आठवणींच्या हिंदोळ्यावर! अर्थात, ये है मुंबई मेरी जान!

Submitted by सचिन काळे on 18 June, 2017 - 03:16

माझी बालपणीची पंचवीसएक वर्षे मुंबईत गेली. आता नोकरी आणि वास्तव्य उपनगरात असल्याने वाट वाकडी करून मुंबईत जाणे सहसा होत नाही. बऱ्याच वर्षांनी काल सकाळी काही कामानिमित्त कुर्ला ते कफ परेड येथे बसने दीड दोन तासाचा प्रवास करणे झाले. प्रवास मेनरोडवर सायन, दादर, भायखळा, सीएसटी असा सरळसोट होता. बसचा लांबचा प्रवास असल्याने मी मस्त खिडकितली जागा पटकावली होती.

जसे सायन मागे पडले आणि माझ्या ओळखीची मुंबईतली जुनी ठिकाणे जसजशी दृष्टीस पडू लागली, तसतशा माझ्या त्यासंबंधीच्या सर्व जुन्या आठवणी उचंबळून येऊ लागल्या. रस्त्याकडेच्या पूर्वीच्या जुन्या बिल्डींगी, दुकाने, बागा, पूल, चौक, हॉटेल, थिएटर पाहून जीव थोडा थोडा होऊ लागला. बस ट्राफिकमध्ये हळूहळू चालत होती आणि मी मान वळवून वळवून बाहेरील दृश्य पहात होतो. सारखं मनातून वाटायचं, अरे! इथे तर ते होतं, कुठे गेलं!!!? आणि इथे हे काय नवीन झालंय. पूर्वीचं ते शोधायला माझी नजर सारखी भिरभिरत होती.

मी उजवी डावीकडे दिसणाऱ्या जुन्या गल्ल्या डोळे भरून पहात होतो. त्या गल्ल्यांमध्ये गणेशोत्सवाच्या काळात रस्त्यावर दाखवले जाणारे सिनेमे पहायला रात्र रात्र मी उंडारलेलो आठवत होतो. काही बसस्टॉप तर वर्षानुवर्षे त्याच जागेवर अगदी तस्सेच ठाण मांडून होते. तर काहींचा सुंदर चकचकीत कायापालट झालेला होता. आता वाहतुकीच्या इतर पुष्कळ साधनसुविधा झाल्याने बसस्टॉपवर मात्र तुरळक गर्दी दिसत होती. मला बसस्टॉपवर असणारी पूर्वीची गर्दी आठवली. बस आली की तिच्यावर गुळाला मुंगळे चिटकावेत तसे माणसे तुटून पडत. काही हॉटेलं तर अजूनही एवढी वर्षे झाली तरी तिथल्या तिथेच होती. त्यातल्या एका हॉटेलात जाऊन मला मालकाला सांगावेसे वाटले, की "तुम्हाला माहितेय का? त्या कोपऱ्यात बसून मी अवघ्या ५५ पैशात साधा डोसा आणि त्याबरोबर एक्स्ट्रा चार्ज न लावता मिळणारी चटणी चक्क पाच सहा वाट्या चापलेली आहे." मला एवढी फुकटची चटणी खाताना पाहून एक वेटर बिचारा मी हाक मारली तर मला अजून द्यावी लागेल म्हणून तोंड फिरवून उभा रहायचा. मी मुद्दाम इराण्यांची हॉटेलं कुठे दिसतात का ते बघत होतो. पण ती काही दिसली नाहीत. त्या हॉटेलांमध्ये असलेली पैसे टाकून गाण्यांची रेकॉर्ड ऐकायची मशीन मला आठवली. जुनी थिएटरं पाहून तिथे तिथे अवघ्या तीन रुपये तिकिटात पाहिलेले पिक्चर मला आठवत होते. पिक्चरची तिकिटे काढायला मी तिथे लावलेल्या रांगा आणि दबलेल्या आवाजात तीन का चार म्हणत फिरणारे ब्लॅकवाले आठवत होते. काही थिएटर गायब झालेले पाहून वाईट वाटत होतं.

रस्त्याच्या बाजूला दिसणाऱ्या पूर्वीच्या काही सरकारी इमारती आणि पोलीसस्टेशन्स अजूनही तिथल्या तिथेच आणि त्याच ऐतिहासिक अवस्थेत दिसले. ते पाहून त्यांच्याशी माझी जुनीच ओळख असल्यासारखे वाटले. तिथे कामानिमित्त मी मारलेले हेलपाटे मला आठवले. पूर्वीच्या दोनतीन मजली इमारतींऐवजी आकाशाशी स्पर्धा करणाऱ्या टोलेजंग रहिवासी इमारतींची संख्या भरमसाठ वाढलेली दिसली. चौकातल्या काही बागा मोठ्या कंपन्यांनी प्रायोजित केल्याने अजूनही सुशोभित केलेल्या दिसल्या. पूर्वी त्या बागा शुष्क आणि चुकार, समाजकंटक मंडळींचा अड्डा असत. म्युनिसिपल इस्पितळं मात्र पूर्वी होती तशीच बकाल दिसली. गिरणकाळापासून असलेल्या लाकडाच्या चाळी एक दोनच दिसल्या. बाकीच्या सर्व नामशेष होऊन त्याठिकाणी बिल्डिंगची खुराडी उभी राहिली होती.

एक मैदान अजूनही तसंच टिकून होतं. तिथे काही मुलं फुटबॉल खेळत होती. रस्त्यावरच्या सिग्नलची संख्या बरीच वाढलेली होती. एका सिग्नलवर तर तीन वेळा सिग्नल हिरवा होऊन पुन्हा लाल झाला, पण माझी बस काही तो पार करू शकली नाही, एवढी ट्राफिक जाम होती. पण रस्त्यावरून चालणाऱ्या लोकांची शिस्त वाखाणण्याजोगी वाटली. पूर्वी सगळीकडे लोकांची अनिर्बंध गर्दी जाणवे. मुंबईत उड्डाणपूलांची संख्या वाढलेली दिसली. बस उड्डाणपूलावरून जाताना पुलाच्या दोन्ही बाजूला संरक्षित कठडे लावल्याचे दिसले. पूर्वी हे कठडे उंचीला फारच छोटे होते. बऱ्याचदा वाहने त्या बुटक्या कठड्यांना धडकत. त्यावरून मला मुंबईतला जे. जे. चा पहिला उड्डाणपूल आठवला, जो बांधकाम चालू असतेवेळीच कोसळला होता. खडापारशीचा पुतळा पाहून गहिवरलो. रस्त्यावर अजून काही पूर्वीचे पुतळे दिसले नाहीत. राजकीय पार्ट्यांचे एखाददुसरे फलक दिसले. पूर्वी रस्त्याच्या दोन्हीकडील इमारतींच्या भिंती राजकीय घोषणांनी रंगवून बरबटलेल्या असत. एक मात्र खरे! रस्त्यावर कचऱ्याचे ढीग काही दिसले नाहीत. पूर्वीच्यापेक्षा आता रस्ते फारच स्वच्छ आणि सुंदर होते.

पेट्रोलपंप तर अजूनही पूर्वी होते तेवढेच आणि त्याच ठिकाणी कार्यरत होते. ह्या पंपांवर मी स्कुटरमध्ये पेट्रोल भरायला जायचो तेव्हा आसमंतात भरून राहिलेल्या पेट्रोलच्या वासाच्या आठवणीने आज मला पुन्हा धुंद करून सोडले. रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडांची संख्या पूर्वी होती तेवढीच आजही दिसली. काही मोजक्या ठिकाणी अजूनही टिकून असलेल्या पूर्वीच्या नावाजलेल्या कंपन्यांच्या आणि वर्कशॉपच्या प्रवेशद्वारांच्या पुन्हा दर्शनानेच माझ्या डोळ्यांचे पारणे फिटले. एवढी वर्षे खोदादादसर्कल जमिनीवरून पहात आलो, आज उड्डाणपुलावरून बर्ड व्हीव्युने पहायला मिळाले. पूर्वी दरवर्षी पावसाळ्यात पावसाच्या पाण्याने तुंबणारी तीच ती ठिकाणे पुन्हा पाहून त्या पाण्यात मी अडकलेल्या दिवसांची आठवण आली.

असाच मजल दरमजल करीत मी तब्बल दोन तासांनी कफपरेड येथे पोहोचलो. पण खरं सांगू!? मला ह्या प्रवासात अवघे दोन मिनीटेही कंटाळा आला नाही. हा प्रवास मी अनुभवलेल्या माझ्या जुन्या मुंबईची आठवण माझ्या मनात पुन्हा जिवंत करून गेला. बसमधून उतरताना मी मनातल्या मनात समाधानाने गुणगुणत होतो. "जरा हटके, जरा बचके, ये है मुंबई मेरी जान!!!"

माझा ब्लॉग  :  http://sachinkale763.blogspot.in

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त वर्णन!!!
माझ्या बालपणीची काही वर्ष लालबाग, काळाचौकी आणि वांद्रे येथे गेली. नंतर कधी त्या परिसारातून गेले तेव्हा अशीच काही आठवणीत हरवले होते Happy

@ मेघा, राहुल, sonalisl, लेख वाचल्याबद्दल आणि प्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले आभार!!!

५५ पैशात साधा डोसा आणि त्याबरोबर एक्स्ट्रा चार्ज न लावता मिळणारी चटणी चक्क पाच सहा वाट्या चापलेली आहे."

कोणत्या सालाची गोष्ट आहे

मला बऱ्याच वाचकांकडून मी जुन्या मुंबईचे लिहिलेले वर्णन कोणत्या सालातील आहे, याची विचारणा होत होती. मी आपणांस सांगू इच्छितो, की हे सर्व वर्णन अंदाजे १९७५-७७ सालाच्या दरम्यानचे आहे.

हे सांगण्याकरिता मी ह्या धाग्यावर उत्साहाने प्रतिसाद लिहावयास सुरवात केली. पण माझा प्रतिसादच एवढा मोठा झाला, की मला त्याचा पुरवणी धागा काढण्याचा विचार करावा लागला.

पुरवणी धागा वाचण्याकरिता कृपया पुढील लिंकवर टिचकी मारावी.

http://www.maayboli.com/node/62864

छान लेख ! धाग्या बद्दल धन्यवाद ! मी सुद्धा भुतकाळाची सफर केली . उदाहरणार्थ - दादरचा कैलाश लस्सीवाला , लालबागचे सरदार हॉटेल (वांगेभजी ), लाडू सम्राट, दादर चे मामा काणे (वडा ), पेटिट लायब्ररी ( ३६५ दिवस उघडी ) , राणी बाग आणखी बरेच काही .

५५ पैशात डोसा वाचून वाटलं तुम्ही खूपच म्हातारे आहात अशी शंका आली.
शेट्टी७६), कामतांची हाटलं तेव्हा पासून मुंबईत होती?(७५-७६)

@ झंपी, शेट्टी७६), कामतांची हाटलं तेव्हा पासून मुंबईत होती?(७५-७६)>>> १९७५-७७ साली आमच्या बिल्डिंगसमोरील रस्त्यावर 'गोकुळ लॉजिंग अँड बोर्डिंग' नावाचे उडप्याचे हॉटेल होते. आणि आजमितीसही ते हॉटेल आणि आमची बिल्डींगही तिथेच आहे.