अण्णा

Submitted by बोबो निलेश on 20 November, 2017 - 00:02

अण्णा
-----------

एम.बी.बी.एस. झाल्यावर मी निर्णय घेतला आता आपण प्रॅक्टिस करायची ती एखाद्या खेडेगावात. माझ्या या निर्णयाचं सगळ्यांना आश्चर्य वाटलं. पण मी माझ्या निश्चयावर ठाम होतो. आणि त्यानुसार कोकणातल्या त्या निसर्गरम्य खेड्यात मी डॉक्टरकीला सुरुवात केली. पैसा अर्थातच भरपूर नव्हता. पण पोटापुरतं मिळत होतं. पण विशेष म्हणजे शहराची धावपळ नव्हती. स्वस्थ निवांत आयुष्य चाललं होतं.
अशात एके दिवशी क्लिनिकवर रंगा बोलवायला आला. शेजारच्या वाडीत कुणीतरी वृद्ध गृहस्थ आजारी होते. मी नाव विचारलं.
“अण्णा दळवी”,रंगा म्हणाला.
“अण्णा दळवी?” मला नाव ओळखीचं वाटलं.
“अण्णा दळवी म्हणजे ते प्रसिद्ध लेखक 'श्री.ना. दळवी' का रे?”, मी रंगाला विचारलं.
"हो. तेच ते. शहराच्या वातावरणाला कंटाळून आले आहेत. आणि हे तर त्यांचं जन्म गाव."
"अच्छा."
"वय झालंय त्यांचं. आजकाल त्यांची तब्येत थोडी नरमच असते."
"काय त्रास होतोय त्यांना?"
"थोडीशी चक्कर आल्यासारखं वाटलं."
"ठीक आहे.चला जाऊ या."
मी बाईक काढली.रंगा मागे बसला. रंगाने सांगितलेल्या मार्गाने आम्ही एका घराजवळ आलो. घर बर्‍यापैकी भारदस्त होतं. नुकतंच रिनोव्हेशन झाल्यासारखं वाटत होतं.
पडवीवर बरेच लोक बसले होते. बहुधा कसलीतरी मीटिंग चालली होती. एक तरुण अधिकारवाणीने काहीतरी सांगत होता आणि जमलेले लोक त्याचं बोलणं मनापासुन ऐकत होते. रंगाला पाहताच तो तरुण उठुन पुढे आला. त्याने आम्हाला नमस्कार केला
"हे कार्यसम्राट गणासाहेब. अण्णांचे सुपुत्र आणि आमच्या गावचे तरुण तडफदार नेते." रंगाने त्या तरुणाची ओळख करून दिली. मी नमस्कार केला.
गणा म्हणाला,"बरं झालं डॉक्टर, तुम्ही लगेच आलात.अण्णा आत आहेत. पलंगावर झोपले आहेत. तुम्ही व्हा पुढे. मी जरा ही मिटींग आटपुन आलोच."
मी अण्णांच्या खोलीचा दरवाजा हळूच उघडला. अण्णा पलंगावर झोपले होते. दाराचा आवाज ऐकून ते कुशीवर वळले. एका प्रसिद्ध लेखकाला आपण भेटतो आहोत या जाणीवेने मी हरखुन गेलो होतो.
"या डॉक्टर साहेब."ते अर्धवट उठत म्हणाले.
"उठू नका. आरामात पडून राहा."मी त्यांना म्हणत आत गेलो.
त्यांच्या बिछान्याच्या बाजूला बसत मी विचारलं,"कसे आहात अण्णा?"
"बरा आहे.अधून मधून जरा त्रास होतो. पण चालायचं.असं व्हायचंच वयोमानाप्रमाणे. अधून मधून गोष्टी,माणसं विसरायला होतात."
मी त्यांचं ब्लड प्रेशर बघितलं. ते थोडंसं वाढलं होतं.
"अण्णा, ब्लड प्रेशर वाढलं आहे थोडंसं. औषधं घ्या वेळेवर आणि पथ्य पाळा.थोडं हिंडा फिरायला सुरुवात करा. जर भेटा नातेवाईकांना,मित्रांना वगैरे.गप्पा मारा."
अण्णांचा चेहरा उजळला.
"बरं झालं तुम्ही म्हणालात म्हणून. जरा समजवा आमच्या गणाला. किती सांगतो त्याला जर मला ने माझ्या मित्रांकडे. बाबी,सदा,नारू. माझे जीवाभावाचे सोबती. एवढे दिवस झाले गावी येउन पण अजून काही योग आला नाही त्यांना भेटायचा. सांगून थकलो आमच्या गणाला.पण तो सारखा आळस करतो. आज जाऊ,उद्या जाऊ म्हणून चाल ढकल करतो. मला ठाऊक आहे, तो समाजकारणात बिझी आहे. पण स्वतःच्या बापासाठी थोडा वेळ काढायला नको का?
मी भेटायला जाईन म्हणता म्हणता परवा शेवटी जीजी मला भेटून गेला. तुम्ही ओळखत असालच त्याला."
"नाही अण्णा. मी तसा नवीन आहे या गावात."
"अहो जीजी म्हणजे एक वल्ली आहे. पण माणूस एकदम दिलदार.एकदम मेहनती. शिवाय धार्मिक माणूस. तुम्ही ते कोपऱ्यावरचं देऊळ पाहिलंच असेल रवळ नाथाचं. ते बांधण्यासाठी यानेच पुढाकार घेतला होता. काय काय खटपटी-लटपटी त्याने केल्या म्हणून सांगू तुम्हाला. मोठमोठ्या दानशूर माणसांना गाठून त्यांचं मन वळवलं. मोठमोठ्या देणग्या मिळवल्या.कित्येक महिने झटला आणि शेवटी ते देऊळ उभारलं. खरंच ते दिवसच वेगळे होते. परवा तो आला आणि तासभर तरी गप्पा मारत होता माझ्याशी. त्याच्या सहवासात वेळ कसा गेला तेच कळलं नाही."
"मी सांगून बघतो गणा भाऊंना. डॉक्टरचा सल्ला म्हणून तरी ते मनावर घेतील." मी हसत म्हटलं.
"बाकी आजकाल लिखाण कसं चाललंय तुमचं? गावच्या प्रसन्न वातावरणात नवीन काही सुचलं की नाही?" मी विचारलं.
"अरे वा. तुम्हाला माहिती दिसते माझ्याविषयी."
"अण्णा, तुम्हाला कोण ओळखत नाही? मराठी साहित्यात तुमचं नाव मोठ्या आदराने घेतलं जातं. कोकणच्या पार्श्वभूमीवर लिहिलेल्या तुमच्या कादंबऱ्या तर राष्ट्रीय पातळीवर नावाजल्या गेल्या. बऱ्याच भारतीय भाषांमध्ये त्याची भाषांतरं झाली. शिवाय लक्षणीय साहित्यासाठीचा साहित्य अकादमीचा पुरस्कारसुद्धा मिळाला तुम्हाला."
"अरे वा, पेशाने डॉक्टर असलात तरी मराठी साहित्याबद्दल बरीच माहिती दिसते तुम्हाला. मराठी पुस्तकं वाचता असं दिसतं."
यावर मी ओशाळा हसलो,"अण्णा, तुमचं जास्त वाचलं नाही कारण माझा ओढ करमणूकप्रधान साहित्याकडे होता. रहस्यकथा,गुढकथा वगैरे.पण नंतर कॉलेजमध्ये गेल्यावर ते वाचनसुद्धा सुटलं."
"ठीक आहे. काही तरी का होईना, पण वाचत होता हे काही कमी नाही."
"बरं आहे तर अण्णा. निघतो मी आता. काळजी घ्या तब्येतीची. आवडत्या गोष्टींमध्ये मन रमवा.लिखाण चालू ठेवा.आवडत्या माणसांना भेटा."
"जरूर. तेवढं गणाला सांगायला विसरू नका, मला माझ्या मित्रांकडे घेऊन जायला सांगायचं."
"जरूर अण्णा. पुन्हा येईन मी उद्या तुम्हाला भेटायला."
अण्णांचा निरोप घेऊन मी त्यांच्या खोलीतून बाहेर आलो. बाहेर गणा अजुनही मिटींगमध्ये बोलत होता. मला बघून तो पुन्हा उठुन आला आणि म्हणाला,"एवढ्या लवकर आटपलंसुद्धा तुमचं? मी नेमका इथे बाहेर बोलत बसलो, ते आत यायला मिळालंच नाही. बाकी कशी आहे अण्णांची तब्येत?"
"तसं विशेष काळजी करण्याचं कारण नाही. ब्लड प्रेशर जरासं वाढलं आहे. या गोळ्या घेऊन या आणि त्यांना द्या आठवणीने जेवणानंतर सकाळ-संध्याकाळ."
मी कागदावर गोळ्यांची नावं लिहून तो कागद गणाकडे दिला.
"ठीक आहे. मी आताच बाजारातुन ही औषधं मागवुन घेतो. बरं, तुमची फी?"
मी फी सांगितली. गणाने खिशातुन कोर्‍या करकरीत नोटा काढुन माझ्या हातात ठेवल्या.
मी जायला निघालो.
अचानक आठवल्यामुळे वळलो आणि गणाला म्हणालो,"आणि हो गणाभाऊ, एक गोष्ट सांगायला विसरलो. औषधाबरोबरच आणखी एका गोष्टीची काळजी घ्या."
"कसली काळजी?" गणाने विचारलं.
"अण्णांना माणसांची आवड आहे. त्यांना नुसतं घरात ठेवू नका. आता या वयात त्यांच्या चित्तवृत्ती प्रसन्न राहायची गरज आहे. त्यांना त्यांच्या मित्रांमध्ये मिसळू द्या. त्यांचे काही मित्र इथेच गावात राहतात. त्यांच्याकडे घेऊन जा त्यांना भेटायला.काय बरं नावं सांगितली त्यांनी?" मी आठवू लागलो.
"बाबी, सदा, नारू, जीजी बद्दल सांगत होते का ते?" गणाने विचारले.
"अगदी बरोबर", मी म्हटलं.
गणा विषण्णपणे हसला आणि म्हणाला,"डॉक्टरसाहेब, तुम्ही अण्णांची पुस्तकं वाचलेली दिसत नाही."
"का? काय झालं?"मी गोंधळून विचारलं.
"डॉक्टर साहेब तुम्हाला सांगायला हरकत नाही. पण खरं सांगायचं तर, अण्णा सांगतात ती माणसंच अस्तित्वात नाहीत.”
“म्हणजे?”
“डॉक्टर साहेब. बाबी,सदा,नारू,जीजी ही सारी त्यांच्या कादंबर्‍यांमधली पात्रं. अण्णांची क्रिएटीव्हीटी म्हणजे त्यांचा शाप बनली आहे की काय असं कधीकधी मला वाटतं. वास्तव आणि कल्पनेतला फरकच आजकाल ते करू शकत नाहियेत."
गणा आणखीही बरंच काही सांगत होता आणि मी मात्र पुरता सुन्न झालो होतो..

************************************ समाप्त ************************************

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडली

मस्त

Pages