‘प्रगती’चा प्रवास

Submitted by पराग१२२६३ on 14 December, 2016 - 11:04

बऱ्याच दिवसांनंतर पुणे-मुंबई प्रवासाचा योग आला. अर्थातच प्रवासाच्या काही दिवस आधीच ‘१२१२६ अप प्रगती एक्सप्रेस’चे आरक्षण करून ठेवले होते. नेहमीच्या सवयीप्रमाणे आपल्या गाडीच्या वेळेच्या किमान दोन-तीन तास आधी स्टेशन गाठण्याचा इरादा याहीवेळी होता. पण पुण्यात उपनगरात राहणाऱ्या सामान्य नागरिकांना दिवसातले काही विशिष्ट तास सोडले, तर तसे करणे कठीणच. घरापासून स्टेशनपर्यंत जाण्या-येण्यासाठी बस किंवा रिक्षासारख्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर विसंबून असलेल्यांची अशी स्थिती असते. पुणे वाढले आहे आणि नुसते विस्तारतच आहे. सार्वजनिक वाहतुकीच्या बाबतीत मात्र काय स्थिती आहे हे पुणेकरांनाही माहीत आहे आणि बाहेरून पुण्यात आलेल्यांनाही. असो.

तरी मी साधारण पाऊण तासच आधी स्टेशनवर होतो. आज १२२६४ डाऊन निजामुद्दीन-पुणे एसी दुरंतो एक्सप्रेसचा दिवस होता म्हणून मला स्टेशनवर जरा लवकर किमान ही गाडी येण्याच्या वेळेपर्यंत पोहचायचे होते. पण मी तिथे पोहचेपर्यंत या ‘महाराणी’ २ नंबरवर येऊन कधीच विसावल्या होत्या, तर १ नंबरवरून पुणेकरांच्या लाडक्या महाराणी १२१२४ अप ‘दख्खनची राणी’ निघण्याच्या तयारीत होत्या. त्या गाडीच्या सगळी प्राथमिक तयारी पूर्ण झालेली होतीच. मी नवीन टाईमटेबल विकत घेऊन पलीकडच्या फलाटांवर जाऊ लागलो, तोपर्यंत ७.१४ झाले होते आणि सेक्शन कंट्रोलरच्या पूर्वपरवानगीने पुण्याच्या डेप्युटी स्टेशन मॅनेजरने स्टार्टर सिग्नल ऑफ (पिवळा) केला होता आणि पुढच्या मिनिटभरातच ‘दख्खनची राणी’ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने निघाली. पलीकडे दुरंतो आहे माहीत असल्यामुळे मी पुलावरून २ नंबरवर गेलो. तर २ वर दुरंतो आणि ३ वर १२१३० हावडा-पुणे आझाद हिंद एक्सप्रेस होती. या गाड्या येऊन बराच वेळ झालेला असल्यामुळे तिथे गर्दी तशी कमीच होती. आता ‘प्रगती’ तिकडे ५ वर लागलेली होती, म्हणून फलाटावरून दुरंतोला न्याहाळत जाऊया आणि पुढच्या पुलावरून ५ नंबरकडे जाऊया असा विचार मनात आला. पुलाजवळ आलो आणि दुरंतोचा वातानुकुलित रसोई यानवरील बोर्ड पाहून चक्रावलोच. अरे ही नक्की १२२६४ च आहे ना अशी शंका आली. कारण त्या डब्यावर डेस्टीनेशन बोर्ड होता ह. निजामुद्दीन त्रिवेंद्रम आणि ट्रेन नेम बोर्ड होता राजधानी एक्सप्रेस. हे बोर्ड निजामुद्दीनला बदलायचे राहून गेल्याचे लक्षात आले. निजामुद्दीनला पिटलाईनवर या गाडीला प्रवासासाठी तयार केले जात असताना ऐनवेळी रसोई यानमध्ये तांत्रिक अडचणी लक्षात आल्या असतील. त्यामुळे तो डबा बदलावा लागला असेल. त्यावेळी तिथे उपलब्ध असलेला स्पेअर डबा जोडताना गडबडीत हे बोर्ड बदलायचे राहून गेले असावेत.

मग पुढे ५ नंबरवर आलो, तेव्हा ‘प्रगती’ लागलेली होतीच. कल्याणचा २१८६१ क्रमांकाचा डब्ल्यूसीएएम-२पी या आमच्या कार्यअश्वाची गाडीशी जुळणीही करून झाली होती. ४ नंबरवर सोलापूर-पुणे सवारी (पॅसेंजर) गाडी येत असल्याचे संकेत दिले जात होते. मी ‘प्रगती’मध्ये माझ्या जागेवर जाऊन बसलो, तेव्हा तिकडे मेन डाऊन लाईनवरून एक मालगाडी कंटेनर घेऊन घोरपडी यार्डात रिसीव्ह केली जात होती. पुढे काही अडथळा नसल्यामुळे आज या गाडीला रुटींग होम सिग्नल ऑफ (पिवळा) मिळालेला होता, म्हणूनच ही गाडी पुढेपुढे निघालेली होती. त्याचवेळी हावड्याहून आलेल्या आझाद हिंदला घोरपडीच्या यार्डात जाऊन संध्याकाळपर्यंत पुन्हा हावड्याच्या दिशेने जाण्यासाठी तयार व्हायचे होते. तिचा तिथे प्रायमरी मेंन्टेनंस केला जाणार होता. पण ती मालगाडी यार्डात पूर्ण आत जाईपर्यंत आझाद हिंदला फलाटावरून हालता येणार नव्हते.

मी माझ्या जागेवर (विंडो सीट) बसलो असताना मधल्या सीटवर एक तरुणी माझ्या शेजारी येऊन बसली. पण काही मिनिटांतच त्या ३ सीटचे आरक्षण असलेले तिघे - आई, लहान मुलगी आणि आजोबा - येऊन बसले. दोघींमध्ये आमचा नंबर आमचा नंबर प्रकार झाल्यावर त्या लहान मुलीच्या वडिलांनी तिला डब्याचा नंबर विचारला, तर त्या तरुणीच्या लक्षात आले की, आपण दोन डबे मागे येऊन बसलो आहे. मग आता माझा डबा कुठे असेल, असा प्रश्न तिला पडला आणि तिने तो विचारलाही त्या लहान मुलीच्या वडिलांना. त्यांनी सांगितले मागे जा. आता गाडीला तर दहा मिनिटेच सुटायला राहिली होती. म्हणून मग मी त्या तरुणीला तिच्या डब्याची खरी दिशा सांगून टाकली आणि पुढच्या दिशेने जायला सांगितले.

बस्स. मनात म्हटले, झालं आलं परत लहान मुल माझ्या इथं. ते तिघे जण माझ्या आसपासच्या त्यांच्या सीटवर विसावले, तेव्हा वडील त्या लहान मुलीला सारखं सांगत होते. कंटाळा आला तर बाळ तू या खिडकीत ये. जी भिती वाटत होती ती हिच. आजपर्यंत कोणत्याही मार्गावर प्रवास करताना मला आलेला हा कॉमन अनुभव आहे. मग वडील बाहेर उतरल्यावर त्या तिघांसाठी बिस्कीटं घेऊन आले आणि माझ्या खिडकीतून आत देत असताना मुलीनं वेफर्सचा पुडा मागितला. आमच्या समोरच स्टॉल असल्याने तिला वडील कायकाय घेत आहेत हे सगळं दिसत होतं.

इकडे गाडीत आता गर्दी झाली होती, तोपर्यंत तिकडे प्रगतीला सोडण्याची तयारी संपत आली होती. पुन्हा एकदा सेक्शन कंट्रोलरच्या पूर्वपरवानगीनंतर ब्लॉक इन्स्टृमेंटच्या मदतीने शिवाजीनगरच्या डेप्युटी स्टेशन मॅनेजरकडून लाईन क्लिअर घेऊन पुण्याच्या डेप्युटी स्टेशन मॅनेजरने स्टार्टर सिग्नल ऑफ (पिवळा) केला होता. लोको पायलट आणि गार्डच्या ब्रेक पॉवर सर्टिफिकेटवर रिडींग लिहून सह्याही झालेल्या होत्या. त्यांना त्यांच्या लॉब्यांमध्ये मार्गावर सुरू असलेल्या कामांच्या सूचना दिल्या गेल्या होत्याच. स्टार्टर सिग्नल ऑफ झाल्याचे गार्डला मागे रिपिटरद्वारे दिसत होते. असिस्टंट लोको पायलट हातात हिरवा बावडा घेऊन इंजिनाच्या दारात उभा होता. ठीक ७.५० ला प्रगतीने दीर्घ गर्जना करून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने कूच केले.

प्रगती पुढे सरकत असताना माझ्या बाजूच्या स्टेबलिंग लाईनवर पुणे वाराणसी विशेष गाडी उभी असलेली दृष्टीस पडली. त्याचवेळी पलीकडच्या बाजूला निजामुद्दीनहून आलेल्या आणि ११.१० ला पुन्हा परतीच्या दिशेने निघणाऱ्या १२२६३ दुरंतोचा सेकंडरी मेंटेनन्स सुरू झालेला आणि तिच्या पलीकडच्या पिटलाईनवर शताब्दी उभी असल्याचे दिसले. तिचा प्रायमरी मेंटेनंस तिथे होत होता. त्या दिवशी १२०२५-२६ पुणे सिकंदराबाद शताब्दी एक्सप्रेसला सुट्टी असल्यामुळे ती कित्तीतरी दिवसांनी पाहायला मिळाली होती. नाहीतर येण्याजाण्याच्या ऑडवेळांमुळे ही गाडी कधी नजरेस पडतच नाही. तेवढ्यात लगेचच इकडे पँट्री स्टाफकडून नाश्त्याची ऑर्डर घेण्याला सुरुवातही झाली. मला नाश्ता करायचा होताच, पण नंतर बघू असा विचार केला. पुढे प्रगती संगम पूल ओलांडत असतानाच डाऊन पुलावरून लोणावळा-पुणे लोकल आत जात होती. त्यापाठोपाठ प्रगती शिवाजीनगर ओलांडत असतानाच बडोद्याच्या डब्ल्यूएपी-४ ई या कार्यअश्वाचे सारथ्य लाभलेली २२९४४ इंदूर-पुणे एक्स्प्रेस जरा सावधपणे पुण्याच्या दिशेने निघालेली होती. कारण ती लोकल पुढे होती ना. त्यामुळे २२९४४ ला अजून पुण्याचा होम ऑन (लाल) असल्याचे संकेत शिवाजीनगरचा पिवळा असलेला डाऊन स्टार्टर कम ॲडव्हास स्टार्टर कम डिस्टंट सिग्नल देत होता. या सगळ्या गाड्यांच्या हालचालींवर सेक्शन कंट्रोलरचे पुण्याहून नियंत्रण होत होतेच, शिवाय पुण्याच्या कंट्रोल ऑफिसमधील डेप्युटी चीफ कंट्रोलर (पंक्चुॲलिटी) कडून या गाड्या वेळेवर कशा धावतील यावर लक्ष होते.

पुढे असलेल्या मालगाडीमुळे प्रगतीच्या मार्गात काही अडथळे येऊ नयेत, यासाठी सेक्शन कंट्रोलरच्या आदेशानुसार खडकीमध्ये मेन अप लाईनवर हुबळीच्या डब्ल्यूडीजी-४ या दोन कार्यअश्वासह धावत असलेल्या बीसीसी वाघिण्यांच्या मालगाडीला रोखून धरले गेले होते. त्यामुळे प्रगतीला खडकीत लूप लाईनवरून पुढे सरकण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे खडकीच्या स्टेशन उपप्रबंधकाने तसे पॉईट्स सेट करून होम सिग्नल ऑफ केला होता. आता लूप लाईनचे पॉईट्स सेट केलेले असल्यामुळे होम सिग्नलही पिवळा मिळाला होता आणि त्याच्या वरची पांढऱ्या लहान दिव्यांची रांग कोणत्या लाईनवरून गाडी जाणार असल्याचे दर्शवत होता. फलाटावर पॉईट्समन हातात हिरवा बावटा घेऊन उभार होताच. कारण त्याशिवाय प्रगतीलाच काय कोणत्याही गाडीला कोणतेही स्टेशन सोडून पुढे निघून जाता येत नाही. अगदी पुढे पिवळा/हिरवा सिग्नल दिसत असला तरी.

आता प्रगतीने चांगला वेळ घेतला होता. पण दापोडीनंतर तिला वेग कमी करावा लागला. कारण कासारवाडीच्या स्टेशनजवळचे लेव्हल क्रॉसिंग गेट बंद होण्यासाठी वेळ लागत होता आणि त्यामुळे गेट सिग्नल ऑन दिसत होता. पण गाडी सिग्नलजवळ येत असताना गेटमनने गेट बंद केल्यामुळे त्याने तो सिग्नल ऑफ केला होता. त्यामुळे गाडी तिथे थांबली नाही. आता पुन्हा वेग घेतला, तोपर्यंत इकडे ऑर्डरप्रमाणे नाश्त्याचे वितरण सुरू झालेच होते, व्हेज कटलेट, ऑमलेट, साबुदाणा वडा.... पुण्यात फारशी थंडी जाणवत नव्हती, पण गाडी सुटल्यावर सगळेच गारठले होते. मग काय अशा वेळी गरमागरम चहा-कॉफीवाला आला, तर कोण त्याच्याकडे दुर्लक्ष करणार? तिकडे ८.१४ ला आकुर्डी क्रॉस करत असताना तळेगाव-पुणे लोकल प्लॅटफार्मवर होती. चारच मिनिटांनी ८.१८ ला देहू रोड क्रॉस केले, पण लगेचच प्रगती काहीशी मंदावली. पुन्हा लेव्हल क्रॉसिंग बंद होण्यात झालेल्या विलंबाचा परिणाम होता तो. दरम्यान पलीकडून लोणावळा-पुणे लोकल डाऊन दिशेने गेली होती. मात्र प्रगती अजून सावधपणेच धावत होती. कारण वेग धरेपर्यंत पुढे शेलारवाडीजवळ आले होते आणि तिथे वेगमर्यादेचा बोर्ड लावलेला होता. त्यामुळे लोको पायलटला वेग कमी करणे क्रमप्राप्तच होते. शेलारवाडीत रुळांचे- स्लीपर बदण्याचे काम सुरू होते. म्हणून ही वेगमर्यादा घालणे आवश्यक होते. या कामाची कल्पना लोको पायलटला पुण्यात गाडीची जबाबदारी घेण्याआधी लोको पायलट लॉबीतील इंजिनियरींग फाईलवूरन मिळालेली होती. शेलारवाडीच्या पुढे टी/पी बोर्ड ओलांडल्यावर मात्र प्रगतीने पुन्हा वेग पकडला. आता घोरावाडी ओलांडत तळेगावच्या वेशीवर प्रगती आली होती. प्रगतीच्या आधी पाऊणतास पुण्याहून निघालेली ११०२४ कोल्हापूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सह्याद्री एक्सप्रेस अजून तळेगावपर्यंतच पोहचली होती. त्यामुळे रोजच्या प्रमाणे सह्याद्रीला प्लॅटफार्मवर (लूप वर) घेऊन प्रगतीसाठी मार्ग मोकळा करून देण्यात आला होता. हे सह्याद्री आणि प्रगतीचे नियमित क्रॉसिंग.

पुढे ५ च मिनिटांत ८.३२ ला लोणावळा-पुणे लोकल क्रॉस झाली. आता मीही नाश्ता -चहा सुरू केला. तोपर्यंत बऱ्याच जणांचा नाश्ता वगैरे आवरल्यामुळे डुलक्या सुरू झाल्या होत्या. माझ्या शेजारी बसलेली ती ५-६ वर्षांची मुलगीही माझ्या खिडकीतून येणाऱ्या थेडगार वाऱ्यामुळे गारठून मुटकूळं करून झोपली होती. माझा नाश्ता सुरू असतानाच ८.३५ ला कामशेत क्रॉस करतेवेळी वळणामुळे पलीकडचा इन्टरमिडिएट स्टार्टर डबल यलो दिसला. मनात विचार आला की, काय झालं. आज प्रगतीला काय झालं आहे. सारखा यलो, डबल येलो सिग्नल मिळत आहे आणि नेहमीसारखी वाटत नाही आहे आज ही प्रगती. पण काही नाही पुढे लगेचच वेग घेत प्रवासातल्या पहिल्या व्यावसायिक थांब्याकडे प्रगती आम्हाला घेऊन निघाली होती.

पण पुन्हा ८.४२ ला मळवलीमध्ये वेग इतका मंदावला की, मला वाटले आता इथे १-२ मिनिटांकरता डिटेन होणार बहुतेक. पण तेवढ्यात स्टेशन मास्तरच्या हातातला प्रोसिड सिग्नल दिसला आणि म्हटले, म्हणजे डिटेंशन नाही आहे येथे. अखेर ८.४८ ला नियोजित वेळेपेक्षा १० मिनिटे उशीरा लोणावळा आले होते.

लोणावळ्याच्या फलाटांच्या आधीच्या डाऊन डिस्पॅच यार्डात गुत्तीचे दोन डब्ल्यूडीजी-४ कार्यअश्व कंटेनरच्या गाडीसह पुढचा प्रवास सुरू करण्यासाठी परवानगी मिळण्याची वाट पाहत होते. त्याचवेळी खालून कर्जतहून आणखी एक कंटेनर गाडी घेऊन नवा कोरा निळा-पिवळा डब्ल्यूडीजी-४डी हा कार्यअश्व कल्याणच्या तीन बँकर्सच्या मदतीने घाट टढून आला होता आणि आता तो पुढे डिस्पॅच यार्डात निघाला होता. नेहमीप्रमाणे लोणावळा आल्यावर प्रवाशांपेक्षा सगळ्यात आधी चहावाले, फेरीवाले, पाणी बाटल्यावाले, चिक्कीवाले, वडापाववाले यांचा लोंढा आत शिरला आणि त्यांनी आपल्या टिपीकल स्टाईलमध्ये कर्कश्य आवाजात प्रवाशांचे लक्ष वेधून घेण्यास सुरुवात केली. त्यांच्या मागून मग प्रवासी आत येऊ लागले. आज प्रगती इकडेही जरा जास्तच थांबली होती. ८.५४ ला लोणावळ्याहून निघालेली प्रगती ९.०३ ला खंडाळ्यात दाखल होत असतानाच तिकडून २२१०५ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-पुणे इंद्रायणी एक्सप्रेस धडाडत लोणावळ्याकडे निघून गेली.

लोणावळ्यानंतर लगेच चेकर येऊन गेला. दरम्यान लोणावळ्यात शिरलेल्या बासरीवादकाने वादन बराचवेळ सुरू होते. घाटामध्ये मंकी हिल अगदी सावकाश क्रॉस केल्यावर नागनाथ केबीनलाही आज दोन मिनिटांच्यावर प्रगतीने विसावा घेतला होता. तेव्हा खाली असलेल्या ४-५ घरांच्या गावात चाललेल्या हालचाली दिसत होत्या. पुढे जामरुंगसुद्धा हळूच क्रॉस केले. पळसधरीच्या जवळ आल्यावर खाली खोपोलीहून सीएसटीकडे जाणारी लोकल आमच्या बरोबरीने निघालेली होती. प्रगतीशी शर्यत लावण्याच्या पवित्र्यात असलेली लोकल अखेर पळसधरीमध्ये थांबली आणि प्रगती पुढे निघून गेली. काहीच क्षणांमध्ये कर्जतच्या स्टेशन परिसरात प्रवेश केला तेव्हा ४ मालगाड्या दोन अप दिशेने आणि १ डाऊन दिशेने लोणावळ्याकडे जाण्याची वाट पाहत असलेल्या दिसल्या.

शेवटी ९.४५ ला कर्जत आले, तेव्हा माझ्या सीटच्या जवळ असलेला एक जण म्हणू लागला - अरे आज बरीच लेट केली आहे गाडी. खरंच तब्बल ३५ मिनिटे लेट होती गाडी. इकडे आल्यावर परत कर्जतच्या वडापाववाल्यांची घाईगडबड होतीच. प्रगती निघत असतानाच खोपोलीहून आलेली मगाचची लोकल पलीकडच्या फलाटावर दाखल झाली. ९.४८ ला प्रगतीला निघण्याची परवानगी मिळाली. पुढे अपेक्षेप्रमाणे १०.०२ ला चौक स्टेशनमध्ये ११०२५ भुसावळ-पुणे एक्सप्रेस लूपवर थांबवून प्रगतीचा मार्ग मोकळा करण्यात आला होता. आज प्रगती लेट असल्यामुळे ही गाडी अलीकडेच क्रॉस होईल वाटत होतेच. प्रगतीला हे स्टेशन क्रॉस करण्यात काहीच हरकत नाही हे दर्शवण्यासाठी ११०२५ चा असिस्टंट लोको पायलट आणि गार्डने प्रगतीला हिरवे बावटे दाखवले होते. पुढे १५ मिनिटात पनवेल गाठले, तेव्हा शेजारून ७१०८९ दिवा-रोहा डेमू निघून गेली. ती पण आज २१ मिनिटे लेटच होती. पनवेलमध्ये शेजारच्या फलाटावर पनवेल-नांदेड स्पेशल उभी होती.

दोनच मिनिटांनी पनवेल सोडताना हार्बर लाईनवरून एक-एक लोकल अप-डाऊन दिशेने धडाडत गेल्या. पनवेलच्या ॲडव्हांस स्टार्टरजवळ Entering Automatic Block System Board होता, तो साक्ष देत होता आता तुम्ही मुंबईच्या वेगवान इलाक्यात आला आहात म्हणून. पनवेलनंतर प्रगतीचा वेग तसा मंदावलेलाच होता. १०.४१ ला निळज्यामध्ये होम पिवळा मिळाल्याने वेग आणखीनच खालावला. दरम्यान पुढे स्टार्टर हिरवा होऊनही वेग घेण्यात वेळ गेला. अखेर दिवानंतर मुंब्राच्या खाडीच्या अलीकडे प्रगतीला दोन मिनिटे थांबावे लागले. त्यानंतर खाडी ओलांडल्यावर पुन्हा पार्सिक बोगद्याच्या तोंडाशी ३-४ मिनिटे थांबावे लागले. त्यावेळी आजूबाजूच्या दुकानांमध्ये, रस्त्यांवर चालेली वर्दळ गाडीतून सगळ्यांचे लक्ष वेधत होती. प्रगती पुढे जाऊ लागल्यावर लक्षात आले की, बोगद्यात अप लाईनवर काम सुरू आहे. म्हणून हा बोगदाही प्रगतीने तसा हळुवारपणे ओलांडला. मजल दरमल करत ११.११ ला प्रगती ठाण्यात दाखल झाली आणि गाडीतील गर्दीही ओसरू लागली. आता सगळीकडे लोकांची आणि लोकल्सचीही मुंबईतील टीपिकल पळापळी नजरेस पडू लागली.

ठाण्यात आम्ही दाखल होत असताना ७ नंबरवरून ११०६२ मुझफ्फरपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस पवन एक्सप्रेस पुढे सोडण्यात आली होती. ११.१३ ला ठाणे सोडत असतानाच इटारसीच्या लाल रंगाच्या डब्ल्यूएपी-४ या कार्यअश्वाबरोबर ११०५९ लोकमान्य टिळक टर्मिनस-छापरा गोदान ठाण्यात शेजारच्या फलाटावर शिरली. ठाण्यानंतर मात्र प्रगती खऱ्या अर्थाने प्रगतीसारखी पळू लागली होती. इतकी फास्ट पळू लागली की, विक्रोळीमध्ये आम्ही या पवन एक्सप्रेसला गाठत होतोच, पण तेवढ्यात आमच्या फास्ट लाईनवर काम सुरू असल्यामुळे प्रगतीला वेग बराच कमी करावा लागला. यात पवन पुढे निघून गेली. मिनिटभरातच प्रगती पुन्हा प्रगतीसारखी पळू लागली आणि घाटकोपरला पवनला मागे टाकून पुढे निघून गेली. दरम्याच्या डब्ल्यूएपी-४ या कार्यअश्वाच्या सारथ्याखाली निघालेली १२५४२ लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर एक्सप्रेस प्रगतीला क्रॉस करून ठाण्याच्या दिशेने निघून गेली. मजल दरमजल करत प्रगती ११.३३ ला दादरला आणि ११.५० ला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला (३५ मिनिटे उशीरा) पोहचली.
---

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलंय. पुणे मुंबई ट्रेन प्रवास खूप आवडतो. पुढच्या वेळी भारतात गेल्यावर माझ्या मुलीला हा अनुभव देण्यासाठी प्रगती किंवा डे.क्वी./डे.ए. ने एक ट्रिप करायचा प्लॅन आहे.

तुमचे हे ट्रेन्सवरचे लेख सुरेश प्रभूंपर्यंत पोचायला हवेत.

पराग.....छान लेख....मला भरपुर अनुभव आहे प्रगतिचा....दर वेलेस दक्खन रानि मीस होते माझी.......!!!!

डिटेल्स खुप जास्तं आहेत असे वाटले. पण पुणे मुंबई ट्रेन प्रवासाशी खुप छान आठवणी निगडित आहेत त्यामुळे आवडले वाचायला.

लेख आवडला. प्रगती , दख्खन राणी पेक्षा आमचा प्रवास संध्याकाळच्या इंटरसिटीने जास्ती व्ह्यायचा. आणि येताना इंद्रायणी किंवा संध्याकाळची प्रगती.

रच्याकने त्या कोल्हापूर लेखाचा दुसरा भाग लिहीणार होता ना ?

हो, पुण्याला परत येताना माझी पण पसंती तशी १२१२३ दख्खनच्या राणीलाच. कटलेट खात गाडीच्या हालचालींकडे लक्षही ठेवण्यातली मजा औरच

.

सकाळी दख्खनच्या राणीचा प्रवास म्हणजे पर्वणीच. एक तर येरवाळी उठून गाडी पकडलेली असते.
अशात थोड्या वेळाने तुफ्फान भूक लागते, मग पॅन्ट्रीत बसून सुर्याची कोवळी कोवळी उन्हं अंगावर घेत ऑम्लेट, बेक्ड बिन्स ऑन ब्रेड खाणं, वरून एक मस्त चहा किंवा कॉफी पिणं (चहा कॉफी खास नसते) पण त्यावेळी चालते. आहाहा.. Happy

मला तर बुवा दख्खनची राणीच आवडते. >>>> मलापण.

पुण्याला येताना जरी दख्खन ची राणी दादर ला थांबत नसली, तरी पहिली पसंती याच गाडीला दिली जाते माझ्याकडून.

प्रगतीला काही वर्षांपुर्वी खानपानसेवेचं Contract, दिवाडकरांना दिलं होतं बहुतेक. अजूनही त्यांच्याकडेच आहे का ते? त्यावेळेस, रेल्वेच्या ठराविक नाश्त्याच्या बरोबर, साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडे, पोहे हे पण मिळायचे प्रगति एक्सप्रेस मध्ये.

तरी पण डेक्कन क्वीन ती डेक्कन क्वीनच. त्या प्रवासाची मजा काही औरच.

१२१२८ इंटरसिटी एक्सप्रेसने प्रवास करायचा आहे, पुण्याहून सकाळी मुंबईला जाऊन संध्याकाळी परतणाऱ्यांसाठी ही गाडी सोयीची नाही म्हणून तिचा प्रवास घडत नाहीए. पुणे - मुंबई मार्गावरची सगळ्यात फास्ट गाडी आहे ही

तीन वर्षांपुर्वी प्रगतीच्या मासिक पासधारकांच्या डब्यातुन एक महिना प्रवास केल्याचा अनुभव गाठीस जमा आहे.

तीन वर्षांपुर्वी प्रगतीच्या मासिक पासधारकांच्या डब्यातुन एक महिना प्रवास केल्याचा अनुभव गाठीस जमा आहे.>>> अरेरे ह्या अडग्या लोकांबरोबर प्रवास म्हणजे त्रासच. गाडी आपल्या बापाची असल्यागत वागतात.

मी मुंबई पुणे इंटरसिटीने एकदा प्रवास केला आहे.
पुर्वी हिचे नाव शताब्दी एक्स्प्रेस होते आणि भाडे ही बरेच होते त्याला.
नंतर ती बंद झाली आणि इंटरसिटी नावाने पुर्नजन्मित झाली.

जेव्हा पुणे मुंबई शताब्दी होती तेव्हा मला त्यातून प्रवास करण्याची अनावर इच्छा होती पुर्ण कधी झालीच नाही.

पुणे मुंबई बहुधा दुपारी होती ४ च्या पुढे बहुधा. मी अशीच तिच्या पुढच्या एक्स्प्रेस ने मुंबईला जात होते आणि कर्जतला दिवाडकर वडा खाताना ही पास झाली, तिचं ते रुपडं आणि वेग पाहून माझा वडा हातात राहिला आणि तोंडाचा वासलेला आ कितीतरी वेळ तसाच होता Lol कर्जत ला ही थांबत नसे.

तीन वर्षांपुर्वी प्रगतीच्या मासिक पासधारकांच्या डब्यातुन एक महिना प्रवास केल्याचा अनुभव गाठीस जमा आहे.>>> अरेरे ह्या अडग्या लोकांबरोबर प्रवास म्हणजे त्रासच. गाडी आपल्या बापाची असल्यागत वागतात.

>>> mandard मी पण पासधारक होतो तर....... Lol

<< पुर्वी हिचे नाव शताब्दी एक्स्प्रेस होते >>
पूर्वी इंटरसिटीचे नावच शताब्दी होते असे नाही तर तिचे वेळापत्रक सोडून सगळेच रुपच वेगळे होते. भाडे प्रचंड असल्यामुळे ती शताब्दी कधीच रेल्वेच्या दृष्टीने लाभदायक ठरली नाही.

मस्त. खूप वर्षांत पुणे मुंबई आगगाडीचा प्रवास झाला नाहीये. पूर्वी केलेल्या प्रवासाचा पुनरानुभव मिळाल्यासारखे वाटले Happy

एक्सप्रेस वे सुरू झाल्यावर मध्यंतरी काही वर्ष कमी झालेली प्रगतीची गर्दी आता पुन्हा वाढली आहे.

एक्स्प्रेस वे सुरू होण्यापुर्वी लोकांनी फार स्वप्न पाहिली होती की आता रोडने खूप लवकर मुम्बईत पोहोचू वगैरे.
पण आता तिथली अवस्था पाहता पुन्हा आपली रेल्वेगाडीच बरी असे वाटून पुन्हा इकडे वळले असावेत.

<<एक्स्प्रेस वे सुरू होण्यापुर्वी लोकांनी फार स्वप्न पाहिली होती की आता रोडने खूप लवकर मुम्बईत पोहोचू वगैरे.
पण आता तिथली अवस्था पाहता पुन्हा आपली रेल्वेगाडीच बरी असे वाटून पुन्हा इकडे वळले असावे<<>>
-- एकदम बरोबर --

२७ डिसेंबर २०१६ म्हणजे प्रगतीचा वाढदिवस. या दिवशी प्रगतीला २५ वर्षे पूर्ण होत आहेत.
HAPPY BIRTHDAY, PRAGATI!

आजच प्रगतीचा अप-डाऊन मुद्दामहून प्रवास करून आलो. प्रगतीला २५ वर्षे पूर्ण झाली ना आज म्हणून प्रवासाचा बेत आखला.

Pages