावे लागतात - आणि लवकरात लवकर संपवलेलेही बरे.

फणसाची एक कॅन ची भाजी संपत नाही का तुमची एका वेळेला? माझी तर उरली तरी फार थोडी उरते नेहमी एक सर्व्हिंग इतकी.

ही संपते, पण उदा. बेबी कॉर्न, स्लाइस्ड ऑलिव्ह्ज, नारळाचं दूध वगैरे नेहमी सगळं संपतंच असं नाही - कधी दीड कॅन लागतो आणि अर्धा उरतो.

ज्यांना मासे/सुके मासे आवडतात त्यांच्याकरता... यात फणस कसा चिरावा याची ही कृती आहे.
मुग्धा कर्णिक यांचा हा ब्लॉग आहे. कच्च्या फणसाची भाजी- अर्थात सुकटवाली

वेसवार हा खास कोकणात वापरला जाणारा एक मसाला आहे. काळा मसाला/मालवणी मसाला याटाइप स्पाइस मिक्स.
घटक पदार्थ मला माहिती नाहीत पण देवगडजवळ राहणारी आत्या आम्हाला नेहेमी पाठवायची वेसवार.
इथे मनीमोहोर आणि आणखीही कोकण फूड कल्चर नीट माहिती असणार्‍यांना कृती माहिती असेल. अंजूला पण Happy

हो वेस्वार हा आमच्या देवगड तालुक्यातील एक पदार्थ आहे. हा मेतकुटासारखा भातावर घालून ही खातात म्हणजे गरम भात तूप आणि त्यावर वेस्वार किंवा दहिभात आणि त्यात वेस्वार. जेवताना वेस्वार आणि त्यात तेल किंवा दही घालून एक तोंडीलावण ही मस्त बनत. दही पोहे केले तर त्यात ही बेस्ट लागतो. तसेच मसाल्या ऐवजी भाज्यात, तसेच फोडणीच्या भातात घालतात.

पूर्वी गोडा मसाला कोकणात तसा जपूनच वापरला जाई . मसाल्याचे जिन्नस सगळे विकत आणावे लागत . त्यामानाने वेस्वार हा घरात असलेले जिन्नस वापरून केला जातो म्हणून असेल . सगळ्या उसळी, पडवळाची , दुधीची , लाल भोपळ्याची, फणसाची ह्या भाज्यांमध्ये मसाला न घालता वेस्वार अजून ही घातला जातो . पडवळाची भाजी तर वेस्वार घातला की खूप वेगळी आणि चांगली लागते.

मी इथे ठाण्याला अजून एकदा ही केला नाहीये कारण नेहमी गावाहूनच पुडी येते . पण कृती माहितेय, ती अशी :

एक वाटी तांदूळ , ( बासमती किंवा कोलम वैगेरे न घेता गावठी घेतले तर जास्त चांगले ) एक वाटी लाल मिरच्या ( हो.. एक वाटी , हा थोडा तिखटच असतो ), एक छोटा चमचा मेथी दाणे आणि एक छोटा चमचा मोहरी हे सगळं भाजायचं आणि मग दळायच. नंतर त्यात थोडा हिंग आणि मीठ मिसळून सारखं करायचं . झाला वेस्वार तयार.

इथे पण एक रेसिपी सापडली . पण वेसवाराच्या खालीच मोजीटो (?) ची कृती देऊन त्यात ' हे वेगळे ड्रिंक जड जेवण झाल्यानंतर अवश्य प्यावे. खूप पाचक व चविष्टही आहे.' असे लिहिले आहे. त्यामुळे वेसवाराची कृती देखील किती पारंपारिक आणि किती स्व रचित आहे देव जाणे

https://www.loksatta.com/vaachakshef-news/food-recipes-27-1204196/

मायबोलीवर पण आहे एक रेसिपी https://www.maayboli.com/node/44285

वेसवार आम्ही कोकणातून आणतो. सध्या पुण्याच्या नणंदेने दिलाय. हेमाताई आख्खे उडीद किंवा उडीदडाळ लिहायला विसरल्या बहुतेक. तोही महत्वाचा घटक आहे. प्रमाण नाही सांगू शकत मी पण जास्त घालतात, तांदुळापेक्षा कमी. विचारेन रीतसर प्रमाण कोणालातरी.

मला वेसवार थोडा सांबार मसाल्याच्या जवळ जाणारा वाटतो चवीला त्यामुळे मी इडली केली की आमटीत सांबार मसाला न घालता हा घालते अर्थात सांबराएवढं छान नाही होत पण जवळ जाणारी चव आहे. भाज्या बाकी सांबरात घालतो त्याच घालते. मला मऊभातावर हा नाही आवडत पण उसळी, आमटीत आवडतो. मेतकुट घेते मी मऊभातावर पण नवरा वेसवार घेतो, त्याला तेच आवडतं.

लोकसत्तामध्ये धने आणि हळद लिहिलीय. या गोष्टी नाही घालत बहुतेक आम्ही. तरी मी विचारेन, वेगवेगळ्या ठिकाणची वेगवेगळी पद्धत असू शकेल.

येसर मराठवाड्यातले, वेसवार कोकणातले Happy

फळे, भाज्या किंवा कुठलेही अन्न canned करतात तेव्हा हवाबंद करतात ज्यामुळे आत जंतू वाढत नाहीत. एकदा उघडले की बाहेरची हवा आत जाते, त्यामुळे फ्रिजात ठेवायचे असले तरी लवकर संपवलेले बरे. नंतर फेकून द्यायच्या लायकीचे होते.

कॅन्ड वस्तू म्हणजे टोमॅटो प्युरे किंवा नारळाचं दूध वगैरे कॅन ओपन केल्यावर जरी लगेच दुसर्‍या डब्यात काढून फ्रिजमध्ये ठेवलं तरी फार टिकत नाही हे खरं आहे. एक दोन दिवसात संपवलेलं बरं.

Pages