कांदा-लसूण मसाला (सोलापूरी पद्धतीचे काळे तीखट)

Submitted by स्मिताजित on 7 December, 2016 - 03:40
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ दिवस
लागणारे जिन्नस: 

साहित्य -

१ किलो लाल मीरच्या , शक्यतो लवंगी घेणे नसेल तर कोणतीही तिखट असणारी

१ किलो कांदा (कापून वाळवलेला )

१/४ लसून

१/४ धने

१/४ खोबरे खिसून / पातळ काप करून

५० ग्राम हळकुंड

५० ग्राम मोहरी

५० जिरे

मुठभर धोंड्फुल आणि तमालपत्र

तेल

१/४ किलो खडा मीठ

मसाले १ किलो मिरची साठी प्रत्येकी १० ग्रॅम (प्रत्येक मसाल्याचे २ भाग करणे - ५-५ ग्रॅम )

लवंग

दालचिनी

शाहजीरे

सालीसकट वेलची

(मिरे वापरत नाही कारण त्याने खूपच तिखट आणि जळजळीत तिखट होते, हवे असल्यास वापरू शकता पण थोड्या प्रमाणात )

इतर मसालेही वापरू शकता तुमच्या आवडी प्रमाणे

असेलतर कोथिंबीर वाळवून

सुंठ (वाळवलेले आले )

क्रमवार पाककृती: 

मला माहित असलेली कांदा-लसूण मसाल्याची गावराण पाकृ आई कडून शिकले आहे तिच इथे देते.
आमच्या सोलापूरला हा अशा पध्द्तीचा कांदा-लसूण मसाला घरोघरी बनतो

हा मसाला वर्षाचा एकदाच बनवतात त्याचे प्रमाण मी देवू शकते पण फोटो वैगेरे नाहित

हा कांदा-लसूण मसाला(आम्ही त्याला मसाला तिखट/काळे तिखट असेही म्हणतो) फार झणझणीत असतो, थोडासाही पुरे होतो. मस्त तर्रीवाले मटण्-चिकण होते आणि हे वापरुन भाजी केली तर इतर मसाल्याची गरज ही नसते

कृती-

मिरच्या १ दिवस चांगल्या कडक उन्हात वाळवणे आणि नंतर त्याची देठे काढणे (सगळ्यात कंटाळवाणे काम आणि हात हि तिखट होतात चुकून डोळ्याला लागला कि शिमगाच )

आता साहित्य भाजायला घेणे

जाड बुडाची कढई तापत ठेवणे (आम्ही गावी हे शक्यतो बाहेर चूलीवर करतो कारण पुढे सांगते)

१) त्यात आता कांदा भाजायला घ्या. तेल न घालता कांदा खरपूस अगदी लालसर असा मंद आचेवर भाजून घ्यावा, हाताने दाबले तर तुटायला हवा. आवश्यक वाटल्यास थोडेसे मीठ घालून भाजू शकता

२) लसूण थोडासा ठेचुन ठेवावा

३) धणे कपभर तेलात परतून घ्यावेत ३-४ मिनिट

४ ) आता खोबरेही खरपूस भाजून घेणे , याला तेल लागते

५) आता हळकुंड तळून घ्यायचे, तळला कि हा छान फुगतो

६) मोहरी जिरे देखील थोड्याशा तेलात टाकून परतून घेणे , हे करताना कढईवर १ मीन झाकण ठेवावे, नाहीतर अर्धे जिरे मोहरी तडतडून कढईच्या बाहेर पडतील

७) धोंड्फुल तमालपत्र आणि वापरणार असल्यास सुंठ देखील थोड्याशा तेलात तळून घ्यावे

८) साहित्यात मसाल्याचे २ भाग करण्यास सांगितले होते (प्रत्येकी ५-५ ग्रॅम )

१ भाग मसाला तेलात तळून घेणे, करपवू नयेत लगेच काढायचे तेलातून नाहीतर तुमचे तिखट कडवट होईल

आणि १ भाग मसाला तसाच कच्चा घ्यावा (याचे कारण मला नक्की सांगता येणार नाही, कदाचित मसाल्याचा सुगंध तीखटाला यावा यासाठी असेल)

आता महत्वाचा भाग, मिरच्या भाजणे

मिरच्या भाजताना भयंकर ठसका उठतो, किचनमध्ये केले तर घरात असणाऱ्या व्यक्ती याच्या ठसक्याने खोकायला लागतात म्हणून आम्ही हा मिरची भाजणीचा कार्यक्रम बाहेरच्या चुलीवर करतो

मिरच्या मोठ्या लोखंडी पाटीत किंवा कढईत भाजाव्यात, थोडेसे कोरडे भाजून झाले कि त्यात पळीभर तेल घालावे आणि २-३ मिनिट पर्यंत चांगले भाजत राहणे (मिरची भाजताना सतत हलवत राहणे नाहीतर करपेल )

हे सर्व साहित्य आम्ही गावी मिरची कांडपात नेतो पावडर करायला, मिरची कांडपाची सोय नसेल तर तुम्ही घरी मिकसर मध्ये करू शकता फक्त प्रमाण कमी हवे

एक एक करून सर्व साहित्य बारीक करून घ्यावे आणि चांगले मिसळावे

नंतर हि पावडर बारीक चाळणीतून चाळून घ्यावी आणि शक्यतो आपण लोणची वैगेरे ठेवतो तश्या चीनी मातीच्या बरणीत भरून घट्ट झाकून ठेवावे जेणेकरून मसाल्याचा वास टिकून राहील वर एखदा हिंगाचा खडा ठेवाव

अधिक टिपा: 

टिप - १) भाजलेले खोबरे,कांदा आणि ठेचलेला लसुन हे तिन्ही वेगवेगळया भांड्यात ठेवावे , कांद्याचा कडकपणा टिकून राहायला हवा म्हणजे व्यवस्थीत वाट्ला जातो

२) तळून राहिलेले तेल नंतर आम्ही तिखटाच्या पावडरीत मिसळतो पण जर तिखट खुप दिवस म्हणजे ६ महिने वैगेरे टिकवायचे असेल तर तेल घालू नये, कुबट वास येवू शकतो तेलाचा

ही पाकृ मी दुसर्‍या संस्थाळावर दिली होती तिथून इथे कॉपी करते आहे

माहितीचा स्रोत: 
आई
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्मिताजित धन्यवाद सोलापूरी मसाल्याच्या रेसिपी बद्दल. तोंडाला पाणी सुटले. Happy
मी सोलापूरी मटण खिमा उंडे,सोलापूरी मटण खाल्ले आहे. भारी तिखट असते. मस्तच झणझणीत होते. त्या मटणात चिंचेचा कोळ घालतात त्यामुळे मस्त चव येते. स्मिताजित सोलापूरी मटण खिमा उंडे, सोलापूरी मटणाची रेसिपी सविस्तर लिहाल का? म्हणजे अस्सल सोलापूरी मटणाचा आस्वाद घेता येईल.

Pages