माणसे वाचताना २- डॉ.प्रसाद दांडेकर यांच्याशी गप्पा

Submitted by सिम्बा on 21 September, 2017 - 04:56

काही दिवसांपूर्वी मी ‘माणसे वाचताना’ नावाचा एक लेख लिहिला होता.
पूर्वग्रह पुसून टाकण्यासाठी, सामान्य पांढरपेशा माणसासाठी taboo असे आयुष्य जगणाऱ्या माणसांची ’माणूस’ म्हणून ओळख करून घेण्यासाठी ’ह्युमन लायब्ररी’ हा उपक्रम आहे.
दरम्यान या उपक्रमाची मुंबईत दोन सत्रे पार पडली, पुण्यातही एक सत्र झाले,
मी या उपक्रमाला एक वाचक म्हणून हजर राहिलो होतो.
इथे एक पुस्तक होते, ’NOT JUST A MEDICAL ERROR’- डॉ. प्रसाद दांडेकर
डॉ. प्रसाद दांडेकर हे मुंबईतील एक प्रसिद्ध ओंकॉलोजीस्ट. पण एक यशस्वी डॉक्टर यापेक्षा वेगळी अशी त्यांची एक ओळख आहे. ते होमोसेक्शुअल आहेत. त्यांच्या बरोबर मारलेल्या गप्पांचे हे संकलन.

IMG-20170920-WA0015.jpg१) समलैंगिक असणे हा भारतात आजच्या घडीला शिक्षापात्र गुन्हा आहे, समलैंगिक व्यक्तीला समाजात बर्याच पूर्वग्रहांचा सामना करावा लागतो, तुम्ही व्यावसायिक आयुष्यात यशस्वी आणि वैयक्तिक आयुष्यात समाधानी आहात. अशी पार्श्वभूमी असताना या विषयासंबंधी बोलताना समाजासमोर आपली खरी ओळख उघड करावी असे तुम्हाला का वाटले?

सुरुवातीलाच एक गोष्ट स्पष्ट करतो- भारतात समलैगिक ’असणे’ हा गुन्हा नाही. मात्र (कोर्टाच्या व्याख्येप्रमाणे) अनैसर्गिक शरीरसंबंध ठेवणे हा गुन्हा आहे. मला पुरुष आवडतात म्हणून कोणी मला शिक्षा करू शकत नाही, मात्र मी दुसर्या पुरुषाशी शरीरसंबंध ठेवले आहेत असे सिद्ध झाले तर मला शिक्षा होऊ शकते.
माझी ओळख उघड करायचा निर्णय मी पूर्ण विचारान्ती घेतला आहे.
सुरुवातीला मी अतिशय निष्क्रियपणे परिस्थितीकडे पाहत होतो. बिंदुमाधव खिरे, अशोक रावकवी यांसारखे सक्रिय कार्यकर्ते LGBT इश्युजसाठी कित्येक वर्षे काम करताना मी पाहतोय. त्यांच्याकडे पाहताना मला हळूहळू जाणवू लागले की “समलैंगिक लोकांना समाजाने मूळ प्रवाहातले मानणे”, हा खूप दूरचा पल्ला आम्हाला गाठायचा आहे. केवळ मूठभर लोक काम करत आहेत, म्हणून बाकीच्यांनी निवांत राहून काहीच साध्य होणार नाही. जर मला सुरक्षित अवकाश हवे असेल तर मला थोडे तरी प्रयत्न करावेच लागतील. ती माझी नैतिक जबाबदारी आहे

या जाणीवेनंतर गे बॉम्बे सोसायटीने आयोजित केलेल्या लसीकरण शिबीर, वैद्यकीय सेमिनार, कॅन्सरबद्दलची व्याख्याने अशा छोट्याछोट्या उपक्रमांत भाग घ्यायला मी सुरुवात केली. घरी आणि मित्रपरिवारात माझ्याबद्दल आधीच माहीत होते. या उपक्रमांतून मी काही प्रमाणात लोकांसमोर ‘आउट’ होत होतो.
अगदी अलीकडे मी ‘ह्युमन लायब्ररी’ उपक्रमात सामील झालो. सामील झालो, तेव्हा हे काय आहे याची मला जरासुद्धा कल्पना नव्हती. त्या event मुळे मला वेगवेगळी पार्श्वभूमी असणाऱ्या खूप लोकांशी बोलायची संधी मिळाली. भेटलेल्या काही लोकांना या विषयाची जुजबी ओळख होती, काहींनी तो विषय सहजपणे समजून घेतला होता आणि स्वीकारला होता, तर काही कुंपणावर बसलेले होते.
आपल्याशी अनुभव शेअर करणारा गे मनुष्य प्रख्यात हॉस्पिटलमध्ये सिनिअर कन्सल्टंट आहे ही माहिती असल्यामुळे, मी माझे नाव उघड केले नसूनही (पहिल्या सेशनला मी नाव उघड केले नव्हते), माझे बोलणे त्यांना खूप विश्वासार्ह वाटले आणि त्यामुळे आमच्यात खूप चांगला संवाद होऊ शकला.
ते सेशन झाल्यानंतर मला वाटले की मी आयुष्यात पहिल्यांदा आपल्या communityसाठी काहीतरी केलेय आणि तेव्हाच मला हे सुद्धा जाणवले की लोकांना माझे म्हणणे विश्वासार्ह वाटायला हवे असेल, तर मला अनामिक राहून चालणार नाही. जर माझ्यासारखे शिकलेसवरलेले आणि respectable काम करणारे लोक आपल्या हस्तिदंती मनोर्यातून बाहेर पडून इतर लोकांबरोबर मिसळले तर लोकांचे पूर्वग्रह लवकर दूर होतील; हा विचार करून मी माझ्या नाव, चेहर्यासकट समाजापुढे येण्याचा निर्णय घेतला.

२) लैंगिकता ही गोष्ट बंद दाराआड असते, जोवर तुम्ही मुद्दाम कोणाला सांगत नाही की मी गे आहे, तोपर्यंत कोणाला कळत नाही (जसे तृतीयपंथी लगेच लक्षात येतात). असे असताना मुद्दाम रस्त्यावर उतरून "आम्ही गे आहोत, आम्हाला आमचे हक्क हवेत," असे म्हणत गे प्राईड मार्च झाले ते कशासाठी? आणि चारपाचशेच्या संख्येने रस्त्यावर उतरून घोषणा दिल्याने नेमके काय साधणार आहे?

चारशे-पाचशे हे आकडे तुम्ही कोणत्या मार्चचे म्हणत आहात ते मला माहीत नाही. जर तुम्ही पुणे प्राईड मार्चबद्दल बोलत असाल तर तिथे आठशेपेक्षा अधिक लोक होते आणि मुंबईसाठी गे आणी गे समर्थक मिळून हा आकडा पंधरा हजारापर्यंत पोहोचला होता. ही निश्चितच मोठी संख्या आहे
ही मिरवणूक काढण्याचे कारण त्याच्या नावातच आहे. हा pride march – अभिमान यात्रा आहे, its about being proud about who we are, हा visibility मिळवण्याचा प्रयत्न आहे. तुम्ही अदृश्य असाल तर कोणीही तुम्हाला मदत करू शकणार नाही. हे बरेचसे HIV पेशंट सारखे आहे. वरवर पाहता तुम्ही समाजात मिसळून जाता पण त्याने तुमचे प्रश्न सुटत नाहीत,
आज भारतात बहुसंख्य लोकांना समलैंगिकता म्हणजे काय हेच माहीत नाही. ज्यांना माहीत आहे त्यांतील बहुसंख्य बायस्ड आहेत, म्हणून ही परेड सामान्य माणसांना जाणवून देण्यासाठी आहे, की आम्ही आहोत. आम्ही तुमच्यापेक्षा वेगळे नाही आहोत, आम्हीसुद्धा तुमच्यासारखीच माणसे आहोत. आम्हाला समान वागणूक द्या. आमचा लढा गे राईटसाठी नाही, तर लढा ह्युमन राईट्ससाठी आहे. आम्हाला मानवी हक्क मिळावेत म्हणून केलेला हा प्रयत्न आहे.

३) पण गे लोकांना मानवी हक्क आहेतच; नाही का? एखादी व्यक्ती गे आहे हे जोपर्यंत लोकांना समाजत नाही तोपर्यंत त्यांच्या वागण्यात फरक नसतो; नाही का? मग उलट अशी परेड करून तुम्ही तुमचे वेगळेपण अधोरेखित करता असे वाटत नाही का?

हे आमच्या हक्कांबद्दल आहे. मला माझी ओळख, माझ्या व्यक्तिमत्त्वाचा भाग लपवावा का लागावा? एक उदाहरण घ्या - समजा तुम्ही एका विशिष्ट जातीचे आहात आणि मी तुम्हांला सांगितले कि तुमच्या एम्प्लॉयरचे त्या जातीबद्दलचे मत फार वाईट आहे, तर तुम्हाला त्या ठिकाणी काम करताना असुरक्षित वाटणार नाही का? तुमची खरी ओळख कळली, तर तुम्हांला मिळणाऱ्या वागणुकीवर/ बढतीवर परिणाम होईल अशी भीती वाटणार नाही का?
आज प्रत्येक गे माणूस अशाच दडपणाखाली जगत असतो आणि 24x7 अशा दडपणाखाली जगणे ही सोपी गोष्ट नाही.
यात दोन भाग आहेत, एक कायदेशीर हक्क आणि दुसरे सामाजिक हक्क. तू म्हणालास तसे कायदेशीर हक्क मला आहेत (अर्थात लैंगिकतेशी संबंधित - जसे की कोणासोबत लैगिक संबंध ठेवायचे, एक कुटुंब फ़ॅमिली युनिट म्हणून जे हक्क येतात ते सोडून), पण सामाजिक हक्कांबाबत आम्ही कायमच डावलले जात आलोय.
आम्ही विशेष वागणूक मिळावी म्हणून मागणी करत नाही आहोत. आम्हाला दयाबुद्धीने वागवा असे म्हणत नाही. आम्ही समान वागणूक द्या असे म्हणतोय. हेट्रोसेक्शुअल सज्ञान माणसाला परस्परसंमतीने जे नातेसंबंध प्रस्थापित करता येतात, तसेच संबंध आम्हाला ठेवता यावेत आणि त्याबद्दल समाजाने आम्हांला गुन्हेगार ठरवू नये, इतकेच आमचे मागणे आहे. ते हक्क आम्हांला भांडून मिळणार नाहीत, तर समाजाला संवेदनशील बनवूनच मिळतील.
एक उदाहरण देतो - बहुतेक सर्व युरोपियन देशांत अतिशय vibrant गे culture आहे, गे क्लब्स, बार, पब्स खूप संख्येने आहेत. पण स्वीडनला Gotenbrg आणि Stockhom मध्ये मला गे बार्स दिसले नाहीत आणि मला त्याचे आश्चर्य वाटले. त्यामागचे कारण मला आणखीनच आश्चर्यकारक वाटले. त्यांचे म्हणणे होते की आमच्याकडे वेगळे गे बार नाहीत कारण त्याची तशी गरज नाही. कुणाला त्याच्या पार्टनरबरोबर ड्रिंक घ्यावेसे वाटले तर त्याने कोणत्याही बारमधे जावे; त्याचे तिकडे स्वागतच होईल. गे समाज आमच्या समाजाचा अविभाज्य भाग आहे, त्यांना वेगळ्या जागेपुरते मर्यादित करून आम्ही आमच्यापासून तोडून टाकू इच्छित नाही. गे व्यक्तीला आमच्या सामायिक सामाजिक अवकाशात व्यक्त होण्याची पूर्ण मुभा आहे,
अर्थात स्वीडन हे त्या स्पेक्ट्रमचे एक टोक म्हणावे लागेल, भारतातला लढा अजूनतरी आमचे अस्तित्व मान्य करा याच पातळीवर आहे.

४) आपण गे आहोत याची जाणीव तुम्हाला कधी आणि कशी झाली?

मला आठवतंय तेव्हापासून मला कधीच स्त्रियांबद्दल आकर्षण वाटले नाही. मी वेगळा आहे याची मला शाळेत असल्यापासूनच स्पष्ट जाणीव होती.
म्हणजे हे झाले असे, की साधारण सहावीचे वर्ष चालू असताना आम्ही घर बदलले आणि मला शाळा बदलावी लागली.
सहावीसातवीतली म्हणजे बारातेरा वर्षांची मुले पौगंडावस्थेच्या उंबरठ्यावर उभी असतात आणि त्यांच्या लैगिक जाणिवा जागृत होऊ लागतात. तेव्हा अचानक माझ्या नवीन सहाध्यायांकडून मला अशी जाणीव करून देण्यात आली की मी त्यांच्या सारखा वागत नाही. माझे मॅनरिझम ‘पुरेसे’ पुरुषी नाहीत किंवा मी मैदानी खेळात नसतो, मला वाचायला आवडते, अशा गोष्टींवरून माझी टवाळी व्हायची. हे बुलिंग इतके वाढले की त्याचा मला ताण यायला लागला.
शाळेत मी अतिशय हुशार विद्यार्थ्यांपैकी एक असल्यामुळे शिक्षकांचे लक्ष असेच, त्यामुळे एका मर्यादेबाहेर जाऊन हा त्रास झाला नाही किंवा शारीरिक दादागिरीला तोंड द्यावर लागले नाही. पण माझ्या जागी कोणी सामान्य मुलगा असता तर त्याला नक्कीच खूप त्रास झाला असता.
मी वेगळा आहे याची जाणीव मला खूपच लवकर झाली; खरं तर खूप लवकर करून दिली गेली.

५) आपण काही बाबतीत बाकी मुलांहून वेगळे आहोत - आपल्याला मुलींबद्दल काही आकर्षण नाही इथपासून ते जगभरात अशी खूप माणसे आहेत, त्यांना गे म्हणतात आणि आपण त्याच कम्युनिटीचा भाग आहोत याची जाणीव कधी झाली आणि त्याला किती वेळ लागला?
हे टप्पे पार करायला मला बरीच वर्षे लागली. जेव्हा तुम्हांला जाणवते की बाकीच्या मुलांपेक्षा तुम्हांला वेगळ्या भावना आहेत, तेव्हा आपण एकटेच अबनॉर्मल आहोत ही भीती मनात ठाण मांडून बसते. त्यात माझ्या लहानपणी नेट, पुस्तके असे काही रिसोर्सेस उपलब्ध नव्हते. तेव्हा हा मार्ग माझा मलाच शोधायचा होता. सातवी ते अकरावी हा काल माझ्यासाठी फार कठीण होता.
पुढे मी अकरावीत असताना मला पंचविशीपुढची एक व्यक्ती भेटली. तिने माझ्याशी सविस्तर बोलून हे काय आहे? समलैंगिकता म्हणजे काय हे व्यवस्थित समजावले. त्याचबरोबर मुंबईत हे लोक कुठे भेटतात, त्यांच्या सोशल मीटिंग्ज होतात वगैरे माहिती दिली. मग त्यातून एकीतून दुसरी अश्या ओळखी हळूहळू होत गेल्या. माझा असा एक ग्रुप तयार झाला. पुढे मेडिकलला गेल्यावर या विषयाबद्दल अजून विश्वासार्ह माहिती कळत गेली. पंचविशीच्या आसपास मला माझा पार्टनर मिळाला. तोपर्यंत मी माझी लैंगिकता स्वीकारली होती.
‘मला मुले आवडतात’ या जाणिवेपासून ’‘मी गे आहे" हा माझ्या लैगिकतेचा स्वीकार करण्यापर्यंतचा माझा प्रवास होण्यास चांगली दहाएक वर्षे लागली. चांगलाच दीर्घ प्रवास होता तो.

P3.jpg६) आणि या प्रवासात खूप चढउतार होते याची कल्पना तुमच्या बोलण्यातून येत आहे. आत्ता सांगितलत तो तुमचा स्वतःचा प्रवास झाला. पण तुमच्या बरोबर असणारे लोक, कुटुंबीय यांचा प्रवास कधी सुरू झाला? तुम्ही घरच्यांशी याबाबत कधी बोललात? तुम्ही स्वतःचा स्वीकार केल्यानंतर त्यांच्याशी बोललात? की तुमच्या मानसिक तणावाच्या काळात त्यांना काही कल्पना होती? त्यांनी तशी काही इंडिकेशन्स दिली होती का?

आपला मुलगा वेगळा आहे याची नक्कीच काहीतरी कल्पना माझ्या आईवडिलांना होती आणि प्रत्येक आईवडिलांना तशी कल्पना/इंट्युशन असतेच. विशेषतः आईला तर असतेच असते. बर्याच केसेसमध्ये they don’t have a vocabulary to express it. म्हणजे जाणवत असते की काहीतरी वेगळे आहे, पण नेमके बोट ठेवता येत नाही. काही केसेसमध्ये काय आहे ते पूर्ण माहीत असते, पण त्यांना त्याबाबत बोलायचे नसते. आपण बोललो नाही तर "तो प्रॉब्लेम आपोआप निघून जाईल," अशा मानसिकतेत ते असतात. थोडेसे डिनायल थोडासा इग्नोरन्स असे सगळे त्यात असते.
माझ्या केसमध्ये, साधारण पंचविशीच्या सुमारास मी माझ्या सेक्शुअलिटीबद्दल क्लीअर झालो होतो. त्याच सुमारास मला माझा पार्टनर भेटला आणि आम्ही दोघांनी ‘as a couple’ राहण्याचा निर्णय घेतला. मला मुळात एखाद्या मुलीशी लग्न करण्यात इंटरेस्ट नव्हता आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे केवळ समाजाला दाखवण्यासाठी म्हणून एक मुलीला फसवून लग्न करून, एका डॉक्टरचा छान चकचकीत संसार चाललय हे नाटक करायच्या मी ठाम विरोधात होतो.
सव्वीस-सत्ताविसाव्या वर्षी जेव्हा माझे PG संपत आले, तेव्हा घरून लग्नाबद्दल दबाव यायला लागला. मी सुरुवातीला लग्नच करायचे नाही; काय गरज आहे? प्रत्येकाने लग्न केलेच पाहिजे का? वगैरे बंडखोरी करून विषय टाळायचा प्रयत्न केला. पण पुढे हा दबाव वाढतच गेला. शेवटी एके दिवशी मी आणि आई घरात एकटे असताना आईने मला कॉर्नर केले आणि लग्न न करण्याचे कारण विचारले. हे इतके अनपेक्षितपणे झाले की मी काहीच बोलू शकलो नाही! शेवटी तिनेच विचारले, की तू लग्न न करण्यामागे मला वाटते ते कारण आहे का? मी फक्त होकारार्थी मान हलवू शकलो. तिला चांगलाच मानसिक धक्का बसल्याचे तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते.
मला तिची ही प्रतिक्रिया सर्वस्वी अनपेक्षित होती. मला वाटायचे, माझी आई तशी प्रोग्रेसिव्ह विचार करणारी आहे. तिचे वाचन बरेच आहे. तिला होमोसेक्शुअलिटी ही कन्सेप्ट माहीत आहे. आमचे या विषयावर दोनतीन वेळा बोलणेही झाले होते आणि ती त्या वेळी या सगळ्या विषयाबद्दल ok होती. पण या सगळ्या गोष्टी जेव्हा आपल्या स्वतःच्या घरात होतात तेव्हा माणसाची प्रतिक्रिया खूप वेगळी असते. दुसऱ्याचा मुलगा गे असेल तर मला चालेल , पण माझा मुलगा मला गे नको असा दृष्टिकोन असतो. या सगळ्या गोष्टींचा आईला खूप त्रास झाला. तिला माइल्ड डिप्रेशन आले; त्यावर ट्रीटमेंट घ्यावी लागली. त्यातून सावरायला तिला बराच वेळ लागला. अर्थात आता ती बरी आहे. माझ्या पार्टनरसोबत तिचे चांगले रिलेशन आहेत. त्याच्या आईवडिलांशी पण तिचा कॉन्टॅक्ट असतो. आता सगळे चांगले आहे. पण तरीही अधूनमधून तिला त्रास होतो. त्या त्रासात “मी गे आहे," हा भाग कमी झालाय. पण तुझे लग्न नाही झाले, मला नातवंडे नाहीत अशी खंत तिच्या वागण्याबोलण्यात जाणवते.
पण मी माझ्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल इतका आनंदी आहे, की तिला वाटणाऱ्या खंतीबद्दल मी स्वतःला दोष देणे बंद केले आहे.
बाकीच्या कुटुंबियांबद्दल म्हणशील तर.. मी जेव्हा बहिणीला सांगायचा प्रयत्न केला तेव्हा तिने हसून उडवून लावले. तिला आधी पासूनच माहीत होते; तिला काही सांगायची गरज पडली नाही.
नंतर मी हळूहळू माझ्या भावंडाना सांगितले; त्यांनी त्यांच्या आईवडिलांना सांगितले. असे करत करत सगळ्या नातेवाईकांना कळले. आणि आतातर मी आणि माझा पार्टनर एकत्रच राहतो, अगदी लग्नापासून फ्युनरलपर्यंत एकत्र जातो त्यामुळे सगळ्यांनाच आमच्याबद्दल माहिती आहे.
आणि सगळ्यानी ते खूप चांगल्या प्रकारे स्वीकारले आहे. They are comfortable about us now.

७) तुमचा स्वतःबरोबर comfortable होण्याचा प्रवास साधारण पंचविशीपर्यंत चालला. कुटुंबियांना कळायला, comfortable व्हायला पुढे तीनचार वर्षे लागली. पण त्याहून मोठ्या सर्कलमध्ये, तुमच्या व्यावसायिक आयुष्यात तुम्ही हे कसे हाताळलेत?

सुदैवाने व्यावसायिक पातळीवरही मी नशीबवान ठरलो आहे. एक तर माझ्या शिक्षणामुळे डिस्क्रिमिनेशनला तोंड द्यावे लागेल अशा लेव्हल्स कमी झाल्या, दुसरं असं की माझे सहकारीसुद्धा उच्चशिक्षित डॉक्टर्स आणि जग पाहिलेले लोक असल्याने मी कधी त्यांच्या चर्चेचा विषय झालो नाही. माझ्या मागे अशी चर्चा झाली असेल तरी मी कधी त्याकडे लक्ष दिले नाही.
जोपर्यंत मी माझ्या कामात शंभर टक्के देतोय आणि माझ्या बरोबरचा/हाताखालचा सहकारी शंभर टक्के देतोय तोपर्यंत माझे सेक्शुअल ओरिएंटेशन काय आहे यामुळे माझ्या बॉसला , मला आणि माझ्या सहकार्याला फरक पडू नये असे वाटते. And I must say my co-workers have accepted this very graciously.

८) आपण तुमची जवळचे कुटुंबीय आणि व्यवसायिक वर्तुळाबद्दल बोललो. आता तुम्ही गेली काही वर्षं एकत्र राहाताय, तेव्हा बाकीच्या समाजाचा तुम्हाला काय अनुभव आला?

मला सुदैवाने या बाबतीत काहीच वावगा अनुभव नाही आला. आम्ही आधी राहत होतो तिथे आणि या आताच्या जागी, दोन्हीकडे आमचे स्वागतच झाले. आमचे दोन्हीकडच्या शेजाऱ्यांशी चांगले संबंध आहेत. अर्थात यात माझ्या प्रोफेशनचा मोठा वाटा आहे. Everybody loves a doctor neighbor :). पण मला स्वत:ला अशी कपल्स माहीत आहेत, ज्यांना समाजाकडून प्रचंड त्रास होतोय.
अगदी साधे घर भाड्याने घ्यायचे म्हटलेत तरी अनंत अडचणी येतात. त्यात गे कपल आहोत असे सांगून जागा घ्यायला गेलात तर जागा मिळणे केवळ अशक्य आहे. आम्ही दोन मित्र फ्लॅट शेअर करणार आहोत असे सांगून जरी गेलात तरी घर मिळत नाही. कारण सोसायट्या बॅचलर लोकांना जागा देतच नाहीत.
आम्हाला आलेला पहिला अनुभव असाच विचित्र होता. आम्ही भाडेकरू म्हणून राहणार म्हटल्यावर एका सोसायटीने आम्हांला इंटरव्ह्यूला बोलावले. दोन पुरुष फ्लॅट शेअर करणार म्हंटल्यावर त्यांनी नियमावर बोट ठेऊन ‘आम्ही बॅचलरला जागा देत नाही,’ असे सांगितले. तेव्हा आम्ही दोघे सोळासतरा वर्षांची random job करणारी आणि दर वीकेंडला पार्ट्या करणारी मुले नव्हतो. आम्ही तिशीपार केलेले, रिस्पेक्टबल जॉब करणारे होतो. पण एकटा पुरुष किंवा एकटी बाई म्हटलं की लोकांना सर्व प्रकारच्या अनैतिक गोष्टींची भीती वाटते.

९) पण त्यांना जर तुम्ही, आम्ही कपल आहोत असे सांगितले असतेत, तर काही फरक पडला असता का?

हो पडला असता. नकाराबरोबरच आम्हांला त्यांच्या विचित्र नजरांचा पण सामना करावा लागला असता.
हा पूर्वग्रह, हा फोबिया fear of unknown मधून येतो असे मला वाटते. गे म्हटले की ही काय विचित्र माणसे असतील, काय काय प्रकार करतील, आमच्या वाढत्या मुलांवर वाईट इन्फ्लुअन्स असेल अशा सगळ्या भीती मनात येत असाव्यात.
मी मागे म्हटले तसे गे प्राईड मार्च याचसाठी गरजेचे आहेत, कारण ते तुमच्यासारख्या माणसांचाच एक वेगळा गट अस्तित्वात आहे हे सगळ्या लोकांसमोर आणतात.

१०) आत्ता पर्यंत सिनेमा tv वर दिसणाऱ्या गे व्यक्तिरेखा कायम विचित्र पेहेराव आणि विनोदी हातवारे करणाऱ्या दिसल्या आहेत. रूढार्थाने नायक जे काम करतो ते करताना गे व्यक्तिरेखा कधीच दिसत नाहीत. प्रमुख व्यक्तिरेखा जरी गे असली तरी ती समाजाच्या रोषाला बळी पडलेली दिसते (ज्यात समाजाचा विरोध प्रामुख्याने दिसतो) गे व्यक्तींबद्दल फोबिया निर्माण करण्यात दृक्श्राव्य माध्यमांचा हात आहे असे तुम्हाला वाटते का?

एखाद्या गोष्टींबद्दलची आपली मते आपण टीव्ही, रेडियो, पुस्तके, फिल्म्स यांवरूनच बनवत असतो. तुम्ही म्हणताय ते खरे आहे. आत्तापर्यंत फिल्म्समध्ये गे व्यक्तिरेखा स्टिरिओटाईप म्हणूनच आल्यात. पण इतक्यात दोन फिल्म्स रिलीज होणार आहेत. त्यात वेगळा अप्रोच पाहता येईल. पण पुन्हा मी म्हणेन, हा एक प्रवास आहे. समाज इतका होमोफोबिक असताना अचानक कोणीतरी उठून आता मी गे व्यक्तीला हिरो बनवतो असे म्हणेल अशी अपेक्षा करणे वास्तवाला धरून होणार नाही.

११) फिल्म इंडस्ट्री मध्ये आउट गे लोकांची संख्या जास्त आहे, हे लोक याबद्दल सहिष्णू आहेत, मग स्वतः गे असणारे लोक, गे व्यक्तिरेखा अर्कचित्रांच्या स्वरुपात का दाखवतात?

मी ह्या प्रश्नाचे थेट उत्तर देऊ शकत नाही कारण मी त्यां इंडस्ट्रीशी संबंधित नाहीये. पण याबाबतचे माझे मत सांगतो.
गे व्यक्तिरेखांचा चित्रपटातील प्रवास सुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे. प्रवासाची सुरुवात जरी स्टिरिओटिपिकल गे दाखवून झाली असली, तरी अलीकडे आलेल्या चित्रपटांत ( बॉम्बे टॉकीज, अलिगढ) गे व्यक्तिरेखा सामान्य माणूस म्हणून दाखवली आहे. आणि हा प्रवास आवश्यक होता, जब्बार पटेलांचा ‘उंबरठा’ अगदी पाथब्रेकिंग चित्रपट होता. त्यांनी सत्तरीच्या दशकात लेस्बियन व्यक्तिरेखा दाखवली होती. पण लोकांना तो भाग कळलाच नाही, कारण असे काही असते याची कल्पनाच तेव्हा लोकांना नव्हती. जब्बार कदाचित पंचवीसतीस वर्षे पुढची गोष्ट लोकांना दाखवत होते. त्यामानाने हिंदी चित्रपटात हा प्रवास थोडा स्लो झाला. आता ‘कांताबेन’चे उदाहरण घ्या. त्यात एक्स्ट्रीम होमोफोबिया दाखवला आहे. पण त्या पात्रामुळे हा फोबिया लाखो लोकांसमोर आला. दोन पुरुष रोमॅंटिकली involved असू शकतात हे सगळ्यांच्या समोर आले. ते चित्रण निगेटिव्ह असले तरी समाजाचा होमोफोबिया समोर आणण्याच्या दृष्टीने ते पात्र अतिशय पॉझिटिव्ह ठरले. आपला प्रॉब्लेम होमोसेक्शुअलिटी नाहीये; होमोफोबिया आहे. तो लोकांसमोर येईल तेव्हा तो आपोआप अड्रेस होईल आणि या विनोदी व्यक्तिरेखा काही प्रमाणात हे काम करत असतात.
आणि दुसरा मुद्दा म्हणजे it is unfair to hold celebrity for social change, they are not responsible for that. अमुक एक डायरेक्टर गे आहे त्यामुळे त्याने नॉर्मल गे व्यक्तिरेखा केंद्रस्थानी ठेवूनच चित्रपट बनवावेत अशी अपेक्षा तुम्ही ठेऊ शकत नाही, चांगले चित्रपट बनवून पैसे कमावणे हा त्याचा व्यवसाय आहे आणि ते करताना तो अजून काही साध्य करू शकत असेल तर ग्रेट! त्याबद्दल आदरच आहे.
उद्या मला कोणी सांगितले की तुझ्या वैद्यकीय ज्ञानाचा उपयोग फक्त गे समाजाच्या सेवेसाठी कर, तर तेसुद्धा चुकीचे असेल; नाहीं का? मी वैद्यकीय पेशात आहे. समाज बदलणे हा माझा पेशा नाही. वैद्यकीय सेवा देता देता मी लोकांचे पूर्वग्रह काढू शकलो तर चांगलेच आहे.

१२) या क्षेत्रात सामाजिक संस्थांद्वारे काय काम होतंय?

संपूर्ण भारतात LGBTQ प्रश्नांवर काम करणाऱ्या भरपूर NGO आहेत. मी सगळ्यांची माहिती देऊ शकणार नाही. कारण त्या खूप विविधांगी स्वरूपाचं काम करत आहेत. पण गे बॉम्बे आणि हमसफर ट्रस्ट या दोन संस्थांच्या काही ठळक उपक्रमांबद्दल सांगतो.
गे बॉम्बे खूप वर्षांपासून काम करत आहे. यांच्या दर महिन्याला मीटिंग्ज होतात. गे बॉम्बे तरुण गे मुलांना चर्चा करण्यासाठी सेफ स्पेस, सुरक्षित अवकाश मिळवून देते. म्हणजे आपल्या सेक्शुअलिटीशी माणूस झगडत असतो तेव्हा त्याला व्यक्त होण्यासाठी, अनुभव शेअर करण्यासाठी, थोड्या मोठ्या लोकांचे अनुभव ऐकण्यासाठी अशीं जागा असणे खूप महत्त्वाचे असते. मी त्या फेज मध्ये असताना जर अशी जागा उपलब्ध असती तर मला त्याचा खूप फायदा झाला असता.
ते गे पेरेन्ट्सच्या (गे मुलांचे आईवडील-नातलग) भेटीगाठी योजतात. त्यांना एकत्र आणून त्यांच्यात संवाद घडवला जातो. अनुभवांची देवाणघेवाण होते. काही प्रश्न असतील तर समुपदेशकाची मदत देऊ करतात. पालकांची अक्सेप्टन्स लेवल वाढण्यासाठी याचा फायदा होतो
ते जगभरातील उत्तम गे फिल्म्स आणून फेस्टिवल अरेंज करतात.
याव्यतिरिक्त मेडिकल कॅम्पस, छोटी आउटिंग्ज, व्याख्याने, कधी छोटी पार्टी असे बरेच उपक्रम चालू असतात. मुख्यत्वे सेफ स्पेस, सोशल नेटवर्किंग आणि एक्सपिरिइन्स शेअरिंग यांवर भर असतो.
हमसफर ट्रस्ट खूपच इस्टॅब्लिश्ड संस्था आहे. Under privileged gay मुलांसाठी ग्रासरूट लेव्हलला काम करते. या मुलांचे समुपदेशन, शिक्षण, हेल्थ सपोर्ट या सगळ्या क्षेत्रांत तिचे काम चालते.
याव्यतिरीक्त ती रिसर्च करते. जगभरातील मोठ्या युनिव्हर्सिटीज, खूप नावाजलेल्या NGOs त्यांच्याशी संबंधित आहेत. गे अरिना मध्ये research हा सुद्धा खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे. लोकांनी या कामसाठी आयुष्य वेचली आहेत, त्यामानाने मी जे करतोय त्याचा magnitude , drop in the ocean आहे याची मला पूर्ण जाणीव आहे.

१३) डॉक्टर तुम्ही आपले व्यावसायिक आयुष्य सांभाळून गे कॉजसाठी जे धैर्य दाखवत आहात ते कौतुकास्पद आहे. मी स्ट्रेट आहे. मी LGBTQ साठी काय करू शकेन?

स्ट्रेट अलाय, आपण त्यांना गे-मित्र म्हणूयात, लोकांना मी दोन गोष्टी सांगेन. एक - गे लोकांची टर उडवणारा, त्यांना कमी लेखणारा, उघड होमोफोबिक मनुष्य तुमच्या ओळखीत असेल, तर त्याच्याशी बोलायचे धैर्य दाखवा. तो असे का करतो आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. होमोसेक्शुअलिटी अनैसर्गिक नाही हे त्याला समजवायचा प्रयत्न करा. तो त्याचा होमोफोबिया पूर्ण सोडेल अशी अपेक्षा नाही; पण कमीतकमी तो विचार करायला प्रवृत्त होईल.
आणि दुसरी गोष्ट - जर तुम्हाला कोणी LGBTQ व्यक्ती माहीत आहे, जी स्वतःला त्रास करून घेत आहे, तर तिला जवळ घ्या, पाठीवर हात ठेवून तिला “it’s ok to be gay and accept you as you are,” हे सांगा. मला वाटते या दोन गोष्टी जरी लोकांनी केल्या तरी खूप प्रॉब्लेम कमी होतील.

डॉ. प्रसाद, वेळात वेळ काढून माझ्याशी बोलल्याबद्दल आणि हा संवाद मायबोलीवर प्रकाशित
करण्याची परवानगी दिल्याबद्दल धन्यवाद आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा!

(* या लेखाचे मुद्रितशोधन करण्यासाठी मायबोलीकर भरत यांचे आभार)
** हा लेख ह्युमन लायब्ररीचे सेशन आणि त्यानंतर मारलेल्या गप्पांचे संकलन आहे.
ही मुलाखत वाचून तुम्हांला पडलेले प्रश्न प्रतिसादात विचारू शकता (कृपया प्रश्न ठळक अक्षरांत लिहा). डॉक्टर प्रसाद यांच्याशी बोलून त्या प्रश्नांची उत्तरे इकडे लिहायचा प्रयत्न करेन.
जर कोणाला खाजगी स्वरुपात त्यांना प्रश्न विचारायचा असेल तर फेसबुक किंवा email च्या माध्यमातून त्यांच्याशी संपर्क साधू शकता. drprasadraj@yahoo.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान ओळख.
>>भारतात समलैगिक ’असणे’ हा गुन्हा नाही. मात्र (कोर्टाच्या व्याख्येप्रमाणे) अनैसर्गिक शरीरसंबंध ठेवणे हा गुन्हा आहे. मला पुरुष आवडतात म्हणून कोणी मला शिक्षा करू शकत नाही, मात्र मी दुसर्या पुरुषाशी शरीरसंबंध ठेवले आहेत असे सिद्ध झाले तर मला शिक्षा होऊ शकते.>> हे नक्कीच बदलायला हवं.
एक प्रश्न पडला, जर हे डॉ. दुसर्‍या पुरुषाबरोबर कपल म्हणून रहातायत आणि शरीरसंबंधही आहेत तर ते हे कसं चालतं?

>>>>> मी दुसर्या पुरुषाशी शरीरसंबंध ठेवले आहेत असे सिद्ध झाले तर मला शिक्षा होऊ शकते.>>
जर या रिलेशनशिपमध्ये दोन्ही पार्टी स्वतः च्या मर्जीने गुंतल्या आहेत तर तक्रार कोण करेल?

लोकांसाठी 2 adults एकत्र राहत आहेत,
आणि नेमक्या याच हिपोक्रेसी बद्दल ते बोलत आहेत.

सिम्बा फारच सुरेख मुलाखत घेतली आहे त्याबद्दल तुमचे प्रथम अभिनंदन. डॉक्टरांचा पॉझिटिव्ह दृष्टिकोण तर वाखाणण्याजोगाच आहे.

माझ्या जवळच्या नात्यात एक गे भाऊ आहे. अत्यंत हुशार, चांगली नोकरी. मात्र समाजात अ‍ॅक्सेप्टन्स नसल्याने अनेक विविध समस्यांना तोंड द्यावे लागते जे बहुसंख्य 'स्ट्रेट' लोकांना कधी लक्षातदेखील येत नाही. या समस्यांचा त्यांच्या वैयक्तिक जीवनावर फार दूरगामी परिणाम होतात - मानसिक स्वास्थ्य, नोकरीतली प्रगती, उतार वयातले वेगळ्याच समस्या (एकारलेपण वगैरे)

अभिनंदन डॉ प्रसाद!
पूर्ण मुलाख्त अजून वाचली नाही.वाचते.
मुळात आपले प्रेफरन्सेस काय असावे हा प्रत्येकाच्या बंद दारा आड चा प्रकार आहे.
परस्पर संमतीने कोणत्याही प्रकारच्या संबंधाना कोणाचे ऑब्जेक्शन असण्याचे, नोकरीवर त्याने परीणाम होण्याचे कारण नाही.पण माईण्डसेट, पूर्वग्रह, पिक्चर मधले चुकीचे चित्रीकरण हे सर्व बदलायला वेळ लागेल.

सिंबा , चांगले प्रश्न विचारले आहेत आणि डॉक्टरांनी पण विचारपूर्वक उत्तरे दिली आहेत.

नोकरीवर त्याने परीणाम होण्याचे कारण नाही. >> भारतात माहित नाही , पण अमेरिकेत कायदे गे लोकांच्या प्रोटेक्शन साठी कायदे असून देखील बर्‍याच ठिकाणी लोकांना ओपनली गे असण्याबद्दल हेटाळणीला तोंड द्यावं लागतं. भारतात नोकरीच्या ठिकाणी कोणी ओपनली गे असल्याचं दाखवलं तर नोकरीत नक्कीच त्रास होत असणार. नुसते कायदे असुन फरक पडत नाही.

सर्वांचे आभार,
टवणे सर, तुमच्या प्रतिसादावरून तुम्ही तुमच्या भावाचे प्रेफरन्स स्वीकारले आहेत असे वाटते, वाचून छान वाटले.

मेधा, तुमचे म्हणणे खरे आहे,
कामाच्या ठिकाणी स्त्रीला अवघडले वाटू नये किंवा डिस्क्रिमिनेट करू नये म्हणून कॉर्पोरेट्स आत्ता आत्ता नियम करू लागले आहेत,
गे लोकांसाठी असे नियम होणे खूप लांबची गोष्ट आहे.

कायद्याने हे शारीरिक संबंध निषिद्ध असल्याने आणि सामाजिक दृष्टया भयंकर taboo असल्याने, कायदा आणि समाजाचा धाक दाखवून गे लोकांचे शोषण झाल्याची उदाहरणे सुद्धा आहेत.

डॉक्टर प्रसाद दांडेकर आता मायबोलीवर आले आहेत.
Drprasadraj हा त्यांचा id आहे,
कोणास काही प्रश्न असल्यास तुम्ही डॉक्टरांबरोबर आता थेट संवाद साधू शकता.

छान आहे मुलाखत सिम्बा☺
मागे आमच्या मित्र मैत्रिणींच्या ग्रुप्स मध्ये हे टॉपिक डिसकस जहाले होते. तेव्हा नार्मल समाजाच्या मनात गे फोबिया शिवाय काही शंका असतात ते आढळले. तेव्हा हे वाटले की ह्या शंका जर साइंटिफिक लेवल वर दूर जहाल्या तर त्यांना होणारा विरोध कमी होउ शकतो. specially regarding gay marriage and gay child adoption.

मुलाखत आवडलीच. घरी आई-बाबांना वाचायला देईन.

मी स्ट्रेट आहे. मी LGBTQ साठी काय करू शकेन? या प्रश्नाचं उत्तर फार आवडलं. माझ्या परीने मी हे करण्याचा प्रयत्न करतेच. माझ्या २ रूममेट्सची मतं चर्चेतुन बदलली आहेत हे पाहुन अजुनही होप्स वाटतात की समाज लवकर हे सगळं अ‍ॅक्सेप्ट करेल

उत्तम मुलाखत. प्रश्न चांगले आहेत. अकरावा प्रश्न खरं तर डॉक्टरांसाठी असंबद्ध आहे. पण त्याचंही त्यांनी फार चांगलं उत्तर दिलंय.
ही मुलाखत वाचल्यावर शोधाशोध केली तेव्हा कळलं , की एकट्याच राहणार्‍या पन्नाशीपुढच्या गे लोकांना एकत्र भेटवून त्यांच्यासमोरच्या (सध्याच्या आणि येऊ घातलेल्या) समस्यांबद्दल चर्चा करण्यासाठी डॉक्टर प्रसाद यांनी एक मंच नियमित स्वरूपात उपलब्ध करून दिलाय.

वर दुहेरी यांनी मांडलेल्या गे मॅरेज आणि चाइल्ड अ‍ॅडॉप्शन संदर्भात त्यांनी काही विचार केलाय का? हे समजून घ्यायला आवडेल.

नवराबायकोंमध्ये एकमेकांना वारस करण्याचा, एकमेकांच्या संपत्तीतील हिश्श्यावर हक्क असतो, तसं स्वतःबाबत करण्याचे कोणते मार्ग गे कपलला उपलब्ध आहेत? नेक्स्ट ऑफ किन म्हणून गे पार्टनरची नोंद करता येते का?
भारतात दत्तक आणि सरोगेट मुलांबाबत जे नियम नुकतेच आलेत, त्यानुसार अविवाहित् पुरुषांना/गे लोकांना मूल जन्माला घालणं किंवा दत्तक घेणं जवळपास अशक्य झालं आहे.

आपले प्रतिसाद पाहुन आनन्द झाला. धन्यवाद

गे विवाह आणि मुल दत्तकघेण्या विषयी,
आजच्या घडीला भारतात समलैंगिक विवाह मान्य नाही, त्यामुळे आमच्यापुढे "लग्न" करण्याचा पर्याय नाही. मुळात गेली पंधरा वर्षे आम्ही एकत्र आहोत ते एकमेकांवरील प्रेमामुळे, आणि "लग्न" ही समाजमान्यतेची मोहोर या नात्यावर असायलाच हवी असा आमचा हट्ट नाही,

काही वर्षांपूर्वी मी UK ला होतो, तिकडे सिव्हिल पार्टनरशिप हा पर्याय होता.हे सोशिअल कॉन्ट्रॅक्ट सारखे आहे ज्या योगे पार्टनरला वारसा हक्क मिळू शकतो.
पण मी परत येणार हे ठरलेले होते आणि UK मध्ये केलेल्या या partnrship ची किंमत भारतात एक कागदाचा तुकडा इतकीच असणार होती, त्यामुळे आम्ही सिव्हिल partnership वगैरे काही केले नाही.

आज भारतात हे नाते कायदेशीररित्या मान्य नसल्याने पार्टनर ला काहीही वारसा हक्क नैसर्गिक रित्या मिळत नाही.
व्यवस्थित रजिस्टर केलेले मृत्युपत्र असेल तर प्रॉपर्टी, इतर मालमत्ता पार्टनर ला मिळू शकते

धन्यवाद रीया

आपल्या मागील तसेच पुधील पीधीलाही ह्या बद्दाल सम्बोधन दिले पाहीजे.

चांगली मुलाखत. धन्यवाद सिम्बा आणि डॉक्टर!
आपला प्रॉब्लेम होमोसेक्शुअलिटी नाहीये; होमोफोबिया आहे. >> ह्याला अनुमोदन.

उत्तम प्रश्न व उत्तम उत्तरे.
धन्यवाद सिम्बा आणि डॉक्टर!
तसेच मायबोलीवर स्वागत डॉक्टर, आपण लिहिलेले लेख वाचायला आवडतील.

उत्तम मुलाखत! इथे प्रकाशित केल्याबद्दल धन्यवाद.

माझ्या युनिवर्सिटीत या देशातला सर्वात मोठा आणि comprehensive असा, Transgender Health Program आहे. ही लिन्क पहा.https://www.ohsu.edu/xd/health/services/transgender-health/resources.cfm

सध्या आमच्या इथे आयडी बॅज वर, नाव आणि टायटल याबरोबर, preferred pronoun लावायची नवीन पद्धत सुरु झाली आहे.

मी आज पाह्यलं. संगीत बारीच्या निमित्ताने प्रसादची भेट झालीये एकदोन वेळा. पण अर्थात हाय हॅलो पलिकडे नाही.

प्रश्न आणि उत्तरे दोन्ही आवडले.

आज वाचली मुलाखत.
सिम्बा छान झाली आहे मुलाखत. डॉ. प्रसाद मायबोलीवर स्वागत. तुम्ही मस्त उत्तरं दिली आहेत.

माझ्या वैयक्तीक मतानुसार समलैंगिकता ही विकृती आहे आणि त्याला शास्त्रीय कारणे देखील आहेत.होमोसेक्शुलीटी डझंट सर्व एनि एवॉल्युशनरी परपोज.इथे डॉक्टरांना नाउमेद करायचा हेतू नाही .पण माझे मत मांडले एवढेच.

Pages