पेरुला चला!

Submitted by मोहना on 22 June, 2017 - 19:53

"विमान कंपन्यांचा ताबाच घेते आता मी." लालबुंद चेहर्‍याने मी जाहीर केलं.
"कशाला?" तितक्याच शांतपणे नवरोजींनी विचारलं.
"त्यांना सुधारायला." धुसफुसत मी उत्तर दिलं. मुलगा विनोद झाल्यासारखा खो खो हसला.
"बाबाचा ताबा तुझ्याकडेच आहे की. तो कुठे सुधारला?"
"प्रयत्नांती परमेश्वर बाबा, प्रयत्नांती परमेश्वर." लेकराच्या विधानाने गहिवरलेच मी. माझं दु:ख पोटच्या मुलाने जाणलं होतं. मी लगेच माझा मनसुबा खुला केला. "तुझ्या बाबांच्या बाबतीत करतेय तेच विमान कंपन्यांच्या बाबतीत. सुधारण्याचा प्रयत्न. वेळा पाळायला शिका म्हणावं. रद्द करतात विमानं. पेरुला निघाले होते. बसते आता घरीच पेरु खात."
"कसले पी. जे. करतेस गं. आणि पेरु नाही परु." माझ्या शब्दांच्या विमानाला लेकीने खीळ घातली.
"pe पे, ru रु. पेरुऽऽऽ. मला माझं ब्रिटीश इंग्रजी सोडायला लावू नकोस." ब्रिटीश इंग्रजीच्या ढालीकडे दुर्लक्ष करत मुलांनी बॅगेकडे मोहरा वळवला.
"आई, जरा कमी कपडे घे. परु तुला नाही बघणार. तू परु बघायला चालली आहेस." नवर्‍याने भले शाब्बासचा कटाक्ष मुलाकडे टाकला.
"फेसबुकवर फोटो टाकायचे असतात. एकाच कपड्यातले किती काढणार?" एवढंसुद्धा कसं कळत नाही असा चेहरा करुन मी उत्तरले.
"तू तुझे फोटो पोस्ट करणार आहेस की परुचे?" मुलगा फीस करुन हसला आणि सूड म्हणून मी दोन चार कपडे अजून कोंबले. मुलाच्या हातात बॅग सोपवली आणि अखेर पेरुला पोचलो.

एक वर्ष, आठवड्यातून एक तास शाळेत शिकलेल्या स्पॅनिशच्या बळावर लेक स्पॅनिशवर प्रभुत्व मिळवल्यासारखी स्पॅनिश फाडायला सज्ज झाली. आम्ही आमच्या फोनमधल्या गुगल भाषांतरकाराला तयारीत राहायला सांगितलं. पण पेरुकर आम्हाला परके मानायला तयारच होईनात. रंग, रुप सारं एकच आणि स्पॅनिश न बोलता habla English, habla English का करतोय तेच त्यांना कळेना. महाराष्ट्रीयन लोकांना इंग्रजी फाडताना पाहिलं की माझा चेहरा होतो तसा त्यांचा होत होता.
"तू नो सबेस एसपॅनोअल?" काय बोलतायत ते नाही समजलं तरी, ’मेल्यांना मातृभाषेचं वावडं, फोडून काढायला पाहिजे’ इत्यादी भाव त्यांच्या चेहर्‍यावर स्पष्ट झळकत. आपल्यातलं कोण स्पॅनिश दिसतं म्हणून आमच्या नजरा एकमेकांवर रोखल्या जात. मग चौघातलं कुणीतरी घाईघाईत पुढे सरसावायचं,
"वुई इंडियन, वुई इंडियन....यू नो ताजमहाल, करी, बॉम्बे नाऊ मुंबाय...." अख्ख्या देशाचं चित्र एका वाक्यात उभारायची घाई उडायची. ते देखील पूर्ण वाक्य न बोलता एकेक शब्द, हातवारे पद्धतीने. यामुळे समोरच्याला न येणारी भाषा येऊ शकते हा पक्का समज काही क्षणातच त्याच वेगात स्पॅनिश बोलून समोरचा खोडून काढे. कोण, काय बोलतंय, सांगतंय याचा कुणालाच ताळमेळ लागत नाही म्हटल्यावर हातातले फोन कार्यरत. ’गुगल ट्रान्सलेटर’ एकमेकांशी ’संवाद’ साधायला लागायचे. ती यंत्र तरी मेली धड कुठे बोलतात. एका यंत्राचं बोलणं दुसर्‍या यंत्राला कळत नव्हतं.
"ही यंत्र म्हणजे आपल्या दोघांसारखी आहेत." न राहवून मी नवर्‍याला म्हटलं. नवर्‍याने आधी गडबडून नजर टाकली माझ्याकडे. मला काय म्हणायचं आहे हे लक्षात आल्यावर त्या नजरेचा त्याने रागीट कटाक्ष केला. पण स्पॅनिश माणसाची ही गोड बाई काय बोलली याबद्दलची उत्सुकता चाळवली असावी. यंत्रावर लिहून, हातवारे करत, ओठ हलवत तो विचारत राहिला. मी माझं यंत्र काढलं, मंजूळ आवाजात बोलणं ध्वनिमुद्रित केलं. स्पॅनिश मध्ये कधी नव्हे ते नीट भाषांतरही झालं असावं कारण स्पॅनिश माणूस खो खो हसला.
"आमच्या देशात पण असंच असतं. " त्याने उत्साहाने यंत्राकरवी माझ्यापर्यंत त्याचा आनंद पोचवला. लेक गोंधळली.
"गुगल ट्रान्सलेटर नवरा- बायकोसारखे कसे असतील?"
"अगं आहेत. तुझ्या बाबाला नाही का मी विचारते एक आणि तो उत्तर दुसरंच देतो. तसंच आहे या यंत्रांचं." स्पॅनिश माणसाला झालेल्या आनंदाने मलाही उकळ्या फुटत होत्या.

पेरुत असेपर्यंत हे असंच चालू होतं. मुखदुर्बळ नवरोजी यंत्राद्ववारे संभाषण साधण्यात इतके रमले की नंतर नंतर तर इंग्रजी येणार्‍या माणसासमोरही स्पॅनिश फाडायला लागले. त्याच्याबरोबर आम्हीही. आमचं वेगवान स्पॅनिश झाल्यावर ’प्लीज स्पीक इंग्लीश’ असं ऐकलं की स्पॅनिशचा धुव्वा उडाल्यासारखं वाटायचं. एका वाक्यासाठी लागलेली पाच मिनिटं धारातीर्थीच पडायची. आमचं वाक्य एकच असायचं, मग पाच मिनिटं कशी लागायची? समोरच्याला समजत नाही म्हटल्यावर एकच वाक्य आम्ही चारही जण वेगवेगळे उच्चार काढून बोलायचो. ते समजलं नाही की वाक्यात हातवारे मिळवले जायचे. आधी संवाद, मग पार्श्वसंगीत असं चढत्या क्रमाने नाटक रंगल्यासारखं दृश्य साकारलं जायचं. प्रेक्षकही मदतीला धावायचे. नाट्यात सहभागी व्हायचे. एकच वाक्य सर्व परिणामासहित सादर व्हायचं. आणि समोरच्या व्यक्तीने इंग्लिश, इंग्लिश म्हणून त्यावर पडदा पाडला की इंग्रजीही पडद्यामागे दडी मारायचं इतकं स्पॅनिश मुरत चाललं होतं अंगात. ट्रम्पची अमेरिका सोडून मुक्काम इथेच हलवू इतकं स्पॅनिश यायला लागलं पण तोपर्यंत आमचे पेरुमधले दिवस संपले आणि आम्ही परत मुक्कामाला पोचलो.

Group content visibility: 
Use group defaults

Lol छान लिहिलयं.
तुमच्या प्रोफाईल मध्ये Cricket & Beyond कसं आलं ?

<<<फेसबुकवर फोटो टाकायचे असतात. एकाच कपड्यातले किती काढणार>>> Lol
<<< ’मेल्यांना मातृभाषेचं वावडं, फोडून काढायला पाहिजे’ इत्यादी भाव त्यांच्या चेहर्‍यावर स्पष्ट झळकत.>>> Lol तूफान...तूफान लिहिलंय.
प्रवासाचा वृतांत सुद्धा येउ द्या.

मस्त लिहिलय..... आवडले. Happy
त्या गुगलचा भाषांतरकाराचा साऊंड वापरुन कसा उपयोग होतो ते बघायला पाहिजे...
त्या अ‍ॅपची लिन्क/नाव द्या प्लिज. मस्त करमणूक होईल, आपण एक वाक्य बोलायचे, अन वेगवेगळ्या भाषांमधे ऐकायचे. द्याच त्या अ‍ॅपची लिंक. <<<< [ प्लिज नोटचः हे विषयांतर किंवा "देता येत नसुनही प्रतिसाद द्यायचाच म्हणुन कैतरी दिलाय" असे नाहीये]

सर्वांना धन्यवाद.

प्रवासवर्णन लिहू? - प्रवासभांडण असतं खरं तर :-). कुणीच कुणाचं ऐकत नाही, म्हणजे मी इथे जाऊ म्हटलं की नवरा तिसरीकडेच जायला निघतो आणि मुलं लोळत राहतात. पडल्यापडल्याच कानांना करमणूक असते म्हणून. पण लिहितेच आता Happy

<<< तुमच्या प्रोफाईल मध्ये Cricket & Beyond कसं आलं ?>>> श्री, समजलं नाही काय म्हणताय ते. क्रिकेटमधले षटकार, चौकार विनोदात आहेत असं समजू की काय :-)?

limbutimbu - हा घ्या दुवा आणि लागा कामाला Happy
https://play.google.com/store/apps/details?id=com.google.android.apps.translate&hl=en

धमाल

धमाल

<ते देखील पूर्ण वाक्य न बोलता एकेक शब्द, हातवारे पद्धतीने. यामुळे समोरच्याला न येणारी भाषा येऊ शकते हा पक्का समज > Lol

Trying too hard. Did you do any sight seeing. ? Like monuments and stuff?

<<<फेसबुकवर फोटो टाकायचे असतात. एकाच कपड्यातले किती काढणार>>> Lol
<<< ’मेल्यांना मातृभाषेचं वावडं, फोडून काढायला पाहिजे’ इत्यादी भाव त्यांच्या चेहर्‍यावर स्पष्ट झळकत.>>> Lol तूफान...तूफान लिहिलंय.
प्रवासाचा वृतांत सुद्धा येउ द्या. >>>>>>>>>>> +१