निद्रानाश (कथा)

Submitted by चैतन्य रासकर on 20 July, 2017 - 18:39

मला आज नेहमीसारखी झोप येत नव्हती.
रात्रीचे अकरा वाजले होते, दहा वाजल्यापासून, मी बिछान्यावर लोळत होतो, मग मोबाईल सुरु केला, फेसबुकवर पस्तीस फ्रेंड्स ऑनलाईन होते, हो मी मोजले, तेवढाच टाईमपास!! पण मी कोणाला मेसेज केला नाही, मागच्या आठवड्यात, ऑनलाईन असलेल्या मोजून दहा लोकांना "हाय" असा मेसेज पाठवला, तर चार जण आपोआप ऑफलाईन झाले, दोघांनी रिप्लाय दिला नाही, तर उरलेल्या चार लोकांनी मला ब्लॉक केले, हा शॉक माझ्यासाठी फार मोठा होता.

मग युट्युब कडे आलो, तिकडे "जेव्हा आलं मनात, घेऊन गेलो रानात" या नावाचं गाणं ट्रेंड होत होतं, छान गाणं होत, मी लगेच डाउनलोड केलं, रिंगटोन म्हणून ठेवलं. व्हाट्सअँपचा नवीन स्टेटस काय ठेवावा याचा निदान चौदा मिनिटे विचार केल्यावर "आय होप, लवकर येईल झोप" असा स्टेट्स ठेवला, पण तरी काही झोप येत नव्हती. माझ्याकडे टीव्ही पण नव्हता, मग नेटफ्लिक्स वर "सेल्फी फ्री" नावाचा माहितीपट बघितला, त्यात सेल्फी काढणे हा एक आजार आहे आणि त्यातून बाहेर कसे पडावे हे सांगितले होते, ते बघून मी चार पाच सेल्फी अजून काढल्या, एक सेल्फी व्हाट्सअँप डीपीला ठेवला, पण तरी झोप येत नव्हती, झोपेची वाट बघत, माझ्याच खाटेवरच माझी वाट लागली होती!!

मी तसाच तळमळत पडून होतो, शेवटी उठून बाहेर फिरायला आलो, तर बाहेर एवढी थंडी की मी थंड झालो, चालण्यात खंड पडला, मंदपणे चालत घरी आलो, घड्याळात बघितले तर साडे बारा वाजले होते, मी बिछान्यावर परत पहुडलो, पंख्याकडे बघत बसलो.

तेवढ्यात, नेहमीचा आवाज आला!!
ओळखीचा आवाज, पायांचा आवाज, जिन्यावरून चढताना होणार पायांचा आवाज, मी टुणकन उडी मारून उभा राहिलो, एका उडीत माझ्या खोलीच्या दरवाज्याकडे गेलो, दरवाज्याच्या 'आय होल' मधून बाहेर बघू लागलो. ती मुलगी, ती रोजची मुलगी, आज नेहमीप्रमाणे घरी आली होती, तिने नेहमीप्रमाणे, डोअर बेलच्या पाठीमागे लपवलेली चावी बाहेर काढली, दरवाज्याचं कुलूप उघडलं आणि आत गेली. ती रात्री साडे बारा, एकच्या सुमारास येत असे, तिची ही नेहमीची येण्याची वेळ होती. सकाळी अगदी सातला नाहीतर सहालाच घराबाहेर पडत असे, मला कसं माहित? मी सकाळी सहाला सुद्धा जागाच असायचो ना!!

ही मुलगी पाच, सहा तास झोपून परत सकाळी कामावर जात असे, तिच्या पोषाखावरून, मी अंदाज केला होता की, ती कदाचित एअरपोर्ट ग्रॉऊंड ड्युटीवर काम करत असेल. ही मुलगी फार मेहनती वाटत होती, मी सुद्धा ऑफिसला खूप लवकर जात असे, झोप न येण्याचा हाच एक फायदा होता!! मी ऑफिस मध्ये वॉचमनच्या सुद्धा आधी येत असे, त्यामुळे वॉचमनने ऑफिसची एक जादा चावी मलाच दिली होती, मी ऑफिस उघडून काम सुरु करत असे, पण झोप न झाल्यामुळे, काम ही नीट करता येत नसे, मी कित्येक दिवसात नीट झोपलो नव्हतो, त्यामुळे मी सदैव दमलेला, थकलेला असायचो, माझ्या चेहऱ्यावर तसं स्पष्ट दिसायचं, ऑफिस मध्ये मला "झोंबी" नावाने चिडवायचे, हे नाव मला चांगलंच झोंबत होते.

महिन्याच्या पगारापेक्षा जास्त मी झोपेची वाट बघत असे!! मी आतुरतेने अजून एका गोष्टीची वाट बघायचो, ती म्हणजे ऑफिसची मिटिंग !! ऑफिस मीटिंग मध्ये माझा बॉस एकदा बोलायला लागला ना की, मला "गाढ" झोप लागत असे, एकदा मस्त बटर चिकन खाऊन आलो होतो, बॉसने लगेच मीटिंग बोलावली, मस्त मीटिंग सुरु होती, मस्त एसी सुरु होता, माझा डोळा कधी लागला कळलं सुद्धा नाही, माझ्या घोरण्याचा आवज बॉसच्या कानावर गेला, मग त्याने मला "गेट आऊट" म्हणून मला हाकललं आणि माझं डोकं आऊट केलं, पण मी शांतपणे स्टेप आऊट केलं.

"ए झोंबी, तुझ्या इन्सोम्नियाला माझ्याकडे गजब औषध आहे" जतीन मला म्हणाला.
जतीन हा माझ्या ऑफिसचा सहकारी होता, पण मला सहकार्य कधी करत नसे, त्याचं गजब औषध अजब असलं तरी, मला सजग राहणे आवश्यक होते.
"काय" मी त्याला फार आशेने विचारले. त्याने इकडे तिकडे बघत मला खिशातून पांढरी कागदी पुडी काढून दिली, मी हळूच हातात घेतली, पुडी उघडू लागलो.
"इथे नको काढू" जतीन पटकन मला म्हणाला.
"का?"
"घरी गेल्यावर बघ" जतीन अगदी हळू आवाजात म्हणाला, "कॅनडाचा माल आहे" जतीन म्हणाला.
"कॅनडा?" मी अविश्वासाने विचारले.
"येस, कॅनडा व्हाया पंजाब" जतीन मोठ्या आत्मविश्वासाने म्हणाला.
मी हसलो, मला वाटलं विनोद करतोय, पण तो गंभीर होता, मी पुडी बॅगेत ठेवून दिली, काम आटपून घरी आलो, मस्त जेवलो, निद्रादेवीची आराधना करू लागलो, पण या साधेनला कोणी दाद देत नव्हते, दहा वाजले होते, खूप दमलो होतो, पण तरीही झोप येईना, मग परत फेसबुक, युट्युबची वारी केली. "भाऊंचा वार, समोरचा गार" नावाचा सिनेमा बघू लागलो, सिनेमा खूपच गहन होता, म्हणून मला सहन झाला नाही, माझी तर झोपच उडाली.

अरे ती पुडी!!
मला जतीनच्या पुडीची आठवण झाली, मी बॅगेतून ती पुडी काढली, आठ दहा साबुदाण्याच्या आकाराच्या पांढऱ्या गोळ्या होत्या, "याने काय होणार?" असा विचार करून मी दोन गोळ्या गिळल्या, बाकीच्या बॅगेत ठेवून दिल्या, गोळ्यांना काही चव नव्हती, पण मी तसाच पडून राहिलो, मी परत युट्युबवर गेलो, टुकार व्हिडीओ बघू लागलो.

नेहमीच आवाज परत आला!!
मी पटकन उठलो, परत आयहोल मधून बघू लागलो, ती मुलगी बरोबर साडे बाराच्या ठोक्याला आली, आज तिच्या हातात पिझ्झा बॉक्स होता, ते बघून मला परत भूक लागली, तिने डोअर बेलच्या मागे लपवलेली चावी काढली, कुलूप काढून आत गेली, माझा टाईमपास झाला होता, मी परत बिछान्यावर पडलो.

मला कधी झोप लागली कळलं सुद्धा नाही!!
मी गाढ झोपलो, कुशी सुद्धा बदलली नाही, जेव्हा उठलो, तेव्हा माझी पूर्ण पाठ आखडली, मान अवघडली, पाय जड झाले, तहान, घसा कोरडा होता, उठून उभा राहिलो, तर चक्कर आली, मी पटकन जाऊन पाणी पिले, मी घड्याळाकडे बघितले तर पहाटेचे सहा वाजले होते, पण माझा थकवा गेला होता, ताजातवाना झालो होतो, मी आरशात चेहरा बघितला, चेहरा तरतरीत झाला होता, पाच तासात एवढा कमाल? वा!! गोळ्यांनी गुण दाखवला होता, मी उठलो, ऑफिसला जायला खूप वेळ होता, म्हणून उत्साहात व्यायाम करू लागलो, पाचवा जोर मारल्यावर दोन्ही हात जखडले, जरा आयोडेक्स चोळल्यावर बरे वाटले. फोन स्वीच ऑफ होता, मी परत चालू केलाच नाही, मी मस्त नाश्ता करून ऑफिसला पोहचलो, आज मी जोमाने काम करणार होतो, फोन चार्जिंगला लावला, काम सुरु केले, जतीन माझ्याकडे आला, कमरेवर हात ठेवून माझ्या समोर उभा राहिला.
"थँक्स यार त्या गोळ्यांमुळे.." मी काही बोलणार तेवढ्यात जतीन म्हणाला, "काल कुठे होता?"
"घरीच, का?" मी म्हणालो.
"बॉस किती चिडला होता, काल का नाही आलास?" जतीनने जरा रागातच विचारले.
"यार, काल तर आलो होतो ना..कालच तू मला...." माझी ट्यूबलाईट पेटली, मी जतीनकडे बघितले, तो माझ्याकडे संशयाने बघत होता, मी पाच तास नाही, अठ्ठावीस तास झोपलो होतो!! मी कालचा पूर्ण दिवस झोपेत घालवला होता!!! जतीनला झालेल्या प्रकारची कल्पना आली, तो माझ्यासमोर बसला मला म्हणाला, "तू किती गोळ्या घेतल्यास?"
मी हाताने "दोन" अशी खूण केली.
"अर्धी गोळी घ्यायची होती" जतीन खालच्या आवाजात म्हणाला, मी पुरता भांबावलो, अजून दोन गोळ्या घेतल्या असत्या तर खपलोच असतो!! तेवढ्यात माझ्या पुढचा फोन वाजला, बॉसने मला त्याच्या केबिन मध्ये बोलावले होते, मी पटकन कॉफी मशीनकडे गेलो, कॉफी रिचवली, मग केबिनकडे गेलो.

माझं आणि बॉसच सरळ साधं संभाषण झालं.
"तू आजकाल थकल्यासारखा दिसतोस" बॉस म्हणाला.
"नाही सर" मी उत्तर दिले.
"तू सुट्टी घे"
"नको सर"
"तू घरी जाऊन विश्रांती घे"
"नको सर"
"तू पुढच्या आठवड्यात परत रुजू हो"
"नको सर"
"तुझं काम जतीन करेल"
"नको सर"
"गेट वेल सून"
"ओके सर"
माझ्याकडे काही पर्याय नव्हता, माझ्या "पेड लिव्हज" शिल्लक होत्या, बॉस चिडला होता, त्याने दाखवलं नाही पण मला जाणवलं, जतीनने सांगितले की काल बॉसने मला बऱ्याच वेळा फोन केला, माझा फोन स्विच ऑफ होता, माझ्यामुळे बरंच काम अडलं, बॉस चिडला, हे तर होणारच होतं, मी त्या गोळ्या परत जतीनला दिल्या, माझा मूड बॉसवर सूड घेण्याचा होता, पण रूड वागून चालणार नव्हतं, म्हणून मी चालत बाहेर आलो, मी बॅग घेतली आणि घरी निघालो.

मला खूप भूक लागली होती, "माहौल मन्चुरिअन" मध्ये जेवायला गेलो, या हॉटेलमध्ये नेहमी छान माहौल असतो पण आज माझ्या डोक्यात फार कल्लोळ होता. खूप जेवलो, खोलीकडे निघालो, खोलीचं दार उघडताना, मनात एक प्रश्न आला, आता काय करायचं? परत झोपायचं? झोप तर येणार नाही, करायला ही काही नव्हतं, मी तसाच दारापाशी उभा राहिलो, माझ्या खोलीच्या समोर अजून एकच खोली होती, त्या मुलीची, प्रत्येक मजल्यावर दोन खोल्या होत्या, पाच मजल्यांची सोसायटी होती, एकूण दहा फ्लॅट होते. मी त्या खोलीच्या दरवाज्याकडे बघितलं, कुलूपाकडे बघितले, मग डोअर बेलकडे बघितले, तिने चावी डोअर बेलच्या मागे लपवली असेल का? मी हळूच डोअर बेलच्या मागे शोधलं, चावी सापडली!
आत जाऊ का नको? आत जाऊन काय करू? कशाला जाऊ? असाच जाऊ, टाईमपास. पण मग कोणी आलं तर? कोण येणार? ही मुलगी रात्री येते, मी चावीकडे बघत हा सगळा विचार करत होतो.

तेवढ्यात वरच्या मजल्यावरून कोणीतरी खाली येत होतं...
मी पटकन कुलूप उघडून, दरवाजा उघडला, आत गेलो!!
मी त्या दाराची कडी आतून लावली, शांत उभा राहिलो, तुम्ही कधी गेला आहात का? असे नकळत कोणाच्या तरी खोलीत, चोरून? चोरायचं तर काही नव्हतं, पण मला नाही माहित मी आत का आलो, आलो असाच. फक्त दोन खोल्या होत्या, किचन आणि हॉल, काही बघण्यासारखं नव्हतं, पूर्ण पसारा होता, बऱ्याच दिवसापासून, कोणी झाडू ही फिरवला नव्हता, बरीच झुरळ फिरत होती, हॉल मध्ये एक बेड होता, एक जुना सोफा होता, त्याचा कापूस बाहेर आला होता, मी सोफ्यावर बसलो, समोर एक छोटा टीव्ही होता, माझ्याकडे टीव्ही नव्हता, त्यामुळे बरेच महिने मी टीव्ही बघितला नव्हता, मी टीव्हीचा रिमोट शोधला, रिमोट सोफ्याच्या खाली सापडला, पण टीव्ही काही लागला नाही, म्हणजे लागला, पण स्क्रीनवर सगळ्या मुंग्या आल्या, एक डीव्हीडी प्लेअर होता, काही सिनेमाच्या सिडीज होत्या, "सजना, परत ये ना" नावाचा सिनेमा सुरु केला, थोडक्यात आपण चोरून एक मुलीच्या खोलीवर आलो आहोत, सोफयावर तंगड्या पसरून टीव्ही बघतोय, याच काही मला भान नव्हतं!!

मला त्या सोफ्यावर कधी झोप लागली ते कळलं नाही!! पण मस्त झोप लागली, अगदी शांत, स्वप्न पडलं नाही, दचकून जागा झालो नाही, ती गाढ झोप म्हणतात ना, अगदी तशी झोप. मस्त मेल्यासारखा झोपलो!

मी जेव्हा उठलो, तेव्हा रात्रीचे नऊ वाजले होते, मी उठलो, माझ्या समोरच्या टीव्हीवर आता फक्त एक ब्लँक स्क्रीन दिसत होती, मुंग्या गेल्या होत्या, माझ्या हातातला रिमोट खाली पडला होता, मी रिमोट उचलून टीव्ही बंद केला, मी कुठे आहे, हे लक्षात आलं, मी लगेच खोलीच्या बाहेर आलो, परत कुलूप लावलं आणि चावी त्या डोअर बेलच्या मागे पहिल्यासारखी लपवून ठेवली, या चावी ने माझी छवी बदलली होती !!

मी माझ्या खोलीत जेव्हा परत आलो, तेव्हा माझ्या लक्षात आलं, कित्येक महिन्यानंतर आपण इतके मेल्यासारखे झोपलो होतो, मला एकदम फ्रेश, मस्त वाटत होतं, काहीतरी जादू होती त्या सोफ्यामध्ये किंवा त्या खोलीमध्ये, बसल्या बसल्या झोप लागली!! मी माझं जेवण स्वतः बनवलं, मस्त जेवलो, एक छान झोप मिळाली की सगळा थकवा लोप पावतो.

मग दुसऱ्यादिवशी परत तिच्या रूमवर गेलो, तिसऱ्या दिवशी मोह आवरता आला नाही, मग मी रोज त्या खोलीत जायला लागलो, आरामात झोपत होती, शांत, गाढ, झोप!! मी पाच दिवस सुट्टी घेतली होती, त्यात मनसोक्त झोपत होतो, अशा झोपेची मला खूप गरज होती, ती मला मिळत होती, मी दुपारी जेवण केल्यावर, झोपायला जायचो, रात्री नऊ पर्यंत मस्त झोपायचो. ती मुलगी साडे बारा, एकला घरी परत यायची, सकाळी सातच्या आधी निघून जायच, मी तिच्या खोलीतली एक सुद्धा गोष्ट हलवली नव्हती, त्यामुळे तिला कधी कळलं नाही, की मी रोज असा चोरून तिथे झोपायला जातोय, पण खरंच त्या जागेत काहीतरी जादू होती, अशा काही वास्तू असतात ना, ज्या तुम्हाला शांत करतात, तशी ही खोली मला शांत झोपवत होती.

त्यादिवशी मी नेहमी सारखा झोपलो होतो, जाग आली, मोबाईल मध्ये बघितलं, तर रात्रीचे सव्वा बारा वाजले, बाप रे!! आपण इतका वेळ कसा काय झोपलो? मी पटकन उठलो, खोलीचे दार उघडून बाहेर आलो खिशातून चावी काढून कुलूप लावणार तेवढयात....
एक मुलगी, खालच्या मजल्यावरून चढून वर आली, तिने मला बघितले, मी चावी हातात घेऊन कुलूप लावत होतो, मी तिच्याकडे बघितले, ही तर तीच मुलगी!! मी तिच्या रोजच्या पोषाखावरून तिला ओळखले, ती मला बघून तशीच स्तब्ध उभी राहिली, तिला झाला प्रकार कळायला तीन-चार सेकंड गेले, मी काही बोलणार, तेवढ्यात ती पळाली!!
ती जशी पळाली, तसं काय करावे ते मला कळेना, आता माझे बारा वाजले होते!! मी तिला हाक मारणार होतो, पण तिचे नाव पण माहित नव्हते, काय करू आता? ती तक्रार करेल? आपण जेल मध्ये जाऊ? काय करू? मी पटकन चावी फिरवली, कुलूप लावलं, पळत त्या मुली मागे गेलो, तो पर्यंत ती निघून गेली होती, मी रस्त्यावर येऊन बघितले, इकडे तिकडे बघितले, पण ती मुलगी दिसली नाही.

मी एका जागी खाली बसलो, आता मी खचलो.
एक मिनिटं, तिला माहितेय का मी तिच्या समोरच्या फ्लॅट मध्ये राहतो? तिने मला आधी कधी बघितले नव्हते, आज पहिल्यांदा मी तिला, तिने मला बघितले, ते ही दोन- तीन सेकंद, तिला मी नक्कीच चोर वाटलो असेल, पण माझ्या हातात तर काहीच नव्हते, मी कधी काही चोरले पण नव्हते. पण तिने मला कधीतरी बघितले असेल तर? तिला माहित असेल की मी तिचा शेजारी आहे, ती पोलिसात गेली तर? मग पोलीस येतील, मारतील का? जेल होईल का? ती मुलगी केस करेल? जेल झाली की मग कधी परत जॉब नाही मिळणार, मग कमवणार काय? खाणार काय? काय करणार? काय करू?
त्या थंडीच्या दिवसात पण मला घाम फुटला.
मी दोन्ही हातांनी डोकं पकडले, तसाच बसलो, पण पटकन उठलो, खोलीच्या दिशेने धावत गेलो. एक शक्यता होती, ती जर पोलिसांकडे गेली असेल, तर ती पोलिसांना घेऊन लगेच इकडे येऊ शकते, मग पोलीस मला ओलीस ठेवतील.
मी माझा फोन स्विच ऑफ केला, सिम कार्ड बाहेर काढून ठेवलं, माझ्या खोलीच्या दिशेने धावलो, पटकन बॅग भरली, दिसतील ते कपडे भरले, माझ्या खोलीला कुलूप लावले, तशी बॅग धरून धावतच रस्त्यापर्यंत आलो, स्टेशनसाठी रिक्षा पकडली.

मी घरी, गावी आलो, माझा फोन स्विच ऑफ केला होता, मी बॉसला मेल करून कळवलं, माझी सुट्टी वाढवून घेतली, माझा जॉब गेल्यातच जमा होता, पण या प्रकरणातून मला लवकर बाहेर पडायचं होतं, मला शोधात पोलीस येतील असे सारखे वाटत होते, मी पुरता घाबरलो, माझी झोप उडून परग्रहावर गेली होती, पण तसे काही झाले नाही, कदाचित ती मुलगी परत आली असेल, घरातून काही चोरीला गेले नाही, यावरून तिने सुद्धा तक्रार केली नसेल किंवा तक्रार मागे घेतली असेल, ती अजून तिथे राहत असेल? का खोली सोडली असेल?

मी पाच दिवस गावी राहिल्यावर, परत माझ्या खोलीकडे आलो, कदाचित पोलीस माझी परत घरी येण्याची वाट बघत असतील, दबा धरून बसले असतील, मी आलो की, मला पकडतील, सगळ्या शक्यता होत्या, पण देवाच्या कृपेने तसे काही झाले नाही. मी दुपारी खोलीकडे आलो, माझ्या समोरच्या खोलीला नेहमीसारखं कुलूप होतं.
मी माझ्या खोलीत शिरलो, पण त्यानंतरचे चार-पाच दिवस भयानक होते, पोलीस येतील, मला घेऊन जातील अशी भीती माझ्या मनात बसली होती, त्यामुळे माझी झोप पूर्णपणे उडाली होती, पण ती मुलगी परत कधी आली नाही, रोज रात्री साडे बारा, एक वाजता ती यायची, मला लगेच पावलांचा आवाज यायचा, पण ती कधी परत आली नाही.
कदाचित वैतागून, तिने खोली सोडून दिली.
काय माहित, पण पोलीस काही आले नाही, कोणी मला त्याबद्दल विचारले सुद्धा नाही, त्यामुळे जसे दिवस जात होते, तशी माझी भीती कमी होतं होती, मी ऑफिसला परत जाऊ लागलो, शांत राहू लागलो, झोपेचे तीन तेरा झालेच होते, पण काम मन लावून करत होतो.

"तुला भास झाला असेल" जतीन म्हणाला.
मी जतीनला झालेला सगळा प्रकार सांगितला.
"कशामुळे"
"त्या गोळ्यांमुळे" जतीन म्हणाला
"नाही रे, हे सगळं गोळ्यांच्या आधी सुद्धा झालं होतं, मी तिला रोज बघत होतो" मी म्हणालो

"बघ मला काय वाटत, तुला झोप येत नव्हती, तुझा मेंदू थकला होता, त्यामुळे...." जतीन एवढे बोलून थांबला.
"त्यामुळे काय..." मी वैतागलो.
"त्यामुळे तुला भास काय? खरं काय? हे कळत नव्हतं" जतीन म्हणाला.
मी काहीच बोललो नाही, विचार करू लागलो, भास? खरंच?
"तू तिच्याशी कधी बोललास?" जतीन प्रश्न विचारू लागला.
"नाही" मी उत्तर दिले.
"तिने तुला बघितल्यावर, ती परत कधीच आली नाही?"
"हो"
जतीन एवढे बोलून थांबला, त्याने मला विचार करायला वेळ दिला, भास? असा होतो? मला माहित नव्हते, मी गडबडलो, जतीन मित्र कमी मानसोपचार तज्ञ जास्त झाला होता, मला एका डॉक्टरच्या आवेशात सांगू लागला,
"तुझ्या मेंदूने अशी एक जागा बनवली जिथे तुला झोप येईल, तू तिथे जाऊन झोपू लागला, पण ही जागा खरी नव्हतीच, हा सगळा तुझा भास होता, तुझा मेंदू तुला फसवत होता, मेंदूला विश्रांतीची गरज होती, मेंदूला कसेही करून तुला झोपवायचे होते, म्हणून त्याने हे सगळं तुझ्या मनात तयार केले, तू तुझ्याच खोलीत झोपत होता, पण तुला वाटलं....."
मी पुढचं काही ऐकू शकलो नाही, असं कसं शक्य आहे? नाही, मी तिला खरं बघितलं, मला नाही भास होऊ शकत.

"मला सांग तू खोलीत का गेला?" जतीनचे प्रश्न अजून संपले नव्हते.
"काही कारण नव्हतं, असंच.." मी म्हणालो.
"हेच तर, असंच नाही गेला, तुला मेंदूने तिकडे जाण्यास भाग पाडलं, त्या खोलीत गेल्यावर शांत झोपवलं" जतीन विश्वासाने म्हणाला. मी जतीनच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं, काही बरळत होता, "विचार कमी, भांडणाची हमी" अशी परिस्थिती उदभवू लागली, मी जतीनला आणि या विषयाला टाळलं, कामाला टाळ लावून घरी निघालो.

भास? खरंच? माझं डोकं जड झालं होतं, रस्त्यात पूर्ण वेळ हाच विचार करत होतो, घरी आलो, पायऱ्या चढू लागलो, मी माझ्या खोलीच्या समोर आलो, त्या मुलीच्या खोलीचे दार उघडे होते!! जाऊ की नको? नको जायला, मी माझ्या खोलीचे कुलूप उघडू लागलो, पण तेवढ्यात त्या घरातून एक बाई बाहेर आली.

"एक्सक्यूस्मि" माझ्या मागून आवाज आला.
मी मागे वळून बघितले, एक तिशीतली बाई माझ्यासमोर उभी होती, मी तिला निरखून बघू लागलो, ही तीच का? पण ती मुलगी लहान...
"हॅलो" ती म्हणाली.
"हाय" मी उत्तर दिले.
"तुम्ही इथे राहता?" तिने विचारले.
मी पुरता घाबरलो होतो, मी फक्त "हो" म्हणून मान डोलवली.
"मी या फ्लॅटची ओनर आहे" ती बाई म्हणाली.
"ओके ओके" मी म्हणालो.
नाही ही ती मुलगी नक्कीच नाही!!

"अक्चुअली कसं आहे ना, मी या फ्लॅटसाठी भाडेकरू शोधत आहे" तिच्या अॅक्सेंट वरून ती पक्की पुणेरी वाटली.
"आधीचे भाडेकरू सोडून गेले का?" मी अंदाज घेत म्हणालो.
"आधी मी आणि माझे मिस्टर राहत होतो, मग आम्ही जर्मनी गेलो, मागच्या आठवड्यात परत आलोय, माझ्या आईकडे राहतोय, मला ब्रोकरकडे अजिबात जायचं नाहीये.."
"म्हणजे वर्षभर इथे कोणीच राहत नव्हतं?" मी चक्रावलो.
"नाही, रिकामाच होता" ती बाई निरागसपणे म्हणाली.
"कोणाला एका-दोन महिन्यांसाठी दिला होतात का?" मी परत विचारले.
"नाही हो, आम्ही मागच्या वर्षी जर्मनी गेलो, त्यानंतर आता परत येतोय, खोली आहे तशीच आहे, कोणाला कधी दिली नाही" ती बाई म्हणाली.
मी ऐकून त्या खोलीकडे एकटक बघत होतो, मला झालेला प्रकार जरा उलगडू लागला, मी घुम्यासारखा बघत होतो, त्या बाईच्या चेहऱ्यावर "अरे मरतुकड्या बोल पटकन" असे भाव उमटले.

"तुम्ही ओनर आहात का?" तिने विचारले.
"नाही, मी भाडेकरू आहे" मी उत्तर दिले.
"अच्छा, प्लीज बघा ना या खोलीसाठी कोणी भाडेकरू, तुमचा कोणी मित्र असेल तर, गेली एक वर्ष, फ्लॅट असाच बंद आहे" त्या बाईने मला विनंती केली.

तिने मला तिचा फोन नंबर दिला,ती बाई निघून गेल्यावर, मी परत माझ्या समोरच्या खोलीकडे बघितले, बंद दरवाज्याकडे बघितले, मी झालेल्या सगळ्या प्रकाराची उजळणी करत होतो, मी पुढे जाऊन, डोअर बेलच्या मागची चावी बाहेर काढली, चावी अजून तिथे तशीच होती.

त्या मुलीला माहित होतं की, या खोलीची चावी इथे, डोअर बेलच्या मागे लपवून ठेवली आहे, तिला हे कसं माहित होतं हे मला कधी कळणार नव्हतं, तिला हे ही माहित होतं की घराची मालकीण, ही जर्मनीमध्ये स्थायिक झाली आहे, त्यामुळे या खोलीत कोणी अचानक येण्याची शक्यता कमीच होती, कोणाला संशय येऊ नये म्हणून, ही मुलगी रात्री उशिरा येत असे आणि सकाळी लवकर जात असे!!

त्यामुळे त्या रात्री मला ती बघून घाबरली, तिला वाटलं, घराचे खरे मालक परत आले आणि पळून गेली.
त्या खोलीचा नवीन खोलीचा भाडेकरू कोण असेल? वेल, कूड यु टेल? मी हा फ्लॅटच विकत घेणार होतो, पण फ्लॅटची किंमत ऐकून मला हिम्मत झाली नाही, एक महिना झाला, खोलीचा रीतसर भाडेकरू झालो आहे आणि त्या सोफ्यावर रोज रात्री आरामात झोपतोय, पण आज काल मी जरा जास्तच झोपतोय!!

-चैतन्य रासकर
https://www.facebook.com/chaitanya.raskar.5

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान कथा. आवडली.

ही कथा अगोदर कुठेतरी टाकली होती का? वाचल्याची आठवतंय. आणि सुरवातीचा भागसुद्धा बदलल्यासारखा वाटतोय.

ही कथा अगोदर कुठेतरी टाकली होती का? वाचल्याची आठवतंय. आणि सुरवातीचा भागसुद्धा बदलल्यासारखा वाटतोय.>>>हो मी सुध्दा ही आधी वाचली आहे

हो हो, मी सुद्धा प्रतिलिपी वर वाचलीय. पण आता कथा छान खुलवलीय.. लेखकाच्या नावामुळे लक्षात राहिली कथा. पुलेशु

@च्रप्स @र।हुल @मी मिनु @अंबज्ञ @ऋतु_निक @mr.pandit @किल्ली @समाधानी @अग्निपंख @सचिन काळे @सस्मित @अंकु @चैत्राली उदेग @असामि-असामि @पलक @प्रज्ञा तिवसकर @समाधान राऊत @सायुरी @krantiveer @नँक्स @वावे @राया @maitreyee

धन्यवाद Happy तुम्हा सगळ्यांना कथा आवडली हे बघून खूप आनंद झाला, इतका छान प्रतिसाद मिळाला की पुढची कथा लवकरच पोस्ट करेन.

@पाथफाईंडर
ही कथा लिहिताना, माझी सुद्धा झोप उडाली होती Lol

मला एक अजून सांगावेसे वाटते, मी मुंबई मध्ये जेव्हा राहत होतो, तेव्हा आमच्या खोलीची एकच चावी होती, सगळेजण एकच चावी वापरत असे, सगळे जण आळशी होते, स्वतःसाठी कोणीही डुप्लिकेट चावी बनवली नाही, आम्ही ती एक चावी डोअर बेलच्या मागे लपवत असू, आम्हा चार लोंकाना फक्त ती जागा माहिती होती, एकदा काय झालं, दोघे जण परगावी गेले होते ,एकजण ऑफिस मधून अगदी रात्री घरी येत असे, मी नेहमीसारखा संध्याकाळी घरी आलो, चावी घेतली, कुलुपं उघडलं, आत आलो, दारातच थबकलो!! घरातले सगळे दिवे, पंखे वेगात सुरु होते, एकूण तीन खोल्या होत्या, तिन्ही खोल्यांमधले ट्यूबलाईट्स, पंखे सुरु होते, घरात मी एकटाच, मी देवाचं नाव घेऊन सर्व दिवे, पंखे मालवले, मी घाबरलो, त्यामुळे कुलुपं लावून घराबाहेर पडलो, शेवटी तो दुसरा रूममेट ही आला, त्याला हा सगळा प्रकार सांगितला, तो ही चक्रवला, पण दोघांनी धाडस केले, शेवटी खोलीत प्रवेश केला, कसातरी झोपायचा प्रयत्न केला, नंतर कळाले की...एवढं लिहिल्यावर असं वाटतेय की या वर एक चांगली कथा होऊ शकते Happy

प्रतिलिपी वर पोस्ट केली होती, तेव्हा फक्त, हजार बाराशे शब्दांची होती, मी परत वाचल्यावर मला जाणवले की कथेत तेवढी मजा राहिली नाही, म्हणून परत कथा लिहून काढली, मला अजून कथेत बरेच काही लिहायचे होते, जसे की त्या घरात राहणाऱ्या आधीच्या मुलीने आत्महत्या केली असते, मग "मी" आत्महत्येचे कारण शोधतो, तर त्या मुलीला ही निद्रानाशेचा आजार असतो, असे कळते, वगैरे वगरे, पण मला वाटलं कदाचित रटाळ होईल आणि मग या गोष्टी नमूद केल्या नाहीत.

Pages