दत्त खुळी

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 6 January, 2018 - 08:30

अनवाणी पावलांनी
तंद्री लागलेल्या मनानी
ती भटकते पाऊस पांघरुनी
कृष्णेच्या काठावरती
उंच उंच घाटावरती

उभी राहते
पादुकांसमोर ठाण मांडूनी
पाय रोवूनी
ओरडणाऱ्या
सुरक्षा रक्षकांकडे
चक्क दुर्लक्ष करुनी
हट्टी मुलीसारखी
डोळ्यात पाणी आणूनी

आणि बोलत राहते भरभरुनी
महाराजांविषयी
शब्दात जीव ओतूनी
तेव्हा तिच्या त्या शब्दातून
डोळ्यातून
अन स्वरातून
ओसंडत असते
विलक्षण श्रद्धा अन प्रेम
तो कैफ लागताच
आमच्या रुक्ष पणाला
या मनाच्या बाभळीही
जातात चंदनी होऊनी

तशी ती पक्की व्यवहारी
नीटस संसारी
पण इथे आली की जाते होऊनी
आत्ममग्न संन्यासिनी
अन् मला सारखं वाटत राहते
तिच्या भोवती
महाराज नक्कीच आहेत म्हणूनी

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

Group content visibility: 
Use group defaults

विलक्षण श्रद्धा अन प्रेम
तो कैफ लागताच
आमच्या रुक्ष पणाला
या मनाच्या बाभळीही
जातात चंदनी होऊनी>>> अप्रतिम
खुप सुंदर कविता

आहा..... अप्रतिम रचना! Happy

<<तिच्या भोवती
महाराज नक्कीच आहेत म्हणूनी <<< ___/\___

खूप सुंदर!

शनिवारीच कृष्णाकाठच्या दत्तस्थानी गेले होते. गुरुचरित्र १८ वा अध्याय कथा जिथे घडली त्या ठिकाणीही जाऊन आले. आणि आज ही रचना नजरेस पडली.

अवधूतचिंतन श्रीगुरुदेव दत्त

कविता ६ जानेवारीलाच म्हणजे शनिवारीच post केलेली दिसतेय. तुम्ही पण होता काय त्या दिवशी नरसोबाच्या वाडीला?