(कॅन्ड) फणसाची भाजी

Submitted by स्वाती_आंबोळे on 31 January, 2018 - 10:48
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१. १ कच्च्या फणसाचा कॅन (इथे Chaokoh नावाच्या ब्रॅन्डचा मिळतो)
२. तुरीचे दाणे आणि/किंवा काळे हरभरे आणि/किंवा शेंगदाणे आणि/किंवा तुमच्या आवडीचं कुठलंही कडधान्य. मटार गोडसर लागतात म्हणून ते नकोत. इथे तुरीचे दाणे फ्रोझन मिळतात ते मी कधीतरी वापरते.
३. एखादी लाल सुकी मिरची, कढीलिंबाची पानं
४. चवीनुसार हिरव्या मिरच्या, मीठ, गूळ आणि काळा/गोडा मसाला
५.फोडणीचं साहित्य - तेल, मोहरी, जिरं, हिंग, हळद
६. खोबरं, कोथिंबीर

क्रमवार पाककृती: 

१. कॅनमधलं पाणी काढून फणसाच्या फोडींत पाणी न घालता त्या कुकरमध्ये वाफेवर शिजवून घ्याव्यात.
(कुकरमध्ये खाली नेहमी घालतो तसं पाणी घालायचं - सांगायला नको, पण शंकेला जागा राहू नये म्हणून लिहीते आहे.)
जे/जी कडधान्यं किंवा शेंगदाणे घालायचे असतील ते त्याचबरोबर, पण त्यात पाणी घालून शिजवून घ्यावेत.
मी सहसा (कुकरच्या Proud ) दोन शिट्ट्या येऊ देते.
faNas_can.jpg

२. फोडी शिजल्या की हव्या त्या आकारात चेचून्/चिरून घ्याव्यात.
३. तेलात मोहरी, हिंग, जिरं आणि हळद घालून फोडणी करावी. त्यात कढीपत्ता, लाल मिरची, हिरव्या मिरच्या घालाव्यात. आवडत असतील तर कोथिंबिरीचे देठ बारीक चिरून घालावेत - छान स्वाद येतो.
४. त्यावर शिजवून घेतलेल्या फणसाच्या फोडी आणि कडधान्य घालावं आणि छान परतून घ्यावं.
५. चवीनुसार मीठ, काळा/गोडा मसाला, गूळ घालावा. खोबरं (सढळ हाताने) घालावं.
६. अंगासरशी पाणी घालावं आणि झाकण ठेवून दोन दणदणीत वाफा येऊ द्याव्यात म्हणजे भाजी छान मिळून येते.
७. आवडीनुसार रस ठेवून भाजी शिजली की गॅस बंद करावा, मग दोन मिनिटांनी कोथिंबीर घालून ढवळून घ्यावी.
८. वाढण्यासाठी भांड्यात काढल्यावर वरून खोबरं कोथिंबीर घालावी.
faNas_bhaji.jpg

वाढणी/प्रमाण: 
चार जणांसाठी पुरेशी होते
अधिक टिपा: 

१. कुकरचा वेळ 'लागणार्‍या वेळा'त धरलेला नाही.
२. फणस आणि कडधान्य आधी निराळं शिजवून घेण्याऐवजी भाजी प्रेशर पॅनमध्येच केली तरी चालेल असं वाटतंय. पुढच्या वेळी तशी करून बघेन आणि त्याबद्दल इथे लिहीन. (म्हणजे भाजी कशीही झाली तरी त्यानिमित्ताने धागा पुन्हा वर येईल. Proud )

मायबोलीवरच फणसाच्या भाजीच्या अनेक रेसिपीज आहेत, त्यात ही माझी भर. Happy

माहितीचा स्रोत: 
१. आई - भाजीची ही पारंपरिक रेसिपी तिने शिकवली. २. मिनोती - कॅन्ड फणस कुकरमध्ये शिजवून वापरायची आयडिया तिने सांगितली.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त दिसतेय! मी यात आलं लसूण पण घालते.
बाकी फणसाची भाजी सायो, स्वाती आणि परदेसाईंनीही लिहिली आहे, म्हणजे कच्चा फणस फक्त बागराज्यातच पिकतो की काय असे वाटावे Wink

शंकेला सुद्धा जागा राहाणार नाही एवढं पाणी घातल्यावर मग त्यातच कडधान्य कुठे नी कसं घालायचं?

एवढ्या बाराकरांनी कच्च्या फणसाची रेसिपी लिहिली म्हटल्यावर बागराज्यात फणस पिकत(च) नाही असं म्हणा Proud

कुकरच्या एका भांड्यात पाणी न घातलेल्या फणसाच्या फोडी आणि दुसर्‍या भांड्यात पाणी घातलेलं कडधान्य.
(तिसर्‍या भांड्याला जागा असेल तर त्यात घ्या शंका Proud )

छान.
>> एवढ्या बाराकरांनी कच्च्या फणसाची रेसिपी लिहिली म्हटल्यावर बागराज्यात फणस पिकत(च) नाही असं म्हणा
Lol
मसूरांसारखे फणस ही स्लो असतील.

कोकणातली माणसं असली की फणस असणारच हमखास! (आमच्या बेकरीतही आहेत कोकणातली माणसं Wink )

>>फणस आणि कडधान्य आधी निराळं शिजवून घेण्याऐवजी भाजी प्रेशर पॅनमध्येच केली तरी चालेल असं वाटतंय.>> इंपॉ घेऊन टाका.
यापेक्षा फार वेगळ्या रेसिपीने करत नाहीच. पण फक्त मला एकटीलाच जरा जास्त आवडत असल्याने फार केली जात नाही.

Boiled chestnuts सेम फणसाच्या आठलानसारखे लागले...आता हे आणि फणस एकत्र आणायचा योग आला की करणार ही भाजी.

Btw brazil nut म्हणजे आठला का?

पाकृ छान आहे, आमच्या इथे फ्रेश वापरून करता येईल.

अवांतर, कच्च्या भाज्या canned केल्यावर त्यांची मूळ चव शिल्लक राहते का?

मी पाकिटातले (फ्रोझन) तुकडे व शेंगदाणे व कोल्हापुरी मसाला घालून केली.
छान झाली.
मुळात फणसाची भाजी करतात हेच मला नवीन होते.
पॅन ला चिकटपण येण्याची भिती होती पण तसे झाले नाही.
वासही तितकासा उग्र नव्हता.

विकु फुकट हो फुकट बाराकर तुम्ही. फणसाची भाजी माहित नव्हती ?? बर आता केली तर वेगळी रेसिपी लिहा मग प्रथेप्रमाणे . कारण तुम्ही जी केलीय त्याचा या मूळ रेसिपीशी काही संबंध नाहीच आहे नाहीतरी Lol

... Happy

गलति से मिश्टेक, माफी.

>>> अवांतर, कच्च्या भाज्या canned केल्यावर त्यांची मूळ चव शिल्लक राहते का?
पूर्वी वालाचे दाणे वापरले होते ते आवडले नव्हते, पाणचट लागले होते. पण हा फणस, बेबी कॉर्न, चायनीज पदार्थांत घालण्यासाठी शिंगाड्याच्या चकत्या हे प्रकार कॅन्ड चांगले वाटले. त्यामुळे 'थंब रूल' असा काही नाही सांगता येणार मलातरी.

कॅन मधला राजमाही चांगला असतो.
फणसची भाजी पहिल्यांदा केल्याने उग्र वासाच्या भितीने कोल्हापुरी मसाला घातला.
गायकापेक्षा तबलजीचाच आवाज मोठा यावा असे काहिसे झाले.
थोडे तुकडे आहेत आता मूळ रेसिपी करेन.

तुमच्या रेसीपी नेहमी ऑथेंटिक व निगुतीने केले ल्या असतात. कोथिंबीर देठ वापरायची आयडिया करेक्ट आहे. सर्व फ्लेवरिंग तिथेच असते. आम्ही पुणेकर त्यात देशस्थ. त्यामुळे फण स काय असतो ते देखि ल पाहिलेले नाही. दोन बटाटे उकडून करून बघेन.

अहो अमा नको नको Happy फणस तो फणस च. फ्लेवर, टेक्स्चर सगळंच मॅटर करेल. मिळेल की तुम्हाला तिथे.
मी आज घेऊन आले आहे चाको चा कॅन. आता आज-उद्या या रेसिपीने करणार चान्स मिळाला की.

अमा, प्लीज फणस आणूनच करा.
पुण्यातल्या सदापेठेत हातगाडीवर गरे विकणारी माणसं कापे म्हणून बरके नि बरके म्हणून कापे गरे सर्रास गळ्यात मारतात तसं भाजीच्या फणसातही फसवतात हे मी प्रत्यक्ष बघितलंय. फणसाचा सीझन सुरू होईल तेव्हा पुण्यात असाल तर खात्रीच्या दुकानात जाऊन भाजीचा फणस आणा. भाजीसाठीचा (कुयरी किंवा पार्‍याचा म्हणतात) फणस मागा. बहुतेक शनिपाराशी देसाई बंधूंकडे असतो सीझनमधे. किंवा तिथेच सुर्वे बंधूंकडे. मुंबईची माहिती नाही. अगदीच शंका वाटली तर पुरेसं आधी मला विपुत कळवा. मी चांगला भाजीचा फणस मिळवून देईन. Happy

अमा, सध्या कच्चा फणस मिळतोय, अगदी बारक्या 6 इंची कुयऱ्यापासून गरे तयार होत असलेला कोवळा ह्या रेंजमध्ये मिळतोय. मी कालच आणलेला. भाजी मस्त झालेली अर्थातच.

रच्याकडे, वास फक्त पिकलेल्या फणसालाच येतो आणि तोही चांगला वास येतो. :). कच्च्या फणसाला वास आल्याचे मला तरी आठवत नाही.

मस्त रेसिपी. आम्ही ही अशीच करतो. हे जानेवारी फेब्रुवारी चे दिवस म्हणजे कुयरीच्या भाजीचे दिवस. इथे देशात ताजा फणस सहज मिळतो त्यामुळे कॅन मधल्या फणसाची भाजी अजून खाल्ली नाहीये.

अर्थात परदेशात राहणाऱ्या लोकांसाठी डब्यातला फणस हे एक वरदानच आहे. तिकडे ताजा फणस मिळणं नंतर तो कापणं , चिरणं सगळं कठीणच आहे.

विकु, ह्या भाजीला जास्त मसाला झेपत नाही तरी ही खूप सुंदर चव असते.

फणस आणि कडधान्य आधी निराळं शिजवून घेण्याऐवजी भाजी प्रेशर पॅनमध्येच केली तरी चालेल असं वाटतंय. पुढच्या वेळी तशी करून बघेन आणि त्याबद्दल इथे लिहीन.
>>>> हे मी केलेलं आहे. उत्तम भाजी होते. आत्ताच्या फॅशन्प्रमाणी इंस्टंट पॉट मध्ये मात्र अजून ट्राय केलेलं नाही Happy

येस येस, फणसाला पर्याय नाही. ब्याडवर्डटाटा तर मुळीच नाही! Happy

>>> तिकडे ताजा फणस मिळणं नंतर तो कापणं , चिरणं सगळं कठीणच आहे.
हो हो! ते खरंतर सुखच वाटतं.
अमा, फणस मिळेल तेव्हा चिरताना हातांना आणि विळी/सुरीच्या पात्याला तेल लावायचं. नाहीतर त्याचा चिकट राप बसतो.

शूम्पे, परफेक्ट! धन्यवाद. Happy

मी जनरली चवळी घालते फणसाबरोबर. कारण आधी भिजवावी लागत नाही. आणि शिजून चेंदामेंदा होत नाही मटकीसारखी. फणस आणि चवळी एकाच भांड्यात कुकरला लावते.

शिजून चेंदामेंदा>>>> सायो ओट्यापाशी उभी आहे आणि चेंदामेंदा झालेली भाजी बघून वैतागली आहे असं दृश्य डोळ्यासमोर आलं! Proud (ती तशी होत नाही हे तिने लिहिलेय तरी. यात पहिली ती म्हणजे भाजी आणि तिने म्हणजे सायोने! Wink )

मी मध्ये प्रेशर पॅन मध्ये केली फणसाची भाजी तेव्हा खरतर फणस फ्रोजन मिळालेला वापरला होता, कॅन मधला नव्हे. फ्रोजन फणस पण छान होता.

Pages