मुंबईतील लोकं थेंबथेंब पावसाला घाबरत का नाहीत?

Submitted by ऋन्मेऽऽष on 22 September, 2017 - 17:10

आज सायंकाळी गर्लफ्रेंडला भेटायची वेळ दिली होती. ऑफिसमधून निघालो, ट्रेनमधून उतरलो, स्टेशनबाहेर पडलो, हातातून मोबाईल काढला, वेळ चेक केली, व्हॉटसप चाळायला घेतले. आणि अचानक वरून थेंबथेंब पाऊस बरसायला लागला. मोबाईल भिजू नये म्हणून मी पटकन छत्री उघडली. उजव्या हातात छत्री आणि डाव्या हातात मोबाईल. चार मिनिटांचाच रस्ता चालायचा होता आणि समोरच्या नाक्यावर गर्लफ्रेंड भेटणार होती. ती तिथे आधीच पोहोचून माझी वाट बघत होती. रमतगमत यथावकाश मी सुद्धा तिथे पोहोचलो, तसे ती मला म्हणाली. "गेल्या तीन चार मिनिटांत मी ईथून शेकडो लोकांना जाताना पाहिले. कोणीही मला या रिमझिम पावसात छत्री उघडलेली दिसली नाही. अपवाद फक्त एक ते पलीकडले आजोबा, आणि त्यानंतर दूसरा तूच !... काय हे रुनम्या, म्हातारा झालास का... फिदी फिदी ... आणि मग गाणे गाऊ लागली. कुठले गाणे हे चाणाक्ष वाचकांना सांगायची गरज नाही.

पण खरेच, पाउस थेंबथेंब म्हटले तरी बरेपैकी पडत होता, पाच मिनिटे तसाच डोक्यावर झेलला तर केसांत सहज पाणी भरले असते. पण तरीही आजूबाजूला कोणीही छत्री न उघडता बिनधास्त ते पाणी अंगावर झेलत चालले होते. अर्थात मी देखील मोबाईल भिजू नये म्हणूनच छत्री उघडली अन्यथा मी सुद्धा त्यांच्यातलाच एक असतो. पण सविस्तर विचार करता मला जाणवले, खरेच मुंबईचा पाऊस जसा धमाल असतो तशीच मुंबईची लोकंही कमाल असतात. छोट्यामोठ्या पावसाला ते जराही दाद देत नाहीत. काय बरं असावी याची कारणे .. ??

थोडा विचार करता मला सुचलेली काही कारणे,

१) मुंबईकरांसाठी पाऊस म्हणजे तोच जो ट्रेन थांबवतो आणि रस्ता तुंबवतो. नुसते रस्ता ओला करून जाणार्‍या सरीला ते पावसात मोजत नाहीत. हलक्या फुलक्या पावसासाठी छत्री उघडणे म्हणजे गल्ली क्रिकेट खेळताना एखाद्या कच्च्या लिंबूसमोर हेल्मेट घालणे असे ते समजतात.

२) मुंबईकरांकडे वेळ नसतो. त्यांचा दिवस घड्याळ्याच्या काट्यावर पळत असतो. त्यामुळे ईटुकल्या पिटुकल्या पावसासाठी छत्रीची उघडझाप करण्यात ते वेळ वाया घालवत नाहीत.

३) एका मुंबईकरासाठी दुसर्‍या मुंबईकराने काढलेले सर्वात अपमानास्पद शब्द म्हणजे, "बंबई मे नया है क्या?"
त्यामुळे एखाद्या परिस्थितीत सर्वसाधारण मुंबईकराने जे करणे अपेक्षित असते तेच सारे करतात.

४) मुंबईकर मुळातच पावसाबाबत रसिक असतात. ट्रेन जेव्हा रखडतात तेव्हा थोडेफार त्रस्त होतात खरे. पण असा छोटामोठा पाऊस ते एंजॉयच करतात. मुंबईला दैवी समुद्र किनारा लाभल्याने पावसाळ्यात मुंबईचे वातावरण सहीच असते.

५) "चला आज छान पाऊस पडतोय तर घरीच थांबूया, भज्या खाऊया, चहा पिऊया", अश्या प्रकारे पावसाची मजा लुटणे हा प्रकार मुंबईकर फारसे करत नाहीत. तर कामानिमित्त घराबाहेर पडलेले असतानाच पावसाचे चार थेंब अंगावर झेलायचे सुख मिळवायचे आणि न थांबता आपले कामही करत राहायचे हि जी एक टिपिकल वृत्ती बहुतांश मुंबईकरांमध्ये आढळते तिलाच तर म्हणतात, मुंबई स्पिरीट Happy

अजून काही सुचेल तसे भर टाकतो .........
शुभरात्री !

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>मुंबईतील लोकं थेंबथेंब पावसाला घाबरत का नाहीत?<<
थेंबथेंब पावसाला घाबरत नाहित कारण त्याला घाबरलं कि छत्री न्यावी लागते. आणि छत्रीची सवय नसल्याने छत्री हरवायचीच शक्यता जास्त, मग घरच्यांचा ओरडा प्रत्येकवेळी. म्हणुन छत्री न्यायचीच नाहि आणि पावसाला हि घाबरायचं नाहि... Proud

(कॉलेज्/नोकरी करताना मी एकदाहि छत्री नेली नाहि; ऑटो/बस/ट्रेन्/शेअरटॅक्सीची पॉइंट-टु-पॉइंट सुपर कनेक्टिविटी असल्यामुळे).

पावसाळ्यात एकदा गाड्या खूपच लेट होत्या . ऑफिसला येण्यासाठी कल्याण स्टेशनला आलो . खूप वेळ लोकलची वाट पाहील्यावर पाय दुखू लागले . फलाट तुडुंब झालेले. गाडी आली तरी आत मध्ये जाण्याबद्द्ल साशंक होतो . तेव्हड्यात आम्ही थांबलेल्या फलाटावर पुण्याच्या दिशेने जाणारी गाडी येत आहे अशी उदघोषना झाली . मित्र म्हणाले लोणावळा फिरून येउ . एकाने तिकीटे आणली . अस्मादिक गाडीत चढले . लोणावळ्यात उपहारगृहात दुपारी जेवलो . रमत गमत चालत खोपोलीला सायंकाळी पोहचलो व तिथून रात्री घरी आलो . निसर्गाचा यथेच्छ आनंद घेतला . तात्पर्य अपवादात्मक परस्थितीतही मुंबईकर आनंदाचे पत्ते शोधू शकतो .

भज्या खाऊया, चहा पिऊया"
हा शब्द वाचून मला जाम हसायला आले. माझ्या मुलालाही अनेक वेळा सांगूनसुद्धा तो 'भजी' न म्हणता "भज्या" असेच म्हणतो. त्याचा सारख अजूनही कोणी आहे, हे बघून जरा बरं वाटल.
बाकी मुंबईच्या लोकांच पावसाबद्दलच मत मला काही माहित नाही. पण तुम्ही लिहलेली कारणं आवडली.

निर्झरा, अनेकवचन भजी हा योग्य शब्द आहे का? पुढच्या वेळी लक्षात ठेवायचा प्रयत्न करेन. जमल्यास एक लेख भजीपाववरच लिहून डोक्यात हा शब्द फिट्ट करायचा प्रयत्न करेन Happy

दत्तात्रयजी, भारी अनुभव आहे, आणि येस्स, मुंबईच्या पावसात जेव्हा अर्धी मुंबई बंद पडते तेव्हा असे अचानक धमाल पोग्राम बनतात. आणि थ्रिलिंग अनुभव देतात. एकदा मी एका आवडत्या मुलीच्या दर्शनासाठी पाऊस नुसता कोसळत असूनही घरातून बाहेर पडलो, पण ऑफिसला अखेरपर्यंत पोहोचलो नाही... पुढे जे झाले ते फारच ईंटरेस्टींग होते. कधीतरी वेळ काढून लिहायचा आहे तो अनुभव.

राज, शाळेत असताना एकदा मी एकाच सीजनमध्ये तीन छत्र्या हरवलेल्या. तेव्हापासून शाळाकॉलेजमध्ये मला छत्रीच नेऊ दिली नाही. कधीतरी अपवादानेच.

ह्याचं प्रमुख कारण म्हणजे मुंबईचे इन्फ्रास्ट्रक्चर कनेक्टिवीटी आणि सहज मिळणारा आडोसा. रिमझिम पाउस झेलत पटकन रिक्षा, टॅक्सी किंवा बस पकडून अंगावरील पाणी झटकून आरामात प्रवास करता येतो. रेल्वे स्टेशनच्या आसपासच बस स्टॉप, रिक्षा किंवा टॅक्सी स्टँड असल्याने उतरल्यावर लगेच रेल्वे स्टेशनमध्ये घुसता येते, मग बाहेर कितीही पाउस कोसळला तरी फिकीर नसते.
मुंबईला दैवी समुद्र किनारा लाभल्याने पावसाळ्यात मुंबईचे वातावरण सहीच असते.
सही.

मार्मिक गोडसे अगदी मार्मिक विश्लेषण. पटकन मिळणारा आडोसा. बरेचदा दुकानलाईन पकडून चालले तरी बराच प्रवास सुका होतो. आणि थांबावेही लागत नाही.
याऊपर डोक्याला रुमाल बांधले की जे थोडेथोडके पाणी डोक्यावर पडेल ते केसांपर्यण्त झिरपेपर्यंत पोहोचलोही..

मुंबईला दैवी समुद्र किनारा लाभल्याने..........

या वाक्याने अजून गदारोळ कसा नाही उठला???

विद्येचं माहेरघर, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आदी बिरुदावल्या मिरवणाऱ्या शहरातील लोकांच्या नाकाला मिरच्या झोंबल्या नाहीत वरील वाक्य वाचून???? Proud Proud Proud

विक्षिप्त मुलगा, जमल्यास पोस्ट संपादीत करा. वेळ चार तासांचीच आहे Sad पण धागा मुंबईच्या पावसाचा कौतुकाचा आहे (म्हणूनच मुंबई ग्रूपमध्ये आहे) तर तेवढ्यापुरताच राहू द्या.
दोन शहरांमधील वाद मजेने एंजॉय करायचा असतो, जर तसे जमत असेल तर,.. पण कोणाला टोचून बोलणे वा सिरीअसली तावातावाने भांडणे मला निरर्थक वाटते. गैरसमज नसावा. पण जमल्यास ईथे तरी टाळा __/\__ Happy

@ ऋन्मेऽऽष, सॉरी. तुझा प्रतिसाद आत्ता वाचला, तोपर्यंत प्रतिसाद संपादित करायची वेळ उलटून गेली होती. पण पुढच्या वेळेस नक्की लक्षात ठेवेन!
अवांतर - येत्या ८ नोव्हेंबरला 'मुंबईकर, पुणेकर की नागपूरकर ?' असा धागा नक्की काढ! खूप मजा येईल!!!

@ रश्मी.. , तुमच्या नाकाला मिरच्या झोंबल्या नाही तर गाल आणि जीभ लाल लाल का दिसते आहे? रच्याक, खूऽऽऽऽऽप क्युट आहे स्मायली!!!!

जमल्यास एक लेख भजीपाववरच >>>>> गई भैंस पानी में........

बाकी, जिलेब्या मस्त पाडतोस. कुठच्या हलवाय्याकडे काम करतोस. Proud

आवडत्या मुलीच्या दर्शनासाठी पाऊस नुसता कोसळत असूनही घरातून बाहेर पडलो, पण ऑफिसला अखेरपर्यंत पोहोचलो नाही... पुढे जे झाले ते फारच ईंटरेस्टींग होते. कधीतरी वेळ काढून लिहायचा आहे तो अनुभव.

आवडेल , लवकर काढा धागा .

मुंबईतील लोकं थेंबथेंब पावसाला घाबरत का नाहीत? मग काय
मुंबई बाहेरील लोकं थेंबथेंब पावसाला घाबरता असं.....

अहो प्रविण, जर मी म्हटलं कोहली फास्ट बॉलिंगला घाबरत का नाही? तर मग सचिन, द्रविड, लक्ष्मण घाबरायचे का? असे म्हणाल तर कसे चालेल.

ग्रूप मुंबईचा आहे म्हणून फक्त मुंबईच्या लोकांबद्दल मुंबईच्या लोकांमध्येच केलेली एक चर्चा आहे. मी मुंबईबाहेर फार पडलो नसल्याने मला बाहेरच्यांची जास्त कल्पना नाही. तरी तुम्ही या धाग्यावर आम्हा मुंबईकरांचे पाहुणे बनून तुमच्या शहरातील लोकं पावसाची मजा कशी लुटतात हे सांगितले तर आवडेलच Happy

मुंबईबाहेरील व्यक्तीनी प्रतिसाद नाही का द्यायचा मग ?? Uhoh
असो,मुंबई बद्दल जे काही माहीती आहे ती टीवी,सिनेमा, न्यूज यांच्या मार्फत मिळाली तीच प्रत्यक्ष अनुभव नाही...
पण मुंबई ची लोक खरच कितीही संकट आली तरी ही न डगमगता परिस्थितीशी सामना करतात हे अगदी मान्य!

अहो प्रतिसाद देऊ नका कोणी म्हटलेय. आणि त्यांच्याही सॉरीची गरज नव्हतीच.
सांगायचा मुद्दा एवढाच की मुंबईचे या अमुक तमुक बाबतीत कौतुक केले म्हणजे बाकीचे तसे नाहीयेतच असा त्याचा अर्थ होत नाही. ग्रूप मुंबईचा आहे हे एवढ्यासाठी दाखवून दिले की माझा तुलना करायचा हेतू नाही यावर तुमचा विश्वास बसावा Happy

बाकी सर्वांचे स्वागतच आहे. मुंबई ही आधी महाराष्ट्राची आहे, मग देशाची, मग मुबईकरांची. मुंबईवर कोणी आपला हक्क सांगू शकत नाही. ही सर्वांनाच आपले नशीब आजमवायची समान संधी देते. फक्त पावसाला तेवढे ईथे घाबरून चालत नाही Happy

हा 8 नोव्हेंबरचा सीन समजला नाही.....
८ नोव्हेंबरला महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे यांचा ९८ वा जन्मदिन आहे. व त्यांचे 'मुंबईकर, पुणेकर की नागपूरकर' हे कथानक फार प्रसिद्ध आहे.
https://www.youtube.com/watch?v=FVWdAx1a0y0

<<<<<पण कोणाला टोचून बोलणे वा सिरीअसली तावातावाने भांडणे मला निरर्थक वाटते.>>>>

अहो पण मायबोलीवर लोक फक्त तेव्हढ्यासाठीच येतात!
त्यांनी असे करायचे, मग कुणितरी त्यावरच लिहायचे, मुद्दाम त्यातून वेगळे वेगळे अर्थ काढायचे, विषय बदल करायचा, म्हणजे प्रत्येक धाग्याला २०० प्रतिसाद ठरलेले. धागाकर्त्याला प्रसिद्धी.