कांद्याची भाजी

Submitted by योकु on 14 November, 2017 - 11:07
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

- मध्यम कांदे असतील तर ५-६; मोठे असतील तर २-३, शॅलट्स/सांबार कांदा वापरणार असलात तर ओंजळभरून तरी हवेत.
- चवीनुसार मीठ
- अर्धा चमचा साखर
- पाव चमचा लाल तिखटपूड
- एक मोठा चमचा गोडा मसाला
- पाव चमचा हळद
- हिरव्या मिरच्या तिखटपणानुसार
- ३-४ कढीलिंबाची पानं
- तेल, मोहोरी, हिंग फोडणीकरता

क्रमवार पाककृती: 

घरामध्ये काही भाज्या नसतील आणि तरीही काही पटकन चविष्ट भाजी करायची असेल तर ही भाजी करून पाहा. फार तेल नाही, बेसन नाही, वाटण नाही...

- मोठे कांदे असतील तर मध्यम लांब चिरून घ्यावेत. मध्यम आकाराचे असतील तर जरा जाड उभे चिरावेत. शॅलट्स असतील तर सोलून एखादी चीर द्यावी मधून
- हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्याव्या
- लोखंडी कढई सणसणून तापू द्यावी
- पळीभर तेल घालून मोहोरी तडतडवावी मग चिमूटभर हिंग घालून लगेच कढीलिंबाची पानं आणि चिरलेला कांदा, मिरची टाकावी
- परतून घ्यावं; तेल सगळ्या भाजीला लागलं की मीठ, हळद, तिखट, मसाला, साखर घालावी (कांदा लाल करायचा नाहीय)
- अगदी पावकप कढत पाणी घालून भाजी शिजू द्यावी
- जरा पाणी घातल्यानी कांदा अगदीच २/४ मिनिटात शिजतो; तसा तो शिजला आणि पाणी राहिलं असेल तर मोठ्या आचेवर आटवून टाकायचं
- कांद्याची भाजी तयार आहे
- पोळी, चपाती, भाकरी, वरण - भात यांबरोबर मस्त लागते

फोटो

Onion Bhaji.jpg

वाढणी/प्रमाण: 
तोंडीलावणं
अधिक टिपा: 

- कांदा जरा गोडसर असतो पण ती चव यात घालवायची नाहीय
- तिखट आणि मसाला जरा चढा घालायचा म्हणजे मग मस्त लागते ही भाजी नाहीतर जास्तच गोडूस लागेल
- घरचा गोडा मसालाच वापरायचाय तरच अपेक्षीत चव साधेल
- गोड्या मसाल्याची एक रेस्पी इथे मिळेल
- मसाला काळपट असल्यानी भाजीला असा रंग येतो

माहितीचा स्रोत: 
आजी (आईची आई). ती ही भाजी लहान लहान आक्ख्या कांद्यांची करायची. फार सुंदर होते.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त दिसतेय.
आमच्याकडे कायम डाळीचं पीठ लावून करतात.

आमच्या कडे पण पीठ लावुन,
अजुन एक म्हणजे टोमॅटो घालुन.

आज अशी ही करुन बघणार. गोड्या मसाला ही करणार विक एंड ला

मस्त

माझी अत्यंत आवडती भाजी. मी पण कांदे लांब लांब चिरून तिखट मीठ, मसाला घालून करते. पण पाणी नाही घालत. गुळ घालते आणि त्यामुळे जे पाणी सुटते त्याला बांधिव इतकेच पीठ घालते (बेसन) खूप कोरडीठाक करत नाही.
आता तुझ्या पद्धतीने करून पाहिन.
तु एकदा जाडं भरडं शेंगदाणा कूट घालून बघ या भाजीत Happy

मस्त पाकृ योकु.
दक्षिणा, शेंगदाणा कूट ची आयडीया पण भारी वाटतेय.

कांद्याची एक व्हेरायटी. त्यातल्यात्यात जवळ जाणारे आणि आपल्या इथे मिळणारे म्हणजे सौदिंदिअन दुकानात मिळणारे सांबार कांदे. दोनांत आकारात फरक ऑलमोस्ट नाही पण चवीत असावा.

छान रेसिपी...

<<आमच्याकडे कायम डाळीचं पीठ लावून करतात.>>
----- यालाच झुणका म्हणतात ना?

>>यालाच झुणका म्हणतात ना?>> नाही. ही कांद्याची पिठ पेरून भाजीच. कोणत्याही भाजीला पिठ लावतात तेव्हा त्याचं प्रमाण मूळ जिन्नसापेक्षा कमीच असतं पण झुणका हा फक्त पिठाचाच असतो.